fbpx
सामाजिक

स्त्री हिंसाचाराचा प्रवास परशूराम ते आसाराम व्हाया माधव राम 

नुकताच पणजी – गोवा येथे एकदिवसीय भारतीय विचार मोहोत्सव पार पडला. यात भा.ज.पा. चे महासचिव राम माधव यांनी भन्नाट विचार व्यक्त केले आहेत. बोलताना त्यांनी काहीही संबध नसताना, स्त्रीवादावर अभ्यास नसताना भाष्य केले आहे. स्त्रीवाद ही एक विचारप्रणाली आहे, इतके सुध्दा प्राथमिक ज्ञान नसणाऱ्या व्यक्तीने जर स्त्रीवादावर बोलल्यास जी गंभीर चूक होऊ शकते ती राम माधव यांनी केली आहे.

राम माधव हे आर.एस.एस. चे प्रचारक आहेत. आता ते भा.ज.पा. चे महासचिव झाले आहेत. तमाम सनातनी मंडळी मुळात स्त्रियांच्या दुयामत्वाची पुरस्कर्ती राहिली आहेत. आर.एस.एस.च्या शाखेत स्त्री-पुरुष विषमतेचे बीज रुजविले जाते. त्याची सुरवात स्त्रियांना संघात प्रवेश नकारण्यापासून होते. संघ जर सांस्कृतिक संघटन असेल तर त्या संस्कृती निर्माणात समाजतील निम्मा हिस्सा असणाऱ्या स्त्रिया का नाहीत ? का ते संस्कृती निर्माण कार्य फक्त पुरुषांचे मानतात? स्त्रिया या उपमानव मानल्या की व्यवहारदेखील स्त्रियांना दुय्यम लेखण्याचा केला जातो.

खास पुरुषांसाठी राखीव असणाऱ्या रा.स्व. संघातही पुरुषप्रधानतेचे बाळकडू दिले जाते. मनुस्मृती सारख्या ग्रंथांमधील काही श्लोक निवडून यत्र पूज्यते नारी…सारखी वाचने गिरवली जातात. स्त्रियांचा देवी म्हणून , गृहलक्ष्मी म्हणून सतत उल्लेख केला जातो. स्त्रियांची आदर्श प्रतिमा म्हणून सरस्वती, लक्ष्मी सांगितली जातात. त्यात काली, दुर्गा, बाणाई, म्हाळसा, निऋती, अक्कमहादेवी इ. चा उल्लेख चुकुनही येत नाही. ब्राह्मणी-पुरुषसत्ताक मुल्य चौकटीनुसार स्त्रिया हळव्या, नाजूक तर पुरुष कर्तृत्ववान, साहसी, धाडसी अशा संरचना किंवा घर बाईच आणि दार पुरूषाच असे विभेदन मांडले जाते. त्यामुळेच र्निऋती दुर्गा ह्या आदर्श ठरत नाहीत.

१९ व्या शतकात म. जोतीबा फुले आणि २० व्या शतकात डॉ. आंबेडकर यांनी स्त्रिया जातीव्यवस्था आणि पुरुषसत्ता यांच्या एकत्र गुंफणीतून भारतातील स्त्रियांचे शोषण होते असे प्रतिपादन केले होते. हा खरा अब्राह्मणी स्त्रीवाद होता. सनातनी रा.स्व.संघाला मुळात कोणत्याच प्रकारचा स्त्रीवाद मान्य नाही. स्त्रीवादाचा स्वीकार केला की स्त्रियांच्या दुयामत्वाला, विषमतेला आणि शोषणाला विरोध केला जातो. तो करायचा नाही. स्त्रीवाद नीट समजूनही घ्यायचा नाही. कारण त्यावर अत्यंत गंभीरपणे विचार मंथन झाले तर त्यातून जातपुरुषसत्ताक हितसंबंधाना धक्का पोहचतो. सनातनी म्हणूनच नेहमी स्त्रीमुक्ती आणि स्त्रीवाद या शब्द आणि संकल्पनेची टिंगल करीत असतात.

दिल्लीतील निर्भया घटनेनंतर त्यांची स्त्रीविषयक मते काय आहेत याचा पुन्हा एकदा अनुभव आपण घेतला होता. मुलींनी धर्म, संस्कार पालन केले पाहिजे म्हणजे असे प्रकार घडणार नाहीत असा अविचार उघडपणे मांडला गेला. सध्या जेलची हवा खात असणारे आसाराम यांनी पिडीत मुलीने मंत्र जप करत त्या मुलाला तू मला भावासारख आहेस असे म्हंटले असते तर बलात्कार झाला नसता असे म्हंटले होते. रा.स्व.संघाचे मुख्य मोहन भागवत यांनी बलात्कार ‘इंडियात’ होतात, ‘भारतात’ नाही स्त्री आणि पुरुष विवाहबद्ध होताना करार होतो. घर स्त्रीने सांभाळायचा आणि पुरुषाची जबाबदारी उदरनिर्वाहाची असते. हा करार मोडला की स्त्रियांवर अन्याय होतात असे म्हंटले होते. सातच्या आत मुली घरात गेल्या तर ही नौबत येणार नाही असे अनाहूत सल्लेही सनातन्यांनी दिले होते. जणू समस्त स्त्रियांनी सत्य प्रतिज्ञापत्रावर लिहून दिले असते की आम्ही सातच्या आत घरात जायला तयार आहोत; पण सनातन्यांनो त्या नंतर एकाही मुलिवर, बाईवर, म्हातारीवर अत्याचार होणार नाही अशी खात्री तुम्ही देता का? वास्तविक स्त्रियांवर घर नावाच्या सामाजिक संस्था म्हणून कार्यरत असणाऱ्या ठिकाणीही अत्याचार होतातच. नकोश्या स्पर्शापासून जन्मदात्या बापानेच बलात्कार केल्याच्या घटना रोज घडत असताना सनातन संस्कृतीच्या नावाखाली स्त्रीविरोधी, तिला बंधनात घालणारी विधाने, मते ते मांडत असतात. स्त्री हिंसाचारावर यांची संस्कृती उभी आहे. स्त्री हिंसाचाराचा त्यांचा प्रवास परशूराम ते आसाराम व्हाया नथुराम असा आहे.

नुकताच परशूराम, आसाराम यांच्या पंक्तीतील विचार भा.ज.पा. महासचिव असणाऱ्या आणखी एका रामाने कथन केला आहे. गोव्या मध्ये एका कार्यक्रमात या रामाने स्त्रीवादावर भाष्य केले आहे. मुळात स्त्रीवादाचा अर्थच न समजल्यामुळे त्यांना अनेकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे. सनातन्यांची स्त्रीवादाविषयी एकप्रकाची नकारात्मक दृष्टी असते. स्त्रीवादाविषयी अनेक गैरसमज ते जाणीवपूर्वक पसरवित असतात. भ्रम, गैरसमज पसरविणे हे एक वैचारिक हत्यार म्हणून ते वापरत आले आहेत. जसे सर्व मुसलमान अतिरेकी, दहशतवादी असतात, सर्व स्त्रिया मतिहीन, अबला असतात, सर्व ब्राह्मण बुद्धिमान असतात इ. तसाच भ्रम त्यांनी स्त्रीवाद म्हणजे कुटुंब फोडणारा विचार, स्त्रीवाद म्हणजे स्त्रियांना अनेक पती करण्याचा अधिकार, स्त्रीवाद म्हणजे भोगवाद, स्त्रीवाद म्हणजे पुरुषांविरुद्ध आगपाखड इ. अशी भ्रमांची साखळी उभी केली आहे. हे स्त्रीवादाचे सनातनी, एकारलेले आकलन आहे. स्त्रीवादाची टिंगल / टर उडविणारे आहे. स्त्रियांना सन्मान, प्रतिष्ठा, हक्क – अधिकार द्यायला ते तयार नाहीत. स्त्रिया स्वतंत्र व्यक्ती आहेत, त्याही माणूस आहेत – कोणाची तरी बायको, पत्नी, बहिण एवढीच त्यांची ओळख नाही हे सांगू पाहणारा स्त्रीवाद त्यांना नको असतो. म्हणूनच ते टिंगल करण्याकडे वळतात.

राम माधव यांनी भारतातील पहिली स्त्रीवादी द्रौपदी असल्याचे म्हंटले आहे. ती स्त्रीवादी असण्याचे कारण काय तर राम माधवांच्या मते द्रौपदी स्त्रीवादाची जननी होती. राम माधव यांनी असे म्हणण्याचे कारण काय तर तिला पाच पती होते. पण ती एकाचेही ऐकत नव्हती. कृष्ण तिचा सखा आणि मित्र होता त्याचेच ती ऐकत होती. राम माधव यांचा स्त्रीवादाकडे बघण्याच दृष्टीकोन यातून व्यक्त होतो. द्रौपदीचे पाच पती आणि तिचा मित्र या गोष्टी राम माधव यांना भलत्याच खुपलेल्या दिसतात. पाच पती करणे, स्त्रियांना मित्र असणे, त्यांनी नवऱ्याचे न ऐकता मित्राचे ऐकणे हा त्यांचा स्त्रीवादाचा अर्थ आहे. ते या विधानातून स्त्रीवादविरोधाचे राजकारण पेरू इच्छितात. प्राच्यविद्यापंडित कॉम्रेड शरद पाटील यांसारख्या महान तत्ववेत्यांनी स्त्रीसत्ता, महाभारत, रामायण कालखंडाची मांडणी बहुप्रवाही ऐतिहासिक भौतिकवादाच्या आधारे केली आहे. त्या नुसार द्रौपदी ही मावळती स्त्रीसत्ता आणि उगवती पुरुषसत्ता काळातील मातृसात्ताक गणसमाजाची प्रतिनिधी आहे. ती अत्यंत बुद्धिमान आणि कर्तृत्ववान होती. पांडव तिचे मार्गदर्शन घेत असत. राम माधव यांना हा इतिहास दडपायचा आहे.

राम माधव यांनी त्यांच्या ब्राह्मणी – पुरुषसत्ताक विचारव्युहातून एकीकडे स्त्रीवादाची टिंगल करत दुसरीकडे स्त्रीसत्तेची आद्य राणी, गणमाता निऋतीच्या ऐतिहासिक कार्याकडे दुर्लक्ष केले आहे. गण भूमीचे समान वाटप करणारी, कला, संगीत इ. ची जननी असणाऱ्या निऋती दुर्गेकडे पाठ करत खोटा भारतीय स्त्रीवाद अधोरेखित केला आहे.

आज स्त्रिया घर आणि दार दोन्ही ठिकाणी मानहानी, अप्रतिष्ठा, कुचंबना सहन करत आहेत, गर्भात मारल्या जाण्यापासून, बलात्कार, जाती युद्धात अत्याचारांना बळी ठरत आहेत, खोट्या जात-जमात प्रतिष्ठेसाठी त्यांचे खून होत आहेत, कधी तथाकथित एकतर्फी प्रेमाच्या नावाखाली त्यांचे खून होत आहेत, धर्मांध राजकरणाच्या त्या बळी ठरत आहेत. अश्या वेळी स्त्रियासंदर्भात या प्रकारची वक्तव्ये भयानक परिणाम करू शकता. स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टीकोन दुषित होऊ शकतो. यामुळे राम माधव यांचे विधान गांभीर्यानेच घेतले पाहिजे. ते सत्ताधारी पक्षाचे महासचिव आहेत. त्यांचे मत व्यतिगत स्वरूपाचे नाही, ते सार्वजनिक कार्यक्रमात अशी स्त्रीविरोधी मांडणी करतात ही गंभीर बाब आहे.

लेखिका अब्राह्मणी स्त्रीवादाच्या पुस्कर्त्या आहेत. राज्यशास्त्राच्या प्राध्यापक असून सत्यशोधक कम्युनिस्ट चळवळीत त्यांचे सक्रिय योगदान आहे.

3 Comments

  1. Londhe navnath Reply

    Lekh samarpak v yogy lihila ahe.
    Pratigamyacha bhurka fadla ahe

  2. Santosh Bhalerao Reply

    एकदम योग्य लेख राम माधव प्रतीगामी विचाराचे आहेत

Write A Comment