fbpx
विशेष

मार्क्स इज डेड, लॉंग लिव्ह मार्क्स!

१९८९ मध्ये बर्लिन भिंत आणि पूर्व युरोपातील साम्यवादी राजवटी कोसळल्या. गोर्बाचेव्ह यांच्या पेरेस्त्रोईका आणि ग्लासनोस्तची परिणती सोविएत साम्यवाद संपुष्टात येण्यात झाली. शीतयुद्ध संपले, पश्चिमी भांडवली लोकशाही व्यवस्था विजयी झाल्या आणि फुकुयामाने म्हटल्याप्रमाणे ‘इतिहासाची इतिश्री’ झाली. ‘अमेरिका ही एकमेव महासत्ता आणि जागतिकीकरणाच्या लाटेला आता कुठलाही पर्याय आणि पर्यायी विचार उरलेला नाही, खरे तर आता मजूर आणि मालक असा भेदच उरलेला नाही- सगळेच उद्योजक, सगळेच उपभोक्ते, तेव्हा कायदेशीरपणे तर शोषणही उरलेले नाही, उत्पन्नाची असमानता, गरिबी वगैरे विषय आहेत, त्याबद्दल विश्व बँक परिषदा घेते आहे, इतकेच काय तर कॉर्पोरेट सोशल रेस्पोन्सीबिलीटी (CSR), एन.जी.ओ. इ. अनेक उपक्रम राबवत आहेत, ‘मुक्त व्यापार’ हा सर्व दुःखाचा अक्सीर इलाज आहे’ अश्या आत्ममग्न कथनाच्या निरनिराळ्या आवृत्त्या ‘इकॉनॉमिस्ट ते प्रादेशिक वृत्तपत्रांची संपादकीये’ यामध्ये फिरत राहिल्या. २००१च्या अमेरिकेवरील दहशतवादी हल्ल्याने (आणि त्यानंतर) ‘खुले आधुनिक (ख्रिश्चन) जग विरुद्ध बर्बर मुस्लिम आतंकवाद’ असा समुएल हंटिंग्टनने वर्णिलेला संस्कृतीसंघर्ष कधी सुप्त तर कधी उघडपणे राजकारणाला दिग्दर्शित करत राहिला. म्हणजे फुकुयामा नाहीतर हंटिंग्टन हे खुल्या लोकशाहीच्यापुढे असलेले ‘पर्याय नाही हाच पर्याय’ (There is no Alternative) आणि त्याला उत्तरआधुनिक फोडणी म्हणजे ‘जागतिकीकरणाच्या काळात वर्ण- लिंगआधारित शोषण आणि त्याचा प्रतिकार तीव्र होतो, पर्यावरणाचा प्रश्न, उपभोग आणि त्यात अनुस्यूत शोषणाची चिकित्सा, हीदेखील भेदक होते, पण त्यांचा विरोध म्हणजे उत्तर शोधणे नाही – व्यवस्था उलथणे नाही. वर्गसंघर्ष हा काल्पनिक नसला तरी मर्यादित उपयोगाचा आहे. बृहदसत्ता, भांडवली- साम्यवादी ह्या सारख्याच शोषक होतात, त्यांचा तोंडवळा आणि व्यवहार फारसा वेगळा नसतो’ अश्या आशयाची मांडणी अनेक उत्तर-आधुनिक विचारवन्तानी केली. (१९६०-७० च्या दशकानंतर ही मांडणी होत आली- पण तिला खरा जोर आणि जोम आला तो साम्यवादी राजवटी कोसळल्यानंतरच; ह्याचाच पुढला भाग म्हणजे उत्तर-वसाहतीक इतिहास आणि त्याचा ‘साम्यवाद हाही परकीय/ युरोपकेन्द्री आहे तेव्हा तो भारताला लागू होत नाही’ असे म्हणत ‘पर्यावरणस्नेही, पुरोगामी प्रथा हिंदू समाजव्यवहारातच कश्या रुजलेल्या होत्या’ अश्या वंदना शिवा, आशिष नंदीकृत स्पिरिच्युअल हिंदुत्वापर्यंत झालेला प्रवास- असो)

हा काही फार दूरचा नाही तर अगदी गेल्या तीस वर्षातला इतिहास आहे. २००८ च्या आर्थिक संकटाने मात्र ही सगळी साम्यवादोत्तर गंमत खाडकन संपुष्टात आणली. आता अनिर्बंध भांडवली विकासाला पर्याय नाही, २१ व्या शतकात आधुनिक माहिती- वित्त भांडवल तेजी-मंदीच्या इतिहासनियमांच्या पलीकडे गेले आहे अश्या आपल्याच धुंदीत मग्न असलेल्या जागतिक अर्थतज्ञांच्या अहंमन्यतेला हा प्रचंड मोठा धक्का होता. अॅडम स्मिथ, फ्रीडमनवर पोसलेले ‘एकॉनोमिस्ट’ चे उच्चभ्रू वाचक असोत नाहीतर खासगी मत्तेच्या अंध समर्थनाची हद्द गाठणाऱ्या आयन रँडच्या कादंबऱ्या वाचत ‘गंभीर तत्वचिंतक’ असण्याचा आव आणणारे कच्चेबच्चे असोत- सगळ्यांना पेकाटातच लाथ बसली होती. लेहमन ब्रदर्सच्या दिवाळखोरीनंतर अमेरिका, ब्रिटनमधल्या बँका, आर्थिक संस्था बुडण्याच्या बेतात होत्या. जगातल्या सगळ्याच सरकारांनी वित्तीय भांडवल आणि त्याची खासगी मालकी कुठल्याही परिस्थितीत अबाधित राहिली पाहिजे अशी भूमिका घेतली आणि जागतिक बँकेने इतकी वर्षे केलेल्या उपदेशाला मुरड घालत अभूतपूर्व वित्तीय तूट सहन करावी लागली तरी चालेल, पण बँका, वित्त-भांडवल वाचले पाहिजे असे म्हणत पुनर्भांडवलीकरण जाहीर केले. हळूहळू वित्तभांडवल खेळते झाले आणि गाडी रुळावर यायला सुरुवात झाली- पण ती तितपतच. केव्हाच गाडलेल्या मार्क्सच्या ‘भांडवली व्यवस्थेत अरिष्टे ही अविभाज्य भाग असतात’ या इशाऱ्याचे स्मरण होऊ लागले; दास कॅपिटलचा खप प्रचंड वाढला, अकादमिक वर्तुळांत मार्क्सवादी असणे पुन्हा फॅशनेबल झाले.

२००८ नंतरही बरेच पाणी वाहून गेले आहे. आर्थिक अरिष्टाचा सामना करण्यासाठी वित्तभांडवलाचा बचाव करण्याचा निवडलेला मार्ग आणि त्यातून कल्याणकारी कार्यक्रमाच्या खर्चांत कपात, स्वयंचलितता (ऑटोमेशन) ह्या सगळ्यातून पश्चिमी देशांत बेरोजगारी, वेतनकपात, कामाच्या तासांत प्रचंड वाढ, असंघटित, असुरक्षित रोजगार ह्यात प्रचंड वाढ झाली. ग्रीस, स्पेन, इटलीसारख्या काही युरोपीय देशांतले संकट एवढे तीव्र होते की तिथे पारंपारिक मध्यममार्गी पक्ष कोसळले आणि सिरीझा, पोडेमोस, फाईव स्टार मूव्हमेंटसारखे डावे पक्ष उदयाला आले, ब्रिटनमध्ये मजूर पक्षाचा ताबा कॉर्बीनसारख्या कट्टर डाव्या नेत्याकडे गेला. आणि दुसरीकडे त्याहीपेक्षा जोमाने नव-नाझी कट्टर उजव्या पक्षांची वाढ झाली. भांडवली अरिष्टाचे खापर उरल्यासुरल्या कल्याणकारी कार्यक्रमावर फोडणे, स्थलांतरितांना विरोध, मुस्लिमद्वेष, वंशवाद हा सगळा झपाट्याने वाढत गेला- अमेरिकेत ट्रम्प अध्यक्षपदी येणे त्याचेच द्योतक होते. एकंदरीत १९९० नंतरचा प्रस्थापित नव-उदारवाद दीर्घकालीन राजकीय आणि आर्थिक अरिष्टात सापडलेला आहे. आणि अश्या अडचणीतही वित्तभांडवल एकीकडे डाव्या सीरीझाची कोंडी, दुसरीकडे कोर्बीन-सँडर्स यांचा ‘लोकशाही समाजवाद’ म्हणजे दिवाळखोरी असा अपप्रचार, आणि तिसरीकडे समजा हा ‘लोकशाही समाजवाद’ निवडणुकीत जिंकलाच तर क्लिंटन-ब्लेयर यांच्याप्रमाणे तो भांडवलाशी ‘समजूतदार समझोता’ करेल अशी व्यूहरचना करण्यात गर्क आहे. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर युरोपीय समुदायाचे अध्यक्ष जीन क्लौड युन्कर मार्क्सच्या २०० व्या जन्मशताब्दीच्या सोहळ्यात काल सहभागी झाले होते. हा काळाचा सूड खराच- पण नक्की कुणावर उगवलेला?

मार्क्स लिहीत होता तो काळ भांडवलशाही पूर्णपणे प्रस्थापित झाली नव्हती असा होता. ब्रिटन, फ्रान्सप्रमाणे काही राष्ट्रांत औद्योगिक क्रांती झाली होती, युरोपात इतरत्र ती होऊ घातली होती. कामगार- बूर्झ्वा रेट्याखाली लोकशाही संस्था, संकेत हे नुकतेच उदयाला येत होते. अद्याप स्थिरस्थावर न झालेल्या भांडवलशाही व्यवस्थेचा ‘सरंजामशाहीमधील शेतकरी, कारागीर इ. सर्वच श्रमिक वर्गाला सर्व उत्पादन साधनापासून तोडून सर्वहारा वर्गाला जन्माला घालण्याचा’ ऐतिहासिक विशेष ओळखत वर्गसंघर्षाचा इतिहास विस्ताराने मांडत मार्क्स-एंगल्स यांनी लिहिलेला ‘कम्युनिस्ट मॅनिफेस्टो’ हा जाहीरनामा असो किंवा भांडवलशाहीचे गती-नियम यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणारे ‘ग्रुंडरीस’ आणि ‘दास कॅपिटल’ हे ग्रंथ असोत- एक गोष्ट स्पष्ट आहे ती म्हणजे हेगेलच्या चिदवादी (idealist) प्रभावाखाली असलेल्या तत्कालीन ‘स्वप्नाळू समाजवादाशी’ फारकत घेत ‘इतिहासाचे शास्त्र’ मांडत मार्क्सने केलेली ज्ञानशाखीय क्रांती (epistemological break). ऐतिहासिक भौतिकवाद आणि द्वंद्वात्मक भौतिकवाद यांची मार्क्स- एंगल्सकृत मांडणी क्रांतिकारी होती ती अश्या अर्थाने की सामाजिक स्थित्यंतराचा ‘गुलामी ते सरंजामशाही ते भांडवलशाही ते साम्यवाद’ असा पूर्वनिर्धारित असा आराखडा असतो, आहे’ याला एकीकडे नाकारत असतानाच (त्यातून एकीकडे ‘क्रांती विधिलिखितात असेल तेव्हा होईल’ असला दैववाद वाढतो आणि दुसरीकडे स्वप्नाळू आशावाद) द्वंद्वात्मकता ही वर्गसंबंधांतच अनुस्यूत आहे, असते आणि जेव्हा उत्पादक शक्तींचा इतका विकास होतो की शोषक उत्पादन-संबंध त्यांना अडसर बनतात तेव्हा सामाजिक स्थित्यंतर/ क्रांती घडते या ‘अनिश्चित निश्चिततेचा’ जोरकस पुरस्कार त्यात होता. म्हणूनच एंगल्सने मार्क्सच्या मृत्यूनंतरच्या शोकसभेत मार्क्सच्या ‘सामाजिक इतिहासाचे शास्त्र आणि त्याचे नियम’ यांचे डार्विनच्या जीवशास्त्रीय क्रांतीशी आणि त्यात अनुस्यूत द्वंद्वात्मक विरोधविकासवादाशी असलेले साधर्म्य अधोरेखित केले.

१९ व्या शतकातील जर्मन तत्वज्ञान, इंग्लीश राजकीय अर्थशास्त्र, आणि फ्रेंच समाजवाद यांचा अपूर्व संगम मार्क्सवादात झाला होता. भौतिकवादी विचार पश्चिमेत नवा नव्हता. मात्र मार्क्स-एंगल्स यांनी इहवादी विचाराला शास्त्रीय आणि द्वंद्वात्मक अधिष्ठान दिले. पदार्थविज्ञान, जीवशास्त्र, खगोल- भौतिकशास्त्र यांच्यात लागत असलेल्या नवनव्या शोधांची जोड देत प्रतिगामी, सनातनी विचारांचा मुकाबला त्यातून शक्य झाला.

समाजातले वर्गवास्तव हेही अर्थशास्त्रज्ञांनी मान्य केलेले होते. पण मार्क्सचे मूलभूत क्रांतिकारक योगदान म्हणजे त्याचा वरकड मूल्याचा सिद्धांत आणि वरकड मूल्यनिर्मिती ही उत्पादनातच होते, वितरणात नव्हे ही मांडणी. भांडवलशाहीमध्ये सर्वहारा वर्ग निर्माण होणे, त्याची संख्या आणि दैन्य वाढणे आणि क्रयशक्तीचा अविरत संकोच होत राहिल्याने वरचेवर उद्भवणारी अरिष्टे याचे मार्क्सने केलेले विवेचन तर्कनिष्ठ आणि शास्त्रीय आहेच- पण त्याचा आणखी एक विशेष आहे. मार्क्स हा ‘व्यावसायिक’ तत्वज्ञ, इतिहासकार, अर्थतज्ञ, समाजशास्त्रज्ञ नव्हता- तो ‘व्यावसायिक क्रांतिकारक’ होता. ‘आजवर तत्वज्ञ, विचारवन्तानी केवळ इतिहास, जगाचा अर्थ लावायचे काम केले; पण मुद्दा आहे तो जग बदलण्याचा’ असे ठामपणे मांडणारा तो ‘पक्षपाती’ होता; ‘बूर्झ्वा तटस्थता ही प्रस्थापित व्यवस्थेची पक्षपाती असते’ हे अधोरेखित करणारा होता.

सोविएत क्रांतीची १०० वर्षे, मार्क्सची २०० वी जन्मशताब्दी, दासकॅपिटल ची १५० वर्षे- गेल्या काही दिवसांत ह्या निमित्ताने मार्क्सविचार पुन्हा प्रस्थापित चर्चाविश्वाचा भाग झाला आहे. ‘मार्क्सचा विचार आज अधिकच कालसंगत ठरतो आहे’ असा बऱ्याच लेखांचा सूर आहे. (काही लेखांचा उलटाही आहे पण ते असो) जयंती-मयंती, आणि त्या निमित्ताने येणाऱ्या लेखांत स्तुतीसुमने असायचीच म्हणून नजरेआड करायचा हा भाग नाही. तर ही कालसंगती नेमकी काय आहे आणि त्याचा जो अर्थ लावला जातो त्यात काय धोके आहेत, काय गोंधळ होताहेत हेही समजून घेणे गरजेचे आहे.

सर्वप्रथम मुद्दा ‘अदृश्य होत चाललेल्या कामगार वर्गाचा’. मार्क्स जेव्हा आपले विश्लेषण करत होता त्यावेळी औद्योगिक भांडवलशाही जोमाने वाढत होती- आणि कामगार म्हणजे गिरण्या, कारखाने यांत काम करणारा कामगार हे गृहीत रूढ होत होते. उत्पादनाचे, उत्पादक श्रमाचे सामाजिकीकरण आणि त्यातून कामगार वर्गाचे संघटन, आणि सर्वहारा क्रांती असे मार्क्सचे मॉडेल ढोबळमानाने मानले जाते (रशिया-चीन आदि क्रांत्या तश्या झाल्या नाहीत, पण मार्क्सने भाकीत केल्याप्रमाणे आता भांडवल खरोखरच जगड्व्याळ झाले आहे; तेव्हा क्रांतीचा मार्क्सवर्णीत प्रोटोटाईप २१ व्या शतकात ग्राह्य धरता येईल असे प्रतिपादन असते) पण आता औद्योगिक कामगार विखुरलेले आहेत; आणि उत्पादक श्रमाचे अधिकाधिक व्यक्तीनिष्ठ रूप (घरातून काम, छोट्या शेडमध्ये काम, कंत्राटीकरण) ह्यामुळे त्यांचे संघटन दुर्बल. शिवाय कामगार आणि त्यांना थेट रोजगार देणारा छोटा कंत्राटदार यांच्यात शोषक-शोषित संबंध कमी आणि दोघेही बहुराष्ट्रीय कंपन्या, बाजारव्यवस्था यांचे वेगवेगळ्या पातळीवर पण शोषित, त्यांची क्रयशक्ती क्षीण करणारे बेकार, अर्ध-बेकारांचे राखीव सैन्य अश्या सगळ्या पेचामुळे आता शोषितांचा उद्रेक उत्पादनप्रक्रिया, किंवा शोषक भांडवल अथवा त्यांना अभय देणारे शासन ह्याकडे केंद्रित होत नाही, त्याला वर्ण-वंश- जाती इ. फाटे फुटले आहेत, शोषित वर्गात फूट पडली आहे. तेव्हा मार्क्सची क्रांती आता काही शक्य नाही.

या आक्षेपांना उत्तर देणारे बरेच लेख आर्टीफिशीयल इंटेलिजन्स (AI) आणि तदनुषंगिक तंत्रज्ञान विकासाची चर्चा करू लागले आहेत. त्यांचा रोख अर्थात ‘AI मुळे मानवी श्रमांना यंत्र हा पर्याय उपलब्ध होईल, त्यातून आधीच असुरक्षित असणारे कंत्राटी कामगारही बेरोजगार होतील आणि त्यातून निर्माण होणाऱ्या क्रयशक्तीच्या संकोचाने आर्थिक अरिष्ट, आणि मार्क्सला अनुस्यूत क्रांतीला पूरक परिस्थिती’ असा असतो. किंवा दुसऱ्या टोकाला ‘AI मुळे मानवी श्रम गरजेचे उरणार नाहीत, सगळेच उत्पादन यांत्रिक होईल, सर्वजण उपभोक्ते म्हणून राहतील, आणि सगळ्यांना एक ‘सार्वत्रिक किमान उत्पन्न’ दिले की आलाच की मार्क्सचा समाजवाद’ असला उथळ सवंग विचार पुढे येत आहे (यात प्रस्थापित माध्यमांना फार रस निर्माण झाला आहे)

मुळात AI च्याआधी माहिती-तंत्रज्ञानाच्या स्फोटाच्या अनुषंगाने ही चर्चा होत आली आहे. अनेक जुने उद्योग त्यात बंद पडले, रोजगार गेले. चीन हा जगाचा कारखाना बनला, हे शक्य झाले ते माहिती-तंत्रज्ञानामुळेच. मार्क्सने वर्णिल्याप्रमाणे माहिती-तंत्रज्ञान हा भांडवलाचा ताजा चेहरा सुरुवातीला मुक्त स्पर्धा, सर्वाना संधी, उद्योजकता यांची जाहिरात करणारा होता- आणि अपरिहार्यपणे त्याची परिणती मायक्रोसॉफ्ट, गुगल, फेसबुक, अमेझॉन ह्यांच्या मक्तेदारया स्थापन होण्यात झाली. भांडवलशाहीमध्ये प्रवास, मनोरंजन, संवाद, आहार, विहार, ह्यातला प्रत्येक घटक नफा कमावण्यासाठी क्रेयवस्तू तर आधीच बनला होता. पण त्यात आधी कार्यरत असलेले छोटे उद्योग, छोटे भांडवल हे भांडवली मक्तेदारयाच्या थेट नियंत्रणात आले. मानवी संभाषण हे फेसबुक, ट्वीटर यांच्यासाठी क्रेयवस्तू झाले. आणि नकळत दीड दोन अब्ज लोक विनामोबदला त्यांच्यासाठी श्रम देऊ लागले. मार्क्सचे ‘परात्मीकरण, क्रेयवस्तूंचा हव्यास’ यांचे विश्लेषण आज अधिकाधिक समर्पक ठरते आहे. ६-८ हजार पगार, १२-१४ तास काम, खुराड्यासारख्या घरात राहणारे १५-२० स्थलांतरित कामगार, युनियन नाही, मतदानाचा ‘हक्क’ बजावायला घ्यावी लागणारी रजा, प्रवास यांचा खर्च परवडणारा नाही, शिक्षण, आरोग्य ह्यांचे बाजार परवडत नाहीत- अश्या अवस्थेत भारतच नव्हे तर अनेक तिसऱ्या जगातील मजूर जगत आहेत. सरकारांनी टेलीकॉम क्षेत्राला दिलेल्या सबसिडीच्या जीवावर २-५ हजारांच्या स्मार्टफोनची ‘चैन’ करत आहेत. अतिशयोक्ती होईल- पण १८५० ते २०१८ मध्ये फरक पडला आहे तो स्मार्टफोनचा.

परात्मीकरण हा मुद्दा थोडा बाजूला ठेऊ. कारण प्रस्थापित, बूर्झ्वा, उदारमतवादी माध्यमे, विचारवंत यांना माणूस वि. यंत्र, भावनाहीनता, वगैरेबद्दल आता AI च्या निमित्ताने बरेच कढ येत आहेत. यंत्राधारित व्यवस्था मानवी मेंदूप्रमाणे तर्क, प्रश्न आणि त्याची उत्तरे शोधणे याबद्दल गदारोळ होत आहे. मात्र भांडवली शोषणात मानवी कामगारांचे यांत्रिकीकरण होते त्याबाबत मात्र फार लिहिले बोलले जात नाही.

खरा मुद्दा आहे तो AI मुळे वर्गसंबंधांत नेमके काय परिणाम होणार हा. तर निश्चितच ड्रायव्हरलेस वाहने, रोबोटिक्स यामुळे दृश्य स्वरूपात अनेक असंघटित रोजगार जाणार हा परिणाम आहेच. पण आणखी एक मुद्दा आहे. पांढरपेशे रोजगार ह्यामुळे सर्वाधिक बाधित होणार आहेत. कारण आउटसोर्सिंग वि. AI असा भांडवलासमोरचा पर्याय आहे- आणि AI मध्ये करावी लागणारी भांडवली गुंतवणूक प्रचंड आहे; तेव्हा आजवर थोडेबहुत वरकडमूल्य ज्यांना द्यावे लागत होते अशा पांढरपेशे रोजगारांचे जर अवमूल्यन होत असेल तर तो स्वाभाविक पहिला पर्याय असणार आहे. अश्या वेळी ‘कामगार’ ह्या शब्दालाही नाके मुरडणारे हे पांढरपेशे काय करणार आहेत? बंगलोर, हैदराबाद येथे आय.टी. मध्ये कार्यरत काहीजणांनी आय.टी. कामगारांसाठी युनियन स्थापन केली. पण युनियनच्याकडे आर्थिक वाटाघाटीसाठीचे दलाल यापलीकडे राजकीय दृष्टीने पाहण्यासाठी कितीजण तयार होणार आहेत? फ्री सॉफटवेयर, हॅकर्स वगैरे चळवळी हे अखेर अपवाद आहेत ते त्यामुळेच.

ह्याच अनुषंगाने मुद्दा येतो तो व्यवस्थेच्या पक्षपाताचा. ‘प्रचलित, लोकप्रिय कल्पना ह्या सत्तारूढ वर्गाच्या कल्पना असतात आणि वर्गसंघर्षातून त्या कल्पना बदलत जातात’ या मार्क्सच्या अवतरणापासून ते ‘वंश-वर्ण-जाती-लिंग आधारित शोषणाचा भांडवली व्यवहारात क्षय न होता त्यांचे रूप पालटत जाते, शोषणविरोधी लढा हा समग्रच असावा लागेल’ ह्या ब्लॅक पँथर, मार्क्सवादी स्त्रीमुक्ती चळवळ, जातिअंताचा कार्यक्रम ह्या सगळ्याच रूपांत व्यवस्थेच्या पक्षपाताचा मुद्दा अगदी स्पष्ट आहे. (मार्क्स भांडवली शोषण स्पष्ट करत होता तेव्हा मुख्यप्रवाही अर्थशास्त्राच्या लाडक्या अश्या ‘खुली स्पर्धा, करार, सनदशीर खासगी मत्ता अश्या सगळ्या अटी मान्य करून झालेल्या व्यवहारात- उत्पादनातही शोषण कसे अंतर्भूत आहे ते स्पष्ट करीत होता. प्रत्यक्ष व्यवहारात साम्राज्यवादाने केलेली लूट, निग्रो गुलामगिरीवर उभारलेली अमेरिकन भांडवलशाही ह्याबद्दल त्याचा विरोध त्याच्या पत्रकारितेतून उघड होता- पण मुद्दा तो नाही) तर हा पक्षपातीपणा AI आणि त्यासाठी लिहिल्या जाणाऱ्या प्रोग्राममध्ये असणारच आहे. अमेरिकेत वित्तीय संस्थांकडून आफ्रिकन-अमेरिकन आणि हिस्पॅनिक लोकांना दिले जाणारे कर्ज चढ्या भावाने असते, (त्यासाठीचे स्कोर पक्षपात करतात) त्या कर्जाची वसुली अधिक कडकपणे होते यावर अनेक रिपोर्ट झाले आहेत. पोलीस, न्याययंत्रणा पक्षपाती आहेत आणि त्याविरुद्ध ‘ब्लॅक लाइव्ज मॅटर’ ही चळवळ गाजते आहे. शिवाय नागरिकांवर पाळत ठेवण्याचा प्रत्येक सरकारचा प्रयत्न आहे त्यात अर्थातच अल्पसंख्य आणि शोषित समाज मुख्य लक्ष्य आहेत. मार्क्सचा विचार हा वेतन-दास्यच नव्हे तर हे सगळेच दास्य, शोषण नाकारणारा आणि ‘मानवी स्वातंत्र्य’ प्रधान मानणारा आहे. ह्या समग्रतेची जोड आजच्या चळवळीना आवश्यक आहे.

एक मुद्दा मांडला पाहिजे तो पर्यावरण आणि मार्क्सवाद याबाबत. मार्क्सवाद हा ‘युरोपीय आधुनिकतेचेच मॉडेल आहे आणि तो उत्पादनशक्तीचा अमर्याद विकास व्हावा अश्या विचाराचा असल्याने त्याला पर्यावरणाची फिकीर नाही’ वगैरे क्रांतिकारी मते मांडत मार्क्सवाद कसा ‘कालबाह्य’ आहे हे मांडले जाते. मुळात इथे मुद्दा येतो तो भांडवली व्यवस्था ‘उत्स्फूर्त, अनियंत्रित’ असण्याचा. माणूस आणि निसर्ग हे परस्परांचा भाग न मानता त्यांचे परात्मीकरण आणि शोषण करत अनियंत्रितपणे अधिकाधिक नफा कमावणे हा ह्या व्यवस्थेचा अविभाज्य भाग आहे. याउलट मार्क्सवाद नियोजनबद्ध विकासाचा आग्रह धरतो. परात्मीकरणाचा अंत साधत पर्यावरण संवर्धन हे केवळ मार्क्सवादातच शक्य आहे. ‘ग्लोबल वार्मिंगचा मुकाबला कार्बन क्रेडिट्सने, नाहीतर नैतिक  करण्याचा भांडवलशाही प्रयत्न हा आपणा सर्वांना विनाशाकडेच घेऊन जाणारा आहे. याबाबत मंथली रिव्ह्यू, तसेच चीनमध्ये इको-मार्क्सिझम यातून काम होत आहे, चीनने प्रदूषणाच्या प्रश्नाबद्दल गंभीर भूमिका घेतली आहे- पण त्यांची सूत्रबद्ध मांडणी गरजेची आहे.

मार्क्सवाद भांडवलशाहीच्या पलीकडच्या व्यवस्थेचे ‘स्वप्न’ मांडत नाही तर त्याची आवश्यकता आणि शक्यता अधोरेखित करतो. उत्पादनव्यवस्थेत बदल का आणि केव्हा होतात, ह्याचे विस्तृत ऐतिहासिक आणि तात्विक विवेचन करतो. ‘मॅनिफेस्टो’ लिहिताना मार्क्सला भांडवली व्यव्यस्था लवकरच कोसळेल असा विश्वास असला तरी त्या व्यवस्थेच्या उत्स्फूर्ततेची, अंगभूत सामर्थ्याची, सतत स्वतःला पुनर्निर्मित करत, अरिष्टप्रधान असूनही टिकण्याच्या वैशिष्ट्याची, आणि सर्वव्यापित्वाची ओळख होती. आज २१ व्या शतकात पर्यायी राजकारण उभे करताना तर ही जाणीव असणे अधिकच गरजेचे आहे. जुन्याच घोषणा आजही चालून जातील अश्या भ्रमात राहणे चालणारे नाही. मार्क्सचा वारसा सांगणारयानी तर नाहीच. म्हणूनच ‘मार्क्स इज डेड! लॉंग लिव्ह मार्क्स!’ असा द्वंद्वात्म पवित्रा घेत उदयोन्मुख झाले पाहिजे.

 

लेखक दिल्लीस्थित अभ्यासक संशोधक आहेत.

1 Comment

  1. milind kirti Reply

    खूप विचारप्रवर्तक लेख आहे. राहुल तुमची लेखमाला मी सातत्याने वाचत आहे. त्यात बौद्धिक खाद्य भरपूर आहे. तुमची मांडणी वर्तमानातील अरिष्ट सांगणारी आहे.

Write A Comment