fbpx
सामाजिक

बी एच यू आंदोलन : विद्यार्थिनींनी कर्मठांना दिलेली सणसणीत चपराक.

‘बनारस’ या कर्मठ हिंदू पुण्यभूमीत वसलेले असल्यामुळे , तेथील परंपरा आणि एकूणच सामाजिक धारणा यांच्या दबावा मुळे, लिंगभेदरहित वागणूक लागू करणे आजवर या विद्यापीठास शक्य झालेले नाही. एका विश्वविद्यालय पातळीवरील ज्ञानार्जनाच्या केंद्रा मध्ये जे आधुनिक विचारांचे प्रतिष्ठान असणे अपेक्षित आहे ते या विद्यापीठात साधले गेलेले नाही. किंबहुना रूढीवादी लोकांच्या वर्चस्वाखालील या विद्यापीठाने कायम आपल्या विद्यार्थिनींना किमान अधिकारांपासून वंचित ठेवण्याचेच काम केलेले आहे. जणू ज्ञानाच्या क्षेत्रात स्त्रियांसाठी अधिकाधिक अडथळे उभे करून त्यांची कोंडी कशी करावी याचा एक पॅटर्नच या विद्यापीठाने विकसित केलेला आहे.

–दीपक

एका विद्यापीठात सुरु झालेले एक सामान्य आंदोलन असे राष्ट्रव्यापी स्वरूप धारण करेल अशी कल्पनाही कोणी केली नव्हती. खर तर बनारस विश्वविद्यालयात विद्यार्थिनींना मिळणारी लैंगिक भेदभावाची वागणूक, तेथील विद्यार्थीनींसाठी असुरक्षित वातावरण हि काही आजची गोष्ट नाही. या युनिव्हर्सिटीत शिकणाऱ्या मुलींसाठी, एक वेगळी नियमावली आहे. हे नियम खास विद्यार्थिनीं साठी बनवले गेलेत आणि ते नियम पाळणे विद्यार्थीनींसाठी बंधनकारक केलं गेलय. विद्यार्थिनिंनी वसतिगृहात कसे राहावे पासून ते विद्यापीठ प्रसाशना बरोबर कसा संपर्क साधावा या प्रत्येक गोष्टीसाठी या विद्यापीठाने मुलींसाठी आचारसंहिता बनवलीय . विद्यापीठाच्या चालकांची मानसिकता आणि वर्तन सरळ सरळ लिंगाधारित भेदभावाचे आहे.
या विद्यापीठांतर्गत लैंगिक भेदभावा विरोधात आजवर कोणीच कधीच आवाज उठवला नव्हता असे नाही. वेळोवेळी या अन्याया विरोधात येथील मुलींनी तक्रारी केलेल्या आहेत. काही एका मर्यादेत प्रशासनाने काही नियम शिथिल करण्याची लवचिकता सुद्धा आजवर दाखविली आहे. परंतु ‘बनारस’ या कर्मठ हिंदू पुण्यभूमीत वसलेले असल्यामुळे , तेथील परंपरा आणि एकूणच सामाजिक धारणा यांच्या दबावा मुळे, लिंगभेदरहित वागणूक लागू करणे आजवर या विद्यापीठास शक्य झालेले नाही. एका विश्वविद्यालय पातळीवरील ज्ञानार्जनाच्या केंद्रा मध्ये जे आधुनिक विचारांचे प्रतिष्ठान असणे अपेक्षित आहे ते या विद्यापीठात साधले गेलेले नाही. किंबहुना रूढीवादी लोकांच्या वर्चस्वाखालील या विद्यापीठाने कायम आपल्या विद्यार्थिनींना किमान अधिकारांपासून वंचित ठेवण्याचेच काम केलेले आहे. जणू ज्ञानाच्या क्षेत्रात स्त्रियांसाठी अधिकाधिक अडथळे उभे करून त्यांची कोंडी कशी करावी याचा एक पॅटर्नच या विद्यापीठाने विकसित केलेला आहे.


२१ सप्टेंबर रोजी या विद्यापीठात जे धरणे आंदोलन सुरु झाले त्याला  छेडछाड व लैंगिक अतिक्रमणाची एक घटना निमित्त ठरली. आजवर विद्यापीठ प्रशासनाने घेतलेल्या स्त्रीविरोधी भूमिका, स्त्रियांना मिळणारी दुय्यम वागणूक या विरोधात विद्यार्थिनींमध्ये धुमसणाऱ्या संतापाचा स्फोट एक दिवस व्हायचाच होता. तो या घटनेच्या निमित्ताने झाला. प्रशासकीय पातळीवर विद्यार्थिनींना मिळणारी वाईट वागणूक, खास स्त्रियांना जखडून ठेवण्याची मानसिकता, आणि या मानसिकतेतून स्त्रियांसाठी बनविलेली जाचक नियमावली या सगळ्याचा व्यापक संदर्भ या आंदोलनास आहे. २१ सप्टेंबर रोजी घडलेल्या लैंगिक आक्रमणाची घटना, त्यावर कारवाई करण्यात विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांची निष्क्रियता व प्रशासनाने दाखविलेली उदासीनता यांनी विद्यार्थिनींना प्रशासनाच्या विरोधात मोर्चा काढावयास भाग पाडले. या पूर्वी देखील विद्यार्थिनींनी आपल्यावर होणाऱ्या अत्याचारांबद्दल विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रारी दाखल केलेल्या होत्या परंतु त्यांचा आजवरचा अनुभव असा आहे कि प्रशासन एका कानाने ऐकते व दुसऱ्या कानाने सोडून देते. त्यावर कसलीही कारवाई करत नाही.
या घटनेच्या काही दिवस आधीच विद्यार्थिनींनी प्रशासनास नवीन हॉस्टेल परिसरात वारंवार घडणाऱ्या   छेडछाड व लैंगिक छळाच्या घटनांबद्दल एक पत्र देऊन लिखित स्वरूपात तक्रार नोंदविली होती. त्यावर उपाय म्हणून विद्यार्थिनींनी सूर्यास्तापूर्वी हॉस्टेल वर परतावे, छोटे व तंग कपडे घालू नयेत असे सल्ले विद्यापीठाने दिले. त्यावर कडी म्हणजे हे सल्ले प्रत्यक्षात उतरवण्यासाठीचे बिनडोक निर्बंध लादणारे फतवे सुद्धा विद्यापीठाने जारी केले. इंटरनेट पाहून मुलींची नैतिकता धोक्यात येईल म्हणून हॉस्टेल मधील वाय फाय सुद्धा प्रशासनाने बंद करून टाकले. २१ सप्टेंबर च्या घटनेनंतरहि नेमके तेच झाले. अत्याचार पीडितेसच त्या अत्याचारासाठी दोषी ठरविण्यात आले. विद्यापीठाच्या या असंवेदनशील वर्तनाने ठिणगी पडली. कोठलेही संघटन किंवा युनियनने विचारपूर्वक योजलेले हे आंदोलन नव्हते. मुलींनी स्वयंसफुर्तीने हे धरणे सुरु केले. विद्यापीठ आपल्या न्याय मागण्याप्रती पूर्णपणे उदासीन आहे, आपलयाला सुरक्षित वातावरणात विद्यापीठ व वसतिगृह परिसरात वावरता यावे या अगदी मूलभूत व साध्या मागणीस प्रशासन गांभीर्याने घेत नाही हे जाणवल्याने मुली संतप्त झाल्या होत्या. मोर्चा काढून कुलगुरू कार्यालयासमोर धरणे देण्याचा मार्ग मुलींनी निवडला. खर तर या मुलींच्या मागण्या अत्यंत रास्त होत्या. परंतु ४० तास धरणे देऊन सुद्धा कुलगुरू या मुलींना सामोरे जायला, त्यांना भेटून त्यांची तक्रार ऐकून घ्यायला तयार नव्हते. उलट संघी संस्कारात वाढलेल्या या महाशयांनी विद्यार्थिनींना निरोप दिला कि त्यांनी प्रथम आंदोलन स्थगित करून आपापल्या वर्गात जावे, फक्त निवडक प्रतिनिधी मंडळाने कुलगुरूंची कार्यालयात येऊन भेट घ्यावी. पण प्रथम आंदोलन मागे घ्यावे तरच कुलगुरू विद्यार्थिनींचे म्हणणे प्रतिनिधींकडून ऐकून घेतील. अन्यथा कसलाही संवाद होऊ शकत नाही.  मुली या प्रस्तावास बिलकुल बधल्या नाहीत. त्यांना एक अंदाज आलाच होता कि एकदा आंदोलन मागे घेतले कि आपल्याला फक्त आश्वासन मिळेल. कारवाई काहीही होणार नाही. दरम्यान कुलगुरूंनी पल्या काही चमच्याना आंदोलनकर्त्या मुलीं मध्ये घुसवून फूट पडायचा हि प्रयत्न करून पहिला. परंतु स्व:त येऊन या आक्रोश करणाऱ्या आपल्या मुलींना भेटायची बुद्धी काही या महापुरुषास झाली नाही. कदाचित त्यांचा अहंकार व त्यांच्यावरचे मनुवादी संस्कार आड आले असतील .
दरम्यान या उस्फूर्त आंदोलनात काही उत्पाती व गुंड घटकांनी घुसण्याचा प्रयत्न केला. आंदोलनास हिंसक वळण देण्याचा हा प्रयत्न कोणाच्या इशाऱ्याने झाला असेल याचा तर्क सहज करता येतो . परंतु या शूर मुली या सगळ्याला पुरून उरल्या. आंदोलनाचं देशभरातून समर्थन होऊ लागले. २३ सप्टेंबर च्या रात्री, शांतीपूर्ण धरणे देणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनींवर बेछूट लाठीमार करण्यात आला. पोलिसांनी विद्यार्थिनींना पळवून पळवून मारले. प्रत्युत्तर म्हणून विद्यार्थांनी पेट्रोल बॉम्ब फेकून जाळपोळ केल्याच्या बातम्या सुद्धा आल्या. परंतु आंदोलनास बदनाम करण्यासाठी व लाठीमाराचे समर्थन करण्यासाठी प्रशासनाने पेट्रोल बॉम्बफेकीच्या व जाळपोळीच्या घटना स्वतःच घडवून आणल्या असल्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांनी केलेल्या लाठीमारात कैक विद्यार्थिनी गंभीर रित्या जायबंदी झाल्या.

आज बी एच यु च्या आंदोलनाने राष्ट्रीय स्तरावर लक्ष वेधून घेतले आहे. बी एच यु चे कुलगुरू विविध राष्ट्रीय समाचार वाहिन्यांवर झळकतायत. विद्यापीठास बदनाम करण्यासाठी काही बाहेरील घटकांनी हा आंदोलनाचा कट केलेला आहे असे हा माणूस वृत्तवाहिन्यांच्या मुलाखतीत बेशरमपणे सांगतोय.
मुलींसाठी विद्यापीठ परिसर सुरक्षित असावा, लैंगिक आक्रमणांना पायबंद घालावा या न्याय्य मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या या मुलींना ” आतंकी तत्व “, “नक्सलवादि तत्व ” , असली विशेषणे लावून हे आंदोलन म्हणजे एक सामाजविघातक प्रवृत्तीची “साजिश ” असल्याची बतावणी हे कुलगुरु करीत आहेत. त्यांचे संघी पाठराखे त्यांना या कामात पूर्ण साथ देत आहेत. आंदोलनकर्त्या मुलींबद्दल तऱ्हे तऱ्हे च्या अफवा पसरवल्या जातायत. त्यांचे चारित्र्यहनन करण्याची मोहीमच उघडली गेलीय.

कुलगुरू,बनारस हिंदू विश्वविद्यालय

कुलगुरू आपली जबाबदारी स्वीकारायला तयार नाहीत. मुलींच्या सुरक्षे बद्दल विद्यापीठ प्रशासनाने हेळसांड केली आहे हे स्वीकारायला तयार नाहीत. चाटूगिरीच्या अशा पायरीवर हे महाराज पोचलेत कि हे आंदोलन म्हणजे मोदींच्या मतदार संघात मोदींना बदनाम करण्यासाठी डाव्या पंथीयांनी रचलेले षडयंत्र आहे असा प्रचार त्यांनी सुरु केलाय. हे आंदोलन एका व्यापक राजकीय कटाचा भाग असल्याची आवई उठवून हे महाशय स्वतःच त्यास राजकीय रंग देत आहेत. एका मुलाखतीत तर कुलगुरू म्हणतायत कि ” हम बी एच यू से राष्टवाद नाही खत्म होने देंगे. हम बी एच यू को जे एन यू नाही बनने देंगे”
हा कुठला राष्ट्रवाद या कुलगुरूंना अभिप्रेत आहे ? हा त्याच्या संघी व वर्णवर्चस्ववादी समजेतून उपजलेला राष्ट्रवाद आहे का ? हा तोच राष्ट्रवाद आहे का जो आपली विचारधारा इतरांवर लादण्यासाठी शिवीगाळ व प्रसंगी शारीरिक हिंसे वर उतरतो ? हा तोच राष्ट्रवाद आहे का जो स्त्रियांना पडद्यात ठेवण्याचे समर्थन करतो ?

आंदोलनाची दखल राष्ट्रीय स्तरावर घेतली गेल्यावर आता शासनास व विद्यापीठ प्रशासनास खडबडून जाग आली आहे. दोषींवर कारवाई करण्याचे आदेश सुटले आहेत. विद्यार्थिनींच्या मागण्यांची दाखल घेतली जाऊन त्या मागत असलेली “सुरक्षा ” पुरविण्याची तयारी होत आहे.

या आंदोलनाचा एक महत्वपूर्ण पैलू हा कि याला सर्वदूर समाजातून साऱ्याच स्तरांतून पाठिंबा मिळाला. देशभरातील बुद्धिजीवी वर्गाने याची दखल घेतली आणि आंदोलनाचे ठाम समर्थन केले. त्याच वेळी खुद्द बी एच यू मधील प्राध्यापक वर्गातून मात्र अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्या लोकांनीच या मुलींना पाठिंबा दिला.

हे आंदोलन बी एच यू च्या इतिहासात एक मैला चा दगड म्हणून नोंदले गेले आहे. हे आंदोलन एका लोकतांत्रिक व प्रागतिक चेतनेचे अभिवाहक बनले आहे. विद्यार्थिनींच्या एकजुटीचे, संघर्षाचे व विजयाचे एक आदर्श उदाहरण म्हणून या आंदोलनाने इतिहासात आपले नाव कायमचे कोरले आहे.

संशोधक, विद्यार्थी, हिंदी साहित्य - बनारस हिंदू युनिव्हर्सिटी

Write A Comment