fbpx
विशेष सामाजिक

टिळक, भगतसिंह, पेरियार,जवळकर आणि ऑक्टोबर क्रांती

(स्कुल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज, लंडन ,यांनी नचिकेत कुलकर्णी यांस निमंत्रित केले असून येत्या ९ नोव्हेंबरला नचिकेत याच विषयावरील विस्तृत निबंध तेथे सादर करणार आहेत.)

७ नोव्हेंबरच्या दिवशी बोल्शेविक क्रांतीची शंभर वर्षं पुरी होत आहेत. मार्क्सवादी इतिहासकार एरीक हॉब्सबॉम यांनी विसाव्या शतकाचे वर्णन age of extremes असे केले होते आणि त्याचा कालखंड १९१४-१९९१ असा आखला होता. त्या विसाव्या शतकाच्या इतिहासाची पर्यायाने समकालीन मानवी इतिहासाची वाटचाल घडवणारी ही घटना होती. बोल्शेविक क्रांतीनंतरच्या कोणत्याही जागतिक घडामोडींचा विचार त्या क्रांतीच्या तसेच त्यातून निर्माण झालेल्या सोविएत संघाच्या संदर्भात करावा लागतो, या अर्थी ती मानवी इतिहासातील पहिली जागतिक क्रांती ठरते. जागतिक असणे केवळ भौगोलिक नसते तर त्या क्रांतीमध्ये असलेली मुक्तीची नव्या समाजाची हमी वैश्विक म्हणजे universal आहे का, यावर अवलंबून असते. फ्रेंच क्रांतीने ज्यांचा पुकारा केला ती स्वातंत्र्य समता मित्रतेची मूल्ये वैश्विकच होती पण त्यांची अंमलबजावणी तशी नव्हती. या संदर्भात तत्कालीन फ्रेंच वसाहत सेंट डोमिनिग येथील ( सध्याचा हैती हा देश) कृष्णवर्णीयांच्या गुलामीविरोधातील यशस्वी क्रांतीचे उदाहरण मार्मिक आहे. हा उठाव दडपण्यासाठी आलेल्या फ्रेंच सैनिकांना हैतीचे क्रांतिकारक ‘मार्सेय -marseillaise’ हे फ्रेंच क्रांतिगीत गात सामोरे गेले – फ्रेंच क्रांतीच्या त्रिसूत्रीचे अस्सल पाईक आम्हीच आहोत तुम्ही नाही, असेच ते ठणकावून सांगत होते. हैतीच्या क्रांतीचे हे स्पिरिट बोल्शेविक क्रांतीत प्रकट होताना दिसते. एका प्रकारचे शोषण, दास्य कायम ठेवून कोणाचीही मुक्ती शक्य नाही. मुक्तीचे राजकारण सार्वत्रिकच असावे लागेल, हा त्या स्पिरिट चा अर्थ! विसाव्या शतकातील सर्व मुक्तीलढ्यांनी -कष्टकरी शतेकऱ्यांच्या चळवळी वसाहतवादविरोधी लढे, वर्णद्वेषविरोधी लढे, स्त्रीमुक्तीच्या चळवळी, धार्मिकजातीय शोषणविरोधी लढे आदींनी बोल्शेविक क्रांतिकडून प्रेरणा घेतली किंवा त्यापासून त्यांना बळ मिळाले आणि सोविएत रशियानेही या लढ्यांची पाठराखण केली त्याचे कारण या स्पिरिटमध्येच आहे.
बोल्शेविक क्रांतीच्या काळातील भारतात भांडवलशाही जात -पुरुषसत्ताक सरंजामशाही आणि साम्राज्यवाद, म्हणजे दिनकरराव जवळकरांच्या शब्दात शेटजी भटजी आणि लाटजीच्या विरोधात एकत्र आणि वेगवेगळे लढे उभे राहत होते. त्यामधील विविध प्रवाहाचे बोल्शेविक क्रांती आणि समाजवादाबद्दलचे आकलन काय होते त्यांच्यावर क्रांतीचा प्रभाव कसा पडला याचा आढावा ह्या लेखात घेण्याचा प्रयत्न आहे. अगोदर म्हणल्याप्रमाणे वैश्विक असलेली क्रांती ही साकार व्हावी लागते ती त्या त्या समाजाच्या विशिष्ट परिस्थितीत ,तिथल्या वैशिष्टयांसह. त्या दिशेने झालेल्या प्रयत्नांची दिशा काय होती, कोणते मार्ग स्वीकारले गेले किंवा कोणते जाऊ शकले असते आणि का गेले नाहीत ह्याचा विचार करणे दरजेचे आहे. हा जरतरचा ऐतिहासिक उत्सुकतेपुरता खेळ नाही. त्याचा आजच्या विचार व्यवहाराशी थेट संबंध आहे.
वसाहतवादी सत्तेच्या जोखडाखाली असलेल्या भारतासारख्या देशांमध्ये बोल्शेविक क्रांतीविषयी आकर्षण किंवा कुतूहल निर्माण होण्याचं तात्कालिक कारण म्हणजे लेनिन आणि बोल्शेविक पक्षाची राष्ट्र राष्ट्र्कांच्या स्वयं निर्णयाच्या बाजूने भूमिका. स्वयंनिर्णयाचा हक्क हा वसाहतवादापासून स्वतंत्र होऊ इच्छीणाऱ्या राष्ट्रांना आहे, ही भूमिका झारच्या रशियन साम्राज्याचा भाग असलेल्या आणि पुढे सोविएत युनियनचे सदस्य झालेल्या युक्रेन, जॉर्जिया, आर्मेनिया, कझाकस्तान, उझबेकिस्तान, अशा राष्ट्रकांनाही होता. त्यानंतर १९२० साली आजच्या अझरबैजान मध्ये झालेल्या कम्युनिस्ट इंटरनशनॅशनलच्या ( comintern ) ‘ कॉंग्रेस ऑफ द पिपल ऑफ इस्ट ‘ मध्ये तसेच comintern च्या दुसऱ्या अधिवेशनात वासाहतिक देशांमधील साम्राज्यवादविरोधी आणि सरंजामशाहीविरोधी चळवळीना पाठींबा देण्याची भूमिका घेण्यात आली. भारताबाहेर राहून स्वातंत्र्यासाठी धडपड करणारे एम. एन. रॉय, बर्लिनमधील वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय आणि त्यांच्या भोवतीचे गट ,मौलवी बर्कतुल्ला, डॉ. खानखोजे असे गदर पार्टीचे क्रांतिकारक , अब्दुल रब बर्क आणि ताश्कंद मधील indian revolutionary association चा गट अशा विविध गटांचा १९२० च्या दशकात लेनिन ,बोल्शेविक आणि कम्युनिस्ट इंटरनशनलशी थेट संपर्क आला. भारतीय राष्टीय स्वातंत्र्याच्या आणि समाजवादी क्रांतीबद्दल या गटांच्या भूमिका ,comintern ची भूमिका बदलत्या व्यूहरचना हा सगळा इतिहास विलक्षण तर आहेच आणि भारतातील कम्युनिस्ट चळवळीच्या जडणघडणीचा अभ्यास करण्यासाठी मोलाचाही आहे . मात्र या लेखामध्ये त्या काळात भारतात ज्या काही चळवळी सुरू होत्या, संघटना कार्यरत होत्या त्यापैकी बाळ गंगाधर टिळक , भगतसिंग ,पेरियार ,सत्यशोधक जवळकर यांचा विचार करायचा आहे.
भारतीय राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळ आणि बोल्शेविक क्रांती या संदर्भातला दाखला म्हणून अनेकदा टिळकांनी केसरीत लिहिलेल्या अग्रलेखाचा उल्लेख केला जातो. या अग्रलेखात टिळकांनी बोल्शेविक क्रांतीचे स्वागत केले होते आणि लेनिनची प्रशंसा केली होती. आपल्या स्वार्थ लालसेपोटी युद्ध लादणाऱ्या वरिष्ठ वर्गांशी कोणतीही तडजोड करण्यास लेनिनने नकार दिला आणि सैन्य आणि सामान्यजनामध्ये त्याच्या लोकप्रियतेचे गमक हे त्याने उमराव-जमीनदारांची जमीन शेतकऱ्यांत वाटून टाकण्याची भूमिका घेतली यात आहे , असा टिळकांच्या अग्रलेखाचा सूर होता. भारतीय कामगार चळवळीचे प्रेरणास्त्रोत आणि कामगार लढ्याला राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्याच्या केंद्रस्थानी आणणारे नेते असाही टिळकांचा गौरव काही अभ्यासक करतात. कामगार चळवळीच्या आणि कम्युनिस्ट पक्षाच्या अग्रणी नेत्यांपैकी कॉ डांगे यांना कामगार चळवळीत जाण्याची प्रेरणा टिळकांनी दिली, याचा उल्लेख वारंवार होत असतो. आयटकच्या पहिल्या अधिवेशनाला टिळक संबोधित करणार होते. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला, याचीही नोंद केली गेली आहे. ( खुद्द डांगे यांनीदेखील ती केलेली आहे ) टिळकांच्या मृत्यूनंतर केसरीमध्ये आलेल्या लेखातही लेनिनचा गौरव करण्यात आला आणि ब्रिटिशांकडून त्याविरोधात पसरवण्यात येणाऱ्या अपप्रचारावर टीका करण्यात आली . एकंदरीत ब्रिटीशांचा शत्रू आणि साम्राज्यवादाचा कट्टर विरोधक म्हणून टिळक आणि त्यांच्या अनुयायांनी लेनिन आणि बोल्शेविकांची कड घेतलेली दिसते. पण टिळकांच्या वैचारिक भूमिकांच्या प्रेरणांचा आशय किंवा गाभा हा बोल्शेविक -समाजवादी विचाराच्या प्रेराणांशी मिळताजुळता होता का ? टिळक विचार आणि राजकारणाच्या मुशीतून, साच्यातून समाजवादी मुक्तिदायी राजकारण उभे राहणे शक्य होते का ? लेनिन आणि बोल्शेविकांनी ज्या पिळल्या, दडपल्या जाणाऱ्या वर्गाची एकजूट उभी करून ज्यांच्या नेतृत्वाखाली क्रांती यशस्वी केली त्या कामगार आणि शेतकऱ्यांच्या लढयाबद्दल -मागण्यांबद्दल टिळक आणि टिळक अनुयायांचा दृष्टीकोन काय होता ? हे प्रश्न महत्वाचे ठरतात. कारण आजही कम्युनिस्ट पक्षांचे नेते तसेच त्यांचे अव्वल विचारवंत वर उल्लेख केलेली उदाहरणे देऊन साम्राज्यवादविरोधी लढ्याच्या मुशीतूनच समाजवादी चळवळ उभी राहते असे सिद्धांत मांडतात. तसेच त्या लढ्याचे अव्वल नेते टिळक यांच्या विचार व्यवहारात कम्युनिस्ट चळवळीचा वारसा त्या चळवळीला एतद्देशीय रूप देण्याच्या हेतूने -स्वीकारतात. टिळकांच्या सामाजिकदृष्ट्या ठाम प्रतिगामी भूमिकांविषयी पुरेसं लिहिलं गेलं आहे. मात्र तरीही काही विचारवंत अशी भूमिका घेतात की साम्राज्यवादविरोधातील भूमिकेचे सातत्य हे अपरिहार्यपणे सामाजिकदृष्ट्या पुरोगामी भूमिकेच्या दिशेने यथावकाश जाणारच ( हे तात्विक समर्थन झाले ,एरवी डावपेच -व्यवहारवाद वगैरेंच्या आधारे पांघरूण घालण्याचा प्रयत्न चालू असतोच! ) ,वस्तुस्थिती त्याच्या बरोबर उलटी आहे. सामाजिकदृष्ट्या क्रांतिकारी भूमिकेचे सातत्य हे साम्राज्यवादविरोधापर्यंत पोहोचल्याची इतिहासाची साक्ष आहे ,जवळकरांचे उदाहरण आपण बघणारच आहोत. कामगार आणि शेतकऱ्यांच्या संघटनाची टिळकांची भूमिका ही या वर्गांना कॉंग्रेसच्या मागे उभी करण्याची म्हणजे पर्यायाने स्थानिक शोषकविरोधी लढ्याला बगल देण्यासाठी होती. ज्याचे अधिक विकसित रूप गांधींच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसने विकसित केले ,आणि त्यातील धोके भगतसिंग सारख्या क्रांतिकारकांनी ओळखले होते हे देखील आपण पाहणारच आहोत. किंबहुना टिळकांनी वेळोवेळी या शोषकांच्या हितसंबंधांची पाठराखणच केलेली दिसते. १८८१ साली factory act ला केलेला विरोध असो ( सत्यशोधक कामगार नेते ना. मे. लोखंडे या कायद्याच्या बाजूचे होते ) , सावकारांपासून शेतकऱ्यांचे रक्षण करू पाहणाऱ्या deccan debt relief act ला केलेला विरोध असो ( म.फुले आणि रानडे हा कायदा येण्यासाठी झटत होते ) पुढे खोतीचं समर्थन असो किंवा कुलकर्णी वतन नष्ट करायला विरोध असो . पारंपारिक ब्राह्मणी जातवर्गीय वर्चस्व टिकवून ठेवणे हा टिळकांच्या साम्राज्यवादविरोधाचा गाभा होता, हे या उदाहरणांचे तपशील पाहिल्यावर लक्षात येते . या पार्श्वभूमीवर टिळकांच्या मुशीतून घडलेल्या त्यांची प्रेरणा मानणाऱ्या कम्युनिस्ट नेत्यांनी एतद्देशीय जातीय -धार्मिक शोषण-शासन व्यवस्थाविरोधात लढे उभे करण्यात उदासीनता दाखवली, जातीविरोध, धार्मिक दडपणुकीविरोधातील लढे निव्वळ सुधारणावादी-reformist होते किंवा आहेत, क्रांतिकारक नाहीत, असे शिक्के मारले. शेतकऱ्यांच्या चळवळी उभारण्याकडेही दुर्लक्ष केले, याकडे बघता येते. टिळकअनुयायी कॉ. डांगे यांच्या गांधी की लेनिन या पुस्तकावर लिहिलेल्या लेखात ब्राह्मणेतर चळवळीचे नेते जागृतीकार पाळेकर ह्या त्रुटीवर १९२२ सालीच बोट ठेवले होते. ब्राह्मण ब्राह्मणेतर वादासंबंधीच्या टिळकपंथी आकलनाबद्दल खेद व्यक्त करून पाळेकरांनी डांगे आर्थिक दास्याखेरीज बौद्धिक-धार्मिक -सामाजिक दास्याचे दुष्परिणाम लक्षात घेत नाहीत आणि पुण्या-मुंबईबाहेरील बहुजनसमाजाच्या स्थितीची त्यांना कल्पनाही नाही, अशी टीका तेंव्हा केली होती . उत्पादक वर्ग असलेल्या बहुजनसमाजाची स्थिती सुधारण्यासाठी कॉंग्रेसपासून वेगळा आणि ब्राह्मणेतरातील वरिष्ठवर्गीयांनाही वगळणारा सोशल डेमोक्रॅटिक बहुजन पक्ष उभा करण्याची गरज पाळेकरांनी व्यक्त केली होती आणि डांगेना उद्देशून लिहिलेल्या लेखात सत्यशोधक चळवळीचे वर्णन ‘सोशालीस्ट धोरणाची चळवळ ‘ असे केले होते. कॉ मधु शेट्ये यांनी म्हणल्याप्रमाणे, टिळकवादाच्या ब्राह्मणी मर्यादांमुळे डांगे व तत्सम कम्युनिस्ट नेतृत्वाने या इशाऱ्यांकडे दुर्लक्षच केले आणि त्यामुळे बोल्शेविक क्रांतीचा सर्व प्रकारच्या शोषणाला विरोध करण्याचा मुक्तिदायी आशय भारतात साकार करण्याचे त्यांचे प्रयत्न थिटेच पडले.
पाळेकरांच्या विचाराचा कल समाजवादी किंवा त्या धर्तीच्या भूमिकेकडे झुकताना दिसतो यात आश्चर्य नाही, कारण जागतिक पातळीवर समाजवादी चळवळी किंवा कम्युनिस्ट पक्ष हे मुळात कामगार शेतकऱ्यांच्या चळवळींमधून संघटनांमधून उभे राहिलेले दिसतात. महाराष्ट्रामध्ये हे दोन्ही लढे जोतीबा फुलेंच्या प्रेरणेतून -पुढाकारातून सत्यशोधकांनी उभे केले हे गेल ओम्वेत यांनी सार्थपणे दाखवले आहे. ह्याचेही आश्चर्य नाही कारण कॉ शरद् पाटील यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे जात ही भारतीय समाजातील पायाभूत शोषणशासन संस्था असल्यामुळे ,सत्यशोधक चळवळीसारख्या जातीविरोधी क्रांतीकारक चळवळीने बहुसंख्य शोषित जातवर्गीय शेतकरी कामगारांच्या प्रश्नांना हात घालणे हे नैसर्गिकच आहे. बोल्शेविक क्रांती आणि मार्क्सवादी विचारांशी परिचय झाल्यानंतर सत्यशोधक चळवळीचा समाजवादी दिशेने विस्तार करण्याची भूमिका निसंदिग्धपणे मांडली ती दिनकरराव जवळकरांनी. १९२८-२९ साली इंग्लंडमधील वास्तव्यात जवळकरांचा ब्रिटीश कम्युनिस्ट पक्षाशी संबंध आल्याची नोंद आहे. अर्थात त्या आधी त्यांनी लिहिलेल्या ब्राह्मणेतर पक्षाच्या कैवारी या मुखपत्रातून मुंबईच्या गिरणीकामगार चळवळीच्या कम्युनिस्ट पुढाऱ्यांवर टीका करणाऱ्या लेखांमध्येही रशियातील कम्युनिस्ट किंवा एकंदर कम्युनिस्ट विचाराबद्दल टीका नाही, त्यांनी झारशाहीच्या बरोबरीने भिक्षुकशाही उखडून टाकल्याचे उल्लेख आहेत. इथले ‘ब्राह्मणी’ कम्युनिस्ट त्याकडे लक्ष देत नाहीत, असाही त्या टीकेचा रोख आहे. पुढे शेतकऱ्यांचे हिंदुस्तान आणि क्रांतीचे रणशिंग या पुस्तकांमधून जवळकरांची शोषणविरोधी समाजवादी भूमिका स्पष्ट होताना दिसते. बोल्शेविक क्रांतीचा थेट उल्लेख मोजक्याच ठिकाणी असला तरी समाजवादाची कल्पना ही सोविएत युनियन समोर ठेवून केल्याचे उघड आहे. सत्यशोधक चळवळीने वापरात आणलेल्या संकल्पनांचा वापर आणि विस्तार समाजवादी विचार मांडण्यासाठी करण्याचा पहिला लक्षणीय प्रयत्न या दोन पुस्तकांमध्ये दिसतो. शेतकरी कष्टकरी बहुजन समाजाचे शत्रू कोण तर शेटजी भटजी आणि लाटजी – म्हणजे भांडवलशाही ब्राह्मणी जातव्यवस्था आणि साम्राज्यवादी सत्ता हे सूत्र जवळकरांनी मांडले. शोषकशासक जातवर्गासाठी सत्यशोधक चळवळीने शेटजी आणि भटजी असा शब्दप्रयोग केला होता त्याचा हा विस्तार. कष्टकरी बहुजन समाजाच्या स्त्रीपुरुषांच्या शोषण पीडनाला धर्माचे अधिष्ठान कसे असते हे सत्यशोधकानी अचूक ओळखले होते, त्यामुळे ते नष्ट करणे हे त्यांच्यादृष्टीने क्रांतिकारक कार्यच होते . भारतात समाजवादाची ती पूर्वअट ठरते याची जाण जवळकरांच्या लिखाणात दिसते. रशियामध्ये प्रीस्ट आणि चर्च यांच्या विरुद्ध मोठी चळवळ आहे,निरीश्वरवाद्यांचे संघ आहेत तसल्या चळवळीची आवश्यकता सध्या हिंदुस्तानला आहे, असे जवळकर नमूद करतात . सत्यशोधक आणि मद्रास इलख्यातील सेल्फ रिस्पेक्ट चळवळीशी या चळवळीची समानताही ते नोंदवतात आणि भारतातील ही चळवळ अजून रशियाप्रमाणे देवळांचा विध्वंस करण्याच्या कार्याला लागलेली नाही पण तसे उग्र स्वरूप आले तरी हरकत नाही कारण रशियाला एका ख्रिस्ताशीच झगडायचे होते आमच्यापुढे ३३ कोटी देव आहेत असा इशाराही देतात. बहुजन समाजाच्या अज्ञानाचा फायदा घेऊन राजे धर्मगुरू धार्मिक रौलट अॅक्टचे जुलमी कायदे चालवत आहेत व शेतकरी मजूर कास्तकार कामगार यांच्यावर भिक्षुकशाही आपले धार्मिक साम्राज्य पसरू पाहत आहे पण आता शेतकऱ्यांना मजुरांना मानवी धर्माची स्थापना करायची आहे, असे उद्दिष्ट जवळकर मांडतात. या मानवी धर्माच्या कसोट्या समता आणि स्वातंत्र्य शेटजी भटजी लाटजीच्या शोषक त्रिकूटाविरोधात प्रामुख्याने शेतकऱ्यांना संघटित करणे हे जवळकरांच्या राजकीय भूमिकेचे मुख्य सूत्र होते. ब्राह्मण आणि बनिया जातीय सावकार व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना कसे लुबाडले जाते याचे तपशीलवार विवेचन शेतकऱ्यांचे हिंदुस्तान मध्ये आहे. जवळकरांचा अकाली मृत्यू झाला नसता तर माओने ज्याप्रमाणे त्याच्या हुनान प्रांतातील शेतकऱ्यांच्या स्थितीचे सर्वेक्षण करून रिपोर्ट लिहिला होता ( हा रिपोर्ट चीनी क्रांतीच्या व्यूह्ररचेनेसाठी पायाभूत ठरला ) तसे काम जवळकरांनी निश्चितच केले असते. जमीन फेरवाटपाची शेतकी क्रांती आणि लोकशाही क्रांतीचा संबंध कम्युनिस्टांनी निदान पक्षकार्यक्रमात तरी नोंदवला होता , बोल्शेविक क्रांतीच्या वाटचालीत तर या संदर्भातील लेनिनचे आकलन/विश्लेषण मार्गदर्शकच ठरले – मात्र भारतातील शेतकी क्रांती ही जात्यंतक शेतकी क्रांती -लोकशाही क्रांती असावी लागणार या दिशेने जवळकरांची मांडणी पुढे जाऊ शकली असती कारण त्यांनी शेतकऱ्यांच्या पिळणुकीचे जातीय स्वरूपही ( वर्गीयतेच्या जोडीने ) लक्षात घेतले होते. शेतकऱ्यांचे स्वराज्य हवे असे म्हणताना जवळकर त्यांच्या तेज साप्ताहिकातील लेखात स्वातंत्र्य लढ्यातील सहभागाबरोबरच शेतकऱ्यांच्या स्वतंत्र संघटना असण्याची गरज बोलून दाखवतात आणि स्वराज्याचे स्वरूप काय असणार ते लढ्याचे स्वरूप ठरवेल कारण सत्तेचे संक्रमण सुरु होते ती वेळ जास्त महत्वाची असते , एकदा विशिष्ट वर्गाची सत्ता स्थिरावली म्हणजे ती बदलणे कष्टाचे आणि दिर्घावधीचे होते असे महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवतात. स्वराज्य जर भांडवलदारांच्या नियंत्रणाखाली राहिले आणि शेतकऱ्यांची पिळवणूक थांबली नाही तर त्याला स्वराज्य comintern च्या दुसऱ्या अधिवेशनात कष्टकरी चळवळीची स्वातंत्र्य लढ्यातील सहभागाची भूमिका कशी असावी याबद्दल लेनिनची भूमिका जवळकरांना माहित होती किंवा काय ते कळायला मार्ग नाही. पण ते स्वतंत्रपणे लेनिनवादी भूमिकेपर्यंत आले असं म्हणता येईल. शेतकऱ्यांचे स्वराज्य पांढरपेशा वर्गाने चालविलेले शहरी शहाण्यांच्या तंत्राने भांडवल्या दीड शहाण्यांच्या हुकमतीने चालणारे नसेल हे स्पष्ट करणारे जवळकर समाजवादाच्या दिशेने जाणाऱ्या लोकशाही क्रांतीचीच रूपरेषा मांडत होते. क्रांतीचे रणशिंग मध्ये ते उघडच शेतकऱ्यांना समाजवादी पद्धतीने संघटित केले तर भांडवलवाल्यांचे स्वराज्य येणे अशक्य होईल , स्वराज्य हे सोशालिस्ट पद्धतीचेच पाहिजे असे निसंदिग्ध आवाहन करतात. इतिहासाच्या भौतिकवादी विश्लेषण पद्धतीची ओळख करून देऊन जवळकर समाजवाद का हवा ते मांडत असल्यामुळे त्याकडे मनोराज्य किंवा घोषणाबाजी असे म्हणून दुर्लक्ष बिल्कुल करता येत नाही. किंबहुना तत्कालीन भारतीय कम्युनिस्टांनी ज्याचा तपशीलवार किंवा स्वतंत्रपणे विचार केला नाही त्या समाजवादाच्या स्त्रीमुक्तीविषयक पैलूंचाही उहापोह जवळकर करतात. समाजवाद गृह व कुटुंबनाशक ठरेल का या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी देऊन सध्याच्या स्थितीतील या संस्था नष्ट झाल्यास दुःख करता कामा नये असे जवळकर बजावतात. भांडवलशाहीतील अपुऱ्या स्त्री स्वातंत्र्यावर टीका करून समाजवादात वेतनाची गुलामी आणि कुटुंबासाठी विवाह ह्या काचातून स्त्री मुक्त ओईल – लग्न होतील ती केवळ परस्परांवर प्रेम करणाऱ्या स्त्रीपुरुषांच्या एकत्रीकरणासाठीच -त्यात कोणतीही धार्मिक बाब उरणार नाही असा निर्वाळा देतात. कृत्रिम अनावश्यक बंधनांचा उच्छेद आणि इच्छास्वातंत्र्य या अर्थी प्रेमस्वातंत्र्याला समाजवाद मान्यता देईल -प्रेमाला उच्च स्थानी बसवेल अशी हमी देतात. स्त्रीमुक्ती आणि प्रेमस्वातंत्र्य याचा विचार समाजवादाच्या संदर्भात एका सत्यशोधकाने अग्रक्रमाने केला, हे सावित्री जोतिबांच्या विचारांचा स्त्रीमुक्तीवादी कस सिद्ध करणारे उदाहरण आहे. त्याचबरोबर समाजवादाचे समग्र आकलन भारतातील कोणत्या समाजशक्तींना – होणे जास्त शक्य होते – स्त्रीदास्यजातीविरोधी अब्राह्मणी प्रवाह समाजवादाला अनुकूल का असू शकतो ह्याचेही ते उदाहरण आहे.
जातीअंतक समाजक्रांतिकारी चळवळीला भांडवलशाही साम्राज्यवादविरोधी धार देणारे जवळकर होते आणि साम्राज्यवादविरोधी शेतकरी-कामगार जनचळवळीच्या मुशीतून समाजक्रांतिकारी शास्त्रीय समाजवादी राजकारणाची रूपरेषा मांडणारे होते शहीद कॉ. भगतसिंग! भगतसिंग यांच्यावरील बोल्शेविक क्रांतीचा प्रभाव ,मार्क्स एंगल्स लेनिनच्या साहित्याचे ते करीत असलेले काटेकोर वाचन याबदडल अनेक अभ्यासक आणि कार्यकर्त्यांनी लिहिले आहेच -लाहोर कॉन्स्पिरासी केस दरम्यान १९३० साली तुरुंगातून भगतसिंगनी लेनिनच्या स्मृतीदिनानिमित्त तार पाठवून ‘महान सोविएत प्रयोगाला शुभेच्छा देऊन आपणही आंतरराष्ट्रीय कष्टकरी चळवळीचा हिस्सा असल्याचा स्पष्ट उच्चार केला होता. राष्ट्रीय स्वातंत्र्यलढ्याला कामगार-शेतकऱ्यांच्या मुक्तीलढ्याचे रूप देऊन एकंदर आंतरराष्ट्रीय चळवळीच्या संदर्भात पाहण्याचा दृष्टीकोन भगतसिंगांच्या विचारात दिसतो. हा विचार कृती आणण्याची पुरेशी संधीच त्यांना मिळाली नाही. मिळू दिली गेली नाही . मात्र स्वातंत्र्य चळवळीमध्ये असलेल्या सशस्त्र लढ्याच्या प्रवाहाला आधुनिक समाजवादी विचाराची बैठक देऊन जनचळवळीच्या ( मास मूवमेंट या अर्थी ) दिशेने नेण्याची ऐतिहासिक भूमिका त्यांनी बजावली. सशस्त्र लढ्याच्या प्रवाहामध्ये धार्मिक -पुनरुज्जीवन किंवा पूर्वगौरववादी धारणा प्रबल होत्या. स्पष्ट राजकीय कार्यक्रम -वैचारिक भूमिका नसल्यामुळे हिंसक कृती करणारे गुप्त गट असेच त्यांचे स्वरूप होते. त्याग आणि बलिदानाच्या तीव्र भावनेतून केलेल्या रोम्यांटिक कृतीमधून व्यापक चळवळ उभी राहणे शक्य नव्हते. स्वतः अशा गटांमध्ये ( हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन) सहभागी असलेल्या भगतसिंग यांनी त्याबद्दल चिकित्सेची -प्रसंगी आत्मटीकेची भूमिका घेऊन नौजवान भारत सभा आणि हिंदुस्तान सोशालीस्त रिपब्लिकन असोसिएशनच्या उभारणीत प्रमुख भूमिका बजावली. सशस्त्र गटांच्या धार्मिक पुनरुज्जीवनवादी – परंपरावादी धारणांची परखड चिकित्सा त्यांच्या ‘ मी नास्तिक का आहे’ या निबंधामध्ये केलेली आहे. स्पष्ट नास्तिक, इहवादी भूमिकेला आधार मार्क्सवादी भौतिकवादी दृष्टीचा होता हे निबंधामध्ये आणि त्या काळातील भगतसिंगच्या डायरीतील नोंदीमधून कळते. धार्मिक गुलामीविरोधात प्रखर संघर्ष करण्याची गरज स्वातंत्र्य चळवळीच्या नेत्यांमध्ये भगतसिंग इतक्या तीव्रतेने कोणालाच जाणवली नव्हती. सांप्रदायिक दंगे आणि त्यावरील उपाय या लेखामध्ये ही जाण स्वच्छपणे दिसते – धर्मभावनेचा चलाख आणि सोयीस्कर वापर लोकांचा पाठींबा मिळवण्यासाठी करण्याकडे टिळकांपासून गांधींपर्यँतच्या नेत्यांचा कल असताना भगतसिंग राजकारणातून धर्माला वगळण्याचे आवाहन करतात. धर्माच्या आधारे लोकांत फूट पाडली जाते आणि समाईक राजकीय भूमिकेच्या आधारेच लोक धर्मपलीकडे जाऊन एकत्र येऊ शकतात हे त्या लेखाचे सूत्र आहे, हे समाईक राजकीय उद्दिष्ट शोषणमुक्ती-समाजवाद हे अन्य लिखाणातून समोर येते. ट्रेड युनियन्सनी धर्माच्या पलीकडे जाणारी वर्गीय एकजूट उभी करण्यासाठी प्रयत्नशील असलं पाहिजे हा आग्रह ह्या लेखातही दिसतो. कानपूरमध्ये भगतसिंग ‘कीर्ती ‘ ( पंजाबीमध्ये कष्टकरी) किसान कामगार पक्षाच्या संपर्कात आले -कानपूर हे महत्वाचे औद्योगिक केंद्र असल्यामुळे कामगार चळवळीशीही थेट संबंध आला ,पंजाबमधील शेतकऱ्यांना संघटीत करण्यातही कीर्ती पक्षाने पुढाकार घेतला होता. मार्क्सवादी साहित्याचा काटेकोर अभ्यास ( ज्याची साक्ष जेल डायरीच्या पानापानावर मिळते ) आणि शेतकरी कामगार चळवळीत सहभाग या मार्गे भगतसिंगांच्या क्रांतिकारक राजकारणाला समाजवादी उद्दिष्ट प्रापत झाले. रशियामधील नेयाचेव वगैरे रोमांटीक सशस्त्र क्रांतिकारी प्रवाहाच्या मर्यादा ओळखून कष्टकरी समूहांना संघटीत करणाऱ्या पक्षाची गरज लेनिन यांनी मांडली तशी प्रक्रिया भगतसिंगाच्या बाबतही घडताना दिसते. १९३१ च्या जानेवारी मध्ये तरुण कार्यकर्त्यांना उद्देशून लिहिलेल्या ‘ to young political workers ‘ या राजकीय मसुदावजा पत्रकामध्ये हे स्पष्टपणे दिसते. क्रांतिकारी साहसवादापेक्षा परिस्थितीचे वस्तुनिष्ठ आकलन आणि त्यावर आधारित व्यूहरचना अधिक महत्वाची असते, हा मुद्दा मांडताना भगतसिंग १९०५-१७ या कालखंडातील बोल्शेविक पक्षाच्या इतिहासातील उदाहरणे देतात. राजकीय डावपेचात्मक तडजोडीची गरज बोलून दाखवत असतानाच ते चळवळ आणि तिचे उद्दिष्ट याचा कधीही विसर पडू न देण्याचीही आठवण करून देतात. शेतकरी आणि कामगार या क्रांतिकारक शक्ती केंद्रस्थानी नसल्यामुळे तत्कालीन स्वातंत्र्य चळवळ तडजोड किंवा सपशेल माघार या दोघांत हेलकावे खात राहते असे विश्लेषण करून ते कॉंग्रेसच्या वर्गीय चारित्र्यावर अचूक बोट ठेवतात. शेतकरी किंवा कामगारांच्या मागण्यांपुढे मान तुकवण्याऐवजी कॉंग्रेस ब्रिटीश सत्तेपुढे शरणागती पत्करणे मान्य करेल हा इशाराही ते देतात. अगोदर म्हणल्याप्रमाणे स्वातंत्र्य चळवळीलाच समाजवादी दिशा देण्यासाठी भगतसिंग झटत होते आणि ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवून राजकीय सत्ता हाती घ्यायची ती मार्क्सवादी आधारावर समाजाची पुनर्ररचना करण्यासाठीच हे या पत्रात ते निसंदिग्धपणे बोलून दाखवतात. सामाजिक व्यवस्था मुळापासून बदलून नवी समाजवादी व्यवस्था आणणे हाच स्वातंत्र्याचा अर्थ मानल्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांप्रमाणे भगतसिंग तत्कालीन अस्पृश्य जनतेच्या लढ्यांना फूट पाडणारे किंवा स्वातंत्र्याच्या उद्दिष्टापासून भरकटवणार वगैरे मानत नाहीत. त्यांच्या स्वतंत्र संघटना उभ्या राहात असल्याचे स्वागत करतात आणि भारतातील सामाजिक सर्वहारा वर्ग हाच आहे, त्यामुळे क्रांतिकारक लढ्याचा कणाही तोच असणार ही जाणीवही भगतसिंग यांच्या अस्पृश्यतेचा प्रश्न ह्या लेखात दिसते. बोल्शेविक क्रांती आणि समाजवादी विचारांच्या प्रेरणेतून साम्राज्यवाद विरोधी स्वातंत्र्यलढे समाजवादी मार्गाने जाऊन यशस्वी झाल्याची उदाहरणे आहेत. हो ची मिन्ह आणि व्हिएतनाम त्यातील उल्लेखनीय उदाहरण आहे. भगतसिंग यांच्या राजकारणात तशा शक्यता होत्या. पुढे भगतसिंगांचे अनेक सहकारी कम्युनिस्ट पक्षत आले (कॉ अजय घोष एकसंध भाकपचे महासचिव होते). मात्र ह्या शक्यता स्वातंत्र्य लढ्याच्या काळात कम्युनिस्ट पक्ष साकार करू शकले नाहीत आणि खऱ्या अर्थाने राष्ट्रीय ताकद बनू शकले नाहीत. शेतकरी कामगार बहुजनांशी एकरूप होऊन सातत्याने जनचळवळीचा आग्रह धरणाऱ्या भगतसिंग यांच्या नेतृत्वाखाली हे होऊ शकले असते असं म्हणायला निश्चितच वाव आहे. भगतसिंगना १९२८ साली सोविएत युनियन ला जाण्याची संधी होती. ती त्यांनी नाकारली, कारण तेंव्हा अॅसेंब्लीमध्ये बॉम्ब टाकण्याचा निर्णय झालेला होता. भगतसिंगाच्या संपर्कातून कम्युनिस्ट इंटरनॅशनलचे भारतीय परिस्थितिचे आकलन बदलू शकते असते आणि त्याचाही परिणाम इथल्या कम्युनिस्ट चळवळीच्या घडणीवर झाला असता असेही म्हणायला वाव आहे.
जातिविरोधी -अब्राह्मणी प्रवाहातील जे एकमेव नेते सोविएत यूनियनला प्रत्यक्ष भेट देऊन आले ते म्हणजे इ व्ही रामस्वामी नायकर ‘पेरियार ‘. १९३३ साली सोविएत यूनियन आणि यूरोपचा दौरा करून पेरियार परत आल्यानंतर सेल्फ रिस्पेक्ट चळवळीला समाजवादी कार्यक्रमाची जोड देऊन समधर्म पक्ष उभारण्याचा प्रयत्न त्यानी केला. (मनुधर्म विरोधी जातीविहीन समधर्म, बौद्ध विचाराचाही समधर्म कल्पनेवर खोलवर प्रभाव होता. ) साम्राज्यवादी दडपशाही, एकंदर प्रतिकूल आणि विषम परिस्थितीत ब्राह्मणेतर समाजाला हक्क मिळवून देण्यासाठी अपरिहार्य झालेल्या तडजोडी आणि कम्युनिस्ट तसेच काँग्रेस सोशालिस्ट पक्षाचा उदासीन पवित्रा अशा अनेक ऐतिहासिक कारणांमुळे हा प्रयोग १९३६-३७ नंतर टिकू शकला नाही. मात्र या कालखंडात आणि नंतरदेखील पेरियार आणि त्यांचे समधर्मवादी सेल्फ रिस्पेक्ट चळवळीतील सहकारी यांनी सोविएत रशिया आणि समाजवादी समाजरचनेचा विचार याबद्दल आस्था बाळगलेली दिसते. रशियामधून परतल्यावर पेरियार यांनी सुमारे चाळीसपेक्षा जास्त सभांमध्ये सोविएत रशियाचा आणि समाजवादी समाजरचना उभारण्याचा पुरस्कार केला, अशी एका गुप्त पोलीस अहवालात नोंद असल्याचे ए आर वेंकटचलपती हे तमिळ इतिहासतज्ञ सांगतात. ‘ सोविएत युनियन ही नव्या जगाची चाहूल आहे, असा प्रयोग मानवाच्या इतिहासात अभूतपूर्व आहे, अशी पेरियार यांची प्रतिक्रिया असल्याचेही त्यांनी नोंदवले आहे. कुडी अरासू व रिव्होल्ट या सेल्फ रिस्पेक्ट चळवळींच्या मुखपत्रातील सोविएत युनियन आणि समाजवाद याविषयी मांडलेले विचार बघण्यासारखे आहेत. आंतरराष्ट्रीय कष्टकरी चळवळ हा ‘सेल्फ रिस्पेक्ट ‘ च्या तत्वांचाच आविष्कार आहे, कारण त्या चळवळीच्या पायाशी मानवी प्रतिष्ठेचेच मूल्य आहे, अशी भूमिका घेणारे समधर्म कार्यकर्ते सेल्फ रिस्पेक्ट चळवळीला आंतर्राष्ट्रीय संदर्भात बघत होते आणि समता बंधुता आणि न्यायासाठीच्या सोविएत प्रयासांमध्ये आपल्या चळवळीच्या उद्दिष्टांच्या सच्चेपणाची आणि यशाची हमी शोधत होते. प्रखर नास्तिक आणि धर्मचिकित्सक – धर्मविरोधी विचाराच्या पायावर उभ्या असलेल्या सेल्फ रिस्पेक्ट चळवळीला सोविएत युनियनबद्दल प्रामुख्याने आकर्षण वाटले ते तेथील संघटीत धर्मविरोधी धोरणांमुळे. भटशाही नष्ट केल्याखेरीज भांडवलशाही नष्ट करता येणार नाही आणि सोविएत रशियाने ज्याप्रमाणे lords, king, clergy च्या त्रिकुटाची सत्ता नष्ट केली त्याप्रमाणे ‘धनिक मूठभर शिक्षित आणि ब्राह्मण ‘यांच्या वर्चास्वाविरोधात इथे लढा द्यावा लागेल हे पेरियार यांनी वारंवार सांगितले. पेरियार यांनी सोविएत युनियन मधील atheist association चे ऑनररी सदस्यत्व स्वीकारले होते आणि कुडी अरासू मध्ये लेनिनचे धर्मविषयक लेख छापले होते. तमिळ भाषेत कम्युनिस्ट जाहीरनाम्याचे भाषांतर सर्वात आधी छापले पेरियार यांनीच. त्याच्या प्रस्तावनेमध्ये पेरियार म्हणतात की खरं तर रशियासारखी क्रांती पिळवणूक गरिबी अज्ञान मानवी प्रतिष्ठेची अवहेलना या सगळ्यांनी ग्रासलेल्या भारतातच व्हायला हवी. धर्म आणि पुरोहितांच्या बौद्धिक आणि शारीरिक गुलामीच्या जोखडाखाली लोक पिचत आहेत पण तरीही भारतात क्रांती होत नाही कारण इथे जातिव्यवस्थेची तटबंदी आहे. जी आर्थिक विषमतेलाही आणखी मजबूत करते , टिकवून धरते ‘. समधर्म कालखंडामध्ये पेरियार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी समता आणि मानवी स्वातंत्र्य साकार करु पाहणाऱ्या सोविएत प्रयोगाशी वेळोवेळी थेटपणे आपल्या चळवळीचे नाते सांगितले आणि आर्थिक दास्य व राजकीय पारतंत्र्य याच्या मुळाशी सामाजिक दास्य असल्याचे ठामपणे मांडून त्यातून मुक्त होण्यासाठीच्या सोविएत युनियनच्या धोरणांचे स्वागत केले.
लेखाच्या सुरुवातीस म्हणल्याप्रमाणे वैश्विक असलेली क्रांती ही साकार व्हावी लागते ती त्या त्या समाजाच्या विशिष्ट परिस्थितीत आणि तिथल्या वैशिष्टयांसह! भारतामध्ये त्या दिशेने झालेल्या प्रयत्नांची दिशा काय होती , कोणते मार्ग स्वीकारले गेले, कोणते जाऊ शकले असते आणि का गेले नाहीत ह्यासंबंधीची काही उदाहरणे या लेखात आपण पहिली. भारतीय संदर्भात समाजवादाचा विचार व्यवहार कसा असावा ,कसा असू शकतो याची दिशा सत्यशोधक जवळकर शहीद भगतसिंग आणि रामास्वामी नायकर पेरियार यांच्या विचार आणि कृतीमध्ये शोधता येईल का ? हा जरतरचा ऐतिहासिक उत्सुकतेपुरता खेळ नाही. त्याचा आजच्या विचार व्यवहाराशी थेट संबंध आहे. जात पुरुषसत्ता नष्ट करण्याच्या दिशेने जाणाऱ्या सत्यशोधक-जातीअंतक समाजवादी मार्गाच्या शोधात आपण आहोत . याबाबत दार्शनिक पातळीवरचे अत्यंत मूलगामी योगदान अर्थातच कॉ. शरद् पाटील यांनी दिले. शेतकरी कामगारांचे जात्यंतक आणि वर्गान्तक जातीवर्गलढे उभे करण्याच्या सत्यशोधक मार्क्सवादी भूमिकेचे पूर्वसूरी ठरतील अशा कृतीशील विचारवंतापैकी काहींचा इथे आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे. .हे विचारवंत बोल्शेविक क्रांती आणि समाजवादाचा अर्थ आम्हाला अधिक खोलवर आकळलेला आहे हेच एकप्रकारे आपल्या विचार आणि कृती मधून ’अधिकृत ‘ कम्युनिस्टाना ‘ सांगत होते आणि आहेत. त्यामुळे लेखाच्या सुरुवातीला ज्या हैती च्या क्रांतीचा उल्लेख केला त्या जाणिवांचे हे वारसदारच ठरतात.

नचिकेत कुलकर्णी हे जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या सेंटर फॉर पॉलिटिकल स्टडीज मध्ये 'आधुनिक भारतीय राजकीय विचार' या क्षेत्रातील संशोधक विद्यार्थी राहिले आहेत. लोकवाग्मय गृह या प्रकाशन संस्थेतहि ते सक्रिय आहेत.

3 Comments

  1. हरिश Reply

    हा हा ! हा लेख म्हणजे ब्राम्हणद्वेषाचा उत्तम नमुना आहे. टिळक हे केवढे महान स्वातंत्र्यसैनिक होते हे समजून घ्यायचे असल्यास त्यांच्यावरिल राजद्रोहाच्या खटल्यांचे वाचन करा. ज्यासाठी त्यांना मंडालेला कैदेत पाठवले गेले. केवळ ब्राम्हण असल्याने त्यांच्यावर टिका करणे म्हणजे बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण आहे. लेखात लेखकाने टिळकांचे महत्व कमी करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे, त्यावरून लेखकाची किव कराविशी वाटते. टिळक हे शेवटपर्यंत भारताच्या हितासाठी, स्वातंत्र्यासाठी लढले. इतरांसारखी ते ब्रिटिशांकडे धर्म व जातिसाठी आरक्षित मतदारसंघ, व आरक्षण मागत फिरत नव्हते. कारण टिळकांना माहित होते की धर्म आणि जातीवर आरक्षण, ब्रिटिश हे लोकांवरील प्रेमापोटी देत नव्हते तर त्यामागे ‘फोडा व राज्य करा’ हि निती होती.

    • सिद्धांत Reply

      ज्या काळात बाळ गंगाधर टिळक तुम्ही म्हणता त्याप्रमाणे देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत होते त्याच वेळी देशातील सहा कोटी जनता सामान्य नागरी अधिकार, मूलभूत हक्क, माणुसकीचे जीवन यापासुन हजारो वर्षापासुन वंचित होते याची तुमच्या भटमान्य टिळकांना ‘लाज’ वाटत नव्हती यातच सर्व काही आले.

  2. प्रमोद देव Reply

    फारच विनोदी लेख आहे…. रशियन क्रांती वगैरे म्हणजे शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रकार आहे. जी व्यवस्था तिथेही टिकली नाही ती, इथे आली नाही म्हणून उगाचंच अरूण्यरूदन सुरु आहे…आणि भट-ब्राह्मण वगैरेंना झोडपण्यातच ह्या सगळ्यांना आसुरी आनंद मिळतोय…ह्या सर्व इतिहासात कुठेही मुसलमान नेते, धर्म ह्याबद्दल एकही अक्षर लिहिलं गेलेलं नाहीये हेही समजून घेण्यासारखे आहे…

Write A Comment