संपूर्ण जग विशेषत: पश्चिम आशिया आणि दक्षिण आशियाने दहशतवादाची भयंकर कृत्यं पाहिली आहेत ज्यात अनेक निष्पाप लोकांना ठार मारलं गेलंय. मुंबईत २००८ मध्ये जेव्हा २६/११ चा दहशतवादी हल्ला झाला, तेव्हा हिंदू आणि मुस्लीम दोन्ही धर्मांचे लोक त्यात मारले गेले. पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टोही अशाच हिंसेचा बळी ठरल्या आणि एकूणच दहशतवादाच्या हिंसेला बळी पडणाऱ्यांची संख्या भारतापेक्षा पाकिस्तानमध्ये अधिक आहे. अगदी जागतिक पातळीवर उदाहरण घेतलं तरी युरोप किंवा अमेरिकेपेक्षा पश्चिम आशियात दहशतवादाचे बळी अधिक आहेत. त्याचवेळी इंडोनेशिया हा सर्वात मोठा मुस्लिम बहुल देश असला तरी पश्चिम आशियामधल्या तेल उत्पादन करणाऱ्या देशांप्रमाणे दहशतवादी हिंसा तिथे आढळत नाही. अल कायदा आणि ईसिस उदयानंतर जगाने अत्यंत भयानक असे दहशतवादी हल्ले पाहिले आणि त्याला इस्लामचं नाव देण्यात आलं. खरंतर ते हल्ले हे तेलावर नियंत्रण मिळवण्यासाठी झाले होते. पण लोकांना मात्र अजूनही इस्लाम आणि या हल्ल्यांचा जवळचा संबंध असल्याची खात्री आहे. अमेरिकेतल्या ९/११ वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्यानंतर हा समज अधिक दृढ झाला. या हल्ल्यामध्ये वेगवेगळ्या देशातले, धर्मातले ३००० निष्पाप लोक मारले गेले असले तरी अमेरिकी माध्यमांनी त्यावेळी ‘इस्लामी दहशतवाद’ नावाचा एक शब्द तयार करून लोकांच्या गळी उतरवला. अशा पद्धतीने पहिल्यांदा दहशतवाद हा इस्लामशी, एका धर्माशी जोडला गेला.
हे सर्व विचार मनात येण्याचं कारण म्हणजे अलीकडेच देशातल्या नावाजलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये राष्ट्रीय सुरक्षा केंद्राच्या एका अभ्यासक्रमामध्ये ‘इस्लामी दहशतवाद’ हा विषय शिकवला जावा, अशी सूचना करण्यात आली आहे. ही बातमी बाहेर आल्यावर दिल्ली अल्पसंख्यांक आयोगाने विद्यापीठाला पत्र लिहून याबाबत पुनर्विचार व्हावा, असं सांगितलं. ज्यांनी या अभ्यासक्रमाला विरोध केला आहे त्यांच्या मते, जर असा अभ्यासक्रम सुरू झाला तर मुस्लिमांविषयी आणि इस्लामविषयी समाजाचे गैरसमज आणखी घट्ट होतील आणि इस्लामविषयी असलेली विनाकारण भीती – ‘इस्लामोफोबिया’ वाढीस लागेल.
तसं बघितलं तर अद्याप संयुक्त राष्ट्रांनाही दहशतवादाची नीट व्याख्या करता आलेली नाही. राजकीय स्वार्थासाठी निष्पाप लोकांना हिंसक कृत्य करून ठार मारणं अशी साधारण व्याख्या दहशतवादाची करतात. इतिहासामध्ये तर राजकीय स्वार्थासाठी दहशतवादी कृत्य करून आपला उद्देश पूर्ण केल्याची अनेक उदाहरणं देता येतील. त्यामध्ये आयरिश रिपब्लिक आर्मी, उत्तर-पूर्वेतील उल्फा, श्रीलंकेतील एलटीटीई आणि ओखलाहोमा येथील आत्मघातकी बॉम्बर अशांची नावं घेता येतील. यामध्ये एलटीटीई ही सर्वात मोठी दहशतवादी संघटना होती जिने राजीव गांधी यांना ठार मारलं. त्याआधी खलिस्तानला पाठिंबा देणाऱ्यांनी इंदिरा गांधींचीही अशाचप्रकारे हत्या केली. भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्याही एका हिंदुत्ववाद्याने गोळ्या झाडून केली. नॉर्वेमध्ये अँडर्स बेहरिंग ब्रेव्हीकने अत्यंत निर्घृणपणे ८६ लोकांना ठार मारलं होतं.
यातला बहुतेकांचा काहीतरी राजकीय हेतू होता, त्यात धर्म हा विचार नक्कीच नव्हता. ईसिस किंवा अल कायदासारख्या संघटनांचा उदय हा पाकिस्तानच्या मदरश्यांमध्ये दिल्या जाणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या शिकवणूकीतून झाला. रशियाचा पाडाव करण्यासाठी अमेरिकेने सौदी अरेबियाला हाताशी धरून इस्लामचा वापर अफगाणिस्तानमध्ये करून घेतला. पाकिस्तानी मदरशांमधून इस्लामच्या नावाखाली विकृत शिकवण देऊन मुस्लिम तरुणांच्या मनात विष पेरण्यात आलं. काफीर, जिहाद सारखे शब्द त्यांच्या मनावर एवढे बिंबवण्यात आले की त्यातून मोठ्या प्रमाणात हिंसेला सुरुवात झाली. अमेरिकेने या दहशतवादी गटांना आठ हजार मिलियन डॉलर एवढी आर्थिक रसद आणि हजारो टन शस्त्रास्त्रं पुरवली. या गटांनी आधी रशियाविरोधी कारवाया करत अफगाणिस्तानमध्ये आपलं बस्तान बसवलं आणि नंतर इस्लामिक स्टेटच्या निर्मितीमध्ये पुढाकार घेतला. यातील काहीजण काश्मिरमध्येही आले आणि त्यांनी तिथल्या स्थानिकांच्या नाराजीचा फायदा उठवत काश्मिरियतच्या नावाखाली हिंसा सुरू केली.
पाकिस्तानी मशिदींमध्ये आणि इतर ठिकाणी होत असलेले बॉम्बस्फोट हे फ्रँकेस्टाइन राक्षसाचं उदाहरण आहेत. दुसऱ्यांसाठी तयार केलेल्या दहशतवादी संघटना आता पाकिस्तानमध्येच घुसून देशाला बरबाद करत आहेत. तेलाच्या खाणींवरचा हक्क अबाधित राहण्यासाठी साम्राज्यवादी शक्तींनी सुरुवातीला या संघटनांना छुपा पाठिंबा दिला. पण आता या संघटनांचा पसारा कॅन्सरसारखा वाढला असून त्यांनी स्वतःची मक्तेदारी तयार केली आहे.
भारतात समझौता एक्सप्रेस, मक्का मस्जिद स्फोट, मालेगाव आणि अजमेर येथे झालेल्या स्फोटांनंतर हिंदू दहशतवाद हा शब्द पुढे आला. तत्कालीन एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांनी मालेगाव स्फोटामध्ये वापरलेल्या मोटारबाइकशी साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर, लेफ्टनंट कर्नल पुरोहित आणि असीमानंद यांचा संबंध असल्याचं पुराव्यांसह दाखवून दिलं. आता त्यातील सगळ्यांना जामीन मिळाला असून दोन संघाच्या प्रचारकांना अजमेर स्फोटाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा मिळाली आहे. ज्या पद्धतीने मुस्लिम दहशतवाद हा शब्द रूढ करण्यात आला होता त्याचप्रमाणे वरील स्फोटांनंतर हिंदू किंवा भगवा दहशतवाद हा शब्दही मोठ्या प्रमाणात वापरण्यात आला.
विद्यापीठांमध्ये दहशतवाद हा विषय शिकवावा पण माध्यमं आणि राजकीय शक्तींनी तयार केलेल्या सध्याच्या दहशतवादाच्या संकल्पनेपेक्षा तो वेगळा असावा. इस्लामी दहशतवाद या संकल्पनेच्या मुस्लिमसमाजावर, तरुणांच्या मानसिकतेवर खोल परिणाम झाला आहे. तसंच त्या समाजाला एका विशिष्ट नजरेतून बघितलं जातं. त्यामुळेच जेव्हा समझौता एक्सप्रेस, मक्का मस्जिद, मालेगाव आणि अजमेर येथे स्फोट झाले आणि त्यात मुस्लिमच मारले गेले तेव्हा पहिल्यांदा आरोपी म्हणून मुस्लिम मुलांनाच अटक करण्यात आली. त्यातील अनेकांचं आयुष्य, करिअर अक्षरशः बरबाद झालं. ही पार्श्वभूमी लक्षात घेतली तर इस्लामिक दहशतवाद असा विषय मुस्लिम समाजाचं आणखी नुकसान करू शकतो. त्यांच्यामध्ये दहशत निर्माण करू शकतो. सध्या देशभरामध्ये असलेल्या द्वेषाच्या राजकारणात याची आणखी भर पडू शकते. दहशतवादावरील अभ्यासक्रमाला विरोध करणाऱ्या संघटना आणि गटांचं म्हणणंही लक्षात घेण्याची गरज आहे. दहशतवाद हा राजकीय हेतू साध्य करण्याचं माध्यम आहे त्याचा अभ्यास तटस्थपणे, प्रामाणिकपणे आणि सध्या दहशतवादाबद्दल असलेला पक्षपाती चष्मा काढूनच व्हायला हवा.