रणभूमी गुजरातमध्ये लढाईला सुरवात झालीय. आजवरच्या निरीक्षणातून तरी हा लढा संवाद विरुद्ध भाषणबाजी असा दिसतोय. एका बाजूला नम्र भाषा आहे तर दुसरीकडे कर्कश्य नारेबाजी आहे. एका पक्षाचा सेनानी सामान्य लोकांत मिसळून त्यांची गाऱ्हाणी, त्यांच्या व्यथा लक्ष्यपूर्वक ऐकतोय, तर दुसऱ्या पक्षाचा धुरंधर, आवेशपूर्ण भाषणांची आपल्या भक्तगणांसमोर आतषबाजी करतोय.
एका बाजूने ‘पप्पू’ या टोपणनावाने विरोधकांकडून हिणवले जाणारे राहुल गांधी आहेत, तर दुसरीकडे ‘फेकू’ या पदवीने सन्मानित पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत.
युद्धभूमी गुजरातमध्ये गेली बावीस वर्षे भाजपाचे राज्य आहे. या काळात भाजपाने काँग्रेसची चटणी उडविली आहे. अगदी दोन महिन्यांपूर्वी गुजरात निवडणूक जाहीर झाली त्याच दिवशी राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपाने गुजरातमध्ये एक चतुर्थांश आमदार फोडून काँग्रेसला जखमी केले. घाव ताजा आहे.
भाजपासाठी मोदी हेच ‘एका योद्धयाचे’ लष्कर आहेत. निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच त्यांनी गुजरातेत सभा घेण्याचा सपाटा लावला होता. तेच पंतप्रधान असल्यामुळे, कैक हजार कोटींच्या प्रकल्पांच्या घोषणासुद्धा त्यांनी या सभांमधून करून टाकल्या. त्यांच्या सभांसाठी राज्य परिवहन मंडळाच्या तसेच खासगी कंत्राटदारांच्या बसेस भरून श्रोते सभास्थानी आणण्यात आले होते.
परंतु मोदींच्या अभिनिवेशाने भरलेल्या भाषणांचा यावेळी पूर्वीसारखा प्रभाव पडताना दिसत नाही. भाषणाच्या मध्यावर लोक उठून चालू पडताना दिसतात. हे काही बर लक्षण नव्हे.
राहुल गांधींनी सुद्धा काँग्रेसच्या प्रचारात झोकून दिल्याचे दिसतेय. राज्यभरात काँग्रेसने काढलेल्या नवसर्जन यात्रेत ते उघड्या वाहनातून सामील होताना दिसतात. सौराष्ट्राच्या दौऱ्यात त्यांना पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव उघड्या मोटारीतून फिरण्यास मनाई केली. राहुल तिथे बैलगाडीतून फिरले, ब्लॅक कॅट कमांडोंचे कडे भेदून ते खुले आम जनतेत मिसळताना दिसत होते.
भाजपाने राहुल गांधींना कितीही पप्पू म्हणून हिणवले तरी त्यांचा व्यक्तिगत करिष्मा गर्दी खेचतोच. ठिकठिकाणी लोक मोठ्या संख्येने रस्त्यालगतच्या धाब्यावर जेवण अथवा चहा साठी थांबलेल्या या ‘पप्पू’ ला पाहण्यासाठी गर्दी करत होते. एका ठिकाणी तर तरुणांच्या गर्दीने आग्रह केला म्हणून राहुल गांधींनी जीन्स टीशर्ट घालून त्यांच्या बरोबर सेल्फी सेशन पण पार पाडले.
सुरत शहरात राहुल गांधींनी त्यांच्या प्रचारकौशल्याचे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन केले. सुरत शहरात वस्त्रोद्योग व हिरा उद्योगात मिळून देशभरातून आलेले किमान दहा लाख कामगार काम करतात. राहुल या कामगारांत मिसळत होते, छोट्या व मध्यम व्यावसायिकांना व त्यांच्या कामगारांना भेटत होते. संध्याकाळी एका बंदिस्त सभागृहात राहुल गांधींची, कामगार व मालकांच्या प्रतिनिधी मंडळांबरोबर सभा ठेवली होती. त्यात राहुलने एक छोटेखानी भाषण केले. त्यात ते म्हणाले,कि बाबानो मी इथे तुमच्यासमोर भाषण ठोकायला आलेलो नाही. मी तुमची ‘मन कि बात’ ऐकून घ्यायला आलोय. पुढील पाऊण तास राहुल व्यापारी व कामगारांचे प्रश्न, व्यथा लक्षपूर्वक ऐकत होते. काही लोकांनी त्यांना बोचरे प्रश्नही विचारले,परंतु राहुल गडबडून जाताना किंवा प्रश्न टाळताना दिसले नाहीत. “मी शिकतोय, माझ्याकडून चुका झाल्यायत, परंतु तुम्हा सर्वांच्या सहकार्याने, मी त्या हळू हळू सुधारेन” अशी नम्र उत्तरे राहुलनी दिली.
अहमदाबादेत पूर्वप्रधानमंत्री मनमोहनसिंगांचे देखील व्यापारी व उद्योजकांसमोर एक भाषण झाले. नोटबंदी व जी एस टी या कशा फसलेल्या योजना आहेत यावरील मनमोहनसिंगांच्या विवेचनास प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. अर्ध्या तासाच्या त्यांच्या भाषणाच्या अखेरीस, श्रोत्यांनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट केला.
काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांच्या सभा, मिटिंगांमध्ये, काँग्रेसचे स्थानिक नेते, कोणीही पंतप्रधान मोदी किंवा भाजप अध्यक्ष अमित शहा यांवर अपशब्द वापरून टीका करू नये असे आवाहन करताना दिसतात.
यावेळच्या निवडणुकीत काँग्रेसने एक कल्पक योजना राबविलेली दिसते. सॅम पित्रोदा हे नाव देशात परिचित आहे. एके काळी राजीव गांधींनी या परदेशस्थ भारतीयांस हेरून त्यांच्या करवी भारतात ‘टेलिकॉम क्रांती’ घडवून आणली होती. पित्रोदा मूळचे गुजराथी. त्यांचा जन्म ओडिशाच्या तिलागढ येथील असला तरी त्यांचे उच्चंशिक्षण बडोदा विद्यापीठात पार पडले. या खेपेस काँग्रेसने पित्रोदांना अभिनव पद्धतीने प्रचारात जोडून घेतले आहे. गुजरातच्या आम जनतेबरोबर, शिक्षक, विद्यार्थी, व्यापारी, शेतकरी,सर्वच घटकाबरोबर बोलून एक “जनतेचा जाहीरनामा” बनविण्याची जबाबदारी पित्रोदांना देण्यात आली आहे.
विकासाचे ‘टॉप डाउन’ म्हणजे वरून खाली लादले गेलेले मॉडेल जनतेच्या व्यथांची दखल घेऊ शकत नाही. गांधीविचारांशी साम्य सांगणारे ‘डाउन अप’ मॉडेलच विकासाची फळे सर्व घटकांच्या पदरात टाकू शकेल अशी काहीशी मांडणी पित्रोदा करताना दिसतात, आणि त्याला गुजरातच्या जनतेकडून सकारात्मक प्रतिसादही मिळताना दिसतो.
सॅम पित्रोदा व मनमोहन सिंग यांना प्रचारात उतरवून, सर्व स्तरातील जनतेशी अखंड संवाद साधत चालविल्या काँग्रेसच्या प्रचाराने, व्यासपिठावरून भाषणबाजीत माहीर, विकासाच्या स्वप्नांचे सौदागर मोदी व त्यांच्या पक्षापुढे कडवे आव्हान उभे राहिल्याचे चित्र दिसते.