fbpx
सामाजिक

भिमा-कोरेगाव १८१८

भिमा कोरेगाव च्या लढाईला २०० वर्ष पूर्ण झाली, त्या निमित्ताने एक जुनाच वाद जाणीवपूर्वक पुढे आणून या शौर्यगाथेला कलंकित करण्याचा प्रयत्न १ जानेवारी २०१८ ला दगडफेक करून करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ह्या वादाची सुरुवात सरसंघचालक गोळवलकरांनी त्यांच्या “बंच ऑफ थॉट॒स” या पुस्तकात केली होती. परकियांच्या नेतृत्वाखाली आपलेच लोक आपल्या लोकांविरुद्ध लढले असा निष्कर्ष काढून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना स्वकीयांच्या विरोधात लढल्याचा अभिमान वाटतो असे म्हटले होते. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच वेळी “स्वकीय कोण?” असा प्रश्न उपस्थित करून, यासाठी तुमचा धर्म, संस्कृती आणि अस्पृश्यांप्रती असणारी वागणूक जबाबदार आहे असे ठोस उत्तर दिलेले आहे. अर्थात हा वाद त्यावेळी पुढे येणे याला मर्यादित अर्थ होता. संघाचे प्रभाव क्षेत्र अगदी एका जातीतल्या छोट्या विभागापुर्ते मर्यादित होते. संघ राजकीयदृष्ट्या फार प्रभावशाली गणला जात नव्हता. आज तशी परिस्थिती नाही. आज केंद्रात आणि जवळ जवळ सर्व भारतावर त्यांची राजकीय सत्ता प्रस्थापित झाली आहे. तिचा फायदा घेऊनच ब्रिटीशांविरुद्ध साधा ‘ब्र’ ही न उच्चारलेल्या या संघाने आपणच सच्चे राष्ट्रवादी असल्याची शेखी मिरवणे सुरु केले आहे. भिमा – कोरेगावच्या निमित्ताने पुन्हा हा वाद खोट्या राष्ट्रवादाच्या नावाने पुढे आणला आहे.

भिमा कोरेगावच्या लढाईच्या संदर्भात मांडणी करताना हे खोटे राष्ट्रवादी दोन गोष्टी जाणीवपूर्वक दडवून ठेवतात. एक म्हणजे त्यावेळी राष्ट्र ही संकल्पना अस्तित्वात होती काय? आणि दोन, पेशवाईची अस्पृश्यांप्रती वागणूक काय होती? राष्ट्राबद्दल “आम्ही हजारो वर्ष राष्ट्र आहोत” ही संघाची भूमिका आहे. अर्थात ते काही भूमिका घेऊ शकतात, कारण त्यांच्या भूमिकांना पुराव्यांपेक्षा श्रद्धांचा आणि भावनांचा आधार असतो. पण पेशवाईत अस्पृश्य जनतेचे जे हाल केले गेले, त्याबद्दल ते काय म्हणणार आहेत? क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शिष्या मातंग समाजातील मुक्ता साळवे ह्यांनी १८८५ साली लिहिलेल्या निबंधात या हाल अपेष्टांचे वर्णन लिहून ठेवले आहे. शिवाय छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज ह्यांच्या राजवटीत सुरु असलेली महार सैनिकांची भरती पेशवाईने बंद का केली? ह्या प्रश्नांची उत्तरे अर्थातच ते देणार नाहीत. त्यांनी दडवून ठेवलेल्या ह्या दोन्ही गोष्टींचा उहापोह आपण ह्या लेखात करणार आहोत.

राष्ट्र, राष्ट्रवाद, ह्या आधुनिक संकल्पना आहेत. भांडवली व्यवस्थेचे हे देणं आहे. भांडवलशाहीला तिच्या विकासासाठी त्याची गरज होती. यूरोपात १७६० ला औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली आणि तिने प्रस्थापित राजेशाही, सरंजामशाही ह्याच्या विरोधात भूमिका घेऊन स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्य पुढे आणली. यातून फ्रांस, इंग्लंड, जर्मनी, इटली, या युरोपियन देशातून राजेशाहीचे उच्चाटन होऊन राष्ट्रवादाचा विकास झाला.

१८१८ ला भिमा कोरेगावच्या लढाईच्या वेळी, आपल्या देशात काय परिस्थिती होती? राष्ट्र अस्तित्वात होते काय? १८५३ मध्ये कार्ल मार्क्स यांनी लिहिलेल्या “हिंदुस्थानातील ब्रिटीश राजवटीचे भावी परिणाम” ह्या लेखात म्हटले आहे की “फोडा आणि झोडा ह्या रोमन राजनीतीचा अवलंब करून ग्रेट ब्रिटनने हिंदुस्थानावर राज्य केले. निरनिराळे वंश, टोळ्या, जाती, धर्म, पंथ, व सार्वभौम सत्ता ह्यांच्या समुच्चयाला हिंदुस्थान हे भौगोलिक नाव दिले जाते आणि त्यांच्यातील विरोध हेच ब्रिटीश वर्चस्वाचे मुख्य केंद्रीय तत्व आहे” असे नमूद करून मार्क्सने पुढे म्हंटले आहे , “ आपल्याला हिंदुस्थानचा पूर्व इतिहास माहित नसला तरी आजच्या घटकेला सुद्धा हिंदुस्थानच्या खर्चाने पोसल्या जाणाऱ्या हिंदी लष्कराच्या जोरावरच हिंदुस्थान इंग्रजांच्या गुलामगिरीत अडकलेला आहे हे महान निर्विवाद सत्य नाही काय?” याचा अर्थ असा होतो की ब्रिटीशांचे लष्कर भारतीयांचेच होते, ज्यात सर्व जाती जमातींचे लोक होते. अगदी १८५७च्या लढाईत ज्याला मार्क्सने भारताचे पहिले स्वतंत्र युद्ध संबोधले आहे, त्या युद्धात दिल्लीच्या निर्णायक रणधुमाळीत ब्रिटीश फौजेत लढणारे ५७००० राजपूत आणि २३००० ब्राम्हण सैनिक होते. त्यामुळे भिमा कोरेगावच्या लढाईत ५०० महार सैनिक ही फार अद्भुत आणि देशद्रोही गोष्ट नाही. कारण देश नावाची गोष्टच अस्तित्वात नव्हती. गोळवलकर म्हणतात त्या प्रमाणे आपण हजारो वर्षे राष्ट्र असतो तर आर्य, ग्रीक, कुशाण, हूण, शक, अफगाण, फ्रेंच, डच आणि अंतिमतः इंग्रज या सर्वांनी येऊन इथे राज्य केले नसते.

राष्ट्र ही संकल्पना आपल्याकडे १८५७ नंतर वाढीस लागली आणि भारतातल्या भांडवलशाहीच्या विकासाबरोबर ती वाढत गेली. लोकमान्य टिळक आणि सुरेन्द्रनाथ बॅनर्जी हे राष्ट्रीय चळवळीचे जहाल नेते भारताचे वर्णन “घडत असलेले राष्ट्र” असे करीत असत. त्यामुळे १८१८ साली राष्ट्र आणि राष्ट्रवादाचा मुद्दा उपस्थित होण्याचा प्रश्नच नाही. भिमा कोरेगावच्या युद्धात जरी महार सैनिक मोठ्या संख्येने असले तरी इतर जातींचे सैनिकही होते. विजय स्तंभावर जी नावे कोरली आहेत, त्यात २२ महार तर १६ मराठा सैनिकांची नावे आहेत. ह्या युद्धात पेशव्यांकडून शौर्याने लढले ते अरब मुस्लिम. पण आज त्यांच्या धर्मबंधुंना पेशवाई समर्थक सरसकट देशद्रोही ठरवत आहेत. मुस्लिम द्वेषावरच त्यांचे राजकारण उभे आहे.

स्वकीय आणि परकीय हे शब्द आज आपण ज्या अर्थाने वापरतो त्या अर्थाने त्या काळात वापरले जात होते काय? १८५७ च्या काळातील गोडसे भटजींचे ‘माझा प्रवास’ हे आत्मचरित्र उपलब्ध आहे. ते अलिबागवरून उत्तरेकडे प्रवासाला निघतात. त्याचे वर्णन ते ‘परदेशी’ निघालो आहे, असे करतात. याच पुस्तकात गोडसे भटजींनी दक्षिणेकडील ब्राम्हण पुजारी इंग्रजांसाठी कशी हेरगिरी करीत, याची उदाहरणे दिली आहेत. हिंदू राजाकडे ते पुजारी म्हणून जात आणि तेथील इथ्यंभूत माहिती ब्रिटिशांना देत असत. ह्याचा अर्थ, देश, देशद्रोह ह्या संकल्पना अस्तित्वात नव्हत्या हे स्पष्ट पणे दिसून येते.

ब्रिटिश राजवटीबद्दल मार्क्स यांचे आकलन पुढेल प्रमाणे होते: “हिंदुस्थानमध्ये सामाजिक क्रांती घडवून आणण्यात स्वतःचा अत्यंत नीच स्वार्थ साधणे हाच (ब्रिटिशांचा हेतू) होता पण मुख्य प्रश्न हा नव्हे, प्रश्न आहे तो हा की आशियाच्या समाजव्यवस्थेत मूलगामी क्रांती घडवून आणल्या खेरीज मानव जातीला आपले इतिहासदत्त कार्य तडीस नेता येईल काय? जर ते अशक्य असेल, तर इंग्लंडने कोणतेही गुन्हे केलेले असोत, ही क्रांती घडवून आणण्यात इंग्लंड अजाणतेपणाने इतिहासाच्या हातातील हत्यार बनले हे कबूल केले पाहिजे.” मार्क्स या ठिकाणी वैश्विक मानवतावादी दृष्टीकोनातून पाहतो. एकंदरच मानव जातीला शोषण मुक्त, दु:ख मुक्त अशा समाजव्यवस्थेकडे घेऊन जाण्याच्या संदर्भात तो भारतातील ब्रिटिश राजवटीच्या परिणामांचा विचार करतो. म्हणून मार्क्सने विषद केलेले ब्रिटिश राजवटीचे ऐतिहासिक महत्व १८५७ नंतर सुरु झालेली राष्ट्र निर्मितीची प्रक्रिया आणि जातीव्यवस्थेचे, खास करून पेशवाईचे अस्पृश्यांच्या बद्दलचे संदर्भ टाळून आपल्याला भिमाकोरेगावच्या लढाई कडे पाहतां येणार नाही.

बऱ्याच लोकांना, अगदी पुरोगामी लोकांनाही फुले-आंबेडकर ब्रिटिशांचे हस्तक वाटत असत. परंतु फुले-आंबेडकरांनी कधीही ब्रिटिशांची वकिली केली नाही, की चिपळूणकरांसारखे ब्रिटिश राज्य ईश्वरी वरदान मानले नाही. ब्रिटिशांना जिथे हाणायला पाहिजे, तिथे व्यवस्थित हाणले आहे. त्यामुळे भिमा कोरेगावच्या लढाईचे खोटे चित्र उभे करून फुले आंबेडकरी चळवळ राष्ट्रविरोधी ठरवण्याचा ब्राम्हण्य्वादी भाजप-आर.एस.एस.चा कांगावा स्वतःच्या राष्ट्रद्रोही ब्रिटिशधार्जिण्या कारवायांवर पांघरूण घालण्यासाठी आहे. जगाच्या पाठीवर जेंव्हा जेंव्हा दडपलेल्या शोषित जनतेने बंडाचा झेंडा उभारला, तेंव्हा तेंव्हा त्यांनी आपली इतिहासातील मुळे शोधण्याचा प्रयत्न करून लढाऊ प्रतीके समोर आणली आहेत. मग ते स्पार्टाकस असोत, चे गव्हेरा असोत, बिरसा मुंडा असोत. शूद्रातिशूद्र आणि स्त्री दास्याविरुद्ध पुकारलेल्या मुक्ती लढ्यात फुले-आंबेडकरांना “आपल्या” इतिहासाची गरज होती. महात्मा फुल्यांनी इतिहास विषयक एक दृष्टी पुढे आणली, जी शूद्रातिशूद्र, स्त्रिया, आणि बहुजन जनताच ह्या भूमीची मालक असण्याचा आणि आर्यभटाने त्यांना कपटाने जिंकून गुलाम केल्याचे सांगते. तर डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी शुद्र पूर्वी कोण होते, अस्पृश्य पूर्वी कोण होते, याबद्दल मूलगामी संशोधन करून ठेवले आहे. भिमा कोरेगावची लढाई डॉ. आंबेडकरांसाठी गलितगात्र झालेल्या, सत्व विसरलेल्या अस्पृश्य समाजाला त्यांच्या पूर्वजांच्या शौर्याची आठवण करून देऊन त्यांच्यात शौर्य जागवण्यासाठी उपयोगी पडले. शिवाय ही शौर्य गाथा केवळ दंतकथा नव्हती. खरी खुरी हाडा मासाची, रक्ताची कथा होती, जी भिमा कोरेगावच्या विजयस्तंभांवर कोरली गेली आहे.

लेखक मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते व डाव्या चळवळीचे विचारवंत आहेत.

Write A Comment