पुन्हा एकदा माझ्या हाती निर्मला स्वामी-गावणेकर यांनी अनुवादित केलेले ‘लाइफ अॅण्ड डेथ इन शांघाय’ हे पुस्तक लागले. ते मी वाचत राहावे असे वाटल्याने सातत्य राखून वाचून काढले. पुन्हा एकदा यासाठी म्हटले की, किमान 3 वर्षांपूर्वी हेच पुस्तक मला एका पुस्तक प्रदर्शनात पहायला मिळाले होते. ते चीनमधील सांस्कृतिक क्रांतिवर लिहिले असल्याचे आढळले तरी ते त्या क्रांतिची बदनामी करण्यासाठी कोण्यातरी भांडवली प्रचारकाने लिहिले असावे असे वाटल्याने तेंव्हा ते मी तेंव्हा घेतले नाही. आता वाचल्यानंतर ते सांस्कृतिक क्रांतिला बदनाम करण्यासाठीच लिहिले आहे याची मला खात्री पटली. तरीही त्या पुस्तकाच्या लेखिका श्रीमती निएन चंग या स्वतः त्या क्रांतिच्या भुक्तभोगी असल्याने त्यांना स्वतःला त्या सांस्कृतिक क्रांतीचा आलेला अनुभव त्यांनी त्यात लिहिला आहे. त्यामुळे त्या काळात शांघायमधील व त्याआधारे एकूणच चीनमधील सामाजिक, राजकीय परिस्थिती कशी होती व सांस्कृतिक क्रांतिचे स्वरूप काय होते, याचा अंदाज येण्यासाठी हे पुस्तक उपयोगी आहे
सदर पुस्तकाच्या लेखिकेचे पती 1939 साली कोमिंगटांग सरकारात मोठ्या पदावर होते. 1949 मध्ये जेव्हा कम्युनिस्ट सैन्याने कोमिंगटांग सैन्याचा पराभव करून शांघामध्ये प्रवेश केला तेंव्हा ते कोमिंगटांग सरकारच्या परराष्ट्र खात्याचे डायरेक्टर होते. क्रांतिनंतर त्यांचे हे पद कम्युनिस्टांनी काढून घेतले. त्याला कम्युनिस्टांनी दुसरी तितकीच महत्त्वाची आॅफर दिली होती, पण कम्युनिस्टांच्या हाताखाली काम करणे त्यांना प्रशस्त वाटले नाही म्हणून त्यांनी ती आॅफर नाकारून शांघाय येथेच शेल या ब्रिटीश बहुराष्ट्रीय कंपनीत जनरल मॅनेजर या महत्त्वपूर्ण हुद्यावर काम करणे सुरू केले. पुढे 1957 साली कँसरने त्यांचा मृत्यू झाला. अशारितीने सदरील लेखिकेचे पती कम्युनिस्टांचे शत्रू असलेल्या कोमिंगटांग (नॅशनॅलिस्ट, राष्ट्रवादी) पक्षाचे कट्टर समर्थक होते. चँग कै शेक यांच्या नेतृत्त्वाखालील याच पक्षाच्या वाॅर लाॅर्डस्, लँड लाॅर्डस्च्या फौजेविरूद्ध काॅ.माओ त्से तुंग यांच्या कम्युनिस्ट पक्षाचा सशस्त्र संघर्ष चालू होता. वर उल्लेख केलेल्या चीनी क्रांतिचा अविभाज्य भाग असलेल्या लाँग मार्चवरील हल्लेही यांनीच संघटित केले होते. ब्रिटन, अमेरिकादी साम्राज्यवाद्यांचा व त्यांच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचाही स्वाभाविकपणे कोमिंगटांगलाच पाठिंबा होता. सदरील लेखिका च त्यांच्या पतींचे दोस्तमित्र्ा व नातेवाईकांचा गोतावळाही तसाच होता. ते विविध ठिकाणी महत्त्वाच्या अधिकार पदावर नोकरीला होते. काही कारखानदार तर काही बडे व्यापारी होते. स्वतः लेखिकेचे आजोबा, वडील पूर्वाश्रमिचे मोठे जमिनदार होते. स्वाभाविकपणेच त्यांचे राहणीमान उच्चभ्रु वर्गाचे होते. शहराच्या मध्यवस्तीत अत्यंत मोठा बंगला, प्रशस्त गार्डन, त्याला साजेसाच नोकरवर्ग, एकच मुलगी, स्वतःला कोणतेच शारीरिक काम करण्याची गरज नाही, असा त्यांचा थाट होता. शिक्षणाची परंपरा असल्याने स्वतःही उच्च शिक्षित, वेळ भरपूर व पुस्तकेही चीक्कार असल्याने वाचनाची आवड, चीनी वंशाच्या असूनही इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, पुढे चालून कम्युनिस्टांचेच राज्य आल्याने माक्र्सवाद, लेनिनवादाचा व माओ विचारांचाही त्यांना अभ्यास करावा वाटला, तो त्यांनी केला. आपल्या परीने व सोयीने तो सोयीस्कररीत्या समजून घेतला. पती वारल्यानंतर त्याच कंपनीत मोठ्या पगारावर नोकरी मिळाली. पूर्वीचेही बँक बॅलंस भरपूरच होते, त्यामुळे कधीच पैशाची ददात पडली नाही, सासरोपार्जित सोन्या चांदीचे दागदागीने, जडजवाहिÚयांनी मढविलेले ब्रेसलेट, हिरे व त्याला प्लॅटिनमचे पट्टे असलेली घड्याळे, दुर्बिणी इत्यादी दुर्मिळ वस्तुंचा खजिना व त्यासाठी आवश्यक ते फर्निचर इत्यादी सुखसोयींनी युक्त असे जीवन चालू होते.
पण 1949 सालात शांघायमध्ये कम्युनिस्टांच्या फौजेने नॅशनॅलिस्टांच्या (कोमिंगटांगचा) फौजेचा पार धुव्वा उडवला. त्यांना शांघायमधून पळता भूई थोडी झ्ााली. म्हणून ते आताच्या तैवानला (त्यावेळचा फार्मोसा) आपल्या उरल्यासुरल्या लवाजम्यासह पळून गेले. जे पळून जाऊ शकले नाहीत ते ‘आज ना उद्या बाजू पलटेल’ या आशेने, ‘देशभक्तीच्या’ नांवाखाली तेथेच थांबलेत. म्हणून त्यांना सांस्कृतिक क्रांतिचा मुकाबला करावा लागला. तो त्यांनी अत्यंत चिकाटीने, धैर्याने, काहिंशी मानहाणी पत्करून, तुरूंगात अथवा लेबर कँपमध्ये जाऊन शारीरिक श्रम करून पण जिद्दीने व नेटाने त्याचा मुकाबला केला. अशा लोकांत या पुस्तकाच्या लेखिका श्रीमती निएन चंग यांचा क्रमांक बराच वरचा लागेल. काहिंनी बदलत्या परिस्थितीचा अंदाज घेत त्याच्याशी जुळवून घेतले व योग्य संधीची वाट पहात दबा धरून राहिले, पूर्वीच्या कारखान्याचे मालक, मॅनेजर स्वतःच्याच कारखान्यात मजूर अथवा कुली म्हणून पक्षाने नेमलेल्या (बरेचदा तो त्या कारखान्यातील कनिष्ट पदावर काम केलेलाही असायचा,) व्यवस्थापकाच्या हुकुमाखाली काम करीत राहिले. कामचुकारपणा केल्यास आणखी पंचाईत येईल म्हणून इमानेइतबारे उत्पादन वाढीचेही प्रयत्न केले.
काही छद्मपणे स्वतःच सांस्कृतिक क्रांतीची धुरा वाहणाऱ्या रेड गार्डस्मध्ये सामील झाले , काहींनी तर वाऱ्याचा रोख ध्यानात घेऊन सरळ कम्युनिस्ट पक्षातच प्रवेश केला, तेथे महत्त्वाची पदे मिळविली, पक्ष नेतृत्त्वातील मतभेदांचा अदमास घेत त्यानुसार स्वतःत बदल करीत राहिले, पक्षातील बदलू शकणारे धोरण, येणारा काळ, मतभेदांच्या बातम्या इत्यादीचे अंदाज जवळच्या आप्तेष्टांना चुपचाप सांगणे अशा बाबी ते करू लागलेत, असे या पुस्तकातून लक्षात येते.
हे पुस्तक म्हणजे सदरील लेखिकेचे आत्मचरित्र नव्हे. ते त्यांनी लिहिले असते तर त्यांना समजून घेणे आणखी सोपे गेले असते. पण ते त्यांनी केवळ सांस्कृतिक क्रांतीच्या काळापुरते लिहिले आहे. तरीही ते वाचत असतांना आपण जेंव्हा एखाद्या क्रांतिकारकाचे चरित्र वाचत असतो तेंव्हा तो किती कठीण परिस्थितीत आपल्या वर्गाशी, क्रांतिच्या आपल्या ध्येयाशी एकनिस्ट राहतो हे आपणाला समजून येते.उदा.काॅ.भगत सिंग, काॅ.चे गव्हेरा, काॅ.अंतोनिओ ग्राम्सी इत्यादी. तसेच हे पुस्तक वाचत असतांना सत्तेतून गेलेल्या वर्गाचे प्रतिक्रांतिकारकही किती जिद्दीने व निष्ठेने आपल्या सत्ताच्यूत वर्गाशी इमान राखतात व संघर्ष करतात, हे या पुस्तकातून सतत जाणवत राहते. प्रतिक्रांतिकारकसुद्धा डरपोक नसतात तर लवचिक असतात हे आपल्या ध्यानांत येते. शेवटी मात्र या लेखिकेच्या ‘देशभक्ती’ची परीक्षा होतेच. त्या आपला ‘प्रिय देश चीन’ सोडून अमेरिकेला जाऊन तेथेच स्थायिक होतात. त्यांच्या दोन्ही बहिणी तर कधीच तेथे गेलेल्या असतात. तेथेच त्या ‘लाइफ अॅण्ड डेथ इन षांघाय’ पुस्तक निवांतपणे लिहितात. तेथील प्रेस क्लब मध्ये भाषणे देतात, अनेक पत्रकारांना सविस्तर मुलाखती देतात.(हे सर्व यु टयूबवर पहायला मिळते) अर्थात या सर्वांचा विषय ‘चीनच्या सांस्कृतिक क्रांतीची बदनामी व त्यातील अतिरेक’ हाच असतो.
पण खरेच, हा अतिरेक म्हणजे नेमका काय असतो? ते या पुस्तकात वाचण्यासारखे आहे. या सांस्कृतिक क्रांतीत हजारो लोक विनाकारण मारले गेले, त्यातून क्रांतीकार्य केेलेले पक्ष कार्यकर्तेही सुटले नाहीत, असे मी ऐकले व वाचले होते. पण या 350 पानाच्या पुस्तकभर कोठेही एखादा अपवाद वगळता माणूस जिवाने मारल्याचे उदाहरण लेखिकेने दिलेले नाही. उलट माणसे मारणे हा आमचा हेतु नाही तर त्यांच्यात बदल घडवून आणणे हा आमचा हेतु आहे व काॅ.माओंचीही आम्हाला तीच शिकवण आहे असे संवाद हे पुस्तक वाचतांना आपणाला वाचायला मिळतात. हां, त्या काळात आत्महत्त्या करण्याचे प्रमाण मात्र वाढले होते हे निश्चित. स्वतः त्यांची तरूण मुलगी मॅपिंग, जिला त्यांनी हे पुस्तक अर्पण केले आहे, हिनेही आत्महत्त्याच केली असा केवळ सरकारीच नव्हे तर त्यांना बित्तंबातमी आणून देणाऱ्यांची देखील माहिती होती. पण आपल्या मुलीला हालहाल करून ठार मारण्यात आले आहे असा लेखिकेचा शेवटपर्यंत दावा असतो. काहीही करून आपल्या मुलिच्या खुन्यांचा शोध घेणे व त्यांना त्याची शिक्षा देणे हे तर त्यांचे जीवनध्येय होऊन बसते. पण आपल्या सोर्सेसमार्फतसुद्धा शेवटपर्यंत ते त्याचा शोध घेऊ शकत नाही. कारण ती आत्महत्त्याच असते. आताच्या आपल्या भांडवली लोकशाही व्यवस्थेत बाजारीकरणामुळे देशभरात वाढत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्त्येंच्या तुलनेत, चीनमधील सांस्कृतिक क्रांतीमधील आत्महत्त्या कितीतरी कमी आहेत. पण त्यासुद्धा का होतात ते ह्या पुस्तकातून आपण समजून घेऊ शकतो.
30 ते 40 च्या संख्येने रेडगार्डस्, ज्यात मुख्यतः तरूण विद्यार्थी व विद्यार्थिनी असतात तसेच काही ज्येष्ठ व्यक्तीही असतात, रेड गार्डस् चे असे दल सदर लेखिकेसारख्यांच्या घरी येतात. घराची पूर्ण छाननी करतात. दागदागीने, जडजवाहीर, दुर्मिळ, मौल्यवान वस्तुपासून तर पुस्तकांपर्यंत सर्वांची वर्गवारी करतात. याची जाण असणारे काही जण त्यांच्यात असल्याने अनावश्यक पुस्तके घराच्या मोकळ्या जागेतच जाळून टाकतात. बाकी सर्व वस्तु जप्त करून सदर व्यक्तिच्या नांवावर शासकीय गोदामात जमा करतात. घरमालकांशी कोणी काय बोलावे, कसा व्यवहार करावा, कशाकशाची छाननी करावी हे बहुतेक त्यांनी आधीच ठरविलेले असावे असे दिसते. सुरवातीला आम्ही कोण आहोत व येण्याचा ऊद्देश काय ते सांगतात. त्यांच्या दंडाला बांधलेल्या लाल पट्टीवर रेड गार्ड्स लिहिलेच असते. शिवाय लेखिकेसारख्या इतरांच्याही घरी यापूर्वी असे प्रकार झाल्याचे माहित असल्याने, संभाव्य प्रकाराची त्यांनाही माहिती असते. कोणीही सदर लेखिकेशी अर्वाच्या शिविगाळ करीत नाहीत, महिला म्हणून त्यांचा अधिक्षेप होईल असे वर्तन करीत नाहीत, पण त्यांनी केलेल्या विनंत्याही मान्य करीत नाही. ते त्यांच्या पद्धतीने नेमून घेतलेले काम करीत असतात. अधून मधून एखादी मुलगी लेखिकेला विचारते, ‘बाहेर इतके बेघर लोक थंडी वाऱ्यात ऊघड्यावर राहत असताना, तुम्हा केवळ दोन जणींना एवढा मोठा 9 खोल्या व 4 बाथरूम असलेला बंगला कशासाठी लागतो. दोन खोल्यात तुमचे भागत नाही काय?’ अशासारखे भरपूर संवाद या पुस्तकात प्रसंगानुरूप दिलेले आहेत. ते निश्चितच वाचनीय आहेत. रेड गार्डस्ची वैचारिक समज, शोषक वर्गाबद्धलची तुच्छता तरीही महिला असल्याची कदर यात जाणवून येते. लेखिका एकट्याच घरी असतांही अर्वाच्य वर्तन तर सोडाच बोलणेही अर्वाच्य नसते.
सांस्कृतिक क्रांतितील हा झाला कार्यवाहीचा एक टप्पा. सर्व बाबी एकाच टप्प्यात केल्या जात नाही. यानंतर त्यांच्यावर आरोप निश्चित करून जनतेच्या न्यायालयात त्यावर सुनावणी होते. जनतेचे न्यायालय म्हणजे, त्या परीसरातील एखाद्या मोठ्या हाॅलमध्ये जमा झालेल्या सर्व लोकासमोर जाहीरपणे आरोप ठेवले जातात. अधूनमधून लोकही त्यात भागीदारी करतात. काही लोक आरोपीविरूद्ध घोषणाही देत असतात. रेड गार्ड्सचा प्रमुख आरोपींना व उपस्थित जनसमुदायांना आरोपाची माहिती देतो. संबंधित लोकही त्यामध्ये भागीदारी करतात. यावेळी आरोपीची, त्यांच्या कुटुंबियांची इंत्थभूत, तपशिलवार माहिती कागदपत्रांसह त्यांच्याकडे असल्याचे आपल्या लक्षात येते. आरोपी असल्याची ओळख सर्वांना व्हावी म्हणून आरोपीच्या डोक्यावर उंच टोपी घालतात. आरोप मान्य असल्यास ठार मारले जात नाही अथवा फाशिचीही शिक्षा दिली जात नाही तर आरोपीची रवानगी लेबर कँपमध्ये शहरातील कारखाना वा तत्सम ठिकाणी अथवा ग्रामीण भागात शेतावर काम करण्यासाठी पाठविण्यात येते.(अर्थात हे त्या आरोपीवरील आरोपाच्या स्वरूपावर अवलंबून असावे असे मला वाटते.पण सदरील पुस्तकात मृत्यूदंड अथवा फाशिची शिक्षा झाल्याचे एकही उदाहरण दिलेले नाही.) आतापर्यंत पिढ्यान्पिढ्या शोषक म्हणून अजिबात श्रम न करता ऐतखावू बनून कष्टकऱ्यांचे शोषण केले आहे, पण आता तसे करता येणार नाही, तेंव्हा आत्मटिका करून, शोषकांचे संस्कार बाजुला सारून आता इतर कष्टकऱ्यां प्रमाणे काम करून जगा व स्वतःवरील जुने संस्कार, विचार झटकून टाकून सुधारा व आम्हा कष्टकऱ्यांत सामावून जा, यासाठी संधी द्यावी म्हणून अशा लेबर कँपमध्ये पाठविण्यात येते. तेथे हिटलर अथवा इतर भांडवली फॅसिस्टाप्रमाणे काॅन्सन्ट्रेशन कँपमध्ये, (यातना गृहात) अथवा गॅस चेंबरमध्ये ठार मारण्यासाठी पाठविले जात नाही हे येथे आपण लक्षात ठेवले पाहिजे. लेबर कँपमध्ये आरोपीच्या कामकाजावर त्या त्या क्षेत्रातील पक्ष व इतर कष्टकऱ्यांचे लक्ष असते. त्यानुसार त्याचा कालावधी कमीजास्त व ठिकाण बदलविल्या जाते.
सदरच्या लेखिकेवर, त्यांनी शेल या ब्रिटीश बहुराष्ट्रीय कंपनीच्या मार्फतीने विदेशाकडे चीनमधील माहिती पुरवून हेरगिरी केल्याचा आरोप ठेवला जातो. हा आरोप त्या शेवटपर्यंत मान्य करीत नाहीत. म्हणून त्यांची रवानगी लेबर कँपमध्ये न करता तुरूंगात केल्या जाते. हे तुरूंग म्हणजे पूर्वीच्याच राज्यकर्त्यांनी , कोमिंगटांगनी बनविलेलेच तुरूंग असतात. खास करून यांच्यासाठी कम्युनिस्टांनी बनविलेली छळ छावणी नसते. तरीही तुरूंग हे तुरूंगच असतात. त्यात त्यांना एकटीला एक खोली दिली जाते व तुरूंगातल्याप्रमाणेच वागविले जाते पण अजिबात छळ केला जात नाही. साधारणपणे 6 वर्षे या लेखिका तुरूंगात असतात. तेथे त्यांना ऐषआराम नव्हे पण आरोग्यासाठीच्या आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा पुरविल्या जातात. डाॅक्टरच्या सल्ल्यानुसार दोन वेळा, एकदा गर्भाशयासाठी दुसऱ्यांदा दातांच्या हिरड्यासाठी त्यांना आॅपरेशन करण्याची गरज पडते, तेंव्हा त्यांच्यावर शांघायमधील मोठ्या शासकीय रूग्णालयात यशस्वीपणे आॅपरेशन व औषधोपचार केले जातात. (उलट आपल्याकडे आजही छत्तीसगढमधील माओवादाचा आरोप असलेल्या आप पक्षाच्या आदिवासी उमेदवार श्रीमती सोनी सोरीवर पोलिसांच्या प्रोत्साहनाने चेहऱ्यावर तेजाबसदृष्य द्रव फेकले जाते तसेच पोलिस कोठडित त्यांच्या गुत्पांगात खडे भरले जातात याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.) अनेकवार संधी देऊन व प्रयत्न करूनही त्या आरोप मान्य करीत नाहीत म्हणून शेवटीशेवटी मात्र तुरुंगाधिकाऱ्यांकडून त्यांना ठोशाने मारहाण केली जाते व अखेर त्यांच्या दोन्ही हातात हातकडी घातली जाते. हातकडी घालणे हा त्यांच्यावरील छळणुकीचा अंतिम प्रकार झाला. त्यामुळे त्यांची जेवणाखाण्याची आबाळ होते. अत्यंत नाजुक असल्याने हाताला ओरखडे पडतात, हातकड्या हाताला रूततात, त्यातून काहिसा रक्तस्त्राव होतो अशी त्यांची छळणुकीची कहाणी आहे. पण आपल्याकडील भांडवली व्यवस्थेत माओवादाचा आरोप ठेवून दंडाबेडी घालणे, कोंबडा करणे, अंडासेलमध्ये ठेवणे, ह्या काय बाबी असतात हे ज्यांना माहित आहे, त्यांच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. नुकतेच मुंबई येथील भायखळा जेलमधील महिला कैदी मंजुळा शेटे यांना झालेल्या अमाणुष मारहाणीत तिचा मृत्यू झाला तसेच तेथील कैद्यांना निट औषधोपचार न मिळाल्याने 2014 ते 17 या काळात 25 पुरूष व 4 महिला कैद्यांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. भोपाळ येथील तुरूंगातून कैदी पळून गेल्याचे सांगून त्यांना जवळच्याच खेड्यात गोळ्या घालून ठार मारल्याचेही आपणाला माहित आहे. भांडवली तुरूंगातील अशा घटना पाहता कम्युनिस्ट असलेल्या चीनमध्ये व सांस्कृतिक क्रांतीच्या काळातही सदरील लेखिकेला कितीतरी सौम्य पद्धतीने वागविले असल्याचे, त्यांच्याच लेखनावरून आपल्या लक्षात येते. तुरूंगातील सौम्य वर्तणुकीमुळे शेवटपर्यंत त्या आपल्यावरील आरोप मान्य करीत नाही. तोपर्यंत देशातील राजकीय परिस्थितीत बदल घडून येतो. काॅ.चै एन लाय, काॅ.माओ त्से तुंग यांचे निधन होते.पक्षांतर्गत दोन धोरणातील संघर्षात तथाकथित सुधारणावाद्यांचे वर्चस्व वाढते. ह्या राजकीय बदलाच्या परिणामी लेखिकेची तुरूंगातून सहिसलामत सुटका होऊन नंतर त्यांचे पुरर्वसन केले जाते.
अशारितीने बंगल्यांच्या झडत्या , सामानांच्या जप्त्या, जनतेच्या न्यायालयात आरोपांची निश्चिती, त्याची सुनावणी, लोकांच्या घोषणा , झालेल्या शिक्षेतून तुरूंगात अथवा लेबर कँपमध्ये रवानगी, तेथे साधारण मजुरांच्या देखरेखीखाली करावी लागणारी कष्टाची कामे इत्यादींचा माणसिक ताण ज्यांना सहन झाला नाही व सुधारण्याच्या मिळालेल्या संधीचा ज्यांना फायदा घेऊन स्वतःवरील शोषकांचे संस्कार, जुने आचार विचार जे बदलू शकले नाहीत व अशारितीने बदललेल्या राजकीय परिस्थितीशी ज्यांना जुळवून घेता आले नाही त्यांनी वैफल्यग्रस्ततेतून मोठ्या प्रमाणात आत्महत्त्या केल्या असण्याचा अनुमान आपण काढू शकतो. लेखिकेची मुलगी मॅपिंग हीनेसुद्धा आपल्या आईची तुरूंगात झालेली रवानगी, स्वतःला आलेले एकटेपण यातून आत्महत्त्या केली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात लेखिकेवर तोही एक मोठा आघातच होता, तो त्यांनी मोठ्या धैर्याने सहन केला यात काही वादच नाही.
तुरूंगातून सुटका झाल्यानंतर त्यांचे सरकारनेच पुनर्वसन केले. एका मोठ्या घरांत त्यांच्या मकदुराप्रमाणे त्यांना दोन खोल्या व झाडे झुडपे लावण्यासाठी थोडी मोकळी जागा देण्यात आली. एक नोकर ठेवण्याची परवानगी मिळाली. त्याच मोठ्या बंगल्यात दुसऱ्याही अशाच एका कुटुंबाला पुनर्वसित करण्यात आले होते. त्यांचे संबंध कसे होते तोही एक मनोरंजक असलेला महत्त्वाचाच भाग आहे. त्यांच्या आयुष्याच्या पुढील सर्व काळात त्यांना सरकारने, पोलीस व इतरही सरकारी अधिकाऱयांनी सर्वतोपरी मदतच केली आहे. त्यांचे (अशा सर्वांचेच) गोठवलेले बँक खाते मोकळे करण्यात आले. व्याजासह सर्व रक्कमा त्यांना परत करण्यात आल्या. लेखिकेच्या खात्यावर बरीच रक्कम असल्याने कोणत्याच बाबीसाठी त्यांना कधीच पैशाची कमतरता पडली नाही. त्यामुळे सरकारने त्यांना दरमहा मदत म्हणून देऊ केलेली रक्कम त्यांनी मोठ्या मनाने नाकारली. इतकेच केवळ नव्हे तर त्यांनी त्यांच्याजवळील काही रक्कम तेथील मुलांच्या अनाथालयाला, बालवाडीला दान म्हणून दिली. त्यांच्या जप्त केलेल्या सर्व वस्तु परत घेऊन जाण्यासाठी त्यांना गोडावूनला येण्याचे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्या तेथे गेल्या. त्यांच्यासारखे आणखी भरपूर कुटुंबीय तेथे आलेले होते. आपापल्या वस्तु शोधून काढून ते घेऊन जात होते. यांनीही त्यांच्या दुर्मिळ वस्तु शोधून काढल्या व परत घेऊन आल्या. त्यातील काही जुने नक्षीकाम केलेले वाईनचे कप, कुटुंबीयांची दुर्मिळ पोर्सोनेलची भांडी, काही पेंटींग्ज त्यांनी स्वतःसाठी ठेऊन घेतली तर काही वस्तु सरकारने उघडलेल्या शांघायमधील म्युझियमला विनामोबदला भेट म्हणून देऊन टाकली. सरकार त्या वस्तुंचा मोबदला द्यायला तयार होते पण तो त्यांनी घेतला नाही. त्यामुळेसुद्धा शासन दरबारी त्यांचा दबदबा वाढण्यास मदत झाली . त्याचा उपयोग त्यांना पुढे अमेरिकेत स्थायिक होण्यासाठी देश सोडून जाण्याकरीता पासपोर्ट मिळवण्यात झाला.
त्यांचे, त्यांच्याकडे असलेल्या जुन्या नव्या सर्व नोकर चाकरांशी चांगले संबंध असल्याचे दिसते. पूर्वी स्वयंपाक, घरकाम व माळीकामासाठी स्त्री -पुरूष नोकर होते तर पुनर्वसित काळात स्वयंपाकादी कामासाठी एक मोलकरीण होती. जुन्या नोकरांनीही त्यांना पुनर्वसित काळात चांगलेच सहकार्य केले. याचा अर्थ ही बाई शोषक वर्गातील आहे व तीने आतापर्यंत नोकर म्हणून आपले शोषण केले आहे ही भावना सर्वसामान्य शहरी मोलकऱ्यांपर्यंत तरी पोहोचली नव्हती असे दिसते. त्यांच्याशी असलेल्या मालक-नोकर संबंधात ते समाधानी दिसतात. लेखिकेचेही वर्तन एखाद्या उदार मालकीनीप्रमाणे होते.
दुसरे आणखी एक महत्त्वाचे म्हणजे तेथील जनतेत सांस्कृतिक क्रांतीच्या थोड्या ओसरण्याच्या काळातही वशिल्याने , भ्रष्टाचारी मार्गाने कामे करून घेण्याचे प्रकार बऱ्याच मोठ्या प्रमाणात होते, याचे आश्चर्य वाटते. खुद्द लेखिकेला संकोच वाटत असतांनाही त्यांच्या ओळखिच्या मित्र मैत्रिणींनी त्यांचे दवाखाने, पासपोर्ट इत्यादी ठिकाणी या मार्गाने कामे करवून घेतली आहेत. त्याला त्यांनी ‘मागील दाराने’ काम करवून घेणे असे नांव ठेवले होते. हा प्रकार आपल्यालाही चांगलाच माहित आहे. तेंव्हा चीनमध्ये बोकाळलेला भ्रष्टाचार हा कितीतरी आधीपासून होता व आताही तो आटोक्यात आला नाही, हे त्यांच्या नुकत्याच झालेल्या 19 व्या काँग्रेसमधील ठरावातून दिसून येते.
लेखिकेने पुस्तकभर काॅ.माओ त्से तुंग व त्यांच्या पत्नी चिआंग चींग यांचा अत्यंत तिरस्काराने, अनादर व एकेरी पद्धतीने उल्लेख केला आहे. काॅ.माओ त्से तुंग किती लवकर मरतात याची ते आतुरतेने वाट पहात होत्या व तुरूंगात असतांना तर त्यांनी त्यासाठी अनेकदा इश्वराकडे प्रार्थनाही केल्या असल्याची कबुली दिली आहे. चिआंग चींग बद्धल, त्या सिनेसृष्टितील अभिनेत्री असल्याने नैतिकदृष्ट्या त्यांचे किती अधःपतन झाले होते, त्यांची किती लफडी होती याचा वारंवार उल्लेख करतात. पण एकही लफडी सोदाहरण त्या स्पष्ट करू शकत नाहीत. सांस्कृतिक क्रांतीची सुरवात करणारे ते खंदे समर्थक होते हे त्या तिरस्काराचे खरे कारण आहे. तसेच त्यांची एकुलती एक मुलगी सिने सृष्टित अभिनेत्री होण्यासाठीच प्रयत्न करते, तशी ती आईला सांगते, मात्र आई तिला त्यापासून रोखण्याचा अजिबात प्रयत्न करीत नाही. सिनेसृष्टी जर अधःपतित आहे तर त्या आपल्या मुलिला त्यापासून रोखण्याचा प्रयत्न का करीत नाहीत? उलट सांस्कृतिक क्रांतिला छुपा विरोध असणारे, भांडवली मार्गाचे समर्थक लिउ शाओ ची, तेंग सियाओ पिंग व बरेचदा चै एन लाय यांच्याबद्दल मात्र त्यांना अतीव आदर असल्याचे उल्लेख त्यांच्या पुस्तकात सर्वत्र आहेत.
तेंव्हा देश विदेशात पुनर्वसित झालेले असे जुन्या शोषक वर्गातील लोक, सरकार व पक्षातील नोकरशहा, जुने जमिनदार, कारखान्यांचे मालक व व्यवस्थापक यांना सुधारण्याचा सांस्कृतिक क्रांतीचा कार्यक्रम अर्धवटच राहिला. कम्युनिस्ट पक्षांतर्गत चालू असलेल्या दोन धोरणामधील संघर्षात अशा भांडवली पद्धतीने जोर काढला व काॅ.माओंच्या मृत्यूनंतर तर ते शिरजोरच झाले . पुढे त्यांनी कम्युनिस्ट पक्षाचाच ताबा घेतला व लाल बावटा खांद्यावर घेऊन भांडवलशाहीचेच काम करणे सुरू केले. आज तेथे भांडवलशाहीची पुनःस्थापना झाली आहे असे जे म्हंटले जाते ते केवळ झालेल्या अद्वितीय प्रगतिमुळे नव्हे तर त्या प्रगतीतील वाटा कोणत्या वर्ग थराला किती मिळतो यातील जी तफावत आहे, त्यामुळे जी विषमता वाढत आहे, त्यातून बेकारी, वेश्या व्यवसाय, सौंदर्य स्पर्धा, वंशवाद , दंगली, कामगारांचे संप इत्यादीतून या बाबी दिसून येतात.
तेंव्हा सोविएत युनियनमधील बोल्शेव्हिक क्रांती कशी घडली याचा आंखो देखा हाल समजून घ्यायचा असेल तर अमेरिकन पत्रकार जाॅन रीड यांचे ‘जगाला हलवून टाकणारे 10 दिवस’ हे पुस्तक जसे उपयोगी पडते तसेच तेथील प्रतिक्रांती समजून घ्यायची असल्यास मायकल सेयर्स व अल्बर्ट काहन यांचा ‘दि ग्रेट काॅन्स्पीरसी’, साम्राज्यवादी षडयंत्र, हे पुस्तक उपयोगी पडते तद्वतच चीनमधील सांस्कृतिक क्रांती म्हणजे काय हे जर समजून घ्यायचे असेल तर ‘लाइफ अॅण्ड डेथ इन शांघाय ’ हे पुस्तक आपल्याला निश्चितच उपयोगी पडू शकेल. फक्त ते वाचतांना आपली वर्गीय दृष्टी जागृत ठेवणे व विचक्षक पद्धतीने वाचणे हे मात्र आवश्यक आहे.