fbpx
विशेष सामाजिक

प्रा आदित्य निगम यांनी ‘द वायर’ मध्ये तोडलेल्या ताऱ्यांच्या निमित्ताने

आदित्य निगम यांच्या बोल्शेविक क्रांतीवरील आख्यानाच्या निमित्ताने 

प्रा. आदित्य निगम यांचा ‘वायर’ मध्ये काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेला बोल्शेविक क्रांतीवरचा लेख[1] महत्वाचा आहे. (https://thewire.in/192636/russian-revolution-centenary-marx-gramsci-peasant/)

फ्रेंच साम्यवादी विचारवंत लुई अल्थ्यूसर (Althusser) यांचे ‘आर्थिक पाया हा मानवी सामाजिक संबंधांचा आधार असला तरी राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक संरचना यांचा स्वतःचा असा स्वायत्त इतिहास असतो. आणि त्यामुळे वर्गसंघर्ष हे कधीच विशुद्ध आर्थिक रूपाने समोर येत नाहीत’ हे प्रसिद्ध अवतरण उदधृत करत निगम आपल्या लेखाची सुरुवात करतात. ‘जगाला ज्ञात असलेली ऑक्टोबर क्रांती (झारकालीन रशियात प्रचलित जुलियन कॅलेंडरप्रमाणे ऑक्टोबर) ही खरे तर नोव्हेंबरमध्ये झाली. मात्र जुलियन कॅलेंडरच्या जागी ग्रेगरियन कॅलेंडर सोविएत युनियनने जानेवारी १९१८ मध्ये स्वीकारले त्यामागे ‘सांस्कृतिकदृष्ट्या पुढारलेल्या राष्ट्रांच्या पंक्तीला बसण्याचा प्रपंच’ होता, युरोप म्हणजे ‘पुढारलेला’ आणि गैर-युरोपीय असणे म्हणजे ‘मागास’ अशी युरोप-केन्द्री भांडवली मानसिकता साम्यवादातही मजबूत होती’ असला खास उत्तर- आधुनिक, उत्तर-वसाहतिक अभ्यासक पठडीतला तर्क लढवत निगम यांनी भांडवली औद्योगिक क्रांती आणि आधुनिकता यांचा साम्यवादी विचारावर किती खोल प्रभाव आहे, कृषी-आधारित ‘पारंपारिक’ समाजाचे ऐतिहासिक संचिते, धर्म, मिथके या सगळ्यांना नाकारणारी आधुनिकता सामायिक यांत्रिक उद्योग आणि शेती लादण्याची साम्यवादाने केलेली चूक, त्यातून अंतर्विरोध कसे निर्माण झाले, वगैरे बराच उहापोह केला आहे.

मात्र निगम यांच्या लेखातील साम्यवादाला, बोल्शेविक क्रांतीला झोडणे हा भाग खरे तर दुय्यम आहे. त्यांनी त्यासाठी जो विचारव्यूह वापरला आहे त्यात राजकीय-सामाजिक संबंध आणि डाव्या-पुरोगामी विचाराने आज घ्यायची भूमिका या अनुषंगाने खरे तर काही महत्वाचे प्रश्न उपस्थित झाले आहेत. निगम यांनी त्याचे सूतोवाच मात्र केलेले नाही. कदाचित त्यांना ते अभिप्रेत नसेल किंवा अडचणीचेही असेल. काही असो, या प्रश्नांबद्दल चर्चा गरजेची आहे.

सर्वप्रथम ‘भूतकाळ’ आणि त्याचा वर्तमानावर असलेला पगडा, आणि मार्क्सवाद्यांनी ह्या मुद्द्याकडे केलेले दुर्लक्ष असा आक्षेप निगम उपस्थित करतात. केवळ आर्थिक क्रांती घडून आल्याने हे भूतकालीन सांस्कृतिक, सामाजिक अवशेष, ‘राष्ट्रीय परंपरा, सांस्कृतिक संचित’ इ. इ. नष्ट होऊ शकणार नाहीत, त्यांचे तत्ववैचारिक स्थान निश्चित करणे आणि त्यातून त्यांच्या मुकाबल्याची दिशा ठरवणे याबाबत चर्चा करणारा अल्थ्यूसर हा कदाचित एकमेव मार्क्सवादी विचारवंत होता. मात्र अल्थ्यूसरशी ह्या मुद्द्यावर सहमत असणारे निगम दुसरीकडे ‘युरोपकेंद्रित आधुनिकता’ हेच मूळ संकट आहे आणि त्यामुळे पारंपारिक रशियन सामायिक शेतकी मालकीमध्येच साम्यवाद शोधणाऱ्या नारोद्निक (Narodnik) विचारवंतांचाही पुरस्कार करतात. अल्थ्यूसरच्या विचारात आर्थिक क्रांतीला पूरक अश्या माओवादी सांस्कृतिक क्रांतीचा संकेत आहे आणि सामंती-परंपरागत संस्कृतीचा पाडाव कसा होईल हे अभिप्रेत आहे. त्याला निगम यांची ‘परंपरा हीच नवता’ आणि पारंपारिक, शेतकीप्रधान समाजाला भांडवली विकासनीती मारक, तेव्हा तोच खरा क्रांतिकारी पर्याय’ असली गडबडगुंडा विश्लेषणपद्धती अजिबात अभिप्रेत नाही. केवळ निगमच नव्हे तर पुरोगामी चळवळीतील अनेकांचा ह्याबाबत संभ्रम आहे. वसाहतवाद, भांडवल, राष्ट्रवाद इ. आधुनिक घटना- विचारांची शिस्तशीर मांडणी न करता ‘केवळ शोषितांचे बहुसंख्यत्व आहे, तेव्हा त्यांच्यातले अंतर्विरोध नजरेआड करून ‘आपोआपवादी’, सोयीस्कर लाभ मिळवण्याच्या मोहाचे’ ते बळी आहेत. शेतकरी-कामगार संघटना, साम्यवादी/ बिगर-साम्यवादी पुरोगामी पक्ष ह्यानी लेनिनच्या ‘क्रांती आपोआप होत नाही, तिची मशागत करणे जरूर असते, ती तयार केली जाते’ ह्या उद्गारांचा आधार फक्त आपापल्या नोकरशाह्या justify करण्यासाठी घेतला, त्याचा खोल अर्थ आत्मसात केला नाही, त्याची अंमलबजावणी केली नाही. जाती- पुरुषसत्ताक समाजाचे सांस्कृतिक- सामाजिक अंतर्विरोध जसे स्वायत्त इतिहास आणि अस्तित्व असणारे असतात तसेच ते आर्थिक संबंधांतून’ही’ मुखर होतात हे वास्तव मान्य करून दुहेरी लढाई लढण्याची तयारी दाखवली नाही. पुरोगामी छावणीतच अश्या ‘समग्र आणि स्वतःची निर्भीड चिकित्सा करायला न कचरणाऱ्या’ आधुनिकतेबद्दल असणारे संभ्रम, आणि अपराधीपणाची भावना ही ऐतिहासिक घोडचूक, मजबुरी काहीही असेल- पण त्याचे परिणाम गंभीर स्वरूपात समोर आहेत. मध्यम जाती- दलित- आदिवासी- स्त्रिया- शेतकरी- शेतमजूर ह्या सर्वच शोषितांचे अंतर्विरोध, आरक्षणाची आंदोलने, जातीय अस्मिता, आणि त्यातून बळकट होणारी प्रस्थापित सांप्रदायिक व्यवस्था असा शोकात्म तिढा आपण गेल्या काही काळात अनुभवतो आहोत.

त्यानंतर निगम प्रसिद्ध इटालियन मार्क्सवादी ग्राम्शी याच्या ‘बोल्शेविक क्रांती ही मार्क्सच्या ‘दास कॅपिटल’च्या विरुद्ध क्रांती होती’ ह्या वचनाचा हवाला देत मार्क्सवाद हा कसा एकरेषीय विकासक्रमाच्या गृहितकावर आधारला होता याची चर्चा करतात. ‘आधी भांडवली विकास, बूर्झ्वा आणि कामगार वर्गांचा उदय, त्यातून प्रगत औद्योगिक समाज आणि वर्ग-संघर्ष आणि मग क्रांती असा क्रांतीचा प्रवास मार्क्सच्या कल्पनेत होता आणि क्रांती मात्र त्याला फाटा देत औद्योगिकदृष्ट्या मागासलेल्या आणि कामगार वर्ग संख्येने खूपच कमी असलेल्या रशियन समाजात प्रथम झाली- तेव्हा मार्क्सचे गृहीत खोटे ठरले’ असे त्यांचे प्रतिपादन आहे. त्यापुढे निगम साम्यवाद आणि भांडवल यांच्या अन्योन्य संबंधाचा आढावा घेतात आणि मोठ्या उद्योगांना प्राधान्य, ‘समाजवादी प्राथमिक संचय’ आणि त्यातून पारंपारिक शेतकरी-कारागीर यांचे विस्थापन, आणि भांडवली औद्योगिक क्रांतीने इंग्लंडमध्ये जे काही दशकांत साध्य झाले ते साम्यवादातून काही वर्षांतच साध्य करण्याची इर्षा ह्यातून स्टालिनच्या काळातील गंभीर स्वरूपाची हिंसा असा साम्यवाद हा मुळातच शेतकरी-विरोधी असल्याचा दावा करतात.

आता गंमत अशी आहे की ‘दास कॅपिटल’ हा ऐतिहासिक द्वंद्वात्मक पद्धतीने भांडवलाचा उद्गम आणि शोषणपद्धतीचा शास्त्रीय लेखाजोखा मांडणारा ग्रंथ आहे. तो काही नोस्त्रादामासचा भाकीत-ग्रंथ नाही. मार्क्सने भांडवली अंतर्विरोध आणि त्यातून युरोपीय साम्राज्यवादी सत्तांमध्ये उद्भवू शकणारे युद्ध याची चर्चा केली होतीच. त्या युद्धाचा आणि रशियन क्रांतीचा किती महत्त्वपूर्ण संबंध होता ते ‘land, bread and peace’ ह्या बोल्शेविक घोषणेतच स्पष्ट होते. दुसरी आणि अधिक महत्वाची बाब म्हणजे रशियात क्रांती प्रथम का झाली याचा उहापोह ग्राम्शी याच्याच लेखात आहे. तुलनात्मकदृष्ट्या संख्येने कमी, पण राजकीयदृष्ट्या पुढारलेल्या अश्या रशियन कामगार वर्गाचा, त्याच्या राजकीय जागरूकतेचा, आणि या जागरूकतेला जबाबदार अश्या, कामगारांचे नेतृत्व करणाऱ्या बोल्शेविक पक्षाचा (त्याच्या केंद्रवर्ती लोकशाहीसकट) क्रांतीमध्ये मोलाचा वाटा होता. निगम यांना अडचणीचा ठरणारा असा हा इतिहास, आणि ग्राम्शी याची टिप्पणी त्यांनी सोयीस्करपणे वगळली ह्यात आश्चर्य नाही.

खरे आश्चर्य आहे ते क्रांतीनंतरच्या गृह-युद्धाचा, झारशाहीसमर्थक सैन्य-अधिकाऱ्यांच्या, मोठ्या कुलक शेतकऱ्यांच्या बोल्शेविकविरोधी उठावाचा, त्यांच्या साम्राज्यवादी पश्चिमी राष्ट्रांशी हातमिळवणीचा आणि त्याचा बीमोड करताना सोविएत सत्तेला आलेल्या अडचणींचा साधा उल्लेखही निगम करत नाहीत. आणखी गंभीर बाब म्हणजे ‘क्रांती ही काही सरळसोट सर्वहारा क्रांती नव्हती, त्यात जर्मन-ज्यू-भांडवलदारविरोध ह्यांची सरमिसळ होती, जनता ही कधीच विशुद्ध क्रांतिप्रवण अशी नसते’ असे निगम यांचे प्रतिपादन आहे. ‘Down with Jew Kerensky, Long Live Trotsky’ अश्या दुहेरी उपरोधिक घोषणा[2] त्याचा उत्तम पुरावा आहेत. पण त्याचाच दुसरा भाग म्हणजे बोल्शेविकविरोधी उठाव हा तर उघडउघड ज्यू-विरोधाने भरलेला होता. असंख्य ज्यू त्यामध्ये मारले गेले. कम्युनिस्ट आणि ज्यूविरोध हा तर साहजिकच हातात हात घालून चालणारा होता. म्हणूनच जनता जरी विशुद्ध क्रांतिप्रवण नसते तरीही त्याच कारणामुळे तिचे नेतृत्व क्रांतिप्रवण गटाला करावे लागते. आर्थिक परिवर्तनासोबतच राजकीयदृष्ट्या प्रागतिक आणि विखारी भाषेवर प्रतिबंध लादणारी व्यवस्था, कायदेकानून करायचे असतात, ते राबवायचेही असतात, आणि त्या सर्वासाठी जागरूक संघटनच गरजेचे असते. हौशी, रोम्यांटिक क्लब चालवणे आणि सामाजिक परिवर्तनाचे राजकारण करणे ह्यात असलेला फरक ध्यानात न घेतल्याने प्रत्यक्ष व्यवहार गोंधळात पडणारा होतो. आणि मग अखेर सोविएत असो किंवा अन्य कुठलेही प्रागतिक पक्ष- संघटना: त्यांचे ऐतिहासिक संदर्भ, अडचणी आणि प्रागतिक धोरणात असलेला प्रत्यक्ष वाटा ध्यानात न घेता, माघारी, पराभव ह्यांचे तात्कालिक संदर्भ न पाहता ‘पहा पहा, हमाम में सब नंगे है’ म्हणत नाके मुरडायची तेवढी सोय उरते.

क्रांतीनंतर सोविएत युनियनने केलेले प्रागतिक कायदे, आणि राष्ट्रकांचे मान्य केलेले अधिकार, वसाहतविरोधी लढ्यांना दिलेला आधार ह्यात state- शासनसंस्थेने क्रांतीचे प्रातिनिधिक संचालन करण्याचे दायित्व स्वतःच्या शिरावर घेतले आणि पक्ष, राजकीय अंतर्विरोध नाकारले. ‘क्रांतीनंतर वर्ग उरलेले नाहीत, आत्यंतिक प्रागतिक असे धोरण शासनसंस्थेत प्रतिबिंबित होते आहे, तेव्हा राजकारण आणि पक्ष ही स्वतंत्र राजकीय यंत्रणा जरूर नाही’ असा तर्क वापरत राजकारणाची पीछेहाट झाली. सामाजिक प्रश्न हे केवळ planning, अराजकीय अश्या तांत्रिक, नोकरशाही स्वरूपाचे बनले. त्याविषयी बरेच गंभीर विश्लेषण झाले आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून निगम हे केवळ भूतकाळाचा प्रभाव क्रांती-उत्तर सोविएत समाजावर कसा होता याबद्दलच्या निरुपणात रमले आहेत.

‘झारशाहीचा अंत, नास्तिक कम्युनिस्ट राजवट, सामुदायिक, यंत्राधारित शेतीचे धोरण, खासगी मालकीचा अंत- ह्या सगळ्या घडामोडी पारंपारिक ग्रामीण शेती-आधारित समाजाला ‘ख्रिस्त-विरोधी राजवट येऊन जगाचा अंत जवळ आल्याची भयकारी सूचना देणाऱ्या’ वाटत होत्या. त्यांच्यासाठी सोविएत शासन हे भयानक दुःस्वप्न होते. अश्या सामान्य लोकांच्या समजुतींना योग्य महत्व कम्युनिस्ट सत्तेने दिले नाही’ असा निगम यांचा आक्षेप आहे. आता अश्या समजुतींना महत्व देणे याचा व्यावहारिक अर्थ म्हणजे सरळ सरळ परंपरानिष्ठ समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक रुढीत ढवळाढवळ न करणे असाच लावायला हवा. कारण निगम तर आधुनिकता, पुढारलेपण आणि मागासलेपण अश्या कॅटेगरीच एका बाजूला नाकारतात. मग क्रांती याचा अर्थ शहरांत नव्या टिळे-माळा, नवे देव-देव्हारे आणि गावांत जुनेच अंगारे-धुपारे असा लावायचा का?

आणखी गंभीर सवाल म्हणजे भांडवलशाही असो किंवा साम्यवाद; भूतकालीन संस्था त्यांना पुरून उरल्या, उरतात, नव्हे अधिकच बळकट होतात. सोविएत सत्ता कोसळल्यानंतर जगभरच धार्मिक आणि मूलतत्ववादी विचार- संघटना यांचा पगडा वाढत गेला. खरे तर पगडा असे म्हणण्यापेक्षा राजकीय प्रभाव आणि हस्तक्षेप असे म्हणणे संयुक्तिक ठरेल. पण त्यात खरे तर आश्चर्य वाटावे असे फार काही नाही. धर्म-जात-राष्ट्र-पुरुषसत्ता ह्या संस्था आणि भांडवल ह्यांच्यात तात्विक अंतर्विरोध नाहीच. युरोपीय प्रबोधनकाल, वैज्ञानिक तर्कनिष्ठ आधुनिकता आणि भांडवलाचा उदय यांचा ऐतिहासिक सहसंबंध आहे. पण व्यावहारिकदृष्ट्या भांडवलाच्या विकास आणि चलनासाठी आधुनिकता आणि लोकशाही यांची पूर्वअट कधीच नव्हती. वसाहतकाल ते आजच्या अनेकरंगी हुकुमशाह्या त्याला साक्ष आहेत. साम्यवादाचा इतिहास मात्र निराळा राहिला आहे. उत्पादनाप्रमाणेच सामाजिक पुनरुत्पादनात क्रांती घडली पाहिजे इतका मूलगामी विचार आणि त्यानुसार अंमल करण्याचा हा इतिहास आहे. अमर्याद क्षमता आणि त्यांचे आविष्करण करणारा ‘नवा सोविएत माणूस’ घडवण्याची स्वप्ने त्यात अनुस्यूत आहेत. धर्म घराच्या चौकटीत बंदिस्त करण्याचा सर्वच साम्यवादी सत्तांचा कटाक्ष, नवे सार्वजनिक सांस्कृतिक उत्सव, माओची सांस्कृतिक क्रांती, त्यातील आत्यंतिक लोकशाही प्रेरणा हे सर्वच पुरोगामी, भविष्याचा वेध घेणारे सर्जक प्रयत्न आहेत, होते. इतिहास हा कधीच एकरेषीय असत नाही, जर राजकीय सत्तेचा अंकुश पुरोगामी छावणीकडे नसेल तर प्रतिक्रांती आणि राजकीय- सांस्कृतिक पीछेहाट सहज शक्य आहे. अरब-इराणी-अफगाण जगातला साम्यवाद्यांचा असलेला प्रभाव, इतकेच नाही तर पूर्व युरोपमधील साम्यवादी सत्ताकाळात निद्रिस्त राहिलेली राष्ट्रकांची संकुचित, प्रतिगामी राष्ट्रवादी धारणा आणि प्रतिक्रांतीनंतर त्या समाजांचे झालेले विघटन, बोस्नियामधील हत्याकांड, स्लाव्ह अस्मिता चळवळी, ज्यू-इस्लामविरोधी-वर्णद्वेषी विचार आणि त्यांची लोकप्रियता हा अलीकडीलच इतिहास आहे.

स्लोव्हेनियन विचारवंत झिझेक साम्यवादी राजवटीचे वर्णन ‘vanishing mediator’ असे करतो. झार, ऑस्ट्रियन साम्राज्यकालीन काळा कालखंड, त्यातील सामंतशाही मागासलेपणा एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला साम्यवादोत्तर काळात एकदम खुली भांडवलशाही, सरकारी कृपाहस्ताने तयार झालेले नवे धनाढ्य उद्योजक, माजलेली अनागोंदी, अराजक आणि प्रतिगामी मूलतत्ववादी राजकारण- ह्या दोन्हीच्या मधोमध हस्तक्षेप होता तो साम्यवादी शासनाचा. शासनप्रणीत औद्योगिक विकास, पुरोगामी कायदा, शिक्षण-आरोग्य-रोजगार यातील कामगिरी इ. अनेक कारणांनी हा कालखंड असामान्य म्हणता येईल. मात्र हा दोन काळ्या कालखंडांना जोडणारा दुवा किंवा सांधा नाही. तो एक महत्वाचा ‘खंड’- break आहे. याची जाणीव असणे जरूर आहे.

मग प्रश्न उभा राहतो तो अश्या स्वायत्त आणि सबळ सामाजिक संस्थांचा, संरचनांची पुरोगामी विचारात तड कशी लावायची. वर्गसंघर्ष बाजूला ठेवून बहुसंस्कृतीवाद (multi-culturalism) हे २० व्या शतकाच्या उत्तरार्धात डाव्या चळवळीने स्वीकारलेले उत्तर आज निष्प्रभ ठरले आहे. ‘श्वेत-कामगार वर्ग आणि त्याचा उजव्या शक्तींच्या प्रबळ होण्यात असलेला वाटा’ हे पश्चिमी राष्ट्रांत सध्या प्रभावी कथानक आहे. बहुसंस्कृतीवादाचे आख्यान सांगत आर्थिकदृष्ट्या उजवीकडे झुकायचे हे आता चालणारे नाही. उलट जागतिकीकरणविरोध म्हणजे स्थलांतरीत कामगारांना विरोध, प्रस्थापितविरोध म्हणजे पुरोगामी माध्यमे, विज्ञान-समाजशास्त्रे यांना विरोध असला उफराटा विचार प्रबळ होतो आहे. तेव्हा थोडक्यात सांगायचे तर निगम यांनी केवळ उदधृत करण्यापुरते वापरलेले विधान ‘इतिहास हा एकरेषीय असत नाही’ याचेच चिंतन आवश्यक आहे. त्यात हस्तक्षेप (आधुनिकता ‘लादणे’, परंपरा ‘नाकारणे’ वगैरेदेखील) करावा लागतो- (आर्थिक आणि सांस्कृतिक असा दुहेरी) नाहीतर बर्बरता हेच भविष्य उरेल. म्हणूनच ‘इतिहासक्रमात हस्तक्षेप’ हा महत्वाचा आहे. बोल्शेविक क्रांती, चीन- क्युबा आणि इतर अनेक देशांतील क्रांत्यांचा तो महत्वाचा धडा आहे.

 

[1] ‘काफिला’ मध्ये त्याचे विस्तारित रूप प्रसिद्ध झाले आहे

[2] ‘kerensky हा ज्यू नव्हताच. मात्र त्याचे सरकार ज्यूंचे लांगूलचालन करते असा समज प्रसृत झाला होता. याउलट trotsky (मूळ नाव bronstein) हा ‘रशियातील सर्वात प्रसिद्ध ज्यू होता’. – निगम

2

लेखक दिल्लीस्थित अभ्यासक संशोधक आहेत.

Write A Comment