fbpx
विशेष

एक आसाराम गजाआड, बाकीच्यांचं काय?

अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून आसाराम बापू याला आज जोधपूर न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. एखाद्या धार्मिक गुरूवर लैंगिक शोषणाचा आरोप काही नवीन नाही. याआधी डेरा सच्चा सौदाचा राम रहीम सिंग याच्यावरही लैंगिक शोषणाचा आरोप होऊन तो तुरुंगाची हवा खात आहे. महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांमध्ये लाडकं व्यक्तीमत्व भय्यू महाराज याच्यावरही एका महिलेने फसवणूकीचा आरोप केला आहे. बाबा रामदेव तर आयुर्वेदिक उत्पादनांच्या नावाखाली फसवणूक करत असल्याचं सरकारी यंत्रणांनी सांगूनही सरकार दरबारी त्यांना असलेला मान-सन्मान खूपच मोठा आहे. त्यांनी आयुर्वेदाच्या नावाखाली उत्तराखंडमध्ये एक प्रचंड साम्राज्य उभं केलं आहे. प्रत्येक बाबाच्या मागे अशापद्धतीने फसवणूकीपासून बलात्कार, खून असे कितीतरी आरोप लागतात. पण त्यातले फारच थोडे आरोप सिद्ध होतात. मात्र धर्माच्या नावाखाली या बाबा-गुरूंनी साठवलेली संपत्ती, त्यांनी बळावलेल्या जमिनी, त्यांचे आश्रम, भक्तगण, सरकार दरबारी त्यांचा राबता या सर्व गोष्टी डोळे दिपवून टाकणाऱ्या असतात.

आसाराम याला जेव्हा लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अटक केली तेव्हा त्याच्या महिला भक्तगणांनीही धुडगूस घातला. राम रहिमला बलात्काराच्या आरोपाखाली अटक होऊ नये म्हणून तर पंजाब-हरयाणा राज्यांमध्ये युद्धाचं स्वरूप आलं. त्याचे भक्तगण तर लढाईवर चाललेल्या सैनिकांसारखे पोलीस आणि पत्रकारांवर तुटून पडलेले दिसले. राधे मां या बाईवर मध्यंतरी असेच आरोप झाले असता तिच्याही भक्तगणांनी गोंधळ घातला. आसारामला शिक्षा सुनावली त्यावेळीही त्याचे भक्तगण प्रतिक्रिया देत होते की, आमची लीगल टीम या निकालाचा अभ्यास करून पुढे अपील करेल. म्हणजे लैंगिक शोषण करणाऱ्या त्यांच्या गुरुविषयी या भक्तांच्या डोळ्यावरची आंधळेपणाची पट्टी अजूनही उघडली नव्हतीच किंवा आपल्या गुरूला आपण पैसा आणि राजकीय संपर्काच्या जोरावर सहज सोडवू शकू ही असलेली गुर्मी असेल.

आसारामसारखे बुवा-बाबा हे भारतीय समाजामध्ये कायम अध्यात्माच्या नावाखाली धर्म आणि राजकीय व्यवस्था यांचा पुरेपूर वापर करून शक्तीमान होऊ पाहतात. एकदा ती ताकद त्यांच्यामध्ये आली की त्यांचे लैंगिक शोषण, बलात्कार, खूप असे गुन्हेही माफ होतात. आसाराम बापूवर याआधी २००८ मध्ये त्याच्या आश्रमातल्या चार मुलांचा अनैसर्गिक मृत्यू झाल्याने खूनाचा आरोपही झाला. तत्कालीन गुजरात सरकारने त्याच्यावर चौकशीचे आदेशही दिले. पण आपल्या गुरूच्या समर्थनार्थ भक्तगण पुन्हा रस्त्यावर उतरले आणि गोंधळ घातला. त्या तपासाचं पुढे काहीच झालं नाही. असं काही घडलं की या गुन्हेगार माणसाला एवढा मान-सन्मान असण्याचं कारण काय हा प्रश्न निश्चितच उभा राहतो.

कोणताही बाबा असो, तो लोकांच्या अगतिकतेचा फायदा घेतो. ती अगतिकता गरीब माणसालाही असते आणि श्रीमंत माणसालाही. त्यामुळे दोन्ही वर्गातले भक्तगण अशा बाबांकडे रांगेत उभे राहिले तर नवल वाटायला नको. काही वर्षांपूर्वी मुंबईमध्ये वैद्यकीय पेशातून निवृत्ती घेऊन अनिरुद्ध बापू म्हणून एक गुरू उदयाला आले. त्यांच्या दरबारी प्रवचन एेकण्यासाठी कसे शास्त्रज्ञ येतात याच्या चुरस कथा त्यांच्या नावाने छापल्या जाणाऱ्या पुस्तकांतून येत होत्या. त्यामुळे बाबांकडे जाणाऱ्या लोकांमध्ये सुशिक्षित-अशिक्षित असा काहीच फरक नसतो. त्यांना केवळ मानसिक समाधान करून घेण्यासाठी उत्तर शोधायचं असतं. हतबल झालेले, आयुष्यामध्ये दिशा न मिळणारे असे अनेक लोक या बाबांच्या नादाला लागतात. पण त्यांच्यातही विशिष्ट जाती धर्माचे लोक जेव्हा या बाबांकडे जाऊ लागतात तेव्हा ती एक वोट बँक म्हणून हे बाबा त्याचा पुरेपूर वापर राजकारण्यांना आपल्या मुठीत ठेवण्यासाठी करतात. सच्चा डेरा सौदा हे याचंच एक उत्तम उदाहरण होतं. त्याने गरीब-मध्यमवर्गातल्या अनेक जातींना आपल्या इतकं जवळ ओढलं होतं की, हरयाणामध्ये जिंकून येण्यासाठी त्या राजकीय पक्षाला या राम रहीमचे पाय धरावे लागायचे. त्याशिवाय भारतीय समाजामध्ये एकूणच स्त्री-पुरुष भेदभाव, स्त्रियांचं दुय्यम स्थान, स्त्री-पुरुष एकत्र येण्यासाठी मज्जाव याचाही फायदा या बाबांना मिळतो. एखाद्या लग्नं झालेल्या बाईला मित्र असणं हे भयंकर मानलं जातं. लग्नं झालेल्या पुरुषाच्या बाबतही तेच लागू होतं. त्यामुळे या आश्रमांमध्ये स्त्री-पुरुषांना उघडपणे एकत्र येता येतं. सर्वसाधारण ग्रामीण असो की शहरी भागामध्ये मी एकटीच फिरायला जाते, असं किती बायका म्हणू शकतात? पण मी बाबांकडे किंवा कोणत्यातही गुरूकडे जाते हे घरच्यांना अधिक पटू शकतं. त्यामुळे मोठ्या प्रमाणात महिला वर्ग या बाबांच्या नादी लागलेला दिसतो. रोजच्या कौटुंबिक कामातून बाहेर पडून सोशलायझेशन करायला या महिलांना बाबांचे आश्रम, त्यांची प्रवचनं हे उत्तम कार्यक्रम असतात. पण या गोष्टी एवढ्यावर थांबत नाहीत. या महिलांच्या मनातल्या असुरक्षित भावनेचा फायदा या आश्रमातून उचलला जातो आणि लैंगिक शोषण, बलात्कार याला सुरुवात होते. कोणी महिला स्वतःहून यासाठी तयार असेल तर गोष्ट वेगळी पण तिच्यावर जबरदस्ती करून, धाक दाखवून आणि धमकी देऊन या गोष्टी होतात. या आश्रमातल्या अनेक गोष्टी या इतक्या गूढ असतात की बाहेरच्या जगाला, पोलिसांनाही त्याचा थांग पत्ता नसतो. हे सर्व दुष्कृत्य करताना थोडेफार पैसे सामाजिक कार्यासाठी देऊन स हे बाबा आपली प्रतिमा चांगली राहिल याकडे जास्त लक्ष्य देतात. पैसा, सत्ता, राजकीय जवळीक यावर या बाबांचं साम्राज्य उभं राहतं. रजनीश यांनी अध्यात्मिक गुरू बनताना सेक्स ही गोष्ट खुली करून टाकली. धर्माचा आधार घेण्याएेवजी त्यांनी धर्मांधतेवर टीका केली. मात्र त्यांचं समाजातलं वाढतं महत्त्वं, त्यांच्याकडे जमा होणारा डॉलर्समधला पैसा हा सरकारच्या डोळ्यात नक्कीच खूपू लागला आणि त्यांनी शेवटी देश सोडून अमेरिकेमध्ये आपलं बस्तान बसवलं.

आसाराम याचा जन्म फाळणीच्या पूर्वी पाकिस्तानात झाला आणि नंतर त्याच्या कुटुंबासह तो गुजरातमध्ये स्थायिक झाला. असूमल सिरूमलानी हे त्याचं खरं नाव. एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या या आसारामने शिक्षण अर्धवट सोडलं आणि सायकल रिपेर, चहाची टपरी चालवणं अशी लहान-मोठी कामं करून पाहिली. पण कशातच त्याला यश आलं नाही. त्यामुळे आपण राहत असलेल्या घरीच त्याने आश्रम उघडून बाबागिरीला सुरुवात केली. बाबागिरी हा भारतामध्ये उत्तम व्यवसाय असल्याने आसारामला अर्थातच यश आलं. त्याने अध्यात्म आणि धर्म याच्यावर प्रवचन देताना सत्ताधाऱ्यांनाही आपलंसं केलं. आधी गुजरातमधल्या काँग्रेस सरकारने व नंतर भाजप सरकारने त्याला आश्रमासाठी जागा दिली. वाढता प्रतिसाद पाहता त्याला जागा मिळवण्यासाठी सरकारची गरज नव्हती. त्याने अनेक ठिकाणी जागा बळकावून आपले आश्रम बांधले.  आसाराम बापूवर जेव्हा पहिल्यांदा आरोप झाले तेव्हा त्याच्या समर्थनार्थ भाजपचे नेते उमा भारती, कैलाश विजयवर्गीय, प्रभात झा लगेच धावून आले. त्यावेळी त्यांना या बापूला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करावीशी वाटलं नाही. इतर लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यांमध्ये तर फाशीच्या शिक्षेची मागणी करायला ते कायम पुढे असतात. आसारामची बायको आणि मुलगी यांनी स्वतः आसारामच्या लैंगिक शोषणविरोधात साक्ष दिली आहे. भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामीसारखे लोक तर या तक्रारी बोगस असल्याचा कांगावा करत होते. यावरून आसाराम बापूचं राजकारण्यांमध्ये असलेलं वजन दिसून येतं.

आसाराम बापूनेही अशाच पद्धतीने आपलं राजकीय स्थान अबाधित करून घेतलं. त्याचवेळी भक्तांच्या आणि त्यांच्याकडून मिळणाऱ्या पैशांच्या जोरावर सरकारी यंत्रणेला समांतर अशी एक यंत्रणा उभी करण्याचा प्रयत्न केला. मग त्यात आश्रम, स्वतःची वैद्यकीय सुविधा अशा अनेक गोष्टींचा भरणा होता. बरं त्याच्या प्रवचनामध्ये उपदेशही अशापद्धतीने विकृत असायचा की तेव्हाही त्याचे भक्तगण सावध झाले नाहीत. हिंदू बायकांनी जास्त मुलं जन्माला घालावीतपासून अनेक अकलेचे तारे या आसारामने तोडले आहेत. पण जेव्हा दिल्लीमध्ये निर्भया सामूहिक बलात्काराची घटना घडली तेव्हा यामध्ये त्या मुलीचीच चूक होती, असं बापूने निर्लज्जपणे सांगितलं. नंतर मग टीका झाल्यावर नेहमीप्रमाणे माध्यमांनी आपल्या बोलण्याचा विपर्यास केल्याची सारवा सारव त्याने केली. हिंदू मतं आसारामच्या माध्यमातून मिळत असल्याने राजकीय पक्षही चुप्पीच साधून राहिले. कदाचित राजकीय दृष्ट्या अडचणीचं वाटू लागल्याने आता आसाराम बापूवर या कारवाया होत असाव्यात. ते कालांतराने स्पष्टही होईल.

पण या सगळ्या कारवायांमधून बापूसारखे दुसरे बाबा निर्माण होणार नाहीत याची खात्री यंत्रणा देत नाही. सरकार ज्या गोष्टी करायला कमी पडतं त्याच गोष्टी या बाबांकडून केल्या जातात. राम रहीम तर लग्नं लावून देण्यापासून अनेक सामाजिक गोष्टी करत होता. अर्थातच त्याचं कधी समर्थन होऊ शकत नाही. कायद्याने वेळोवेळी जर आपलं अस्तित्व दाखवलं तर कदाचित निष्पाप लोक या बाबांच्याकडून होणाऱ्या शोषणापासून वाचतील विशेषतः लहान मुलं आणि अल्पवयीन मुली. तसंच आसाराम बापूला झालेल्या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिलं जाऊ शकतं. आसाराम तुरुंगात असला तरी त्याचे आश्रम, त्याने निर्माण केलेली संपत्ती यावर अद्याप सरकारचं नियंत्रण नाही. आसारामची स्वतःची यंत्रणा उत्तम पद्धतीने सुरू आहे. त्याला मदत करण्यासाठी ती यंत्रणा पूर्ण सज्ज आहे. वकील देण्यापासून ते उद्या परिस्थिती आलीच तर रस्त्यावर उतरून राडा करण्यापर्यंत त्यांची तयारी आहे. त्यामुळे केवळ आसाराम नाही तर त्याच्या संपूर्ण साम्राज्याला तडाखा बसला तर शोषणाचा बळी ठरलेल्या मुलींना खरा न्याय मिळू शकेल. एकाला तर शिक्षा मिळालीये. बाकीच्यांना कधी हा प्रश्न आहे.

लेखक न्यू जर्सी स्थित राजकीय विश्लेषक आहेत.

Write A Comment