पुर्णिया बिहारमधील अत्यंत मागास जिल्हा. पण नैसर्गिक संपत्तीने समृद्ध! थोर लेखक फणिश्वरनाथ रेणुंचा जिल्हा. फणिश्वरनाथांच्या कथांमधील पात्रं अत्यंत भोळी, साधी, अडाणी असतात. मारे गए गुलफाम म्हणजे ज्या कथेवर राज कपूरने तिसरी कसम बनवला त्यातली मुख्य व्यक्तिरेखा हिरामणची. त्याच्यासारखी अत्यंत भोळी. किंवा पंचलाइट या कथेत पेट्रोमॅक्स पेटवता न आल्याने प्रेम करणाऱ्या गोधनला माफ करणाऱ्या गावकऱ्यांसारखी अडाणी. बिहार म्हणजे मागास, अशिक्षितांचा प्रदेश अशीच सर्वसाधारण प्रतिमा सध्याच्या प्रसारमाध्यमांमधून देशभरातील तथाकथित सुसंस्कृत मध्यमवर्गीयांच्या मनात तयार झालेली आहे. पण भारतीय इतिहासाचा दोन तृतियांश हिस्सा बिहारच्या या गंगेच्या खोऱ्यातील आहे, याचा सोयिस्कर विसर देशातील सुसंस्कृत मध्यमवर्गीयांना पडतो. गांधीजींच्या स्वातंत्र्य लढ्याला खऱी धार चंपारण्यातील त्यांच्या सत्याग्रहानेच चढली. काय कारण असावं त्याचं? का बिहारमध्ये आणि विशेषतः याच पुर्णिया जिल्ह्यात किसान सभेचं काम स्वातंत्र्यापूर्वीपासून उभं राहिलं असावं? सर्वाधिक नैसर्गिक संपत्तीने नटलेल्या भूभागावरच जगात सर्वाधिक शोषण होतं, हा जगाचा इतिहास आहे. अफ्रिकेचा इतिहास पाहा हवं तर! शोषित समाज दिर्घकालीन लढ्यासाठी मानसिक तयारी करत असतो. परिस्थितीने आलेलं शहाणपण, जगातील कुठल्याही विद्यापीठापेक्षा अधिक अक्षय असतं.
या व्हिडिओमधले पुर्णिया जिल्ह्यातले महंमद मुर्तसिम हे ज्येष्ठ नागरिक राम आणि रहिम मधला फरक आणि त्यातील साम्यस्थळ समाजाऊन सांगताना त्यांची भारतीय संस्कृतीची असलेली समज आणि ती समज ज्या विवेकाच्या आधारावर त्यांनी नेणिवेत भिनवली आहे तो विवेक हे भारतातल्या सोडा जगातल्या कुठल्या विद्यापीठात शिकवत असतील? प्रभू रामचंद्रांची वंशावळ अगदी पार राजा हरिश्चंद्रांपर्यंत न अडखळता धडाधडा ते सांगतात. राम हे परमेश्वराचे दूत होते. रहिम म्हणजे साक्षात इश्वर असा फरकही ते करतात. महंमद मुर्तसिम जेव्हा प्रभू रामचंद्रांना इश्वराचे दूत म्हणतात तेव्हा त्यांना थेट प्रेषित महंमद यांचाच दर्जा ते देत असतात, हे समजण्याचा विवेक आज खूप कमी जणांमध्ये उरलेला आहे. खरंतर हे वाक्य योग्य नाही. खूप कमी जणांमध्ये उरलेला नाही हा विवेक. तथाकथित शहरी मध्यम वर्गीय व उच्च मध्यमवर्गीयांमधील खूप कमी जणांकडे तो उरलेला आहे. मागास अति मागास अशा भारतातल्या ठिकाणी हा विवेक खूप आहे. अगदी कंटेनरच्या कंटेनर भरून टनांनी घेऊन जावा इतका. मात्र त्याला रामायण महाभारतात अण्वस्त्रेही होती, असे सांगणाऱ्या पारिवारिक इतिहास गप्पा प्रमाण मानणाऱ्या काळात गिऱ्हाईकं फारशी नाहीत. रामाच्या वंशावळीतील राजा रघुवर येऊन ते सांगतात रामायणात लिहिले आहे की रघु कुली निती सदा चली आई प्राण जाई पर बचन ना जाई…
रहिम को बाप ना मां है असे सांगत ते राम हे इश्वारचे दूत आहेत, असे सांगून ते अगदी जोरदार आवेशात सांगतात की रामाला पुरुषोत्तम म्हटलं जातं. त्यांच्यावर केवळ तुमचाच मालकी हक्क नाही. ते जसे हिंदुंचे आहेत, तसेच ते मुसलमानांचे, पारशांचे, ज्यूंचे सगळ्यांचे आहेत. ते केवळ पुरुषोत्तमच नाही तर मर्यादा पुरुषोत्तम आहेत…
महंमद मुर्तसीम यांना समजलेला राम हा महात्मा गांधींना अभिप्रेत असलेला राम आहे. तो संघ परिवाराला हवा असलेला गर्व से कहो… म्हणणारा व वीटा जमा करण्याच्या नावाखाली गावा गावांतून दंगे घडवणारा राम नाही. तो राम कुणाचे संसार राखेत मिळवत नाही. तो राम सर्वसमावेशक आहे. लोकांचे भले करणारा. ज्याच्या आठवणीने सर्व षड्रिपू गळून पडावेत व माणसाने माणसाला आपसूक ओळखावे असा तो राम आहे. आपल्याच प्रजातीचा म्हणून काळा गोरा, स्त्री-पुरुष, उच्च निच, गरिब श्रीमंत, हिंदु मुसलमान असा कोणताही भेदभाव न ठेवता समोरच्या मनुष्यास छातीसी कवटाळावे. सारे विश्व शोषणरहित मंगल व्हावे…
नामदेव ढसाळांनी त्यांच्या माण्साने या कवितेत म्हटल्या प्रमाणे…
आभाळाला बाप आणि जमिनीला आजी मानून त्यांच्या कुशीतगुण्यागोविंदाने आनंदाने रहावेचंद्रसूर्य फिके पडतील असे सचेत कार्य करावेएक तीळ सर्वांनी करंडून खावा माण्सावरच सूक्त रचावेमाण्साचेच गाणे गावे माण्साने…
महंमद मुर्तसिम तुम्ही सांगितलेला राम आम्ही पूर्ण शक्तीने सर्वदूर पसरवण्याचा प्रयत्न करू…
जय श्रीराम!
हा पहा व्हायरल व्हिडिओ: