fbpx
राजकारण

भागधेय

सौदी अरेबियामध्ये सौद राजांचा अंमल स्थापन करण्यासाठी त्या वेळच्या तिथल्या राजाने इखवान या वहाबी मिलिशियाची मदत घेतली होती. ते कुणी बाहेरचे लोक नव्हते. ते अरब बेदूईन टोळ्यांमधून आलेले लोक होते. परंतु कट्टरपंथीय होते. वहाबी पंथाचा त्यांच्यावर पगडा होता. जेव्हा जेव्हा सौदी राजघराण्यावर या इखवान पुरस्कृत विरोधाला तोंड देण्याची वेळ आली तेंव्हा तेंव्हा त्यांना एक पाऊल पुढे जाऊन आम्हीच कट्टरपंथीय आहोत, अगदी इखवानांपेक्षा आमचा कट्टरता वादात कुणीही हात धरू शकणार नाही असे सामान्य जनतेला दाखवावे लागले. भारतात बजरंग दल आणि हातात त्रिशूळ नाचविणारे आणि डोक्याला भगवी फडकी बांधणारे विश्वहिंदुपरिषदेचे उन्मादी लोक हे या देशातील वेगळ्या रंगरुपाचे इखवानच आहेत, त्यांना गप्प बसवायचे तर आडवाणींच्या चेल्यांना दोन पावले पुढे जाऊन आम्हीच खरे हिंदु धर्माचे तारणहार आहोत, असा उद्घोष करत रहावा लागेल. त्यातून त्यांची सुटका नाही. गो रक्षणाचा मुद्दा हा त्यातूनच जन्माला आलेला आहे, हे सर्वांच्या समोर आहे.

-धनंजय कर्णिक

एकेकाळचे देशाचे उपपंतप्रधान असलेले लालकृष्ण आडवाणी आज देशाच्या राजकाराणातून एका कोपऱ्यात फेकले गेले यासंबंधी अनेकांनी आपापली मते व्यक्त केली. परंतु लालकृष्ण आडवाणी हे कोपऱ्यात जाऊन पडणे किंवा अडगळीत जाऊन पडणे हा त्यांच्यासाठी झालेला काव्यगत न्याय आहे किंबहुना त्यांच्यावर नियतीने उगवलेला सूड आहे, असे थेट मत व्यक्त करणे टाळले गेले. कदाचित मृत व्यक्तिबद्दल वाईट लिहू नये असा वृत्तपत्रीय संकेत जसा पाळला जातो तसा तो अडगळीत पडलेल्या आडवाणींबद्दल पाळला गेला असावा. आडवाणी यांनी काढलेली रथयात्रा किंवा त्यानंतरचा बाबरी मशिदीच्या निमित्ताने देशात निर्माण केला गेलेला उन्माद यांच्याशी संबंधित असलेल्या सर्व घटनांची सर्वस्वी जबाबदारी लालकृष्ण आडवाणी यांची एकट्याची आहे याचा आपल्याला विसर पडता कामा नये. रविश कुमार यांनी आडवाणींची तुलना गुरुदत्त यांच्या नायकाशी केली. परंतु प्यासाचा नायक कवी आहे. सद्गुणी आहे. इथे आपण एका दुर्गुणाची चर्चा करतो आहोत हे त्यांच्या स्थितीचा पंचनामा करताना लक्षात ठेवण्याची गरज आहे.

सोमनाथच्या मंदिरापासून आडवाणी यांनी जी नाट्यपूर्ण रथयात्रा काढली त्या रथयात्रेच्या निमित्ताने देशभारात ज्या दंगली झाल्या त्यात अधिकृत आकडेवारीनुसार ८०० लोकांचा मृत्यु झाला. परंतु या घटनेच्या पश्चातदेखील अनेक घटना घडत राहिल्या. त्यात मृत्यु पावलेल्यांची संख्या काही हजारांच्या घरात जाते. त्याची जबाबदारीही आडवाणी यांचीच आहे, परंतु ते ती कधीही स्वीकारणार नाहीत, कारण त्यांच्या अंगी तेवढे धैर्य नाही.

रथयात्रेच्या अनुभवातून त्यांनी आपल्या कार्यपध्दतीत किंवा व्यूहरचनेत बदल केला नाही. वास्तवात त्यांनी तो तसा करण्याची गरज होती. त्यायोगे त्यांना समाजसमाजात निर्माण होणाऱ्या दुहीचे भान होते असे म्हणता आले असते. परंतु त्यांनी नंतर काढलेल्या सहाही यात्रांनंतर सातत्याने समाजांमधील अंतर वाढतच गेलेले पहावयास मिळते. त्याचा परिपाक गुजरातमध्ये २००२ साली झालेल्या दंगलींमध्ये झालेला पहावयास मिळतो. भले त्यासाठी आपण तत्कालिन मुख्यमंत्री मोदींना दोषी ठरवत असलो तरी त्या घटनेचे कर्ते करविते आडवाणीच होते, असे आपण म्हणू शकतो. आडवाणींनी ते विष लोकांच्या मनात कालवलेले होते.

आडवाणी यांनी तीन ओटीसी वर्ग केलेले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कार्यकर्त्यांसाठी ओटीसीच्या वर्गासाठी निवड केली जाणे ही सन्मानाची गोष्ट समजली जाते. त्यांनी हे तिन्ही वर्ग आपल्या अल्पवयातच केलेले होते, कारण त्यांनी वयाच्या १४ व्या वर्षापासून रा.स्व. संघाच्या शाखेवर जायला सुरुवात केलेली होती.. त्यांची मनाची जडणघडण रा.स्व. संघाच्या शाखेत झाली. त्यानंतर त्यांनी आपले जीवन संघाच्या विचारसरणीला समर्पित केले. हे समर्पित जीवन समाजाला उन्नतीच्या मार्गावर नेण्यासाठी त्यांना वापरता आले असते. ती क्षमता त्यांच्यात असावी कारण त्यांनी ती उर्जा जनसंघाच्या बांधणीसाठी वापरली. त्यांची नियुक्ति संघानेच अलवार, कोटा, भरतपूर येथे संघप्रचारक म्हणून केली होती. अलवार हे भारतातून फुटून बाहेर पडण्याच्या बाजूचे संस्थान होते. संस्थानिकांना त्या काळात हिंदुमहासभा जवळची वाटत असे. सावरकरांना ही राज्ये आपले दैवत समजत असत. आपला नेता मानत असत. आजही अलवारच्या पुलाला नथुराम गोडसेचे  नाव देण्याचा अगोचरपणा करण्याइतपत तिथे गांधी व्देषाचे विष भिनलेले आहे. त्याचे कारण कारण संघस्थानावरून दिली जाणारी त्याकाळातील शिकवण हेच आहे.

आडवाणींची नियुक्ति जनसंघाच्या कार्यासाठी झाल्यानंतर ते राजस्थानातीलच एका जनसंघाच्या खासदारांचे स्वीय सहाय्यक झाले. फावल्या वेळात ते पांचजन्य साठी चित्रपटाची परिक्षण लिहीत असत. माध्यमांचा अनुभव त्यांनी त्याकाळात गोळा केला. समाचार भारती ही देशातील सर्वात मोठी वृत्तसेवा होती. तिच्या अध्यक्षपदावर १९७३ साली जयप्रकाश नारायण होते. १९७५ साली ही संस्था भारत सरकारने ताब्यात घेऊन तिचे नामकरण समाचार असे केलेले होते. पीटीआय, युएनआय आणि हिंदुस्थान समाचार अशा तीनही संस्थाचे एकत्रीकरण करून एकच वृत्तसेवा सुरु करण्याची यामागे कल्पना होती. हा प्रकार आणीबाणीच्या काळात झाला. जनता सरकार सत्तेत आल्यानंतर लालकृष्ण आडवाणी यांनी माहिती आणि प्रसारण मंत्री नात्याने समाचार मध्ये सरसकट देशभर रा.स्व. संघाचे कार्यकर्ते या संस्थेत नियुक्त केले जातील अशी खबरदारी घेतली. आपल्याला भविष्यात जे काही करायचे आहे त्याची ही केवळ सुरुवात होती. दूरदर्शन हे माध्यम त्यावेळी बाल्यावस्थेत होते तरीही त्यांन तिथे आपल्या विचारांच्या माणसांना भरतीत प्राधान्य मिळेल अशी खबरदारी घेतलेली होती. हे सारे आपोआपच घडते आहे असे दाखविण्याची खबरदारी घेण्याइतपत ते चलाख होतेच.

याचाच परिणाम आपल्याला १९८७ साली पहावयास मिळला. आडवाणींच्या काळात माहिती व प्रासारण विभागात अधिकाराच्या पदावर आलेल्या लोकांनी रामायणासारख्या धार्मिक कार्यक्रमाला दूरदर्शनवर जागा देणे हा अपघात नव्हता. त्यापूर्वी दूरदर्शनरून कोणताही धार्मिक प्रचाराचा कार्यक्रम दाखवायचा नाही असा नियम पाळला जात होता. परंतु असा कार्यक्रम दाखविण्यात गैर किंवा त्यात काय एवढे, ही तर देशाची विसारत आहे असे म्हणणे म्हणजे जे आडवाणींनी पेरले ते उगवू लागलेले होते.. ती मालिका दूरदर्शनवर सुरु झाल्यानंतर त्या चकचकीत खोटे खोटे धनुष्यबाण वापरणाऱ्या रामाला आणि फिल्मी डायलॉगबाजी करणाऱ्या सीतेला लोकांनी डोक्यावर घेतले आणि रामाचा देशात पुनर्जन्म झाला, भारतीय जनता पक्षासाठी सुपिक जमिन तयार झाली. अर्थात त्याचे यावेळचे जन्मदाते लालकष्ण आडवाणी होते. या गोष्टीचा साद्यंत उहापोह अरविंद राजगोपाल यांनी आपल्या पॉलिटिक्स आफ्टर रामायण या २००० साली प्रकाशित झालेल्या पुस्तकात सविस्तरपणे केलेला आहे.

आडवाणींनी काढलेल्या रथयात्रेनंतर संपूर्ण देशाचे राजकारणच बदलून गेले. लोकांच्या तोंडी गर्वसे कहो हम हिंदू है ही घोषणा देणारी बजरंग दल आणि आजच्या परिस्थितीतील विश्वहिंदुपरिषद या संघटना आज कोणीही काहीही म्हटले तरी लालकृष्ण आडवाणींचीच निर्मिती आहे. डॉ. प्रवीण तोगडिया आणि नरेंद्र मोदी ही जोडगोळी हे आडवाणींनी निर्माण केलेले शस्त्र आहे आणि ते कोणत्याही थराला जाऊ शकते हे त्या जोडगोळीने सिध्द केलेले आहे.

१९४६ साली बॅ.जीना यांनी देशाची फाळणी व्हावी या हेतूने डायरेक्ट अॅक्शनचा आदेश दिला होता. त्यानंतर देशभरात जातीय दंगलींचा आगडोंब उसळला. देश उध्वस्त होईल अशी स्थिती निर्माण झाली. सामाजिक सौहार्दाचा बळी त्या दंगलींच्या अग्निप्रलयात पडला. तो भूतकाळ विसरता विसरता स्वातंत्र्यप्राप्तीनंतरची ४० वर्षे गेली. काही ठिकाणी जखमा भरल्या. तर काही ठिकाणी त्या तशाच भळभळत्या राहिल्या. पण त्यावर किमान फुंकर घालावी अशी मानसिकता बहुसंख्यांकांच्या मनात निर्माण व्हावी असे प्रयत्न राष्ट्रनिर्मितीसाठी झटणाऱ्या धुरिणांनी केला.  परंतु एका मंडल आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी आणि त्याला प्रत्त्युत्तर म्हणून  काढल्या गेलेल्या रथयात्रेच्या तमाशाने देशातील सामंजस्याची सुरु असलेली प्रक्रिया धुळीला मिळविण्याचे काम लालकृष्ण आडवाणी यांनी आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी केले, हे विसरता कामा नये.

सौदी अरेबियामध्ये सौद राजांचा अंमल स्थापन करण्यासाठी त्या वेळच्या तिथल्या राजाने इखवान या वहाबी मिलिशियाची मदत घेतली होती. ते कुणी बाहेरचे लोक नव्हते. ते अरब बेदूईन टोळ्यांमधून आलेले लोक होते. परंतु कट्टरपंथीय होते. वहाबी पंथाचा त्यांच्यावर पगडा होता. जेव्हा जेव्हा सौदी राजघराण्यावर या इखवान पुरस्कृत विरोधाला तोंड देण्याची वेळ आली तेंव्हा तेंव्हा त्यांना एक पाऊल पुढे जाऊन आम्हीच कट्टरपंथीय आहोत, अगदी इखवानांपेक्षा आमचा कट्टरता वादात कुणीही हात धरू शकणार नाही असे सामान्य जनतेला दाखवावे लागले. भारतात बजरंग दल आणि हातात त्रिशूळ नाचविणारे आणि डोक्याला भगवी फडकी बांधणारे विश्वहिंदुपरिषदेचे उन्मादी लोक हे या देशातील वेगळ्या रंगरुपाचे इखवानच आहेत, त्यांना गप्प बसवायचे तर आडवाणींच्या चेल्यांना दोन पावले पुढे जाऊन आम्हीच खरे हिंदु धर्माचे तारणहार आहोत, असा उद्घोष करत रहावा लागेल. त्यातून त्यांची सुटका नाही. गो रक्षणाचा मुद्दा हा त्यातूनच जन्माला आलेला आहे, हे सर्वांच्या समोर आहे.

भाजपाच्या मानगुटीवरचे हे भूत राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही आता उतरवता येणार नाही. कारण ते त्यांच्याही बोकांडी बसलेले आहे.

हे भूत जन्माला घालणाऱ्या आडवाणींना अडगळीत टाकले गेल्याबद्दल कुणीही खंत बाळगू नये तेच त्यांच्या वाट्याला येणे क्रमप्राप्त होते. तेच त्यांचे भागधेय आहे.

 

लेखक ज्येष्ठ पत्रकार असून लोकसत्ता दैनिकात चीफ रिपोर्टर म्हणून त्यांनी दीर्घकाळ पत्रकारिता केली आहे.

1 Comment

  1. Ashutosh Diwan Reply

    Very nice and correct.But he is a politician and he did what he had to,to further his cause.That is his right.And one can not wish away unpleasant reality.Today this seems to be the direction majority Indians prefer.

Write A Comment