fbpx
राजकारण

पश्चिम बंगालमध्ये राम के नाम

पश्चिम बंगाल ही आक्रमक हिंदुत्ववाद्यांसाठी कधीच सुपिक भूमी नव्हती. त्यामुळेच फार क्वचितच भारताच्या या पूर्वेकडील राज्यात साजरा केल्या जाणाऱ्या राम नवमी या सणाच्या निमित्ताने झालेल्या धार्मिक दंगलींचे आश्चर्य वाटणे स्वाभाविक आहे. मात्र ज्या असनसोल- रामगंज भागात राम नवमीच्या निमित्ताने दंगे झाले ते पाहता हे प्रकरण वाटते तितके सोपे नाही. त्याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.

रामापेक्षा दूर्गा महत्त्वाची

अनेकांचे असे म्हणणे असते की, भारतातील हे राज्य मुस्लिमांच्या प्रती अत्यंत सौम्य किंवा सौहार्दाची भूमिका घेत असते. अविभाजित बंगालमधील इस्लामचे महत्त्व तसंच भाषेच्या नावाखाली पाकिस्तान या धर्मावर आधारित जन्मलेल्या राष्ट्रापासून वेगळे झालेल्या बांग्लादेश सोबत अत्यंत मैत्रीपूर्ण संबंध याची त्याला पार्श्वभूमी आहे. मात्र असे असले तरी राष्ट्रीय स्वयंसेव संघाचे अस्तित्व या प्रदेशात कित्येक दशके आहे हे विसरता कामा नये. बंगाल्यांनी या आक्रमक, उजव्या-राष्ट्रवादी निमलष्करी स्वयंसेवकांपासून स्वतःला आतापर्यंत तसे दूरच ठेवले आहे. बंगाली जनतेच्या धर्माच्या नावाने उद्घघोष करण्याच्या स्वतःच्या पद्धती आहेत. त्यांच्यासाठी फूटबॉल, मॉछ-भात (मासे-भात), बिर्यानी आणि दूर्गा पुजा याला सर्वोच्च प्राधान्य आहे. दूर्गापुजेचे महत्त्वही धार्मिक रूढी-परंपरा म्हणून असण्यापेक्षा मौजमजा म्हणूनच अधिक आहे. एक मात्र खरे की, दूर्गा आणि काली या दोन देवतांचे धार्मिक महत्त्व हे रामापेक्षा या प्रदेशात कितीतरी अधिक आहे.

असनसोलची अग्नीपरीक्षा

बहुतेकांनी राम नवमीच्या निमित्ताने पश्चिम बंगालमध्ये झालेल्या दुर्दैवी घटनांबाबत विविध प्रकारच्या व माध्यमांमधी बातम्यांमधून काही वाचलं असेल. असनसोल- रानीगंजमध्ये राम नवमीच्या निमित्ताने धार्मिक दंगल घडवून आणण्यामागे नक्कीच राजकीय शक्तींचा हात आहे. यात मुस्लिम आणि हिंदू दोन्ही मृत्यूमुखी पडल्याचे समोर आले आहे. राज्य सरकारने ही दंगल थांबविण्यासाठी तिथे पोलीस दल, रॅपिड अॅक्शन फोर्स यांचीही मदत घेतली. अगदी भारतीय दंड विधान संहितेतील कलम १४४चा वापरही केला. ज्या ठिकाणी खूपच तणावसदृश्य परिस्थिती होती तेथील इंटरनेटही कापण्यात आले. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या राज्यात नव्हत्या तेव्हाच हा सगळा प्रकार घडला आहे. बॅनर्जी या दिल्लीत भाजपा-काँग्रेसरहित इतर पक्षांची तिसरी आघाडी उभारण्याच्या त्यांच्या प्रयत्नासाठी गेलेल्या असताना जो राम बंगाली हिंदू संस्कृतीत कधीच फारसा लोकप्रिय देव नव्हता त्याच्या निमित्ताने इतका मोठा गहजब कसा काय झाला?

 हे राम

पश्चिम बंगाल हे राज्य म्हणजे केवळ बागंली भाषिकांचे राज्य आहे, असा अनेकांचा समज आहे. मात्र हे खरे नाही. पश्चिम बंगालमधील असनसोल, रानीगंज, दुर्गापूर हे असे काही भाग आहेत की, जिथे हिंदी भाषिकांची संख्या लक्षणीय आहे. भौगोलिकदृष्ट्या असनसोल ( असन नावाच्या वृक्षाच्या नावावरून हे नाव पडले आहे) आणि रानीगंज हे भाग बिहार आणि झारखंड या राज्यांना लागून आहेत. त्यामुळेच तेथील संस्कृतीवर पक्क्या बंगाली संस्कृतीपेक्षा त्या राज्यांचा सांस्कृतिक पगडा अधिक आहे. किंबहुना या भागांमध्ये हिंदी ही व्यवहाराची भाषा आहे. आणि भारतातील कुठल्याही हिंदी भाषिक प्रदेशात तुम्ही गेलात तर राम हा सर्वाधिक लोकप्रिय आणि महत्त्वाचा देव आहे. बंगाल्यांमध्ये मात्र अनेकदा रामाबद्दल आणि विशेषतः लोकाग्रहास्तव सितेला अग्नीपरीक्षा द्यायला लावण्याच्या त्या कथेबद्दल टीकेचा स्वर असतो. मात्र पश्चिम बंगालमधील हिंदी भाषिक लोकांसाठी राम हा विष्णुचा सातवा अवतार आहे. त्यांच्यासाठी राम हा सर्वोच्च देव आहे. त्यामुळे रामाची थट्टा मस्करी करणे किंवा त्याच्यावर टीका करणे हा त्यांच्याकरिता पापाचा परमोच्च बिंदूच होय. ते कुणीही करू शकत नाही. अगदी कुणीही नाही!

 डुप्लिकेट भक्त

असनसोल लोकसभा मतदारसंघ हा सध्या भाजपच्या ताब्यात आहे. विविध आक्रमक वक्तव्यांसाठी ख्याती असलेले बाबुल सुप्रियो या मतदारसंघातून २०१४च्या निवडणुकीत जिंकून आले होते. १९८९ पासून ही जागा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ताब्यात होती. २०१४मध्ये मात्र भाजपचा या ठिकाणी विजय झाला. गायक असलेल्या सुप्रियोंच्या झोळीत मतदारांनी मते टाकली. भाजपसाठी हा मोठा विजय होता. पश्चिम बागंलच्या राजकारणात आजही फारसे महत्त्व नसलेल्या भाजपला या निमित्ताने चंचूप्रवेश मिळाला आणि तृणमूल काँग्रेसचे प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून त्यांनी आपल्याला दर्शविण्यास सुरुवात केली. देशभरात भाजपला सातत्याने मिळणाऱ्या विजयामुळे व नरेंद्र मोदी या व्यक्तिमत्त्वाची व्यापारी समाजात असलेल्या लोकप्रियतेमुळे असनसोलमध्ये भाजप आणि राम हे अधिकाधिक लोकांच्या नेणिवेत रूजत गेले आहेत. मात्र तृणमूल काँग्रेसला बंगाली भाषिक आणि मुस्लिम मतादारांचा प्रचंड पाठिंबा आहे. या नव्या राजकीय समिकरणांचा तृणमूल काँग्रेसवरही परिणाम झाला. त्यांनी असनसोल शहराचा महापौर म्हणून जितेंद्र नाथ तिवारी यांना बसवले. हे तिवारी खुले आम हिंदुत्ववादी भूमिका घेत असतात. तिवारींसारख्याला बसवल्यामुळे असनसोलमधील भाजपचा प्रभाव कमी होईल, असा तृणमूलचा होरा होता. प्रत्यक्षात तिवारी भाजपची तेथील वीटसुद्धा हलवू शकले नाहीत. उलट भाजपचे कार्यकर्ते त्यांना डुप्लिकेट रामभक्त म्हणून जनमानसात उघड उघड मस्करी करतात.

तलवार ही लेखणीपेक्षा श्रेष्ठ

खरं म्हणजे तृणमूलही पश्चिम बंगालमधील वाढत्या प्रभावामुळे चिंतीत आहे. भाजपने पश्चिम बंगालमध्ये थोड्या जागासुद्धा जिंकता कामा नयेत, अशी त्यांची राजकीय धारणा आहे. ममता यांचे अत्यंत नाटकीय व आक्रमक वागणे, त्यांची अत्यंत स्वच्छ प्रतिमा यांची बंगाली तरुण मनाला नक्कीच भूरळ आहे. मात्र तरीही बंगालमध्ये बेकारी वाढते आहे हे मान्य करावेच लागेल. खरे तर हा काही केवळ पश्चिम बंगालपुरता प्रश्न नाही. संपूर्ण भारतालाच बेकारीने ग्रासले आहे. पण भारतातील इतर राज्यांमधील तरुणांनाही नोकऱ्या मिळत नाहीत, त्यामुळे आपल्याला मिळाल्या नाहीत तर काय, असा विचार पश्चिम बंगालमधील तरुण करून स्वतःच्या मनाला दिलासाही देऊ शकत नाहीत, हेही तितकेच खरे आहे. त्यामुळे माझं काय या एकाच ध्येयाभोवती गुरफटलेल्या या जगात हे तरुण उद्विग्नावस्थेत अस्वस्थ करणारे सवाल समोर ठेवत आहेत. पश्चिम बंगालमधील उद्योग राज्य सोडून गेलेले नाहीत. मात्र हव्या तेवढ्या वेगाने त्यांचा विस्तारही होत नाहीये. जरी ममता बॅनर्जी यांना २०११पेक्षा २०१६मध्ये लोकांनी जास्त मताधिक्याने व अधिक जागांसह निवडून दिलं असलं तरीदेखील बंगालमधील एक छोटा का असेना पण असा घटक आहे जो म्हणतो आहे की, भाजपला एकदा तरी संधी द्यायला हवी. ममता यांच्या पक्षात नेत्यांची दुसरी फळीच नाही, ममता यांच्या पक्षाला धक्का दिला जाऊ शकतो, असा भाजपच्या नेत्यांना विश्वास वाटतो तो यामुळेच. भाजपचे संघटनकौशल्य पाहता त्यांना दुर्लक्षित करता येणार नाही. मात्र भाजपकडे पश्चिम बंगालमध्ये स्वयंभू नेतृत्व नाही. दिल्लीला विचारून राज्यातील प्रत्येक निर्णय करणाऱ्या त्यांच्या पक्षापेक्षा तृणमूल त्यामुळेच लोकांमध्ये अधिक वेगाने पोहचते. पण भाजपच्या उघड उघड तलवारी नाचविण्याचे आणि आक्रमक हिंदुत्वाचे आकर्षण असणाराही एक वर्ग आता पश्चिम बंगालमध्ये तयार झाला आहे. मात्र तरीही सर्वसाधारण बंगाल्यांची ममता म्हणजे त्यांच्या दीदीलाच पसंती आहे हेही तितकेच खरे. धर्माच्या नावावर पश्चिम बंगालच्या जनतेला विभाजित करून राजकारण करण्यापर्यंत अद्याप भाजपला यश मिळालेले नाही.

किल्ली

धर्माच्या नावावर लोकांची मोट बांधणे किती सहजशक्य आहे हे आजवरच्या राजकारणाने सिद्ध केलेलेच आहे. निवडणुकीच्या पूर्वी धार्मिक दंगली घडवून नंतर त्या आधारावर अधिकची मते व जास्तीच्या जागा पदरात पाडून घेता येतात. हे बंगालमध्ये घडेल का? धार्मिक आधारावर झालेल्या धृवीकरणामुळे भाजप ही पश्चिम बंगालमध्ये एक मोठी शक्ती म्हणून उदयाला येईल, याची शक्यता सध्या तरी वाटत नाही.

देशातील अनेकांना धार्मिक तणाव नको असतो. देशाच्या फाळणीत पंजाबसारखाच बंगाल्यांनीही धार्मिक दंगलींचा वणवा काय असतो ते पाहिले आहे. त्या दंगलीत होरपळळेल्या काही कुटुंबीयांमध्ये आजही मुस्लिमांबद्दल एक दुस्वास आहे. मात्र त्यामुळे ते थेट हिंदुत्ववादी पक्षाला मत देऊन त्याच्या हाती राज्यशकट देतील, असे वाटत नाही. पश्चिम बंगालमधील बहुतांश जनतेला धर्माच्या नावावर मतदान करणे हे मान्य नाही. मात्र सातत्यपूर्ण शहरांमधील धार्मिक धृवीकरण, ग्रामीण शहरी भागांमधील धृवीकरण यातून काहीतरी राजकीय खेळ होऊ शकतो. मात्र त्यासाठी संपूर्ण राज्यभरात कार्यकर्त्यांची खूप मोठी फौज लागेल. जी अर्थातच भाजपकडे नाही. पश्चिम बंगालमध्ये ममता दीदीचा पराभव होऊ शकतो तर तो तिच्या कारभारातील त्रूटींमुळे नाराज असलेल्या जनतेकडूनच. धार्मिक धृवीकरण करून हा पराभव करण्याचा प्रयत्न जर कुणी केलाच  तर त्याला यात यश मिळणे सध्याच्या काळात तरी शक्य नाही.

लेखक कोलकातास्थित पत्रकार आहेत.

Write A Comment