महिला दिन साजरा करण्याचा त्यांना काय अधिकार?वास्तविक जागतिक महिला दिन हा शोषित – कष्टकरी चळवळीची देण आहे. १९०८ सालात १५ हजार कष्टकरी स्त्रिया न्यूयॉर्क शहरात एकत्रित आल्या आणि आपल्या मागण्यांसाठी त्यांनी अभूतपूर्व असा मोर्चा काढला होता. कामाचे तास निश्चित करा, योग्य वेतन द्या आणि मतदानाचा अधिकार द्या या मागण्यासाठी कष्टकरी स्त्रिया रस्त्यावर उतरल्या होत्या. सोशलिस्ट पार्टी ऑफ़ अमरीका ने पुढाकार घेत ८ मार्च या दिवशी पहिला राष्ट्रीय महिला दिवस घोषित केला होता. १९१० सालात क्लारा झेत्किन या जर्मनी मधील डेमोक्राटिक पार्टीच्या सदस्य असणाऱ्या स्त्रीने जागतिक महिला दिनाचा विचार मांडला आणि एका परिषदेत १७ देशातील १०० पेक्षा अधिक स्त्रियांनी या विचारला सहमती दिली. १९११ सालात ऑस्ट्रिया डेन्मार्क, जर्मनी आणि स्वित्झर्लंड मध्ये महिला दिन साजरा करण्यात आला. समान अधिकारासाठी सुरु झालेल्या संघर्षाच्या लढाईतून महिला दिनाची कल्पना पुढे आली आहे. फ्रेंच क्रांती दरम्यान युद्ध थांबवा या मागणीसाठी स्त्रियांनी आंदोलन सुरु केले होते. युद्धात स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडण्यात आली होती.१९१७ सालात रशिया मधील स्त्रियांनी महिला दिनाच्या दिवशी कपडे आणि अन्न अधिकारासाठी संप पुकारला होता. झारशाहीच्या अस्ता नंतर स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला. म्हणजे १९०७ सालापासून कष्टकरी स्त्रियांनी वेगवेगळ्या देशात केलेल्या संघर्षातून महिला दिन जागतिक स्तरावर साजरा होऊ लागला आहे. १९७५ साली युनोने विश्वातील विविध देशात कष्टकरी स्त्रियांनी केलेल्या संघर्षाची दाखल घेत ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून जाहीर केला आणि तो आता सर्वत्र साजरा केला जातो.हा जागतिक महिला दिनाचा इतिहास आणि पार्श्वभूमी लक्षात घ्यायला हवी. कारण हा दिन साजरा करण्या मागील स्त्री मुक्तीचा गाभा, समान अधिकाराची भाषा हरवत चालली आहे अशी भीती वाटणे स्वाभाविक आहे. कारण मूळ गाभा दुर्लक्षित करून वाट्टेल त्या प्रकारे जागतिक महिला दिन साजरा होताना दिसत आहे. विविध वाहिन्यांवरून महिला दिनाचे सोहळे साजरे केले जाताना दिसत आहेत. कर्तृत्ववान महिलांच्या मुलाखती, पुरुषांचे मानल्या गेलेल्या क्षेत्रात प्रवेश केलेल्या स्त्रिया, धाडसी स्त्रिया – बाईक वगैरे चालविणाऱ्या यांच्या मुलाखती घेण्याचा सपाटा लावला जातो. कोण कर्तृत्ववान? कशाला म्हणायचं कर्तृत्व? ‘ पुरुषांचे ’ राखीव क्षेत्र म्हणजे काय? या बद्दल कोणतेच प्रश्न न उपस्थित करता, समान अधिकाराची चर्चा न करता हे सोहळे केले जात आहेत. महिला दिन म्हणून अमुक रेल्वे स्टेशनवर टीसी ते सफाई कर्मचारी फक्त महिला काम करणार, असे करणारे हे देशातील पहिलेवहिले रेल्वे स्टेशन …अश्या चर्चा. कर्जबळी ठरलेल्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर डोईचा पदर खांद्यावर घेऊन ताठ मानेने उभी राहिलेली शेतकरी स्त्री, कुटुंब सावरणारी मधल्या जातीवार्गातील ही स्त्री कर्तृत्ववान नाही? तिची मुलाखत घेणे, त्यातून समाजात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठीचे जनमत तयार करणारे कार्यक्रम योजले जात नाहीत. सतत आस्मानी आणि सुलतानी संकटे झेलूनही कुटुंब आणि समाजाला पोसणारी स्त्री माध्यमांना मुलाखती साठी चालत नाही. ८ मार्च : महिला दिन आला की त्याची पहिली वाच्यता करतात त्या वस्तू निर्माण करणाऱ्या कंपन्या. हो, ‘ स्त्रियांनी वापरायच्या वस्तू ’ च्या जाहिराती मिनिटा मिनिटाला सुरु होतात. सौंदर्य प्रसाधनांना पासून सानिटरी नापकीन तयार करणाऱ्या कंपन्या ‘हप्पी वेमेंस डे ’ म्हणत महिला दिनाचेही वस्तूकरण करताना दिसतात. सामाजिक मध्यामानीही यात खूप धुडगूस घातला आहे. या मध्यमना हत्यार बनवत स्त्री मुक्तीची टवाळी करण्याची संधी अनेकानी घेतलेली दिसते. बायका असूनही तुम्ही किती करता असा पुरुषवर्चस्ववादी विचार ‘सहज’ म्हणून मांडला जातो. स्त्रिया शिकल्या तरी त्या कशा अंधश्रद्ध आहेत, सावित्रीबाईनी यासाठीच का तुम्हाला शिकवलं? इ इ ऐकविण्याची संधी महिला दिनाचे ‘ औचित्य ’ साधून साधली जाते. महिला दिन असतो तसा पुरुष दिन नसतो का ?असा भोळा आव आणत ‘ भाबडा ’ प्रश्नही विचारला जातो. अशी एक ना हजारो उदाहरणे सांगता येतील.खरे तर ८ मार्च : जागतिक महिला दिन काय किंवा अन्य दिन काय – कोणताही दिन साजरा करण्यामागे एक विशिष्ट कारण परंपरा असते. उदाहरणार्थ शिक्षक दिन, भारतीय स्त्रीमुक्ती दिन, शाक्त राज्याभिषेक दिन इ. हि व्यवस्था टिकून राहण्यात ज्यांचे हितसंबंध असतात अशा शक्ती वेगळ्या प्रकरचे दिन साजरे करतात तर आणि त्या उलट व्यवस्था विषमता मूलक, शोषक असल्याने ती उलथउ पाहणाऱ्या शक्तीही पर्यायी भूमिका घेत विविध प्रकरचे दिन साजरे करत असतात. दिन साजरे करण्याची भूमिका विशिष्ठ पार्श्वभूमीवर आकारास येत असते. भारता सारख्या जातपितृसत्ताक शोषण प्रधान असणाऱ्या देशात दिन साजरे करणारे एका बाजूला तर दुसरीकडे पर्यायी दिन साजरे करण्यासाठी आंदोलनात्मक भूमिका घेतल्या जाताना दिसतात. दिन साजरे करण्याच्या मागण्यामध्ये तीव्र स्वरूपाचे संघर्षही दिसतो. उदा. ५ सप्टेंबर शिक्षक दिन साजरा करण्याची प्रथा सत्ताधारी वर्गाकडून पुढे आली. परंतु शोषित-अंकित जातीवर्गकडून ‘२८ नोव्हेंबर हा शिक्षक दिन’ म्हणून साजरा करण्यासाठी लढा देण्यात आला. राधाकृष्णन यांचा जन्म दिवस शिषक दिन म्हणून साजरा करण्यास ठाम विरोध दर्शविला गेला. या मागे एक मुलभूत अशी विचार चौकट आहे. २८ नोव्हेंबर हा म. जोतीराव फुले यांचा स्मृतिदिन आहे. ब्राह्मणी व्यवस्थेने तमाम ब्राह्मणेतर जाती आणि ब्राह्मण स्त्रियांना ज्ञानबंदी केली होती. १९ व्या शतकात या महामानवाने हि बंदी झुगारून देत ज्ञानाची कवाडे सर्वांसाठी खुली करण्यासाठी संघर्ष केला. म्हणून म. फुले यांचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन अशी भूमिका प्रस्थापितविरोधी सामातावाद्यानी घेतली आहे. २५ डिसेंबर : मनुस्मृती दहन दिन हा भारतीय स्त्रीमुक्ती दिन अशीही मागणी गेली २०-२२ वर्ष घेतली जात आहे. तात्पर्य दिन साजरे करणे म्हणजे केवळ अस्मितांचे राजकारण नसते. (अर्थात अस्मितांच्या राजकारणालाही मुक्तीदाई चळवळीत एका विशिष्ट टप्प्यावर महत्व असतेच.) त्याकडे केवळ सोहळे साजरे करणे, अजून किती दिन साजरे करायचे, एक दिवसच ? का रोजच स्त्रियांचा सन्मान झाला पाहिजे – या दृष्टीने पाहणे म्हणजे पुरुषी – नकारात्मक मानसिकतेचे, काही प्रसंगी अहंगंडाचे प्रदर्शन करण्या सारखेच असते. कोणताही दिन साजरा करण्यामागे एक राजकारण असते. ते कधी विषमता चीरस्थायी कण्याचे तर कधी समता मूल्याच्या जोपासनेसाठीचे असते. या दोन प्रकारच्या राजकारण संघर्षात आपल्या सारख्या देशात कामालीची विसंगती, विरोधाभास आढळून येतो. दिन साजरा करण्यालाच आज पर्यंत विरोध करणारे वेगवेगळे दिन साजरे करू लागले आहेत. ते एक तर विशिष्ट दिनाला विरोध तरी करतात किंवा दिनानामागील इतिहास आणि भूमिका दडपून दिनाचे सोहळे साजरे करताना दिसत आहेत. व्ह्यालेन्टाइन डे ला कडाडून विरोध करायचा. का? तर तो ‘परकीय ’ डे आहे. प्रेम व्यक्त करण्याची हिम्मत आणि कुवत नाही हे वास्तव दडवायची मानसिकता या विरोधात काम करत असते. प्रेम करण्याचा अधिकार तरुणाईला मिळाला तर जातपुरुषसत्ताक समाजाची घडी विस्कटण्याचे भय या मागे आहे. म्हणूनच प्रेम व्यक्त करण्यासाठी एकमेकांना गुलाब पुष्प देणारे तरुण तरुणी या सनातन्यांना जणू देशद्रोही, आतंकवादी वाटतात. त्यांना बेदम मारहाण केली जाते. अध्यात्माचे मार्केटिंग करणाऱ्यांनी या दिनाला विरोध करत मातृपितृ दिन जाहीर करून टाकला आहे. निखळ मैत्री हि संकल्पनाच या ब्राह्मणी संस्कृतीत नाही. स्त्री- पुरुषांना एक तर आई – मुलगा, नवरा-बायको…..अशाच नात्यात बघितले पाहिजे अशी यांची सांस्कृतिक दहशत असते. आणि यो या नात्यातीलही प्रेम, आपुलकी, माया, ओलावा याबद्दल ते चक्कर शब्द काढायला तयार नसतात. उलट हि नाती सत्तात्मक , पदसोपनात्मक, श्रेणीबद्ध स्वरुपाची असायला हवी असा कटाक्ष असतो. बाईच्या जतीन अस वागू नये, बाईच्या जातीला हे शोभत नाही, नवऱ्यान मारल आणि पावसान झोडल तर कोणाला सांगायचं अशी मानसिकता निर्माण करून स्त्रियांच्या दुय्यामत्वाचे नैसर्गीकीकरण, स्वभाविकीकरण केले जाताना दिसते. याच प्रकरच्या संस्कृतीच्या स्वयंघोषित रखवालदरानी माता, बहिण, पत्नी, दासी या रुपात स्त्रियांना बंदिस्त केले आहे. स्त्रियांना पापयोनी मानले आहे. त्यांना स्त्रियाचा विटाळ वाटतो. सातच्या आत घरात हे बंधन ते आधुनिक काळात स्त्रियांवर घालतात आणि तेही संस्कृतीच्या नावावर. राजस्थान मध्ये महाविद्यालीन विद्यार्थिनीना (मुलीना) पन्टशर्ट घालयला मज्जाव करणारे आज मितीला महिला दिन साजरा करताना दिसत आहेत. यांना जागतिक महिला दिन साजरा करण्याचा अधिकार खरच आहे का? धर्म, वंश, जातीच्या नावावर स्त्रियांना दुय्यम लेखणारे, जवानाच्या पत्नीच्या आत्मसन्मानाला ठेचणारे, मुलीनी कोणते कपडे घालावे-घालू नये याचे फतवे काढणारेच आज महिला दिनाचे सोहळे साजरे करताना दिसत आहे. स्त्रियांच्या हक्क, अधिकार आणि प्रतिष्ठेची गळचेपी करणाऱ्यांना महिला दिन साजरा करण्याचा अधिकार नाही. मुंबई, गुजरात दंगलीत अल्पसंख्यांक स्त्रियांवर हल्ले करण्यात पुढाकारावर असणाऱ्यांच्या तोंडून महिला दिनाच्या शुभेच्छा कानावर आघातच वाटतो. ज्यांनी स्त्रीविरोधी, स्त्रियांच्या दुयमत्वाचा पुरस्कार केला ते महिला दिनाचे सोहळे साजरे करत आहेत आणि दुसरी कडे स्त्रीमुक्ती चळवळ क्षीण झाली आहे, कोंडीत सापडली आहे, तिचे एन्जिओकरण झाले आहे म्हणून त्यांच्या कडूनही फारसा वेगळा कार्यक्रम पुढे येताना दिसत नाही. असे का घडते? याचे एक कारण असे – चळवळी संपल्या आहेत. त्या मोठ्या प्रमाणात सर्वत्र चालू असलेल्या दिसत नाहीत. चळवळी जोरदारपणे सुरु असतात तेंव्हा त्या विचारांचा पुरस्कार करणारे, शोषित-अंकीतांच्या बाजूचे साहित्य मोठ्या प्रमाणात निर्माण होताना दिसते. ते अपवादात्मक स्वरूपाचे राहत नाही. चळवळी संपू लागल्या कि उरतात ते सोहळे, तोचतोपणा. स्त्री असल्याचे जतवणे, मिरवणे. स्वत्वहीन होत जाणे. सध्या असाच काहीसा व्यवहार घडताना दिसत आहे. महिला दिनाचा इतिहास वेतनाच्या हक्कासाठीचा, कामाचे तास कमी करण्यासाठीचा आहे. या लढ्याची प्रेरणा मार्क्स, लेनीन, एगेल्स सारख्यांची आहे. पण सत्तेच्या उन्मादात लेनिंनचाच पुतळा पडणार्यांना हे कसे समजणार? यांचे हे वागणे म्हणजे तुम्ही आम्ही एक, कंठाळीला मेख!
सामाजिक
1 Comment
मागच्या महिन्याभरातील हा पहिला लेख जो राईट अँगल च्या स्टँडर्ड चा वाटला नाही. सो सो आहे.