उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सध्या नाव बदलण्याच्या मोहीमेवर अाहेत. अलीकडेच त्यांनी उत्तर प्रदेशमधील प्रसिद्ध शहर अलाहाबादचं नाव प्रयागराज असं केलं. अलाहाबादला गंगा, यमुना आणि अदृश्य पावलेली सरस्वती यांचा संगम होतो म्हणजेच प्रयाग होतो म्हणून बहुदा इस्लामिक प्रभाव असलेलं नाव त्यांनी बदललं. पण या शहराबद्दलच्या अनेक कथा आहेत. काहींच्या मते, या शहराचं नाव इला-वास आहे. इला ही पुराणामध्ये पुरुरवाची आई म्हणून ओळखली जाते. काहींच्या मते, अल्हा-उदल या लोकगीतातील अल्हावरून शहराला नाव पडल्याचं बोललं जातं. एेतिहासिक रेकॉर्डनुसार, अकबराने इलाहा-बाद किंवा इलाही-बास असं नाव ठेवलं होतं. इलाहा हा शब्दाल देवासाठी वापरला जातो. हे शहर हिंदूंसाठी पवित्र असल्याचं तो मानत होता. तसंच पर्शियनमध्ये इलाहा-बास म्हणजे देवाचं राहण्याचं ठिकाण. त्यावेळचे पुरावे आणि नाणी यावरून हे सिद्ध होतं की, अकबराला सर्वधर्म समानता मान्य होती. पण योगी आदित्यनाथ यांनी मात्र इस्लामचा प्रभाव असलेली अनेक नावं बदलून टाकली. मुघल सराईचं पंडित दीनदयाल उपाध्याय, ऊर्दू बाजारचं हिंदू बाजार, अली नगरचं आर्य नगर केलं. त्यांच्या मते, मुस्लिम नावं ही परकीय वाटतात.
एका मुलाखतीत योगी सांगतात की त्यांनी अनेक नावं बदलायची आहेत. त्यांच्या या यादीमध्ये ताज महालचं नाव राम मंदिर, आझमगडचं आर्यमगड आणि यावर कडी म्हणजे त्यांना भारतचं नाव बदलून हिंदुस्तान करायचं आहे. त्यांच्यामते, मुस्लिम आक्रमकांनंतर ही नावं बदलण्यात आली होती. त्यामुळे त्यात बदल करण्याची गरज आहे. पूर्वी मायावती उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री असताना त्यांनीही ठिकाणींची नावं बदलण्याचा सपाटा लावला होता. त्यांच्यानंतच आलेल्या अखिलेश यादव यांनी तो उलटा निर्णय घेऊन जुनी नावं पुन्हा ठेवली.
योगी हे प्रसिद्ध गोरखनाथ मठाचे महंत आहेत आणि उत्तर प्रदेशच्या राजकारणामध्ये त्यांचं स्थान महत्त्वपूर्ण आहे. हिंदू महासभेमधून त्यांचा राजकीय प्रवेश झाला. त्यांचा राजकारणामध्ये प्रभाव एवढा मोठा आहे की, त्यांच्या नावाची घोषणाच आहे यूपी में रहना होगा तो योगी योगी कहना होगा. त्यांची हिंदू युवा वाहिनी उत्तर प्रदेशमध्ये अनेक नकारात्मक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. साक्षी महाराज, साध्वी उमा भारती, साध्वी निरंजन ज्योती यांच्या रांगेत हे आदित्यनाथ आहेत. खरंतर संन्यासी म्हणून त्यांनी या जगातील लोभ-माया अशा सर्व गोष्टींचा त्याग करण्याची गरज आहे. पण त्यांचं मन अजूनही या जगातील घडामोडींमध्ये अडकलेलं दिसतं.
ब्रिटीश वसाहतवादानंतर या साध्वी आणि योगींचा राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात सुळसूळाट झालेला दिसतो. ज्या ठिकाणी जमिनीचे फेरवाटप झालेलं नाही, जमिनदार-धर्मगुरू यांच्याकडे मोठ्या प्रमाणात जमिनींची मालकी आहे, त्या ठिकाणी हे असले गुरू राजकारणामध्ये उतरलेले दिसतात. ते लोकशाही व्यवस्थेला परदेशी संबोधून विरोध करतात. भारतीय समाजातील जात व्यवस्थेचं ते समर्थन करतात. अशाच पद्धतीने इराणमध्ये अयातोल्लाह खोमेनीचा उदय झाला होता. पाकिस्तानमध्येही मुल्ला लोक पाकिस्तानी सैन्याच्या मदतीने आपली हुकूमत गाजवत आहेत. झिया उल हकच्या काळामध्ये पाकिस्तानच्या इस्लामीकरणाच्या प्रक्रियेमध्ये मौलाना मौदुदीचा अशाच पद्धतीने उदय झाला होता. शेजरच्या म्यानमारमध्येही अशिन वारथू या संन्याशाचा असाच उदय झाला. त्यासा बर्माचा बिन लादेन म्हणून ओळखलं जायचं. त्याने राजकीय व्यवस्थेमध्ये शिरून अल्पसंख्यांक समाजाच्या विरोधात आघाडी उघडली होती.
भारतातही हे असे साधू-संत राजकीय व्यवस्थेत घुसून आपला कार्यक्रम राबवण्यासाठी कशा पद्धतीने त्याचा वापर करतात याची अनेक उदाहरणं आहेत. ते सर्व बहुदा हिंदुत्ववादी चळवळीला पाठिंबा देणारे असतात आणि त्यांच्या भाषणामधून कायम दुही माजवणारे विचार पसरवतात. साध्वी निरंजन ज्योतीने हराम जादे असा शब्द प्रयोग हिंदू नसणाऱ्यांबद्दल केला होता. मुस्लिमांची लोकसंख्या प्रचंड वाढत असल्याचं वादग्रस्त विधान केल्याने साक्षी महाराजांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. योगींच्या विरोधातही वादग्रस्त वक्तव्यं केल्याच्या अनेक तक्रारी आहेत. त्यांनी मृत पावलेल्या मुस्लिम महिलेवरही बलात्कार करा इथपर्यंत विधानं केली आहेत.
आता उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रीपदच हातात आल्यावर त्यांनी हिंदुत्वाचा अजेंडा हाती घेतला आहे. त्यातून सण-उत्सवही सुटलेले नाहीत. गेल्या दिवाळीला राम आणि सीतेची मूर्ती असलेलं एक हेलिकॉप्टर उत्तर प्रदेशमध्ये उतरलं आणि योगींनी त्या मूर्तींचं स्वगात गेलं. मग त्यांनी दिवाळीला मोठ्या संख्येने दिवे लावण्याचा कार्यक्रम हाती घेतला. अलीकडेच कुंभमेळ्यासाठी राज्य पाच हजार कोटी रुपये खर्च करणार असल्याची त्यांनी घोषणा केली. त्याचवेळी आरोग्य, दळण-वळण आणि इतर सुविधांचा राज्यामध्ये असलेला अभाव मात्र त्यांच्या नजरेस पडत नाही. उत्तर प्रदेशमध्ये आरोग्य सोयींच्या अभावामुळे अनेक मुलं, बालकं मृत्यूमुखी पडली होती याचाही त्यांना सोयीस्कर विसर पडला आहे. ज्या शहरांच्या नावात बदल केला तिथे तर वाहतूक, दळण-वळणाच्या सुविधा इतक्या वाईट अवस्थेत आहेत आणि मानवी हक्कांचं उल्लंघन तर संपूर्ण राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे. अल्पसंख्यकांचे तर इतके हाल होत आहेत की, त्यांना जगण्याचा काही अधिकारच उरलेला नाही. त्यांचा रोजगार अवलंबून असलेल्या अनेक मांस विकण्याच्या दुकानांवर बंदी घालण्यात आली.
सेक्यूलर मूल्यं ही एक मोठी थाप असल्याचं योगींनी आधीच जाहीर केलं आहे. ते जे काही निर्णय घेत आहेत त्यावरून हे स्पष्ट आहे की, त्यांची वाटचाल ही हिंदू राष्ट्राच्या दिशेने सुरू आहे.