fbpx
सामाजिक

सावधान – असे आहेत यांचे उद्याचे कार्यक्रम

दरवर्षी 1 जानेवारीला महाराष्ट्रातील दलित जनता भिमा कोरेगाव येथे, तेथील विजय स्तंभाला सलामी देण्यासाठी जमत असते. यावर्षी याबाबतच्या घटनेला 200 वर्षे पूर्ण झाली असल्यामुळे नेहमीपेक्षा मोठ्या संख्येने दलित समुदाय जमला होता- ‘भिमा कोरेगाव ने दिला धडा, नवी पेशवाई मसनात गाडा ’ असे घोषवाक्य घेऊन दि-31 डिसेंबरला पुणे येथील शनिवार वाड्यासमोर ,एल्गार परीषदेचे आयोजन करण्यात आले. त्याची तयारीही राज्यभरातून करण्यात आली- देशातील नवनेतृत्वातील काॅ-जिग्नेष मेवानी, उमर खालीद, सोनी सोरी, भिम आर्मीचे सचिव, यांच्या बरोबरच राधिका वेमुला, उल्का महाजन, बी-जी-कोळसे पाटील, आणि अध्यक्षस्थानी अॅड-बाळासाहेब आंबेडकर यांना आमंत्रित करण्यात आले होते- ही परीषद होऊ नये यासाठी अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाने , पुणे मनपाच्या महापौर मुक्ता टिळक व पेशव्यांच्या तथाकथित वारसांनी आटोकाट प्रयत्न केले होते- परंतु अॅड-बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नामुळे शेवटी ही परीषद यशस्वीपणे पार पडलीच.
यावर्षीच्या भिमा कोरेगाव येथे होणाऱ्या कार्यक्रमाला गालबोट लावण्याचे प्रयत्न वरील प्रमाणे जसे झाले तसेच भिमा कोरेगाव शेजारील वढू बुद्रुक येथील गोविंद गोपाळा (महार) गायकवाड यांच्या समाधीस्थळावरून सुद्धा तेथील गावकऱ्यानी ब्राम्हणी अतिरेक्यांच्या फुशिने वाद उपस्थित केला होता- भिमा कोरेगाव येणारे लोक या समाधीस्थळाबरोबरच छत्रपती संभाजी महाराज व त्यांच्याच शेजारी असलेल्या त्यांचे गुरु कवि कलश यांच्या समाधीस्थळी येतात. गोविंद गोपाळांच्या वारसांनी तिकडे ‘जाण्याचा मार्ग’ अशी पाटी लावली होती- दि-29 डिसेंबरलाच ती पाटी तर गावकऱ्यांनी ऊखडून टाकलीच पण पूर्वीपासून असलेला त्या समाधीजवळील त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे इतिहासकारांनी लिहिलेला बोर्डही काढून टाकला- त्याचप्रमाणे त्यावर असलेले लोखंडी पत्र्याचे छतही काढून त्याची नासधूस केली- या घटनांचे व्हिडिओ सोशल मिडियावरून व्हायरल झाले होते- अशा घटने वरून यावर्षी काहीतरी भानगड आर-,एस एस -शी संबंधित संघटना करतील असा अंदाज आल्याने मी 31 डिसेंबरच्या ,एल्गार परीषदेला व 1 जानेवारीला भिमा कोरेगाव येथे विजयी स्तंभाला सलामी देण्यासाठी जायचा निर्णय घेतला होता- त्याप्रममाणे मी या एतिहासिक परीषदेला ,श्रोता व प्रत्यक्षदर्शी म्हणून हजर होतो- आर-,एस एस -शी संबंधिता संघटना ,एल्गार परीषदेत काहीतरी गडबड करतील हा माझा अंदाज साफ चुकला- तेथे त्यांनी तसे काहीही केले नाही. पण 1 जानेवारीला जमलेल्या दलित बांधवावर इतका मोठा हल्ला करतील असेही मला वाटले नव्हते. तो मात्र त्यांनी केला- तो पूर्व नियोजित होता व त्याची सुरवात वढु बुद्रुक पासूनच करण्यात आली हे नंतर स्पष्टच झाले आहे.
याबाबत सामाजिक अत्त्याचार प्रतिबंधक चळवळ व जातीमुक्ती आंदोलनाच्यावतीने आम्ही सत्यशोधन समिती म्हणून वडु बुद्रुक सह सनसवाडी, भिमा कोरेगाव आदी ठिकाणी भेटी दिल्या आहेत-या समितीत मी स्वतः, डाॅ-भारत पाटणकर, काॅ-किशोर ढमाले व काॅ-प्रतिमा परदेशी तसेच गेलं आम्व्हेट याही होत्या- या सत्यशोधनासाठी डाॅ-भारत पाटणकर यांच्याशी संबंधित त्या परीसरातील कार्यकर्त्यांची खुपच मदत झाली हे येथे मुद्दाम नमुद करावेसे वाटते. या समितीचा सत्यशोधन अहवाल आम्ही दि-5 जानेवारीला पुणे येथे पत्रकार परीषद घेऊन मांडला आहे- तसेच याबाबतची माहिती देणारे व आपले मत व्यक्त करणारे माझ्यासह निखिल वागळे, अॅड-बाळासाहेब आंबेडकर, कानवटे, प्रविण बर्दापूरकर, काॅ-किशोर ढमाले इत्यादिंचे लेख इतरत्र प्रसिद्ध झाले असल्यामुळे या घटनांच्या तपशिलात येथे जायचे कारण नाही. पण या लेखातून न आलेला ,एक मुद्दा म्हणजे ज्याला ‘वाईटातून चांगले’ म्हणता येईल तो म्हणजे या घटनामुळे ‘महार बटालियनने पेशव्यांचा पराभव केला होता’ हे ऐतिहासिक सत्य आता देशभर चर्चिले जाईल- तसेच औरंगजेबाने ब्राम्हणी घातपात्यांच्या सहाय्याने छत्रपती संभाजी महाराजांना पकडल्यानंतर हालहाल करून ठार मारले व त्यांच्या देहाचे छिन्नविछिन्न तुकडे करून कोल्हîा कुत्र्या मांजरांना खाण्यासाठी इतस्त्तः फेकून दिले- अशा अवस्थेत जो कोणी त्यांचा दाह संस्कार करेल त्याच्यासह त्यांच्या वंशजांचे शिरकाण केले जाईल असेही त्यांनी दवंडी पिटवून जाहीर केले असतांना गोविंद गोपाळा महार याने ते धैर्य दाखवले व त्यांच्या महार वतनी जमिनीत छत्रपती संभाजी महाराजावर अंत्यसंस्कार केले- याचीही माहिती या हल्ल्याच्या वाईट घटनेने आता देशभर चर्चेला आली आहे- कवी कलश व छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाध्या अजूनही गोविंद गोपाळा महार यांच्या वतनी जमिनीत व गावकुसाबाहेर आहेत, त्याचे सरकार दप्तरी रेकाॅर्ड आहे, सत्यशोधन समिती म्हणून आम्ही या सर्व समाध्या पाहून व आदराने दर्शन घेऊन आलो आहोत हेही येथे नमूद करतो.
एल्गार परीषदेस आलेल्या वक्त्यांनी अगदी समयोचित भाषणे केली. केंद्रात व राज्यात सत्तेत असलेल्या सरकारांची व त्यांचे प्रमुख नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांच्या धोतरांची लक्तरे मात्र सर्वच वक्त्यांनी शनिवार वाड्यावर टांगली- जिग्नेष मेवानी व उमर खालीद यांनीही चिथावणीखोर भाषणे केली नाहीत पण त्यांच्या भाषणाना जमलेल्या जनतेकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे आर-,एस -एस -चे लोक दुखावले जाणे स्वाभाविक आहे- मोदी, अमित शहासंह सर्वांनी जिग्नेश मेवानींना निवडणुकीत पराभूत करण्यासाठी जंग जंग पछाडूनही तो निवडून आला तसेच उमर खालीद सारखा , मुस्लीम शनिवारवाड्यापुढे येउन नव्या पेशवाईला आव्हान देतो ही कल्पनाच आर-,एस -एसला सहन होण्यासारखी नव्हती- म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. येरवी देशभरातील कानाकोपऱ्यातून आर-,एस-,ए स-शी संबंधित किती मंत्री , आमदार खासदार, साधु साध्व्या इत्यादी उपटसुंभ – ‘तुम्ही पाकिस्थानात चालते व्हा, आम्हाला ही राज्य घटनाच बदलवायची आहे, 10-10 मुलांना जन्मास घाला,’ असे कितीतरी चिथावणीखोर फालतु वक्तव्ये सतत करीतच राहतात. पण त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल होत नाही याची आपणा सर्वांनाच माहिती आहे.
या घटनेतून आणखी ,ऐक बाब लक्षांत घेतली पाहिजे की, इतिहास काळातील सत्य घटनेवर आधारित प्रतिकांची पुढील लढ्यासाठी म्हणून निश्चितच प्रेरणा मिळावी – त्यासाठी भिमा कोरेगाव येथील विजयी स्तंभ व वढु बुद्रुक येथील समाध्या हे त्यापैकीच आहेत हेही सत्य आहे- परंतु केवळ त्यातच रममाण होऊन काम भागाणार नाही तर वर्तमानातील वास्तवाचेही भान आपल्याला ठेवावे लागेल. त्यादृष्टिने आर-,एस-,एस-शी संबंधित समस्त हिंदु आघाडीचे मिलिंद ,ऐकबोटे व शिव प्रतिष्ठानचे मनोहर भिडे यांची संघटना मराठा विरूद्ध दलित यांच्यात फाटाफुट करण्यात कोणत्या कारणाने यशस्वी झाली याचा शोध घेणे फारसे कठीण नाही. सध्याच्या राज्यकर्त्यांच्या धोरणातून सर्वच समाजविभागांची जी परवड होत आहे त्यात याची बिजे आहेत- त्याची जाणीव या समाजाला महत्प्रयासाने करून द्यावी लागेल. याबाबतीत मराठा सेवा संघ , संभाजी ब्रिगेड यांनी समंजस भूमिका घेतली आहे. पण या सर्व बाबींना ते आवर घालू शकतील अशी त्यांची ताकद दिसत नाही, ती ताकद वाढविण्यासाठी त्यांना साथ केली पाहिजे- त्याचप्रमाणे दि-1 जानेवारीला पूर्वनियोजितपणे घडवून आलेल्या हल्ल्यामुळे सर्वच बाबतीत हाल झालेल्या व अशाच हालात आपापल्या गावी परतलेल्या दलित बंधु भागिनिंना नवी पेशवाई मोडण्यासाठी आपली इतर कष्टकरी समाजविभातील ताकद वाढवावी लागणार आहे- सर्व जातील कष्टकरी विभागांचा द्वेष करून केवळ आपल्या ,एकट्याच्याच भरवशावर नवी पेशवाई तोडता येणार नाही- मोठ्या शांत डोक्याने या वास्तवाचे भान ठेवूनच पुढील लढा द्यावा लागेल. अन्यथा या सर्व घटनांचा परिणाम आता असलेले सवर्ण व दलित यांच्यातील ध्रृविकरण वाढविण्यात होईल व तोच त्यांचा हेतु आहे. कारण आताच्या राज्यकर्त्यांच्या धोरणातून ते कोणत्याही समाजविभागाचे, कष्टकरी शेतकरी वर्गाचे कोणतेच प्रश्न सोडवू शकत नाहीत. अशा परिस्थितीत पुन्हा सत्तेवर यायचे असेल व त्यांची नवी पेशवाई अशीच अबाधित चालू ठेवायची असेल तर सवर्ण दलित, मराठा-दलित असे ध्रुवीकरण नव्या पेशवाईच्याच फायद्याचे ठरणार आहे- त्यासाठीच आर- एस -एस प्रयत्न करीत आहे- त्याला आपण बळी पडू नये याची काळजी घ्यावी लागेल.
आता सत्ता आर- एस -एस -च्या हातात असल्याने त्यांनी सत्तेचा पुरेपुर गैरवापर केला आहे- वडु बुद्रुक येथे हजारो तरुण जमले असतांना व तेथे आणाभाका देण्याच्या घोषणा देऊन भिमा कोरेगाव , सनसवाडी, शिक्रापूर इकडे पोलिस अअधिकाऱ्यांसमक्ष भडकविले गेले असतांना त्यांनी त्यांना कोणताही अटकाव केला नाही. दुसऱ्या, तिसऱ्या मजल्यावरून खालील दलित समुदायांवर दगडफेक होत असतांना, त्यांच्या गाड्यांची जाळपोळ होत असतांना ते शांत राहिलेत- बहिष्कार घालणाऱ्या त्या परीसरातील जमावातील कोणालाही साधी अटकही अजून झालेली नाही, मग कोम्बिंग आॅपरेशन तर दुरच राहिले. तेथे जाळलेल्या शेकडो गाड्यांचे अजून साधे पंचनामेही झाले नाहीत मग नुकसान भरपाईची तर बातच सोडा. मात्र 3 जानेवारीला महाराष्ट्र बंदच्या निमित्ताने नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे मोर्चा काढणाऱ्या समुदायातील 17 वर्षाच्या ,एका विद्यार्थ्याला मात्र त्यांनी इतके बदडून काढले की त्यात त्याचा जीवच गेला. बीड येथील , एका तरुणाला काळेनिळे होईपर्यंत बदडून काढले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील हजारो तरुणांना विविध गुन्ह्याखाली अटक करून पोलिस व न्यायालयीन कोठडित पाठविण्याचे सत्र सुरू केले आहे- त्यातही वेचून जे शिक्षित असतील त्यांना टार्गेट केले आहे. त्यांचे भावी जीवनच उध्वस्त करण्याचे हे कारस्थान आहे. मुख्यमंत्री एकीकडे कोंबिंग आॅपरेशन बंद केले आहे असे सांगत असतांनाच प्रत्यक्षांत मात्र ते धुमधडाक्यांत चालू ठेवले आहे. त्याचाही जेथे ज्याला जसे जमेल तसा प्रतिकार करावा लागेल. तोही लांब पल्ल्याचा असू शकेल. या निमित्ताने नवी पेशवाई अथवा फॅसिस्ट सत्ता म्हणजे काय याचीही अनुभुती आपल्याला या निमित्ताने येत आहे.
त्याच बरोबर या हल्ल्यात चुकून ,एक मराठा तरुण सणसवाडी येथे ठार झाला आहे. – त्याच्या व हदगाव येथील विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना 25 लाखाची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी फक्त सणसवाडीबद्दल 10 लाखाची घोषणा केली आहे. हदगावच्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांचे काय? दुसरे अशा सर्व घटनांना जबाबदार असलेल्या मनोहर भिडे यांचे नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांचेशी असलेले जीवाभावाचे संबंध ध्यानात घेता तो त्यांचा कार्यकर्ताच आहे हे आपण समजून घेतले पाहिजे. कारण अशा लोकांच्या जिवित कार्यामुळेच अशा फॅसिस्ट सत्ता प्रस्थापित व टिकून राहत असतात. ज्याप्रमाणे पाकिस्थानातील मुस्लिम अतिरेकी हाफीज सईद याला भारताने मागणी करूनही पाकिस्थानी सरकार त्याला ज्या कारणाने अटक करत नाही तशाच कारणाने आपल्या देशातील केंद्र व राज्य सरकार या अशा ब्राम्हणी अतिरेक्यांना अटक करणार नाही. तशातच मालेगाव प्रकरणी प्रज्ञा ठाकूर, पुरोहित अशासारख्या अटक केलेल्या आतंकवाद्यांना जेथे सोडून दिले जात आहेत अशा वातावरणात नवीन अतिरेक्यांना ते पकडतील याची सुतराम शक्यता नाही. किंवा सवर्ण -दलित दरी वाढविण्यासाठी त्यांना योग्य वाटेल वेळी ते अशा अटकेचे नाटक घडवून आणतील हेही आपण समजून घेतले पाहिजे.

लेखक डाव्या चळवळीतील कार्यकर्ते आहेत.

Write A Comment