सध्या देशाचा माहौल असा बनलाय की तुम्ही सेक्युलर आहात म्हणजे मुस्लिमधार्जिणे आहात, अशी ओरड सुरू होते. तुम्हाला एकटे पाडण्याचा सहमतीने प्रयत्न होतो. त्यात तुम्ही मुसलमान असाल तर मग तुमच्या अस्तित्वापासून ते जगण्याच्या उद्देशापर्यंत सगळ्या पातळ्यांवर विविधांगी चर्चा होते. ही चर्चा घडवून आणण्यामागे विशिष्ट हेतू असतोच असतो. भारत हा भारतीयांचा आहे आणि जे हिंदू आहेत तेच भारतीय आहेत, त्यामुळे भारत हे हिंदू राष्ट्रच आहे, हे लोकांच्या मनावर ठसवण्याचा आटोकाट प्रयत्न गेली अनेक वर्षे सुरू असून सध्या हा उन्माद पराकोटीला पोहोचला आहे.
मुस्लीम शासक परकीय होते. इतकेच नाही तर बहुतांशी आक्रमण करणारे मुस्लीम शासक लुटारू होते. त्यांनी इस्लामचा हिंसेच्या माध्यामातून किंवा तलवारीच्या जोरावरच प्रसार केला, असेही इतिहासाचा अभ्यास तर सोडाच पण काहीही भान नसलेले बिनदिक्कतपणे बोलत असतात. मध्य आशियातून आलेल्या बाबरने आपले साम्राज्य काबूलपासून ते ग्वाल्हेरपर्यंत वसवले आणि त्याच्या पुढच्या पिढ्या इथल्याच होऊन गेल्या. सगळे मोगल शासक भारतीय बनूनच राहिले. त्यांनी इथले लुटून इंग्रजांप्रमाणे अझरबैजान आबाद केले नाही. त्यांच्या काळात उत्तर भारतात हिंदू-मुस्लीम सांस्कृतिक संगमाला बहार आला. गंगा-जमनी तहजीबचा आदर पार सातासमुद्रापलिकडे जाऊन पोहोचला. सांगायचं तात्पर्य हे की, ताज महाल हे पूर्वीचे तेजो महाल नावाचे शिवमंदिर होते किंवा जामा मशिदच्या जागी आधी जमुना मंदिर होते, ही चर्चा घडवून लोकांच्या मनात विष कालवण्याचा पद्धतशीर प्रयत्नामागे एक अत्यंत काटेकोर रणनिती आहे. मुस्लीम शासकांचं श्रेय नाकारण्याचा किंवा मुस्लिमांचं भारतीयत्वच नाकारण्याचा हा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जातोय.
जागतिक पातळीवर जेव्हा भारतीयत्वाचा विचार होतो, तेव्हा भारतीय संस्कृती आणि परंपरांचा त्यात मुख्य वाटा असतो. आज पाश्चिमात्य जगाला सर्वाधिक आकर्षण कुठल्या भारतीय परंपरेचं असेल तर ते भारतीय संगीताचं! त्यातही भारतीय शास्त्रीय संगिताचं. गायन असो वा वादन, भारतीय शास्त्रीय संगीत अभिजात आणि अलौकिक मानलं जातं. आजच्या घडीला भारतीय संगीत पूर्णत: बहरलं, त्याचं बहुतेक श्रेय प्राचीन संगीत घराणांच्या मुस्लीम संस्थापकांना जातं. सामवेदात मूळ असलेलं भारतीय शास्त्रीय संगीत गुरु-शिष्य परंपरेतून विकसित झालं. घराण्यांच्या गायन-पठन-मनन परंपरेतून म्हणजे अलिखित पद्धतीने गुरूच्या शिकवणीतून शिष्यांपर्यंत वाढत गेलं. पिढ्या दर पिढ्यांमधून घराण्यांचा वारसा वाढत गेला. ध्रुपद-धमारमध्ये अडकून पडलेलं भारतीय शास्त्रीय गायन हे ख़्याल किंवा रागदारीपर्यंत विकसित करण्याचं काम उस्तादांनी केलं. उस्ताद हस्सू आणि हद्दू खान यांनी स्थापन केलेला ग्वाल्हेर घराणे हे सर्वात प्राचीन घराणे मानले जाते. त्याचप्रमाणे आग्रा (हाजी सुजान खान, उस्ताद घग्गे खान बक्श), किराना (उस्ताद अब्दुल करीम खान), जयपूर-अत्रौली (उस्ताद अल्लादिया खान), पतियाला (उस्ताद फतेह अली खान, उस्ताद अली बक्श), दिल्ली (उस्ताद मम्मन खान) आदी प्राचीन घराण्यांचे संस्थापक मुस्लीम उस्ताद आहेत. घराणे संगीत जसं जसं पुढे गेलं तसं ते हिंदू-मुस्लीम धर्माच्या आणि जाती-भेदाच्या भिंतींपलीकडे गेलं. आधुनिक भारतात संगिताच्या परंपरेला कुठल्याही द्वेषाची आडकाठी रोखू शकली नाही. मुस्लीम उस्तादांच्या तालमीत हिंदू वादक-गवय्ये तयार झाले. बहुतेक सर्व संगीत घराण्यांचं नाव हिंदू गायकांनी मोठं केलं. ग्वाल्हेर घराण्याचे पं. विष्णु दिगंबर पलुस्कर आणि प. ओंकारनाथ ठाकूर, आग्रा घराण्याचे पं. दिनकर कैकिणी, किराना घराण्याचे पं. भिमसेन जोशी आणि गंगूबाई हंगल तर जयपूर-अत्रौलीच्या केसरबाई केरकर आणि किशोरी अमोणकर यांची नावं सांगता येतील. त्यांनी मुस्लीम उस्तादांच्या घराण्याच्या गायकीचा प्रसार व प्रचार केला. मुस्लीम उस्तादांचं भारतीय शास्त्रीय संगितातलं महत्त्व कमी करण्याचाही प्रयत्न हिंदू राष्ट्रवादाच्या पुरस्कारातून झाल्याचे दाखले आहेत. पं. विष्णू नारायण भातखंडे आणि पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी गायन समाज आणि गांधर्व महाविद्यालयांच्या माध्यमातून एक चळवळ चालवली. त्यातून रागांच्या संहिता आणि स्वरलिपी आदी संगीतलिखाण मोठ्या प्रमाणात झालं. लिखित संहितेच्या शिकवणीतून शिष्यवर्ग वाढतो, पण तयारीचे गायक-वादक घडत नाहीत, हे आज सिद्ध झालंय.
गायनकलेच्या घराण्यांची परंपरा फार जुनी आणि मोठी आहे. जुन्या काळात घराणा संगितात शिष्यत्व पत्करून गुरूकडून तालीम घेऊन संगीत साधना केली जात असे. गुरूकडे वर्षानुवर्षे राहून शिष्य संगिताची तालीम घेत असत. विविध घराण्यांच्या उस्तादांचं गाणं आत्मसात करण्याच्या ध्यासातून किराणा घराण्याच्या पं. भिमसेन जोशींनी ग्वाल्हेरला जाऊन थोर सरोदवादक उस्ताद हाफिज अली खाँ यांच्याकडून राग मारवा शिकला. रियाज करण्याची पद्धत अवगत केली. गायनाबरोबर सारंगी वाजवण्याची पद्धत ही मुस्लीम उस्तादांनी प्रचलित केली. सारंगी, सरोद, सतार ही जातिवंत आणि लोकप्रिय वाद्य मुस्लीम उस्तादांनीच विकसित केलेली आहेत. वादनकलेत मैहर घराण्याचे बाबा अल्लाऊद्दीन खाँ साहेबांचं कार्य खूप मोठं आहे. आलाप, जोड, झाला, मध्यलयीतली व द्रुतलययीतली गत वाजवून वादनकला सादर करण्याची पद्धत लोकप्रिय करण्याचं श्रेय बाबा अल्लाऊद्दीन खाँ साहेबांना जातं. त्यांच्या शिष्यांनी म्हणजे जावई पं. रविशंकर (सतार), मुलगा उस्ताद अली अकबर खाँ (सरोद), मुलगी अन्नपूर्णा देवी (सुरबहार), पं. पन्नालाल घोष (बासरी) यांनी भारतीय वाद्य संगिताचा प्रसार केला. पं. रविशंकर आणि उस्ताद अली अकबर खाँ यांनी तबलावादक उस्ताद अल्लारखाँ यांच्या साथीनं साठच्या दशकात वर्ल्ड टूर करून भारतीय शास्त्रीय संगिताची ओळख पाश्चिमात्य जगाला करून दिली. भारतीय संगीत जागतिक स्तरावर लोकप्रिय केलं. आज जगात सर्वत्र भारतीय फ्युजन संगीत गाजतंय, त्याचं मूळ या तिघांच्या वर्ल्ड टूर काॅन्सर्टस् मध्ये आहे.
भारतीय शास्त्रीय संगिताच्या माध्यमातून लोकप्रिय झालेली सूफी कव्वाली ही तर सर्वस्वी मुस्लीम संप्रदायामुळंच विकसित झाली. लौकिक अर्थानं दिल्ली परिसरातल्या ख्वाजा अमीर खुस्रोंपासून लोकप्रिय झालेली कव्वाली पाकिस्तानात ठाण मांडून बसली. स्वातंत्र्य किंवा फाळणीनंतर भारतीय संगीतही विभागलं गेलं. अनेक मुस्लीम गव्वये-वादक पाकिस्तानात गेले, तर अनेक हिंदू गायक-वादक राजाश्रयासाठी लाहोर-कराची-पेशावरहून भारतात आले. पटियाळा घराण्याचे थोर गायक उस्ताद बडे गुलाम अली खाँ फाळणीच्यावेळी पाकिस्तानात गेले. पण मनाने कधीही ते तिथे रमले नाहीत, म्हणून भारतात परतले. सांगायचं तात्पर्य हे की, संगीत जात-पंथ-धर्म-भाषा मानत नाही. तसे ते भारतीय शास्त्रीय संगितात मानले गेलेसुद्धा नाही. आजही प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांची लोकप्रियता भल्याभल्यांना मोहिनी घालते, ती त्यामुळेच. भारतीय संगितातली मुस्लिम घराण्यांची गर्भश्रीमंती हे भारतीयत्वाचं संचित आहे. हीच वस्तुस्थिती थोड्याबहुत फरकाने भारतीय कला, साहित्य, संस्कृती आणि परंपरांच्या बाबतीत लागू होते. त्यामुळं सांस्कृतिक राष्ट्रवादाचा उद्दामपणे पुरस्कार करून मुस्लिमांचं योगदान किंवा श्रेय नाकारताना आपण आपल्या भारतीयत्वावरच प्रश्नचिन्हं उभे करत आहोत, हे ध्यानात घ्यायला हवे.
–
3 Comments
आशिषदादा खूप छान !
GREAT!
Khup chan