सिलसिला, लम्हे, चांदनी, दिलवाले दुलहनिया ले जायेंगे या सारखे रोमँटिक सिनेमे देणाऱ्या यश चोप्रांचा, दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमा होता धूल के फुल. तर दुसरा सिनेमा होता धर्मपुत्र. साल होते १९६०. शशी कपूर, माला सिन्हा, राजेंद कुमार या कलाकारांना घेऊन बी आर चोप्रांनी धर्मपुत्र बनविला.
फाळणीची जखम ताजी होती, खुद्द चोप्रा कुटुंबाने फाळणीची धग अनुभवली होती. लाहोर मधून हे कुटुंब भारतात विस्थापित झाले होते. अख्खा देशच घायाळ झाला होता. लाखो लोक मारले गेले आणि हिंदू, मुसलमानांत एकमेकांबद्दल द्वेष आणि संशयाचे वातावरण मोहल्ल्या, मोहल्ल्यात निर्माण झाले होते. स्वतंत्र भारताच्या नेतृत्वास जनतेला या अस्थिर, विषारी मानसिकतेतून ओढून काढून नव्या युगाच्या प्रगतीपथावर न्यायचे कार्य करावयाचे होते. जनतेची धारणा, मूड, भावना सकारात्मक करण्याचे शिवधनुष्य बॉलीवूड मध्ये, बलराज चोप्रा या विस्थापिताने पेलले.
आदर्शवाद, भाईचारा, सर्वधर्मसमभाव वैगेरे पोकळ संदेश देणारा सिनेमा न बनविता, चोप्रा बंधू थेट वास्तवास भिडले. सुरवात आपल्याला १९२५ सालात घेऊन जाते. भारतात ब्रिटिशांचे राज्य आहे. नवाब बद्रुद्दीन व अमृत राय हे दिल्लीत राहणारे दोन घनिष्ठ मित्र. त्यांच्या कुटुंबातही सख्ख्या भावन्डा सारखा घरोबा. घरेही एकमेकांशेजारी, व आपसात सतत राबता. तर नवाब बद्रुद्दीनची मुलगी हुस्न बानोचे जावेद नावाच्या एका तरुणावर प्रेम जडते. त्यातून हुस्नबानो गरोदर राहते. बद्रुद्दीन जावेदबरोबर तिचा निकाह लावायचा खटाटोप करतात, परंतु जावेद लापता झालेला असतो. गर्भपात करावा तर पोरीच्या जीवास धोका होऊ शकतो. अमृत राय व पत्नी सावित्री, हुस्नबानोस आधार देतात, तिचे बाळंतपण पार पाडतात, एवढेच नव्हे तर त्या मुलास दत्तकही घेतात. मुलाचे नाव दिलीप ठेवले जाते. दिलिप राय व नवाब या दोन्ही कुटुंबांचा लाडका छोकरा असतो. पुढे हुस्नचे जावेद याच नावाच्या दुसऱ्या माणसाबरोबर लग्न होते व ती सासरी जाते, नवाब बद्रुद्दीन चलेजाव चळवळीत भाग घेतात, एका निदर्शना दरम्यान मारले जातात. पुढे कैक वर्षांनी दिलीपची आपल्या आई बरोबर गाठ पडते. तरुण दिलीप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रांत झालेला असतो. दंगे घडवून आणण्यात पुढाकार घेत असतो, असाच एका दंग्यादरम्यान एक मुस्लिम मुहल्ला पेटवून देण्याच्या कामगिरीवर दिलीप जातो. तिथे त्याची गाठ हुस्नबानूशी पडते. आपण संस्काराने कट्टर हिंदुधर्माभिमानी असलो तरी आपले जैविक वास्तव हे मुसलमान आई बापाचें अपत्य हे आहे हे सत्य अचानक नागडे होऊन दिलीप समोर उभे राहते. त्याचे सगळे विश्वच उलटे पालटे होऊन जाते. सिनेमा मुळातच पाहण्यासारखा आहे, त्याच्या क्लायमॅक्स सध्या व्हाट्सअप वर व्हायरल झाला आहे.
पिक्चर चालला नाही, परंतु सिनेमातील दंगलीच्या चित्रीकरणामुळे, काही ठिकाणी चित्रपटगृहात प्रेक्षक प्रक्षुब्ध झाले. यशराज चोप्रानी नंतर वास्तवाचा नाद सोडला आणि ते लोकांच्या पसंतीचे प्रणयरम्य सिनेमे काढीत राहिले.