fbpx
विशेष सामाजिक

छिंदम संघम गच्छामि !!!

अहमदनगर येथील भाजपाचा उपमहापौर श्रीपाद छिंदम याने छत्रपती शिवाजी शिवाजीमहाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले भाजप वगळता सर्व पक्ष संघटना यांनी रस्त्यावर येऊन छिंदमचा निषेध केला, अगदी तो ज्या पद्मशाली समाजातून येतो त्यानेदेखील त्याचा तीव्र शब्दात निषेध केला. पोलिसांनी त्याला अटकदेखील केलेली आहे. ही विकृती एकट्या छिंदमपुरती मर्यादित नाही तर छिंदमची जडणघडण ज्या परिवारात झाली तो परिवार आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघचा. छिंदमचे ज्या गणवेशात छायाचित्र समाजमाध्यमांवर फिरते आहे त्यावरून हे पुरेसे स्पष्ट आहे. छिंदमच्या वक्तव्याबाबत संपूर्ण संघाला जबाबदार धरता येणार नाही, असा युक्तिवाद केला जातो पण शिवाजीराजे-संभाजीराजे यांची बदनामी करणारे संघीच कसे?

संघाचे बायबल म्हणून ज्या ग्रंथाचा उल्लेख केला जातो त्या “विचारधन”(bunch of thoughts) या ग्रंथात देखील दिवंगत सरसंघचालक गोळवलकर गुरुजी म्हणतात”संभाजी म्हणजे मदिरा आणि मदिराक्षीमध्ये बरबाद झालेला पापी,दारुडा आणि व्यभिचारी होता” याच ग्रंथावर संघाच्या पिढ्यानपिढ्या पोसल्या आहेत.

संघातून आलेले लोक शिवाजीराजांवर जाणिवेतून कितीही बढाया मारत असले तर त्यांच्या नेणिवेत काय कचरा भरलेला असतो तो छिंदमसारख्याच्या मुखातून कधीतरी बाहेर पडतोच,प्रमोद महाजन केंद्रीय मंत्री असताना म्हणाले होते “आमची सत्ता संपूर्ण देशभर आहे शिवाजीराजांचे राज्य फक्त साडेतीन जिल्ह्यापुरते होते”. यातून यांना शिवरायांबाबत किती घृणा आहे हे स्पष्ट होते.एका बाजूला मतांसाठी शिवाजीराजांचे नाव घ्यायचे आणि सत्ता आली की त्यांचा द्वेष करायचा ही त्यांची वृत्ती आहे.

वि दा सावरकर म्हणाले होते “शिवाजी कसला राजा हा तर काकतालीय न्यायाने झालेला राजा होता”.सावरकरांना मौर्याची सत्ता नष्ट करणारा पुष्यमित्र शुंग, पेशवे महान वाटले पण शिवाजीराजे दखलपात्र वाटले नाहीत. लेन आला आणि शिवाजीराजांची बदनामी करून गेला, असे घडले नाही तर राजवाडे, पुरंदरे, बेडेकर इत्यादी मंडळींनी शहाजीराजाना सतत गैरहजर दाखवणे आणि रामदास- कोंडदेव यांना गुरु नसताना सतत शिवबा- जिजामातेशेजारी दाखवणे हे काम केलेले आहे.पुरंदरेंनी तर “दादोजी,जिजामाता आणि शिवबाचे गोत्र एकच होते” अशी कल्पनाविस्तारीत विकृती त्यांच्या ग्रंथात लिहिली. पुरंदरचे हे वाक्य छिंदमइतकेच किंबहुना त्यापेक्षा अधिक बदनामीकारक आहे. लेनच्या पुस्तकाची पाळंमुळं पुरंदरेंच्या विकृत लिखाणात आहेत.संघीष्टांच्या मनात असणारी विकृती कधी लेनद्वारे तर कधी छिंदमद्वारे बाहेर पडते.

लेनच्या पुस्तकावर बंदी घालू नये असा सल्ला तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांनी दिला,पण शिवप्रेमींच्या उद्रेकानंतर त्यांनी घुमजाव केले.असाच सल्ला एका ज्येष्ठ पुरोगामी संपादकानेदेखील दिला होता. लेनला मदत करणारी जी मांदियाळी आहे त्यात अनेक संघी आहेत. त्यात माधव भंडारी देखील आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे न्या.पी बी सावंत,ज्ञानपीठक प्राप्त साहित्यिक डॉ भालचंद्र नेमाडे, जितेंद्र आव्हाड, डॉ प्रकाश आंबेडकर, ज्ञानेश महाराव ,प्रा प्रतिमा परदेशी इत्यादींनी व संपूर्ण महाराष्ट्राचा विरोध असताना देखील देवेंद्र फडणवीस-विनोद तावडे यांनी पुरंदरेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला.आता तर पुरंदरेंच्या शिवसृष्टीला ३०० कोटी रुपये फडणवीस सरकारने मंजूर केलेले आहेत. म्हणजे हे जिजाऊंची बदनामी केल्यामुळे पुरंदरेंना बक्षीस दिले काय? असा प्रश्न पडलेला आहे.

योगेश उपासनी नावाच्या व्यक्तीने बीड येथील सावरकर कॉलेजात “शिवरायांना चापटा मारायला हव्यात” असे वक्तव्य केले होते.तेंव्हा संतप्त तरुणांनी कॉलेजची तोडफोड केली होती.ते उपासनी आता कीर्तनकार बनून महाराष्ट्रात फिरतात.म्हणजे छिंदम एकटा नाही हा एक संघटित विकृतीचा परिपाक आहे.

बहुजन समाजाला नाउमेद करण्यासाठी त्यांच्या महापुरुषांची बदनामी करणे,स्त्रियांचे चारित्र्यहनन करणे ,हा यांचा सनातनी धंदा आहे वेद पुराणात माहिलांबद्धल किती बदनामीकारक लिहिले आहे, याचा समाचार महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, कॉ शरद पाटील आणि डॉ आ ह साळुंखे यांनी घेतला आहे महिला ही सेवेसाठी व उपभोगासाठीच आहे हे पुराणांनी लिहिले आहे मत्सपुराण तर म्हणते “उपवर झालेल्या मुलीचा उपभोग घेण्याचा पहिला मान भटासाठी असतो” तर अथर्ववेदात लिहिले आहे की” एखादी स्त्री जर ब्राह्मणाला आवडली आणि त्याने जर तिचा हात धरला तर ती त्याची अधिकृत बायको होते,ती विवाहित असली तरी, हे सत्य आहे हे सांगण्यासाठीच सूर्य रोज उगवतो” या विचारांचे राज्य संघ भाजपाला आणायचे आहे. याचा अभिमान आपण बाळगणार का? त्यामुळेच प्रबोधनकार ठाकरे म्हणाले होते पुराणं म्हणजे शौचकूप आहेत. या शौचकूपाची मानसिकता घेऊन संघी आजदेखील वावरत आहेत. त्यातूनच छिंदमसारखे माजोरडे तयार होतात. यांचे कार्य सदासर्वकाळ चालू आहे, आज सत्ता आल्यामुळे ते उघडपणे बोलत आहेत, पण ही विकृती अनादी काळापासून चालत आलेली आहे.

वैचारिक आणि राजकीय मतभिन्नता असू शकते पण याचा अर्थ स्त्रियांची किंवा प्रतिपक्षाची बदनामी करणे, हा पराक्रम नव्हे, तर हा विकृतीचा कळस आहे. शिवरायांनी तर शत्रूच्या स्त्रियांचा देखील आदर करा, हे आपल्या सैनिकांना सांगितले. संघ शिवरायांचे नाव घेतो पण पूर्णतः त्यांच्या विरोधी विचारांचे काम करतो. यांना शिवाजीराजे हवे आहेत दंगलीसाठी आणि वर्चस्वासाठी! यांना शिवरायांची समता, शेतकारीहित, स्त्रीसन्मान, उदार धार्मिक धोरण इ. चे कांही देणेघेणे नाही. शिवरायांची नैतिकता आणि प्रगल्भता यांच्यात येणार नाही, कारण त्यांची ती वृत्तीच नाही.

बहुजन समाजाने विशेषतः मराठा समाजाने या संघ भाजपवाल्यापासून दूर राहावयाला हवं. यांना पोसणे म्हणजे शिवरायांची बदनामी करणारांना हातभार लावणे होय. यांना पोसणे म्हणजे लोकशाहीची हत्या करणारांना मदत करणे होय. मराठा समाजासाठी हा संक्रमणाचा काळ आहे .आपल्या महामानावांची बदनामी करणाऱ्या संघी विचारांसोबत जायचे की आपल्या पूर्वजांच्या खांद्याला खांदा लावून स्वराज्यासाठी लढणाऱ्या एससी, एसटी, ओबीसी, मायनॉरिटी इत्यादींबरोबर राहायचे? जीवाला जीव देणाऱ्या बहुजनाबरोबर राहायचे की विश्वासघातकी संघींबरोबर जायचे, हे आता ठरवावे लागेल.

संघाच्या कोअर टीम मध्ये काय चालते,हे आपल्याला माहीत नाही पण पुरंदरे, उपासनी, फडणवीस, छिंदम इत्यादींच्या भूमिका आणि वक्तव्ये पाहिली तर शिवाजीराजांबद्धल यांच्या मनात काय असणार, हे स्पष्ट होते. शिवाजीमहाराज, जिजाऊ, संभाजीराजे, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर इत्यादी महामानवाबाबत जोक्स तयार करणे, कुजबुज तंत्राद्वारे त्याचा प्रचार करणे हा तर सांघी मानसिकता असणाऱ्यांचा होलसेल धंदाच आहे. शाहू महाराज म्हणजे घसरगुंडी ही बदनामी कोणी केली? शाहू महाराजांचा संघर्ष ज्यांच्याविरुद्ध होता त्यांचेच हे षडयंत्र आहे, पण शाहुराजाने वैचारिक संघर्ष केला, त्यांनी कमरेखाली वार केले नाहीत. कमरेखाली वार करणे ही संघी मानसिक विकृती आहे. वैचारिक पद्धतीने लढता आले नाही की चारित्र्यहनन करणे, शिवीगाळ करणे हा यांचा प्राचीन काळापासूनचा धंदा आहे. हे विचाराने लढुच शकत नाहीत, हे त्यांनी अनेक वेळा सिद्ध केलेले आहे. ऐका बाजूला ध्रुवीकरण करण्यासाठी बहुजन महापुरुष वापरायचे आणि दुसऱ्या बाजूला त्यांना बदनाम करायचे, हा एका संघटीत कटाचा भाग आहे.

आपल्या देशात तत्त्वज्ञानाच्या पातळीवर विविधता आहे,पण त्यांचे अंतिम उधिष्ट मानवता, समानता, स्त्रीसन्मान राहिले आहे. चार्वाक, जैन, बौद्ध, कापालिक, आजीवन, शाक्त, महानुभावी, वारकरी, सुफी, लिंगायत, शीख इत्यादी दर्शनाची संपन्नता आपल्या देशात आहे,पण या सर्व तत्वज्ञानाला वितळवून हिंदुत्वाच्या(सनातनी)साच्यात घालण्याचे काम संघाने चालवले आहे, विविधतेतील टॉलरन्स यांनी मातीमोल केला आहे.

संघाचे हिंदुत्व हिंदुअंतर्गत जातीत समता, साक्षरता, बुद्धिप्रामाण्यवाद, स्त्रीसन्मान निर्माण व्हावा,यावर आधारलेले नाही, तर ते दलित आणि मुस्लिम द्वेषावर आधारलेले आहे. माहिलांबाबत तर संघी मानसिकता असणाऱ्यांचा दृष्टिकोन अत्यंत घाणेरडा आहे. यांच्या परिवारातील महंत, नेते सतत बोलत असतात की “प्रत्येक हिंदूने पाच-दहा मुलांना जन्म द्यावा “म्हणजे हे काय महिलांना बाळाला जन्म देणारी फॅक्टरी समजतात काय? हे ब्राह्मण महिलांना देखील दुय्यमच लेखतात त्यामुळेच एकही महिला सरसंघचालक किंवा शंकराचार्य होऊ शकलेली नाही. महिलांची टिंगल करणे, जोक्स तयार करणे, चारित्र्यहनन करणे हा यांचा पारंपारिक उद्योग आहे. गतवर्षी भाजपाचे आमदार प्रशांत परिचारक म्हणाले होते की”तिकडे सीमेवर सैनिक तीन तीन वर्षे लढतात त्यांना इकडे मुलं होतात आणि तिकडे ते पेढे वाटतात”हा देशासाठी रक्त सांडणाऱ्या सैनिकांचा अपमान आहे,हा वीरांच्या पत्नीचा अपमान आहे,हा देशाचा अपमान आहे अर्थात हा परीचारकाचा देशद्रोह आहे,तरी परीचारकाला अजून अटक नाही,असे वक्तव्य जर एखाद्या बहुजन आमदाराने केले असते तर आतापर्यंत त्याचे घर पेटवले असते.परीचारकाला मात्र फडणवीस सरकारचा पाहुणचार चालू आहे,जणुकाय महिलांची-महामानावांची बदनामी करणे हा आमचा जन्मसिद्ध हक्कच आहे अशा मुजोर वृत्तीने हे वागत आहेत.

२०१४ च्या निवडणुकीत भाजपाची घोषणा होती “चला घेऊ शिवछत्रपतींचा आशीर्वाद।चला देऊ मोदीला साथ”.आज मात्र शिवरायांचा आशीर्वाद घेऊन सत्तेवर आलेले भाजपवाले शिवरायांची बदनामी करण्यात व्यस्त आहेत.शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शित होणाऱ्या शिवरायांवरील चित्रपटाची पोस्टर हटवून आता मोदींची पोस्टर लावण्याचा फतवा मुबई भाजपाने काढला आहे,आता भाजपाला शिवरायांपेक्षा मोदी महापुरुष वाटत आहेत.

संघ नेहमी संस्कृतीच्या गप्पा मारत असतो,भाजप हा सुसंस्कृत कार्यकर्त्यांचा पक्ष अशा वल्गना संघवाले नेहमी करत असतात.छिंदमच्या वक्तव्यावरून तमाम मराठी भाषकांना समजले,संघाचा सुसंस्कृतपणा म्हणजे काय आहे ते!

पद्मशाली समाजाने छिंदमच्या वक्तव्याचा निषेध करणारं एक पत्रक ताबडतोब काढले आहे,तसं पत्रक पुरंदरेंचा निषेध करणार ब्राह्मण महासभा कधी काढणार आहे?.ते असं पत्रक काढणार नाहीत,कारण आजदेखील त्यांना पुरंदरे हे महापुरुषच वाटतात, हीच सामूहिक विकृतीची फलशृती आहे.

लेखक शिवकालीन इतिहासाचे अभ्यासक असून गेली अनेक वर्षे प्रगतीशील चळवळीतील कार्यकर्ते आहेत.

2 Comments

  1. छान लेख
    प्रबोधनकार ठाकरे यांचे बरेच साहित्य उपलब्ध होत नाही
    पेशवाई बद्दल ही फार कमी माहिती उपलब्ध आहे
    ती सर्वाना समजणे गरजेचे

Write A Comment