fbpx
विशेष

देशापुढील आजच्या समस्या

जगात जन्मावर आधारलेले श्रेष्ठत्व व कनिष्ठत्व मानणारे समाज नाहीत असे नाही. वर्णवादी व वंशवादी समाज आहेत. श्रेष्ठत्व व कनिष्ठत्व ही भावना मुळातच अनुदार, असंस्कृत व मानवव्देष्टी आहे. परंतु भारतातील हिंदू समाजाने प्राचीन काळापासून ज्या ग्रंथाला आपला धर्मग्रंथ व संविधान म्हणून शिरसावंद्द मानले तो ग्रंथच अशी उच्चनीचता धार्मिक व कायदेशीर मानून तिला पावन व अधिकृत करतो, एवढच नव्हे, तर कोट्यवधी जनतेला अस्पृश्य मानून तिला समाजाच्या वेशीबाहेर ठेवतो, हेहि नसे थोडके म्हणून किं काय, श्रेष्ठ मानल्या गेलेल्या समाजातील स्त्रीयांसह सर्व समाजातील स्त्रियांना दुय्यम व असमान मानून मुलांना जन्म देणारा एक प्राणी या पलीकडे त्यांना स्थान देत नाही. या ग्रंथाचे व त्याने आदेशिलेल्या “उच्च” संस्कृतीचे निष्ठेने पालन करणारे हिंदू आजहि आहेत. त्यात पूर्वीप्रमाणेच  अनेक धर्ममातंड, “सुशिक्षित”, आणि सामाजिक व राजकीय पुढारीहि आहेत. याच विचारांच्या त्यांच्या विविध संघटनाहि आहेत.

त्यामुळेच हिंदू समाजाचे दोन प्रमुख विभाग आहेत. एक अतिअल्प संख्य मनुवाद्यांचा व दुसरा सागराप्रमाणे पसरलेल्या अमनुवाद्यांचा. अमनुवाद्यांचा समाज जरी बहुसंख्य असला, तरी मनुस्मृतीच्या कृपेने तो हजारो जाती-उपजातीमध्ये परस्परांशी संघर्ष करीत विखुरला आहे. मनुवाद्यांना मनुस्मृती ही पवित्र व परमपूज्य धर्मग्रंथ म्हणून शिरोधार्य वाटते. अमनुवाद्यांना ती अमानवतावादी, विषमतावादी, अन्यायी व अधर्मी वाटते. असे असले तरी मनुवाद्यांचा देशाचा इतिहास घडविण्यात व देशाला बिघडविण्यात फार मोठा वाटा आहे. मनुवाद्यांनीच सबंध हिंदू समाजाला आजवर बदनाम केले आहे. व आजहि ते करीत आहेत. त्यामुळे सर्व देशहि बदनाम झाला आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आर.एस.एस.) ही मनुवाद्यांची संघटना आहे. भारतीय जनता पक्ष हा तिचा राजकीय अवतार आहे. ही संघटना व तिच्या बिरादरीतील इतर संस्था, इतर मानवव्देष्टी, कडव्या, अतिरेकी संघटनांप्रमाणेच दहशतवादी आहेत. मुस्लीम समाजाच्या इसिस, तालिबान, जिहाद या धर्मांध संघटना व अमेरिकेतील गौरवर्णींयांची वंश व वर्णव्देष्टी, कुल्कक्स क्लॅन या संघटनां प्रमाणे. फरक एवढाच की, आर.एस.एस. ही धर्मांध व जात्यंधहि आहे. या सर्व संघटनांमध्ये दोन समान धागे आहेत. या संघटनांचे नेते व सदस्य हे बौद्धिक व मानसिकदृष्ट्या मागासलेले आहेत व त्यामुळे ते आजहि मध्ययुगातील अंधारमय जगातील विचार व कृती करत असतात. आर.एस.एस. तर मध्य व प्राचीन युगातहि अजून वावरत आहे. म्हणूनच त्यांच्याकडून मानवद्रोही  व मानव विघातक विचार व कृती घडत असतात. या संघटनांच्या नेत्यांना व अनुयायांना आधुनिक युगातील माणसात अजून यायचं आहे.

या संस्थांच्या नेत्यांचा व सदस्यांचा दुसरा महत्वाचा स्वभावधर्म म्हणजे ते स्वतंत्र बुद्धीने कधीहि विचार करीत नाहीत. त्यांचे  ज्ञान व विचार हे त्यांची पोथी, परंपरा, सनातन विचार व वरिष्ठांनी दिलेली दिशा व आदेश यापुरतेच मर्यादित असतात. वेगळी माहिती मिळवण्यास वा स्वतंत्र बुद्धीने विचार करण्यास त्यांच्यावर बंदी असते. सैनिकांप्रमाणे हडेलप्पी शारिरीक शिस्त, व विचारांना एकारलेली शिस्त. मुळात त्यांची भरती सैनिक म्हणूनच होते. यामुळे नवीन विचार त्यांच्या मेंदूत शिरतच नाहीत व शिरले तरी पचत नाहीत. त्यांच प्रबोधन करून त्यांना शहाणे करण्याचा प्रयत्न करणे हे वेळेचा व शक्तीचा अपव्यय असतो.

आज आमच्या देशाचा राज्यकारभार अशा अप्रबुद्ध व खुज्या विचारांच्या संघटनेच्या हाती आहे व हे आमच्या आजच्या समस्यांचे मूळ कारण आहे.  आजची राजवट ही दोन नितीशून्य राज्यकारभाराची पार्श्वभूमी असणाऱ्या व व्यापारी मनोवृत्तीच्या व्यक्तींच्या हाती आहे. एक आहे पंतप्रधानपदी विराजमान व दुसरी सत्ताधारी पक्षाच्या अध्यक्षपदी. त्यामुळे देशात अनैतिक व व्यापारी नितीमुल्य रुजवण्यात येत आहेत व सामाजिक नितीमुल्यांना पायदळी तुडवण्यात येत आहे. या मुल्यांचा पाया – “पापबिना लक्ष्मी नही अने लक्ष्मीबिना सत्ता नही” या म्हणीत स्पष्ट होतो. गेल्या चार वर्षात आपल्याला त्याचा प्रत्यक्ष अनुभवहि आलेला आहे. पैशाने काहिहि विकत घेता येते, अशी सत्ताधारी पक्षाची धारणा आहे. जोडीला कौटिल्याची विधिनिषेधशून्य, साम, दाम, दंड, भेद हि राजनिती. त्यामुळे निवडणुकांवर हजारो कोटी रुपयांचा खर्च. खासदार, आमदार विकत घ्यायला कित्येक कोटींचा घोडेबाजार; दुसऱ्या पक्षात फुट पाडायला विविध कारवाया, वारेमाप जाहिरातबाजी, खोटी आश्वासने; दिखाऊ प्रकल्प, योजना व कार्यक्रम यांचा उदघोष, विकासाच्या आभासी वातावरणाची निर्मिती देशी व परदेशी भांडवलदारांना पायघड्या व त्यांच्या फायद्याचे कायदे कानून; दुसऱ्या बाजुला शेतकरी, कामगार-कर्मचारी आदि कष्टकऱ्यांची व गरिबांची चारी बाजूंनी कोंडी आणि उपासमार, त्यांनी आजवर मिळवलेल्या सर्व सोयी सवलतींचेहि उच्चाटन, त्यांच्या तोंडातलाहि घास काढून घेण्याच्या योजना व कारस्थान, कायम कामगारांची हकालपट्टी व कंत्राटी कामगारांची भरती, शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढ, शिक्षणाचे व आरोग्याचे बाजारीकरण, चंगळवाद व भंपक आणि विकृत संस्कृतिला उत्तेजन आदि जनता विरोधी कारवाया. थोडक्यात, लोकशाहीचे धनिकशाहीत व जनतेच वेठीला बांधलेल्या गुलामात रुपांतर.

या राजवटीत मनुवादी-धर्माचे ठेकेदार व संपत्तीचे वतनदार यांची अपूर्व युतीही झाल्याचे दिसून येते. पुरोहित व धनिक यांची तशी प्राचीन काळापासूनच घनिष्ट मैत्री आहे. “एकमेका सहाय्य करू, अवघे सर्वचि गिळू” हि त्यामागील कुटील नीती. पुरोहितांनी जनेतला शिकवण द्यायची कीं “आजची समाजव्यवस्था ईश्वर निर्मित आहे. ती बदलता येणार नाही, आणि ती बदलण्याचा प्रयत्न करू नये. ते पाप आहे. ठेविले अनंते तैसेचि रहावे. आपली आजची स्थिती ही पूर्व जन्मीच्या कर्माचे फळ आहे” आणि समाज परिवर्तनाला रोखायचे. जनतेच लक्ष त्यांच्या दु:स्थितीच्या खऱ्या कारणांपासून दुसरीकडे वळवायचे. त्याकरता, कर्म-कांड, उपास-तापास, प्रायश्चीत्त, पूजा-अर्चा, यज्ञ, देव-देवतांचे उत्सव, मंदिरांची उभारणी, बुवा,स्वामी, महाराज, तांत्रिक-मांत्रिक, चमत्कार इत्यादिंच्या नादी तिला लावायचे, इतर धर्मांबद्दल व धर्मियांबद्दल द्वेष व त्यांच्याशी संघर्ष करण्यास चिथावणी द्यायची व त्यात स्वधर्मीयांना सतत गुंतवून त्यांच्यावरची मगरमिठी अधिक घट्ट करायची. धनिकांनी त्याकरिता पैसा व इतर साधन पुरवायची, नवीन मंदिर बांधून द्यायची. सभा संमेलन, उत्सवांना पैसा द्यायचा, पुरोहितशाही वा धनिकशाही या दोहोंचे आसन स्थिर व सुरक्षित करावयाचे व या दोघांनीहि आजच्या राजवटीसारख्या धर्मांध व अनिर्बंध भांडवलाशाही राजवटींला मदत करून तिघांचीहि सत्ता कायम ठेवायचे प्रयत्न करायचे, असा हा तिघांमधील देशविघातक अलिखित करार आहे.

चाणक्य उर्फ कौटिल्य हा आजच्या राजकर्त्यांचा आदर्श असल्यामुळे, त्याने प्रतिपादित केलेली कुटील, अनैतिक व विधीनिषेधशून्य राजनिती त्यांनी अवलंबावी हे स्वाभाविक आहे. त्या नितीची त्यांना एरव्हीहि गरज आहे. संख्येने अत्यल्प असल्यामुळे, इतर प्रचंड लोकसंख्येवर शेकडो वर्ष राज्य करणे, त्याशिवाय शक्य झाले नसते. आज तर सत्तेचे सिंहासनच त्यांना सांभाळायचे व टिकवायचे आहे. कौटिल्य नितीचा पायाच साम, दाम, दंड, भेद हा आहे. कौटिल्याच्या शिकविणीप्रमाणे सत्ता मिळविण्याकरता व ती टिकवण्याकरता कुठल्याहि व कशाहि प्रकारचा उपाय आणि गुन्हा क्षम्य असतो. राजपुत्राने गादी मिळवण्याकरता आपल्या बापाची हत्या केली, तरी ते क्षम्य आहे. अशा नितीच्या अनुयायांनी स्वतःची सत्ता अबाधित ठेवण्यासाठी धर्मा-धर्मात, जाती-जातीत, जातीतल्या गटा-गटांत संघर्ष माजवून देशाची उभी-आडवी चिरफाड केली, तर त्यात आश्चर्य मानण्याचे कारण नाही. हे कृष्णकृत्य ते प्राचीन काळापासून करत आहेत व आज तर त्यांच्या या कृतीला उधाण आले आहे. चातुर्वण्याची निर्मितीच त्याच्याकरता झाली व मनुस्मृतीची आज होणारी पूजा त्याकरताच आहे. चातुर्वण्यामुळे देशातील बहुसंख्य अ-मनुवादी समाज हा नेहमीच शारिरीक, बौद्धिक व मानसिकदृष्ट्या दुबळा राहिला आहे. देशाच ऐक्य व सामर्थ्य भंगलेले व क्षीण अवस्थेत आहे. सुमारे सहा हजार परस्पर विरोधी जातीत देशाचा बटवारा झाला आहे व आज जाणून-बूजून या जातीत निरनिराळ्या मार्गाने संघर्ष पेटवून दिला जात आहे. इतरांतील दुही हीच मनुवाद्यांची शक्ती आहे. परंतू स्वार्थाकरीता देशाला दुभंगलेला ठेवण्यात त्यांना कुठलेहि दुष्कृत्य वाटत नाही, हा देश्द्रोहीपणा असला तरी.

हे सर्व “पवित्र” कार्य ते समाजातील कळीच्या संस्था आपल्या ताब्यात ठेवून करत असतात. आज तर सत्ता हाती आल्यामुळे हे काम अनिर्बंधपणे व बिनदिक्कत चालू आहे. वर्तमानपत्र, दूरदर्शन, रेडीओ, सोशल मिडिया आदि सर्व प्रचार माध्यम; शैक्षणिक, धार्मिक व सांस्कृतिक संस्था यातून त्यांचा सतत प्रचार चालू असतो, हे आपण पहातोच. सत्ता हाती असल्यामुळे शिक्षण खाते, पोलीस यंत्रणा, व गुन्हा अन्वेषण खाती यांचा आपला स्वार्थी हेतू साधण्यासाठी सर्रास उपयोग करण्यात येत आहे. आता तर न्यायदान यंत्रणेवरहि ताबा मिळविण्याचे प्रयत्न होत आहेत. समाजाला सर्वबाजूंनी वेढून, त्यांच्यावर हुकमत चालविणे, म्हणजे फॅसिझम निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यामुळेच राजकिय विरोधक, टीकाकार-विचारवंत, पिडीत, अल्पसंख्य, निवडक समाज कार्यकर्ते व समाज संस्था यांच्यामागे न  केलेल्या गुन्ह्यासाठीहि पोलिसांचा ससेमिरा, धाडी, अटक व न्यायालयीन खटले यांचे सत्र सतत चालू ठेवून दशहतवाद, भय व असुरक्षितता निर्माण करण्यात येत आहे. याउलट मनुवादी व त्यांचे समर्थक यांनी कितीहि व कसल्याहि प्रकारचे गुन्हे राजरोस केले तरी त्यांना मोकाट सोडण्यात येत आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखलहि करण्यात येत नाहीत. आज असे गुन्हेगार व त्यांच्या टोळ्या ठिकठिकाणी थैमान घालत आहेत.

आजच्या सत्ताधारी पक्षाला व राजवटीला आमचे संविधान मान्य नाही, हे सर्व विदीत आहे. त्यांच्या प्रत्येक निवडणूक जाहिरातनाम्यात राज्यघटना बदलण्याचा निर्धार जाहीर केलेला असतो. त्यांना घटनेतील पायाभूत तरतुदी म्हणजे लोकशाही, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, प्रजासत्ताक, मुलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व व स्वतंत्र न्यायदान यंत्रणा मान्य नाहीत. त्यांना हुकूमशाही, मनुवादी धर्म राष्ट्र, भांडवलशाही, एकसंचालकानुवर्ती व एकसंघ केंद्रसत्ता व नियंत्रित न्यायदान यंत्रणा असलेली राज्यघटना पाहिजे. सारांश, त्यांना देशात मनुवादी-धर्माची, भांडवलशाही व फॅसिस्ट राजवट आणायची आहे. गेल्या अवघ्या चार वर्षातील कारभाराने त्यांनी देशालाहि हे पटवून दिले आहे. आज तर आमचे संविधान जाळून व मनुस्मृती झिंदाबाद आणि घटनेचे शिल्पकार डॉ.आंबेडकर मुर्दाबाद, अशा घोषणाहि राजरोस देशाच्या राजधानीतहि देण्यात येत आहेत.

सारांश, देशातील आजच्या समस्या मनुवादी समाजव्यवस्थेचा पाठपुरावा, “मनीवादी” अर्थव्यवस्थेचा सरकार-प्रोत्साहित सर्वंकष अंमल, फॅसिझमवादी राज्यव्यवस्था, धर्मांधता, जात्यंधता, असहिष्णुता, दहशतवाद व हिंसाचार, या सर्वांच्या एकत्रीकरणातून निर्माण झाल्या आहेत. यावर उपाय काय, हे पुढच्या लेखात पाहू.

माजी न्यायमूर्ती, सर्वोच्च न्यायालय

1 Comment

  1. SHRIKANT MAHAJAN Reply

    MUCH TALKED ABOUT MANU SMRUTI IS NEITHER BEING STUDIED /KNOWN TO BRAHMINS NOR TO THOSE WHO HATE THEM.SO, UNNECESSARILY MANU SMRUTI HAS BEEN AFFIXED TO BRAHMINS/BJP. IN HIS LAST ARTICLE, SHRI P B SAWANT HAD ENDORSED RESERVATIONS TO MARATHA THOUGH THE LEADERS FROM THE SAME COMMUNITY HAD BEEN IN POWER FOR OVER 50 YEARS THIS IS SOMETHING NOT EXPECTED FROM A PERSON WHO HAD BEEN A JUDGE IN SUPREME COURT..HE SHOULD TELL US WHETHER WHETHER THE NEVER ENDING DEMANDS OF RESERVATION WOULD ENCOURAGE CASTE ISM OR NOT AMENDMENTS TO CONSTITUTION HAS TAKEN PLACE SEVERAL OCCASIONS IN LAST OVER 60 YEARS.IS THAT DISREGARD TO CONSTITUTION? BESIDES, UNLIKE ISLAM, MANU SMRUTI HAD A GREAT FEATURE OF REVISION FROM TIME TO TIME. IN OUR COUNTRY, EDUCATED DON’T VOTE BUT TALK ALL THE 5 YEARS, WHEREAS ILLITERATE VOTE AS PER THE DREAMS SOLD TO THEM. THEREFORE OUR CONSTITUTION NEEDS DUE CHANGES TO OFFSET INTERPLAY OF ELECTION, CORRUPTION.LIKE U.S.,WE CAN NOT HAVE INTELLIGENT PEOPLE AS MINISTERS (OR EVEN SECRETARIES) BECAUSE THEY CAN NOT GET ELECTED BY MASSES. TODAY, EVERY ONE WANTS TO ENJOY SOME PROTECTED AMBIANCE OR THE OTHER, e.g. CASTE WANTS TO GET SOMEHOW CLASSIFIED AS BACKWARD. OUR GOVT NEEDS IMMUNITY FROM ITS ALLIANCES & OPPOSITION PARTIES.& BUDGET ONLY ONCE IN 5 YEARS.

Write A Comment