fbpx
विशेष

केम्ब्रिज एनॅलॅटिकाची भानगड

केम्ब्रिज अनॅलिटीका व फेसबुक यांनी भारतीय मतदारांच्या ‘डेटा’चा गैरवापर केल्याच्या बातम्या गेले आठवडाभर मीडियातून झळकत आहेत. ठळक बातम्यांची जागा व्यापणारी ही भानगड नेमकी काय आहे याचा मात्र बहुतेकांना नेमका अंदाज नाही. तर भारतातील केम्ब्रिज अनॅलिटीकाच्या नेमक्या उद्योगांचा परामर्श घेण्याचा हा प्रयत्न आहे.
केम्ब्रिज अनॅलिटीका या कंपनीची स्थापना २०१३ साली झाली, तत्पूर्वी तिची पालक कंपनी होती SCL – स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन लॅब.ही कंपनी ब्रिटन मध्ये २००५ साली स्थापन झाली. भारतातही या पितृकंपनीची शाखा होती. SCL प्रायव्हेट लिमिटेड या नावाने भारतीय कंपनी रजिस्टर झाली होती. तिचे चार डायरेक्टर होते. अलेक्झांडर निक्स, अलेक्झांडर ओक्स, अमरीश कुमार त्यागी आणि अविनाश कुमार राय. पैकी पहिले दोघे ब्रिटिश नागरिक होते. हे दोघे ब्रिटन मधील पालक कंपनीचे सुद्धा संस्थापक होते. अमरीश कुमार त्यागी हे जनता दल युनायटेडचे नेता के सी त्यागी यांचे पुत्र. यांची स्वतःची एक कंपनी आहे. ऑवलेनो बिझनेस इंटलिजन्स या नावाची त्यागींच्या मालकीची कंपनी केम्ब्रिज अनॅलिटीकाची भारतातील सहकारी आहे.
हे झालं पहिल्या तीन डायरेक्टर्स बद्दल. चौथा अविनाश कुमार राय कोण ? तर हे एक अत्यंत लो प्रोफाइल व्यक्तिमत्व आहे. १९८४ पासून ते विविध राजकीय पक्षांचे निवडणूक मदतनीस व सल्लागार राहिले आहेत. या अविनाश कुमार रायनी, एका ख्यातनाम इंग्रजी भाषिक वेबपोर्टलला दिलेल्या मुलाखतीत, केम्ब्रिज अनॅलिटीचाचा नेमका ‘धंदा’ काय व तो ते कसा करतात याचे इत्यंभूत वर्णन केले आहे.

२००९ च्या लोकसभेस, अविनाशकुमार राय, हे भाजप उमेदवार महेश शर्मा यांचे सल्लागार म्हणून काम पहात होते. हे महेश शर्मा म्हणजे तेच- सध्याचे सांस्कृतिक राजमंत्री, वेळोवेळी आगंतुक टिप्पणी करून प्रसिद्धीच्या झोतात राहणारे. तर गौतम बुद्ध नगरची सीट शर्मा सहज जिंकतील असा राय यांचा कयास होता. परंतु बसपाच्या सुरेंद्र सिंग नागर यांनी शर्मांचा सोळा हजार मतांनी पराभव केला. या पराभवाने शर्मापेक्षा राय जास्त चकित झाले. एका लंडन स्थित मित्राबरोबर गप्पा मारताना, त्यांनी ह्या अर्तक्य वाटणाऱ्या पराभवाची कथा सांगितली. त्यावर त्यांच्या मित्राने, लंडन मधील ‘माहिती शास्त्रज्ञांची’ मदत घेऊन पराभवाची नेमकी करणे शोधता येतील असे सुचविले. राय यांनी मित्राची सूचना गांभीर्याने घेतली, आणि त्या दिशेने पाठपुरावा केल्यावर त्यांचा संपर्क डॅन मुरेसन या SCL -लंडन या कंपनीच्या ‘निवडणुका विश्लेषण प्रमुख’ या व्यक्तीशी झाला.
डॅन मुरेसन हा मूळचा रोमानियन, परंतु जन्माने ब्रिटिश नागरिक. तो राय यांच्या आमंत्रणावरून आपले तीन साथीदार घेऊन भारतात आला. हे तीन साथीदार त्याने आणले होते ‘बिहेवियरल डायनॅमिक्स इन्स्टिटयूट’ या संस्थेतून. ही बिहेवियरल डायनॅमिक्स इन्स्टिटयूट सुद्धा अलेक्झांडर निक्स व अलेक्झांडर ओक्सचा सक्खा भाऊ निगेल ओक्स या दोघांनी स्थापन केली होती.
तर मुरेसन व त्याच्या चमू ने गौतम बुद्ध नगर या लोकसभा मतदार संघातील जवार या विधानसभा मतदार संघात, जिथे शर्माना अनपेक्षितपणे खूप कमी मते मिळाली होती, तिथे जाऊन दुभाष्याच्या मदतीने मतदारांच्या मुलाखती घ्यायचा सपाटा लावला. साधारण महिनाभर तरी हे मुलाखतीचे सत्र चालले. सर्व मुलाखती त्यांनी व्हिडियो रेकॉर्ड केल्या, व प्रत्येक मुलाखतीचे रेकॉर्डिंग नंतर बारकाईने तपासले. मतदार खोटे बोलतोय किंवा कसे हे उत्तर देताना त्याच्या चेहऱ्यावरील हावभावांवरून ताडून या टीमने आपले विश्लेषण पार पाडले. त्यांनी शर्माच्या पराभवाचा निष्कर्ष असा काढला की लोक शर्माला राजकारणी किंवा डॉक्टर म्हणून ओळखतच नव्हते. त्यांना तो एक परगावात राहणार एक श्रीमंत शेटजी वाटत होता. शर्मा लोकांना प्रचार दरम्यान “मला निवडून दिलेत तर मी तुमची सेवा करेन ” अशी मोघम वचने देत होते, परंतु सेवा करेन म्हणजे नेमके काय करेन याचे ठोस स्वप्न ते मतदारांसमोर ठेवू शकले नाहीत. म्हणून मतदारांनी शर्माना नाकारले. शर्माचा एक ब्राम्हण सहकारी मतदारसंघात प्रचारात उत्साहाने उतरला होता परंतु या इसमा बद्दल मतदारसंघातील ब्राम्हण वर्गात एवढे कलुषित मत होते, की ब्राम्हणांनी मुद्दाम या सहकाऱ्यास अपशकुन करण्यासाठी बसपास मते टाकली. अजून एक निष्कर्ष मुरेसनच्या टीम ने नोंदवला तो म्हणजे, शर्मांचा प्रचार एवढा ठळकपणे ब्राम्हणकेंद्री झाला, की त्यास उत्तर म्हणून बाकी सर्व जातींनी एकवटून शर्मांचा पराभव करू शकेल अशा उमेदवारास आपले मत टाकले. मुरेसनच्या या विश्लेषणाने राय फारच प्रभावित झाले. डेटा सायन्स हे प्रकरण किती प्रभावी ठरू शकते याची एक झलकच त्यांना मिळाली होती. मुरेसनने देखील भारतात पुढे काम करण्यात स्वारस्य दाखविले.
राय म्हणतो २०१० साली तो बिहार मध्ये काही उमेदवारांचा निवडणूक सल्लागार म्हणून काम पाहत होता. निवडणूकांचे काम नसेल तेव्हा राय माहिती विश्लेषणावर आधारित इतर कामांची कंत्राटे घ्यायचे. अमरीश त्यागी व राय यांचे कौटुंबिक संबंध होते. त्यागींच्या कंपनीबरोबर राय, डेटा पृथ्थकरण करून बनावट औषधे शोधून काढणायच्या कामांत अधून मधून मदत करीत.

एक दिवस मुरेसन आणि अलेक्झांडर निक्स दोघे दिल्लीत येऊन राय व त्यागीना भेटले. राय भारतातील काही मतदारसंघातील मतदारांचा जातीनिहाय डेटा व त्यांचे मत कोणत्या पक्षास अनुकूल होऊ शकते याची माहिती संकलित करीत आहेत याची कुणकुण मुरेसन याना होतीच. मुरेसननी हे काम संयुक्तपणे करण्याची ऑफर दिली. एकूण अठ्ठावीस लोकसभा मतदार संघात हे माहिती संकलनाचे व विश्लेषणाचे काम करून हा डेटा इच्छुक राजकीय पक्षास विकायचा अस मुरेसनचा प्लॅन होता. २०१४ ची लोकसभा निवडणूक अजून चार वर्षे लांब होती, तोपर्यंत हे काम सहज पार पाडता आले असते. या संकलित माहितीस समजण्यास सोप्या अशा पद्धतीने पेश करू शकेल अशा मोबाईल ऍप ची निर्मिती करण्याची जबाबदारी रायनी स्वतः कडे घेतली. रायचे म्हणणे आहे की SCL ची टीम कधी बिहारला गेलीच नाही. २०१० साली सत्तावीस मतदारसंघातील माहिती संकलनाचे काम रायनी स्वतः पार पाडले.

या सत्तावीस मतदारसंघात कोण्या एकाच पक्षास रायनी मदत केली असेही नाही. निरनिराळ्या मतदार संघात वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे उमेदवार राय यांचे ‘क्लायंट’ होते. SCL – इंग्लंडच्या वेबसाईट वर, २०१० साली बिहार इलेक्शन, २००३ साली राजस्थान इलेक्शन साठी काम केल्याचे दावे म्हणजे निव्वळ विक्रीतंत्रातील बढाईखोरीचा प्रकार आहे असे राय यांचे म्हणणे आहे. २०११ च्या सुमारास SCL – इंग्लंडला घाना येथील एका राजकीय पक्षाचे निवडणुकीचे कंत्राट दिले. सर्वेक्षणातून जमाकेलेल्या डेटावरून निष्कर्ष काढण्याचे व त्यावरून प्रचाराची दिशा ठरवायचे हे काम होते. या कामातील माहितीच्या पृथकरणाचा भाग SCL ने त्यागींच्या ऑवलेनो बिझनेस इंटलिजन्स या कंपनीस दिला. सर्वेक्षणाचे भरलेले फॉर्म्स त्यागींच्या गाझियाबाद येथील ऑफिसात इमेल ने येत. गाझियाबाद मध्ये बसलेली टीम या डेटाचे विश्लेषण करून, प्रचारात कोठले मुद्दे घेतले पाहिजेत याचे निष्कर्ष SCL ला कळवत. घानातील या कंत्राटाच्या निमित्ताने त्यागी, राय व निक्स, मुरेसन यांची चौकडी चांगलीच जुळली. भारतीय निवडणुकात अशाच प्रकारची सेवा राजकीय पक्षांस देण्याचा विचार या चौघांनी पक्का केला, आणि त्यादृष्टीने पुढील हालचाली सुरु केल्या.

स्थानिक ज्ञान व आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान यांचा अनोखा मिलाप आमच्याकडे आहे. त्या जोरावर सर्वेक्षण करून त्यातून अचूक निष्कर्ष काढावयाचे, व लोकांची अपेक्षा काय आहे हे ताडून आपला प्रचार त्या दिशेने करायचा असे तंत्र आम्ही विकसित केले आहे असा दावा करणारे प्रेझेंटेशन यांनी बनविले. शास्त्रीय पद्धतीने निवडणूक व्यवस्थापन करून उत्कृष्ट निकाल मिळविता येतो व ते करण्यास आमच्या कंपनीस निवडणूक सल्लागार म्हणून नेमा अशी ही ‘सेल्स पिच’ होती. त्यागी व राय यांनी हे प्रेझेंटेशन विविध राजकीय पक्षांच्या नेते मंडळींस सादर करून, निवडणूक सल्लागारांचे कंत्राट मिळविण्याचा प्रयत्न सुरु केला. राय सांगतात त्यानुसार काँग्रेस व भाजपा मधील मोठ्या नेत्यांच्या त्यांनी भेटीगाठी घेतल्या. यात अलेक्झांडर निक्स, काँग्रेसचे कंत्राट मिळविण्याबद्दल आग्रही होता. त्याचा कयास होता की इतकी वर्षे सत्तेत असल्यामुळे काँग्रेसकडे दाबून पैसा असणार, आणि पुढील निवडणूक जिंकण्यासाठी तो खर्च करायचीही त्यांची तयारी असणारच.

राय म्हणतात की काँग्रेस नेतृत्वाने यात खूप इंटरेस्ट दाखविला, परंतु प्रत्यक्ष एकही कंत्राट दिले नाही. मग या कंपनीने ठरविले की आपण काम दाखवू आणि त्या जोरावर काँग्रेस आपसूक कंत्राट देईल. अमेठी, रायबरेली, जयपूर ग्रामीण व मधुबनी या चार लोकसभा मतदार संघातील संकलित माहिती साठा त्यांनी राहुल गांधींना फुकट ‘भेट’ म्हणून द्यायचे ठरले. दरम्यान निक्स एका बड्या भाजप नेत्याला सुद्धा भेटला, परंतु त्या नेत्याने ‘कळवतो’ असे सांगून निक्स ची बोळवण केली. निक्सने सुद्धा भाजप बरोबर पाठपुरावा केला नाही. त्याच्या डोक्यात काँग्रेस हीच ‘लठ्ठ’ गिर्हाईक असल्याचे फिट बसले होते.  काँग्रेसला कामाचे सॅम्पल दाखवायचे या हेतूने अखेरीस इंद्रापुरम मध्ये कामाची सुरवात झाली. सुरवातीचे २ / ३ महिने SCL – इंग्लड च्या एका टीमने भारतातील सर्वे करणाऱ्या टीमला प्रशिक्षण दिले. कोठले प्रश्न विचारायचे, कोठल्या क्रमाने विचारायचे मिळालेली उत्तरे थेट मोबाईल ऍपमधून ऑनलाईन कशी भरायची असे हे प्रशिक्षण होते.

या प्रशिक्षणादरम्यान रायना एक विचित्र जाणीव झाली. हे सर्वेक्षणाचे प्रशिक्षण असे चालले होते, की जणू काँग्रेस विरोधी प्रचार सर्वेक्षण करतानाच आपसूक पार पडेल. सर्वेक्षणातील प्रश्न व एकूण प्रश्नांचा रोखच तसा ठेवण्यात आला होता. म्हणजे प्रश्नच अशा रीतीने विचारले गेले होते- की तुम्ही कोणास मत द्याल असा सरळ प्रश्न करण्याऐवजी उत्तरे देणारास काँग्रेस विषयी द्वेष वाटेल असे प्रश्न रचलेले होते. राय ना आश्चर्य वाटले. यांना कंत्राट काँग्रेसचं मिळवायचय तर हे काँग्रेसविरोधी प्रश्नावली का बनवतायत ? नंतर एक दिवस निक्स अमेरिकेतून एक नवीन अँड्रॉइड ऍप घेऊन आला. रायने बनविलेल्या ऍप पेक्षा हे स्वस्त आणि वापरावयास सोपे आहे असे सांगून पुढील सर्वेक्षणासाठी हेच नवीन ऍप वापरायचा आग्रह निक्स ने धरला. नवीन ऍप वापरून काम सुरु झाले आणि अमेठी व रायबरेलीचे ‘मॅपिंग’ हे नवीन ऍप वापरून पूर्ण करण्यात आले.

सर्वेक्षणाचे काम सुरु असताना, अमेरिकेतून एक भारतीय वंशाची अमेरिकन नागरिक कामाची पाहणी करण्यास उगविली. कोणी तरी तिला विचारले कि आपण बेहेवियरल इन्स्टिटयूट मधून आलात काय ? त्यावर ती उत्तरली – मी क्लायंट च्या वतीने देखरेख करावयास आले आहे. राय म्हणतात – तेव्हा माझ्या डोक्यात प्रकाश पडला- की निक्स ने गिर्हाईक गाठले आहे – आणि ते गिर्हाईक काँग्रेस नाही ! तिला पुढे विचारले की बाई क्लायंट कोण ? तर तिने सांगितले की मी नाव नाही सांगू शकत, परंतु अमेरिकास्थित एक गुजराती पार्टी आहे – ज्यांना काँग्रेस पराभूत व्हायला पाहिजे आहे.
या प्रसंगानंतर राय निक्स ला भेटला. राय त्याला म्हणाला की बाबारे, तुला जर या पार्टीचं काम घ्यायचं असेल, तर जरूर घे, मी या कामातही तुला निश्चित साथ देईन. पार्टी कोठली याचा मला काहीही फरक पडत नाही. इलेक्शन मॅनेजमेंट हा माझा व्यवसाय आहे. परंतु काँग्रेस कडून प्रायोगिक तत्वावर काम करण्यासाठी पैसे घ्यायचे, हे काम पसंत पडलं तर तुमच्याबरोबर अजून मतदारसंघासाठी करार करू म्हणून बोलणी करायची, आणि प्रत्यक्षात त्याच कामासाठी दुसरी पार्टीपण शोधायची, एवढेच नव्हे तर काँग्रेसच्याच पैशाने काँग्रेसलाच पराभूत करणारे सर्वेक्षण तयार करायचे हे काही माझ्या व्यावसायिक नीतिमत्तेत बसत नाही.

पकडला गेल्यावर निक्सकडे एकच उत्तर होते. ते म्हणजे – मी इथे पैसे कमवयला आलो आहे. या नंतर रायनी, निक्सने आणलेल्या ऍप चा प्रोग्रॅम दाखविण्याची मागणी केली. हा प्रकल्प राय व त्यागिनी SCL बरोबर सुरु केला, तेव्हा सर्वेक्षणातून मिळालेला डेटा भारतीय सर्व्हर्स वर अपलोड होईल असं ठरलं होत. परंतु निक्स ने आणलेलं नवीन ऍप सर्वेक्षणाचा डेटा थेट अमेरिकेतील सर्व्हरला पाठवीत होता. निक्स लबाडी करतो आहे हे लक्षात आल्यावर रायने काम थांबविले आणि यापुढे काम करण्यापूर्वी आपसात एक सामंजस्य करार करू त्यानंतरच काम सुरु करू असा आग्रह धरला. तसेच निक्सच्या SCL बरोबर काम पुढे चालू ठेवण्यासाठी, रायने मुरेसनला इथे दिल्लीत बसवा अशीही अट घातली. कारण रायचा मुरेसन वर विश्वास होता. परंतु मुरेसन तर उपलब्ध नव्हता SCL -UK ने त्याला केनिया येथे पाठविले होते. केनिया मध्ये प्रेसिडेंट उरहू केन्याटा यांचे काम कंपनीने घेतले होते. पुढे २०१३ साली SCL च्या मदतीने राबविलेली प्रचारमोहीम फते होऊन केन्याटा सत्तेत आले. अजून चार वर्षांनी २०१७ साली केन्याटानी SCL ची उपकंपनी केम्ब्रिज अनेलटिकाला इलेक्शन मॅनेजमेंट चे काम दिले त्यातही केन्याटा विजयी झाले,परंतु केम्ब्रिज ऍनेलिटीका ने बजावलेल्या भूमिका वादग्रस्त ठरली.
इथे थोडे विषयांतर झालं, आपण गोष्ट करीत आहोत २०११/१२ सालची. मुरेसन केनियात होता, भारतातील SCL चे काम रायनी रोखून धरले होते. मुरेसन आला तरच मी काम पुढे चालू करेन अशी अटच रायनी घातली होती. राय एव्हाना २०१२ सालच्या विधानसभा निवडणुकीसाठी विविध पक्षीयांबरोबर काम करू लागले होते. SCL चे काम थंड पडले होते.  तशात एक वाईट बातमी आली. केनिया मध्ये कामासाठी बस्तान मांडून बसलेले मुरेसन हॉटेल रूम मध्ये मृतावस्थेत सापडले. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगण्यात आले, परंतु राय सांगतात की त्यांच्या कानावर SCL कर्मचाऱ्यांच्या सुरु असलेली अशीही कुजबुज पडली की मुरेसनचा खून करण्यात आला होता. काँग्रेस कडून पैसे घेऊन भाजपासाठी काम करण्याचा जो उद्योग SCL भारतात करू पाहत होती, तसाच डबल गेम त्यांनी केनियातही खेळण्याचा प्रयत्न केला, त्यात मुरेसनचा बळी गेल्याची बोलवा होती.

मुरेसनच्या मृत्यू नंतर त्या जागी ख्रिस्तोफर वायली या तुलनेने तरुण इसमास नेमण्यात आले. सध्या हा वायलीच फेसबुक व केम्ब्रिज अनॅलिटीका वादाच्या केंद्रस्थानी आहे. यानेच केम्ब्रिज एनॅलॅटिका मधून राजीनामा देऊन प्रकरण प्रसार माध्यमांत नेऊन जागल्याची भूमिका पार पडली आहे.
परत विषयांतर झाले. आपण २०१२ सालच्या घडामोडी पाहात होतो. तर मुरेसनचा अंत झाला आणि राय SCL बरोबर पुढे काम करतील ही शक्यताच मावळली. राय कडून डेटा मिळण्याचे बंद झाल्यावर हा जो कोणी अमेरिकास्थित गुजराती क्लायंट निक्सने शोधला होता, तो क्लायंटपण SCL ने गमावला. दम्यान SCL सुद्धा आपल्या राजकीय विश्लेषण करणाऱ्या विंगला वेगळे काढून केम्ब्रिज एनॅलॅटीका या नावाने वेगळी कंपनी काढायच्या व्यापात गुंतली होती. तिचा डोळा आता येऊ घातलेल्या अमेरिकन निवडणुकीवर होता.

राय आणि त्यागींचे मार्ग येथून बदलले. राय स्वतंत्रपणे निवडणूक सहाय्य्कची कामे मिळवीत राहिले तर त्यागींची कंपनी आजही केम्ब्रिज एनॅलॅटीका बरोबर भागीदारीत काम करते.

ही सर्व माहिती अविनाश कुमार राय या एकेकाळच्या केम्ब्रिज एनॅलॅटिका बरोबर भागीदारीत काम करणाऱ्या गृहस्थाने दिली आहे. केम्ब्रिज एनॅलॅटिकाने भारतीय निवडणुकांत आजवर नेमकी काय कामगिरी पार पाडली या बाबत कदाचित अजून वेगळी माहिती अलेक्झांडर निक्स, अलेक्झांडर ओक्स, अमरीश कुमार त्यागी या उरलेल्या SCL लिमिटेडच्या उरलेल्या तीन संचालकांकडे असेलही, पण आजवर ज्ञात झालेली माहिती ही अशी आहे.

( द प्रिंट मधील शिवम विज यांच्या लेखावरून साभार )

राईट अँगल्स Editorial Board

Write A Comment