fbpx
राजकारण

पुतळा पाडला, फोटो काढला, चला नवीन काही शोधू !

मला पहिल्यांदा भाजपचे अलीगडचे खासदार सतीश गौतम यांचे आभार मानायचे आहेत कारण त्यांनी अलीकडेच एक मोठा राष्ट्रीय विषय लावून धरला. त्यांच्या प्रयत्नांंमुळे १९३८ पासून अलीगड मुस्लिम विद्यापीठामध्ये असलेला महंम्मद अली जिना यांचा फोटा काढण्यात आला. मला आश्चर्य वाटतं की, आतापर्यंत गांधी, आंबेडकर, राजेंद्र प्रसाद, के. एम. मुन्शी, सी. व्ही रमन, जयप्रकारश नारायण, मदर तेरेसा यांच्यासोबत चुपचाप भिंतीवर लटकणाऱ्या त्या जिनांचा फोटो पाहून किती जणांनी देशद्रोही कृतींसाठी प्रेरणा घेतली असेल.

मी स्वतःला थोडाफार देशभक्त म्हणवतो. पण मी हेही मान्य करतो की, देशाच्या प्रती असलेलं माझं प्रेम रोज व्यक्त करण्याचा वेळ मला मिळत नाही. माझ्या कामाचं स्वरुप असं आहे की, देशभक्तीसारख्या मोठ्या गोष्टी व्यक्त करण्यासाठी मला उर्मी रहात नाही. त्यामुळे टिव्ही वाहिन्यांवर सुरू असलेले देशभक्तीचे अनेक वाद-प्रतिवाद, चर्चा मी पाहू शकत नाही. खरंतर या चर्चा ५०० वर्ष किंवा त्याहून जुन्या इतिहासावर टिपू सुलतान, पद्मावती, लाल किल्ला आणि ताज महालचं सत्य, लव्ह जिहाद प्रकाश टाकतात. कधी कधी मी त्या चर्चा पाहतो पण माझं थकलेलं मन तोपर्यंत त्यातील ज्ञान ग्रहण करण्याएवढं ताजतवानं राहिलेलं नसतं. मला कधी कधी तर इतकं नैराश्य येतं की या इतिहासातील किती पैलू आपल्याला माहित नाहीत. देश विघातक प्रवृत्तीच्या इतिहासकारांनी हा खरा इतिहास कसा लपवून ठेवला होता हे केवळ देशभक्त मित्रांमुळे कळलं.

पण यावेळी मात्र परिस्थिती ज्ञान ग्रहण करण्याबरोबरच भावनिकही आहे. कारण जिनांच्या एका फोटोने आपल्या देशाचं किती नुकसान केलंय याची मला पहिल्यांदा याची जाणीव झाली. पण काही देशभक्त हिंदू युवा वाहिनीच्या कार्यकर्त्यांनी तो फोटो काढल्यापासून मला जरा हायसं वाटलं. या सगळ्या प्रकारामध्ये थोडं रक्त सांडलं, आरोप-प्रत्यारोप झाले, पोलिसांनी देशविघातक विद्यार्थ्यांवर लाठ्या चालवल्या. पण जिनांच्या फोटोने केलेल्या नुकसानाच्या तुलनेत ही खरोखरच कमी किंमत आपण मोजली. शिवाय उत्तर प्रदेशच्या कैराना मध्ये पोट निवडणूक आणि कर्नाटकमध्ये विधानसभेची होणारी निवडणूक विसरून चालणार नाही. खरंतर २०१९ पण फार दूर नाही. या सगळ्या घडामोडींमुळे माझ्यातील देशभक्तीही एकदम उफाळून आली आणि काही गोष्टी लिहिण्याची ताकदही मला मिळाली. खाली दिलेल्या गोष्टी मला लवकरच पूर्ण करायच्या आहेत–

— जिनांनी पाकिस्तानची कल्पना मांडण्याची कितीतरी आधी द्वीराष्ट्र सिद्धांताची मांडणी वि. दा. सावरकर आणि हिंदू महासभेच्या नेत्यांनी केली. कलकत्ता येथे १९३७ मध्ये हिंदू महासभेच्या झालेल्या परिषदेमध्ये अध्यक्ष म्हणून भाषण करताना सावरकर म्हणाले की, “आपण हिंदू म्हणजे एक देशच आहोत.” जिना आणि मुस्लीम लीगने द्वीराष्ट्राची मांडणी करण्यापूर्वीचं हे वक्तव्यं आहे. सावरकर पुढे म्हणतात की, “गेल्या 30 वर्षांपासून आपण भारताच्या भौगिलिक एकतेविषयी विचार करत आहोत आणि कॉंग्रेस त्या एकतेचा सर्वात मोठा पुरस्कर्ता आहे. पण अचानक मुस्लिम अल्पसंख्याक एकानंतर एक सवलत मागत आहेत आणि एका वेगळ्या राष्ट्राचा दावा करत आहेत. जिनांच्या द्वीराष्ट्रीय सिद्धांताबद्दल मला आक्षेप नाही. आम्ही हिंदू स्वतःच एक राष्ट्र आहोत आणि हिंदू आणि मुस्लिम दोन राष्ट्रे आहेत, हे ऐतिहासिक सत्य आहे.”

याबाबत मला अशी मागणी करायची आहे की, द्वीराष्ट्र सिद्धांतामुळे जिनांना जो सन्मान देण्यात आला तोच सावरकरांनाही द्यावा.

स्वातंत्र्यपूर्व काळातील बंगाल, सिंध आणि नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रोव्हियन्स (एनडब्ल्यूएफपी) मध्ये सरकार स्थापनेसाठी हिंदू महासभा व मुस्लिम लीग यांनी युती केली होती याचे एेतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत. बंगालमध्ये १९४१ मध्ये मुस्लिम लीगच्या सरकारमध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी होते. या दोन पक्षांनी १९४३ मध्ये सिंध आणि १९३९ मध्ये एनडब्ल्यूएफपीमध्ये सरकार स्थापन केलं. या इतिहासामुळे मला थोडी अस्वस्थता वाटते कारण ज्या श्यामाप्रसाद मुखर्जी ज्यांना देशभक्त म्हणून ओळखलं जातं त्यांनी धर्माच्या आधारावर बंगाल व पंजाबच्या फाळणीचं जिनांप्रमाणेच समर्थन केलं.

हे खरं असू शकत नाही? कदाचित एखाट्या कारस्थाचा हे भाग असेल !

हिंदू महासभा जनसंघ-भाजपा-राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे सतत मुस्लीम लीग आणि जिना यांना आपले शत्रू म्हणून पाहत आले आहेत. पण इतिहासाच्या पुस्तकातील असे संदर्भ पूर्णपणे काढून टाकण्याची किंवा सुधारण्याची गरज आहे. हिंदू युवा वाहिनी आणि टीव्ही-स्टुडिओमधल्या चर्चेत भाग घेणारे भाजप-आरएसएस नेते, फेसबुकवर आणि त्यांच्या सोशल मीडिया फॅक्टरीतून पुढे व्हाट्सएपवर कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा याबाबतचा दावा तरच टिकू शकेल.

आता पुन्हा एकदा, इतिहासकारांनी सांगितलं की, १९३८ पर्यंत जिनांकडे हिंदू मुस्लिम एकतेचा राजदूत म्हणून पाहिले जात होतं. गोपाळ कृष्ण गोखले यांनाही ‘हिंदू मुस्लिम एकतेचे उत्तम राजदूत’ असं जिनांना म्हटलं आहे. जिना हे कधी तुरुंगात गेले नाहीत परंतु ब्रिटिशांच्या विरोधात स्वातंत्र्य चळवळीत ते सहभागी होते. इतकंच काय पण त्यांनी राजद्रोहाच्या खटल्यात बाल गंगाधर टिळकांचा बचाव केला. त्यांनी सरदार पटेल आणि भगतसिंग यांच्या बाजूने ब्रिटीशांना न्यायालयात आव्हान दिलं.

पाखंडी! हे कसे शक्य आहे? जिना तर १९४७ मध्ये हिंदूंच्या हत्येचा आदेश देणारा ‘खूनी’, ‘हिंदू द्वेष्टा’ होता. हे सर्व सत्य मला माझ्या बऱ्याच मित्रांनी मला वॉट्स अॅप आणि फेसबुकवर पाठवलं आहे.

एक व्यक्ती आपल्या आयुष्यात दोन वेगवेगळ्या वेळी चांगली आणि वाईट कशी होऊ शकते? इतिहासाच्या पुस्तकात पुन्हा योग्य बदल आवश्यक आहेत अन्यथा हिंदू युवा वाहिनी – बजरंग दल-भाजप-आरएसएस ब्रिगेडला देशभक्तीचे धडे देण्याची सुरुवात करावी लागेल. जिनांची स्तुती केली म्हणून सरकारला गोखलेंविरोधात फौजदारी खटला सुरू करण्याचा विचारही करावा लागेल कदाचित. सीबीआय त्यात लक्ष देऊ शकते.

जिनांसारखंच आणखी एक व्यक्तिमत्व म्हणजे अल्लामा इक्बाल, ज्यांनी लिहिलेलं  ‘सारेजहाँ से अच्छा हिंदोस्तान हमारा’ हे अजूनही भारतात शाळेतली मुलं गातात.  (खुला कबुलीजबाब – जेव्हा मी हे गाणं ऐकतो तेव्हा नकळत गुणगुणत राहतो. ) इक्बाल पाकिस्तानचे विचारवंत बनले आणि त्यांनी नंतर ‘सारेजहाँ से अच्छा पाकिस्तान हमारा’ हे गीत तयार केलं. हे असलं दुसरं गाणं लिहिलं म्हणून पहिल्या गीतावर बंदी घातली पाहिजे. (माझ्या मित्रांच्या म्हणण्याप्रमाणे, त्यांनी वॉट्स अॅपवर एक पुरावा पाहिला आहे की ‘सारेजहाँ से अच्छा हिंदोस्तान हमारा’ हे गाणं प्रत्यक्षात मामा कृपाल यांनी लिहिले आहे. पण इक्बाल यांनी नंतर हिंदुस्तान ज्या जागी पाकिस्तान लिहून स्वतःच्या नावाने चालवलं. ते इक्बाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार आहेत.)

या अशा इतिहासातल्या सगळ्या खाचाखोचा शोधण्यासाठी आता महाभारत युगात इंटरनेट शोधणारे इतिहासकार आणि त्रिपुराचे युवा मुख्यमंत्री बिप्लब देब या विद्वानांच्या अध्यक्षतेखालील प्रमुख राष्ट्रीय इतिहासकारांच्या समितीची स्थापना लगेचच करावी लागणार. पुस्तक, ग्रंथालय, संस्था, चित्रपट, लघुपट, ज्यामध्ये जिना आणि इक्बालसारखे लोक कोणत्याही स्वरूपात – ऑडिओ, व्हिज्युअल, इमेज किंवा मजकूरात आढळतात ते सर्व फोटो, ग्रुप फोटो आणि अन्य राजद्रोही सामग्री शोधण्यासाठीची जबाबदारी या समितीवर द्यावी. या लोकांना त्यातून काढून किंवा फोटोशॉपसारख्या प्राचीन भारतात उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून त्याएेवजी सावरकर आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांसारख्या लोकांना तिथे पुनर्स्थापित करावं. (हे यापूर्वीच करायला हवं होतं. मात्र, त्या समितीच्या अध्यक्षपदी दिनानाथ बत्रा या मूळ राष्ट्रीय इतिहासकाराने दावा केला. पण राष्ट्रवादी इतिहासकारांच्या तरुण आणि उदयोन्मुख गटाला असं वाटतं की बत्रांनी केवळ मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये यावं.)

असं म्हटलं जातं की, ११ ऑगस्ट १९४७ रोजी महंम्मद अली जिना यांनी सांगतिलं की आपण मुक्त आहात. पाकिस्तानमध्ये आपण आपल्या मंदिराला जाण्यासाठी मोकळे आहात. आपण आपल्या मशिदीत किंवा पाकिस्तानातील इतर कोणत्याही ठिकाणी उपासना करण्यास मुक्त आहात. आपण कोणत्याही धर्माचे, जातीचा किंवा पंथाशी संबंधित असू शकता- याचा राज्याच्या व्यवहाराशी काहीही संबंध नाही.

‘बकवास! हे कसं म्हणता येईल? हे वाईट आहे, सैतानी आहे, दुसरं काहीही नाही.

ज्यांना सरळ इतिहासामध्ये कट-कारस्थान दिसतं ते खरंतर देशद्रोही आहेत. एखाद्या साध्या सरळ गोष्टीला खोटा रंग देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची एक यादीच तयार करावी लागेल. खरंतर अशा लोकांचा राष्ट्राला धोका आहे. अशा खोट्या एेतिहासिक गोष्टी बनवून सांगणं एक प्रकारे समाजासाठी हानीकारक आहे. म्हणूनच, असे दावे करणाऱ्या आणि इतिहासाचा अपप्रचार करून स्वतःला बुद्धिवंत म्हणवणाऱ्यांवर देशद्रोहाचे खटले चालवायला हवेत.

थोडक्यात, अलीगड विद्यापीठाच्या प्रकरणात माझी देशभक्ती उफाळून आली आहे.  देशातील अनेकांना असंच वाटत असेल अशी मला खात्री आहे. केवळ जिनांचा फोटो काढला म्हणून विजयाच्या धुंदीत न राहता अशा आणखी काही गोष्टी शोधायला हव्यात ज्या देशासाठी नुकसानकारक आहेत. चला अशा देशभक्तीच्या आणखी गोष्टी शोधूया आणि त्याचं प्रदर्शनही करूया आणि त्याचबरोबर काही मतंही पदरात पाडून घेऊया.  आमेन !

 

Write A Comment