fbpx
विशेष

तात्या आम्हाला वाचवा

२०१६ साली डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यापासून अमेरिकेत स्थित भारतीयांचे, व भारतातून अमेरिकेत जाऊन ‘सेटल’ व्हायायची स्वप्ने पाहणाऱ्या भारतीयांचे धाबे दणाणले आहेत. दर काही दिवसांनी उलट सुलट बातम्या येत राहतात. एच वन बी व्हिसा साठीच्या अटी ट्रम्प कडक करणार आहेत, अवैध पणे राहणाऱ्या परकीय नागरिकांना पकडून पकडून त्यांच्या मायदेशी हाकलणार आहेत, ग्रीन कार्ड मिळविणे जवळपास अशक्यप्राय करून सोडणार आहेत अशा प्रकारच्या या बातम्या दर काही दिवसांनी राष्ट्रीय दैनिकांच्या पहिल्या पानावर झळकतात.

अमेरिकेत वैधपणे नोकरी धंद्याच्या निमित्ताने कायदेशीर बाबींची पूर्तता करून राहणाऱ्या किंवा गेली कैक वर्षे अमेरिकेत राहून आता त्यांचे राष्ट्रीयत्व मिळविलेल्या भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकांना सुद्धा,हाकलले जाण्याची भीती नसली तरी एक अनामिक दडपण ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून आले असेल तर नवल नाही. कारण तुम्ही कितीही सफाईदार इंग्रजी बोललात, अमेरिकी चालीरीती, शिष्टाचार पाळलेत आणि अमेरिकी जनजीवनात संपूर्ण समरस झालात, तरी एकदा घराबाहेर पडलात, की तुम्ही ‘इंडियन’ असता, तुमचे रंगरूप, शारीरिक ठेवणं ह्या गोष्टी तुमची वांशिक ओळख जगास तत्काळ करून देत असतात. त्यापासून सुटका नाही. आणि ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून, “भारतीय” ही वांशिक ओळख घेऊन रस्त्याने फिरणे किंवा सार्वजनिक स्थळी वावरणे जरा जोखमीचे झालेले आहे. मोदीजींची सत्ता आल्यापासून गाई, बैलांची वाहतूक करणे, अगदी वैध कागदपत्रांसह करणेही जीवावर बेतू शकते याचा अनुभव आपण घेतोच आहोत. अमेरिकेतील भारतीय वंशाचे आपले बांधव, साधारण तशाच प्रकारची दहशत आज तिथे अनुभवत आहेत. म्हणजे गेल्या दोन तीन वर्षांत हजारो भारतीयांवर, ते भारतीय आहेत म्हणून हल्ले झालेत अशातली गोष्ट नाही. पण अशा चार पाच घटना जरी ओळीने एकापाठोपाठ एक घडल्या, तरी संपूर्ण वांशिक गटावर दहशत बसविण्यास ते पुरेसे असते. एच वन बी व्हिसावर फिलाडेल्फियात गेली सहा वर्षे राहणारा एक मित्र परवा फोनवर सांगत होता की हल्ली फार कंटाळा येतो, किती वेळ घरात बसून टीवी, सिनेमे पाहणार ? वर्षभरा पूर्वी, एका शनिवारी मुलांना घेऊन आम्ही एका सार्वजनिक पार्क मध्ये फिरायला गेलो होतो, तर तिथे आलेल्या गोऱ्या अमेरिकन मंडळींचा एक ग्रुप आमच्याकडे रोखून पहात होता. त्यापैकी एकाला सहज ‘असे का पहाताय’ म्हणून टोकले, तर दुसरा एक गोरा धटिंगण अंगावर धावून आला. ‘गो बॅक टू युवर कंट्री यु फकिंग इंडियन’ असे ओरडायला लागला. मुलं घाबरून रडायलाच लागली. आम्ही तिथून पळ काढला. त्या दिवसापासून आम्ही आता पूर्वीसारखे फिरायला घराबाहेर पडत नाही.

दुसरा एक भारतीय कंपनीत काम करणारा, पण कामानिमित्त दर महिन्या, दोन महिन्यातून एकदा अमेरिकेत, बिझनेस व्हिसावर जाऊन येऊन असणारा एक परिचित सांगत होता की गेली बारा वर्षे तो नियमित अमेरिकेतील वेगवेगळ्या शहरांत जातोय, पण गेली दोन वर्षे तिथे एक विचित्र टेन्शन जाणवतेय. तो न्यूयॉर्क मध्ये गेला की एका ठरलेल्या हॉटेलात रहातो. गेल्या वेळी तो क्लायंट मिटिंग आटोपून संध्याकाळी उशिरा हॉटेलवर परत येत होता. हॉटेलच्या लिफ्ट पर्यंत पोचला तेव्हा लिफ्टचे दार बंद होत होते. याने धावत जाऊन लिफ्टचे बटन दाबले, तर आत दोन गोरे, बहुधा काही पेग रिचवून घट्ट झालेले, उभे होते. एका भारतीयाने आगाऊपणा करून आपला काही सेकंदांचा खोळंबा केला हे पाहून त्यापैकी एकाची तार सटकली. “मी लिफ्टमध्ये शिरलो, तर यानेच लिफ्टचे दार उघडे राहण्यासाठी जे बटण असते ते दाबून धरले होते. आणि माझ्याकडे रागा रागाने पहात होता. मी माझ्या मजल्याचे बटन दाबायला गेलो, तर वसकन अंगावर आला, “इंडियन्स नॉट अलाऊड इन द एलिव्हेटर, गो युज द स्टेअरकेस” असा अतिशय खुनशी आवाजात बोलला. मी काही बोललो तर हा निश्चित हात उचलेल असे भाव त्याच्या डोळ्यात दिसत होते, मी चुपचाप बाहेर आलो. आणि पाच माळे चढून जिन्याने गेलों. असा अनुभव न्यूयॉर्क मध्ये येईल असं मला स्वप्नात सुध्दा वाटलं नव्हतं. ”
हे अनुभव प्रातिनिधिक आहेत. अमेरिकेत राहणं हे ट्रम्प आल्यापासून भारतीयांसाठी सुसह्य राहिलेले नाही, तरी ते असह्य झालेय असेही नाही. ट्रम्प हा एकटाच काय तो व्हिलन आहे, बाकी अमेरिकन्स उदारमतवादी आहेत अशातली गोष्ट नाही. किंबहुना परकीय नागरिक इथे येऊन आपल्या हक्काच्या नोकऱ्या हिसकावून घेताहेत ही भावना बहुसंख्य अमेरिकन लोकांच्या मनात असल्यामुळेच ट्रम्प राष्ट्राध्यक्ष होऊ शकले. त्यामुळे भविष्यात ट्रम्पचा कार्यकाळ संपल्यानंतर सारं काही आलबेल होईल याची शक्यता कमीच आहे. त्यातच दर दिवशी, देशात प्रवेश देण्यावरून, व्हिसाच्या अटी अधिक कडक करण्यावरून, ग्रीनकार्डच्या अर्जास मंजुरी देण्यावरून ट्रम्प प्रशासन नवनवीन नियम, कायदे बनवीत सुटले आहे. ट्रम्प पायउतार होऊन भले पुढील सत्ता डेमोक्रॅट्सची आली, तरी जनाधाराच्या ताकतीवर ट्रम्प ने उभे केलेले स्थलांतर विरोधी कायदे उलटे फिरविणे त्यांना शक्य होणार नाही.
खरं तर आदर्श भांडवलशाही मध्ये ज्या सिद्धांतानुसार भांडवल ज्या अर्थव्यवस्थेमध्ये अधिक परतावा मिळेल तिथे वाहाते, त्याच सिद्धांतानुसार मजूर सुद्धा जिथे त्यांच्या श्रमास अधिक मोबदला मिळेल तिथे स्थलांतर करतात. अमेरिकन भांडवलास जर भारतात गुंतवणूक करण्यास अटकाव होत नसेल तर भारतीय मजुरांस अमेरिकेत जाऊन आपले श्रम विकण्यास अडथळा होता कामा नये. परंतु वास्तवात “आदर्श भांडवलशाही ” या नावाची गोष्ट अस्तित्वात नाही.म्हणजे एरवी अमेरिकन्स मुक्त अर्थव्यवस्थेचे कितीही गोडवे गात असले तरी मुक्त अर्थव्यवस्थेच्या सिद्धांतानुसारच जेव्हा स्वस्तातले परकीय मजूर त्यांच्या देशात जागोजागी दिसू लागतात, या काळ्या बाळ्या कुरूप, बुटक्या लोकांची त्यांच्या डोळ्यासमोर आर्थिक प्रगती होऊ लागते, तेव्हा हे उपरे त्यांच्या डोळ्यात खुपू लागतात.
गंमत अशी आहे की तेथे जाऊन स्थिरस्थावर झालेली ही भारतीय मंडळी, जगातील एका अतिशय प्रगत देशात रहातात. टोकाचे व्यक्तीस्वातंत्र्य व अभिव्यक्तीस्वातंत्र्य जपणाऱ्या उदारमतवादी अमेरिकन व्यवस्थेचे सर्व फायदे ते उपटत असतात. परंतु भारतात मात्र संकुचित व धर्मवादी मानसिकता सत्तेत यावी अशी यांची तीव्र इच्छा असते. भारतीय संस्कृती ही जगातील सर्वश्रेष्ठ संस्कृती असून, क्वांटम फिजिक्स पासून ते हृदय प्रत्यारोपणापर्यंत सार काही ज्ञान, विज्ञान आमच्या वेदांत, यज्ञविधींत प्राचीन ऋषीमुनींनी अगोदरच सांगून ठेवले आहे अशी यांची ठाम समजूत असते.
खरं तर ट्रम्प फक्त, आम्हा अमेरिकन भूमीपुत्रांच्या नोकऱ्या हे लोक बळकावतात या मुद्द्यावरून भारतीयांवर खुन्नस काढतायत. ट्रम्पच्या जागी राज ठाकरे असते तर त्यांनी निश्चित सांगितले असते, की बाबानो आहे ना एवढा तुमचा महान देश, आणि आता तर एवढा महान नेता पण मिळालाय, एवढा महान की त्याच्या स्वागत समारंभाला तुम्ही तिकीट काढून लाखोंच्या संख्येने मॅडिसन चौकात बेहोष होऊन घोषणा देता, तर जा की तुमच्या महान देशात परत. इथे कशाला झक मारताय ? आम्ही अमेरिकन अर्थव्यवस्थेला हातभारच लावतोय, वेळेवर कर भरून सरकारी तिजोरी भरतोय वैगेरे आमच्यावर उपकार केल्याचा आव आणू नका.आमचा देश कसा चालवायचा ते आम्ही पाहून घेऊ, तुम्ही सुटा इथून

गेली पंचवीस तीस वर्षे अमेरिकेतील भारतीय वंशाची लोकसंख्या अतिशय वेगाने वाढत आहे. त्यात वैधपणे कायदेशीर व्हिसा घेऊन आलेले लोक आहेतच, पण अवैधपणे राहणारेही कमी नाहीत. पर्यटक किंवा विद्यार्थी म्हणून वैध व्हिसा घेऊन यायचे आणि नंतर परतच जायचे नाही. अशी मंडळी कोठलेही अधिकृत नोकरी धंदे करू शकत नाहीत. त्यांना कसलेही हक्क नाहीत. त्यांचे सर्व व्यव्हार रोखीने होतात कारण त्यांना बँकेत खातेही उघडता येत नाही. या लोकांची नेमकी संख्या कोणालाच ठाऊक नाही, परंतु ती पन्नास लाख ते सव्वा कोटींच्या दरम्यान असावी असे आडाखे तज्ज्ञांनी बांधले आहेत. या सर्वांच्या मुसक्या आवळण्यासाठी ट्रम्पचे हात शिवशिवतायत. होमलँड सिक्युरिटी या डिपार्टमेंटने आजवर कैक भारतीय वस्त्या, दुकाने, हॉटेल्स वर धाडी टाकून वर्षानुवर्षे अवैधपणे राहणाराना पकडून त्यांची परत पाठवणी केलेली आहेच,आणि यापुढे देशात येणाऱ्या मंडळींसाठी इथे कायमचे वास्तव्य करता येणे असंभव कसे करता येईल यासाठी नवनवीन कायदे ट्रम्प प्रशासन पारित करीत सुटले आहे. अलीकडेच, या पुढे सरसकट तीन वर्षाच्या वास्तव्यास परवानगी देणारा एच वन बंद करून त्या ऐवजी हरेक अर्जाची काटेकोर छाननी करून,खरोखरच जितक्या कालावधीचे काम असेल तेवढेच राहण्याची परवानगी देणारा एच वन व्हिसा या पुढे देण्यात येईल असे घोषित करण्यात आले.

अमेरिकेत स्थायिक होऊ इच्छिणारे भारतीय आणि त्यांची अडवणूक करणारे अमेरिकन प्रशासन यांच्यातील संघर्षाचा इतिहास १९२३ साली सुरु होतो. त्या काळातील अमेरिकन कायद्यानुसार ‘मुक्त’ गोऱ्या पुरुषास अमेरिकेचा “नैसर्गिक ” नागरिक होण्याचा हक्क होता. भगतसिंग ठींड या नावाचा सरदार १९१३ साली पंजाब मधून अमेरिकेस गेला होता. लाकूड कटाई कारखान्यांत त्याने काही वर्षे काम केले नंतर तो अमेरिकन फौजेत दाखल झाला. त्याचा नागरिकत्वाचा अर्ज अमेरिकन प्रशासनाने, तो कायद्यातील पूर्वअटीची पूर्तता करीत नाही या सबबीखाली फेटाळला. त्यावर भगतसिंग ठींड ने कोर्टात धाव घेतली. भगतसिंगने अपिलात म्हंटले की, अहो मी शीख आहे. आम्ही सरदार मूळचे आर्य वंशीय. एकेकाळी युरोपातून आम्ही आर्य भारतखंडात स्थलांतरित झालो. भारतात मी एका ‘उच्च’ जातीय कुटुंबात जन्मास आलो. माझे रक्त शंभर टक्के उच्चवर्णीय आहे. मी वांशिकदृष्ट्या तुमचा भाऊच आहे. मला आपलं म्हणा अशा स्वरूपाचे प्रतिज्ञापत्र त्याने सर्वोच्च न्यायालयात दिले. अमेरिकेचे नागरिकत्व मिळविण्यासाठी भगतसिंग ठींडला शिखांच्या वांशिक श्रेष्ठतेच्या, भारतातील जातीय श्रेष्ठतेच्या कल्पनेचा आधार घ्यावा लागला.

आजही परिस्थिती फारशी वेगळी दिसत नाही. ट्रम्पला, त्याच्या रिपब्लिकन पक्षाला पाठिंबा देणारा भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकांचा एक मोठा गट आहे. त्याचे नाव आहे ‘रिपब्लिकन हिंदू कोयलिशन’ . ट्रम्प प्रशासन सरसकट सगळ्याच भारतीयांशकत सर्वच अवैध रहिवाश्यांची गठडी वळेल या भीतीने या ‘रिपब्लिकन हिंदू कोयलिशन’ गटाने एक अत्यंत जातीवादी आणि घृणास्पद प्रकार सध्या हाती घेतला आहे. यांचे म्हणणे आहे, की अवैधपणे इथे राहणाऱ्या मंडळींचे पण दोन प्रकार आहेत. एक ‘चांगले’ आहेत दुसरे ‘वाईट’ आहेत. चांगले कोण ? तर ज्यांचे आई बाप एके काळी वैध व्हिसा घेऊन अमेरिकेत आले, इथे त्यांना मुले झाली, हे लोक व्हिसाची मुदत संपल्यावर परतच गेले नाहीत, परंतु जेव्हा हे मंडळी वैध व्हिसा वर राहत होती तेव्हा इथे प्रामाणिकपणे कर भरत होती. ही ‘चांगली शिकलेली’ एज्युकेटेड लोक आहेत. तर अशा ‘चांगल्या’, शिकलेल्या, कुशल लोकांना आणि त्यांच्या पोराबाळांना इथून हाकलू नका. त्यांना नागरिक व्हायची संधी द्या. दुसरे जे ‘वाईट’ प्रकारचे लोक आहेत, ते कधीच येथे वैध मार्गाने उद्योग करीत नव्हते, त्यांना खुशाल हाकला. आमचं काही म्हणणं नाही. थोडक्यात, भारतातून आलेल्या ‘कुशल’ कामगारांनी भले अमेरिकन कायद्याला वाकुल्या दाखवून अवैध रहिवासी व्हायचे पत्करले असेल, पण हे लोक किंवा त्यांचे आईबाप ‘कुशल’ कामगार आहेत किंवा होते. त्यांना अमेरिकेचे नागरिक व्हायची संधी द्या. बाकी मेक्सिकन वैगेरे अकुशल लोक, ज्यांचा प्रवेशच अवैध मार्गाने झालाय त्यांना खुशाल हाकला.

ट्रम्प व त्यांचे प्रशासन या हास्यास्पद ‘चांगल्या’ बेकायदेशीर व ‘वाईट’ बेकायदेशीर व्याख्या स्वीकारेल याची सुतराम शक्यता नाही, परंतु भारतीयांमधली ‘उच्चनिचतेची’ मानसिकता या निमित्ताने जगासमोर आली.  एकूण, २०२१ साली पुढच्या अमेरिकन निवडणुकीत ट्रम्प व त्यांच्या रिपब्लिकन पक्षाचा पराभव व्हावा म्हणून अमेरिकन ग्रीन कार्ड व नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेली मंडळी व सध्या भारतात शिकणारी परंतु भविष्यात अमेरिकेत स्थायिक व्हायची स्वप्ने पाहणारी मंडळी देव पाण्यात बुडवून बसली असतील तर नवल नाही. एवढंच की अमेरिकेत सर्वसमावेश विचारसरणीचा, लिबरल ,सहिष्णू विचारधारेचा विजय व्हावा, त्यांनी आम्हाला कसलीही खळखळ न करता आनंदाने सामावून घ्यावे, त्याच वेळी भारतात मात्र बीफ खाल्लं या संशयावरून मुडदे पडणारी कट्टर विचारसरणी सत्तेत राहावी, ही मानसिकता भयंकर दांभिक आहे.

लेखक आय टी तज्ज्ञ असून काही काळ अमेरिकेत वास्तव्यास होते.

Write A Comment