fbpx
विशेष

महाभारतातल्या इंटरनेट जोकच्या पलीकडे

काही दिवसांपूर्वी त्रिपुराचे नवीन मुख्यमंत्री विप्लव देब यांनी इंटरनेटचा शोध महाभारतातच लागल्याचा दावा केला. संजय याने धृतराष्ट्राला महाभारतातल्या युद्धाचं केलेलं वर्णन यावरून देब यांनी इंटरनेटचं विधान केलं. त्यांनी आपल्या अनेक मुलाखतींमध्ये स्वतःला सिद्ध करण्याचा आटापिटा केला. पण त्यांचं एकूणच विज्ञान, समाज आणि इतिहास याचं ज्ञान दिव्य आहे. त्यामुळे या विधानावरून जोक्स आणि कोट्याच जास्त वायरल झाल्या. पण असं हास्यास्पद विधान करणारे ते एकटे नाहीत. भाजप आणि आरएसएस मध्ये अशी विधानं करणारे अनेक आहेत. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणपती म्हणजे प्लॅस्टिक सर्जरीचा नमुना असल्याचं म्हटलं होतं तर विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री हर्ष वर्धन यांनी स्टीफन हॉकिंग्ज यांनी आइनस्टाइनच्या थिअरी अॉफ रिलेटिव्हिटी पेक्षा वेदांमध्ये जास्त चांगल्या थिअरी असल्याचं ठोकून दिलं.

विप्लव देब यांचं वक्तव्यं हसण्यावारी नेलं तरी त्रिपुरामधल्या विद्यार्थ्यांना या विचारांचं शिक्षण दिलं जाणार असेल तरी ती गंभीर बाब आहे. चुकीचा आणि खोटा इतिहास शिकवून आपण उद्याच्या भारताचं भविष्य बरबाद करणार आहोत. भारत हा जगातल्या थोड्या राष्ट्रांमध्ये मोडतो ज्याने वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अवलंब संविधानाच्या कलम ५१ अ मध्ये घातला आहे. वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगल्यास गरिबीमध्ये जगणाऱ्या भारतातील कोट्यावधी जनतेचं आयुष्य सुकर होईल आणि आधुनिक भारताच्या बांधणीला सुरुवात होईल, असा विश्वास भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा होता. संशोधन आणि प्रयोग याला प्रोत्साहन देण्यासाठी नेहरूंनी वैज्ञानिक संस्थांची स्थापना केली. त्यामध्ये आयआयटी, भाभा अॅटॉमिक रिसर्च सेंटर, टाटा इन्स्टिट्यूट अॉफ फंडामेंटल रिसर्च यांचा प्रामुख्याने समावेश होतो. विक्रम साराभाई यांच्या नेतृत्वाखाली १९६२ मध्ये इंडियन नॅशनल कमिटी फॉर रिसर्चची स्थापना होऊन इस्रोची सुरुवातही नेहरूंमुळेच झाली. काही वर्षांनी याची फळं भारताला मिळू लागली कारण आपल्या देशात शास्त्रज्ञ तयार झाले.

पण आज त्याच नेहरूंना बदनाम करण्याची मोहीम भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने उघडली आहे. नेहरूंच्या सेक्युलरिझम आणि वैज्ञानिक दृष्टीकोन या दोन तत्त्वांना हरताळ फासण्याचं काम या भाजप आणि संघाकडून सुरू आहे. भारताबरोबरच स्वतंत्र झालेला शेजारी देश पाकिस्तान आणि सध्याचं भाजप सरकार यांचा विश्वास देशाला बौद्धिकदृष्ट्या मागास ठेवणं आणि लोकांसाठी ज्ञानाची दारं बंद करणं हा आहे. या दोनही गोष्टी नेहरूंच्या तत्त्वाच्या अगदी विरुद्ध आहेत.

देशातल्या तर्कशुद्ध किंवा रॅशनल विचारांचा खात्मा करण्याची जोरदार मोहीमच त्यांनी हाती घेतली आहे. जे कोणी तर्कशुद्ध विचार करणारे लोक आहेत, सेक्युलरिझम मानणारे आहेत त्यांचा मनात सातत्याने भीती निर्माण करायची. याचा परिपाक म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये गोविंद पानसरे, एम एम कलबुर्गी, नरेंद्र दाभोलकर आणि गौरी लंकेश यांचे खून करण्यात आले. त्यांच्या तर्कशुद्ध, सेक्युलर विचार मांडणी या लोकांना खटकत होती. अशा पद्धतीने एका बाजूला आपल्या जुन्या परंपरांचा पुरस्कार करून दुसऱ्या बाजूला बदला घेण्यासाठी हिंसा करायची असं सत्र सध्या सुरू आहे. लेनिन यांचा त्रिपुरामधला पुतळा पाडणं, आंबेडकरांच्या पुतळ्याची नासधूस करणं, विप्वव देब यांच्यासारख्यांची वक्तव्य हे एक प्रकारे सासत्याने देशातलं वातावरण बिघडवून ठेवण्यासाठी सुरू आहे.

भारताने १०४ उपग्रह आकाशात सोडल्याचा देव यांना अभिमान वाटतो. तो वाटयलाच हवा. पण त्याचं श्रेय हे नेहरूंच्या वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवण्याला जातं हे विसरता कामा नये. नेहरूंनी आपल्या डिस्कवरी अॉफ इंडियामध्ये म्हटलं आहे की, वैज्ञानिक दृष्टीकोन, साहस, सत्य शोधून काढण्यासाठी संशोधन आणि नवीन ज्ञानाची आस, पडताळणी केल्याशिवाय गोष्टींचा अस्वीकार, नवीन पुराव्यांच्या आधारे जुन्या गोष्टींमध्ये बदल करणं, सिद्ध होणाऱ्या गोष्टींवर विश्वास ठेवणं आणि मनाची शिस्त या गोष्टी केवळ विज्ञानासाठी नव्हे तर आयुष्यातल्या समस्य सोडवायला महत्त्वाच्या आहेत. पण सध्याच्या सत्ताधारी पक्षाच्या गावीही या गोष्टी नाहीत. खोट्या आणि रचलेल्या भूतकाळाचा अभिमान बाळगण्यातच त्यांना अभिमान वाटतो.

भारताबद्दल अभिमान बाळगायचाच असेल तर अनेक गोष्टी आहेत. भारतीय तत्त्वज्ञान, अध्यात्म, आणि विज्ञानही. प्राचीन आणि मध्य युगीन भारताने खगोलशास्त्रा, गणित, वैद्यकशास्त्र, पशूवैद्यकशास्त्र, आर्किटेक्चर, धातू शुद्धीकरण या क्षेत्रांमध्ये दिलेलं योगदान मोठं आहे. त्यासाठी आर्यभट्ट, वराहमिहीर, भास्कराचार्य, ब्रह्मगुप्त, सूश्रुत यांची नावं घ्यावी लागतील. आर्यभट्टाने इसवीसन पूर्व ४९९ मध्ये “ pi ” चे मूल्य अचूक मोजले. सौर वर्षाचा कालावधीही त्याने मोजला होता. पृथ्वी ही गोलाकार असून एका अासाभोवती फिरते आणि चंद्रावर तिची सावली पडली असता ग्रहण लागतं, हे त्याने मांडलं होतं. हे सगळे शोध वैज्ञानिक होते. रोमिला थापरसारख्या इतिहास तज्ज्ञांनी पुराव्यांच्या आधारे या शोधांना मान्यता दिली असून सुरुवातीला ज्याप्रमाणे ग्रीक खगोलशास्त्रज्ञ आणि भारतीय शास्त्रज्ञ यांच्यात चर्चा होत तशाच चर्चा अरब खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ज्ञ यांच्याशीही होऊ लागल्याचं म्हटलं आहे. पाश्चिमात्य लेखकांनी मात्र अनेकदा इतर देशांमधल्या शास्त्रज्ञांचं योगदान दुर्लक्षित ठेवलं आहे. पण याचा अर्थ असा होत नाही की, प्रत्येक गोष्ट इतिहासात होती म्हणून दावे करत रहायचे. उलट आर्यभट्टने “ pi ” चे मूल्य शोधल्यानंतर ही वैज्ञानिक प्रगती का थांबली याचा विचार व्हायला हवा. वैज्ञानिक इतिहासतज्ज्ञ जे. डी. बर्नाल यांनी म्हटलं आहे की, “व्यापार आणि औद्योगिक स्थलांतराबरोबरच विज्ञानाची केंद्रपण बदलत राहिली. बॅबिलोनिया, ईजिप्त आणि भारत ही प्राचीन काळी वैज्ञानिक केंद्रं होती.” विज्ञान आणि तंत्रज्ञानाची प्रगती व सामाजिक-आर्थिक रचना यांच्या परस्पर संबंधांचा अभ्यास करायचा असेल तर मनात कोणताही किंतू न बाळगता, तर्कशुद्ध पद्धतीने करायला हवा. खोट्या इतिहासाचे दाखले देणं ही गंभीर बाब आहे. कोणताही देश अशा खोट्या इतिहासावर त्याचं भविष्य घडवू शकत नाही. असं करणारे हे मूलतत्त्वावादी असून त्यांचा छुपा अजेंडा त्यामागे असतो. त्यातून एखाद्या समाजाची प्रश्न विचारण्याची आणि आत्मपरिक्षणाची क्षमता नष्ट होते. त्यानंतर त्या समाजातल्या लोकांना आपलं बौद्धिक बंधक बनवणं सोपं आहे.

Write A Comment