fbpx
सामाजिक

हिंदू सौंदर्य वि. ख्रिश्चन सौंदर्य  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच आठवड्यामध्ये भाजपच्या आमदार, खासदार नेत्यांना कानपिचक्या देऊनही त्यांच्या वागण्या-बोलण्यात फरक पडलेला नाही. माध्यमांना “मसाला” पुरवू नका असं मोदींनी सांगितलं तरी भाजपच्या नेत्यांना वाट्टेल ते बोलल्याशिवाय राहवत नाही. पहिल्यांदाच त्रिपुराचे मुख्यमंत्री झालेले विप्लव देव यांनी इंटरनेट महाभारत काळात असल्याचा शोध लावल्यानंतर आता  डायना हेडन ही एकेकाळची विश्वसुंदरी ही भारतीय विश्वसुंदरी नाही असं विधान केलं. त्यांच्या मते, भारतीय सुंदरी या व्याख्येत फक्त एेश्वर्या रायच बसते. सौंदर्याबद्दल प्रत्येकाची व्याख्या वेगळी असू शकते. मात्र भारतीय सौंदर्याची व्याख्या ठरवणारे विप्लव देव कोण हा प्रश्न आहेच? मूळात देव यांनी केलेलं विधान हे केवळ सौंदर्याच्या व्याख्येपुरतं मर्यादीत राहत नाही तर त्याच्या मागे दडलेली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पर्यायाने भाजपची मानसिकता दिसून येते. मोदींनी केलेला उपदेश त्यामुळेच “तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो,” असा तर नाही ना, असं वाटून जातं. कारण गेल्या चार वर्षांमध्ये भाजपच्या विविध नेत्यांनी स्त्रीया, दलित, मुसलमान आणि इतर अल्पसंख्यांक समूह यांच्याबद्दल केलेली वक्तव्यं ही त्यांची फॅसिस्ट विचारधारा दाखवून देते.

साधं उदाहरण घेऊया. दुसरे सरसंघचालक गोळवलकर यांच्या “बंच अॉफ थॉट्स”मध्ये तर त्यांनी जाहीर करून टाकलंय की, हिंदू धर्म बदललेल्यांच्या मनात भारताविषयी प्रेम राहत नाही. “ जेव्हा आम्ही म्हणतो की, हे हिंदू राष्ट्र आहे तेव्हा ताबडतोब प्रश्न विचारला जातो की, या जमिनीवर राहणाऱ्या मुस्लिम आणि ख्रिश्चनांचं काय? त्यांचा जन्म इथेच नाही का झाला आणि त्यांची रोजीरोटी पण इथेच आहे. त्यांनी धर्म बदलल्यामुळे ते भारतासाठी परके कसे काय झाले? पण महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांना या गोष्टीची आठवण आहे का की, ते या मातीची मुलं आहेत? ….नाही. धर्म बदलल्यामुळे त्यांच्या मनातील देशाविषयीचे प्रेम आणि भक्ती कधीच संपून गेली आहे .” ते पुढे तर जाहीर करून टाकतात की, मुस्लिम, ख्रिश्चन आणि कम्युनिस्ट या देशाच्या अंतर्गत सुरक्षेला धोका आहे.

वि दा सावरकर यांनी तर अल्पसंख्यांक हे हिंदू राष्ट्राचा भागच होऊ शकत नाहीत हे जाहीर करून टाकलं आहे. “हिंदुत्वाचे काही महत्त्वपूर्ण घटक आहेत, एक राष्ट्र, एक जाती आणि एक संस्कृती. हे घटक एकत्र करून असं म्हणता येईल की, तो हिंदू आहे कारण सिंधुस्थान ही त्याच्यासाठी केवळ पितृभमी नसून पुण्यभूमी पण आहे. पहिल्या दोन गोष्टी राष्ट्र आणि जाती या पितृभूमी या शब्दाशी निगडीत आहेत तर तिसरा शब्द संस्कृती हा पुण्यभूमीशी निगडीत आहे. कारण संस्कृती म्हणजे संस्कार, प्रथा, परंपरा, रुढी ज्यामुळे तेथील जमीन एक पवित्र जमीन होते” (इसेंशियल्स अॉफ हिंदुत्व-पान ४४). याचाच एक अर्थ असा निघतो की, अल्पसंख्यकांसाठी त्यांच्या धर्मावरचा विश्वास आणि भारतीयत्व हे दोन्ही पर्याय एकाच वेळी निवडणं केवळ अशक्य आहे. हिंदुत्वावर आधारित ही हिंदू राष्ट्राची सत्यता आहे.

आता हा विचार जर त्यांच्या नेत्यांनी, पूज्यजनांनी दिला असेल तर आधुनिक काळामध्ये जन्माला येऊनही भाजपच्या तरुण पिढीला या विचारांचंच आकर्षण वाटत राहणार. डायना हेडन ही अँग्लो इंडियन ख्रिश्चन आहे आणि एेश्वर्या राय ही हिंदू. या दोघींनीही विश्वसुंदरी किताब पटकावला तेव्हा त्यांना त्यांचा धर्म बघून नव्हे तर भारतासारख्या विकसनशील देशामध्ये असणारी सौंदर्यप्रसाधनाच्या उत्पादनाची बाजारपेठ पाहून दिला. पण या गोष्टीलाही आता 20 वर्षांहून अधिक काळ उलटला आहे. एेश्वर्या राय थोड्या फार प्रमाणात चित्रपटांमध्ये दिसते. डायना फारशी कामं करताना दिसत नाही. त्यामुळे एवढी जुनी गोष्ट कोणी सहज उकरून  काढून वाद निर्माण करू शकत नाही. ती मुद्दामच केलेली असते. खरंतर हिंदुत्ववाद्यांना इस्लाम आणि ख्रिश्चन धर्माचा एकप्रकारे हेवा वाटतो. कारण त्या धर्मांप्रमाणे एक देव, एक पुस्तक अशी विचारसरणी हिंदू धर्मामध्ये नाही. सावरकरांच्या वरील वक्तव्यावरून तर ते अधिकच स्पष्टं होतं. ही गोष्ट हिंदुत्ववाद्यांना मोठ्या प्रमाणात खटकते. त्याला ते सातत्याने हिंदूंचा कमकुवतपणा म्हणून हिणवत राहतात. आणि हा कमकुवतपणा कमी करून इतर धर्मांप्रमाणे कट्टर व्हायचा सल्ला ते देत राहतात. हिंदू धर्मातही एक पुस्तक, एक देव अशी विचारसरणी असावी यासाठी त्यांचा प्रचंड आटापिटा चालतो. त्यावेळी एकीकडे चार्तुवर्ण्य व्यवस्थेचं समर्थन करणारा संघ प्रसंगी आदिवासी आणि दलितांनाही हिंदू म्हणायला तयार होतो आणि त्यांना इस्लाम किंवा ख्रिश्चन धर्म हा आपला एक शत्रू असल्याचं चित्रं उभं केलं जातं.

भारताच्या ईशान्येकडच्या राज्यांमध्ये बऱ्याच प्रमाणात ख्रिश्चन धर्माचा प्रभाव आहे. हे ख्रिस्ती मिशनरी कसे गरीब लोकांचं धर्मांतर करून त्यांना आपल्या धर्मात जबरदस्तीने घालतात, हा संघाचा प्रचार गेली अनेक वर्ष राहिला आहे. त्यामुळेच संघाने आपल्या पूर्णवेळ कार्यकर्त्यांना या ईशान्य भारतामध्ये कायमस्वरुपी आदिवासींना हिंदू धर्मामध्ये धर्मांतरित करण्यासाठी पाठवलं आहे. सातत्याने धर्माच्या नावाने दुही निर्माण करून अल्पसंख्यकांना दहशतीत ठेवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विविध कृप्त्यांमधली ही एक आहे. पण मूळात प्रश्न येतो की, हिंदू धर्मामध्ये धर्मांतरित करणार कसं? कारण हा धर्म जाती व्यवस्थेने जकडलेला आहे. त्यामुळे दुसऱ्या धर्मातून एखादा माणूस हिंदू होत असेल तर तो जात काय लावणार? अल्पसंख्यांक समाजाविरोधात चित्रविचित्र वक्तव्यं करून बहुसंख्य समाजाची दिशाभूल करणं आणि त्यांना या अल्पसंख्यांकाच्या विरोधात लढवत ठेवणं एवढीच भाजपची नीती यातून स्पष्ट होते. याच विचारांच्या प्रभावाखाली येऊन विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्याने ख्रिश्चन मिशनरी ग्रॅहम स्टेन्स आणि त्याच्या दोन लहान मुलांना जीवंत जाळलं होतं. मध्यंतरी वि दा सावरकर यांचे भाऊ गणेश सावरकर यांच्या लिखाणाचा हवाला देत येशू ख्रिस्त कसे तामिळ हिंदू होते, असा शोध हिंदुत्ववाद्यांनी लावला. येशू यांनी शेवटचा श्वास काश्मिरमध्ये घेतला वगैरे अनेक थापा यामध्ये मारल्या होत्या. येशू ख्रिस्तांच्या जीवनावर मोठ्या प्रमाणात संशोधन झालं असून त्याचे अनेक पुरावेही उपलब्ध आहेत. अशावेळी बिनधास्त थापा मारणं हा त्यांच्या मूर्खपणाचा नाही तर  “रणनिती”चा भाग आहे. या वर्षाच्या सुरुवातीला संघामधी विचारवंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एस गुरुमूर्ती यांनी अहमदाबाद येथे बोलताना ख्रिश्चन धर्माने जगातलं पर्यावरण नष्ट केल्याचा आरोप केला. युनायटेड नेशन्सनेही असंच म्हटल्याचाही त्यांनी दावा केला. मूळात भाजप सरकार सत्तेत आलं तेच लोकांचा बुद्धीभेद करून. त्यामुळे सातत्याने थापांचा वर्षाव लोकांच्या डोक्यावर करत राहिलं की काही काळाने यातल्या काही गोष्टी लोकांना खऱ्या वाटू लागतात आणि तेच भाजपसारख्या पक्षांच्या पथ्यावर पडतं.

त्रिपुरा हे ईशान्येकडच एक राज्य जे आतापर्यंत कम्युनिस्ट सरकारच्या ताब्यात होतं ते पहिल्यांदाच भाजपला मिळालं आहे. विकासाच्या नावने ढोल पिटून भाजप सरकार सत्तेत आलं खरं. पण ही असली वक्तव्यं जर राज्याच्या मुख्यमंत्रीच करत असेल तर कसल्या विकासाची अपेक्षा त्यांच्याकडून करणार. जनतेला कम्युनिस्टांची एवढ्या वर्षांची सत्ता भ्रमनिरास करणारी वाटली. पण सहा महिने व्हायच्या आतच लोकांना भाजपबद्दल त्याहीपेक्षा जास्त भ्रमनिरास झाला. आता केवळ विप्लव देव यांच्याकडून आणखी काय नवीन वक्तव्यं येतयं याची वाट बघणं त्रिपुरावासीयांना भाग आहे.

 

लेखक मुंबईस्थित राजकीय विश्लेषक व राईट अँगल्सचे नियमित वाचक आहेत.

Write A Comment