fbpx
विशेष

आली गांधी पर्वणी…

पुढील वर्ष म्हणजे 2019 हे महात्मा गांधींचे शतकोत्तर सुवर्ण जयंती वर्ष आहे. केवळ भारतातच नव्हे तर साऱ्या जगभर हे वर्ष साजरं केलं जाईल. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तर हे वर्ष सादर करायला इतके आतूर झाले आहेत की त्यासाठी त्यांनी विविध कमिट्यांची स्थापनासुद्धा केली. या कमिट्यांवर वर्णी लागावी म्हणून अनेक गांधीवादी संस्थांचे पदाधिकारी सर्वतोपरी प्रयत्नशील आहेत. ज्यांची वर्णी लागली ते व ज्यांची नाही लागली तेसुद्धा वेगवेगळ्या पातळ्यांवर हे कार्यक्रम आपल्या देखरेखीखाली कसे होतील यासाठी प्रयत्नरत आहेत. वेळ पडल्यास स्वतंत्र चूल मांडण्याची त्यांनी तयारी केली आहे. यातले अनेक जण आणि संस्था जरी स्वतःला गांधींचे खरे वारसदार मानून काम करत असल्या तरी हा वारसा सांगण्याचा अधिकार ते केव्हाच गमावून बसले आहेत. कारण गांधीवादाचा वारसा म्हणजे संस्था, अधिवेशने, खादी, गांधीकथा आणि कर्मकांड असा सोयीस्कर समज त्यांनी करून घेतला आहे. शतकोत्तर सुवर्णजयंतीचा इव्हेंट साजरा करणं आणि तो आपल्याच आवडीच्या लोकांच्या वतीने साजरा करणं हीच त्यांना इतिकर्तव्यता वाटते. हे सर्व करताना राष्ट्रपित्याच्या देशात राष्ट्रपित्याच्या हत्येला थेटपणे जबाबदार असलेल्या विचारसरणीच्या सरकार सत्तेवर आहे आणि त्यांना गांधी त्यांच्या सोयीने वापरायचे आहेत याकडे गांधीवाद्यांनी दुर्लक्ष केलं आहे.

गांधीजींबाबत बेताल बरळण्याच्या नादात तथाकथित हिंदुत्ववादी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी बरोबरी करू शकेल, अशी दुसरी हिंदूत्ववादी संघटना शोधून काढणं कठीण आहे. तितकंच त्यांच्या खोटारडेपणाची बरोबरी करणारी संघटनाही शोधून काढणं मुश्कील आहे. ज्यांची स्थापनाच गांधीजींच्या सर्वसमावेशक राष्ट्रवादाला विरोध करण्यासाठी झाली आहे, ज्यांचं जीवन या विचारांनी संपवलं, महात्म्याची निंदा-नालस्ती केली, ज्यांनी गांधीजींच्या खुनाला जाणीवपूर्वक “वध” संबोधून खूनाचं गौरवीकरण केलं, ज्यांनी त्या खूनाचा आनंद मिठाई वाटून साजरा केला आणि ज्या संघटनेच्या परिवारातील इतर आजही त्या खूनाचं गौरवीकरण प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे करतात त्या संघाच्या सरकारला गांधींचा इतका पुळका कसा? त्यांचं गांधी प्रेम अचानक उचंबळून कसं आलं? दुर्दैवाने त्याचा विचार करण्याची शु्द्ध या गांधीवाद्यांना नाही.

संघ ही फॅसिस्ट विचारधाला आणि कार्यपद्धतीवर आधारित संघटना असल्याने खऱ्याखोट्याची कोणतीही चाड या संघटनेला नाही. स्वातंत्र्य आंदोलनात कोणताही सहभाग नसल्याने राजेंद्र प्रसादांपासून सुभाषचंद्र बोस, अगदी राजगुरू, भगतसिंग कसे संघाशी संबंधित होते हे सांगण्याची गरज संघाला भासते. त्यामुळे कोणत्याही पुराव्याशिवाय संघाची प्रचार यंत्रणा अत्यंत खुबीने अशा बातम्या अधूनमधून पेरत राहते. जिथे भगतसिंगसारख्या नास्तिक आणि समाजवादाच्या पुरस्कर्त्यावरही संघ दावा करू शकतो, तिथे रामनाम जपणारा, गोरक्षण, रामराज्य, स्वदेशी यांचे पुरस्कर्ते गांधी यांना आपल्याच गटामध्ये दाखवणं संघाला शक्य आहे. कारण गांधींचा राजकीय आणि सामाजिक विचार वगळून, अस्पृश्यता निवारण, हिंदू-मुस्लिम एेक्य आणि सेक्युलरिझमचा पुरस्कार या गोष्टी संघ सोयीस्कररित्या विसरतो. गांधींना अशापद्धतीने सोयीस्कररित्या स्वीकारण्याचा संघाचा प्रयत्न नवीन नाही. गांधी जन्मशताब्दी वर्षापासून म्हणजे 1969 पासूनच संघाने हा प्रयत्न सुरू केला आहे. 1969 मध्ये संघाचे गुरूजी मा. स. गोळवलकर जिवंत होते. त्यावेळी संघ स्वयंसेवकांचा आविर्भाव जणू गांधीजींचा आत्माच गोळवलकरांच्या शरिरात वास करत आहे, असा होता. गोरक्षणाच्या कार्यक्रमांमधून नरेंद्र मोदींच्या मांडीला मांडी लावून बसणारे सर्वोदयी गोरक्षण हे संघाचंच कार्य आहे याचे प्रमाणपत्र प्रदान करत असतात. गांधीजींचा गोवंशवृद्दीचा कार्यक्रम ते गोरक्षणाच्या नावाने गुंडागिरी करणाऱ्या विश्व हिंदू परिषद आणि तत्सम संघटनांच्या पातळीवर आणून ठेवतात. गांधी शतकोत्तरी सुवर्ण जयंती साजरी करण्यासाठी संघाला अशा गोरक्षकांती असलेली गरज गांधीवादी पुरवत आहेत. केवळ हिंदू-मुस्लिम द्वेषभावना पसरवण्याचा संघाचा गोरक्षणाचा कार्यक्रम आणि गांधींच्या गोवंशवृद्धीचा कार्यक्रम जणू एकच असल्याचा चित्र उभं करण्याचा संघ प्रयत्न करत आहे. त्याला गांधीवादी कुठेतरी मदत करत आहेत.

संघाला गांधींना केवळ सोयीस्कर पद्धतीने वापरायचं नाही तर गांधींचे शुल्लकीकरणही करायचं आहे. “गोडसेने गांधींचा वध केला ” असं म्हणत एकीकडे गांधींना रावण बनवायचं आणि नथुरामाला रामाची बरोबरी द्यायची हा कावा गेली 70 वर्ष राबवला जात आहे. गांधींना मारलं हे चूक पण नथुरामाचा हेतू वाईट नव्हता, असं म्हणून गांधीजींच्या खूनाचं समर्थन मोठ्या खुबीने चाललं आहे.

पण एवढ्यावरच फॅसिस्ट समाधान मानत नाहीत. म्हणूनच संघ आता महात्म्याचे योजनाबद्ध शुद्धीकरण करत आहेत.

सत्तेवर आल्या आल्या म्हणजे 2 अॉक्टोबर 2014 पासूनच संघाच्या सरकारने स्वच्छ भारत अभियानाची घोषणा करून गांधीजींच्या हातात झाडू दिला. गांधीजींचा झाडू दाखवून भाजपने त्यांचे इतर महत्त्वाचे कार्य उदाहरणार्थ हिंदू-मुस्लिम एेक्य, अहिंसा, सत्य, सर्वधर्मसमभाव याला हरताळ फासला. ही गोष्ट लोकांसमोर स्पष्टपणे मांडण्याचा प्रयत्न इव्हेंट साजरा करणारे गांधीवादी करताना दिसत नाहीत. त्यावेळी फारसा विरोध न झाल्याने संघाची आणि पर्यायाने भाजपची भीड आणखी चेपली गेली. मग महात्मा गांधींच्या चरख्यावर मोदी सूत कताई करू लागले. खादी ग्रामोद्योग महामंडळ ही संस्था दरवर्षी गांधीजींची दैनंदिनी प्रकाशित करते. या दैनंदिनीवर दरवर्षी सूत कातताना गांधीजींचा फोटो असायचा. त्याजागी रुबाबदार कपड्यातले महात्मा मोदी आले. महात्मा गांधींची जागा मोदींनी घेऊ पाहिली. त्यावर जो काही थोडा-फार विरोध झाला त्याला आलेलं उत्तर म्हणजेही गांधींचं शुल्लकीकरणच होय. मोदींच्या फोटोमुळे खादीच्या विक्रीत वाढ होतो, असं सरकारकडून सांगण्यात आलं. पण सर्वांनी गांधीजींचा हा अपमान सहन केला. उत्पादनाची साधनं ही उपभोक्त्याच्या हाती असावीत हे खादी ग्रामोद्योगाचं मूलत्त्वं डावलून महात्मा मोदी खादीची विक्री वाढवून नफा कमवण्याचे अर्थशास्त्र भारताला शिकवून गांधींच्या तत्त्वांचं अवमूल्यन करत आहेत.

अहिंसेच्या प्रस्थापनेसाठी जगणाऱ्या आणि अहिंसेसाठीच आपलं जीवन समाप्त करून घेणाऱ्या राष्ट्रपित्याच्या देशात केवळ एक व्यक्ती किंवा समाज आपल्या धर्माचा नाही असं कारण देऊन हिंसेचा यथेच्छ वापर केला जात आहे. केवळ तेवढ्याने फॅसिस्ट वृत्तीचं समाधान होत नाही तर त्यापुढे जाऊन निर्लज्जपणे हिंसेचं समर्थन केलं जातं. त्यासाठी लव जिहाद, घर वापसी, रामजादे-हारामजादे हे परवलीचे शब्द ठरवले गेले आहेत. 2015 मध्ये गोमांस खाल्ल्याच्या संशयावरून महंमद अखलाख याची जमावाने हत्या केली. या विकृत हत्येतील एका आरोपीचा तुरुंगात मृत्यू झाला. त्याचं शव तिरंग्यामध्ये गुंडाळून त्याची अंत्ययात्रा काढण्यात आली. त्या भागातल्या भाजपचे आमदार, खासदारही त्यात सहभागी झाले जणूकाही अखलाखची हत्या ही देशाच्या सीमेवर जागवलेलं शौर्य होतं. कथुआमध्ये 8 वर्षांच्या मुलीवर अमानवी बलात्कार होतो. देवळात हे कृत्य होतं आणि त्याच्या आरोपींना पकडल्यावर कारवाई होऊ नये म्हणून सत्ताधारी भाजपचे नेते उघडपणे दबाव टाकतात. भाजपचे दोन मंत्री, संघाशी संबंधित संघटनांसह आणि वकिलांना घेऊन रस्त्यावर उतरतात. हे नक्की कशाचं द्योतक आहे? या सरकारने बलात्कारासारख्या घाणेरड्या गुन्ह्यालाही हिंदू-मुस्लिम असा धार्मिक रंग दिला. उन्नावमध्येही बलात्कार केलेल्या मुलीच्या बापाने भाजपच्या आमदाराच्या अटकेची मागणी केली तर त्याला पोलिस स्टेशनमध्येच मारून टाकण्यात आलं. हा गांधींना अभिप्रेत असणारा भारत आहे का ?

हे सर्व होत असताना गांधीजन आणि त्यांच्या संस्था शतकोत्तर गांधी सुवर्णजयंतीच्या शासकीय समितीमध्ये वर्णी लावून घेण्यासाठी खटपट करतात, जातीयवादी-फॅसिस्ट शासनाच्या समितीमध्ये सामील होतात हे अशोभनीय आहे. स्वतःला गांधींची माणसं म्हणवून घेण्याचा अधिकारच या लाचारांनी गमावला आहे. संघाच्या नथुरामाने गांधीजींचा खून केला नाहीतर स्वतःला गांधीवादी म्हणवून घेणारी ही मंडळी संघाच्या शाखेवर जाऊन नमस्ते सदावत्सले करत असती. गांधींच्या हत्येने संघाचं समाधान झालेलं नाही. त्यांना गांधी विचारही संपवायचे आहेत. दुर्दैवाने गांधींच्या नावाने दुकानदारी करणारी मंडळी त्यासाठी सहाय्य करत आहेत. अशी दुकानदारी करणारी माणसंच गांधीजींच्या नावाने असलेल्या संस्थांमध्ये जागा अडवून बसले आहेत. गांधी विचारांचा निःपात करायला निघालेल्या संघाच्या या फॅसिस्ट सरकराला विरोध न करणे हा गांधीशी द्रोह आहे. अशा सरकारच्या समित्यांमध्ये सामील होणं ही गांधींची प्रतारणा आहे नव्हे त्यांची दुसरी हत्याच आहे.

 

लेखक  गांधीवादी विचारवंत असून “जातीयवादी राजकारणाचा अन्वयार्थ” हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे.
 

Write A Comment