fbpx
विशेष

फ्रान्सिस फुकुयामाचे फुलबाजे

शीतयुद्ध संपायच्या आसपास, ‘साम्यवादाचा पाडाव म्हणजे भांडवलशाही, खुला व्यापार आणि उदार लोकशाही राजकीय व्यवस्था यांना आव्हान देणाऱ्या वैचारिक व्यवस्थेचा पाडाव, फासिझमचा पाडाव तर दुसऱ्या महायुद्धातच झालेला, तेव्हा हा विचारसरणीच्या संघर्षाच्या ‘इतिहासाचा अंत’ आहे’ अशी जोरकस मांडणी करून प्रसिद्ध झालेला विचारवंत फ्रान्सिस फुकुयामा एका अर्थाने नव्वदीच्या उत्फुल्ल नव-उदार भांडवली व्यवस्थेचे मनोगत व्यक्त करत होता. ह्या व्यवस्थेचे मनोगत व्यक्त करणारे दुसरे प्रसिद्ध नाव सम्युएल हंटिंग्टन. त्याच्या ‘संस्कृतींचा संघर्ष’ ह्या ‘इतिहास म्हणजे अखंडित धर्मयुद्ध’ अश्या नजरेने पाहणाऱ्या मांडणीतून नव्वदीचा उत्फुल्ल जोश आणि उत्साह (मुख्यत्वे पाश्चिमात्य जगातला, पण त्याचे प्रक्षेपण आणि ग्रहण जगभरात आक्रमकपणे होऊ लागले होते) हे किती भयग्रस्त होते याचे दर्शन घडवणारे होते. असो. फुकुयामाने नुकत्याच लिहिलेल्या ‘अस्मितेच्या राजकारणाचा विरोध’ ह्या लेखाची आणि सप्टेंबर अखेरीला प्रसिद्ध होणाऱ्या त्यांच्या याच विषयावरील पुस्तकाची चर्चा होत आहे. ट्रम्प यांचा अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय, ब्रेक्झिट, युरोपात जोमाने वाढणारे नव-नाझी पक्ष, जगभरात उजव्या आणि हुकुमशाही शक्तींचा वाढता प्रभाव ह्या पार्श्वभूमीवर ‘नव्वदीच्या उत्फुल्ल नव-उदार भांडवली व्यवस्थेच्या कल्पवृक्षाला ही भयावह विषारी फळे कशी लागली’ हा खरे तर फुकुयामा आणि त्याचा नव-उदारमतवाद/ नव-परंपरावाद (neo-liberalism/ neo-conservatism) यांनी आत्मपरीक्षणाची निकड म्हणून बघितला पाहिजे. तसे न करता ‘साप साप म्हणून भुई धोपटणे’ हा उदारमतवादाचा लाडका खेळ वेगळ्या तऱ्हेने त्यानी सुरु ठेवला आहे. या खेळाचे प्रेक्षक, ग्राहक, आणि विक्रेते जगभर आहेत. तेव्हा ह्या सगळ्याची झडती सर्वच चर्चाविश्वांत गरजेची आहे.

सर्वप्रथम फुकुयामा इतिहासाची एकरेषीय मांडणी करण्याचा वारंवार प्रयत्न करतो आणि त्याचा आधार हा ‘स्पिरीट’/ आदर्शवादात शोधतो हे नमूद करणे महत्वाचे आहे. अशी एकरेषीय मांडणी हा एकंदर युरोपीय आधुनिकतेचाच व्यवच्छेदक भाग आहे हे लोकप्रिय गृहीतक मात्र चुकीचे आहे. भांडवलशाहीला समांतर असा विकसित होत गेलेला युरोपीय उदारमतवादी विचार आणि त्याचे विचारविश्वातील वर्चस्व हे अनेकदा ‘मानवी स्वातंत्र्य हे मूलभूत ‘स्पिरीट’ आणि त्याचा क्रमाक्रमाने होत राहिलेला विस्तार’ अश्या आदर्शवादी रीतीने इतिहासाकडे पाहते. मात्र त्याला आव्हान देणारी मार्क्सवादी विश्लेषणपद्धती द्वंद्वात्म भौतिकवादी दृष्टीने ‘इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास’ अश्या तऱ्हेने पाहते. त्यात ‘स्पिरीट’ चे शेपूट नाही की ‘वर्गविहीन समाज पृथ्वीवर अवतरेलच’ असली भाबडी स्वप्नाळू समजूतही नाही. आधुनिकता म्हणजे युरोपकेंद्रीता म्हणजे साम्राज्यवाद- वर्चस्ववाद इ.इ. सोपे हिशोब सरसकट मांडणारया लोकांना ही पद्धत म्हणूनच अडचणीची वाटते.

इतिहासाचे ‘ग्रेन्ड नरेटिव्ह’- विराट कथ्य हे द्वंद्वात्म संघर्षाचा परिणाम आहे, अशी हेगेलप्रणीत मांडणी फुकुयामा अनुसरु पाहतो. पण त्याचा भर ‘एन्ड ऑफ हिस्टरी’ च्या वेळी मुक्त भांडवल, व्यापार ह्याचा सर्वदूर पसारा कसा आहे ह्या ‘विराट कथ्य’ याचे विस्तृत वर्णन आणि आता त्या कथ्यात उपटलेल्या अति-उजव्या चळवळीची कारणे म्हणून लोकप्रिय/ पॉप शैलीत मानसशास्त्रीय कल्पना, पौर्वात्य/ पाश्चिमात्य प्राचीन तत्वज्ञान यांची उचल, आणि सरमिसळ करणे ह्यावरच आहे. त्यातला द्वंद्वात्म संघर्षाचा भाग फुकुयामाच्या मांडणीला वर्ज्य आहे. ‘जे अस्तित्वात आहे तेच तर्कशुद्ध आहे’ अश्या प्रस्थापित व्यवस्थेला तात्त्विकदृष्ट्या न्य्याय आणि तर्कशुद्ध ठरवण्याच्या ‘उजव्या हेगेलियन’ खेळाचे फुकुयामा हे अनुयायी आहेत. ‘एन्ड ऑफ हिस्टरी’ ते आजवर त्याचा प्रवास प्रस्थापितांचे प्रस्थापितत्व का आहे याचेही विश्लेषण न करता त्यांच्या शक्तीचे केवळ वर्णन आणि समर्थन असाच राहिला आहे. एका अर्थाने तो ‘प्रस्थापितांचा शाहीर’च म्हटला पाहिजे. या खेळाचाच नवा अविष्कार म्हणजे फुकुयामाची अस्मितेबद्दलची मांडणी आहे.

फुकुयामा म्हणतो “२००७-०८ च्या आर्थिक अरिष्टाचा परिणाम म्हणून अति-उजव्या शक्तींची वाढ झाली, आणि हुकुमशाही सत्ता बळकट होत गेल्या हे पुरेसे समाधानकारक कारण नाही. अस्मितेच्या राजकारणात ह्या घडामोडींची मुळे आहेत’. निःपक्षपातीपण सिद्ध करण्याची खास लिबरल खोड म्हणून म्हणा किंवा स्वतःचा कन्झर्वेटिव्ह अजेंडा अधिक हुशारीने पुढे रेटण्याची निकड म्हणून म्हणा; फुकुयामा डाव्या आणि उजव्या अश्या दोन्ही बाजू अस्मितेच्या राजकारणाला जबाबदार कशा आहेत हे मांडतो- ’२० व्या शतकात डावे आणि उजवे हे स्थूलमानाने आर्थिक मुद्द्यांवर राजकारण सिद्ध करत होते. डाव्या राजकारणाचा पाया ट्रेड युनियन, समाजकल्याण कार्यक्रम, संपत्तीचे पुनर्वितरण ह्यात होता. तर उजव्यांचे राजकारण हे सरकारचा उद्योगांतील हस्तक्षेप कमी करणे, आर्थिक तूट कमी राखणे इ. गोष्टींवर केंद्रित होते. आज मात्र दोन्ही बाजू फक्त अस्मितेचे राजकारण करताना दिसतात. डाव्यांचा भर विविध वांशिक अल्पसंख्य, स्थलांतरित, निर्वासित, स्त्रिया, एलजीबीटी यांच्यावर आहे तर उजवे बहुसंख्याक राजकारण आणि राष्ट्रवाद, वंश, धर्म इ. वर भर देतात’. मग अस्मितेचे राजकारण हे सर्वव्यापी कसे आणि का बनले आहे ह्यासाठी वर उल्लेख केल्याप्रमाणे प्लेटोच्या ‘थायमोस’[1] ह्या कल्पनेची ओढाताण करत ‘लोकशाही म्हणजे अस्मितेच्या वर्चस्ववादी प्रेरणेवर अस्मितेच्या समतामूलक रूपाने मिळवलेला विजय- ह्यात अमेरिकन गुलामी आणि त्यासाठीचे गृह युद्ध, कामगारांचा लढा आणि त्यांना मिळालेले अधिकार, स्त्री मुक्ती हे सगळेच आले’ असा आदर्शवादी डोलारा फुकुयामाने मांडला आहे. यातले त्यांचे राजकारण स्पष्ट आहे. ‘शोषित असोत की बहुसंख्याक; हे सगळे करतात ते केवळ अस्मितेचे राजकारण- त्यात गट, समूह आणि त्यांचा ‘कल्पित’ अपमान/ शोषण यांचा विचार प्रधान ठरतो आणि ‘व्यक्ती’ ह्या एककाला असलेले स्थान संपत जाते’ असा अगदी काटेकोर व्यक्तिवादी, स्वातंत्य्रवादी आव आणत आणि सगळ्याना ‘हमाम में सब नंगे है’ असे म्हणत शोषितांचा संघर्ष आणि त्याचा नैतिक अधिकार अमान्य करणे हेच त्यांचे उद्दिष्ट आहे. ‘न्यू योर्कर’ या प्रतिष्ठित नियतकालिकाने त्याबद्दल फुकुयामा यांच्यावर चांगलीच टीका केली आहे- ‘पुतीन, आणि ब्लॅक लाईव्हज मॅटर, यांना एकाच चौकटीत बसवणे आणि त्याउप्पर, दोघांनाही मार्टिन ल्युथरशी जोडणे हा कल्पनाशक्तीचा अतिरेक आहे. ‘ग्रेट बुक’ होण्याच्या क्लुप्तीचे हे उत्तम उदाहरण आहे- इतिहास म्हणजे जणू काही कागदी बाहुल्यांचा क्रम असा फुकुयामाचा उपक्रम आहे’

‘थायमोस’ वगैरे भंपकपणाचाही न्यूयोर्कर ने समाचार घेतला आहे ‘मानसिक अवस्था- डिप्रेशन असो की राग, थकवा, लालसा- हे सगळे मेंदूमधल्या रासायनिक पातळीवर अवलंबून आहे. फुकुयामाची ‘प्रतिष्ठेची अपेक्षा ठेवणारी थायमोस’ ही ‘मूलभूत मानवी स्वभाव’ आहे असला बचाव म्हणजे छाछूगिरी आहे. त्याला हा बचाव करावा लागतो कारण पुतीनच्या उदयाला कारणीभूत ठरलेली परिस्थिती आणि एखाद्या स्त्रीने लिंग-भेदभाव आणि पुरुषसत्ता यांमुळे माझ्या अंगभूत गुणाना वाव मिळत नाही अशी तक्रार करणे यांना एकाच तराजूने मोजणे यातून शक्य होते. ती स्त्री आणि रशियन लोक ह्या दोघांनाही जणू काही सेरोटोनीन हे रसायन तेवढे आवश्यक आहे असा फुकुयामाचा अविर्भाव आहे’

१९६० च्या दशकात मार्टिन ल्युथर किंग यांची आफ्रिकन अमेरिकन लोकांच्या नागरी हक्कांसाठीची चळवळ, स्त्री मुक्ती चळवळ यांनी समातामूलक समाज आणि कायदे यासाठीचे लढे तीव्र केले. त्यांना कमी-अधिक यश मिळत गेले. पण शोषण आणि असमानतेचे अनेक प्रश्न कायम राहिले. ब्लॅक पँथर इ. नी मग स्वतंत्र निग्रो अस्मिता, इतिहास आणि त्याचा सन्मान यावर भर दिला. हा ‘बहुसांस्कृतिकवाद’ हळूहळू डाव्या- पुरोगामी पक्षांनी, चळवळीनी आपलासा केला. ह्यात भर ‘समान नागरी हक्क’ यावर नसून ‘अस्मिता आणि तिचा सन्मान’ यावर होता; ह्यावर फुकुयामाचा खास आक्षेप आहे. कल्याणकारी राज्याचे महायुद्धोत्तर मॉडेल संकटात सापडले आणि पश्चिमेतल्या सोशल डेमोक्रॅटिक पक्षांची कोंडी होत गेली. त्यावर सोपा उपाय म्हणून त्यांनी ‘बहुसांस्कृतिकवाद’ हा उपाय निवडला आणि त्यावर ‘प्रतिक्रिया म्हणून उजव्यानी राष्ट्र, वंश, भाषा, रंग, इ. अनेक आधारावर बहुसंख्याक अस्मितेचे राजकारण सुरु केले’ असा फुकुयामाचा सोयीस्कर पण उफराटा इतिहासक्रम आहे. आता १९-२० व्या शतकातले कू क्लक्स कलन (KKK), १९३० च्या दशकात युरोपात उदयाला आलेला फासिझम, इतकेच काय साम्राज्यवादाच्या संपूर्ण इतिहासातला पायाभूत असा वर्ण-वंशद्वेष याची उत्पत्ती ही देखील ‘बहुसांस्कृतिकवाद’ यावरची प्रतिक्रियाच समजायची का? शोषण आणि त्याचे ऐतिहासिक रूप, राजकारण याचे आकलन केवळ बुद्धिबळाच्या पटावरील प्यादी असेच बाळबोध असणार असेल तर मात्र प्रश्नच नाही. हे बाळबोध आकलन कुणाला सोयीचे आहे हे लक्षात ठेवणे मात्र जरूर आहे.

यापुढे जात फुकुयामा म्हणतो ‘डाव्यांच्या अस्मितेच्या राजकारणामुळे अभिव्यक्तीस्वातंत्र्य धोक्यात आले आहे. पर्यायाने लोकशाहीच धोक्यात आली आहे’. का, तर राजकीय काटेकोरपण (political correctness) आणि त्याचा अतिरेकी आग्रह. ह्या आग्रहाचा परिणाम असा झाला आहे की प्रस्थापित सर्वच राजकारणी तोलून- मापून बोलू पहात आहेत. आणि त्यातून बेताल बोलणारया ट्रम्पसारख्या लोकांचे फावले आहे. कारण अमेरिकेतील एक वर्ग ‘राजकीय काटेकोरपण हा खोटेपणा आहे आणि त्यापेक्षा ट्रम्प परवडला कारण तो अस्सल आहे; उगीच मुखवटा पांघरलेला नाही’ अश्या विचाराने ट्रम्पच्या सगळ्या चुका पोटात घालायला तयार आहे. आणि त्याला डावे जबाबदार आहेत’. म्हणजे अन्यायाविरुद्ध बोलणे म्हणजे अन्यायाला जबाबदार ठरणे असा उफराटा न्याय फुकुयामा करतो आहे.

डाव्यांची प्रस्थापितविरोधाची भाषा, विशेषतः मीडिया आणि राजकीय प्रस्थापित यांचा विरोध, सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेचा पक्षपात इ. बद्दलची भूमिका हे सर्व उजव्यानी आत्मसात केले आहे. हे फुकुयामाचे निरीक्षण बरोबर आहे. पण त्याचा निष्कर्ष ‘अस्मितेच्या खेळाला डावेच जबाबदार आहेत’ हा खोटारडेपणा आहे.

फुकुयामाच्या लेखातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो ‘समान नागरी ओळख’ लोकशाही समाजाने विकसित केली पाहिजे हा. जागतिकीकरणाच्या नंतर स्थलांतरित, निर्वासित यांचे वाढत गेलेले प्रमाण आणि त्यातून निर्माण झालेले प्रश्न याबद्दल ९० च्या दशकात उत्फुल्ल नव-उदार भांडवलाने काहीशी खुली भूमिका घेतली होती. २००१ च्या WTO हल्ल्यानंतर मात्र ‘राज्यसंस्थेने नागरिकांवर सतत पाळत ठेवली पाहिजे’ याला पूर्ण मुभा मिळाली. कायदे उत्तरोत्तर कडक झाले. सीरियन निर्वासित प्रश्न, आयसीस यांच्या पार्श्वभूमीवर तर युरोपात मोठाच पेच निर्माण झाला. मुस्लिम स्थलांतरित, निर्वासित यांचे धार्मिक कायदे आणि आधुनिक युरोपीय कायदे यांच्यातील संघर्ष हा माध्यमे आणि चर्चाविश्वाचा लाडका विषय बनला. हिजाब, स्त्रियांवरील अन्याय, अल्पसंख्य समुदायाचे हक्क, फतवे अश्या वळणाने ही चर्चा बहुसांस्कृतिकवाद विरुद्ध उजवा बहुसंख्याकवाद यात रुपांतरीत झाली. (शाहबानो, रश्दी, बाबरी, असे आपल्याकडचे टप्पे त्याचाच भाग आहेत) फुकुयामा ह्या वादात पूर्णपणे बहुसांस्कृतिकवादविरोधी भूमिका घेतो. ‘राज्यसंस्था आणि सिव्हील सोसायटी यांनी अल्पसंख्य समाजाला बहुसंख्य समाजात मिसळून जायला मदत केली पाहिजे. त्यासाठी लोकशाहीने ‘समान राष्ट्रीय ओळख’ विकसित केली पाहिजे, जिचा पाया भाषा, वर्ण, धर्म असा नसून समान मूल्ये असला पाहिजे. युरोपीय देशांनी आपले नागरिकत्व कायदे बदलून कडक केले पाहिजेत. केवळ जन्म हा पुरेसा नाही तर देशाची भाषा शिकली पाहिजे, इतिहास माहिती हवा, आणि देशावर आणि संविधानातील आदर्शावर निष्ठा ठेवण्याची शपथ घेतली पाहिजे’ असा त्याचा आग्रह आहे. Leitkultur (leading culture) ह्या प्रबोधनमूल्ये मानणाऱ्या सांस्कृतिक ओळखीला नागरिकत्वाचा आधार बनवला पाहिजे, जन्म किंवा वंश नाही- प्रबोधनमूल्ये ही डाव्या- पुरोगामी लोकांनी आपली जबाबदारी आहे हे ओळखले पाहिजे- बहुसांस्कृतिक बनण्याच्या नादात त्याचा विसर पडून चालणार नाही’ असे त्याचे प्रतिपादन आहे. फ्रेंच रिपब्लिकन मूल्ये जपण्याचा आग्रह आज फ्रान्समधील अति-उजवे धरत आहेत हा विरोधाभास आहे. अमेरिकन ‘समान नागरी ओळख’ निर्माण होईल ती सर्वांना सक्तीच्या अश्या ‘राष्ट्रीय सेवेमधून’- मग ती सैन्यासाठी असेल किंवा नागरी कामात असेल- शाळेत शिकवणे, पर्यावरण रक्षणाचे काम इ. मधून. अस्मितेच्या राजकारणाला शह देता येईल तो एक पर्यायी ‘सेक्युलर नागरी समान ओळख’ तयार करून आणि हा अजेंडा जर डावे राबवायला तयार नसतील तर त्यांचे राजकीय भवितव्य धोक्यात आहे असे एकंदर फुकुयामाचे प्रतिपादन आहे. जणू काही ही नागरी समान ओळख हवी तशी झुकवून वापरणे उजव्या शक्तींना शक्य होणार नाही असा भाबडेपणाचा भाग त्यात आहे किंवा मग तो साळसूदपणाच म्हणायला हवा. ‘भारतमाता की जय’, वंदे मातरम, गांधीजींचा चरखा, तिरंगा- ह्या सगळ्या स्वातंत्र्य आंदोलनाच्या ओळखीला संघपरिवाराने बहुसंख्याकांची मक्तेदारी म्हणून कसे वापरले आहे, दलित- मुस्लिम- आदिवासी यांना दुय्यम दर्जाचे आणि कायम संशयित म्हणून कसे वागवले आहे, समान नागरी कायदा आणि मुस्लिम महिलांना अधिकार यसाठी नक्राश्रू हा सगळा इतिहास आपल्यासमोर आहे. युरोप- अमेरिकेतही स्थिती वेगळी नाही. फ्रेंच ‘समान नागरी ओळख’- मार्सेल हे राष्ट्रगीत, राज्यक्रांतीच्या स्वातंत्र्य-समता- बंधुता यांचे प्रतीक असा राष्ट्रध्वज हे सगळे नव-नाझी पक्ष आपली मक्तेदारी म्हणून वापरत आहेत, घेट्टो मधल्या दुय्यम लोकांना मात्र हे स्वातंत्र्य- समता- बंधुता लागू नाही. १७९१ मध्ये फ्रेंच वसाहत हैतीमधील गुलामांच्या उठावाला चिरडायला गेलेल्या फ्रेंच सैन्याला राज्यक्रांतीचा आदर्श आणि वास्तव यांतला हा विरोधाभास लक्षात आला. हैतीचे गुलाम फ्रेंच राज्यक्रांतीचा आदर्श मानत मार्सेल हेच मानवमुक्तीचे क्रांतिगीत गात होते. ते पाहून फ्रेंच सैन्याला गुलामगिरी लादण्यासाठी लढणे कठीण होत गेले. यातला हैतीच्या गुलामांचा लढा गौरवपूर्ण आहेच- पण महत्वाचे आहे ते १७८९ च्या फ्रेंच राज्यक्रांतीनंतर वसाहती आणि गुलामी लादण्यासाठी सैन्य पाठवणे आणि त्या सैन्याने मार्सेल हेच राष्ट्रगीत गात गुलामी लादणे ह्यात  जाकोबिन असोत की नेपोलियन- कुणालाच गैर वाटत नव्हते. वसाहतवाद ते जागतिकीकरण यांचा प्रवास एकीकडे ‘युरोपीय प्रबोधन मूल्ये ही वैश्विक आहेत असे प्रचारत राहायचे आणि त्यांचा वापर गुलामी, ते घेट्टो लादण्यासाठी करायचा’ असाच राहिला आहे. अति-उजवे, फासिस्त प्रवाह केवळ ही मुख्यधारा तिच्या तार्किक परिणतीला नेत आहेत.

फुकुयामाचा एकंदर नव-उदार/ नव-परंपरावादी इतिहास लक्षात घेतला तर त्याने असे प्रतिपादन करणे यात नवल नाही असेच म्हटले पाहिजे. महत्वाचा भाग असा आहे की त्याला पूरक असे आवाज डाव्या वर्तुळांत आधीच उमटत आहेत. ‘रॉकस्टार मार्क्सिस्ट’ विचारवंत झिझेक याने ‘युरोपीय प्रबोधनमूल्ये जपणे हे प्राथमिक महत्वाचे असे म्हणत हे निर्वासित आणि युरोपियन नागरिक यांच्यात प्रचंड सांस्कृतिक तफावत आहे. त्याविषयी बोलणे हे महत्वाचे आहे- तसे केले तरच युरोप युरोप म्हणून वाचेल’ असे खास अति- उजव्यांचे लाडके ‘इस्लामिक दहशतवादाचे’ भूत उभे केले आहे. त्यावर उतारा म्हणून तो निश्चितच ‘निर्वासितांना स्वीकारले पाहिजे, ‘शेजाऱ्यावर प्रेम करा’ ह्या खास ख्रिश्चन तत्वाने स्वीकारले पाहिजे’ याचा पुरस्कार करतो. पण हा ‘शेजारी’ संपूर्णपणे अपरिचित असल्याचा वारंवार उच्चार त्यांचा ‘स्वीकार’ करण्यास कसा उपयोगी ठरेल हे तो सांगत नाही. आयसीस, असाद यांच्यापासून पळ काढणारे मध्यपूर्वेतील लोक हा रोग नसून रोगाचा दृश्य परिणाम आहे, तेलाच्या हव्यासाने अमेरिकेने मध्यपूर्वेत केलेला हस्तक्षेप, सिरीया प्रश्न हा रशिया- अमेरिका- इराण-टर्की ह्यांच्यातल्या प्रभुत्वसंघर्षाचा परिणाम हे सगळे मान्य करूनही त्यावरचे त्याचे उत्तर हे अखेर अस्मिता आणि मूल्ये ह्यांच्या निसरड्या वाटेने जाणारेच आहे.

सर्वांना सक्तीच्या अश्या ‘राष्ट्रीय सेवे’चा मोह फ्रेडरिक जेम्सनसारख्या एरवी तर्कशुद्ध मांडणी करणाऱ्या मार्क्सवाद्यालाही पडला. जेम्सन आपल्या ‘अमेरिकन युटोपिया- ड्युअल पॉवर & युनिव्हर्सल आर्मी’ ह्या पुस्तकात जी मांडणी करतो ती मार्क्सच्या भाषेत ‘बराकीचा कम्युनिझम’च आहे. बँकांचे, इन्शुरन्स कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण, तेल उत्खननावर बंदी, बड्या कंपन्यांवर जाचक कर लादणे, सर्वांना किमान उत्पन्न, मिडियावर नियंत्रण, उजव्या प्रपोगंडावर बंदी, सर्वत्र Wi-Fi, कॉलेज फी माफ, आरोग्यसेवा मोफत इ.इ. नेहमीच्या डाव्या धोरणांमध्ये नवीन फार काही नाही. गोम आहे ती हे सगळे कसे शक्य होणार- तर प्रत्येक अमेरिकन नागरिक सैन्यात भरती झाल्याने. त्यातून कडक शिस्तीने रस्ते, उद्योग, यांची बांधणी शक्य होईल. शिवाय सैन्य हेच सरकारी खर्चकपातीच्या नव-उदार धोरणातून बचावलेले असल्याने सगळेच जर सैन्यात दाखल झाले तर सगळेच एका अर्थी सरकारचे नोकर; म्हणजे समाजवाद आपोआप अवतरेल असला काही तरी अफाट प्रकल्प जेम्सन याने रंगवला आहे. युद्धखोरी, वर्चस्ववाद, राष्ट्रवाद, वंशवाद यांचा जो दृढ संबंध आहे तो तुटायला, क्रांतिप्रवण परिस्थिती, आणि पेचप्रसंग याची गरज असते. (रशियन क्रांतीच्या वेळी ‘जमीन, ब्रेड, आणि शांतता’, ही बोल्शेविक घोषणा यशस्वी झाली हे खरे पण त्याची पुनरावृत्ती इतर युरोपीय राष्ट्रांत झाली नाही. युद्धातून पळ काढणारे सैनिक आणि भुकेने मरणारे कामगार, विपन्नावस्थेत पोचलेले शेतकरी यांच्या संयुक्त आघाडीचा तो एकाकी प्रसंग ठरला). आक्रमक राष्ट्रवाद आणि सैन्य-उद्योग यांचे नफेखोरीसाठी युद्धे लादणे याविरुद्ध असलेल्या आजवरच्या डाव्या भूमिकेला खालून वरपर्यंत बदलून टाकण्याचा हा प्रकल्प विचारवंती स्वप्नरंजनच राहिले असते तरी ठीक होते. पण त्यात भर पडली आहे ती  ‘श्वेतवर्णीय कामगार वर्ग’ ह्या नव्या कथानकाची. नव-उदार भांडवली धोरणांना विरोध म्हणून ट्रम्प आणि ब्रेक्झिट; यामुळे प्रस्थापित आर्थिक भांडवलाला चपराक बसेल असे स्वप्नरंजन बऱ्याच डाव्यांकडून केले जात आहे- ह्या ‘भांडवलाच्यामुळे उद्योगांचे आउटसोर्सिंग झाले, त्यामुळे विकसित जगातील कामगारांच्या नोकऱ्या गेल्या, परंपरागत डावे पक्ष युनियनच्या मूळ धोरणांना तिलांजली देत, बहुसांस्कृतिकवादाच्या कह्यात गेले आणि अल्पसंख्य लोकांचे लांगूलचालन करू लागले; ह्या सगळ्याबद्दल राग म्हणून अति- उजव्या पक्ष- धोरणांना लोकांनी स्वीकारले तेव्हा ‘श्वेतवर्णीय कामगार वर्ग’ हा महत्वाचा आहे, त्याला आपण धोरणाच्या केंद्रस्थानी आणले पाहिजे’ वगैरे वगैरे. खरे तर डाव्यांच्या ऐतिहासिक स्मृतिभ्रंशाचे हे उदाहरण म्हणता येईल. भांडवलशाहीचा अर्थ केवळ मुक्त व्यापार असा नाही. ती केवळ एक अवस्था आहे, होती. १९व्या शतकातल्या इंग्लंडच्या मुक्त व्यापाराला शह दिला तो अमेरिका, जर्मनी इ. उदयोन्मुख सत्तांनी आणि तो आयात कर लादून. मुक्त व्यापार की संरक्षित व्यापार; ह्या दोन्ही भांडवलशाहीच्याच अवस्था होत्या. विशिष्ट परिस्थितीला अनुरूप म्हणून तत्कालीन राष्ट्रीय भांडवलदार वर्गाने घेतलेली ती भूमिका होती. जागतिकीकरणाच्या गेल्या ३०-४० वर्षांच्या प्रवासाचे चक्र पुन्हा व्यापार संरक्षण धोरण राबवून उलटे फिरवता येईल हा ट्रम्प आणि अति-उजव्यांचा हिशोब आहे त्यात मुख्य भाग ‘श्वेतवर्णीय कामगार वर्ग’ विरुद्ध ‘उपरे’ आणि ‘परदेशी चोर’ अशी विभागणी करून आपले राजकारण बळकट करण्याचा आहे. आणि आज जागतिक भांडवल त्याला जो विरोध करते त्यात फक्त ‘स्थलांतरित कुशल कामगार’ तेवढे सुरक्षित ठेवायचा भाग आहे. उत्पन्न कर कमी करणे, खासगी उद्योगाला उत्पादन, इन्फ्रास्ट्रक्चर, मोटारी यात प्रोत्साहन, परकीय भांडवल ह्या सगळ्यातून किती ‘श्वेतवर्णीय कामगार वर्ग’ आपल्या नोकऱ्या परत मिळवेल हा प्रश्नच आहे कारण ऑटोमेशन आणि आर्टीफिशियल इंटेलिजन्स यांच्या समोर मानवी श्रम हळूहळू हद्दपार होत जाणार आहेत. आणि हा कामगार वर्ग मुख्यत्वे मध्यमवयीन असल्याने त्याला अपेक्षित वेतन हे भांडवलाला परवडणारे नाही. हा सगळा वस्तुनिष्ठ विश्लेषणाचा भाग बाजूला ठेवून बहुसंख्याकांच्या लांगुलचालनाचा रस्ताच निवडायचा- म्हणजे आर्थिक आणि सामाजिक या दोन्ही धोरणाचा अति उजवा चेहरा स्वीकारायला तयारी दाखवायची. विकसित देशांत असलेल्या असंघटित कामगारांचे जर विश्लेषण केले तर त्यात स्थलांतरित आणि निर्वासित बहुसंख्येने आहेत. त्यांच्याशी असलेल्या वर्गीय एकतेचा ब्रेक्झीटचा आंधळा पुरस्कार करणाऱ्या डाव्यांना पडला आहे अशी आज परिस्थिती आहे. ‘part of no part’ हे जे कामगारवर्गाचे वर्णन आहे त्यात खऱ्या अर्थाने स्थलांतरित आणि निर्वासित कामगारच आहेत- पराकोटीच्या आर्थिक आणि सामाजिक अशा दुहेरी शोषक हल्ल्यांना त्यांना तोंड द्यावे लागत आहे. आणि त्यांना आजवर साथ देणारे डावे आता हुरळून वर्ण-वंशवादी राजकारणाच्या लांडग्यांच्या मागे लागले आहेत.  डाव्यांची ही तऱ्हा तर ९०च्या नव-उदार सोशल डेमोक्रॅटसची दुसरीच तऱ्हा- फुकुयामा त्यांच्या बहुसांस्कृतिकवादावर जी टीका करतो ती काही अंशी रास्त आहेच पण त्याच्यात आणखी भर पडली आहे ती फासिझमच्या बागुलबुव्याची. अति-उजव्या शक्तींचा जोर वाढत आहे तर स्वतःचा नव-उदार धोरणाचा रस्ता चुकला असे कबूल करून नवे समाजवादी धोरण काय असेल याची चर्चा राहिली बाजूला- केवळ ‘फासिझम, फासिझम’ असे ओरडून सगळ्यांनी संयुक्त आघाडी करावी एवढेच त्यांचे राजकारण राहिले आहे.

एकुणात ‘साप साप म्हणून भुई धोपटणे’ हा उदारमतवादाचा लाडका खेळ फुकुयामा आणि नव-परम्परावादी, युरोपीय डावे, आणि सोशल डेमोक्रॅट्स आपापल्या तऱ्हेने आणि परीने खेळत आहेत. पण समकालीन अति-उजव्या फँटसीमध्ये ‘राष्ट्रीय पुनरुत्थान/ संस्कृतीरक्षण’ आणि ‘नव-उदार ग्राहकवाद’ हे दोन्ही सामील आहेत हे ओळखून त्यांना छेद कसा देता येईल हा खरा क्रांतिकारी सवाल आहे. ह्या फँटसीचा लाभ मिळणारा वर्ग कुठला हा सवाल विचारत आंतरराष्ट्रीय कामगार वर्ग आणि त्याची वर्गजूट कशी सांभाळता येईल हा खरा चिंतनाचा विषय आहे. ‘वर्ग’ ही अस्मिता/ ओळख हीच एका अर्थी ‘समान नागरी ओळख’ आहे आणि तिला आंदोलने आणि लढयातूनच बळकट करता येईल हेही लक्षात ठेवले पाहिजे; उगीच राष्ट्रीय अस्मितेचे नवनवे चकवे लावून घेण्यात काही हशील नाही.

 

[1] सॉक्रेटीसने थायमोस चा संबंध लहान मुले आणि कुत्री यांच्याशी जोडला होता- ‘अकारण भावनिक स्फोट’ अश्या अर्थाने- हेही लक्षात घेण्यासारखे आहे

2

लेखक दिल्लीस्थित अभ्यासक संशोधक आहेत.

Write A Comment