fbpx
विशेष

आधीच मर्कट त्यात शिक्षणमंत्री झाला

मानवाच्या शास्त्रशुद्ध अभ्यासासाठी चार्लस डार्विन(1808-1882) यांचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवावे लागेल.त्यांच्या वाट्याला सुमारे 73 वर्षाचे आयुष्य आले.वयाच्या 22 व्या वर्षी सुमारे पाच वर्षे बोटीतून जगाची सफर करून त्यांनी पक्षी,जलचर,वनस्पती,प्राणी इत्यादी सजीवांचा अभ्यास केला,पुढे त्यावरती मिळवलेल्या डाटावर(स्रोत) वीस वर्षे काम करून 1859 साली त्यांनी आपला on the origin of species हा अभिजात ग्रंथ प्रकाशित केला.सुमारे 25 वर्ष संशोधन करून डार्विनने थेअरी मांडली,डार्विनचे संशोधन म्हणजे सत्यपाल सिंहासारखे उचलली जीभ आणि लावली टाळ्याला अशा प्रकारचे नाही.पळी पंचांग आणि भटी भेजा घेऊन डार्विनने पंचगव्य सेवन करून संशोधन केले नाही.तर शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करून त्यांनी मानवी उतक्रान्ती बाबत सिद्धांत मांडला.
कोणताही सजीव स्वतंत्रपणे निर्माण झालेला नाही, तर ही प्रदीर्घ आणि रासायनिक प्रक्रिया आहे. Geology च्या थेअरीनुसार सुमारे 460 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वी निर्माण झाली.सुरुवातीला तप्त वायूचा असणारा गोळा पर्जन्य वृष्टीमुळे थंड झाला,त्यावरती पाणी साठले.सुमारे 350 कोटी वर्षांपूर्वी एकपेशीय सजीव निर्माण झाला.ही एक रासायनिक प्रक्रिया आहे.लाखो वर्षांनी बहुपेशीय जलचर,पक्षी,प्राणी,वनस्पती निर्माण झाले.सुमारे 5 कोटी वर्षांपूर्वी वानरसदृश्य प्राणी निर्माण झाला.
सुमारे 30 ते 40 लाख वर्षाच्या दरम्यान अस्ट्रोलोपीथिकस हा मानवसदृश्य प्राणी तयार झाला.याचा जबडा मोठा होता,चार पायावर चालत होता,त्यानंतर होमो हेबिलास हा हातांचा वापर करणारा प्राणी निर्माण झाला.प्रत्येक स्टेजला तो निसर्गानुसार स्वतःमध्ये बदल करून घेतोय( adaption) यालाच डार्विन survival of fittest म्हणतात.ज्या प्रजातीने निसर्गानुसार स्वतः मध्ये बदल करून घेतला, तिच प्रजाती जिवंत राहिली,बाकी प्रजाती नष्ट झाल्या.
होमो हेबिलास नंतर होमो इरेक्टस हा मानव आला.पाठीचा ताठ कणा हे त्याचे वैशिष्ट्ये होय.वणव्याच्या ज्वाला त्याला अग्नीची जाणीव करून गेल्या.तो अन्न भाजून खाऊ लागला,त्यामुळे त्याचा जबडा लहान झाला.त्यानंतर निअंडरथल ही स्टेज आहे.त्यानंतर होमो सॅपीयन ही स्टेज आहे.याच टप्प्यात तो दगडी हत्यार वापरू लागला, म्हणजे हा काळ सुमारे एक लाख वर्षांपूर्वीचा मानला जातो,ऐतिहासिक भाषेत या काळाला स्टोन एज(stone age) म्हणतात.याच मानवाने शेतीचा,घर बांधण्याचा शोध लावला.याला गॉर्डन चाईल्ड नावाचा महान आर्किओलॉजिस्ट क्रान्तीचे युग म्हणतो.
यानंतरची म्हणजे आजची स्टेज आहे होमो सॅपीयन सॅपीयन याचा अर्थ आहे सुंदर आणि बुद्धिमान मानव.मानवशास्त्राने(Anthropology) याबाबत शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास केलेला आहे.पण मानवाचा विकास संपलेला नाही, असे मानवशास्त्रज्ञ पुराव्यानुसार सांगतात.एक लाख वर्षांनी आजच्या सारखा मानव नसेल,केस नसतील,नडगीचे एक हाड नसेल,पायाचे खालचे तळवे नसतील,याबाबतचे कल्पनाचित्र ज्ञानपीठकार डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी ‘हिंदू’त मांडलेले आहे.
माकडापासून मानव झाला, असे डार्विन देखील सांगत नाहीत, तर natural selection आणि survival of fittest हे दोन महत्वाचे सिद्धांत डार्विन यांनी मांडलेले आहेत.कोणताही एखादा सजीव स्वतंत्रपणे तयार झालेला नाही,तर सर्व सजीव उतक्रान्त होत आलेले आहेत.आजचा मानव आणि माकड हे मूळ एकाच प्रजातीपासून निर्माण झालेले असावेत,माकडापासून मानव नव्हे,असे अंथ्रोपोलॉजिस्ट सांगतात.सत्यपालसिंह मात्र मानवलीला करण्याऐवजी मर्कटलीला करतात, हे सगळे वैदिकपरंपरेला प्रमाण मानल्याचे परिणाम आहेत.असे जर शिक्षणमंत्री आपल्या देशाला लाभले असतील तर आपल्या देशाचे भवितव्य अंधकारमय आहे.
सत्यपालसिंह ज्या पक्षाचे खासदार आहेत त्या भाजप पक्षाचे अडवाणी आणि मुरलीमनोहर जोशी हे सायन्स विषयात पोस्ट ग्रॅज्युएट आहेत,सत्यपालसिंह स्वतः आयपीएस आहेत, इतकेच काय ज्यांच्या विचारधनावर हा पक्ष पोसलेला आहे त्या गोळवलकर यांनी देखील विज्ञान शाखेतील पद्व्युत्तर शिक्षण घेतले होते. लालकृष्ण अडवाणी यांच्यापासून असे अनेक संघ भाजपातील उच्च वर्णीय आधुनिक विज्ञान कला वाणीज्य शाखेतील पदवीधर आहेत. या नेत्यांपैकी अनेकांची मुले ही युरोप अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी कायम जात असतात. काहीतर कायमची तिथेच स्थायिक झाली आहेत. म्हणजे स्वतः विज्ञानाचे शिक्षण घ्यायचे, आधुनिक शिक्षणाची कास धरायची आणि बहुजन समाजाला वेद शिका म्हणायचे, माणूस माकडापासून झाला नाही, पृथ्वी सुर्याभोवती फिरत नसून सुर्यच पृथ्वीला प्रदक्षीणा घालतो, प्राचीन काळात भारतात अण्वस्त्रे होती, प्लास्टिक सर्जरी चालत असे वगरै भाकडकथांनी देशातील गरिब बहुजनांना मूर्ख बनवण्याचे काम करायचे, ही बहुजनांची फसवणूक आहे. ज्या काळात वेद शिकणे प्रतिष्ठेचे होते त्या काळात बहुजनांनी वेद शिकल्यास त्यांना क्रूर शिक्षा देऊन त्यापासून वंचित ठेवले. वेद शिकणाऱ्या शंबुकापासून ते शस्त्रविद्या शिकणाऱ्या एकलव्यापर्यंत अनेकांचे याच वैदिकांनी काय केले हे सांगण्याची गरज नाही. अनेक संत आणि संभाजीराजाना त्यांच्या विद्वत्तेवर जळून हालहाल करून ठार मारणारे हे भाजप आणि संघ ज्या वैदिक पंरपरेचा उदोउदो करते तेच तर होते की! आज विज्ञान शिकणे काळाची गरज असताना बहुजनांना वेद शिकण्याचा सल्ला देणे हा सत्यपालसिंह ज्या पक्षातून लोकसभेवर निवडून गेले आहेत त्या पक्षाचा कावेबाजपणा आहे. हा कावेबाजपणा महात्मा फुलेंनीच ओळखला होता त्यामुळेच वेदातील मर्म मैदानी आणावे असं त्यांनी बहुजनांना सांगून ठेवलं आहे.
हिंदू संस्कृतीच्या नावाखाली वाट्टेलत्या भाकडकथा पसरवणारे हे महाभाग स्वतःची मुलं अमेरिका-युरोपात शिक्षणासाठी पाठवतात आणि येथील शेतकरी,दलित,आदिवासी मुलांना असल्या भाकडकतांचे डोस पाजतात हा कावेबाजपणा जर ओळखला नाही तर बहुजनांच्या पुढील पिढ्यांचे अतोनात नुकसान होणार यात शंकाच बाळगायला नको.
विदेशात एखादा शोध लागला की हे आमच्या पुराणात आहेच की, अशी बोंब मारणे म्हणजे दुसऱ्याच्या मुलाला माझाच मुलगा आहे असे म्हणने होय.जर वेद-पुराणं इतकी सामर्थ्यशाली आहेत तर,विमान,रेल्वे,मोबाईल,लाईट,कार,टीव्ही इत्यादींचा शोध भारतात का लागला नाही?
भाजप आणि त्यांच्या परिवाराला आधुनिक शिक्षणाचे पुराणीकरण करायचं आहे,हे सत्यपालसिंहसारख्या अनेक भाजप नेत्यांच्या वक्तव्यावरून सिद्ध होते.हे प्रगतीच्या दृष्टीने धोकादायक आहे.आज डार्विनच्या सिद्धांताला विरोध करणारे मंत्री उद्या असेही म्हणतील की सीमेवर सैनिकाऐवजी होम हवन यज्ञ करू म्हणजे शत्रू आपोआप पळून जातील,असे जर सुरु झाले तर आपल्या देशाचे पानिपत होईल.हे रोखायचे असेल तर अशा बेताल वक्तव्याला वेळीच रोखायला हवं नाहीतर उरावर बसलेली पेशवाई बहुजनांच्या भावी पिढ्यांचे मेंदूच काबीज करून टाकेल.
डार्विनचा सिद्धांत परिपूर्ण नाही. तो अगदी चुकीचाही ठरू शकतो. उत्क्रांती खरोखरचं घडली का ? तर घडली. कारण आज जगभरात सापडणाऱ्या
जीवाष्मां वरून करोडो वर्षांपूर्वी या ग्रहावर आज आढळतात त्याहून वेगळ्याच प्रजाती नांदत होत्या. मग उत्क्रांती नेमकी कशी घडली ? डार्विन म्हणतात त्यानुसार सजीवांच्या रचनेत अपघाताने अचानक होणारे बदल – म्युटेशन्स – मुळे एकाच प्रजातीतील काही निवडक नमुने इतरांपेक्षा जीवनाच्या संघर्षात सरस ठरू लागले, त्या प्रजातीत या निवडक नमुन्यांची अपत्ये, मात्या पित्यांचे गुणधर्म घेऊन जन्मास आली आणि काळाच्या ओघात, ह्या नवीन गुणधर्म असलेल्या पिढ्या त्याच प्रजातीतील इतर प्राण्यांच्या तुलनेत प्रबळ ठरून त्यांची संख्या वाढत राहिली. इतर नष्ट होऊन गेले.
हा सिद्धांत चुकीचा असू शकेल, विज्ञान जगतात आजही या सिद्धांताचे खंडन करणारे नवीन नवीन संशोधन होतच आहे, जेव्हा पुरेसे पुरावे हाती येतील आणि
उत्क्रांती नेमकी कशी घडून आली याचे स्पष्टीकरण मिळेल, तेव्हा डार्विनचा सिद्धांत चुकीचा ठरला, तरी त्याने कोणासहि वाईट वाटण्याचे काही कारण
नाही. परंतु डार्विनचा सिद्धांत चुकीचा आहे कारण ब्रम्हाच्या मुखातून ब्राम्हण बाहेर पडले, हातातून क्षत्रिय, पायातून शूद्र वैगेरे भाकड कथा डार्विनचा प्रतिवाद होऊ शकत नाहीत. जिवाच्या उत्पत्तीचा, या ग्रहावरील जीवसृष्टीच्या खेळाचा वेध घेण्यात डार्विनचे योगदान हा एक मैलाचा दगडं बनून राहिला आहे.
उद्या अगदी स्पष्ट पुराव्यानिशी डार्विनचा सिद्धांत फेटाळला गेला, तरी तो विज्ञानाच्या पुस्तकांतून वगळून टाकणे हा वेडाचार असेल. कारण सैद्धांतिक
मांडणी कशी करावी, विज्ञाननिष्ठ विचार कसा करावा हे शिकण्यासाठी डार्विनची मांडणी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे महत्वाचे आहे.
स्टीफन हॉकिन्सचा प्रसरण पावणाऱ्या विश्वाचा सिद्धांत जेंव्हा पुराव्यानिशी स्विकारला गेला, तेव्हा जयंत नारळीकर व फ्रेड हॉईलचा स्थिर
विश्वाचा सिद्धांत रद्द ठरला, त्यासाठी नारळीकरांच्या सिद्धांत आता विज्ञानाच्या पुस्तकांतून काढून टाका हि मागणी जेवढी मूर्खपणाची, त्याहून
अधिक सत्यपालसिंहांचा डार्विन वरील रोष मूर्खपणाचा आहे. सत्यपाल सिंह हे एकेकाळचे आय पी एस अधिकारी आहेत. देशातील सर्वोच्च प्रतीची सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा, मुलाखत पास झाले आहेत. या देशातील एवढा उच्चंविद्याविभूषित माणूस जर एवढा आचरट असेल, आणि अशा माणसाला खास निवडून मोदीसरकार शिक्षणमंत्री बनवित असेल, तर आपला प्रवास मध्ययुगाच्या दिशेने सुरु झाला आहे यात काही शंका नाही.

 

लेखक शिवकालीन इतिहासाचे अभ्यासक असून गेली अनेक वर्षे प्रगतीशील चळवळीतील कार्यकर्ते आहेत.

Write A Comment