fbpx
विशेष

अन्नपूर्णादेवी

दुसर्‍या महायुद्धाच्या काळात ब्रिटनच्या पंतप्रधानपदावर विराजमान असणारा आणि हिटलरच्या नाझी हुकूमशाहीला पराभूत करणारा महायोद्धा म्हणजे विन्स्टन चर्चिल. त्याला एकदा स्टॅलिनप्रणीत सोविएत रशियाबद्दल विचारण्यात आले होते. तेव्हा चर्चिलने त्याचे वर्णन करताना फार समर्पक आणि कल्पक उपमा योजिली होती. तो म्हणाला : ‘‘सोविएत रशिया इज ए रिड्ल रॅप्ड इन मिस्टरी इनसाइड ऍन एनिगमा.’’ म्हणजे सर्व गूढच गूढ: ‘‘गूढतेच्या अवगुंठनात झाकलेले पूर्णपणे अनाकलनीय असे कोडे.’’ नुकत्याच वयाच्या ९१ व्या वर्षी मर्त्य जगाचा निरोप घेऊन अनंतात विलीन झालेल्या आणि संगीत जगताला दुरून परंतु ‘मॉं’ या संबोधनाने परिचित असलेल्या अन्नपूर्णादेवींना हे वर्णन तंतोतंत लागू पडते.अन्नपूर्णादेवींनी दशकानुदशके स्वत:ला एक प्रकारच्या बंदिवासात कोंडून घेतले होते. त्यानी आपले शिष्य नित्यानंद हळदीपूर, प्रदीप बारोट, सुरेश व्यास आणि इतर काही जण वगळता जगाशी अजिबात संपर्क ठेवला नव्हता. भारत सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ किताब जाहीर केला होता. संगीत नाटक अकादमीने सन्मानवृत्तीही देऊ केली होती. त्यांनी यापैकी काहीही स्वीकारले नाही. अन्नपूर्णादेवींच्या शिष्यवर्गात निखिल बॅनर्जी, बहादूर खान, ज्योतीनंद भट्टाचार्य, हरिप्रसाद चौरसिया अशी संगीत जगतातील दिग्गजांची नावे होती. अशांना शिकविणार्‍या अन्नपूर्णदेवी किती ज्ञानी आणि विदुषी असल्या पाहिजेत याचा फक्त अदमासे अंदाज लावता येत होता.

कारण अन्नपूर्णादेवींचे वादन ऐकण्यासाठी उपलब्ध नव्हते. त्या ‘सूरबहार’ वाजवत असत. हे वाद्य म्हणजे रुदवीणेचे धाकटे भावंड. त्यांचे वडिल म्हणजे ‘मैहर’ या मध्यप्रदेशातील संस्थानाचे दरबार कलावंत आणि राजाचे गुरु उस्ताद अल्लाऊद्दीन खान. त्यांना सरोदपासून व्हायोलिनपर्यंत अनेक वाद्ये वाजवता येत. त्यांच्या वादनशैलीला ‘मैहरे’ शैली असे नाव पडले. रोशनआरा खान हे मुलीचे मूळ नाव. पण अल्लाऊद्दीन बाबांची मैहरच्या शारदा मातेवर अपार श्रद्धा होती. त्यामुळे त्यांनी रोशनआराला ‘अन्नपूर्णा’ या नावाने संबोधण्यास सुरुवात केली. मुलगा अली अकबर हा नामांकित सरोदिया झाला. शिष्य रविशंकर याने सतारवादक म्हणून नाव कमावले. अन्नपूर्णाने ‘सूरबहार’ वर हुकूमत प्रस्थापित केली.

गुरुने आपला शिष्य रविशंकर आणि कन्या अन्नपूर्णा यांना विवाहबंधनात अडकविले. ते दोघे एकत्रितपणे जुगलबंदीचे कार्यक्रम करीत असत. ही गोष्ट १९५० च्या दशकातील. पुढे त्यांचे आपापसात जुळेनासे झाले आणि सतारवादक म्हणून रविशंकरांची ख्यात सर्वदूर पसरली. आणि अन्नपूर्णादेवी अज्ञातवासात गेल्यासारख्या झाल्या. रविशंकरांनी त्यांना मंचावर येऊ दिले नाही आणि त्यांच्यावर निवृत्ती लादली अशी कुजबुज सुरु झाली. रविशंकरांनी याचा निग्रहाने आणि वारंवार इन्कार केला आहे. पण त्यांच्या आयुष्यात इतर स्त्रिया आल्या आणि ते विभक्तही झाले तरी ही कुजबुज सुरुच राहिली.

अन्नपूर्णादेवी साठ पासष्ट वर्षे मंचापासून दूर राहिल्यानंतर त्यांच्या वादनातील कस कोणत्या निकषांच्या आधारे जोखणार? त्यांनी आपल्या गुरुला वचन दिल्यामुळे त्या जाहीरपणे वाजवत नाहीत असे सांगितले जात असे. त्यांचे निकटवर्तीय असेही म्हणत की ‘‘अल्लाऊद्दीन बाबांची ८०/९०% विद्या मॉंकडे आहे; ६५ ते ७०% अली अकबर खान खॉंसाहेबांकडे आहे आणि जेमतेम ५०% रविशंकरांकडे.’’ पण वस्तुनिष्ठ निकषांचा अभाव असल्यामुळे छातीठोकपणे काहीही म्हणणे धाडसाचे ठरते.

एनसीपीए तर्फे चालणार्‍या वादन वर्गात त्या काही वर्षे शिकवीत. तोपर्यंत त्या घराबाहेर जात असत. परंतु संस्थांचे बंधनकारक नियम त्यांना जाचक वाटले असावेत. त्यातूनही त्या बाहेर पडल्या. आपल्या घरावरची घंटाही कुणी वाजवू नये. दरवाजा उघडला जाणार नाही अशी सक्ते ताकीद दारावर लावलेली असे. नोरा जोन्स या रविशंकरांच्या तिसर्‍या अपत्याचा अमेरिकेत जन्म झाल्याची बातमी भारतात पसरल्यानंतर मात्र त्यांची अधिकृतपणे घटस्फोटाकडे वाटचाल केली. आपला शिष्य ऋषिकुमार पंडया यांच्याबरोबर विवाहही केला.

‘‘वो तो हमारे लिए मॉंही थी. हमें इतना प्यार दिया और ग्यान बॉंटा की उसकी कभी गिनती नही हो सकती.’’ असे हरिप्रसाद म्हणतात. त्यांच्या वादनातील ध्रुपद शैलीचा रागविस्तार ही मॉंची शिकवण आहे असे जाणकार सांगतात. अलिकडे यूटयूबच्या माध्यमातून त्यांच्या वादनाचे दोन नुमने प्रसारित होत आहेत. त्यातून रागांचे गांभीर्य आणि सखोलता प्रकट होते. शिष्यांना तयार करण्याकडेच आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी लक्ष केंद्रीत केले. त्यावरून अकबर बादशहा आणि तानसेनाच्या प्रसिद्ध कथेची आठवत होते. ‘‘तू एवढा सुंदर गातोस तर तुझा गुरु (स्वामी हरिदास) किती स्वर्गीय आनंद देणारे गात असेल?’’ असे बादशहा म्हणाला. ‘‘पण ते दरबारात येणार नाहीत. आपल्या मंदिरात ते साधनारत असतात.’’ असे तानसेनाचे उत्तर होते. गुरु दरबारात येणार नाहीत, तर त्यांची अदाकारी ऐकायला ज्या मंदिरात बसून ते साधना करतात तिथपर्यंत जायची तयारी अकबराने दाखविली. तानसेन म्हणाला, जहानपन्हा तुम्ही तिथे आलात तराही तुमची फर्माईश पुरी करण्यासाठी ते गातील असं समजू नका. आता अकबराची उत्सुकता अजूनच ताणली गेली. तो तानसेनास म्हणाला, काही तरी तोड काढ, तुझ्याहून भारी आवाज या पृथ्वीतलावर असेल यावर माझा विश्वास नाही, आणि तू तर म्हणतोस तुझे गुरुच्या दर्जाचे गायन तुलाही शक्य नाही, तर मला कसेही करून तुझ्याहून भारी गायकाची अदाकारी ऐकायचीच आहे.

तानसेन अकबरास घेऊन हरदास साधना करीत बसले होते त्या जागी गेला, व साधनमग्न गुरु समोर त्याने सूर आळवावयास सुरवात केली, एका नाजूक हरकतीवर तानसेन मुद्दाम चुकीच्या सुरात गाऊ लागला, ते ऐकताच त्याबरोबर ताबडतोब हरिदास गाऊ लागले आणि आपण आनंदात न्हाऊन निघत आहोत असे बादशहाला वाटले. ‘‘तू बादशहासाठी गातोस. तुझे गुरुनी थेट परमेश्‍वरासाठीच गातात.’’ असे भावपूर्ण उद्गार बादशहाने काढले. अन्नपूर्णादेवींना हे लागू पडेल. नाही का?

लेखक ग्वाल्हेर घराण्याचे गायक/संगीत अभ्यासक आहेत

Write A Comment