fbpx
सामाजिक

संस्कारी गर्भवती – स्त्रियांच्या लैंगिकतेवर मनुवादी पहारा!

संस्काराचा संबंध संस्कृतीशी असतो. आपल्या देशातील संस्कृती एकसाची, एकजिनसी स्वरुपाची नाही, तर ती बहुविध स्वरुपाची आहे. बहुजनांच्या या बहुविविध संस्कृतीला नेस्तनाबूत करुन ब्राह्मणी-पुरुषसत्ताक संस्कृती म्हणेज एकमेव संस्कृती आणि त्यानुसार वर्तन म्हणजेच फक्त संस्कार या नव्या भ्रमात भारतीयांना गुंतवण्याचाही हा एक डाव आहे. ग्रामीण बोली, देशी बोली, मांसाहार करणे, बेधडकपणे जीवन जगणे, मनाला आवडेल त्यांची चरित्र्ये वाचणे, त्यावर लिहिणे, स्वच्छंदी वागणे याही बाबी संस्कारात येतात, पण त्या `आमच्या’  संस्कारात येत नाहीत म्हणून तुम्ही करायच्या नाहित हा दहशतवाद कशासाठी?

प्रा. प्रतिमा परदेशी

संस्कारी गर्भवती निर्माण करण्याचा केंद्र सरकारने गेल्या तीन वर्षांपासून जणू विडाच उचलला आहे. आयुश मंत्रालय तर कधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आघाडी `आरोग्य भारतीच्या’ वतीने संस्कारी गर्भवती निर्माण करण्यासाठी विविध उपाय ते सुचवत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी पुत्रकामेष्टी यज्ञातुन उंच, गोरी मुले निर्माण करण्याचा फंडा मांडला होताच. आता केंद्र सरकारच्या आयुश खात्याकडुन एक पुस्तिका प्रसिध्द करण्यात आली आहे, ज्यातुन संस्कारी गर्भवती चे धडे दिले गेले आहेत. या पुस्तकातुन तीन बाबी ते स्त्रियांवर थोपवत आहेत. (१) गर्भवती स्त्रियांनी मांसाहार करु नये (२) गर्भवती झाल्यानंतर शरीर संबंध ठेऊ नये. (३) गर्भधारणेनंतर प्रभावी व्यक्तिंविषयी वाचन करावे.

`संस्कारी गर्भवती’ ही योजना रा.स्व.संघाच्या आदेशावर चालणार्‍या सरकारने जाहीर केल्यामुळे पहिली शंका उपस्थित होते ती म्हणजे संस्कारी गर्भवती म्हणजे नेमकं काय? संस्कारी गर्भवती आहोत हे सिध्द करण्याचा पहिला मार्ग सांगितला आहे तो मांसाहार न करण्याचा. मांसाहारी व्यक्तिंमध्ये संस्कार नाहीत हे त्यांनी आधीच जाहीर करुन टाकले आहे. याला कोणताच वैज्ञानिक, सैध्दांतिक आधार नाही. वास्तविक मांसाहार सर्वात प्रथिनयुक्त आणि हिमोग्लोबिनयुक्त आहार असल्याचे स्त्रीरोगतज्ञापासून सर्वच डॉक्टर सांगतात. त्याला वैज्ञानिक आधारही आहे. परंतु आपल्या उदरात वाढणार्‍या जीवाच्या चांगल्या भरणपोषणासाठी गर्भवतींनी हा प्रथिनयुक्त आहार त्याज्य करावा असा आदेश दिला गेला आहे. ब्राह्मणी मूल्यकल्पनांनुसार अभक्ष भक्षण म्हणून मांसाहाराकडे बघितले गेले आहे. इतकेच नाही तर जातीनिर्मितीचे एक कारण जे अभक्ष भक्षण  करत होते त्यांना हिन मानले जाऊ लागले असे दिले गेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी `भारतातील जाती’ या निबंधात या मताचे खंडन केले आहे. `अभक्ष भक्षण’ यातुन नव्हे तर स्त्रियांवर बंधने लादुनच जातीव्यवस्था घट्ट केली गली हा महत्वपूर्ण सिध्दांत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडला आहे. परंतु याला आरएसएसचा पूर्ण विरोध आहे.

जातीव्यवस्थेला अधिक दृढमूल करण्यासाठी ते आता स्त्रियांच्या लैंगितेवर, जननक्षमतेवर नियंत्रण घट्ट करुन जातीव्यवस्था नव्या स्वरुपात संस्कारी गर्भवती या गोंडस नावाखाली पुनरुत्पादित करत आहेत.

संस्काराचा संबंध संस्कृतीशी असतो. आपल्या देशातील संस्कृती एकसाची, एकजिनसी स्वरुपाची नाही, तर ती बहुविध स्वरुपाची आहे. बहुजनांच्या या बहुविविध संस्कृतीला नेस्तनाबूत करुन ब्राह्मणी-पुरुषसत्ताक संस्कृती म्हणेज एकमेव संस्कृती आणि त्यानुसार वर्तन म्हणजेच फक्त संस्कार या नव्या भ्रमात भारतीयांना गुंतवण्याचाही हा एक डाव आहे. ग्रामीण बोली, देशी बोली, मांसाहार करणे, बेधडकपणे जीवन जगणे, मनाला आवडेल त्यांची चरित्र्ये वाचणे, त्यावर लिहिणे, स्वच्छंदी वागणे याही बाबी संस्कारात येतात, पण त्या `आमच्या’  संस्कारात येत नाहीत म्हणून तुम्ही करायच्या नाहित हा दहशतवाद कशासाठी? काय खायचे आणि काय खायचे नाही याचे फतवे काढणे म्हणजे संस्कृतीतील बहुविविधता नाकारण्यासारखेच आहे. बीफ बंदी, आता मांसांहार बंदी हे ब्राह्मणी आहारशास्त्र बहुजनांच्या माथी मारणे हा सांस्कृतिक दहशतवादच आहे. आहाराचे स्वातंत्र्यच नाही असे म्हणणे संविधानविरोधी आहे. गर्भवतींनी म्हणे सात्विक आहार घ्यावा. सात्विक आहार म्हणजे काय, तर दुध, तुप, फळे इ. शूध्द शाकाहारी अन् मांसाहार काय अशूध्द? कोणी ठरवले हे निकष? या मनुवादी संकल्पनाव्युहांचा परिणाम अनेक अन्नपदार्थ बनविण्याचे मार्गदर्शन करणार्‍या व्यावसायिक पुस्तकातुनही ओतप्रोत भरला आहे. या रेसिपीज बुक मध्ये घडीच्या पोळ्या, सुरळीची वडी, पुरणपोळी इ. इ. पदार्थ भारतीय थाळी म्हणून सांगितले जातात. बोंबलाची चटणी, सोडे (सुके झिंगे) घालुन केलेली वांग्याची भाजी, इ. इ. भारतीय थाळी नाही का? खाद्यसंस्कृती ते आहारशास्त्राचे सनातनीकरण आजवर केले गेले आहेच. आता गर्भवतींचा अनाहुत सल्ले देताना सरकारस्तरावरुन हे घडत आहे हा मोठा धोका आहे.

गर्भवती स्त्रियांना काही पदार्थ खाण्याची इच्छा होत असते. डोहाळे जेवणाचे सोहळे करुन ते पुरविले जाण्याची पध्दत आहे. मग मांसाहाराचे डोहाळे लागले तर? सुकटीची  चटणी खाविशी वाटली तर? संस्कारी अपत्ये जन्मणार नाहीत की काय? मांसाहाराच्या डोहाळ्यांचे करायचे काय? की ब्राह्मणी राष्ट्रासाठीच्या तथाकथित संस्कारित मुलांसाठी स्त्रियांनी नेहमीप्रमाणे त्यागच करायचा? हा दहशतवाद स्त्रियांनी गाडलाच पाहिजे. या सांस्कृतिक दहशतवादाला आमचा ठाम नकार आहे हे उच्चरवाने सांगण्याची गरज आहे.

गर्भवतींनी शरीर संबंध करु नये हे स्त्रीपुरुष संबंधांवरचे सरकारी नियंत्रण कशासाठी. पालक होणार्‍या स्त्रीपुरुषांना याची समज असते, बाळंतपणात काही अडचणी येणार असतिल तर डॉक्टर्सही सल्ला देतात. पण जबाबदार पालकांना शरीरसंबंध ठेऊ नका हे सांगणे हे व्यक्तिच्या सर्वांगीण जीवनावर नियंत्रण प्रस्थापित करण्याचाच एक भाग आहे. आरोग्य भारतीने स्त्री-पुरुष कोणत्या दिवशी, कोणत्या वेळी, कोणत्या ठिकाणी, कसे एकत्र आले तर पुत्र ऊंच – गोरा होणार हे सांगणे आणि आता आयुश खात्याने पुस्तिका प्रसिध्द करुन असे फतवे देणे यात साम्य आहे.

याच पुस्तिकेत गर्भवतींनी प्रभावशाली व्यक्तिंविषयी वाचन करावे हा धडा ही फारच निसरडा आहे. या देशात विद्येची देवता म्हणे सरस्वती नावाची एक स्त्री, बाळाच्या कपाळावर भविष्य लिहून जाते ती म्हणे सटवाई. पण मनुस्मृतीनुसार तर मन स्त्रीशूद्राय मतिम् दध्यातफचा दंडक! स्त्रियांवर ज्ञानबंदी लादणार्‍या धर्म-संस्कृतीतुन सटवाई, सरस्वती निर्माण होणार तरी कशा? ज्ञानबंदीच्या ब्राह्मणी दंडकामुळे आज २१ व्या शतकातही बहुजन मुलींचे शिक्षणातील गळतीचे प्रमाण अधिक आहे. वयात येताच विवाह करुन टाकण्याचा दंडक इ. कारणांमुळे मुलींचे उच्च शिक्षणातील प्रमाण जेमतेम आहे. यावर उपाय सांगायचे नाहित आणि गर्भवती असताना वाचन करा असा सल्ला द्यावचा ही ज्ञानव्यवहारातुन मनुवादाच्या परिणामातुन परिघा बाहेर फेकल्या गेलेल्या स्त्रियांचा उपहास करण्यासारखेच आहे. आजचे जातपुरुषसत्ताक – वित्तभांडवली   समाजव्यवस्थेत स्त्रिया असंघटित क्षेत्रात मोठ्या प्रमाणात फेकल्या गेल्या आहेत, अब्जावधी स्त्रिया अंगमेहनतीची कामे करत आहेत, गर्भवती असणार्‍या अशा स्त्रियांना  नवव्या महिन्यापर्यंत काबाडकष्ट करावे लागत आहेत, त्यांना प्रभावशाली व्यक्तिंविषयी वाचा असा सल्ला सरकार देऊ तरी कसे शकते? आधी त्यांना समान कामाला समान दाम मिळाला पाहिजे, सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. सरकार त्याबाबत मूग गिळुन गप्प बसले आहे.

शिवाय प्रभावशाली व्यक्ति म्हणजे कोण? सध्या देशात एक आणि एकमेव प्रभावी व्यक्ति म्हणजे नरेंद्र मोदी! असाही फतवा अघोषितपणे जारीच आहे. त्यांच्यावर टिका करण्यांबद्दल, काही प्रश्‍न उपस्थित करणार्‍यांबद्दल काय आणि कशाप्रकारे बोलले जाते, धमाकवले जाते याचा अनुभव आपण सोशल मिडीयावरुन दररोज घेत आहोत. मग काय गर्भवतींनी `मोदी चालीसा’ पठण करायचा काय? यावर कदाचित असे उत्तर संघभाजपाकडून दिले जाईल की राम, कृष्ण अशा राष्ट्रपुरुषांविषयी त्यांनी वाचावे. फारतर पुढे जाऊन आपण फार आधुनिक विचारांचे आहोत असे भासविण्यासाठी ए.पी.जे. अब्दुल कलाम, धिरुभाई अंबानी इ. यांची चरित्रे वाचावित असाही अनाहुत सल्ला दिला जाऊ शकतो. पण या पुस्तकात आणि संघ-भाजपाच्या प्रभावळीकडून कधी स्त्रीसत्ताक गणराज्याची राणी निर्ऋती, बळीराजा,गौतम बुध्द, चार्वाक, संत बसवेश्‍वर, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे…अशी नावे घेतली जात नाहीत आणि घेतली जाणारही नाहीत. कारण ती समताधिष्ठत समाजासाठी विचार-कार्य करणारी विचार परंपरा आहे.

त्यानी सांतिलेल्या तीनही सूत्रांमधुन त्यांनी अत्यंत चालाखपणे अल्पसंख्यांक स्त्रियांना वगळले आहे. वि. दा. सावरकरांनी जसे हिंदु शब्दाची व्याख्याच ज्यांची पित्रु भू व पुण्य भू अशी करुन मुस्लिमांना वगळण्याचे राजकारण केले होते. `आयुश विभाग’ त्याच मार्गाने चालला आहे. हिंदु, बौध्द, ख्रिश्‍चन धर्मिय स्त्रियांच्या आहारात मांसाहाराला महत्वाचे स्थान आहे. त्यांना  `संस्कारी गर्भवती’  करायचे  नाही? रास्वसंघाने हेडगेवार यांच्या जन्मशताब्दी वर्षात १५ पुस्तिकांचा संच प्रसिध्द केला होता. त्यात हिंदु कुटुंब, हिंदु समाज जीवन अशा अनेक पुस्तिका आहेत. त्यातही व्यक्तिच्या जीवनावर सर्वांगिण नियंत्रण हेच सूत्र आहे. तो विचार मोदी सरकार आज अमलात आणू पहात आहे. अल्पसंख्यांकांना दुय्यम नागरिकत्व देणे याकडे त्यांची वाटचाल आहे. तेच सूत्र  मसंस्कारी गर्भवतीफ च्या निमित्ताने गेली तीन वर्ष ते मांडण्याचा प्रयत्न करत आहेत.

वादाच्या भोवर्‍यात अडकले की घुमजाव करायचा हीदेखील त्यांची परंपरा आहे. आरक्षण सपवण्याचा मुद्दा मांडायचा आणि अंगावर आला की घुमजाव करायचे याचा अनुभव आपण घेतला आहेच.  `संस्कारी गर्भवती’  प्रकरण अांगलट येणार असे लक्षात येताच आयुश खात्याने माघार घेतली आहे. तो फक्त सल्ला आहे, मानायचा की नाही याचे बंधन नाही वगैरे सांगायला त्यांनी सुरुवात केली आहे. त्यांनी वादावर पडदा टाकायचा जरी प्रयत्न केला असला तरी स्त्रियांच्या कडेकोट नियंत्रणाचा विचार हा त्याच्या एकंदर विचारांचा गाभाभूत भाग आहे. तो ते तात्पुरता बाजुला ठेवतील पण कायमस्वरुपी नाही हे आपण लक्षात ठेवायलाच हवे. जातपुरुषसत्ताक मूल्यांच्या पुरुज्जीवनाचा त्यांचा प्रयत्न हाणून पाडायलाच हवा.

लेखिका अब्राह्मणी स्त्रीवादाच्या पुस्कर्त्या आहेत. राज्यशास्त्राच्या प्राध्यापक असून सत्यशोधक कम्युनिस्ट चळवळीत त्यांचे सक्रिय योगदान आहे.

3 Comments

  1. शुभा Reply

    आता काही दिवसांनी बायकांनी घरून बाहेर पडायचे नाही,शाळा महाविद्यालयात जायचे नाही हे बाकी राहिलंय, अष्टपुत्रा सौभाग्यवती असा आशीर्वाद देणारी आपली संस्कृती,अन्य काय अपेक्षा ठेवणार

  2. मोहन मद्वाण्णा Reply

    गर्भ संस्कार आणि सुवर्ण प्राशन यासारख्या फॅडानी सध्या धुमाकूळ घातला आहे. जे जुन्या ग्रंथात सांगितलेले आहे ते प्रमाण अशा समजावर हे आधारित आहे. सामान्याना काहीं तारतम्य असेल तर त्यास बळी न पडता जो आहार आपले वाडवडील करीत होते तो घ्यावा. आहारात कृत्रिमरीत्या बदल करण्यासारखे काहींही नाही.

  3. ढोक रघुनाथ Reply

    आपलं लेख खूप वास्तवातावादी असून हे खरे आहे, या साठी आपण प्रबोधन लेखाचे द्वारें करून janprabodn केले त्याबद्दल आपले आभार मानावे तेवढे कमीच आहे.

Write A Comment