fbpx
सामाजिक

# ME TOO : आव्हान सत्यशोधक भगिनिभावाकडे घेऊन जाण्याचे!

नुकताच निर्ऋती दुर्गेच्या स्त्रीसत्ताक नेणिवांचा जागर केला जाणारा घटस्थापना उत्सव देशभर मोठ्या प्रमाणात साजरा केला गेला. शेतीचा शोध स्त्रियांनी लावला आणि त्या राजकर्त्या बनत गणभूमीच्या समान वाटपाच्या कर्त्या झाल्या. स्त्रियांनी शेतीचा शोध लावला ही स्त्रीमनाची नेणीव आज घटस्थापना करताना व्यक्त होताना दिसते. निर्ऋतीच्या लेकींना हा खरा इतिहास सांगण्याची गरज आहे. नखरेलपणे, तोंडावर, पाठीवर रंग फासून बेधुंदपणे गरबा करणे म्हणजे  नवरात्री उत्सव नाही. तर निर्ऋती-दुर्गेकडून समतेचा आणि त्यासाठी लढण्यास सिद्ध होण्याचा वारसा पुढे चालविला पाहिजे. स्त्रीसत्ताक गणसमाजाचा कायाकल्प पुरुषसत्ताक त्रैवर्णीय समाजाकडे होण्याच्या काळात स्त्रीसत्ताक गणांनी आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष केला. त्याच्या स्मृती नवरात्री उत्सवात जागवल्या जातात. परगणीयांना, अपप्रवृत्तीला थोपविणार्‍या अंबाबाई, भवानी माता, कालिकामाता, रेणूकामाता, सप्तश्रृंगी, जोगेश्वरी इ. गणमाता, कुलमाता आणि महान योगिनींचा गुणगौरव या काळात केला जातो.

परंतु यंदाच्या वर्षी नवरात्री उत्सव निर्ऋतीच्या लेकींसमोर कसा आला? काळ बदलत चालला आहे. आता निर्ऋतीच्या लेकी जात, धर्म, वर्गाच्या तुरुंगात विभागल्या गेल्या आहेत. इतक्या की स्त्रीसत्तेच्या काळात पाया घातला गेलेल्या सम्यक भगिनीभावाचाही त्यांना विसर पाडवा. आधुनिक काळ- १९ व्या शतकापासून याचे नेमके भान आपल्याला दिले ते म. जोतीराव फुले आणि सत्यशोधक चळवळीने. कुणबा करणार्‍या स्त्रिया आणि ब्राह्मणी मूल्य उरापोटाशी कवटाळणार्‍या स्त्रियांचे दु:ख एक नाही हे त्यांनी सांगितले. २० व्या शतकात काही बदलाच्या वार्‍याच्या झुळूकांची अनुभूती स्त्रियांनी मिळाली; पण शोषण-शासनात गुणात्मक बदल झालेला नव्हता. स्वातंत्र्याच्या तोंडावर स्त्रियांच्या पायात जखडवल्या गेलेल्या जातीच्या बेडीवर घणाघाती घाव घालण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदु कोड बिलाच्या निमित्ताने केले. पण आज जसा शबरीमाला मंदीरात प्रवेश देऊ नये म्हणून काही स्त्रियाच भगवा ध्वज हाती घेत विरोध करीत आहेत त्या वेळी  तसाच विरोध खुद्द स्त्रियांनी करपात्रीजी नावाच्या सनातन्याच्या बहकाव्यात येऊन केला होता.

निर्ऋती-दुर्गेच्या जागराच्या काळात दोन धक्कादायक, चिंताजनक अशा घटना घडत आहेत. एक शबरीमाला मंदीरात प्रवेशाची आणि दुसरी ‘ मीटू ’ अभियानाची! ब्राह्मणी धर्माने लादलेल्या शूद्धी, पावित्र्याच्या खुळचट कल्पनांच्या परिणामी पुरुषसत्तेच्या बेड्यांना अधिकाधिक घट्ट करण्याचे वेगवेगळे मार्ग सांगितले गेले. कधी खास स्त्रियांसाठी अडीच हजार व्रतांचे महाजाल तर कधी सधवा-विधवा-कुमारिका अशा वर्गवारीत चिणून टाकण्याचे प्रयत्न केले गेले. शबरीमाला मंदीरात ऋतुप्राप्ती होणार्‍या स्त्रियांना प्रवेश नाकारला गेला तो याच खुळचट शुद्धीच्या कल्पनांमुळे. त्याविरोधातील आवाजांचा स्वर तीव्रतर होत गेला. सर्वोच्च न्यायालयाने एकदाचा निर्णय दिला – शबरीमालात सर्व वयाच्या स्त्रियांना प्रवेश खुला! कायद्याची लढाई जिंकली; पण ब्राह्मणी-पुरुषसत्ताक बुरसटलेल्या मनोवृत्तीने स्त्रियांना पुन्हा एकदा जुन्या चौकटीत बंदीवान करण्याचा जणू चंगच बांधला! एकीकडे निर्ऋती-दुर्गेच्या उत्सवाच्या काळातच शबरीमालात प्रवेशाचा हक्क स्त्रियांना मिळाला; पण अय्याप्पाची काल्पनिक भिती उभी करत पुरुषसत्ता जिंकू पहात आहे. तिला भाजपा मुखंड बेदरकारपणे पाठींबाही देत आहेत. अखिल भारतातील निर्ऋतीच्या लेकींनी शबरीमाला प्रवेश म्हणजे आमच्या आपमानाविरोधातील चळवळ आहे, हा आत्सन्मानाचा लढा आहे, हा आमचा घटनात्मक अधिकार आहे, यासाठी सत्यशोधक भगिनीभावाने एकत्रित येत संघर्ष केला पाहिजे.

याच घटोत्सवात एक वादळ भारतातील मनुवादी-पुरुषसत्ताक मानसिकतेवर जोरदारपणे आदळले आहे. त्यात भलीभली माणसे इतकी हेलपाटून गेली आहेत की नेमकी काय प्रतिक्रिया द्यावी हेच त्यांना उमगेना झाले आहे. ते वादळ आहे – # ME TOO चे, (‘मीटू’चे.) # ME TOO ची सुरुवात झाली ती उच्च मध्यमवर्गीय, मुख्यत: सिनेक्षेत्रातील स्त्रियांकडून. त्यानंतर बोलत्या झाल्या पत्रकार भगिनी, नंतर यात सहभागी झाल्या स्त्री दिग्दर्शिका, व्यावसायिक शिक्षण घेणार्‍या किंवा पूर्ण झालेल्या विद्यार्थिनी, काही समजदार पुरुषही. या मोहिमेकडे सुरुवातीपासूनच कसे बघितले गेले? वृत्तवाहिन्यांनी अत्यंत चुकीच्या पद्धतीने या प्रश्नाची मांडणी केली. काय त्या चर्चा – प्राईम टाईम, लक्षवेधी…इ इ चर्चेत स्त्रीमुक्ती संघटनांच्या प्रतिनिधी नाहीत तर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधी बोलविल्या गेल्या. अर्थात याला हरकत नाही. परंतु त्याच चर्चेत पुरुषहक्क संरक्षण मंचाच्या प्रतिनिधींना बोलवायचे? प्रश्न पुरुषांच्यावर होणार्‍या अन्यायाचा बनवला तो या भंगड माध्यमांनी. प्रश्न होता स्त्रियांच्या आत्मसन्मानाचा! त्यांच्या मनात सलत असलेल्या अपमानाचा, मानहानीचा! हे युद्ध स्त्री विरुद्ध पुरुष असं मूळात नाही, आणि नव्हतही. पण त्याला हे विपरित परिमाण या २४ तास काहीतरी चटकदार दाखवण्याच्या फंदात असणार्‍या वृत्तवाहिन्यांनी दिल.

समाज माध्यमांमधुन किंवा अन्य ठिकाणहून अनेकजण याबद्दल बोलले. त्याचे स्वरुप कसे होते? एक मत असे होते हे प्रश्न ‘आमचे’ नाहीत. आम्हाला काय त्याचे? हे ‘त्या’ क्षेत्रातील बायकांचे प्रश्न आहेत. आम्ही कशा नाकासमोर चालणार्‍या/रे आहेत. म्हणजे ‘त्या’ विरुद्ध ‘आम्ही’ त्या घरदाराचा विचार न करणार्‍या आणि आम्ही घरदार घरंदाजपणे सांभाळत पुढे चालणार्‍या असे ब्राह्मणी-पुरुषी विभेदन त्यांनीही उभे केलेच. दुसरीकडे ती सध्या काय करते? तर ती आपल्यावरील बीतलेल्या अवमानाबद्दल ब्र शब्द उच्चारू इच्छिते! पण मूळात हाच गुन्हा मानणार्‍या मानसिकतेला हे अवकळू शकले नाही. त्या आत्ताच का बोलू लागल्या? १० वर्षापूर्वीच का बोलल्या नाहीत? असे बोलणे म्हणजे हा आणखीन एक हमखास उपाय असतो अन्याय दडपण्याचा. स्त्रियांनी कधी, कशा पध्दतीने बोलायच हेही इतरांनीच नियंत्रित करायच? हाच तर आहे मनुवाद!! स्त्रियांना जेव्हा वाटेल, त्यांच्यात जेव्हा हिम्मत तयार होईल तेव्हा त्या बोलू शकतात, आपले दु:ख चव्हाट्यावर मांडू शकतात, आपल्या मोडक्या संसाराची लाज – आब इ इ बाजूला सारत आपबिती कथन करु शकतात. याला तर कायदाही मान्यता देतो ‘मग आत्ताच का?’ असा अनाहूत सवाल विचारणारे कोण हे टिक्कोजीराव?

काही तर स्ववंघोषित पुरोगामी सुध्दा  चर्चेत असे काही सहभागी झाले की यांना नेमके कोणत्या विचारांचे म्हणायचे? असा आता प्रश्नच खर्‍यार्थाने निकालात निघाला आहे असे वाटते. या तथाकथित पुरोगाम्यांना नाना पटेकरांचा भलताच पुळका आला आहे. त्यापायी ते आपल्याशी असभ्य वर्तन करण्यात आले होते अशी तक्रार करणार्‍या तनुश्री दत्ताच्या चारित्र्याचा जमाखर्च मांडू लागले.  एखाद्या वादात अशा व्यक्तिगत पातळीवर बोलू लागल्यास कोणीतरी नानाचा पहिली पत्नी असणार्‍या नीलकांती पाटेकरांसोबतचा व्यवहार कसा होता? ते प्रसिध्द अभिनेत्री मनिषा कोईराला सोबत त्यांचे नाते नेमके काय होते ? असे प्रश्न विचारू लागले तर पुन्हा स्त्रियांचीच बदनामी, अवमान होणार. आणि मग कोणीतरी याची सुरुवात करणार्‍यालाही हाच न्याय आपण अगदी स्वत:पासून सर्वांना लावणार का? असाही प्रश्न विचारण्यापर्यंत जाणार. मूळात यात फक्त हेत्वारोप आहेत. आवाज उठविणार्‍या बाईच चारित्र्य तपासण्याचा आणि तेही प्रचलित ब्राह्मणी-पुरुषसत्ताक चौकटीत!, हा अधिकार कोणीही स्वत:कडे घेऊ नये.

स्वातंत्र्योत्तर काळापासून मालमत्तेत समान वाटा मिळावा, इच्छित व्यक्तीशी विवाह करता यावा, हव्या त्या लग्न पद्धतीने लग्न करता यावे, विवाहानंतर पतीपत्नीचे पटत नसल्यास रितसर काडीमोड घेण्याचा हक्क असला पाहिजे या करीता संघर्ष जारी आहे. १९६५ नंतर खंडीत स्वरुपात हिंदु कोड बिल लागू झाल्यानंतरही आज जातजमात पंचायती आक्रमकपणे सक्रीय झाल्या आहेत. स्त्रियांना मिळू शकणार्‍या थोड्याफार स्वातंत्र्याच्याविरोधात हिंसकपणे व्यवहार करत आहेत. हे वास्तव नजरेआड करुन चालणार नाही. हिंदु कोड बिलातील विविध कायदेशी हक्कांच्या पार्श्वभूमीवर, १९७५ नंतरच्या स्त्री चळवळींच्या परिणामी तयार झालेल्या मनोभूमीच्या पार्श्वभूमीवर ‘मीटू’ म्हणण्याचे बळ स्त्रियांमध्ये निर्माण झाले आहे, ही वास्तवाची एक बाजू आहेच.

दुसरी बाजू अनेक जणांनी पुढे आणली आहे. दलित-आदिवासी स्त्रियांवर अन्याय होताना तुमची वाचा का बसली होती? हा राग आपण समजू शकतो. जातपुरुषसत्ताकवर्गीय समाजात सर्वाधिक शोषित या दलित-आदिवासी-भटकेविमुक्त स्त्रियाच आहेत. खोट्या जातप्रतिष्ठेसाठी, पुरुषी अहंगडापोटी त्यांच्यावर बलात्कारासारखे अस्त्र उगारले गेले आहे. जातीस्त्रीदास्यांताच्या लढ्याला सिध्द होत असताना काही सैध्दांतिक बाजूही लक्षात घ्याव्या लागतिल. सत्यशोधक स्त्रीवादी क्रांतीत स्त्रियांच्या जाणिवांचे स्तर लक्षात घ्यावे लागतील. आपल्याकडे दलित-आदिवासी-भटकेविमुक्त स्त्रिया सामाजिक संघर्षात पुढाकाराने सहभागी होत आल्या आहे, नेतृत्व करत आल्या आहेत, ज्ञान निर्मिती करत आल्या आहेत. त्यातुन त्यांच्या जातीस्त्रीदास्यांच्या जाणिवांचा स्तर हा विकसित झालेला आहे. म्हणूनच भवरीदेवी ‘मीटू’असे कोणतेही अभियान सुरु नसतानाही आपल्यावरील अन्यायाच्याविरोधात निर्भिडपणे उभ्या राहू शकतात. त्यांच्या लढ्याला त्यांच्या पतीसह सर्व समतावादी सक्रीय पाठिंबा देताना दिसतात.

ज्या स्त्रियांच्या जातीस्त्रीदास्यांतासंबंधीच्या जाणिवांचा विकास प्राथमिक स्वरुपाचा आहे, वर्गीय-जातीय हितसंबंधांच्या अडथळ्यांनी अडवलेला आहे, अशा भगिनी आज ‘मीटू’ चळवळत सहभागी होत आहे. त्यांच्या भगिनीभाव विषयक जाणिवांचा विकास उच्चतर पातळीवर घेऊन जाणे गरजेचे आहे, ना की त्यांना शत्रूगोटात लोटणे. या भगिनी आणि आम्ही सर्वहारा भगिनी यांच्यात आंतरविरोध आहेत, हे सूर्यप्रकाशा इतके सत्य आहे. पण तो आंतरविरोध कायम शत्रूभावी स्वरुपाचा नाही तर पुरुषसत्तेच्याविरोधात लढताना सार्वजनिक क्षेत्रात कधीकधी अशत्रूभावी स्वरुपाचा आहे. त्यांना सत्यशोधक भगिनीभावाची ओळख करुन द्यावी लागेल. त्यांना जातीअंताच्या चळवळीचा एक टप्पा असणार्‍या डिकास्ट-डिक्लास होण्याच्या मार्गाकडे घेऊन जावे लागेल. तशी संधी ‘मीटू’निमित्ताने आली आहे. ज्या विद्यापीठीय  क्षेत्रातील लैंगिक अन्यायाच्याविरोधात आवाज उठवण्याचे धाडस विद्यार्थिनींनी केले आहे, हे हिमनगाचे वरचे एक टोक आहे, तळ भयावह आहे. प्रयोगशाळेत होणारा नकोसा शारीरिक स्पर्शापासून रेल्वे, बसमध्ये चाळे करणारे पुरुषी हात याबद्दल बरेच बोलता येईल, बोलले पाहिजेच. तेव्हा का बोलल्या नाहीत??? नाही बोललो कारण शिक्षणच बंद झाल असतं, तेव्हा नाही बोललो कारण भिती दाखवली गेली होती चारित्र्यहननाची….एक ना हजार कारणे असू शकतात. सर्व बाजूंनी विचार करत करत ही चर्चा सत्यशोधक भगिनीभावाकडे घेऊन जाण्याची जबाबदारी उचलली पाहिजे. मीटू अभियानात त्या नुसते आरोप का करतात, गुन्हा का दाखल करत नाही, कोणत्याही पुरुषावर कोणीही काही आरोप करतील, थोडक्यात काय तर याचा गैरफायदा घेतला जाईल अशी भीती बोलून दाखवली जात आहे. या मागेही एक पुरुषी राजकारण कार्यरत आहे. असे म्हणणार्‍या पुरूषांना आपले किंवा आपल्या मित्रमंडळींची नावे त्यात येतील की काय अशी तर गर्भित भीती नाहीना? या म्हणण्याला फारसे गांभीर्याने घेता कामा नये. कारण कदाचित २० कोटी जनसंखेतील ०.००१% असे होऊ शकते या भीतीने या मोहिमेला हरताळ फसता येणार नाही. कदाचित इतक्या न्यूनतम प्रमाणात कोणी असे करेल, या मोहिमेत मी सुधा…या अट्टाहासापोटी मृत पुरुषाबद्दलही काहीबाई बोलण्याची शक्यता आहे इ. इ. गृहीत धरले तरीही या मोहिमेला कमी लेखता कामा नये. असे आरोप स्त्रिया, दलित, आदिवासी, भटके विमुक्त यांसारख्या सामाजिक सर्वहरा जातीवर्गासाठी केले जाणार्‍या संरक्षक कायद्यांबद्दल नेहमीच होत आले आहेत. कलम ४९८ असो की जातीयअत्याचार प्रतिबंधक कायदा असो या बाबातीत असेच घडताना दिसते. या कडे फारसे लक्ष न देता सत्यशोधक भगिनिभाव वृदिंगत करण्याचा एक टप्पा म्हणून याकडे पहिले पाहिजे. ही चर्चा निर्ऋतीच्या सर्व वरासदारानी सत्यशोधक भगिनिभावकडे घेऊन जाण्याची जबाबदारी उचलूयात!  सत्य की जय हो!!

लेखिका अब्राह्मणी स्त्रीवादाच्या पुस्कर्त्या आहेत. राज्यशास्त्राच्या प्राध्यापक असून सत्यशोधक कम्युनिस्ट चळवळीत त्यांचे सक्रिय योगदान आहे.

Write A Comment