fbpx
कला

तू माने या ना माने दिलदारा…

कलाक्षेत्रात कलावंताच्या मेहनत आणि गुणवत्तेपेक्षाही त्याच्या नशिबाचा भाग मोठा असतो. उमेदीच्या दिवसांमध्ये उपेक्षा झाल्यावर उतारवयात त्याच्या कलेचं चिज होतं, त्यातही आपला वेगळा ठसा उमटवून जायचं, हे सोपे काम नाही. असंच काहिसं पुरणचंद आणि प्यारेलाल वडाली या लोकप्रिय सूफी गायक वडाली बंधूंच्या बाबतीत झालं. घरंदाज पाकिस्तानी सूफी गायकांच्या गोतावळ्यात वडाली बंधू तसे कमनशिबी म्हणायला हवेत. त्यात ते हिंदू असल्याने सूफी कव्वालीपासून दूर राहिले तर गुरबानी व भजन गायक म्हणून बसलेला शिक्का पुसण्यात बराच वेळ गेला. पण जेव्हा त्यांनी काफी/कलाम आणि गज़ल गायनावर भर दिला तेव्हा त्यांची ख्याती पंजाबबाहेर पसरली.

वडाली बंधूंपैकी धाकटे बंधू प्यारेलाल वडाली यांचं वयाच्या ७५ व्या वर्षी नुकतच निधन झालं. त्यांचे गुरू हे त्यांचेच थोरले बंधू पुरणचंद वडाली हेच होते. त्यांचाच तालमीत गाण्याचा रियाज केल्यामुळे प्यारेलाल पुरणचंद यांचे सहकारी गायक बनले. या दोघा वडाली बंधूंमध्येही उस्ताद अमानत अली-फतेह अली, नझाकत अली-सलामत अली, राजन मिश्रा-साजन मिश्रा आणि नुसरत फतेह अली-फारूख फतेह अली खान यांच्यासारखंच साम्य होतं. ते म्हणजे, या सर्व गायक बंधूंमध्ये धाकटा भाऊ सरगम, लयकारी आणि तानांमध्ये माहिर होते. म्हणजे थोरले बंधू हे गाण्याचा आकार आणि विचार पद्यातून मांडत गायचे तर धाकटे बंधू त्यांची संगत करताना गाण्याचा विस्तार आलाप, सरगम, तानांमध्ये करत ते गाणं पुढे न्यायचे, हेच या सर्व गायक बंधूंच्या यशस्वी होण्याचे गमक होते किंवा राजन-साजन मिश्रा यांच्याबाबतीत ते आजही आहे. सांगायचं तात्पर्य हे की, भारतीय शास्त्रीय संगितात गुरू-शिष्य परंपरेतून गाणं शिकून ते स्वतंत्र पद्धतीनं ख़याल किंवा रागदारीचं गायन असो किंवा उपशास्रिय गायन सादर करणाऱ्या ज्या लोकप्रिय जोड्या झाल्या त्यात त्या प्रत्येक जोडीनं त्यांच्या गाण्याची चौकट विचारपूर्वक ठरवलेली होती. त्यात कुणी कधी व कसे गायचे, कसे एकमेकांवर कुरघोडी न करता गाणं पुढे न्यायचे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे द्रुत लयीत आपल्या गाण्याचा ठसा सरगम आणि तानांच्या साह्यय्याने उमटवायचा. याप्रमाणेच वडाली बंधूंचं गाणं बहरलं. पण ते पंजाबपुरतंच बहुतांशी राहिलं.

सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे कलावंताच्या बाबतीत त्याच्या कलेला योग्य वेळी म्हणजे योग्य काळात किंवा वयात आणि योग्य व्यासपीठावर संधी मिळायला हवी. पंजाबमधल्या अमृतसर जिल्ह्यातल्या गुरू की वडाली गावात लहानाचे मोठे झालेल्या पुरणचंद यांनी वडिल ठाकूरदास वडाली यांच्याकडून पारंपरिक लोकसंगिताचे धडे घेतले. पुरणचंद हे मुळात पैलवान होते आणि पोटापाण्यासाठी आखाडा गाजवत संगिताची तालीम घेतली. आधी पंडित दुर्गादास आणि काही काळ पातियाला घराण्याचे अध्वर्यू उस्ताद बडे गुलाम अली खाँ यांच्याकडे ख़याल गायकीचे शिक्षण घेतले. त्यामुळं त्यांचा रागदारीचा बाज विस्तारला गेला. पुढे त्यावर आधारीत सूफी गायकी वडाली बंधूंनी विकसित केली. पंजाबमध्ये गुरुबानीचं फार जास्त चलन आहे. त्याचा विपरित परिणाम म्हणून वडाली बंधूंचं उपशास्त्रिय गाणं त्यांच्या उमेदीच्या काळात पंजाबच्या पलिकडे फारसं पोहोचू शकले नाही. १९७५ साली जालंधरच्या विख्यात हरवल्लभ संगीत संम्मेलनात सहभागी होण्यासाठी गेलेल्या पुरणचंद आणि प्यारेलाल वडाली बंधूंना मान्यवर गायक-वादकांचे कार्यक्रम लांबवल्यामुळं आपलं उपशास्त्रिय गाणं सादर करता आलं नाही. तेव्हा त्यांनी निराश होऊन जवळच्याच हरवल्लभ मंदिरात हजेरी लावायची म्हणून गाणं सुरू केलं. सुदैवानं त्यांचं गाणं ऑल इंडिया रेडियोच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने ऐकलं. त्यांनी दुसऱ्या दिवशीच आकाशवाणीसाठी वडाली बंधूंचं पहिलं गाणं रेकॉर्ड केलं. पण तरीसुद्धा पंजाबमध्येच अडकून राहिलामुळं सूफी अंदाजातली गुरुबानी आणि भजनं गाण्यावरंच वडाली बंधूंचा जास्त भर राहिला. मुळात ती त्यांच्या उदरनिर्वाहाची गरज होती.

नव्वदच्या दशकाच्या मध्यात सूफी संगितानं ग्लोबल म्युझिकच्या विश्वात धडक मारली. १९९४ साली शेखर कपूरचा डाकू फुलनदेवीवरचा बॅंडिट क्वीन चित्रपट आला, त्याला उस्ताद नुसरत फतेह अली यांनी संगीत दिलं होतं. त्यात त्यांनी तीन-चार गाणी गायली तर गायिली होतीच, पण बॅकग्राऊंडला सूफी आलापी गाऊन ग्लोबल म्युझिकसमोर सूफी गायकीचा अनोखा अविष्कार सादर केला. त्यानंतर नुसरत फतेह अली यांच्या सूफी कव्वाली आणि कलामांची ख्याती भारतात पसरायला लागली, तेव्हा पंजाब-चंदिगड-दिल्ली परिसरात वडाली बंधूंच्याही सूफी गायकीची चर्चा सुरू झाली. बाबा बुल्ले शाह आणि बाबा फरिद यांच्यासह इतर संत-फकिरांचे पंजाबी-उर्दू कलाम, काफी तसंच फडकत्या चालीतल्या गजलांची फर्माइश व्हायला लागली. साहजिकच वडाली बंधूंची पंजाबबाहेर देश-विदेशातल्या संगीत समारोहांमधली हजेरी वाढायला लागली.

२००३-०४च्या सुमारास वडाली बंधूंचा ‘तू माने या ना माने दिलदारा…’ हा म्युझिक अल्बम खूप गाजला. त्यांच्या या सूफी गाण्यानी त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवलं. त्याआधी ‘दमा दम मस्त कलंदर’ ही मूळ ख्वाजा अमीर खुस्रोची पण नंतर बाबा बुल्ले शाहने पुनर्लेखन केलेली काफी पंजाबी-सूफी ढंगात सादर केली. त्याचाही पुढे स्वतंत्र अल्बम निघाला. तसंच ‘जैसे तेरी ईद हो गयी’, दिल देना ते दिल मंगना वे सौदा इक्को जहाँ आणि अलिकडचं ‘रब्ब दा दिदार’ ही सूफी गाणी गाजली. विशेष म्हणजे पंजाबी बाज असताना आणि आपल्या गाण्यावर प्रचंड हुकूमत असतानादेखील वडाली बंधूंनी आग्रहखातरसुद्धा कधी संवग पंजाबी गाणी गायिली नाहीत. हलाखीच्या परिस्थितीतही पंजाबी धांगडधिगा गाण्याच्या आमिषाला बळी पडले नाहीत. कदाचित संतांची-पिर फकिरांची इबादत करण्याच्या श्रद्धेनं ते सूफी गायन करत असत, त्यामुळेही त्यांनी आपल्या गाण्याशी तडजोड केली नाही.

लाईव्ह स्टेज शोजमध्ये आलाप, जोड, मध्य व द्रुत लयीत सूफी काफी किंवा कलाम सादर करणं, हे वडाली बंधूंच्या सूफी गायकीचं वादातीत वैशिष्टय होतं. त्यामुळं शास्त्रिय संगिताच्या संम्मेलनांमध्ये मोठमोठ्या पंडित-उस्तादांच्या बरोबरीने वडाली बंधुंना गाण्याची निमंत्रण यायला लागली होती. पण गेल्या काही वर्षांपासून पुरणचंद यांचं वाढतं वय आणि प्यारेलाल यांच्या आजारपणामुळं लाईव्ह स्टेज शोज् कमी झाले होते. खरंच कलावंताचं मरण दोन वेळा होतं, पहिल्यांदा त्याला हवी असते तिथे दाद मिळत नाही तेव्हा आणि दुसऱ्यांदा नको तिथे दाद मिळते तेव्हा. अगदी तसंच कलावंताला उमेदीच्या काळात संधी, वाव किंवा प्रसिद्धी न मिळता उतारवयात जेव्हा मिळते तेव्हा त्याची कला जवान झालेली असते पण वाढलेल्या वयामुळं मर्यादा येतात. तसंच काहिसं या गोड गळ्याच्या हरफनमौला वडाली बंधूंच्या बाबतीत झालं, असं म्हणावं लागेल. मात्र जेवढं गाणं त्यांनी गायिलं ते भारतियांसाठी तरी अजोड होतं, ते तमाम रसिकांच्या सदैव स्मरणात राहिल!

लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत, कैक मराठी वृत्तपत्रांत तसेच वृत्तवाहिन्यांमध्ये त्यांनी काम केले आहे.

Write A Comment