सदर लेख अशोक मित्रांनी २००८ साली बिनायक सेन यांना अटक झाली त्यासंदर्भात टेलिग्राफ मध्ये लिहिला होता. भविष्यात सुधा भारद्वाज सारख्या परिघाबाहेर राहिलेल्या आदिवासी समाजाचे प्रश्न उठविणाऱ्या लोकांना अटक होईल असे भाकीत मित्रांनी त्यावेळी केले होते.
——————————————————————————————————————————————————————
ती मूळची कृष्णा चंदावरकर. घरात संगीतप्रेमी वातावरण . अगदी लहानपणीदेखील तिचा आवाज धीरगंभीर आणि नादमय होता . किशोरवयात केलेल्या कठोर साधनेतून आवाजाचा पोत आणखीच सुधारला . आजूबाजूला राहणाऱ्यांकडून गाण्याच्या कार्यक्रमाची बोलावणी वारंवार येत असत. आणखी एक किशोरी आमोणकरच उदयाला येत आहे असे अनेकांना वाटू लागले. मात्र तिने त्यांची निराशा केली आणि संगीताकडून आपले लक्ष बौद्धिक साधनेकडे वळवले. सामाजिक प्रश्नांबद्दलच्या नितांत कळकळीची त्याला जोड होतीच
विचारसरणी ही काही वारसाहक्काने मिळालेली मालमत्ता नसते ,ज्या भोवतालात तुम्ही जगता त्याची ती देणगी असते. कृष्णावर बहुधा तुरुंगवास भोगून क्रांतिकारक विचाराची दीक्षा घेऊन आलेल्या काकांचा प्रभाव पडला असावा. तिने अर्थशास्त्र शिकण्याचा निर्णय घेतला . या विषयाच्या अभ्यासातून मिळालेल्या ज्ञानाचा देशातील वंचितांच्या प्रश्नांसाठी उपयोग करणे हाच त्यामागचा हेतू होता. कृष्णा बॉंबे स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड सोशियोलॉजिची ख्यातनाम विद्यार्थिनी बनली आणि नंतर तिथेच शिकवूही लागली. अर्थतज्ञच असलेल्या रंगनाथ भारद्वाजशी तिने लग्न केलं आणि दोघांनी पुढील संशोधनाकरिता Massachusetts Institute of Technology ला जाण्याचा निर्णय घेतला. दोघांमध्ये कृष्णा निर्विवादपणे अधिक प्रतिभावान होती आणि बहुधा त्यांच्या मुलीचा -सुधाचा – जन्म झाल्यानंतर लवकरच दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेण्यामागे हे कारण असावं . पीएचडी पदवी प्राप्त करून कृष्णा मुंबईला परतली आणि आर्थिक सिद्धांताच्या क्षेत्रात नवनवी क्षितिजे गाठत कीर्ती मिळवत राहिली. त्याचबरोबर तिने आर्थिक विषमता आणि शेती उत्पादन या विषयांवरील कामही चालू ठेवलं.
हे सगळं होत असतानाच एक विलक्षण घटना घडली. पिएरो स्राफा हा थोर अर्थतज्ञ ( आणि थोर फॅसिझम विरोधी इटालियन कम्युनिस्ट नेते अंतोनियो ग्रामशी आणि पाल्मिरो तोलियाती यांचा जिवलग मित्र ) केम्ब्रिज विद्यापीठात एकांतात रममाण होऊन अभिजात अर्थतज्ञ डेविड रिकार्डोच्या लेखनाचे संपादन करण्यात गुंतला होता. त्याचा प्रयास मार्क्स आणि रिकार्डोच्या विचारात मध्यममार्ग शोधण्याचा आहे अशी सार्वत्रिक समजूत होती. Production of Commodities by Means of Commodities, हे त्यांचे प्रगल्भ तत्वदृष्टीने खचून भरलेले लहानसे पुस्तक साठच्या दशकाच्या सुरुवातीस प्रसिद्ध झाले आणि अर्थशास्त्राच्या विश्वात एकच खळबळ उडाली. फारच थोड्या लोकांना या पुस्तकातील मांडणीचे मर्म नेमकेपणे कळले आणि स्राफाच्या दृष्टिकोनाचा अर्थ लावू पाहणारे मोठमोठे निबंध मात्र प्रसिद्ध होत होते. मुंबईस्थित इकॉनॉमिक वीकलीचे संपादक सचिन चौधरी यांना कोण कुठले काम करू शकेल याची अचूक जाण होती. त्यांनी स्राफाचे पुस्तक परीक्षणासाठी कृष्णा भारद्वाजांना दिले. कृष्णाने लिहिलेल्या परीक्षणाने अकॅडेमिक विश्वात खळबळ उडाली कारण स्राफाला नेमके काय म्हणायचे आहे हे प्रथमच स्पष्ट होत होते. ह्या परीक्षणाला अभिजात कृतीचा दर्जा प्राप्त झाला , कोलकाता विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात अनिवार्य वाचनासाठी लागू केलेले बहुधा हे एकमेव पुस्तक परीक्षण असावे.
मुंबईहून कृष्णा दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये रुजू झाली आणि कालांतराने जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयात शिकवू लागली. अध्यापन संशोधन निबंध लिहिणे आणि sabbatical च्या काळात केम्ब्रिजमध्ये ठिय्या देऊन स्राफाच्या समग्र लेखनाच्या संपादनाचे काम तिने अव्याहतपणे चालू ठेवले. दरम्यानच्या काळात तिचे चांगले मित्र बनलेले स्राफा मृत्यू पावल्यानंतरही तिने रिकार्डो आणि मार्क्सना जोडण्याचा स्राफाचा प्रकल्प चालूच ठेवला. मात्र ब्रेन ट्युमरच्या आजाराने तिला अकाली हिरावून घेतलं .
मात्र आज कृष्णाबद्दल नाही तर तिच्या मुलीबद्दल सुधाबद्दल बोलायचं आहे. सुधा सर्वार्थाने विलक्षण प्रतिभासंपन्न होती ,उदाहरण घ्यायचं झालं तर जेमतेम सात आठ वर्षाची असतानाच ती लॉजिकल पॉझिटिव्हिझमवरील वैचारिक वादात रस घेत असे आणि त्या विचाराची कठोर चिकित्साही करीत असे. सगळ्या परीक्षांमध्ये ती सहजतेने अव्व्ल यश मिळवत राहिली आणि आयआयटी कानपूरमधील पाच वर्षही याला अपवाद नव्हती. तिच्याकडे अव्व्ल फर्स्ट क्लासने मिळालेली डिग्री तर होतीच पण जन्माने प्राप्त झालेलं अमेरिकन नागरिकत्वही होतं.भौतिक सुखाचा राजमार्ग तिच्यासाठी खुला होता
अमेरिकेला जाऊन ती अकॅडेमिक यश आणि विद्यापीठीय विश्वात बख्खळ पैसा कमवू शकली असती. एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीत तज्ञ म्हणून काम करू शकली असती. भारतातच मॅनेजमेंट गुरु म्हणून मिरवू शकली असती किंवा प्रशासकीय सेवेच्या सोपानाच्या पायऱ्या सर करू शकली असती.तिने ह्यापैकी काहीही केलं नाही. वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यावर दिल्लीतील अमेरिकन वकीलातीत जाऊन तिने अमेरिकन नागरिकत्वाला अधिकृतपणे सोडचिठ्ठी दिली.सुधाने छत्तीसगडच्या निबिड जंगलात राहण्याचा मार्ग पत्करला.
काही काळासाठी ती भिलाईमध्ये शंकर गुहा नियोगीच्या संघटनेशी जोडलेली होती आणि नोकरशाही व स्थानिक कंत्राटदारांच्या बेबंद भ्रष्टाचाराविरोधात संघर्षरत होती. त्या भागातील खाणी आणि कारखान्यात राबणाऱ्या कष्टकर्यांना वाजवी वेतन मिळवून देणे हा तिच्यासाठी अग्रक्रमाचा प्रश्न होता लवकरच तिच्या कामाचा आवाका दलित आणि आदिवासी हक्कांच्या व्यापक प्रश्नापर्यंत जाऊन भिडला.सुद्धा आदिवासींबरोबर राहू लागली आणि लवकरच त्यांच्यापद्धतीने विचार करायलाही शिकली. तिने आणि तिच्या नवऱ्याने एका आदिवासी मुलीला दत्तक घेतले. तिचं संबंध आयुष्य आदिवासी आणि दलित समुदायाच्या हक्कांसाठीच्या ,जमिनहक्काच्या , शिक्षण आरोग्याच्या आणि धनदांडग्या जमीनदारांपासून संरक्षण मिळवण्यासाठीच्या सततच्या संघर्षाने व्यापलेले आहे.
म्हणजे थोड्याफार फरकाने बिनायक सेन छत्तीसगडमध्येच करत असलेल्या कामाशी मिळतेजुळते असेच सुधाचेही काम आहे..सत्ताधारी विनायक सेन आणि सुधा भारद्वाजसारख्या व्यक्तींना एका ठराविक मापाने मोजतात आणि ही लोकं आदिवासींमध्ये जास्तच मिसळतात म्हणून धोकादायक असल्याचा शिक्का मारतात. आदिवासींसोबत काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा संघटनेवर राज्यसंस्थेचे शत्रू असल्याचा अधिकृत शिक्का मारला जातोच आणि आदिवासींचे हक्क शाबीत करण्यासाठीच्या चळवळींना सत्ता उलथून पडण्यासाठीची कृती मानली जाते. विनायक सेन यांना ह्याच आधारावर अटक केली गेली.आदिवासी समुदायांमध्ये आरोग्य सुविधा पोहोचवणे आणि त्याबद्दलच्या माहितीचा प्रसार करणे हे त्यांचे कार्यक्षेत्र होते. त्याचमुळे त्यांना लक्ष्य करण्यात आले. सुधाचं भवितव्यही यापेक्षा वेगळं नसेल असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही.
भारतातील सुखवस्तू कुटुंबातील अमेरिकेत स्थायिक होणाऱ्या किंवा मल्टीनॅशल कंपनीत काम करणाऱ्या किंवा आयटी कंपनीत प्रोग्रामिंग बॉस बनू पाहणाऱ्या किंवा प्रशासकीय नोकरीत अव्व्ल पदावर जायची इच्छा बाळगणाऱ्या प्रत्येक ९९९९ तरुणतरुणींमागे एक बिनायक सेन किंवा शुद्ध भारद्वाज असेलच असेल. असं असणं भाग आहे कारण मानवी मनाचा अविभाज्य भाग असलेली विवेकबुद्धी मानवी जीवनातील विसंगतींविरुद्ध आवाज उठवायला भाग पाडते. अर्थात सगळ्याच विवेकी व्यक्ती नेहमीच विवेकबुद्धी जागृत ठेवतातच असं नाही मात्र विवेकबुद्धीला जागूनच सतत जगणाऱ्या काही मोजक्या व्यक्ती असतातच.
ऐषारामाचा रस्ता निवडणारे ९९९९ भारतीय तरुणतरुणी पैशाच्या राशीत लोळतील हे काही सांगायला नको. एखादा बिनायक सेन एखादी सुधा भारद्वाज खडतर संघर्षमय आयुष्य जगत राहतील. एक प्रश्न मात्र कायम छळत राहील.
उद्या समजा अर्थतज्ज्ञ व गणितज्ञांनी मिळून राष्ट्राची आजची व भविष्यातील संपन्नता व नागरिकांची जगण्याची प्रत आणि तिच्यात भर टाकणारे वैयक्तिक योगदान याचे मापक विकसित केलेच, तर अशा बिनायक सेन, सुधा भारद्वाज सारख्या एकांड्या शिलेदारांचे योगदान, त्यांच्या बरोबर शिकलेल्या व यशस्वी व्यावसायिक बनलेल्या इतर सर्वांच्या एकत्रित योगदानाच्या किती पट अधिक भरेल ?.
1 Comment
सुधा भारद्वाज संबंधीचा लेख उत्तम आहे. मराठीत हे लेखन प्रथमच येत आहे. अभिनंदन…!
-अशोक राजवाडे