डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर राजकारण करू नका, असा अनाहूत सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. खरं तर यावर खो खो खो हसण्यापलिकडे काहीही प्रतिक्रिया असू शकत नाही. मात्र देशभरातील भक्तगणांसाठी ज्यांना मोदीजींचा शब्द म्हणजे थेट भगवंतांच्या तोंडून बाहेर पडलेले ब्रह्मवाक्यच, असे वाटते त्यांच्यासाठी काही गोष्टींचा खुलासा आवश्यक आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कुठलीही एनजीओ चालवत नव्हते. देशातील जातीव्यवस्थेच्या विरोधात त्यांच्या जीवनकाळात सुरू असलेला प्रत्येक संघर्ष हा राजकीयच होता. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा त्यांनी देशातील प्रत्येक शोषित घटकास दिलेला मूलमंत्र म्हणजे काय आहे? शोषितांनी शिकून संघटित व्हायचे आणि नंतर संघर्ष करायाचा तो नक्की कशासाठी आणि कोणत्या प्रकारे? आज जी देशातील दलित, आदिवासी, शोषित समाजाची अवस्था आहे ती कशामुळे आहे? पंतप्रधान मोदीजींच्या आवडत्या गुजरातमध्ये जिथे त्यांनी जगाला तोंडात बोटे घालायला लावण्याइतपत विकास केला आहे म्हणे, तिथे दलितांना मेलेल्या गुरांसाठी उघडे नागडे करून, चामडी पट्ट्यांनी मारण्याची घटना झाली. मोदीजींनी २००२ च्या दंगलीनंतर झालेल्या निवडणुकीत मिळवलेले यश इतके प्रचंड होते व त्यांना संपूर्ण हिंदू समाजाने दिलेला पाठिंबा इतका अवाढव्य होता की त्याच्यावर स्वार होऊन त्यांनी विकासाचे जे राजकारण केले त्यात काही त्रूटी राहिल्या का हो? बरं नसतील राहिल्या असं समजू, जे घटक हा जातीय शोषणाचा त्रास भोगत आहेत त्यांनी बाबासाहेबांनी दाखविलेल्या राजकीय मार्गावरून चालत राजकारण नाही करायचे तर काय “ओम बाबासाहेबाय नमः ” असे १०५ वेळा लिहून ते व्हॉट्सअपवर १०५ लोकांना पाठवून, या देशातील शोषणकर्ता कधीतरी अर्धा भाकर तुकडा ताटात टाकेल याची वाट पाहात राहयचे? बाबासाहेब हे विज्ञानवादी राजकारणी होते. भारतातील दैववादातूनच हा समाज अधोगतीकडे जात असल्याची त्यांची ठाम धारणा होती.
उनाच्या घटनेनंतर अलिकडेच गुजरातमध्येच आणखी घडलेली घटना म्हणजे घोड्यावर बसतो म्हणून करण्यात आलेली एका दलित तरुणाची हत्या. आता ही हत्या झाल्यानंतर नक्की दलित, शोषित समाजाने काय करायचं? कोणत्या प्रकारचा संघर्ष उभा करायचा?
या प्रश्नांची अगदी थेट उत्तरं डॉ.बाबासाहेबांनी आपल्या लिखाणातून आणि अनेक भाषणांमधून एकदा नव्हे तर असंख्य वेळा दिली आहेत. बाबासाहेबांनी असं थेट म्हटलं आहे की, शोषित समाजातील प्रत्येक घटकाने राजकीय भूमिकेचा पुरस्कार केला पाहिजे, राजकीय पक्षात सामील व्हायला पाहिजे. माझी कुठलीच राजकीय भूमिका नाही, असं म्हणणं म्हणजे स्वतःला विकण्यासाठी जाहिर करणं होय, असं थेट त्यांनी सांगून ठेवलं आहे. आता असं असताना मोदीजी हे नक्की काय सांगत असावेत बरे? एकतर मोदीजींना बाबासाहेब काय आहेत ते नीट माहित नसावेत किंवा आयुष्यभर गोळवलकरांच्या विचारधरानाची पारायणं केल्यामुळे त्यांना बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गाच्या विपरितच लोकांनी जावे असे तरी वाटत असावे. अन्यथा असा बाबासाहेबांनी समाजाला दिलेल्या सल्ल्याच्या विपरित सल्ला ते पंतप्रधानपदावरून देशातील जनतेला व विशेषतः ज्यांनी एका प्रश्नावर रस्त्यावर उतरून संघर्ष केला त्या जनतेला देण्याचे काम कसे काय करतील?
आपल्या सर्व सामाजिक समस्यांचे मूळ हे राजकारणात आहे, असे बाबासाहेबांचे म्हणणे होते. किंबहुना त्यांनी असेही म्हटले आहे की, सुरुवातीला मला असे वाटत असे की, सामाजिक बदल केला की, हिंदू धर्मातील या अनिष्ठ, अन्यायकारक प्रश्नांवर मार्ग काढता येईल, मात्र आता माझ्या लक्षात आलं आहे की, या सर्व प्रश्नांचं उत्तर हे राजकारणातच आहे. देशातील शोषित समाजाला साधन, संपत्ती, प्रतिष्ठेच्या वाटपात समान वाटा मिळवण्यासाठी राजकारणाशिवाय पर्याय नाही, असे त्यांचे थेट म्हणणे होते.
बाबासाहेबांनी आपल्या विद्वत्तेच्या जोरावर व त्यांनी परदेशात शिकलेल्या मानववंशशास्त्राच्या जीवावर धर्माची कठोर चिकित्सा केली. मात्र त्यांनी चार पीठांच्या शंकराचार्यांच्या समोर प्रश्न उभे केले नाहीत. त्यांनी प्रश्न उभे केले ते देशातील प्रथम क्रमांकाचे राजकीय नेते महात्मा गांधी व त्यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या काँग्रेस पक्षासमोर. याचे कारण काय होते? याचे कारण बाबासाहेब थेट राजकारण करत होते. म्हणूनतर स्वतंत्र मजूर पक्षाच्या नावावर त्यांनी निवडणूक लढवली. अनेक पक्षांशी आघाड्याही केल्या. त्यांनी जे शेवटचे पत्र लिहिले आहे, त्यात त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची संकल्पना मांडली. या पक्षाची भूमिका व विचारधारा याचा त्यांनी अत्यंत व्यवस्थित उहापोहही या पत्रात केला आहे. भारतीय राज्यघटना समितीसमोरील त्यांचे अखेरचे भाषण काढून वाचा… बाबासाहेब म्हणतात आज आपण एका विसंगतीपूर्ण जीवनात प्रवेश करत आहोत. एका बाजूला एक व्यक्ती एक मत या तत्त्वाचा देशाने स्वीकार केला आहे. मात्र हे स्वीकारत असताना जर आपण या देशातील जनतेस सामाजिक व आर्थिक समता देऊ शकलो नाही, तर या तत्त्वाला अर्थ उरणार नाही. या मंदिराचा ताबा जर सैतानांनी घेतला, असं जर पुढे आलं तर माझेच लोक हे मंदिर उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाहीत.
काय म्हणणं आहे बाबासाहेबांचे? देशातील दलित, शोषित जनतेसमोर असलेले प्रश्न हे देशात वर्षानु वर्षे असलेल्या एका विशिष्ट समाजाच्या अधिसत्तेमुळेच आहे. ही अधिसत्ता कशातून प्राप्त होते? ही अधिसत्ता राजकारणाशिवाय प्राप्त होत नाही. समतेचे मूल्य घेऊन राज्यशकट हाकणाऱ्या बळीराजामुळे कुणाचं काय घोडं मारलं जात होतं? मारलं जात होतं… त्यामुळेच देवादी देव इंद्र देवाचं स्थान डळमळीत झालं होतं. हे स्थान कशामुळे डळमळीत व्हावं बरं? एखादा राजा अत्यंत न्याय्य पद्धतीने राज्य कारभार करत असेल, त्याच्या राज्यात कुणीच दुःखी नसेल, कुणीच अन्यायाने ग्रासलेला नसेल, समानता हेच मूख्य सूत्र असेल, तर दुसऱ्या राजाचं स्थान डळमळीत होणारच. कारण तीच आदर्श राज्यपद्धती आमच्या राज्यातही राबवा, असं त्याच्या राज्यातील जनताही बोलणारच ना. कदाचित ती जनता उद्या समानतेने वागवणाऱ्या राजाच्या मागे उभे राहून प्रस्थापित अन्यायकारक राज्य पद्धतीच्या विरोधात बंड ही करू शकते. त्यामुळेच त्याला किती कपटाने मारण्यात आलं बरं?
शंबुकाने वेदपठण करण्याची मागितलेली परवानगी, नाकारली तर नाकारली वर त्याचा शिरच्छेद केला गेला… का बरं? हे राजकारण नव्हतं? समाजातील ज्या घटकाला गुलाम म्हणून ठेवलेलं आहे, त्यांनी जर शिक्षण घेतलं, तर उद्या आमच्या डोळ्याला डोळा भिडवून आणि खांद्याला खांदा लावून हक्क मागतील, तर या विषमतामूलक व्यवस्थेचा पायाच नाही का ढासळणार? आज एकाने केलं उद्या सारा समाज करेल. त्यांच्या मनात याबद्दल कायमची भिती राहिली पाहिजे म्हणून शंबुकाच्या शिरच्छेद वर्षा नु वर्षे लोकांच्या नेणिवेत राहिल, असे उदाहरण घालून दिले गेले.
एकलव्याचा अांगठा का मागितला गेला? हे राजकारण नव्हतं? अर्जूनापेक्षा चांगली धनुर्विद्या द्वीज नसलेल्या एका शूद्राला येणं म्हणजे वर्णव्यवस्थेला थेट आव्हान होतं. उद्या या एकलव्याने सैन्य जमवले व आर्यांवर हल्ला केला तर सगळंच मूसळ केरात जाण्याची भिती होती. आर्यांतर्गत लढाईत कौरवांच्या बाजूने असणाऱ्या द्रोणांनी हा अांगठा कुणासाठी मागितला होता? अर्जूनासाठी! ते कुरुक्षेत्रात अर्जूनाच्या विरुद्ध लढले. पण एकलव्याचा अांगठा अर्जूनासाठी मागितला. कारण दुर्योधन जिंकावा पण हरल्यास अर्जूनच यावा चुकूनही एकलव्य सत्तेवर येता कामा नये… हे काय राजकारण नव्हतं?
तेव्हा मोदीजींनी एक गोष्ट लक्षात ठेवावी. बाबासाहेब म्हणजे देवळातील मूर्ती नव्हेत. ते प्रत्येक शोषिताच्या रोमारोमात, पेशीपेशीत, रक्ताच्या थेंबाथेंबात भिनलेला अंगार आहेत.
आमचे, हो आमचेच दलित शोषितांचे महाकवी नामदेव ढसाळ यांनी सांगितलंय
रक्तात पेटलेल्या अगणित सुर्यांनो
तूमची आय-बहीण
आजही विटंबली जाते
हाटाहाटातून…
मवाल्यासारखे माजलेले
उन्मत्त नीरो
आजही मेणबत्तीसारखी जाळतात
माणसं
चौकाचौकातून…
कोरभर भाकरी पसाभर पाणी
यांचा अट्टाहास केलाच तर
आजही फीरवला जातो नांगर
घरादारावरून
चिंदकातले हात सळसळलेच तर
छाटले जातात आजही नगरानगरातून
रक्तात पेटलेल्या अगणित सुर्यांनो,
किती दिवस सोसायची ही
घोर नाकेबंदी
मरेपर्यंत राहयचं का असंच युद्धकैदी?
ती पाहा रे ती पाहा
मातीची अस्मिता आभाळभर झालीय
माझ्या यातनेनं आता
झिंदाबादची गर्जना केलीय
रक्तात पेटलेल्या अगणित सुर्यांनो,
आता या शहराशहराला
आग लावत चला …
तेव्हा उन्मत्त निरो आणि त्यांच्या भक्तांना एकच विनंती आहे की, तुम्ही या देशातील कुणाच्याही नादाला लागा, बाबासाहेबांच्या नादाला लागू नका, आमच्या रक्तात पेटलेला बाबासाहेब म्हणजे आमच्या रक्तात पेटलेले सूर्य आहेत याची पक्की मनाशी खूणगाठ बांधून ठेवा. तुमचा पराभव निश्चित आहे. मात्र तो इतकाही दारुण होऊ देऊ नका की दररोज स्वतःचा चेहरा स्वतःलाच आरशात पाहणे शक्य होणार नाही.
1 Comment
Keep up the good work!!