fbpx
राजकारण

मराठ्यांनो सावधान तुमचे अस्तित्व धोक्यात!

देशभरात प्रस्थापित राजकीय पक्ष दंगली स्वतःच्या स्वार्थासाठी करतात हे जगजाहीर आहे. स्वातंत्र्य नंतरच्या काळात एखाद्या मुख्यमंत्र्याची उचलबांगडी करायची असेल तर हिंदू-मुस्लीम दंगल घडवून आणायची, दंगल शमली की मुख्यमंत्री बदला. अशी मोहीम सुरुवात व्हायची. मुख्यमंत्री बदलण्याचे नामी हत्यार म्हणजे दंगल. याची अनेक उदाहरणे आहेत. १९९२चे तर सुप्रसिद्ध आहे! राजकीय पक्षांची ही भूमिका समजली जावू शकते. परंतु, १ जानेवारीला भीमा कोरेगावामध्ये अनियंत्रित हिंदू संघटनांनी केलेली दंगल ही त्या वेळेस समजली नाही. परंतु, आता हळूहळू दंगलीचे कारण व धोरण स्पष्ट व्हायला लागल आहे. अलीकडे आंबेडकरी समूह, दलित समूह यांनी स्वतःची जागा, वलय, सामाजिक, राजकीय परिस्थिती निर्माण केलीय. त्यांच्या बरोबरीने ओबीसी हिंदू हा सुद्धा आपली वेगळी जागा आणि अस्तित्व निर्माण करत आहेत आणि तेही पेशवाईच्या विरोधात लढण्याच्या इतिहासातून म्हणजेच स्वतःचं शौर्य हे सिद्ध करायचे आणि ते थेट शिवाजी महाराजांशी नेवून जोडायचे. ही बाब अनियंत्रित वैदिक हिंदू परंपरा मानणार्‍या संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे व त्यांच्या सहकाऱ्यांना मान्य नव्हती आणि म्हणून हा भीमा कोरेगावाचा हल्ला करण्यात आला. त्यांना भीती होती की, आरक्षणाच्या माध्यमातून जे धृवीकरण झाले होते, मराठा-मराठ्यांचे बोलत होता, ओबीसी-ओबीसींबद्दल बोलत होता, आंबेडकरी आणि दलित आपले बोलत होता. आदिवासी स्वतःची भाषा बोलत होता. अनुकूलता होती तिला भीमा कोरेगावाच्या कार्यक्रमाने छेद जातोय हे लक्षात आल्यानंतर पुन्हा भय आणि भीतीचे वातावरण निर्माण करून थांबवायचे हा प्रयत्न. दुसरे असे की, शिवाजी महाराजांच्या माध्यमातून पुन्हा आपण विस्कटलेली घडी एकत्र आली तर हिंदुत्त्ववाद्यांचे राजकारण संपलं. या भीतीपोटी सुद्धा हा हल्ला आहे. नुकत्याच घडलेल्या घटनांनी सध्या जरी परिस्थिती सकारात्मकरित्या बदललेली आहे, ती कायम राहील यासाठी मराठा समाजाकडूनच हालचाली झाल्या पाहिजेत. मी असे मानतो आहे की, पूर्वीच्या काळी पूर्ण मराठा समाज हा ’गांधीवादी हिंदुत्व’मानत असे ज्याला अवैदिक वारकरी संदर्भ होता आणि म. गांधीचे सगळ्यात मोठे योगदान म्हणजे बहुजनांना स्वातंत्र्य चळवळीच्या केंद्रस्थानी आणणे, जिद्द निर्माण करणे, लढ्याला प्रवृत्त करणे आणि स्वातंत्र्याच्या निमित्ताने प्रस्थापितांच्या विरोधात जाण्याचे बळ देणे. कालांतराने सवर्ण समाजाकडून नेतृत्व हे बहुजनांकडे आले. आज जी मराठा समाजाची इतरांपेक्षा जी सुबत्ता आहे. ही सुबत्ता म. गांधीच्या हिंदुत्वाची कास धरली म्हणून काळाच्या ओघामध्ये आपण काय होतो? अन् काय झालो. याचे भान ही राहिले नाही. काँग्रेस आणि स्वतःला काँग्रेसी म्हणणारे म. गांधींनाच विसरले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे म्हणाले होते की, जो आपला इतिहास विसरतो तो लयास जायला सुरुवात होते. आज मला मराठा समाजाची तीच परिस्थिती दिसते. यशवंतराव चव्हाण, शंकरराव पाटील, वसंतदादा पाटील किंवा शंकरराव चव्हाण असतील या सर्व व्यक्तींमध्ये सामाजिक बांधिलकीही वेगळी होती. आताच्या मराठा पुढार्‍यांची बांधिलकी ही वेगळी. त्यांनी झुकते माप मराठा समाजाला दिले. पण, इतर कुणालाही दुखावले नाही. त्यामुळे ही माणसे गेल्यानंतरही लोक त्यांच्या नावाचे आजही स्मरण करतात. त्याचे सर्वात मोठे कारण, ते महात्मा गांधीच्या हिंदुत्वाच्या तालमीतून तयार झाले. आताचे मराठा समाजाचे नेतृत्व हे व्यक्तिगत स्वार्थापोटी सर्वसमावेशक पाटीलकी विसरले आणि त्या पाटीलकीचे दैवतही विसरले. त्यामुळे स्वार्थी अप्पलपोटी नेतृत्त्व उभे राहिले. यातून वैदिक हिंदू परंपरेला मानणार्‍या संधीसाधुंनी शिवाजी महाराजांचा सर्व समावेशक चेहरा पुसून गोबाह्मण प्रतिपालक शिवाजी उभा केला. त्याला मराठे तरुणाई ही बळी पडली. त्यामुळे प्रस्थापित मराठा पुढार्‍यांची हिंमत होत नाही की, त्यांनी हे चुकीचे आहे. ज्या जेधे आणि इतर मंडळींनी ब्राह्मणशाहीच्या विरोधात लढा दिला. आज तीच मराठ्यांची तरुण पिढी ब्राह्मणशाहीलाच स्वीकारून शिवाजी महाराजांना संकुचित करून त्यांना पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होतोय. महात्मा फुल्यांनी समाधी शोधून त्यासाठी शिव्याशाप खाऊन शिवाजी महाराजांना बहुजनांच्या अधिस्थानावरती बसवले. डॉ. बाबासाहेब  आंबेडकरांनी महाडच्या सत्याग‘हामध्ये ’जय भवानी, जय शिवाजी’ या घोषणेच्या माध्यमातून शिवाजी महाराजांना लोकराजा हे उभे केले आणि बहुजनांना महाराजांच्या रूपाने एक प्रतिक दिलं. आज मला हे बहुजन प्रतीक पुढे राहिल का? याबद्दल शंका निर्माण होते. अनेक वर्षानंतर ओबीसी खुलेआम पद्धतीने उघडपणे ऐतिहासिक दृष्ट्याही सिद्ध झालेले सत्य सांगत आहेत की, आम्ही महाराजांच्या सैन्यामध्ये होतो, आम्ही लढलो, आमचाही स्वराज्य उभारणीत सिंहाचा नसेल कदाचित पण, खारीचा तरी वाटा आहे. आमच्या हातात  शिवाजी महाराजांनी दिलेली तलवार ही पेशवाईने काढली. आम्हाला निशस्त्र केले, जातीत बंधिस्त केले आणि आम्ही ओबीसींनी मराठ्यांसोबत भीमा कोरेगावाला महार सैन्याच्या खांद्दयाला खांदा लावून पेशवाईही उलटवली. ही भावना मराठा समाजाला कायम राखायची असेल, तर आज मराठा समाजामध्ये दोन विचारधारा प्रभावी झालेल्या दिसत आहेत. १. गांधीवादी हिंदुत्व मानणारा प्रवाह. २. वैदिक हिंदुत्व मानणारा प्रवाह. वैदिक हिंदुत्त्व मानणार मराठा हा स्वतःच्या मनाप्रमाणे-मतानुसार चालत नाही. वैदिक परंपरेला मानणारे, मनुवादी संस्कृती मानणारे मिलिंद एकबोटे, भिडे यांच्या इशार्‍यावर ते चाललेत. गांधीवादी हिंदुत्व मानणारा मराठा स्वतंत्र आहे. तो विचार करणारा आहे. स्वतः सहिष्णुता पाळतो. पाटीलकीचीही भावना जपतो. अशा परिस्थितीत तो गप्प  बसला तर वैदिक मनुवाद मानणार्‍या परंपरेचा मराठा पर्यायाने गांधीविरोधी समूह हा वर्चस्व मिळवल्याशिवाय राहणार नाही. त्याचे हे वर्चस्व हे मराठा समाजापुरते मर्यादित राहील आणि तो शिवाजी महाराजांना अधिकाधिक संकुचित करत मनुवादी वैदिक परंपरेचा रक्षणकर्ता अशीच प्रतिमा उभी करत जाईल. ही प्रतिमा जशीजशी पुढे येईल तसतसे बिगर मराठा हे मराठ्यांपासून लांब जायायला सुरुवात होईल. आणि यातून मनुवादी-वैदिक परंपरा मानणारा मराठा कटपुतली सारखा वागेल आणि त्यांच्या सर्व नाड्या या मनुवादी वैदिक परंपरा मानणारे मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडेंसारख्या लोकांकडे राहील. आतापर्यंत महाराष्ट्राचे नेतृत्व हे गांधीवादी हिंदुत्व मानणार्‍या मराठा समाजाकडे होते. कुरकूर होत होती, विरोध होत होता पण, मान सन्मानाने बोलवले तर ती कुरकूर आणि विरोध शमून जायचा. अपेक्षा एवढी होती की, आम्हाला डावलू नका आणि बाजूला सारू नका. भीमा कोरेगावाच्या निमित्ताने महाराष्ट्रात मराठा समाजाच्या परिस्थितीमध्ये बदल होतोय का? याचा  विचार केला पाहिजे. गांधीवादी हिंदुत्त्व मानणार्‍या मराठा समाजाने एक लक्षात ठेवले पाहिजे की, महात्मा गांधीची हत्या झाल्यानंतर महात्मा गांधी हिंदुत्ववादी आणि मनुवादी वैदिक परंपरा मानणार्‍यांमध्ये दंगल झाली. त्यामध्ये अनेकांचे नुकसान झाले. अधिक नुकसान हे मनुवादी वैदिक हिंदुत्ववाद्यांचे झाले. मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी जे मनुवादी वैदिक हिंदुत्वदी विचारांचे नुसते प्रतीक नाही, तर संपूर्ण प्रतिनिधित्व करतात. त्यांनी ’आम्हाला’ १९४८ साली काय सोसावे लागले याचा उल्लेख केला होता. मला ताबडतोब मराठवाड्यातल्या दंगलीची आठवण झाली. दंगल झाली हे निश्‍चित, घरे जाळली, माणसं मारली हेही निश्‍चित पण, आज ३० वर्षानंतर मराठवाड्यातल्या घटनांचा कोणी उल्लेख करत नाही. ज्यांची घरं जाळण्यात आली, मारण्यात आले त्यांचे आणि दंगलखोरांचे आताच्या कालावधीमध्ये जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाल्याचे मी पाहतो. काही घटना घडल्या त्यांनी आपसात मिटवल्या आणि आज गुण्यागोविंदाने नांदत आहे. परंतु, पंतप्रधान जे आरएसएसचे प्रतिनिधी आहेत त्यांनी सर्व आरएसएसच्या वतीने १९४८ साली ’आमच्यावर’ काय बितले याचा २०१६-१७ साली उल्लेख करणे याचा अर्थ ते १९४८ साली झालेली दंगल विसरलेले नाहीत, तर राहून-राहून खपली काढल्या सारखं त्याचा उल्लेख करतात. याचा अर्थ त्यांच्या मनामध्ये शल्य आहे की, आपण बदला घेवू शकतो. मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांच्या ह्या कारवाया सरळ बदला घेवू शकत नाही, म्हणून वाकड्या मार्गाने बदला घेण्याचा प्रयोग तर नाही? याचा गांभीर्याने विचार मराठा समाजाने केला पाहिजे. मराठा समाजाला स्वतःच्या हातातले नेतृत्व घालवायचे नसेल, तर महात्मा गांधीचे हिंदुत्व मानणार्‍या मराठ्यांनी भूमिका घेतली पाहिजे. त्यासाठी स्वजातीच्या विरोधात वाटले तरी प्रबोधन व भूमिका त्यांनी घेतली पाहिजे. ती भूमिका म्हणजे त्यांना १ तारखेला भीमा कोरेगावाच्या विजयस्तंभाला वंदन करण्यासाठी जमलेल्या लोकांवरचा हा वैदिक मनुवादी हिंदू परंपरा मानणार्‍या मराठा समाजाने केला, त्याचा निषेध महात्मा गांधी यांचे हिंदुत्त्व मानणार्‍यांनी केला पाहिजे तसे केले नाही तर, जात म्हणून एकसंघ राहाल, पण उरलेले जातीसमूह सवंगडी हे निवडणुकीत त्यांच्या बरोबर नसतील. मराठा समाजाने यापुढे ठरवायचे आहे की, ते जातीचे राजकारण करतील की तत्त्वाचे राजकारण करतील. महात्मा गांधींना बहुजनांची चळवळ उभी करायची होती ती त्यांनी केली. सत्तेतले आणि समाज स्थानातले परिवर्तन आणले. ते टिकून ठेवायचे की नाही याचा निर्णय म. गांधी यांचा हिंदुत्व मानणार्‍या मराठ्यांनी केला पाहिजे. ते स्थान त्यांना टिकवायचे असेल तर त्यांनी ताबडतोब मनुवादी वैदिक हिंदुत्व मानणार्‍या मराठ्यांचा जाहीर निषेध केला पाहिजे. आणि पुन्हा महात्मा गांधीच्या विचारांना या देशामध्ये अग्रस्थानी आणले पाहिजे. मराठा समाज हे करू शकला नाही तर नेतृत्व गमावून बसेल आणि त्यानंतर जेम्स लेनच्या माध्यमातून शिवाजी महाराजांची जी बदनामी झाली. या वेळी शिक्कामोर्तब केले जाईल. मराठा समाजाला अनेक वेळा जागृत करण्याचा प्रयत्न केला. शहाणपणाचे दोन शब्दही सुचवले. मराठा समाजाने एक लक्षात घ्यावे जोपर्यंत शिवाजी महाराजांचे प्रतीक सार्वत्रिक करतील तोपर्यंत मराठा समाजाचे नेतृत्व हे अबाधित राहील. ज्या दिवशी शिवाजी महाराज मराठा समाजातील मनुवादी वैदिक हिंदुत्व परंपरेच्या हाती गेले त्या दिवशी मराठा समाजाचे नेतृत्व संपलेले असेल. तेव्हा मराठा समाजाने स्वः जातीतला माणूस चुकत असेल आणि चुकला असेल तर त्याचा निषेध हा केलाच पाहिजे. तो करण्याची हिंमत ठेवली पाहिजे. आणि त्यातूनच इतर गैर मराठा जे शिवाजी महाराजांना मानतात त्यांना आपुलकी आणि सद्भावना आपल्याबद्दल वाटेल. हे जर झाले तरच नेतृत्व टिकेल. नेतृत्व टिकवण्याच्या हितसंबंधांसाठीही मराठ्यांनी हे केले नाही तर मराठ्यांनो सावधान तुमचे अस्तित्त्व धोक्यात आले आहे!!!

प्रकाश आंबेडकर हे भारतीय रिपब्लिकन पक्षाचे नेते आहेत

3 Comments

  1. SANTOSH MARUTI SHEDGE Reply

    श्रीमान प्रकाश आंबेडकर, का? तुह्मी सर्व सतत उकरत असता आणि त्यामुळे प्रत्येकाच्या मनात दंगल हि भीती निर्माण करत असता, मोर्चा काडणे ह्या मुळे किती जणांचे नुकसान होते किती तरी वात्रट तरुण जाळपोळ मारामारी धमकी अशा गोष्टी शिकतात आणि पकडले गेले कि पोलीसांचे हातपाय जोडतात. तुह्मी सरकारशी माणसांच्या मुलभूत गरजासाठी का लडा देत जसे कि पाणी, वीज, रस्ते, निसर्ग, संडास ह्या गोष्टींसाठी आज मुंबईत तसेच इतर शहरात झोपडीत राहणारे माणसे प्रत्येक मुलभूत गरजांपासून वंचित आहे जसे कि रात्री धारावीत ९५% संडास बंद असतात हे तर एक छोटेचे उदाहरण दिले. कशाला जाती-पातीचे राजकारण करून पुढील पिढी संपवताय, आह्मी सरळ-सादी माणसे त्यांच्यात कशाला विषवल्ली पसरवताय.

  2. SANTOSH MARUTI SHEDGE Reply

    श्रीमान प्रकाश आंबेडकर, का? तुह्मी सर्व सतत उकरत असता आणि त्यामुळे प्रत्येकाच्या मनात दंगल हि भीती निर्माण करत असता, मोर्चा काडणे ह्या मुळे किती जणांचे नुकसान होते किती तरी वात्रट तरुण जाळपोळ, मारामारी, धमकी अशा गोष्टी शिकतात आणि पकडले गेले कि पोलीसांचे हातपाय जोडतात. तुह्मी सरकारशी माणसांच्या मुलभूत गरजासाठी का लडा देत नाही जसे कि पाणी, वीज, रस्ते, निसर्ग, संडास ह्या गोष्टींसाठी आज मुंबईत तसेच इतर शहरात झोपडीत राहणारे माणसे प्रत्येक मुलभूत गरजांपासून वंचित आहेत. जसे कि रात्री धारावीत ९५% संडास बंद असतात हे तर एक छोटेचे उदाहरण दिले. कशाला जाती-पातीचे राजकारण करून पुढील पिढी संपवताय, आह्मी सरळ-सादी माणसे त्यांच्यात कशाला विषवल्ली पसरवताय.

Write A Comment