fbpx
सामाजिक

फॅसिझमचा फास

देशात आपल्या आजूबाजूला काय घडत आहे ते समोर स्वच्छ दिसत असतानाही, “छे हे वाईट आहे, पण हा काही फॅसिझम नाही. फॅसिझम असा नसतो” असल्या नकारात्मक वृत्तीमुळे येथे फोफावणाऱ्या फॅसिझमला अाणखी फोफावण्यास राजकीय अवकाश मिळतो. म्हणूनच अलीकडेच थंड डोक्याने करण्यात आलेला गौरी लंकेशचा योजनाबद्ध खून हा हिंदू फॅसिझमचा अविष्कार आहे हे सांगावेच लागते. खुनी पकडले जातात की नाही, त्यांना शिक्षा होते की नाही हे प्रश्न माझ्या मते फारच दुय्यम आहेत. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी या शृंखलेतील गौरी ही चौथी हत्या आहे. भविष्यात या शृंखलेत अजूनही नावे जोडली जाण्याची शक्यता दाट आहे.

–कुमार केतकर

जिव्होवानी जेंटील हे इटालियन गृहस्थ १८७५ साली जन्मले. लहानपणापासून त्यांचा तत्वज्ञान या विषयाकडे ओढा होता. त्या विषयात प्राविण्य मिळवून तारुण्यात त्यांनी इटली व रोम मधील वेगवेगळ्या विद्यापीठात इतिहास व तत्वज्ञान या विषयांत प्राध्यापकी केली. जेंटील स्वतः नास्तिक होते, परंतु आपण सांस्कृतिक दृष्टीने कट्टर कॅथॉलिक आहोत अशी जाणीव त्यांनी आवर्जून जपली होती. साधारण आपल्या सावरकरांसारखीच. राष्ट्राची उन्नती साधायची असेल आणि त्याला आपला वैभवशाली भूतकाळ परत मिळवून द्यावयाचा असेल तर प्रखर राष्ट्रवाद जोपासावाचं लागेल आणि त्याची पायाभरणी अगदी शालेय शिक्षणक्रमापासून करावी लागेल अशी जेंटीलची धारणा होती.

पहिले महायुद्ध संपल्यानंतर १९२२ साली इटलीत मुसोलिनीने आपल्या सरकारमध्ये त्यांना शिक्षणमंत्री नेमले. मुसोलिनी इटलीत जो प्रयोग करू पाहत होता त्याला तात्विक चौकट पुरविणारे हे जेंटीलच होते. त्यांनी उभे केलेले तत्वज्ञान फॅसिझम या नावाने ओळखले जाते.

पहिल्या महायुद्धात ध्वस्त झालेल्या युरोपातील जनतेने युद्धामुळे होणारी प्रचंड उलथापालथ अनुभवली होती. या युद्धाची व्याप्ती अतिभव्य होती. युद्धात ओढल्या गेलेल्या सर्वच देशांनी आपापल्या नागरिकांना थेट सैन्यात किंवा युद्धसंबंधित कामांत गुंतवून टाकले. युरोपातील नागरी जीवन आणि लष्करी जीवन यातील सीमारेषा धूसर होऊन गेली. सरकार पुरेसे शक्तिमान असेल तर ते राष्ट्राची सर्व नागरी ताकद एकवटून युद्धात झोकून देऊ शकते याची चुणूक युरोपातील जनतेस पहिल्या महायुद्धात मिळाली.

या आक्रमक जगात राष्ट्र म्हणून सन्मानाने टिकून राहायचे असेल तर दोन गोष्टींची नितांत गरज आहे. जनतेत प्रखर राष्ट्रवाद, राष्ट्रासाठी प्रसंगी प्राणही द्यावयाची तयारी असलीच पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे सरकार मजबूत असलेच पाहिजे. लोकशाही, मतमतांतरे, विरोधी पक्ष, निवडणूका, बदलणारी सरकारे वैगेरे गोष्टी फिजूल आहेत. त्या मुळे राष्ट्राची ताकद फालतू गोष्टींत वाया जाते, अशी भावना पहिल्या महायुद्धानंतर युरोपात मूळ धरू लागली होती. या भावने भोवती जेंटीलने फॅसिझमचे अख्खे तत्वज्ञान रचले. फॅसिझमचे तत्वज्ञान व त्यावर आधारित राष्ट्रनिर्मितीचा ब्लूप्रिंट उलगडून सांगणारी ” द डॉक्ट्रीन ऑफ फॅसिझम” अशी पुस्तिका जेंटीलने १९३२ साली लिहिली. ती लिहिली जेंटीलने असली तरी ती प्रकाशित झाली मुसोलिनीच्या नावाने. जेंटीलचे नाव त्यात सहलेखक म्हणून आले.

एक तत्वज्ञान म्हणून फॅसिझम नेमके काय सांगतो ?

#१. लिबरल डेमोक्रसी म्हणजे उदारमतवादी लोकशाही ही एक भोंगळ व्यवस्था असून तिचा तात्काळ त्याग केला पाहिजे. राष्ट्र हे विरोधी पक्ष मुक्त केले पाहिजे. एकपक्षीय व्यवस्थाच राष्ट्रापुढील संकटांचा सामना समर्थपणे करू शकते. मगते संकट परचक्राचे असो की आर्थिक अरिष्ट. एक राष्ट्र एक पक्ष. अगदी शत प्रतिशत एकच पक्ष. विरोधी पक्ष ही कल्पनाच राजकीय व्यवस्थेतून बाद करून टाकावी लागेल.

#२. संपूर्ण राष्ट्र, एकूण एक नागरिक प्रखर राष्ट्रवादी होऊन एकदिलाने राष्ट्रीय सरकारच्या प्रत्येक कार्यक्रमात संपूर्ण ताकतीनिशी सामील व्हावयास हवा. व्यक्ती म्हणून कोणालाही राष्ट्रापासून स्वतंत्र अस्तित्व नाही. व्यक्तींचे अस्तित्व राष्ट्राच्या अस्तित्वात समर्पित होईल. हे आपोआप होत नसते. राष्ट्रवाद जनतेत रुजवावा लागेल. त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी देशातील सर्व नागरी संस्थावर अधिपत्य मिळवावे लागेल. राष्ट्राचे संपूर्ण सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक अवकाश एकाच राष्ट्रीय विचारधारेने व्यापून टाकावे लागेल.

३. या एकमेव राष्ट्रीय पक्षाचे नेतृत्व एकच नेता करेल. त्याची छाती अमुकएक इंचाचीच असेल अशी काही अट जेंटील ने नमूद केलेली नाही. परंतु हा नेता सर्वशक्तिमान असेल. तो अत्यंत कर्तबगार व उर्जावान असेल.त्याची प्रत्येक कृती राष्ट्रहिताचीच असेल. राष्ट्रास इप्सित ध्येयावर नेण्यासाठी तो प्रसंगी कठोर निर्णय घेण्यास कचरणार नाही. तो सार्वभौम असेल. पक्षातून किंवा बाहेरून कोणीही त्याला आव्हान देऊ शकणार नाही. पक्ष व देश दोघांचाही कारभार एकचालकानुवर्तित्व पद्धतीने चालेल.

४. हिंसा ही नेहमीच वाईटच असते असे नाही. राष्ट्रहितासाठी जरूर तेथे हिंसा वापरावीच लागेल. एक महान राष्ट्राच्या उभारणीत होणारा अंतर्गत विरोध, पक्षाच्या विचारधारेचे व सर्वोच्च नेत्याचे टीकाकार यांना थेट कृती, किंवा डायरेक्ट ऍक्शन करूनच संपवावे लागेल. वैचारिक विरोध मोडून काढावाच लागेल.

५. अनिर्बंध भांडवलशाही व संपूर्ण उद्योग सरकारी मालकीचे करणारा साम्यवाद या दोन पर्यायांच्या पलीकडे जाणाऱ्या ‘तिसऱ्या’ धोरणाचा अंगीकार फॅसिझम करतो. या तिसऱ्या धोरणानुसार उद्योग धंदे खासगी असतील परंतु राष्ट्राच्या गरजे नुसार उत्पादनाचा प्राधान्यक्रम ठरविण्याचे धोरण सत्ताधारी करतील. साम्यवादातील वर्गकलहा च्या सिद्धांताची फॅसिझमला धास्ती वाटते, त्याच वेळी वर्गविहीन सामाजरचना राष्ट्रहिताची नाही उलट उतरंडी प्रमाणे रचलेली व्यवस्था हीच सार्वात कार्यक्षम आणि आदर्श व्यवस्था आहे. सर्व आर्थिक वर्गांत समन्वय साधून त्यांना राष्ट्रउभारणीच्या उदात्त कामात जुंपण्याचे काम फॅसिस्ट सरकारचे उद्दिष्ट्य असले पाहिजे असेहि फॅसिझम सांगतो

या व्यतिरिक्त अजून अर्थकारणाचे व लष्करी सिद्धतेचे काही सिद्धांत गुंफून जेंटील व मुसोलिनीने एक परिपूर्ण विचारधारा म्हणून फॅसिझमचे तत्वज्ञान जगापुढे ठेवले.

बरं या सगळ्या विचारसरणीचा आपल्याशी काय संबंध ? आपण तर भारतीय राज्यघटनेशी बांधील अशी जगातील सर्वात मोठी लोकशाही आहोत. भारतात एवढे वैविध्य आहे कि या बहुपेडी संस्कृतीवर कोणी हुकूमशहा फॅसिझम लादु शकेल ही शक्यताच भारतीय राजकारणी, व विचारवंत वर्तुळात झटकून टाकली जाते . परंतु फॅसिझम हा असा बहुरूपी सैतान आहे की तो आजूबाजूला वावरत असताना सुद्धा भल्या भल्याना त्याची चाहूल लागत नाही. भारतीय विचारवंतांच्या वर्तुळात, इतिहास, भाषाशास्त्र, राजकारण यातील दाखले देऊन फॅसिझमचा आणि भारतातील वर्तमान परिस्थितीचा कसा काहीच संबंध नाही हे सिद्ध करू पाहणारांचेच बहुमत आहे. काही पत्रकार आणि प्राध्यापक तर भारतातील प्रमुख धारा हिंदू आहे, आणि ऐतिहासिकदृष्ट्या पहिले तर ही एक अत्यंत सहिष्णू, सर्वसमावेशक विचारधारा असल्यामुळे, या देशात फॅसिझमचे रोपटे मूळच धरू शकत नाही अशी मांडणीही करतात.

देशात आपल्या आजूबाजूला काय घडत आहे ते समोर स्वच्छ दिसत असतानाही, “छे हे वाईट आहे, पण हा काही फॅसिझम नाही. फॅसिझम असा नसतो” असल्या नकारात्मक वृत्तीमुळे येथे फोफावणाऱ्या फॅसिझमला अाणखी फोफावण्यास राजकीय अवकाश मिळतो. म्हणूनच अलीकडेच थंड डोक्याने करण्यात आलेला गौरी लंकेशचा योजनाबद्ध खून हा हिंदू फॅसिझमचा अविष्कार आहे हे सांगावेच लागते. खुनी पकडले जातात की नाही, त्यांना शिक्षा होते की नाही हे प्रश्न माझ्या मते फारच दुय्यम आहेत. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी या शृंखलेतील गौरी ही चौथी हत्या आहे. भविष्यात या शृंखलेत अजूनही नावे जोडली जाण्याची शक्यता दाट आहे.

या हत्या प्रकरणात काही गोष्टी अगदी स्पष्ट आहेत. गौरी आपल्या लेखणीने लढत होती. धार्मिक आणि जातीय कट्टरपंथीयांविरोधात आवाज उठवत होती. तिने कधीच कोठल्याही प्रकारच्या हिंसेचे समर्थन केले नव्हते. स्त्रियांवर होणाऱ्या घरगुती अत्याचार आणि हिंसेविरोधातही तिने कायम लिखाण केले. आणि तरीही तिच्या खुनानंतर काही मंडळींना जल्लोष करावासा वाटला. त्यांचं म्हणणं होतं की गौरी कायम हिंदुत्वाच्या विरोधी लिखाण करीत होती. या तिच्या ‘कर्मा’चे उचित फळ तिला मिळाले आहे. वास्तवात गौरी हिंदुत्वाच्या नव्हे तर दहशत माजवणाऱ्या हिंदुत्वाच्या विरोधी होती. महात्म्यावर गोळ्या झाडणाऱ्या हिंसक हिंदुत्वाच्या विरोधात होती. आणि केवळ हिंदुत्ववादीच नव्हे तर कट्टर इस्लामपंथीयांनाही तिने वेळोवेळी झोडपले होते. ती नक्षलवादी असल्याची एक कुजबूज मोहीम तिच्या खुनानंतर सुरु झाली. परंतु नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांचे तिने कधीच समर्थन केले नव्हते.

हिंदू फॅसिझमची पुरेशी ओळख न पटल्यामुळे किंवा उदार हिंदुत्वच्या रम्य कल्पनेत आकंठ बुडल्यामुळे -गौरी लंकेशची हत्या ही इतर कुठल्याही खुनासारखीच एक वाईट घटना आहे. हा एक फौजदारी गुन्हा आहे आणि त्याचा तपास झालाच पाहिजे. मारेकऱ्यांना शिक्षा मिळालीच पाहिजे. परंतु गौरीचा खून हा हिंदू फॅसिझमचेच लक्षण आहे या म्हणण्यास काही अर्थ नाही- अशी भूमिका मीडिया व विचारवंतांपैकी बरीच मंडळी घेताना दिसतात. सध्याच्या भारतात या भूमिकेचे सहर्ष स्वागत होईल यात शंका नाही. परंतु अशा भूमिकेमुळे आपल्यासभोवती वाढणाऱ्या फॅसिझमचे पाश अजून बळकट होत जातील याचे भान या संभावित उदारमतवाद्यांनी ठेवावे.

गौरीचा खून तिच्या वैचारिक मांडणीमुळेच झाला. हा राजकीय खून आहे. याच्या मुळाशी विशिष्ट राजकीय विचारसरणी आहे. ही विचारसरणी गेली काही दशके भारतात नांदते आहेच. परंतु गेल्या तीन वर्षांत, मोदी पंतप्रधान झाल्यानंतर ही विचारसरणी आक्रमक होऊन वावरू लागली आहे. खून झाले त्या राज्यांत तर काँग्रेसचे सरकार होते हा तर्क तर अगदीच भाबडा आहे. फॅसिस्ट हिंदुत्वाची ही विचारसरणी आंतरभारतीय आहे. त्यांचे जाळे देशभर पसरलेले आहे. यात वेगवेगळ्या संघटना वेगवेगळ्या पातळीवर कार्यरत असल्या तरी या सर्व एका केंद्रीय विचारसरणीभोवती गुंफलेल्या आहेत. वर्तमानातील सर्वोच्च सत्तेतील सर्वोच्च नेत्यांना ही विचारसरणी मातृस्थानी आहे. म्हणूनच दाभोलकर, पानसरे , कलबुर्गी आणि आता गौरी या चौघांच्याहि हत्येत एक सामान सूत्र दिसून येते. या चौघांनाही हत्येपूर्वी, सोशल मीडियातील या हिंदू फॅसिस्ट मंडळींनी घेरले होते, त्यांना गर्भित धमक्या दिल्या होत्या. आणि त्यांचे खून पडल्यानंतर जाहीर जल्लोष ही केला होता.

गौरीच्या खून प्रकरणातील सर्वात धक्कादायक आणि किळसवाणी गोष्ट ही आहे, की सोशल मीडियात गौरीचा खुन साजरा करणारी मंडळी ही आपल्या पंतप्रधानांचीची सुहृद आहेत. ट्विटर वर प्रधानमंत्री या मंडळींस ‘फॉलो ‘ करतात. म्हणजे वैयक्तिक ओळख असेल किंवा नसेल , परंतु पंतप्रधानांना हे लोक समविचारी आणि ज्यांच्या विचारांची आवर्जून दखल घ्यावी असे वाटतात. बर हे उघड झाल्यानंतरदेखील मोदींनी ना खुनाचा निषेध केला ना या खून साजरा करणाऱ्या मंडळींपासून सोशल मीडियावर फारकत घेतली. खास नोंदवण्याजोगा अजून एक मुद्दा म्हणजे, अशा जवळपास ५०० पेड सोशल मीडिया हिंदुत्व प्रचारक मंडळींना पंतप्रधानांनी भारतास डिजिटल व हाय टेक बनविण्यासाठी काय काय करावे यावर सूचना देण्यासाठी एक बैठक बोलावून त्याचे आमंत्रणही दिले होते.

आक्रमक हिंदुत्ववाद्यांना सर्वोच्च सत्ताधाऱ्यांचा पूर्ण पाठिंबा व आशीर्वाद आहेत ही काही गोष्ट काही लपून राहिलेली नाही. सरकारी व खासगी प्रसारमाध्यमातील सीमारेषा पुसट होऊ लागली आहे. शैक्षणिक अभ्यासक्रमात ‘खरा राष्ट्रीय’ इतिहास सांगणे, सर्व संस्था, विश्वविद्यालयवर कब्जा करू पाहणे, विरोधाचा आवाज या न त्या मार्गाने दाबून टाकणे , खोट्या कर्तृत्वाचा डंका पिटणे, खोटी आकडेवारी बिनदिक्कत प्रसारित करणे ही सारी फॅसिझमचीच लक्षणे आहेत. अगदी लख्ख दिसत आहेत. हिटलर मुसोलिनी वरील कोणतीही पुस्तके वाचली तर विचारसरणी व कार्यपद्धतीमध्ये वर्तमान भारताशी कमालीचे साधर्म्य दिसेल. प्रसारमाध्यमांच्या गळ्याभोवतीचा फास वेगाने आवळतोय. फॅसिस्ट सत्ताधाऱ्यांना विरोध सहन होत नाही. विरोध करणाऱ्या पत्रकार, संपादकास खच्ची करून टाकण्यासाठी, त्यांच्यावर खोटे नाटे खटले भरणे, त्यांच्या कार्यालयावर धाडी टाकणे असे उद्योग सर्रास चालू आहेत. विरोध करणारास धमक्या देणे, काही केसेस मध्ये तर थेट ठारच मारणे हे फॅसिझमचे व्यवच्छेदक लक्षण आता भारतात स्पष्ट दिसत आहे.

आजवर या देशातील उदारमतवादी , पुरोगामी आणि अगदी डावे देखील आपण एक सुदृढ व प्रगल्भ लोकशाही आहोत त्यामुळे इथे फॅसिझम कधीच येऊ शकत नाही या भ्रमात राहिले. या भ्रमातून बाहेर पडून लोकशाहीवादी पक्षाचा बुरखा पांघरून सत्तेत विराजमान झालेल्यांचा बुरखा आत्ताच टराटरा फाडला नाही, तर कदाचित ती संधी परत कधीच मिळणार नाही. फॅसिस्टांनी देशावर पुरेपूर कब्जा केल्यानंतर आपल्या हातात फक्त पश्चाताप करणेच उरेल.

पत्रकारितेतील आघाडीचे नाव. महाराष्ट टाइम्स , लोकसत्ता अशा वृत्तपत्रांचे माजी संपादक.

3 Comments

  1. vaishnavee menon Reply

    कुमार सरांनी जे लिहीलय ते अगदी तंतोतंत खरं आहे.माणसं झापङं लावून जगताहेत. ते एक गोषट विसरतात की फॅसिझम तयांचया उंबरठयावर येऊ शकतो नवहे तो केवहाही येईल. अप्रतिम लेख.

  2. स्पष्ट आणि सडेतोड. आतातरी हिंदुत्वाचे भुत चढलेली मंडळी जागी होतील ही आशा.

  3. राजेश Reply

    लेखाची सुरुवात आश्वासक वाटली, परंतु पुढे अचानक त्रोटक होऊन संपल्याने निराशा झाली. कुमार केतकरांसारख्या ज्येष्ठ व चिकित्सक पत्रकाराकडून याहून अधिक सखोल मांडणीची अपेक्षा आम्ही वाचक करतो.

Reply To vaishnavee menon Cancel Reply