fbpx
सामाजिक

अब्राह्मणी स्त्रीवाद

अलीकडे सोशल मीडीयावर व्यक्तिगत शेरेबाजीतून भांडणे व त्या भांडणाला वादाचे स्वरुप देण्याचे अनेक प्रकार घडत आहेत. हे ज्या प्रकारचे वाद-विवाद सुरू असतात ते काही प्रमाणात चिंताजनक आहे. शेरेबाजी करणे, टिंगळटवाळी करणे, स्वयंघोषित अभ्यासक, विचारवंत असण्याचा दावा करणे असे प्रकार या माध्यमांवर सातत्याने सुरू असतात. गळ्यात मंगळसूत्र घालू नका, असं सावित्रीबाई म्हणाल्या होत्या, बाबासहेब – फुले असे म्हणाले होते , वगैरे बिनदिक्कतपणे लिहिणे. कोणत्याही वादाची पार्श्वभूमी, खोली इ. माहित नसताना त्यात अगांतुकपणे शिरकाव करत विचारवंताचा आव आणणे इ. प्रकार सर्रास होताना दिसतात. काही महाभाग आपली `विद्वत्ता’ दाखविण्यासाठी एका ग्रूपवर सुरू असलेल्या चर्चेत अमुक माणूस कसा चुकीची मते मांडत होता आणि मी त्याला अस्सं खोडलं…अशा अविर्भावात लिहित असतात. तेही तद्दन खोटे. एकाने असाच प्रकार करताना तो अमुक म्हणतो कृष्णा केळुसकर हे मराठा होते असं म्हंटल वेड्याने…अस लिहिलं होत. केळुस्करांनी आत्मनिवेदनातच मला ब्राह्मण स्त्रिया कृष्ण्या.. म्हणत, कारण मी कुणबी – मराठा होतो असे लिहिले असल्याची आठवण करून द्यावी लागते. पण हे असे कितीदा, किती दिवस करायचे? फेसबूक किंवा इतर सोशल मिडियाला वैचारिक वर्तुळात फारसे गांभीर्याने घेतले जात नसले तरी त्यावर व्यक्त होणाऱ्या प्रगतीशील म्हणविणाऱ्यांनी व्यक्त होण्यापूर्वी तरी नीट माहिती घ्यावला हवी. विषय योग्य पद्धतीने समजून घ्यायला हवा.
सध्या स्त्रीमुक्ती, स्त्रीप्रश्नावरही अत्यंत संवेदनाहिनपणे, शेरेबाजीने, जात्याभिमानाने किंवा जाती अहंगड किंवा न्यूनगंडाने चर्चा केली जातान दिसत आहे. पूर्वी ब्राह्मणी स्त्रीमुक्ती चळवळीतील काहींनी वापरलेली `ते’ आणि `आम्ही’ ही विभागणी विपरित पध्दतीने आत्मसात करून वापरली जाताना दिसत आहे. समाजशास्त्रीय विश्लेषण, पध्दतीशास्त्र याच्याशी जणू उभा दावा मांडला जात आहे. जिजामाता चारित्र्यहनन प्रकरण, शनीमंदीर प्रवेश आंदोलन आदींमध्ये शेलकी विशेषणे वापरली गेली. पण समाजशास्त्रीय विश्लेषणाकडे पाठ फिरवली गेली. चर्चेची तयारी नाही तर आमचे तेच खरे असा आविर्भाव त्यात होता. कोण कोणती भाषा केव्हा वापरते आणि का वापरते यामागेही एक राजकारण असतेच. उथळ शेरेबाजी समाज परिवर्तनासाठी उपयोगी नसते. त्यातुन कोणाला तरी सुनावलं याचं तात्पुरत समाधान मिळू शकतं इतकचं. म्हणून पुन्हा जातीस्त्रीदास्यांतक चळवळीचे प्रबोधन गतिमान करण्याच्या हेतूने अब्राह्मणी स्त्रीवादी मांडणीची गरज वाटते. म्हणून त्या विषयी-
अब्राह्मणी स्त्रीवादाच्या मांडणीचे श्रेय मार्क्सवाद-फुले-आंबेडकरवाद या सापेक्षतः नव्या तत्वज्ञानाला जाते. ज्याची मांडणी कॉ. शरद् पाटील यांनी केली आहे. या स्त्रीवादाची मांडणी मुख्यत ८० च्या दशकापासून सुरु झाली. १९७५ सालात उभ्या राहिलेल्या स्त्री चळवळीला विधायक नकार देत अब्राह्मणी स्त्रीवादाची मांडणी केली गेली. अब्राह्मणी स्त्रीवाद हा स्त्रीमुक्ती चळवळीस अधिक शास्त्रीय पाया उपलब्ध करुन देतो. ब्राह्मणी-अब्राह्मणी ह्या समाजशास्त्रीय कोटीक्रमाचा (कॅटेगरी) वापर यात केला गेला. ब्राह्मणी या संकल्पनेचा अर्थ स्थूलमानाने जातीवर्गस्त्रीदास्याचे समर्थन करणारा प्रवाह तर अब्राह्मणी म्हणजे जातीवर्गस्त्रीदास्यांतक विचार प्रवाह होय. भारतासारख्या देशात शोषण-शासनाची प्रमुख संस्था म्हणून जातीव्यवस्था आहे. रामायण-महाभारत काळात उदयाला आलेली पुरुषसत्ता, बुध्दोत्तर काळात उदयाला आलेली जातीव्यवस्था आणि ब्रिटिश आगमनानंतर उदयाला आलेली वर्गव्यवस्था यांच्या एकत्रित गुंफण व गुंतागुंत यातून शोषण होते, ही महत्वपूर्ण मांडणी अब्राह्मणी स्त्रीवाद करतो. स्त्री चळवळ, स्त्रीमुक्ती चळवळ, दलित स्त्रीमुक्तीवाद, दलित-बहुजन स्त्रीमुक्तीवाद ते अब्राह्मणी स्त्रीवाद असा स्त्रीचळवळीचा प्रवास झालेला आहे. स्त्रीमुक्ती चळवळ गतीमान करताना तात्विक मांडणीला महत्व असते. १९७५ नंतर उदयाला आलेल्या स्त्री चळवळीने स्त्रीवादाचा स्वीकार करत समस्त स्त्रिया एकसारख्या शोषित असतात, असे मांडून पाश्चात्य स्त्रीवादाचे अनुकरण केले. पुरुषप्रधानतेविरुध्द लढा दिला. परंतु ही चळवळ अल्पावधीतच कोंडीत सापडली. कारण भारतासारख्या देशातील शोषण व्यवस्थांचे समग्र भान त्यात नव्हते. स्त्रियांना संघटित करताना स्त्रिया या जाती-वर्गात विभागल्या गेल्या आहेत, हे वास्तव लक्षात घेतले गेले नाही. येथील पुरुषसत्ता व जातीव्यवस्था यांचा सहसंबंध लक्षात न घेणे, स्वायत्ततेचा अत्याग्रह धरणे, यातून स्त्रीचळवळीची कोंडी झाली. विशिष्ट तत्वज्ञान व राजकीय पक्षाशी बांधिलकी मानणे म्हणजे ’शेपूटवादी’ अशी टिका स्त्रीवाद्यांनी केलेली होती. परिणामी कष्टकरी स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फोडणारी मार्क्सवादी छावणी या स्त्रीचळवळी पासून दूर राहिली. स्त्रीचळवळीने घेतलेल्या भूमिका, मांडणी, नव्या संकल्पना उदा कौटुंबिक हिंसाचार, पितृसत्ता, भगिनीभाव, प्रतिके-प्रतिमांच्या चळवळी, पुनर्वसन केंद्रे इ. यांच्या चिकित्सेची गरज अब्राह्मणी स्त्रीवादाला वाटते.
वर्गवादी स्त्रीचळवळ ही एकारलेली राहिली. मार्क्सवादाची तात्विक चौकट स्वीकारत भारतातील स्त्रियांच्या प्रश्नांची मांडणी त्यांनी केली. कष्टकरी स्त्रियांना संघटित करताना त्यांच्या जात-शोषणाकडे दुर्लक्ष केले गेले. खाजगी मालकी, कुटुंब संस्था ह्या संकल्पनांच्या आधारे स्त्रीप्रश्न मांडला गेला. पण जातीव्यवस्थेच्या भौतिक शोषणकडे मात्र दुर्लक्ष केले. परिणामी स्त्री-अत्याचराचे प्रश्न हाती घेणे या मर्यादेतच कार्य राहिले.
स्त्रीवाद, दलित स्त्रीवाद, दलित-बहुजन स्त्रीवाद, दलित भूमिदृष्टी या प्रवाहांनाही तात्विक व व्यवहारिक मर्यादा आहेत. ’स्त्रीवादा’तून स्त्रियांच्या शोषणाची एकमेव संस्था म्हणून पितृसत्तेचा विचार केला गेला. स्त्री या कोटीक्रमात जातीतील सर्वहारा स्त्रियांना गृहित धरण्यात आले. मुख्यत शहरी मध्यमवर्गीय स्त्रियांच्या प्रश्नांवरच आंदोलने व भूमिका घेतल्या गेल्या.
या भूमिकेला विधायक नकार देत दलित स्त्रीवाद ९० च्या दशकात उभा राहिला. त्याला जागतिकीकरणाची पार्श्वभूमी होती. दलित स्त्री-संघटना स्वतंत्रपणे कार्यरत झाल्या. परंतु प्रक्रीया ही चळवळीच्या रेट्यातून निर्माण झाली नव्हती. जागतिकरण, उदारीकरण, खाजगीकरणाच्या रेट्यातून (विशेषत एनजीओकरणाच्या लाटेतून) झाली. जागतिकीकरणाच्या सुरवातीच्या काळात दलित महिला संघटनांना परकीय पैसा मोठ्या प्रमाणावर मिळाला. दलित स्त्री या घटकासाठी मोठ्या प्रमाणावर फंडिंग आले आणि दलित स्त्रियांच्या वेगळ्या दुखःची चर्चा सुरु झाली. दलित स्त्रीवादाने एकीकडे प्रस्थापित स्त्रीवादाला विधायक नकार दिला तसाच दलित पुरुषसत्तेवरही प्रहार केला. ’दलित’ कोण?, संघटनेचे नेतृत्व कोण करणार? इ. प्रश्न उपस्थित करण्यात आले. जन्माने दलित जातीतील स्त्रिया या संघटनेचे नेतृत्व करतील असे घोषित करण्यात आले. ’दलित’ शब्दाची पारंपारिक अर्थचौकट स्वीकारली गेली. परिणामी त्यात मुख्यत शहरी मध्यमवर्गीय दलित स्त्रियाच पुढाकारावर राहिल्या. एनजीओंचा अजेंडा बदलला, फंडिंग बदलले की त्या चर्चा व संघटना काही जणींपुरत्याच मर्यादित झाल्या. बौध्देतर दलित, आदिवासी, भटक्याविमुक्त, ओबीसी स्त्रियांना ह्याही प्रवाहाने परिघाबाहेरच ठेवले.
’दलित स्त्री’ या कोटीक्रमात सर्वसमूह श्रेष्ठत्वावर भर राहिला. दलित स्त्रियांकडेच असाधरण क्षमता असल्यामुळे त्या नैसर्गिक दृष्ट्याच त्या जात-पुरुषसत्तेविरुध्द लढू शकतात असे गृहित धरले गेले. दलित स्त्री एकसंध नाही ह्या वास्तवाकडे डोळेझाक करण्यात आली.
दलित स्त्रीवादाच्या मर्यादा, उणीवा बाजूला सारत दलित भूमिदृष्टी हा नवा विचार मांडला गेला. भूमीदृष्टी कशाला म्डणायचे याची सैध्दांतिक मांडणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु या मांडणीत, भूमीदृष्टी सिध्दांत सापेक्षतावादाचा पुरस्कर्ता नाही, दलित स्त्रियांच्या ’अनुभववादात’ आपण अडकून पडत नाही, दलित स्त्री हा कोटीक्रम एकसंध नाही अशा स्पष्टकरणांची जंत्रीच दिसते. शोषणशासनाच्या व्यवस्थांचा पृथकपणे विचार करताच येत नाही. भूमीदृष्टी अवलंबिणे म्हणजे आपल्या पारंपारिक स्त्रीवादी भूमिका नव्याने तपासून पाहणे, काही भूमिका पुसून टाकणे असे समीकरण केले आहे. यात नवे काही नाही. ही मांडणी अब्राह्मणी स्त्रीवादाने अधिक जोरकसपणे केलेली होतीच. ती दोन पातळ्यांवर एक- तत्वज्ञानाच्या, दोन व्यवहाराच्या. दलित भूमिदृष्टी हा प्रवाह काय आहे हे सांगण्यापेक्षा काय नाही ह्यावरच भर देताना दिसतो. ज्ञाननिर्मितीच्या संदर्भातच हा प्रवाह मुख्यत मांडणी करतो हे त्याचे प्रमुख वैशिष्ट्यही आणि महत्तम मर्यादाही!
दलित-बहुजन स्त्रीवादाची मांडणी मुख्यत ओबीसी जातीतील स्त्रियांकडून करण्यात आली. परंतु या मांडणीत सिध्दांत, तत्वज्ञान या पेक्षा अनुभववाद, व्यवहारवादाला अवाजवी महत्व दिले गेले. बहुजन ही काही कॅटेगरी नाही; तो शब्दार्थ आहे. शिवाय त्याचा संसदीय राजकारणात मोठ्याप्रमाणावर वापर झाला आहे. ती समाज विश्लेषणाची कॅटेगरी नाही. बहुजन म्हणजे नेमका कोणता जात-वर्ग? संख्येने जास्त असाही अर्थ क्रांतिकारी राजकारणासाठी उपयुक्त नाही. ’दलित स्त्री’कोटीक्रमाच्या ज्या मर्यादा आहेत त्याच ’दलित-बहुजन’ याच्या आहेत. यात बहुजन जातीतील स्त्रिया एकसंध मानल्या गेल्या आहेत. त्यांच्यातील असाधरण क्षमता आणि श्रेष्ठत्व यावर भर दिला गेला आहे. अशा मांडणीतून ब्राह्मणेतरांमधील पुरुषसत्तेचे, जात भावनेचे समर्थन होण्याचा मोठा धोका संभवतो.
स्त्रीवादी, दलित स्त्रीवादी, दलित भूमिदृष्टी, दलित-बहुजन स्त्रीवादाचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यांनी विशिष्ट मुद्दे अग्रभागी आणण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु त्यात मर्यादाही आहेत. भारतात स्त्री प्रश्नाची जात-पुरुषसत्ता-स्त्रीदास्य यांमुळे झालेली गुंतागुंत समग्रपणे समजून घेउन त्याची सम्यक मांडणी करावी लागेल. सिध्दांत आणि व्यवहार याचे परस्पर नाते असते. सिध्दांतात उणिवा राहिल्या तर त्या व्यवहारातही येतातच. म्हणून स्त्रीमुक्ती चळवळीची कोंडी झाली होती तसेच स्त्रियांना संसदेत आरक्षणाच्या प्रश्नावर उभी फूट पडली, २५ डिसेंबर मनुस्मृती दहनदिन भारतीय स्त्रीमुक्ती दिन ह्या मागणीला पाठिंबा द्यायचा की नाही, ह्यावर उभे तट पडले. या पार्श्वभूमीवर अब्राह्मणी स्त्रीवादाची गरज विशेषत्वाने जाणवते.
अब्राह्मणी स्त्रीवादी प्रवाहाच्या संकल्पनात्मक मांडणीतील तीन महत्वाची सूत्रे येथे स्पष्ट करत आहे.
(१) स्त्री शोषणाचे तिहेरी स्वरुप – भारतात स्त्रियांचे शोषण करणाऱ्या तीन प्रमुख संस्था म्हणजे पुरूषसत्ता, जातीव्यवस्था आणि वर्गव्यवस्था. इतिहासाच्या विशिष्ट कालखंडात या शोषण संस्थांचा उदय झाला. त्याची बहुप्रवाही ऐतिहासिक भौतिकवादाच्या संदर्भात मांडणी कॉ. शरद पाटील यांनी केली आहे. या तिनही संस्था स्त्रियांचे भौतिक शोषण करतात. ह्या तिहेरी बेड्यात स्त्रिया बंदिवान आहेत, असे अब्राह्मणी स्त्रीवाद आधोरेखित करतो. पुरुषसत्ता, जातीव्यवस्था व स्त्रीदास्य ह्या स्वायत्तपणे नाही तर त्यांच्या एकत्रित गुंफणीतून शोषण होते. म्हणूनच स्त्रीमुक्तीच्या लढ्यात यापैकी केवळ एकाच शोषण संस्थेच्या विरोधात लढा करता येत नाही.
(२) पितृसत्ता नव्हे पुरुषसत्ता – पितृसत्ता या संकल्पने विषयी स्त्रीवादाने अत्यंत महत्वपूर्ण मांडणी केली आहे. डॉ. गेल आॅम्वेत यांनी पितृसत्तेविषयी लिहिताना स्त्रीवादी सिद्धांताचे महत्त्व स्पष्ट केले आहे. त्यांच्या मते, ’स्त्रीमुक्ती चळवळीच्या उदयापासून ‘स्त्रीदास्याच्या’ संकल्पनेचा स्वीकार सार्वत्रिक झाला आहे. तरी केवळ स्वीकार हा पुरेसा नाही. स्त्रीमुक्तीने आणि स्त्रीवादी सिद्धांताने अनेक वैशिष्ट्यपूर्ण नवीन भूमिका मांडल्या आहेत. `पितृसत्ता’ ही पुरुषाचे वर्चस्व मानणारी स्वायत्त आणि स्वतंत्र समाजरचना आहे. सर्वमान्य अशी पितृसत्तेची व्याख्या म्हणजे पितृसत्ता, स्त्रियांची लैंगिकता, प्रजनन आणि श्रमशक्तीवर पुरुषांचे टप्प्याटप्प्याने नियंत्रण आणते. पारंपरिक मार्क्सवादी धारणेच्या उलट पितृसत्ता या संकल्पनेत व्यक्त होणारा स्त्री पुरुषांमधील आंतर्विरोध हा वर्गाशी निगडित असला तरी स्वायत्त आहे. पितृसत्ता हा केवळ आर्थिक पायावर उभारलेला सांस्कृतिक इमला नव्हे.
पितृसत्ता हेच केवळ वर्चस्वाचे स्वायत्त वर्गहीन रूप नाही. स्त्रीवाद हा एककारणी नसून बहुकारणी राहिला आहे. शक्तिशाली काळ्या सत्तेच्या आणि नागरी हक्क चळवळीच्या प्रभावाखाली अमेरिकेतील ‘स्त्रीवादी वर्ग, पितृसत्ता आणि वंश’ हे परस्परांवर परिणाम करणारे शोषणाचे घटक आहेत, असे सर्वसाधारणपणे मानले जाते. हा बहुकारणवाद भारतात आजपर्यंतच्या उच्चवर्णीय स्त्रीवादाच्या वर्चस्वामुळे मोठ्या प्रमाणात दुर्लक्षित राहिला. ‘जे खाजगी ते राजकीय’ खाजगी / सार्वजनिक यातील द्वैताला आव्हान. पितृसत्ता, वर्ग आणि शोषणाच्या इतर घटकांचा संयोग होऊ शकेल असा एकात्म सामाजिक सिद्धांत विकसित करण्यात स्त्रीवाद्यांना अजून यश आलेले नाही. पण ते त्यांचे साध्य आहे आणि त्यादृष्टीने त्यांनी महत्त्वाची पावले उचलली आहेत. कोणत्याही परिपूर्ण सिद्धांकनाला ह्या मुद्यांची दखल घेणे आवश्यक आहे’.
परंतु पितृसत्ता या नामाभिधानातून केवळ पित्याची सत्ता असाच आशय आधोरेखित होतो. अब्राह्मणी स्त्रीवाद पुरुषसत्ता ही संकल्पना मांडतो. कारण स्त्रीसत्ताक समाजव्यवस्थेचे विघटन होउन उदयाला येत असलेला समाज मातृवंशक राजर्षिसत्ताक गणसमाज होता. ह्या मातृवंशक समाजात पित्याच्यावंशाततून नव्हे तर मातेच्या वंशातून राजा निवडला जात होता. समाज मातृवंशक असूनही त्यात दासप्रथा उदयाला आली होती. स्त्रिया क्रय्य व वध्य मानल्या जाऊ लागल्या होत्या. हा पुरुषसत्तेच्या उगवतीचा काळ होता. राजा पुरुष असे पण त्याचा जन्म मातृवंशात झालेला असे. महाभारतात कंसापर्यंत राज्याचा वारस राजाचा स्वतःचा मुलगा नसून बहिणीचा मुलगा व्हायचा. याला पितृसत्ता म्हणणे अशास्त्रीय ठरेल. पुरुषसत्ता ही संकल्पना वापरल्या ती अधिक काटेकोर ठरेल.
स्त्रीवाद्यांनी सत्ता ह्या संकल्पनेलाच नाकारले आहे. परंतु सत्ता हा शब्द व संकल्पना आधुनिक काळात ज्या अर्थी वापरली जाते, तसा तिचा अर्थ स्त्रीसत्तक गणसमाजात नव्हता. सत्ता किंवा शासन याचा अर्थ राजकार्याशी संबंधीत होता. राजकार्य गणभूमीच्या वाटपाशी संबंधीत होते. स्थीया शास्त्या होत्या याचा अर्थ त्या गणभूमीच्या समान वाटपाचे राजकार्य करत होत्या. शब्दांना स्वयंमेव अर्थ नसतात. आणि ते अपरिवर्तनीयही नसतात हे लक्षात घ्यावे लागेल. कॉ. शरद् पाटील यांनी मासिक ’सत्यशोधक मार्क्सवादी’च्या अंक ७,८ / सप्टेंबर-आॅक्टोबर १९८८ मधील संपादकीयात म्हंटले आहे की, ‘वर्ग’ शब्दाचा अर्थ वर्गसमाजाचा पायाभूत भौतिक घटक एवढाच होतो. या ‘शुध्द’ अवस्थेत त्याला पुरोगामी वा प्रतिगामी असा कोणताच अर्थ नसतो. तो कामगार व भांडवलदार या शब्दांना जोडला तरी ते पुरोगामित्व वा प्रतिगामित्व व्यक्त करू शकत नाहीत. कामगारांना वर्गीय आत्मभान येईतो ते वर्गलढ्यांच्या ऐवजी विनाशक दंगलीही करतात. वर्गीय आत्मभान आले तरी ते स्वार्थी वर्गच राहतात. क्रांतिकारी आत्मभान आल्यानंतरच ते पुरोगामी वर्ग बनतात. म्हणून मार्क्स म्हणतो की, ‘कामगारवर्गाला क्रांतिकारी बनवायचे काम भांडवलदार करतो. इंग्लंड-अमेरिकेसारख्या नवसाम्राज्यवादी देशातले कामगार अजूनही भांडवलदारी नेतृत्वाखाली आहेत. म्हणून कोणत्याही शब्दांचा अर्थ ऐतिहासिक विकासक्रमात पाहिला पाहिजे. शब्दांचा अर्थ नित्य नसतो, ऐतिहासिक विकासक्रमात तो बदलत असतो.’ याकडे लक्ष केंद्रित रायला हवे. कॉ. शरद पाटील यांचे अवतरण देण्याचा हेतू इतकाच की सत्ता, शासन, राजकार्य ह्या शब्दांचे तत्कालिन समाजव्यवस्थेत काय अर्थ होते हे समजावुन घेतले पाहिजे. तसे न केल्यास स्त्रीसत्तेचा ऐतिहासिक वारश्याला आपण मुकू शकतो. त्यातून पुढील काळात गंभीर सैध्दांतिक चुका होऊ शकतात.
अब्राह्मणी स्त्रीवादानुसार पुरुषसत्तेचे आकलन कसे गेले गेले? स्त्री म्हणजे गृदेवता, आज्ञाधारक पत्नी, सुमाता, मोलकरीण, वेश्या, निर्बुध्द जीव, साध्वी, बाजरबसवी, कुमारी, माता इ. साचेबंद नमुना नाही. त्या स्त्रियांवर लादलेल्या भूमिका आहेत. स्त्रियांना स्वतंत्र अस्तित्व व व्यक्तीत्व असते हे सूत्रे बीज अब्राह्मणी स्त्रीवादने मान्य केले आहे. पुरुषसत्ता ही गृहव्यवस्था (कुटुंब संस्था), लैंगिकता, हिंसा, राज्य, संस्कृती, कामाचे ठिकाण याचा परिणाम असते. पुरुषसत्तेची संरचना ही स्त्रियांच्या श्रमशक्तीवर, उत्पादन क्षमतेवर नियंत्रण, स्त्रियांच्या प्रजोत्पादनावर नियंत्रण, लैंगिकतेवर नियंत्रण आणि स्त्रियांच्या आर्थिक व सांपत्तिक साधनसामग्रीवर नियंत्रण यातून साकार झालेली असते. कुटुंब-घर ते सार्वजनिक क्षेत्रापर्यंत स्त्रियांना दुय्यमत्व लादले जाते. स्त्रियांच्या श्रमशक्तीवर, उत्पादन क्षमतेवर पुरुषसत्ताक रचना नियंत्रण ठेवते. भारतासरख्या देशात श्रमशक्ती, उत्पादन क्षमता यांचा विचार जात-पुरुषसत्तेच्या परिप्रेक्षातच करावा लागतो. कारण डॉ. आंबेडकर म्हणतात त्या प्रमाणे इथे केवळ श्रमाचे नाही तर श्रमिकांचे विभाजन जातीव्यवस्थेने केलेले आहे. जातिव्यवस्थेच्या अनेक लक्षणांपैकी एक लक्षण म्हणजे व्यवसाय बंदीचे आहे. जातविशिष्ट व्यवसाय करण्याची सक्ती केली गेली. श्रमाचे जातनिहाय विभाजन करण्यात आले आहे. स्त्रियांना विशिष्ट श्रमाची सक्ती केली गेली आहे. श्रमाच्या जातनिहाय विभाजना सोबतच लिंगाधारित विभाजनही करण्यात आले. श्रमाच्या जातनिहाय लैंगिक विभाजनात स्त्रियांना गृहश्रमाची सक्ती केली जाते तसेच कोणत्या जातीतील स्त्रियांनी कोणत्या प्रकारचे श्रम करायचे किंवा करायचे नाही हेही सांगितले गेले. उच्च जातीतील स्त्रियांनी मुख्यत गृहश्रम करायचे आणि ब्राह्मणेतर जातीतील स्त्रियांनी गृहश्रमासोबतच सार्वजनिम क्षेत्रातील श्रम करायचे असे जात व लिंग यानुसार विभाजन करण्यात आले. त्याला धर्मशास्त्रांचा आधार देण्यात आला. इतकेच नाही तर श्रेष्ठत्त्वाचे, शुध्दीचे नियमही त्याशी जोडण्यात आले. ब्राह्मण जात श्रेष्ठ का? याच्या कारणमिमांसेत ’आमच्या स्त्रिया’ घरात असतात. पुनर्विवाह करत नाही याप्रकारचे निकष सांगितले गेले. ब्राह्मणेतर स्त्रियांच्या चारित्र्याला कमी लेखून त्यांना गृह व सार्वजनिक अशा दोन्ही प्रमारच्या श्रमांचे ओझे त्यांच्यावर टाकण्यात आले. यामुळे त्यांच्या शोषणात अधिक भर पडली. म. फुल्यांनी ’कुळंबिण’ या अखंडातून हेच वास्तव आधोरेखित केले आहे. यातून पुरुषसत्ता एकसाची नसते तर ती बहुस्तरसत्ताक पध्दतीची असते हे स्पष्ट होते.
ब्राह्मणी पुरुषसत्ता स्त्रियांच्या प्रजोत्पादन व लैंगिकतेवर नियंत्रण ठेवते. कुटुंब व्यवस्थेचा पाया पुरुषसत्ताक व जात्याधिष्ठित आहे. जात-पुरुषसत्ताक शोषणाला,विषमसंबंधांनापुनरुत्पादित करण्यासाठी विविह, कुटुंबसंस्था इ. चा साधनस्वरुप वापर केला जातो. सजातीय स्त्री-पुरुषांनी देवा-ब्राह्मणाच्या साक्षीने लावलेला विवाह व त्या विवाहातून जन्माला आलेले त्याच जातीचे बीज असणारे मूल अशी जातशूध्दतेची पुरुषसत्ताक संरचनाच ’वैध’ मानण्यात येते. अबाह्मणी स्त्रीवाद या बीजशूध्दीच्या जात-पुरुषसत्ताक मूल्यांना आव्हान देतो.

समारोप- अब्राह्मणी स्त्रीवादाची मांडणी आजमितीला एक वैशिष्ट्यपूर्ण सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक अशा वैश्विक उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण बनत आहे. जागतिकीकरणाला तब्बल वीस वर्ष पूर्ण होण्याच्या काळात देशात सर्वच क्षेत्रात मोठी घुसळण झाली आहे. भारतात जातीव्यवस्था, वर्गव्यवस्था आणि पुरुषसत्ता ह्यांच्या गुंफणीतून तयार झालेल्या समाजव्यवस्थेबरोबर ह्या बदलत्या वास्तवाचे गंभीर परिणाम झाले, तरीही प्रधान शासन शोषणाची संस्था म्हणून जातिव्यवस्था घट्टपणे अस्तित्वात आहे. कारण आजही स्वभांडवलाची सुरक्षितता स्वजातीतच शोधली जात आहे. सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा आणि ज्ञान ह्यांच्यावर जातीवर्चस्व आहे.
जागतिक भांडवलाचे स्वरुप बदलत असताना एत्तदेशीय भांडवलशाहीनेही वित्तभांडवलीचे रुप धारण केले आहे. ह्या सर्वाचा एकत्रित परिणा दलित, आदिवासी, भटके-विमुक्त आणि स्त्रियांवर होताना दिसतो. खाजगीकरण, उदारीकरणाच्या मुक्त(?)नव्हे मोकाट व बाजारधिष्ठित व्यवस्थेत जातवर्गपुरुषसत्ताक शोषण तीव्रतर होत चालले आहे. राखीव जागांना हरताळ फासण्यापासून ते जात्याधिष्ठित अत्याचार, हिंसाचारात भर पडत आहे. त्यातून जात आणि स्त्रीशोषणने परिसीमाच गाठली आहे. त्याचे अलिकडील उदाहरण म्हणजे खैरलांजी हत्याकांडात. एकीकडे खैरलांजीचे वास्तव तर दुसरीकडे ‘हाराकी’ (हायब्रीड बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके) तंत्रज्ञानाने शेतकरी आत्महत्या करीत आहे. गायरान जमिनी आणि अन्य जमिनी कसणाºयांकडून हिसकावल्या जात आहेत. सेझच्या ब्रह्मराक्षसाने जागतिक भांडवलशाहीच्या भरणशोषणासाठी बळीराजाला पुन्हा एकदा पातळात गाडण्यास सुरुवात केली आहे. तीन पिढ्या जमिनी कसूनही भूमिहीन आदिवासींना ७/१२ मिळवण्यासाठी दिवसरात्र संघर्षच करावा लागत आहे. ही आणि अशी सारी उदाहरणे निर्देश करतात ती आज निर्माण झालेल्या व्यवस्थेची गुंतागुंत. या गुंताच्या परिस्थितीत स्त्रीप्रश्न वेगळ्याप्रकारे घडविला जात आहे. स्त्रीशोषणाला विविध आयाम ‘नवउदारमतवादी’जगात प्राप्त होत आहे. या युगात सामाजिक चळवळीपुढे मोठी आव्हाने उभी ठाकली आहेत. जागतिकीकरणाच्या युगात झालेल्या बदलांचा परामर्श कोणते वास्तव पुढे आणतो? ’’नवउदारमतवादी विचार विश्वाने भ्रांत विचारप्रणाली पुढे आणल्या. जगाची, समाज समजून घेण्याची एक परिभाषा त्यांनी पुढे आणली. अर्थात ती पध्दतशीरपणे. यात मोलाची भर टाकली एजीओंच्या जाळ्याने. शोषण, समता, भांडवलशाही, जातीअंत, वर्गसंघर्ष, स्त्रीदास्य ह्या संकल्पनांचा लोकांना विसर पडावा ह्या हेतून प्रश्नांची मांडणीच पध्दतशीरपणे व्यवस्थासमर्थक, पोषण, शरण करण्याची एक पध्दत रुढ करण्यात आली. अन्यायाचे, शोषणाचे नैसगीकीकरण करण हा मुख्य हेत यात आहे. उदा. शोषण हा शब्द सार्वजनिक जीवनातून हद्दपार करुन ’सक्षमीकरणाने‘ त्याची जागा घेणे, भांडवलशाही ऐवजी ‘अर्थव्यवस्था.’ म्हणजे जणू भांडवलशाही म्हणजेच अर्थव्यवस्था; आणि अर्थव्यवस्था म्हणजेच भांडवलशाही असे नवे समीकरण मांडले जात आहे. पर्यायी अर्थव्यवस्था म्हणजेच भांडवलशाही असे नवे समीकरण मांडले जात आहे. पर्यायी अर्थव्यवस्था जणू अस्तित्वात नव्हत्या किंवा असूच शकत नाही. सर्व क्षेत्रात ‘ग्राहक’ व ‘विक्रेते’ असतात आणि तेच ‘स्वाभाविक’ असणे असे मांडले गेले. आणि ग्राहकांचीच काळजी (केअर) ही व्यवस्था घेणार. अर्थात अन्यांची नाही. ज्ञानाच्या क्षेत्रात विद्यार्थी ग्राहक बनले. ज्ञानाला बाजारपेठेचे स्वरुप आले. ह्या सोबतच प्रत्येक जण ग्राहक असतो तसाच तो ह्या व्यवस्थेचा एक ‘भागधारक’ आहे. म्हणजे देशात कोणी शोषित, पिडीत, दलित, वंचित, उपेक्षित नाही. व्यवस्था त्याची व तो व्यवस्थेचा भाग आहे. म्हणजे ही व्यवस्था टिकली तरच तुम्हाला भाग मिळेल आणि तरच तुमची काळजी घेतली जाईल. असा भास निर्माण करून तेच वास्तव असल्यासारखे मांडले जात आहे.
भारतासारख्या जातीस्त्रीदास्यक समाजात ह्या भांडवली, बाजारधिष्ठित विचारविश्वाला ब्राह्मणवादाचा चेहरा मिळाला की समता नव्हे समरसता आदिवासी नव्हे वनवासी, स्त्रीमुक्ती नव्हे महिला मुक्ती इ. इ. अशी परिभाषा येते. नुसतीच येत नाही तर तिला ‘अधिकृत’, ‘सर्वसमावेशी’ मानले जाते.
अशा प्रकारे एकदा मांडणीला सुरुवात झाली की वर्गसंघर्ष काय किंवा जातीअंतक चळवळ काय किंवा स्त्रीमुक्तीचे लढे काय करणे गैरलागू, फिजूल ठरतात. उलट गुलामीतच तुमची मुक्ती आहे ह्या विचाराला अधिमान्यता मिळवली जाते. कमीलचे परात्मिकरण करणाºया वित्त भांडवलशाही आलेल्या जातीस्त्रीदास्यक समाजात शोषितांच्या गुलामीची जाणीव पध्दतशीरपणे बोथट करुन जातीस्त्रीदास्यमूलक बाजार व्यवस्थेतील गुलामगिरी म्हणजेच मुक्तता असे सांगितले जाते किंवा भासवले जाते. अशावेळी सर्वात शोषणाला बळी पडतात त्या स्त्रिया. या व्यवस्थेने करिअरच्या संधी मिळवण्यासाठी तुम्ही सुंदर असले पाहिजे. किंबहूना सुंदर असणं म्हणजेच विकास असे बिंबवत ‘सौंदर्याचा उद्योग’ पुढे आला. त्यामुळे अपरिहार्यपणे लैंगिकतेचेही जागतिकीकरण झालेले दिसते.
स्त्रियांच्या केवळ शरिरावर मनावर नव्हे तर व्यक्तित्वावर, स्वत्वावर, अस्तित्वावर सोबतच त्यांच्या लैंगिकतेवरही जात व पुरुषांचा ताबा नव्यानव्या प्रकारे, नव्या माध्यमातून पुढे आला आहे. आज देशात स्त्री शोषणाचे गंभीर रुप पुढे आहे आहे. ‘मंडल’नंतर देशात मोठी घुसळण झाली आणि स्त्रीशोषण अधिकच तीव्रतर होत चालले आहे. जातजनगणना (२०१०-११) ने पुढे आणलेले लिंग गुणोत्तर, खापपंचायती आणि ‘आॅनर किलिंगचा’प्रश्न, तथाकथित एकतर्फी प्रेमातून होणºया हिंसा, स्त्री गर्भाची हिंसा ही सर्व उदाहरणे स्त्रीशोषणाची तीव्रता अधोरेखित करीत आहेत.
अशा परिस्थितीत अब्राह्मणी स्त्रीवादाच्या मांडणीची तातडी आपल्या सहजच लक्षात येवून शकते. अब्राह्मणी स्त्रीवाद ही तशी नवी मांडणी नव्हे. परंतु या नव्या आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता ह्या प्रवाहात अधिकतर आहे. अब्राह्मणी स्त्रीवाद हा ब्राह्मणी स्त्रीवाद, दलित स्त्रीवाद, मार्क्सवाद ह्यांना विधायक नकार देत; परंतु ह्या प्रवाहाशी संवाद साधत भगिनीभाव बाळगत विकसित झालेला विचार प्रवाह आहे. मार्क्सवाद-फुले-आंबेडकरवाद ह्या सापेक्षत नव्या तत्वज्ञान व अन्वेषण पध्दतीचा स्वीकार करीत अब्राह्मणी स्त्रीवाद उभा आहे.

लेखिका अब्राह्मणी स्त्रीवादाच्या पुस्कर्त्या आहेत. राज्यशास्त्राच्या प्राध्यापक असून सत्यशोधक कम्युनिस्ट चळवळीत त्यांचे सक्रिय योगदान आहे.

1 Comment

  1. प्रमोद देव Reply

    निव्वळ शब्दच्छल आहे.
    मात्र असा शब्दच्छल सतत करत, इतका मोठा लेख पाडणे म्हणजे खरंच अभिनंदनीय काम आहे.

Write A Comment