fbpx
सामाजिक

वेब ३.० : नव्या आभासी जगातील आव्हाने

सगळ्या जगाला कवेत घेऊन भाषा-वर्ण-धर्म-देश इ. बंधने ओलांडत एक जागतिक नागरी प्रबुद्ध विश्व त्यातून तयार होईल असली दिवास्वप्ने तेव्हाही पाहिली गेली होती. प्रत्यक्षात मनोरंजन म्हणून विनावेतन श्रम करणारे अब्जावधी लोक आणि त्यासाठी प्रेरणा म्हणून सातआदिम पापांचा व्यापार हेच प्रत्यक्षात आले. त्याची परिणती अधिकच परात्मीकरणात (alienation) झाली. परात्मीकरण दूर होण्यासाठी सोशल मिडिया, आणि सोशल मिडियाच्या वापरातून अधिकच परात्मीकरण असे हे दुष्टचक्र बनले. त्याचा उपाय हा आभासी वास्तवात शोधला जातो आहे ह्यासारखा क्रूर विनोद नाही.


मेटा (पूर्वीची फेसबुक) ह्या कंपनीचे शेयर्स गुरुवारी २६ टक्क्यांनी घसरले आणि तिच्या बाजारमूल्यात २३० बिलियन डॉलर्सची घट झाली. २०२१ च्या चौथ्या तिमाहीचे निकाल अनपेक्षितरीत्या निराशाजनक होते. पण त्याहून अधिक महत्वाचे म्हणजे कंपनीचे सामाजिक माध्यमांकडून आभासी वास्तव ‘मेटावर्स’ कडे होणारे संक्रमण आणि त्यासाठी आवश्यक गुंतवणूक (सध्या हा एकदा १० बिलियन डॉलर्सहून अधिक आहे) आणि त्याभोवती असणारी अनिश्चितता ह्या सगळ्याचा परिणाम बाजारातील घसरणीत झाला.

मात्र ही भांडवली बाजारातील नेहमीची चढउतार नाही. ह्या घटनेला असलेले संदर्भ, तिच्यात अनुस्यूत भविष्यदर्शन ह्या सगळ्याचा परिणाम संपूर्ण जगावर होणार आहे. माहिती-तंत्रज्ञान आधारित भांडवलशाहीतील हे संक्रमण समजून घेतले पाहिजे, त्याचा अर्थ-सामाजिक- राजकीय असा सर्वांगीण विचारझाला पाहिजे.

सर्वप्रथम मेटा (फेसबुक) च्या निराशाजनक निकालांची आणि त्यानंतर शेयर्समध्ये झालेल्या घसरणीची कारणे पाहू.

१. वाढीला बसलेली खीळ- फेसबुक वापरणाऱ्यांच्या संख्येत प्रथमच आधीच्या तिमाहीपेक्षा अर्ध्या मिलियनने घट झाली. अठरा वर्षांच्या फेसबुकच्या इतिहासात ही पहिलीच घट आहे. फेसबुकच्या इतर प्लॅटफॉर्म्स (इन्स्टाग्राम, व्हॉटसएप) वर वाढ होत आहे खरे पण फेसबुकवर झालेली घट प्रातिनिधिक ठरणार अशी भीती आहे.

२. ‘टिक टॉक’ ची स्पर्धा- चीनच्या ‘टिक टॉक’ ने इंस्टाग्राम पुढे मोठे आव्हान उभे केले आहे. इंस्टाग्रामने व्हिडियो ‘रील्स’ द्वारा टक्कर देण्याचा प्रयत्न केला असला तरी जाहिरात विक्रीत रील्स फारसे उपयुक्त नाही. (व्हिडियोमधल्या जाहिराती टाळून प्रेक्षक पुढे जातात)

३. अॅपल ने आपल्या धोरणात केलेले बदल- ह्या बदलांमुळे अॅपल वापरणाऱ्यांना फेसबुक आणि इतर अॅप्सपासून आपल्या ऑनलाईन कृती गोपनीय ठेवता येऊ शकतात. त्यामुळे फेसबुक इ. च्या जाहिरात विक्रीवर थेट परिणाम होतो.

४. गुगलला मिळालेला लाभ- गुगल फेसबुकप्रमाणे वापरकर्त्यांच्या संबंधित डेटासाठी अॅपलवर जास्त अवलंबून नाही. त्यामुळे अॅपलच्या धोरणबदलानंतर गुगलच्या ई-कॉमर्स संबंधित जाहिरातीत लक्षणीय वाढ झाली.

५. मक्तेदारीविरोधी सरकारी नियमनाची धास्ती- अमेरिका, युरोपात फेसबुकच्याविरुद्ध अनेक नियामक चौकशा सुरु आहेत. फेसबुकने इन्स्टाग्राम, व्हॉटसएपद्वारा सोशल मीडियावर मक्तेदारी स्थापन केली असा त्यांचा रोख आहे. शिवाय ‘केम्ब्रिज अॅनालिटिका’ सारखी प्रकरणे, ‘युझर एंगेजमेंट’ च्या नादात अति-उजव्या, हिंसक शक्तींना पोषक echo chambers घडवणारा algorithm, ह्या सगळ्याचा प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष परिणाम अधिक नियमन, चौकशा यांत होतो आहे.

६. ‘मेटावर्स’ च्या आभासी वास्तवावर गुंतवणुकीची जोखीम.

ह्या सर्व कारणांसोबतच महत्वाचे म्हणजे कोविडच्या संकटानंतर अमेरिका आणि जगभर वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी व्याजदरांत मोठी वाढ अपेक्षित आहे. गेल्या चाळीस वर्षांत घटते व्याजदर, अल्प चलन फुगवटा (महागाई), जागतिकीकरण आणि त्यातून स्वस्त मजूरी ह्या नव-उदार धोरणातही मोठा फेरबदल असणार आहे. ह्याच कालखंडात माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांचा झपाट्याने जो विस्तार झाला त्याला ही सर्व धोरणे साह्यभूत होती. नफा दुय्यम ठरवून केवळ वाढती ग्राहक संख्या, त्यांनी अधिकाधिक वेळ प्लॅटफॉर्मवर घालवणे इ. अपारंपरिक कसोट्या ह्या कंपन्यांच्या कामगिरीला लावल्या जात होत्या त्याला मक्तेदारीप्रवण प्रेरणा जशी होती तशीच अल्प व्याजदराची वित्तीय भांडवलाला पोषक भूमिकाही होती. आता चक्र उलटे फिरू लागलेतर ह्या भीतीने केवळ मेटा (फेसबुक) च नव्हे तर एकंदर तंत्रज्ञान कंपन्यांचा ‘नॅसडॅक’ हा निर्देशांकही चांगलाच घसरू लागला आहे.

त्याचप्रमाणे गेल्या दोन वर्षांत कोविडमुळे ‘वर्क फ्रॉम होम, स्टडी फ्रॉम होम’ इ. मुळे ह्या सर्व तंत्रज्ञान कंपन्यांच्या वाढीला अधिकच बळ मिळाले. पण कोविडची साथ जशी ओसरेल आणि लोक पुन्हा ऑफिसेस, शाळा इ. कडे परतू लागतील तसतसे पारंपरिक मनोरंजन आधारित सेवा उद्योग- नाट्यगृहे, सिनेमागृहे, रेस्टॉरंट्स इ. यांची मागणी पुनर्स्थापित होईल आणि डिजिटल माध्यमांत झालेली वाढ ‘सूज’ होती असा निष्कर्ष निघेल असे एक प्रबळ अनुमान आहे. आणि म्हणूनच वेब ३.० चा आणि फेसबुकच्या ‘मेटावर्स’ चा विचार करणे महत्वाचे आहे.

वेब ३.०
वेब ३.०

स्थूलमानाने ‘वेब ३.०’ चा विचार असा आहे- ‘वेब १.०’ म्हणजे नव्वदीच्या दशकातील माहिती तंत्रज्ञान हे डेस्कटॉप संगणक आधारित होते. वेब ब्राउजिंग, बॅनर अॅड्स, ई-कॉमर्स यांचा विस्तार या काळातला. ‘वेब २.०’ म्हणजे गेल्या १५ वर्षातील स्मार्टफोन आधारित जग. अॅपल आणि गुगल यांच्या ऑपेरेटिंग सिस्टिम्स आणि त्यावर आधारित अॅप्स, नेटफ्लिक्ससारखे वर्गणी आधारित मनोरंजन प्लॅटफॉर्म्स, सोशल मीडिया- ह्या सगळ्याला आधार होता स्मार्टफोन आधारित प्रणालीचा. मात्र ‘वेब ३.०’ हे विकेंद्रित, ब्लॉकचेन आधारित मॉडेल असेल. तिथे प्रचलित मोठ्या मक्तेदारी कंपन्या फार प्रभाव टाकणार नाहीत. माहिती/मनोरंजन निर्माते/ग्राहक आपापसांत अधिक सहजपणे व्यवहार करू शकतील. NFT हे त्याचे एक उदाहरण झाले. त्याचबरोबर खासगी माहिती अधिक प्रभावीपणे गोपनीय राखता येईल. आभासी (virtual) वास्तव, augmented वास्तव ह्यांचा विस्तार आता शक्य होईल. फेसबुकला अभिप्रेत ‘मेटावर्स’ हे त्याचेच एक उदाहरण असेल. सध्या गेमिंगमध्ये प्रचलित तंत्रज्ञानाचा वापर सार्वत्रिक करून खेळाचे सामने, ऑपेरा, मिटींग्स यांत घरबसल्या ‘प्रेक्षक’ म्हणून न राहता थेट ‘अनुभव’ मिळवणे शक्य होईल- मात्र ‘चौथ्या भिंतीचे’ हे कोसळणे ब्रेख्तच्या एपिक थियेटरप्रमाणे कला-उत्पादकाच्या हाती नसून उपभोक्त्याच्या हाती असेल.

ह्या आभासी वास्तवाला प्रत्यक्षात आणण्यासाठी मोठी गुंतवणूक होत आहे (ती एकुणात १३० बिलियन ते १.३ ट्रिलियन डॉलर्स असेल असा ‘गोल्डमनसॅक्स’चा अंदाज आहे). ऱोब्लॉक्सच्या शेयर्सची सार्वजनिक नोंदणी (IPO), मायक्रोसॉफ्ट ने ऍक्टिव्हिजन ब्लिझर्डची (कॉल ऑफ ड्युटी इ. गेम्स चेनिर्माते) ६८ बिलियन डॉलर्सला केलेली खरेदी, फेसबुकचे आगामी मेटावर्स (ऑक्युलस उपकरण वापरत). गेमिंग हा गाभा ठेवून त्यातील अतिवास्तव अनुभव इतर सोशल मीडिया, मनोरंजनातही उपयोगी आणता येतील हा त्यातील हिशोब आहे. संगीत महोत्सव, फॅशन शो, गेमिंग स्पर्धा इ. चे प्रयोग ह्या नव्या आभासी विश्वात होऊ लागले आहेत. शिक्षण, पर्यटन इ. क्षेत्रांतही ह्या आभासी वास्तवाचे महत्व असणार आहे. परवडत नाही अशांनाही ‘वर्गणी’ तत्वावर सामावून घेऊन व्यवहार्य बिझनेस मॉडेल्स होऊ शकतील असा अंदाज आहे. वर म्हटल्याप्रमाणे कोविड लॉकडाऊन हा त्याला अतिशय पूरक ठरलेला घटक आहे. ‘गोल्डमन सॅक्स’च्या मते ८ ट्रिलियन डॉलर्स इतका ह्या नव्या आभासी अर्थव्यवस्थेचा पसारा असणार आहे.

‘वेब ३.०’ च्या अनुषंगाने तंत्र-वित्त जगतात एक वाद सुरु आहे तो म्हणजे ह्या तंत्राच्या विकेंद्रीकरणाचा आणि त्यातून मोजक्या बलाढ्य कंपन्यांऐवजीछोट्या उत्पादकांना बळ पुरवण्याचा दावा. गमतीची गोष्ट अशी की तंत्रज्ञानाची कुठलीही नवी प्रगती हाच दावा करत होत आलेली आहे. परंतु त्यासाठीची पायाभूत गुंतवणूक जेव्हा खासगी भांडवल करत असते तेव्हा भांडवलाचे सारे नियम अपरिहार्यपणे त्याला लागू होतात. नव्वदीच्या दशकात माहिती-आधारित जागतिकीकरण जेव्हा होत होते तेव्हा हाच दावा मुख्य आकर्षण होता. अर्थातच अर्थव्यवस्थेत त्यातून नवनवे उद्योग उदयाला आले, नवी कौशल्ये, नव्या शक्यता तयार झाल्या. मात्र कळसूत्री चालक म्हणून अतिबलाढ्य अशा फेसबुक, गुगल, अमेझॉन, नेटफ्लिक्स इ. मक्तेदारी भांडवली कंपन्या प्रस्थापित झाल्या. सगळ्या जगाला कवेत घेऊन भाषा-वर्ण-धर्म-देश इ. बंधने ओलांडत एक जागतिक नागरी प्रबुद्ध विश्व त्यातून तयार होईल असली दिवास्वप्ने तेव्हाही पाहिली गेली होती. प्रत्यक्षात मनोरंजन म्हणून विनावेतन श्रम करणारे अब्जावधी लोक आणि त्यासाठी प्रेरणा म्हणून सातआदिम पापांचा व्यापार हेच प्रत्यक्षात आले. त्याची परिणती अधिकच परात्मीकरणात (alienation) झाली. परात्मीकरण दूर होण्यासाठी सोशलमीडिया, आणि सोशल मीडियाच्या वापरातून अधिकच परात्मीकरण असे हे दुष्टचक्र बनले. त्याचा उपाय हा आभासी वास्तवात शोधला जातो आहे ह्यासारखा क्रूर विनोद नाही.

ह्या विकेंद्रीकरणाचा आणि तज्जन्य परात्मीकरणाचा आणखी एक महत्वाचा परिणाम म्हणजे प्रस्थापित संस्थात्मक संरचना आणि त्यांच्या संतुलक भूमिकेचे संपुष्टात आलेले महत्वं. पक्षीय राजकारण, लोकशाही संस्था यांना जगभरच शह मिळाला. प्रस्थापित वृत्त- टेलिव्हिजन मीडियाचे अवमूल्यन झाले. अति-उजव्या शक्तींना ‘पर्यायी सत्ये’ आणि ‘इतिहास’ जोरकसपणे मांडायला भला मोठा अवकाश मिळाला. ‘ह्या सगळ्यात उत्कटपणे लोक वेळ घालवतात’ म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा ऐसपैस अर्थ लावून सोशल मीडिया कंपन्यांचे उखळ पांढरे झाले. मात्र २०२० च्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीनंतर ट्रम्प आणि त्यांच्या समर्थकांनी केलेल्या उठावामुळे ह्या कंपन्यांना ट्रम्प यांच्यावर बंदी घालावी लागली. तोवर घेतलेली भूमिका बोटचेपी, नफाखोर आणि गृहयुद्धपूरक आहे हेच त्यातून सिद्ध झाले. अमेरिकेत निदान काही एक कारवाईचे भय आणि बहुतांश उत्पन्न तिथूनच होत असल्याने या कंपन्यांना आपले ‘गेटकिपर’ पण अखेर सिद्ध करायला लागले. दुसरीकडे ऑस्ट्रेलियामध्ये वृत्तमाध्यमांना फेसबुक, गुगल इ. कंपन्यांनी जाहिरात उत्पन्नाचा वाटा दिला पाहिजे म्हणून कायदा संमत झाला. असे असले तरी जगभर इतरत्र अशी बंधने येण्याची शक्यता फारच धूसर आहे. धोरणकर्ते आणि त्यांच्या नियमनाचा वेग अतिशय संथ आहे. आणि तरीही अशी नियंत्रणे यायच्या आतच नव्या क्रीडांगणावर धाव घेण्याची ‘मेटावर्स’ ही सुरुवात आहे.

कसे असणार आहे हे नवे जग? सुरुवातीचे अंदाज तरी निराशाजनक आणि ‘नव्या बाटलीत जुनीच दारू’ ह्या धर्तीचे आहेत. अजून प्राथमिक अवस्थेत असतानाच लैंगिक शोषणाचे आरोप ‘मेटावर्स’ वर झाले आहेत. त्यात खरे तर आश्चर्यजनक काही नाही. मूळात ‘फेसबुक’ ची सुरुवातच कॉलेजच्यावर्गातील मुलींचा आकर्षकपणा आणि त्यांचे रँकिंग ठरवण्यातून झाली होती. एकूण इंटरनेटवरच उपलब्ध चेहरेविहित अनामपणाच्या सोयीचा विकृत वापर किती सर्रासपणे होत असतो ते सर्वज्ञात आहे. चिंतेचे आहे ते इंटरनेटच्या द्विमित जगातून त्रिमित ‘मेटावर्स’ मध्ये होणाऱ्या संक्रमणात ह्या शोषणाचे गांभीर्य कितीतरी पटीने अधिक वाढलेले आहे. लैंगिक शोषणच नाही तर ट्रोलिंगलाही त्रिमित परिमाण लाभल्याने निर्माण होणाऱ्या धोक्यांची आपणकल्पना करू शकतो. शिक्षण, पर्यटन, मनोरंजन इ. क्षेत्रांत हे आभासी वास्तव आणि त्यावर आधारित उद्योग उदयाला येणार आहेत. त्यासाठी आवश्यक नियंत्रक कायदे हा राजकारणाचा एक भाग झाला. पण ह्या वास्तवाशी जुळवून घेत सामाजिक व्यवहाराचा आणि त्यात अनुस्यूत नियंत्रक/दिशादर्शक पुरोगामी राजकीय पक्ष, अराजकीय संस्थांचा सांधेबदल परिणामकारकपणे व्हायला हवा. ‘वेब २.०’ म्हणजे स्मार्टफोनचे जग अति-उजव्या शक्तींच्याकह्यात होते. त्याला ‘वेब ३.०’ मध्ये शह द्यायचा असेल तर बिझनेस मॉडेल्स, आणि सामाजिक संस्थांची मॉडेल्स ह्यावर आतापासूनच विचार आणि कृतीगरजेची आहे.

लेखक दिल्लीस्थित अभ्यासक संशोधक आहेत.

Write A Comment