समाजवादी साथी फॅसिझम दिसता खाती माती असं म्हणणं हे अर्धसत्य आहे कारण प्रश्न केवळ फॅसिझमविरोधी लढाईत दगा देण्याचाच नाही. संघाच्या फॅसिझमला मुख्य प्रवाहात आणण्याचं समाजवाद्यांचे योगदान वादातीत आहे. आचार्य नरेंद्र देव यांच्यासारख्या थोर दार्शनिक नेत्याचा आणि नंतरच्या टप्प्यावर मधू लिमयेंचा अपवाद वगळता समाजवादी पक्ष /आंदोलनाला वैचारिक राजकीय दिशा देणाऱ्या नेत्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे फॅसिस्ट रूप कितपत कळले होते, आणि कळलेच तर त्याचा धोका कळला होता का, असा प्रश्नच पडण्यासारखा त्यांचा इतिहास राहिला आहे. “संघ फॅसिस्ट असेल तर ,मीही फॅसिस्ट आहे’’, असे उद्गार काढून संघ फॅसिस्ट नसल्याचे सगळ्यात मोठे सर्टिफिकेट देणारे जयप्रकाश नारायण होते, हे विसरता येणार नाही. आणीबाणीच्या विरोधात काहीही कृती न केलेल्या -तुरूंगातून इंदिरा गांधींना माफीनामे लिहून पाठवणाऱ्या संघ -जनसंघीयांना जनता पक्षाच्या माध्यमातून केंद्रीय सत्तेपर्यंत घेऊन जाणारे समाजवादीच होते. संघ बदलतोय –संघ बदलतोय असा धोशा लावणाऱ्यांमध्ये खुद्द एसेम जोशी होते आणि राम बापटांसारखे समाजवाद्यांचे `मार्गदर्शक विचारवंत’ राष्ट्रकार्यात संघाची भूमिका काय असावी, यावर विस्तृत लेखही लिहीत होते.
नचिकेत कुलकर्णी
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा देऊन नितीशकुमारांनी पुन्हा एकदा समाजवाद्यांच्या अवसानघातकीपणाचा दाखला दिला आहे. संघ-भाजपविरोधातील लढाईमध्ये नितीशकुमार हे आयत्या वेळी दगा देणारे बेभरवशाचे साथी आहेत आणि कुठच्याही क्षणी ते संघाच्या मांडीवर बसायला तयार होऊ शकतात हे उघड आहे. यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. कारण जवळजवळ २० वर्ष नितीशकुमार आधी समता पक्ष आणि नंतर जनता दल युनायटेड हे त्यांच्यासोबतच होते , आणि जद (यु) चे प्रवक्ते आणि खासदार के. सी. त्यागी यांच्या अलीकडच्या विधानावरून तर त्यांना भाजपसोबतच्या सुखाच्या दिवसांच्या आठवणींचा उमाळा येतोय अशीच स्थिती दिसते.
अलीकडेच झालेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीत मिळालेल्या भरघोस यशात लालूप्रसादांचा वाटा लक्षणीय किंबहुना निर्णायक होता त्यामुळे २०१९ मध्ये आता विरोधी पक्षाचं नेतृत्व करण्यासाठी नितीश कुमारांखेरीज कोणीच नाही असं वातावरण जरी दिसत असलं तरी ते सपशेल फसवं होत . मुळात ‘मोदी नकोत पण आडवाणी चालतील ‘ असा पवित्रा घेऊन भाजपची साथ सोडणारे संघ विरोधी भूमिकेवर कितपत ठाम राहणार हा प्रश्न होताच. मोदी नकोत असा आग्रह धरणारे नितीश कुमार २००२ च्या गुजरात हत्याकांडानंतरही वाजपेयींच्या मंत्रिमंडळात मंत्री राहिलेच तेंव्हा सांप्रदायिक-हिंदुत्ववादी फॅसिझमला विरोध हा त्यांच्यासाठी अग्रक्रमाचा मुद्दा नव्हता हे देखील ध्यानात घेतलं पाहिजे. नितीशकुमारांचा एक पाय भाजपच्या रिंगणात आहे आणि ते उद्या भाजपसोबत जाऊ शकतात याचे स्पष्ट संकेत देण्यापलीकडे एकंदरच समाजवादी साथी फॅसिझमविरोधी लढाईत माती खाण्यात पटाईत असल्याचे, ठराविक काळाने पुन्हा पुन्हा दिसणारे दृश्य पुन्हा बघायला मिळत आहे.
समाजवादी साथी फॅसिझम दिसता खाती माती असं म्हणणं हे अर्धसत्य आहे कारण प्रश्न केवळ फॅसिझमविरोधी लढाईत दगा देण्याचाच नाही. संघाच्या फॅसिझमला मुख्य प्रवाहात आणण्याचं समाजवाद्यांचे योगदान वादातीत आहे. आचार्य नरेंद्र देव यांच्यासारख्या थोर दार्शनिक नेत्याचा आणि नंतरच्या टप्प्यावर मधू लिमयेंचा अपवाद वगळता समाजवादी पक्ष /आंदोलनाला वैचारिक राजकीय दिशा देणाऱ्या नेत्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे फॅसिस्ट रूप कितपत कळले होते, आणि कळलेच तर त्याचा धोका कळला होता का, असा प्रश्नच पडण्यासारखा त्यांचा इतिहास राहिला आहे. “संघ फॅसिस्ट असेल तर ,मीही फॅसिस्ट आहे’’, असे उद्गार काढून संघ फॅसिस्ट नसल्याचे सगळ्यात मोठे सर्टिफिकेट देणारे जयप्रकाश नारायण होते, हे विसरता येणार नाही. आणीबाणीच्या विरोधात काहीही कृती न केलेल्या -तुरूंगातून इंदिरा गांधींना माफीनामे लिहून पाठवणाऱ्या संघ -जनसंघीयांना जनता पक्षाच्या माध्यमातून केंद्रीय सत्तेपर्यंत घेऊन जाणारे समाजवादीच होते. संघ बदलतोय –संघ बदलतोय असा धोशा लावणाऱ्यांमध्ये खुद्द एसेम जोशी होते आणि राम बापटांसारखे समाजवाद्यांचे `मार्गदर्शक विचारवंत’ राष्ट्रकार्यात संघाची भूमिका काय असावी, यावर विस्तृत लेखही लिहीत होते.
गांधींजींच्या खुनाशी संबंधित असल्याचा डाग असलेल्या संघावर आपली स्वातंत्र्यलढ्यात कमावलेली पुंजी ओवाळून टाकून त्यांना समाजमान्यता मिळवून देण्यात जेपी-एसेमसारख्यांना कोणत्या स्वार्थत्यागाची अनुभूती यातून मिळाली हे कळायला मार्ग नाही. पण समाजवाद्यांच्या राजकीय समजेची दिवाळखोरी मात्र त्यातून लख्ख दिसून आली. अर्थात संघ जनसंघाला राजकीय मुख्यप्रवाहात आणण्याचं आणि त्यांची डागाळली छबी उजळवण्याचं काम सुरु केलं होतं ते राममनोहर लोहियांच्या बिगर काँग्रेसवादाने! स्वतंत्र भारताच्या इतिहासात संघाला राजकीय सत्तेत वाटा मिळवून दिला तो १९६७ च्या निवडणुकीत सत्तेवर आलेल्या संयुक्त विधायक दलाच्या लोहियाप्रणित प्रयोगाने. स्वातंत्र्यानंतरच्या काळात भारतीय राजकारणातील विभाजनरेषा – faultline ही व्यापक अर्थाने उदारमतवादी -पुरोगामी -धर्मनिरपेक्ष शक्ती विरूद्ध धर्मांध सांप्रदायिक शक्ती अशी होती – राजकीय स्पर्धा /चर्चा ही डावीकडे झुकलेले उदारमतवादी (नेहरू) आणि कम्युनिस्ट सोशालिस्ट यांच्यामध्ये होती – गैरकाँग्रेसवाद प्रचलित झाल्यामुळे निव्वळ काँग्रेसविरोध एवढ्याच कारणासाठी सोबत घेतलेल्या संघ आणि जनसंघाला विरोधी पक्ष म्हणून मान्यता मिळू लागली आणि राजकीय स्पर्धा -चर्चेची faultline बदलू लागली. असल्या सरमिसळीमधून लोहियांसारख्या रोमँटिक निस्सीम बंडखोर नेत्याला दीनदयाळ उपाध्यायांच्या विचारात देशभक्तीचा साक्षात्कार व्हावा -आणि सहकार्याच्या शक्यता दिसाव्यात हे समाजवाद्यांच्या सर्व दोष आणि अपुरेपणावर लख्ख प्रकाश टाकणारे नमुनेदार उदाहरण आहे.
भारतीय समाजातील मुख्य अंतर्विरोध कुठले , राष्ट्राच्या राजकीय जडणघडणीवर त्यांचा काय परिणाम होतो आणि समता-लोकशाहीची आधुनिक मूल्य रुजवण्यासाठी ह्या जडणघडणीमध्ये आपला सहभाग कशा प्रकारचा असायला हवा, ह्याबद्दल निश्चित आकलनच नसल्यामुळे समाजवाद्यांना स्वतःच्या राजकीय उद्दिष्टाबद्दल मुळात स्पष्टता नव्हतीच. ह्या प्रश्नांचे आकलन होण्यासाठीची आणि कृतीला मार्गदर्शन करणारी तात्त्विक बैठक इतिहास आणि समाजाच्या शास्त्रीय विश्लेषणातून घडवली जाते- अशा विश्लेषणाचे प्रभावी हत्यार म्हणजे मार्क्सवाद! ज्याचे समाजवाद्यांना कायमच वावडे. ह्या अॅलर्जीचे मूळ कारण अगम्य आहे. कदाचित न्यूनगंड असेल. खरं तर नरेंद्र देवांचं लिखाण हा मार्क्सवादी विश्लेषणाचा उत्तम नमुनाच आहे ,पण लोहिया, जेपी आणि मध्येच अचानक मिनू मसानी यांच्यापलीकडे समाजवाद्यांची गाडी जात नसल्यामुळे ते आपल्याच संस्थापक नेत्याच्या विचारला पारखे झालेत. आपल्याला मार्क्स कळला नाही, मार्क्सविचारातले काही पैलू आपण वाचलेच नाहीत असं कबूल करण्याऐवजी समाजवाद्यांचे वसंत पळशीकरांसारखे मार्गदर्शक विचारवंत ‘मार्क्सला हे कळलेच नाही ‘ वगैरे बिनधास्त विधाने सर्रास करतात. मार्क्सवादाचं वावडं आणि दुसरी कुठली विश्लेषण चौकट उभी करता आली नाही, त्यामुळे युरोपीय उजवे- conservative विचारवंत – शीतयुद्धात अमेरिकेची बाजू लढवणारे मुक्त विचारवंत आणि भारतीय पुनरुज्जीवनवादी विचारातले पैलू यांची बेशिस्त उसनवारी करून आपली तात्त्विक भूमिका मांडण्यात समाजवाद्यांनी धन्यता मानली. समाजवादी ज्याला मूलभूत योगदान वगैरे मानतात ती लोहियांची `इतिहासचक्र’ आणि `समाजवाद, काळा – गोरा’ हि दोन पुस्तकं उदाहरणादाखल बघण्यासारखी आहेत. यात प्रगतीच्या संकल्पनेवर प्रश्न उठवण्यापासून ते भांडवलशाही आणि कम्युनिझम एकाच पाश्चात्य संस्कृतीची अपत्ये आहेत, त्यामुळे ती भारताला लागू पडणारी नाहीत, अशा संघीय विचारधारेच्या धर्तीचे विचार आहेत. मग दीनदयाळांच्या एकात्म मानवतावादाशी अशा विचाराची दोस्ती का नाही जमणार ? अशा ठिगळकामातल्या फटींमधून प्रतिगामी धारणा, समजुती सहज शिरकाव करू शकतात आणि मग जनसंघ देशभक्त आहे इथपासून ते संघ हा फॅसिस्ट नाहीच तर हुकूमशाहीविरोधी लढ्यातील सच्चा साथी असल्याचे साक्षात्कार होऊ शकतात.
ब्रिटीश राजकीय तत्वज्ञ जॉन लॉक म्हणतो त्याप्रमाणे मूर्ख माणूस योग्य गृहीतकांवरूनही योग्य निष्कर्ष काढू शकत नाही मात्र वेडा माणूस मोठ्या निष्ठेने चुकीच्या गृहीतकांवरून निष्कर्ष काढत राहतो. समाजवादी ह्या दोन्ही अवस्थांमध्ये हेलकावे खात राहिले असं म्हणता येईल का ?
वर उल्लेख केलेल्या प्राथमिक महत्वाच्या प्रश्नांचा विचारच न केल्यामुळे किंवा चुकीची उत्तरं शोधल्यामुळे समाजवाद्यांच्या राजकीय व्यवहाराचा आधार राहिला तो एका बाजूला पराकोटीचा नेहरूविरोध आणि दुसऱ्या बाजूला कम्युनिस्टांचा विलक्षण द्वेष. भारत – चीन सीमा वादाच्या आणि संघर्षाच्या काळात युद्धज्वर आणि राष्ट्रवादी उन्माद वाढवण्यात समाजवाद्यांचा खासकरून लोहियावाद्यांचा मोठा वाटा राहिला. त्यांच्यावर कळतनकळत बसलेल्या या उजव्या प्रतिगामी विचारांचा पगडा त्याला कारणीभूत होता आणि त्याला जोड होती ती नेहरूविरोधाची. आजही अशा युद्धखोर उन्मादाविरोधात ठाम भूमिका घ्यायला समाजवादी कचरतातच. किंबहुना मुलायम सिंग आणि नितीशकुमारांसारखे समाजवादी त्याला धार्जिणी भूमिकाच घेताना दिसतात. भारत पाकिस्तान संबंध तथाकथित सर्जिकल स्ट्राईक ,अण्वस्त्रचाचण्या अशा प्रश्नांबद्दलच्या त्यांच्या किंवा एकंदरच समाजवाद्यांच्या भूमिका बघाव्यात. विकास आणि राष्ट्रनिर्मितीची militarist किंवा बल केंद्रित भूमिका मांडणाऱ्या अब्दुल कलामांचीही समाजवाद्यांमध्ये वाहवा होत असते.
असल्या भूमिका फॅसिस्टांना पूरक-पोषक कशा ठरतात ते हे वेगळं सांगायची गरज नाही. शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात १९६८ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत समाजवाद्यांनी सेनेशी युती केली त्यात कम्युनिस्टद्वेषाचा भाग उघडच होता. कम्युनिस्टांच्या द्वेषापायी शिवसेनेसारख्या फॅसिस्ट प्रवृत्तीला आपण शिरजोर करतोय याचं सोयरसुतक समाजवाद्यांनी बाळगलं नाही आणि एकंदरीतच सेनेशी थेट संघर्षाची भूमिका अभावानेच घेतली. या कम्युनिस्टद्वेषाला आंतरराष्ट्रीय परिमाणही होतं आणि ते नेहरूविरोधाचंही कारण असावं असं मानायला जागा आहे. जेपी-लोहियांच्या आंतराराष्ट्रीय प्रश्नांवरच्या भूमिका अमेरिकन-ब्रिटिश साम्राज्यवाद्यांच्या बाजूने झुकणाऱ्या होत्या. उघडपणे किंवा हेतुपुरस्सर जरी नाही तरी कमालीच्या सोव्हिएत विरोधामुळे परिणाम तोच साधला जायचा. पुन्हा इथेही अपवाद नरेंद्र देव आणि मधू लिमयेंचाच – (ह्या दोघांचाही मार्क्सवादावर पकड होती हा योगायोग खचितच नसावा ) यामुळे त्यांचे नैसर्गिक मित्र राहिले ते साम्राज्यवादधार्जिणे प्रतिगामी आणि सापेक्षदृष्ट्या का होईना साम्राज्यवादविरोधी भूमिका घेणाऱ्या काँग्रेसला पराभूत करण्यासाठीच्या बड्या आघाडीत संघाच्या मांडीला मांडी लावून समाजवादी बसले. नेहरू आणि काँग्रेसच्या जनविरोधी धोरणाविरोधात डावा पर्याय उभा करण्याचा मार्ग समाजवाद्यांना कधीच धडपणे स्वीकारता आला नाही. तो त्यांच्या या कम्युनिस्ट आणि सोविएत द्वेषापोटी. भारतातले कम्युनिस्ट किंवा सोविएत युनियन यांना निर्दोष ठरवण्याच्या त्यांच्या मर्यादा नाकारण्याचा अजिबात हेतू नाही. त्याची चिकित्सा व्हायलाच हवी आणि होतही असते. पण फॅसिझमला कसून विरोध करायच्या ठाम भूमिकेपासून ते कधी दूर र गेले नाहीत हा इतिहास आहे.
गैरकाँग्रेसवादाने पछाडलेले समाजवादी मग तात्कालिक राजकीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संघ जनसंघाला बरोबर घेऊन त्यांची ताकद वाढवत राहिले आणि तर्कट लढवून त्याचं समर्थनही करत राहिले. २००२ च्या गुजरात हत्याकांडाच्या वेळी समाजवाद्यांचे नेते – साथी -मित्र ‘ जॉर्ज फर्नांडीस ज्या हिरीरीने सरकारच्या बाजूने उतरले होते ती या तत्त्वशून्य आणि निलाजऱ्या तर्कटाची परिसीमाच होती .
हा सगळा इतिहास असतानाही आणि आज राजकीय ताकद नगण्य असतानाही शहाणपणाचे फुकटचे धडे देत राहून टीकाटिप्पणी करत राहण्याचा अनावर सोस समाजवाद्यांना असतोच. समाजवाद्यांची स्वतःची ताकद नसतानाही निवडून आणले जाणारे आमदार आणि आता तर जनता दल युनायटेडचे प्रदेशाध्यक्ष असलेले कपिल पाटील यांनी लिहिलेला लेख ह्या कमावलेल्या शहाजोगपणाचाच नमुना आहे. कोविंद यांचं समर्थन करण्याच्या निर्णयाची पाठराखण करण्यासाठी त्यांनी ज्या सबबी दिल्या आहेत त्या हास्यास्पद आहेतच पण थेट गांधी आणि आंबेडकरांना वेठीस धरून आपल्या संधीसाधूपणाला मुलामा द्यायचा त्यांचा प्रयत्न समाजवाद्यांचे व्यवच्छेदक लक्षण किती खालपर्यंतच्या त्यांच्या समर्थकांमध्ये रुजलं आहे, हे दाखवणारा आहे. कोविंद हे तसे काही संघाचे नाहीत आणि त्यांनी किमान दाखवण्यापुरतं बाबासाहेबांचं नाव घेतलं असला थिल्लर युक्तिवाद करून त्यांनी आजही संघ-भाजपच्या फॅसिझमविरोधी ठाम भूमिका घ्यायचं सोडून काँग्रेसची मापं काढायचा जो काही निसरडा प्रयत्न केला आहे तो चकवे लावण्याचा जुनाच समाजवादी घालमोडेपणा आहे. प्रत्यक्ष राजकीय सामाजिक व्यवहारात शून्य हस्तक्षेप असलेले काही रिकामटेकडे समाजवादी ‘विचारवंत’ येताजाता संघ आणि कम्युनिस्टांना एका मापात तोलून चकवा लावणायचे-गोंधळ निर्माण करण्याचे आणि संघविरोधाची धार बोथट करण्याचे चाळे करीत असतातच. काँग्रेसविरोध कम्युनिस्टविरोध यात चर्चाविश्व गुंतवून ठेवून संघाला मोकळे रान मिळते याचे त्यांना भान नाही आणि असलेच तर फिकीर बिलकूलच नाही.
झुंडशाही आणि मॉब लिंचिंग -हत्यासत्राच्या रूपाने समोर ठाकलेल्या फॅसिस्ट संकटाविरोधात- संघाच्या मोदी सरकारविरोधात अभूतपूर्व एकजुटीची गरज असताना चिकित्सेच्या नावाखाली संभ्रम वाढवण्याच्या समाजवादी चाळ्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. फॅसिझमला प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष मदत करण्याच्या त्यांच्या परंपरेलाच ते जागत आहेत हे ओळखले पाहिजे आणि त्याचा हिशोबही चोख ठेवला पाहिजे!
14 Comments
अतिशय उत्तम विश्लेषण. सहमत आहे.
कम्युनिस्ट झेंडा फडकवण्याचा केविलवाणा प्रयत्नकरत लिहीला गेलेला——
—— पण ——
समाजवादाची—वाद्यांची वैचारिक दुरावस्था आणि दिवाळखोरीही उत्तमप्रकारे मांडणारा दुर्मिळ लेख .
Cold War rivalaries of communist and socialist. Have resulted in disaster for humanity It is time both realise this and face present challenge unitedly
उत्तम विश्लेषण! ह्यात नेहरु आणि त्यांचे समाजवादी विरोधक ह्यांच्या भूमिकांमधील फरकाचे विश्लेषण हवे होते.
नचिकेत,
फार महत्वाचा लेख आहे हा.
संधीसाधूपणा आणि भंपक समन्वयवाद यातून विचारधारा विरल झाल्या आणि आज फॅसिझमविरोधाची धार अधिकाधिक बोथट होत गेली.
अशा वेळेस तुझा लेख वाचून काठावरच्या समाजवाद्यांनी आत्मपरीक्षण करुन व्यापक सहमतीचा वैचारिक अवकाश निर्मिला पाहिजे, असं वाटतं.
Nachiket very good evaluation of samajwadi
Excellent
विचारसरणीच्या अंगाने
समाजवादी कळपातील व्यक्तिंचा अभ्यास केला तर नेहमीच दोन स्पष्ट गटात विभागणी करता येईल.
एक गट जो—
काही प्रमुख भाग मुद्दे सोड़ता—
अनेक छोट्या मोठ्या बाबीत संघवाल्यांच्या युक्तिवादांना समाजवादी ढांच्यात बसवू पाहणारा.
व दूसरा गट
अशा प्रकारांना स्पष्ट नकार देणारा व समाजवादी विचार पुढे नेणारा.
खरे पाहता
हे दोन विरूद्ध विचारसरणी आहेत. त्यांनी आधीच परस्परा पासून अलग व्हायला पाहिजे. तरच दूसर्या गटाचे वैचारिक शुद्धिकरण व विकास शक्य आहे.
पण जिथे केवळ संख्याबळच पाहिले जाते ; व जिथे दिशेला महत्व न देता नुसतेच कार्यविस्तारामागे किंवा सत्तेमागे धावणे चालू असते त्यांच्यावाट्याला रखडणच ठेवलेले असणार . शिवाय वाटचालही इतस्तत: व भरकटत होत असते .
Very good analysis
फॅसिझम विरुध्दच्या लढाईत माती कोणी खाल्ली ?
— रेखा ठाकूर
नचिकेत कुळकर्णी यांच्या “समाजवादी साथी खाती फॅसिझमची माती” या १ जुलै रोजी प्रसिध्द झालेल्या लेखा वरील प्रतिक्रिया.
“गांधीजींच्या खुनाशी संबंधित असल्याचा डाग असलेल्या संघावर आपली स्वातंत्र्यलढ्यात कमावलेली पुंजी ओवाळून टाकून त्यांना समाजमान्यता मिळवून देण्यात जेपी-एसेमसारख्यांना कोणत्या स्वार्थत्यागाची अनुभूती यातून मिळाली हे कळायला मार्ग नाही. पण समाजवाद्यांच्या राजकीय समजेची दिवाळखोरी मात्र त्यातून लख्ख दिसून आली. अर्थात संघ जनसंघाला राजकीय मुख्यप्रवाहात आणण्याचं आणि त्यांची डागाळली छबी उजळवण्याचं काम सुरु केलं होतं ते राममनोहर लोहियांच्या बिगर काँग्रेसवादाने! स्वतंत्र भारताच्या इतिहासात संघाला राजकीय सत्तेत वाटा मिळवून दिला तो १९६७ च्या निवडणुकीत सत्तेवर आलेल्या संयुक्त विधायक दलाच्या लोहियाप्रणित प्रयोगाने.” — नचिकेत कुळकर्णी
संघावर गांधीच्या खूनाचा डाग होता परंतू गांधीजींच्या खूनाच्या कटाचे रिपोर्ट काँग्रेस सरकार कडे असतानाही कटाचे सूत्रधार मोकळे राहिले व खून झाला ही जबाबदारी काँग्रेसला कशी नाकारता येईल ? इतिहास वेदनादायक आहे. व काँग्रेसच्या या पापाकडे दुर्लक्ष करून सेक्यूलर म्हणून सर्टिफिकिटे देणाऱ्यांच्या काँग्रेसधार्जिण्या राजकारणाचा इतिहास जुना आहे.
मागासवर्गिय आयोगाच्या प्रश्नावर डॉ. आंबेडकरांना राजीनामा द्यावा लागला व तब्बल ४२ वर्षे हा प्रश्न काँग्रेसने लोंबकळत ठेवला व त्याची अंमलबजावणी होण्यासाठी भाजपा बरोबरच्या आघाडीच्या राजकारणातून व्ही. पी. सिंगांना यावे लागले. काँग्रेसच्या शेतकरी, ओबीसी व बहुजन विरोधी ब्राह्मणी धोरणांच्या विरोधात असलेला असंतोष संघटित करून लढाऊ संघर्ष करणारे समाजवादी आंदोलन उभे करणारे डॉ लोहियां असोत किंवा इंदिरा गांधीनी केलेल्या आणीबाणीच्या भीषण फॅसिस्ट कारवाई विरोधातील जयप्रकाशनी केलेला शांततामय संघर्ष असो अथवा नंतरच्या काळात भारिप बहुजन महासंघाने केलेले काँग्रेस विरोधी बहुजनवादी राजकारण असो काँग्रेस धार्जिण्या कम्युनिस्ट व पुरोगाम्यांनी या सर्वाना संघाचे राजकारण बळकट करणारे म्हणून बदनाम केले. पैकी लोहियांनी व जयप्रकाशनी जनसंघाला सोबत तरी घेतले होते परंतू भारिप बहुजन महासंघाने तर त्यांना बरोबरही घेतले नव्हते.
या देशातील फॅसिझमचा स्त्री शूद्रांना सत्ता, संपत्ती प्रतिष्ठा नाकारणाऱ्या ब्राह्मण वर्चस्ववादाशी अन्योन्य संबंध आहे. फॅसिझम फक्त संघाच्या रुपात नाही तो काँग्रेसच्या रुपातही आहे. सत्तर वर्षाच्या काँग्रेसच्या प्रदीर्घ सत्ताकारणा नंतर फॅसिझमचा बिमोड सोडा त्याचा प्रभाव वाढत राहिला याचे कारण हिंदू मुसलमानातील तळच्या जाती समुहातील स्त्री पुरुषांना सत्ता व संपत्ती च्या समान वाटपाची धोरणे काँग्रेसने कधीही राबविली नाहीत. पिछडा पावे सौ मे साठ ही हाक असो अथवा काँग्रेसच्या शेतकरी व गरीब विरोधी धोरणांविरोधातील निवडणुकीचे राजकारण हा या देशातील ब्राह्मणवादा विरुध्दचा संघर्ष हा फॅसिझम विरोधातील संघर्षच होता. उच्चवर्णिय अभिजनांची मक्तेदारी झालेल्या राजकारणात बहुजनांना आणून भारतीय राजकारणाचा उच्चवर्णिय चेहरा बदलण्याचे काम या राजकिय आंदोलनांनी केले. लोहियांनी बहुजनांच्या राजकिय जागृतीचे व संघटनेचे लढाऊ, कल्पक व मातीतले राजकारण केले त्यामधूनच लालूप्रसाद, मुलायम सिंग, नितीश कुमार, रामविलास पासवान इ. बहुजन समाजातील नेतृत्त्व पुढे आले. फॅसिझम विरुध्दच्या लढाईत लालुंच्या कमिटमेंटचे कौतुक नचिकेत कुळकर्णींनी केले आहे त्या लालूंना मागच्या निवडणुकीत तोंडघशी पाडण्याचे क्षूद्र डावपेच काँग्रेसने केले. या देशाच्या ८५ % समूहाला कायम अवमानित व उपेक्षित ठेवण्याचे जे राजकारण काँग्रेसने सातत्याने केले त्यामुळे या समुहांना संघ व सेने सारख्या फॅसिस्ट गोटात ढकलण्यात आले व या महागड्या चुकांचे दुष्परिणाम आज आपण भोगतो आहोत. या देशाच्या राजदूतांमधे एकही दलित वा आदिवासी नाही व काश्मिरी पंडितांचा भरणा आहे म्हणून लोहियांनी टीका केली व सातत्याने नेहरुंच्या अभिजनवादी धोरणांना धारेवर धरले त्यांना नेहरुद्वेषी म्हणून हिणवण्यात आले परंतू नेहरु हा काँग्रेसचा ब्राह्मणी अभिजन चेहरा होता ही वस्तुस्थिती कशी विसरता येईल ?
आज या देशातील उच्च शिक्षित वरच्या थरातील उच्च वर्णिय अभिजन समूह संघाचे प्रच्छन्न समर्थन करताना पाहून पुरोगामी अचंबित होतात. या देशाची शिक्षण व्यवस्था व पाठ्यपुस्तकां वर पोसलेला सुशिक्षित वर्ग मुस्लीम द्वेष आणि वर्ण व पुरुष वर्चस्वा चीे ब्राह्मण्यवादी मूल्ये शिकतच मोठा होतो. याला पुरोगामीही अपवाद नाहीत. नेहरुंच्या नेतृत्त्वा खालील काँग्रेस सरकारने स्वतःच नेमलेल्या कोठारी कमिशनच्या शिफारसी फेटाळून शिक्षण व्यवस्थेतील उच्चनीचता, भेदभाव व इंग्रजीचे महत्त्व वाढविले. महामंडळांच्या पाठ्यपुस्तकांनी हिंदुत्त्ववादी व फॅसिस्ट राजकारणाला पोसण्यास हातभार लावला. आज काही प्रमाणात शिवाजी महाराजांच्या इतीहासाच्या ब्राह्मणी करणाची चिकीत्सा महाराष्ट्रात होत आहे. शरद पवार आज सत्ता गेल्यामुळे ओबीसी व बहुजनांना चुचकारण्यासाठी शिवाजीच्या इतीहासाच्या ब्राह्मणीकरणा विरोधात बोलत आहेत परंतू यानीच प्रदीर्घ काळ सत्ता भोगत असताना ओबीसींना दूर ठेवण्यासठी महाराष्ट्रात ब्राम्होक्षत्रिय युतीचे राजकारण केले व या ब्राह्मणी करणाला कधीही विरोध केला नाही. संसदेत सावरकरांची प्रतिमा बसविण्याचे काम केले. इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील हिंदुत्ववादी प्रचारकी मजकूर बदलण्याच्या तज्ञांच्या मागणीवरील विधान सभेतील चर्चेत तो मजकूर न बदलण्याचे आश्वासन सेनेला दिले. इतीहासाचे ब्राह्मणीकरण शिवाजी महाराजां पुरते मर्यादित नाही. पेशवाईतील स्त्रीया व अस्पृश्यां वरील अनन्वित अत्याचार, ब्राह्मणांचा बेबंद व घृणास्पद स्वैराचार, भिक्षुकशाही याबद्दल पाठ्यपुस्तकांची आळी मिळी गुपचिळी आहे. ब्राह्मणशाही विरुध्दचा संस्कृती संघर्ष आणि त्याचे बहुजन नायक याबद्दल ही पाठ्यपुस्तके काही सांगत नाहीत. स्वतंत्र्य चळवळीतील बहुजनांचे योगदान, सत्यशोधक चळवळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आंदोलन हा सर्व इतीहास सोयीस्कररित्या वगळलेला आहे. आज संघाच्या उन्मादी हिंसक राजकारणाला बळ देण्याचे काम ह्या शिक्षण व्यवस्थेतून उदयाला आलेला उच्चशिक्षित अभिजनवर्ग करत आहे. फॅसिझमची ही अशी अनेक अंग रुपे आहेत फॅसिझमचे फक्त संघा बरोबर समीकरण मांडण्याचा राजकिय डावपेच काँग्रेसला सोयीचा आहे पण फॅसिझम विरुध्दच्या लढाईतील कळीच्या मुद्याना बगल देणारा आहे.
“झुंडशाही आणि मॉब लिंचिंग -हत्यासत्राच्या रूपाने समोर ठाकलेल्या फॅसिस्ट संकटाविरोधात- संघाच्या मोदी सरकारविरोधात अभूतपूर्व एकजुटीची गरज असताना चिकित्सेच्या नावाखाली संभ्रम वाढवण्याच्या समाजवादी चाळ्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. फॅसिझमला प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष मदत करण्याच्या त्यांच्या परंपरेलाच ते जागत आहेत हे ओळखले पाहिजे आणि त्याचा हिशोबही चोख ठेवला पाहिजे!” –नचिकेत कुळकर्णी.
मोदी, अमित शहा, मोहन भागवत, संघ परिवार व त्यांच्या गुंड सेनांनी आज देशापुढे उभे केलेले आव्हान प्रचंड व गंभीर आहे. या परिस्थितीत “अभूतपूर्व एकजुटी” ची गरज आहे असे ईशारे देताना गैरसोयीच्या गोष्टी विसरुन मित्रांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचे काम “अभूतपूर्व एकजुटी” साठी न्यायाचेही नाही, सत्याचेही नाही व शहाणपणाचेही नाही.
आज या आव्हानापुढे आपण एवढे हतबल व दिग्मूढ झालोे आहोेत की प्रामाणिक आत्मचिंतन, व परखड, समतोल व वस्तुनिष्ठ पणे विश्लेषण करण्या ऐवजी सर्व पापाचे खापर कोणाच्या तरी माथ्यावर फोडून उत्तरे शोधायचा आडमार्ग बरा वाटतो आहे.
कुमार केतकर आणि मंडळींचा हा जुना आरोप आहे की समाजवाद्यांनी गांधीजींच्या खूनाचा डाग असणाऱ्या संघाला प्रतिष्ठा दिल्यामुळे ते मुख्य प्रवाहात आले. यावर मला अनेक प्राथमिक प्रश्न पडतात.
१) म्हणजे संघ परिवाराने ” गांधीजींना मारण्याची चूक” केल्यामुळे हिंदुत्त्ववादीे अप्रतिष्ठित झाले. अन्यथा त्यांचा वैचारिक व राजकिय पराभव व अप्रतिष्ठा करण्याची आपली कुवत नाही. म्हणजे मरता मरता शेवटी त्या म्हाताऱ्यानेच संघाच्या फॅसिझमला पाचर मारली व या देशातील फॅसिझम विरोधी आंदोलनाला मदत करुन गेला.
फॅसिझमशी लढाईतील निर्णायक महत्त्वाचा मुद्दा हा जनसमूहांशी जिवंत नाते असलेल्या राजकारणाचा आहे. गांधीनी हिंदुत्ववाद्यांना डोके वर काढू दिले नाही याचे एक कारण त्यांचे मासेसशी घट्ट नाते असलेले राजकारण हे होते.
२) त्यामुळेच समाजवाद्यांनी माती खाऊन ४० वर्षे झाली. या ४० वर्षात उत्तरोत्तर संघ परिवाराची ताकद वाढतच गेली. त्याला रोकण्याचा मार्ग
“प्रश्नांचे आकलन होण्यासाठीची आणि कृतीला मार्गदर्शन करणारी तात्त्विक बैठक इतिहास आणि समाजाच्या शास्त्रीय विश्लेषणातून घडवली जाते- अशा विश्लेषणाचे प्रभावी हत्यार म्हणजे मार्क्सवाद! ” — नचिकेत कुलकर्णी
ह्या मार्क्सवादाचे पंडीत असलेल्या कम्युनिस्ट व पुरोगाम्यांना सापडत नाहीए.
राजकारण ही गतिमान परिवर्तनशील व जिवंत प्रक्रिया आहे. ४० वर्षांपूर्वी घडून गेलेल्या चुका दुरुस्त करता येत नसतील उलट अधिकच जटिल होत असतील तर काहीतरी गंभीर कारणे आहेत ती शोधण्या ऐवजी सबबी सांगून प्रश्न सुटणार नाही.
व्ही. पी. सिंगनी मंडलच्या अंमलबजावणीची घोषणा केल्यामुळे आघाडीतून भाजप बाहेर पडला व अडवाणींनी रथयात्रा सुरू करताना “मंडल काढल्यामुळे आम्हाला कमंडल काढावे लागले ” असे विधान केले. काँग्रेसने ४० वर्षे मागासवर्गिय आयोगाला विरोध केला. मार्क्सवाद्यांच्या पश्चिम बंगाल सरकारने बंगालमधे ओबीसी नाहीत असा जावई शोध लावला होता. (व शरद् पाटलांनी त्याला खोडून काढले होते ). मार्क्सवाद्यांच्या ब्राह्मण्याचे दाखले अनेक आहेत ( प्रदीर्घ काळ सत्तेवर राहूनही माणसे ओढणाऱ्या रिक्शाना यंत्रे लावण्याची संवेदनशीलता मार्क्सवाद्यांनी दाखवली नाही जी एम. जी. रामचंद्रन यानी तामिळनाडूत सायकल रिक्षांना यंत्रे लावून दाखवली ) ओबीसींच्या प्रश्नावर भाजप आणि काँग्रेस आणि मार्क्सवाद्यां मधिल साम्य लक्षणिय आहे. ओबीसी आरक्षणा बरोबरच महिला आरक्षणाच्या मुद्यावर काँग्रेस, कम्युनिस्ट व भाजपची साठ गाठ जमली होती आणि वृंदा कारत, सुषमा स्वराज व रेणुका चौधरी एका सुरात बोलत होत्या.
हिंदुंच्या अनुनयासाठी राजीव गांधींनी ४० वर्षे कोर्टाने बंद ठेवलेले बाबरी मशिदीचे दरवाजे उघडायला परवानगी देणे व नंतर पंतप्रधान नरसिंह राव व संरक्षण मंत्री शरद पवार यांच्या सरकारने बाबरी मशिदी वरील प्रच्छन्न हल्ल्याच्या वेळी तिच्या संरक्षणाची जबाबदारी नाकारणे या घटनांनी संघाची ताकद वाढविण्याचे काम केले. या घटनांना चुका म्हणणे चुकीचे आहे हे काँग्रेसच्या ब्राह्मण्याचे दाखले आहेत. ब्राह्मण्याचे तत्त्वज्ञान व ब्राह्मणी वर्चस्वा शी संघर्ष घेण्याची टाळाटाळ करणारे काँग्रेस, मार्क्सवादी व समाजवादी या देशातील फॅसिझमचा पराभव करूच शकणार नाहीत.
संघाबरोबरच्या संघर्षाची ठोस वैचारिक भूमिका ( narrative ) व कार्यक्रम काँग्रेसने मांडल्या शिवाय निव्वळ पक्षिय आघाडीची भूमिका मान्य नाही. असे निवेदन नितीश कुमारनी केले आहे. कारण आघाडीच्या राजकारणात मित्र पक्षांना दगा देण्याचा काँग्रेसचा इतीहास, काँग्रेसचे ब्राह्मणी नेतृत्व, वैचारिक वारसा, इतिहास आणि बहुजन विरोधी कारभाराचा अनुभव पहाता काँग्रेस संघ विरोधी आंदोलनाचे नेतृत्त्व करु शकेल का याबद्दल शंकाच आहेत. आज काँग्रेसवाल्यांची भाजपकडे लागलेली रिघ व मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी रामजन्मभूमी आंदोलनात घेतलेली उडी काँग्रेसच्या वैचारिक दिवाळखोरीची साक्ष आहे.
नचिकेत कुलकर्णी यांच्या समाजवादी साथी खाती फॅसिझमची माती या लेखाने समाजवादी साथींना चक्क मिरचीचाच उतारा मिळाल्यासारखे ते थयथय नाचत आहेत. कुलकर्णी हे जणूकाही राहूल गांधींच्या मांडीवर बसलेले आहेत आणि त्यांना साक्षात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी दुधभात भरवत आहेत, असे कपोलकल्पित चित्र मनामध्ये रंगवून मार्क्सवादी तत्त्वज्ञानाच्या अज्ञानाच्या न्यूनगंडाला अहंगडामध्ये परावर्तित करून द्राक्ष आंबटच्या अविर्भावात विविध रंगांच्या साथींनी जो मोरपंखी प्रश्नभडीमार सुरू केला आहे, त्याला खरेतर खूप खोलात जाऊन उत्तर देता येईल. मात्र फार खोलीच्या तात्त्विक पाण्यात पोहोण्याची सवय नसलेल्यांना डुचमळता डुचमळताच बुडी मारायला लावावे लागते. त्या बुडीतही त्यांचे जीव घाबरेघुबरे होऊन काठावर उडी मारण्याचीच शक्यताच अधिक. त्यामुळे याबाबत जे काही वाटते ते समाजवाद्यांचा जीव घाबराघुबरा होऊ नये, याची विशेष दक्षता घेत शब्दांत उतरवण्याचा प्रयत्न करतो.
काँग्रेसच्या ब्राह्मणी चारित्र्याचे समर्थन नचिकेत कुलकर्णी यांच्या लेखात कुठे केले असल्याचे दिसले तरी नाही. असो काँग्रेसने या देशात राज्य करताना उच्च जात-वर्गाच्या हितसंबंधांना बाधा आणण्याचे काम केले नाही, किंबहुना ते हितसंबंध सांभाळणे हेच काँग्रेस पक्षाच्या अस्तित्वाचे मुख्य लक्षण आहे. प्रश्न आहे तो फॅसिजमचा. फॅसिजम ही हुकमशाही व्यवस्था कायम एखाद्या समुहविशेषाच्या द्वेषावर उभी राहते व पोसली जाते. जर्मनीमध्ये ती ज्यूंच्या द्वेषावर उभी राहिली होती. भारतातील फॅसिजम हा केवळ आणि केवळ मुस्लिमांच्या द्वेषावर उभा राहिलेला आहे. टिळकांच्या मृत्यूपश्चात लोकशाही मार्गाने राज्यशकट हाती घेता येणे शक्य नाही म्हणून इथल्या ब्राह्मणी विचारधारेतून संघाची स्थापना झाली. खरे पाहाता काँग्रेसचे नेतृत्वही ब्राह्मणीच असताना अशा वेगळ्या संघटनेची गरज कशातून निर्माण झाली असावी? तर त्याचे उत्तर पेशावाईत सापडते. इंग्रजी युनियन जॅक देशावर फडकला तेव्हा महाराष्ट्रातून सत्ताच्युत कोण झाले होते या इतिहासाचा थोडासा अभ्यास केल्यास ते लगेचच कळेल. असो सांगण्याचा मुद्दा असा की समाजवादी वगळता इतिहासात कुणाच्याच चूका झाल्याच नाहीत, असे विश्लेषण कुलकर्णी यांचा लेख कुठेच करत नाही. किंबहुना कम्युनिस्टांच्या चुकांवरही लेख बोट ठेवतो. अर्थात ती जाता जाता दिलेली टपली आहे, असे अनेक समाजवाद्यांना वाटत असावे. लेखाचा मूळ उद्देश आहे तो मुस्लिमांप्रती प्रचंड विद्वेष पसरवणाऱ्या विचारधारेच्या संघाने या देशात बाबरी विध्वंस आणि गुजरात कत्तलीनंतर देशाची संपूर्ण सत्ता स्वबळावर मिळवलेली आहे. देशभरात गोमातेवरून अखलाकपासून सुरू झालेली मालिका जुनैदवर येऊन थांबलेली नाही. अशा वेळी मुख्य शत्रू कोण आहे याचे भान समाजवादी का बाळगत नाहीत त्याची समाजशास्त्रीय मांडणी या लेखात आहे, असे दिसते. लेखकाने या सगळ्याचे कारण समाजवाद्यांच्या इतिहासात लपलेले आहे. फॅसिजमसोबतचा समाजवादी घरोबा ही मूळ भारतीय समाजवाद्यांची नव्हे तर त्यांना परदेशातून कायम मदत करणाऱ्या जर्मन लोकशाही समाजवाद्यांचीच परंपरा आहे, याचेही थोडे विश्लेषण केले असते, तर महाराष्ट्रातील विविध गटातटात व जातींमध्ये विभागलेल्या समाजवाद्यांना कदाचित ही लागलेली मिरची थोडीशी सुसह्य होऊ शकली असती. अर्थात हे असेच झाले असते का, ही मिरची त्यामुळे कमी लागली असती का तेही समाजवाद्यांचे आजवरचे उपद्व्याप पाहता ग्यारेंटीने सांगता येत नाही. कुलकर्णी यांच्या लेखावर अनेक प्रतिक्रिया व्हॉट्सअप या समाजमाध्यमावरही फिरत आहेत. त्यात संजीव साने यांचीही एक प्रतिक्रिया वाचनात आली. हे समाजवादी परिवारातीलच संजीव साने आहेत किंवा कसे हे माहित नाही. मात्र या प्रतिक्रियेत `नचिकेत कुलकर्णी यांचे विवेचन भेदक आहेच पण जणूकाही फॅसिजम हाच जगातला एकमेव प्रश्न आहे…’ असे वाक्य आहे. कुलकर्णी यांच्या लेखाचा नेमका उद्देशच समाजवाद्यांच्या या फॅसिजम प्रती असलेल्या कमी आकलनशक्तीला समोर ठेवून लिहिण्याचा आहे, हे सर्वसाधारण तत्वज्ञान, राजकारण, समाजशास्त्र माहित असलेल्या समजू शकते. सध्या देशात फॅसिजमच नाही तर अनेक प्रश्न आहेत. अगदी रस्त्यावरील खड्ड्यांपासून रेल्वेच्या अनियमिततेबद्दल अनेक प्रश्नांनी जनता भेडसावलेली आहे. तरीही फॅसिजम का महत्त्वाचा वाटतो हे समजण्यासाठी मार्क्सवादी तत्त्वज्ञान समजण्याची गरज असते, हे कुलकर्णी यांचेच नाही तर एरिक हाॅब्जवॉम यांचेही म्हणणे होते. अर्थात एरिक हॉब्जवॉम हे मार्क्सवादी बुद्धिवंत असल्यामुळे त्यांच्या ठायी वसंत बापटांइतकी कुठेय प्रतिभा असा प्रतिप्रश्न येऊ शकतो, असो.
पिछड्यांना सौमे साठ पावे हा उद्घोष करणाऱ्या आदरणीय डॉ. राममनोहर लोहिया यांना या देशातील मुस्लिमांचे प्रश्न कळले नव्हते हे मानायला जागा नाही. आज ज्यांची अवस्था दलितांपेक्षाही वाईट आहे अशा मुस्लिम समाजाची तेव्हाची अवस्था दलितांपेक्षा फार चांगली होती का? त्याचे भान नेहरूंना होते, त्यामुळेच पाकिस्तानात गेलेल्या मुस्लिमांचे मनपरिवर्तन होऊऩ ते परत भारतात येतील व जगाच्या अंतापर्यंत मी त्यांची वाट पाहिन, असे त्यांचे म्हणणे होते. मग ज्या साठच्या दशकात आदरणीय लोहियाजींनी जनसंघासोबत बडी आघाडी केली तेव्हा जनसंघाचे या देशातील मुस्लिमांबाबतचे मत हे केवळ चुकीचेच नसून या देशाला खड्ड्यात नेणारे आहे. या देशातील अल्पसंख्यांकांना हिंसेला तोंड द्यायला लावणारे आहे, त्यांचे शोषण करणारे आहे, असे त्यांना का वाटले नसावे? हे नक्कीच इतक्या मोठ्या मनाच्या नेत्याला वाटलेच असणार तरीही त्यांनी ही आघाडी उभी करून भारतीय राजकारणाच्या परिघाबाहेर असलेल्या उजव्या हिंदुत्ववाद्यांना सोबत घेतले त्या मागे व्यक्तीद्वेष आणि मार्क्सवादद्वेष या पलिकडे कुठले कारण आहे, याचे उत्तर समाजवादी देत नाहीत.
भारतीय कम्युनिस्टांना जात ही या देशातील महत्त्वाची काँट्रॅडिक्शन आहे हे समजून घेता आले नाही. त्यापायी उजव्या, डाव्या व अतिडाव्या कम्युनिस्टांनी मोठ्या चूका केल्या. समाजवाद्यांनी याला माती खाल्ली असे म्हणायलाही हरकत नाही. मात्र यावरचा उपाय देखील कॉ. शरद् पाटील यांनीच शोधला. शरद् पाटील हे स्वतःला शेवटपर्यंत कॉम्रेड म्हणवत होते, असे म्हणणे या महान दार्शनिकावर अन्याय करणारे ठरेल. कारण ते केवळ म्हणवण्यापुरते कॉम्रेड नव्हते तर त्यांनी सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली व शोषितांच्या राज्यव्यवस्थेसाठी अव्याहत स्वतःच्या हाडाची काडं केली.
मार्क्सचे योगदान हो दोन टप्प्यांमध्ये पाहावे लागते. त्याची आर्थिक मांडणी व त्याचे तत्त्वज्ञान त्याची आर्थिक मांडणी ही त्या काळातील इंग्लंड व युरोपातील भांडवलशाहीला दिलेला पर्याय होता. कालानुपरत्वे भांडवलशाहीच्या विषाणुने आपले स्वरूप बदलले असल्याने त्यात बदल व्हायला हवा असे काहीसे अनेक समाजवादी धुरीण म्हणत असतात. खरे तर मार्क्सच्या मांडणीमध्ये त्याच्या नंतर लेनीन, माओ, ग्रामश्ची, अल्थुजर, ते अगदी शरद् पाटलांपर्यंत अनेकांनी योगदान दिलेले आहे. मात्र मार्क्सने तत्त्वज्ञानाच्या पातळीवर दिलेला द्वंद्वात्मक भौतिकवाद, ऐतिहासिक भौतिकवाद याला पर्याय असल्यास तो समाजवादी धुरीणांनी समजावावा. तत्त्वज्ञान हे भविष्याचा वेध घेणारे शास्त्रांचे शास्र असते, वैश्विकता हा त्याचा महत्त्वाचा गूणधर्म असतो,हे मार्क्सवाद सांगत नाही, हा तत्त्वज्ञानाचाच नियम आहे, इतके तरी समाजवाद्यांना मान्य असावे, असे गृहित धरायला हरकत नाही.
काँग्रेसने केलेल्या चुकांचा बदला घेण्यासाठी फॅसिस्टांच्या मांडीवर जाऊन बसण्याचे अजब तर्कट समाजवादी लावतात ते केवळ त्यांच्या तत्त्वज्ञानाच्या अभ्यासातील कमतरतेचेच द्योतक आहे. माओ आपल्या ऑन काँट्रॅडिक्शन या निबंधात म्हणतात की, तुमच्या आजुबाजुला अनेक काँट्रॅडिक्शन्स असतात. अगदी शेजाऱ्याशी नळावरून सुरू असलेला वादही काँट्रॅडिक्शनच असते. मात्र यातील काही शत्रूभावी असतात तर काही अशत्रूभावी. यातील महत्त्वाची किंवा सर्वात महत्त्वाची काँट्रॅडिक्शन शोधून तुम्हाला त्यावर प्रहार करावा लागतो. तेव्हाच क्रांती जन्म घेत असते. समाजवाद्यांच्या न्यूनगंडाची माफी मागून हे सांगण्याचा प्रयत्न मी यासाठी करतो आहे की, या देशातील फॅसिजमपेक्षा कोविंद या दलित समाजातील संघीय व्यक्तीला राष्ट्रपतीपदावर बसवणे त्यांना महत्त्वाचे वाटते. फॅसिजमची इथे वाढ होईल यापेक्षा बडीआघाडी करून काँग्रेसला सत्ताच्युत करणे त्यांना महत्त्वाचे वाटते. अण्णा हजारेंसारख्या बिनडोक नेत्याच्या कच्छपी लागून भ्रष्टाचार भ्रष्टाचार ओरडण्याचीही त्यांना खुमखुमी असते. अहो इतकेच कशाला जनसंघाच्या मांडीवर बसून जयप्रकाश यांनी क्रांती केली असाही उदघोष समाजवादी साथी करत असतातच.
काही समाजवादी साथींना समाजवादी परिघाबाहेरील संघटनांना गांधीवाद समजावणे हे त्यांचे परमकर्त्यव वाटते. ते वाटणेही काही अयोग्य नाही. त्यामुळे काही समाजवाद्यांनी आंबेडकरवाद्यांना गांधीवाद शिकवण्याचे हाती घेतलेले प्रकल्प कदाचित पूर्ण झाल्यामुळे ते आता कम्युनिस्टांना गांधीवाद शिकवण्याकडे झुकल्यासारखे बोलत असतात. गांधीजी हे सेक्युलर, लोकशाहीवादी नेते होते याबाबत दुमत असण्याचे कारणच नाही. मात्र त्यांच्या वर्गशोषणाबाबतच्या भूमिकांबाबत समाजवाद्यांची भूमिका काय? मुख्य म्हणजे देशात लोकशाही समाजवादी क्रांती झालीच जयप्रकाशजींनी केली तशी वजा संघ परिवार, असा सकारात्मक विचार आपण करुयात, तर या देशात खाजगी भांडवलाला वाव असणार की नसणार? भांडवलशाही ही शोषणाची प्रक्रिया आहे की नाही? समाजवाद्यांच्या हाती राज्य आले की ते राज्य ते प्रामाणिकपणे चालवणार यात शंका नाही, मात्र त्या प्रामाणिकपणाची चौकट काय? कारण संघ परिवार त्यांच्या चौकटीत प्रामाणिकपणेच राज्य चालवत आहे.
जॉर्जी दिमित्रॉव्ह यांनी फॅसिजमचा धोका हा कितीतरी आधी ओळखून त्याच्या विरोधात व्यापक आघाडीची भूमिका मांडली होती. प्रकाश बाळ यांच्या लेखात कम्युनिस्टांना सुनावलेल्या गोष्टी या दिमित्रॉव्ह यांनी कितीतरी आधीच सुनावलेल्या आहेत. मात्र त्यातून धडा घेण्याचा शहाणपणा अनेकदा कम्युनिस्ट करत नाहीत. त्या वेडेपणातूनच हिटलर जन्मतात. जर्मनीपासून इटलीपर्यंत आणि स्पेनमधील फ्रँकोच्या राजवटीपर्यंत कम्युनिस्टांमधील भविष्याचा वेध घेण्याची ही क्षमता कमी पडली यात काहीच वाद नाही. त्यावर जगभरातील कम्युनिस्टांनी विपूल लिखाण केले असून ते आत्मटिकेपरच आहे. अर्थात ही आत्मटिका कम्युनिस्टांनाच करावी लागणार कारण हा वेध घेण्याची क्षमता मार्क्सवादी तत्त्वज्ञानाचे हत्यार असल्यामुळे त्यांच्याकडेच आहे, हेही लक्षात घ्यायला हवे.
काँग्रेसच्या राजकारणामुळे काही समुहांना सेनेसारख्या गोटात ढकलल्याचा शोध जसा काही समाजवाद्यांना लागला त्याच प्रमाणे काही समाजवादी पाटलांना नेहरूंना गांधीचा आकस होता, असाही भगवा शोध लागला आहे. समाजवाद्यांच्या विचारधारेशी टोकाचे मतभेद असूनही त्यांच्या त्यागाबाबत व जातीविषमता विरोधी निष्ठांविषयी कधीही संशय घेता येणार नाही. मात्र सध्या काही समाजवादी साथींमधील धुरीण डाव्यांच्या नेणीवा स्वतःच्या मागास जातींचा फायदा घेत तपासण्याचा स्वयंस्फूर्त कुटीर उद्योगाची धडपड करीत आहेत. या धडपडणाऱ्या समाजवादी साथींनी या देशातील मुस्लिमांबाबत नितीश कुमार ते कपिल पाटील व्हाया जयंत धर्माधिकारी आणि रेखा ठाकूर यांचे नक्की मत काय ते सांगावे आणि त्यानंतर खुशाल कोविंद नावाच्या फॅसिस्ट पक्षाच्या दलिताचे समर्थन करावे.
– समर खडस
ha Samar khadas toch chutiya ka ..jo TV var yedo kadhi kadhi lamb kes ani chashma wala…nako titki akkal pajalat asto…toch ka ha?
होय. मीच तो समर खडस. पण तू आपलं खऱ्या नावाने का नाही वावरत ?
आताच तुझ्या कंपनीच्या (असेंचर) एका एच आर व्ही पी बरोबर बोलणं झालं माझं. तो म्हणालाय कि आमच्या कंपनीत, कंपनीचं नेटवर्क वापरून हे सगळं करणारे लोक नको आहेत. हि केस वापरून इतर कर्मचाऱ्यांना धाक बसेल अशी कारवाई तात्काळ करतो म्हणाला.
भारतीय राजकारणाच्या रंगमंचावर संघ परिवाराला समाजवादी साथीनी कशा प्रकारे प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आणि सत्तेच्या सर्वोच्च स्थानीं कसे नेले, याचे मुद्देसूद विश्लेषण नचिकेत कुलकर्णी यांनी उपरोक्त लेखात करून दिले आहे. हे वाचताना मला समाजवादी शाहीर वसंत बापट