देशातील शेतकरी, दलित, बहुजन, कामगार कष्टकरी, सकल स्त्रिया अस्वथतेच्या उंबरठ्यावर आहेत. त्यातून एक असंतोष साकार होत आहे. या सामाजिक घटकात कमालीचा असंतोष पाहायला मिळतो, त्याची कारणे आजच्या परिस्थितीत पहायची झाल्यास २०१४ पासून सत्ताधारी वर्गाने चालविलेल्या धोरणात प्रामुख्याने ती दिसत आहेत. लोकशाही मार्गाने निवडून येत लोकशाही प्रणालीचाच घात करण्याचे प्रकार वारंवार देशातील जनता अनुभवत आहे. सरकार विशिष्ठ जातीवर्गाचेच हितसंबंध जोपासत आहे अशी पहिली भावना जनतेच्या असंतोषात दिसत आहे. अन्नदाता शेतकरी जणू “आत्महत्या आंदोलन’’ करीत असताना त्याची ‘साला’ म्हणून अवहेलना करणे, शेतकरी संपाकडे कुत्सितपणे बघत परदेशातून धान्य आयात करू असे उद्दामपणे म्हणणे, शेतकाऱ्यांना कर्ज माफी दिली तर आत्महत्या थांबणार आहेत का? असे बेमुर्वतपणे म्हणणे, शेतकऱ्याला कर्ज दिले तर बँका, आर्थिक विकास ठप्प होईल अशी दर्पोक्ती करणे आणि दुसऱ्या बाजूला ललित मोदी, विजय मल्या, निरव मोदी आणि आणखीन त्यांचे याच प्रवृत्तीचे भाईबंद यांना सुखरूप विदेशात जाऊ देणे या प्रकारांमुळे सामन्य जनतेत असंतोष साकारत आहे, तिच्या मनात एक प्रकारची चीड, राग साठत चालला आहे. दुसरीकडे जीएसटी, नोटाबंदी यामुळे व्यापारी आणि तमाम भारतातील जनतेत असंतोष दुमासात आहे. नोटाबंदीचा निर्णय रिझर्व बँकेच्या अखत्यारीत येत असतानाही एक व्यक्ती प्रधानसेवकाचा आव आणत स्वतःच जाहीर करते. रिझर्व बँक, निवडणूक आयोग या सारख्या यंत्रणांचे महत्व कमी लेखले जात आहे आणि एकाधिकारशाहीकडे देश नेला जात आहे यामुळेही जनतेच्या असंतोषात भर पडत आहे. देशभक्तीच्या भलत्याच व्याख्या पुढे आणल्या जात आहेत. नोटा बदलून घेण्यसाठी रांगेत उभे असणाऱ्याचे मृत्यू दुर्लक्षित करून रांगेत उभे असणाऱ्यांना लाडू वाटायचे आणि तुम्ही देशभक्त आहात असे म्हणायचे, देशभक्तीसाठी सैन्यात भारती झालेल्या सैनिकाना सर्व प्रकारे अपमानित करायचे, कधी परिचारकसारख्या भाजपा खासदाराने सैनिकांच्या पत्नीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायचे तर कधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुख असणाऱ्या मोहन भागवत यांनी भारतीय सैन्याचा अवमान करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काठी हातात घेतलेल्या तुकड्यांची थेट सैन्याशी तुलना करायची, कधी तर चक्क ‘राष्ट्ररक्षा महायज्ञ’ करायचा घाट घालायचा हास्यास्पद प्रकार करायचा असे बालिश प्रकार सुरु आहेत. भाजपा खासदार महेश गिरी यांनी अंतर्गत आणि बाह्य शत्रूंचा विनाश व्हावा म्हणून राजधानीतच यज्ञ सोहळा आयोजीत केला होता. या यज्ञयागामुळे भारताचे वाईट चिंतणाऱ्यांचा नाश होईल, मंत्रोच्चारामुळे देशाची सुरक्षा व्यवस्था, महिलांची सुरक्षा व पर्यावरण राक्षणाचे संकल्प पूर्ण होतील असा दावा त्यांनी केला होता. हा यज्ञ सोहळा म्हणजे बारा महिने चोवीस तास – तिन्ही त्रिकाळ देशाच्या सीमा सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या सैन्यदलाचा अवमानच आहे. यज्ञ करून अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा सध्या होणार असेल तर सैन्य दालच नको अशी ही भूमिका काही दिवसात घेतली गेली तर आश्चर्य वाटायला नको! त्यांना त्यांचा मनूचा मामला पुढे आणणारी आर्मी हवी आहे. देशाचे परराष्ट्रीय धोरण, राजनय, अंतरराष्ट्रीय संबंध, अलिप्ततावाद इ. धोरणांवर कार्यरत असणारे सैन्य त्यांना नको आहे. हिटलरी बाण्याचे वरिष्ठ सांगतील तसे आदेश अंधानुकरण करत, संमोहित होऊन करणारी टोळी त्यांना अपेक्षित आहे. परधर्माच्या द्वेषावर, भांडवलशाहीधार्जिणी नीती, ज्याला कूटनीती म्हणता येईल, ही त्यांना राबवायची आहे. सैन्यादालाचेही फासिस्तीकरण-ब्राह्मणीकरण करण्याचा हा डाव असल्याचे लोक बोलू लागले आहेत. सैन्य आणि सैन्यदलाचा अपमान जनतेच्या जिव्हारी लागला आहे.
देशभक्तीच्या अचाट व्याख्या करायच्या या सोबतच ते संस्कृतीचे राजकारण उफराट्यापद्धतीने करीत आहेत. गेल्या काही वर्षात देशात एक प्रकारचा सांस्कृतिक दहशतवाद जनता अनुभवत आहे. सनातनी संघटनाचा उन्माद उघड झाला आहे. कोणी काय खायचे, काय खायचे नाही, काय बोलायचे किंवा बोलायचे नाही यावर मोठ्या प्रमाणात निर्बंध येऊ लागले आहेत. सहिष्णुता धोक्यात आली आहे. सहिष्णुतेला भेकडपणा किंवा पारधर्माचे लांगुलचलन असे घोषित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र सध्या अशाच कारणांनी अक्षरशः ढवळून निघत आहे. असंतोषाची लाट महाराष्ट्रात वणवा बनू पाहत आहे. त्याचे अलीकडील ठोस उदाहरण म्हणजे कोरेगाव-भीमाची दंगल. १ जानेवारी रोजी ब्राह्मण्यवादी शक्तींनी या दंगलीचे नेतृत्व केले आहे. (दंगलीची सर्व माहिती आणि विश्लेषणासाठी किशोर ढमाले, भारत पाटणकर, भीमराव बनसोड आणि प्रा.प्रतिमा परदेशी यांचा सत्यशोधन अहवाल अभ्यासुनी पाहावा.) दंगलीची दाहकता महाराष्ट्राने अनुभवली आहे. या संघटीत ब्राह्मण्यवादी कटकारस्थानाचा अनुभव घेतला आहे. या प्रकरणनंतर महाराष्ट्रात प्रचंड असंतोष पसरला. या असंतोषाला गोळा करण्याचे आणि विधायकरीतीने ब्राह्मणी शक्तींच्या विरोधात टोक देण्याचे महत्वपूर्ण काम अड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. असंतोष मनात असणारी जनता जाती-धर्म निरपेक्षपणे त्यांच्या पाठीशी उभी राहिली, हे ३ जानेवारी रोजी झालेल्या १००% महाराष्ट्र बंद वरून लक्षात आले. महाराष्ट्रात सनातनी शक्तींच्या विरोधात निर्भीडपणे ते उभे राहिले. १ जानेवारीच्या दंगलीचे सूत्रधार एकबोटे आणि भिडे असल्याचे त्यांनी उघडपणे सांगितले. या घटनेनंतर महाराष्ट्राचे वैचारिक ध्रुवीकरण झाले. सामतावाद्यांच्या सततच्या संघर्षामुळे, सबळ पुराव्यामुळे मिलिंद एकबोटे यांना तर अटक झाली पण भिडे यांना का नाही असा सवाल करत २६ मार्च रोजी अभूतपूर्व असा मोर्चा निघणार होता. पण पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारल्यामुळे अखेर आझाद मैदानात अभूतपूर्व अशी सभा घेण्यात आली. महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून मार्चात सहभागी होण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात आले होत. या लाखाच्या जनसमुदायात १५ ते २५ या वायोगातील तरुणांची संख्या लक्षणीय अशी होती. ज्याला ‘हलता मॉब’ म्हटले जाते त्याचा प्रत्यय मोर्चात आला. प्रचंड असंतोष आणि राग जनतेच्या डोळ्यात जाणवत होता. इतका उत्स्फूर्त प्रतिसाद गेल्या अनेक वर्षात दिसला नव्हता. तो काळपरवाच्या लालबावटा मोर्चा, शेतकरी आंदोलने आणि या निळ्या वादळातून दिसला आहे. जनतेत इतका राग, चीड, असंतोष का असावा? हा एका रात्रीत निर्माण झालेला नाही, केवळ पक्षादेश म्हणूनही संघटीत झालेला नव्हता. त्याला देशात आणि राज्यात निर्माण झालेली सामाजिक, राजकीय परिस्थिती कारणीभूत होती. राज्यघटना बदलायला निघालेले सरकार, शेतकऱ्याचा घात करणारे सरकार, विद्वेष पसरविणारे सरकार, जातीयवादी सरकार, उद्योगपतीधर्जीणे सरकार या प्रकाश आंबेडकर आणि डावे – पुरोगामी शक्तींनी केलेल्या प्रबोधनातून सरकाचे जनविरोधी स्वरूप उघड होत होते तर दुसऱ्या बाजूला जातीयवादाविरोधात सातत्याने आघाडीवर असण्याऱ्या समूहाच्या असंतोषाला प्रकाश आंबेडकर यांनी वाट मोकळी करून दिली. त्यांच्या शिवाय दुसरा सक्षम नेता हा असंतोष गोळा करू शकत नव्हता कारण ते फासिस्तांच्या तंबूत डेरेदाखल झाले आहेत, किंवा त्यांच्या तेवढा प्रभाव व क्षमताही नाहीत. राष्ट्रपती पदासाठी प्रकाश आंबेडकरांचे नाव पुढे येणे, दिल्ली, कर्नाटक, उत्तरांचल, गुजरात इ. ठिकाणी त्याच्या मोठ्या सभा होणे आणि सामाजिक माध्यमातून त्या जनतेपर्यंत पोहचणे, महाराष्ट्रात जातीमुक्ती आंदोलनाचे नेतृत्व करणे, मागासवर्गीय शिष्यवृत्तीसाठी संघर्ष करणे, रा.स्व.संघविरोधी भूमिका घेणे, पुण्यातील गडकरी पुतळ्या संदर्भात भूमिका घेणे, ब.मो.पुरंदरे प्रकरणात इतिहासाच्या विकृतीकारणाविरोधात बोलणे, भिडे-एकबोटे कंपूविरोधात ठाम भूमिका घेणे यामुळे आणि वेळोवेळी सरकारचा बेचक्यात पकडणे या राजकारणामुळे महाराष्ट्रातील तरुण त्यांच्याकडे आकर्षित झाला. आशावादी नजरेने त्यांच्या कडे बघू लागला आहे. तो आझाद मैदानात सहभागी झाला होता. म्हणजे एकीकडे भारिप-बहुजन महासंघाची ताकद आणि त्यात हा अधिकच घटक जो त्यांच्या पक्षात नाही पण आंबेडकरवादी आहे तोही सहभागी झाला होता. सरकारने मोर्चाला परवानगी नाकारून आणि भिडे यांनी प्रकश आंबेडकर यांची चौकशी करून त्यांनाच अटक करा असे म्हंटल्याने आझाद मैदानाकडे येणाऱ्या संख्येत वाढच झाली. रामदास आठवले यांनी हा आमचा मोर्चा नाही म्हणून जाहीर केल्याने त्याची सत्ताकांक्षाच दिसून आली; आंबेडकरवाद नाही. थोडक्यात परवानगी नाकारणारे फडणवीस सरकार, मनोहर भिडेचे विपरीत बोलणे आणि आठवलेंचा बालीशपणा हे तीन फुलटॉस चेंडू प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार असे फटकावले की आझाद मैदानात निळे वादळच जमा झाले.
मोर्चा अभूतपूर्व झाला हे खरे. त्यात सत्यशोधकांनी, डाव्यांनी आणि जातीविरोधी चळवळ करणाऱ्या अनेक सामाजिक संघटनांनी सहभाग घेतला हीही जमेची बाजू. भाजपा आणि कॉंग्रेस दोन्ही पक्षविरोधी आघाडी करण्याची भूमिका घेणारेच मोठ्या संख्येने आले ; दोन्ही कॉंग्रेसना आजही धर्मनिरपेक्ष समजणारे गैरहजर होते अशी चर्चा आझाद मैदान परिसरात चालू होती. माध्यमांनी या प्रचंड मोर्चा-सभेची फारशी दाखल घेतली नाही, शेरेबाजी, दलित एक्य इ चौकटीत आझाद मैदानातील वादळाचा उल्लेख केला गेला. माध्यामांचा दुटप्पी व्यवहारही यातून अधोरेखित झाला आहे. एखाद्या मोर्च्याला, सभेला ज्यात खळखट्याक आणि तत्सम भाषा वापरली जाते, त्यांना अति प्रसिद्धी आणि पदर खर्चाने दोन दिवस प्रवास करून आलेल्या, ४२ डिग्री उन्हात ६ तास बसून ऐकणाऱ्या जनतेसाठी माध्यमात जागा नाही. मोर्च्याच्या मागण्यांबद्दल फारसे न बोलता दलितांचा मोर्चा, दलित नेतृत्व, ऐक्य याभोवती चर्चा रंगवण हा जातिवाद आणि दुजाभाव नाही तर काय आहे? एका माध्यमावर तर आझाद मैदानात श्रीमंत कोकाटे कसे? असा प्रश्न विचारला गेला. महारष्ट्रात दुही माजविणाऱ्या भिडे-एकबोटे यांना गुरुजी, सर, जी असे म्हणत प्रश्न विचारायचे आणि दुसरीकडे कोकाटे कसे काय असे विचारायचे. कोकाटे हे काय देशद्रोही आहेत काय? ते हजर राहण्यातून सामाजिक सलोख्याचा संदेश मिळत होता याची तर पोटदुखी नव्हती ना? महाराष्ट्र कात टाकतो आहे.
नवे राजकारण साकार होऊ शकण्याची परिस्थिती निर्माण होत आहे, मध्यामांनीही यातून काही बोध घेत सत्यबाजू दाखविण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
जातीयवाद्यांविरोधात एव्हढी मोठी ताकद जमा तर झाली पण पुढे काय? असाही प्रश्न अनेकजण विचारात होते. ही संघटीत शक्ती २०१९ च्या निवडणुकीत आपला करिष्मा दाखवेल का ? अशीही चर्चा सुरु आहे. प्रकाश आंबेडकर यांनीच काही वर्ष पूर्वी आंबेडकर चळवळ संपली आहे अशी पुस्तिका लिहिली होती. या निळ्या वादळाने आंबेडकरी चळवळीला नवी उभारी आणि दिशा मिळू शकते याची जाणीव झाली आहे. निळे वादळ तात्पुरते न घोंगावता त्याचा वणवा होण्यासाठी सर्वांनाच झटावे लागणार आहे.