एक जमाना असा होता की बातम्या स्वयंभू घडायच्या. याउपर आपल्याला जर काही घडामोडी पाहिजे असतील तर त्या घडवून आणाव्या लागत. एक उदाहरण: एकोणीसाव्या शतकाच्या शेवटी अमेरिकेला स्पेनविरुद्ध युद्ध पाहिजे होतं. पण त्यासाठी जनतेला कसं तयार करायचं? जनतेला सहसा युद्ध नको असतं. आपली मुलं मरायला पाठवायची, किंवा दुसर्याची मारायची हे कुणाला आवडेल? तेव्हा सत्ताधार्यांना त्यासाठी मजबूत कारण तयार करावं लागतं. स्पेनविरुद्ध कागाळी करायला अमेरिकेने स्वत:चीच यूएसएस मेन (USS Maine) ही नौदलाची बोट क्यूबाची राजधानी हव्हॅना या बंदरात स्फोट करून बुडवली. (क्यूबा तेव्हा स्पेनच्या ताब्यात होता.) अमेरिकेचेच अडीचशे जवान ठार झाले. अमेरिकन जनता पेटली. वृत्तपत्रांनी अशा वातावरणाची पूर्वतयारी काही वर्षं आधी करून ठेवली होती. स्पॅनिश लोक क्यूबात कसे भयानक अत्याचार करताहेत या भडक भडक बातम्या वर्ष-दोन वर्षं वर्तमानपत्रांत झळकत होत्या. (बायकांवर बलात्कार, लहान मुलांची गुलाम म्हणून विक्री, वगैरे, वगैरे. यूक्रेन आणि रशिया आठवा.) मेन बोट बुडाली आणि “Remember the Maine, hell with Spain!” अशा गर्जना चालू झाल्या.
अशा प्रकारच्या वृत्तपत्रशैलीस पुढे पित पत्रकारिता (yellow journalism)— म्हणजे हीन दर्जाचं, सनसनाटी वृत्तपत्रलेखन—असं नाव पडलं. त्यानंतर आलेलं वृत्तपत्रलेखन तितकंच बनावट (fake) असलं तरी त्याच्यावरचं पिवळं वेष्टन काढून त्याला सभ्यतेचा पोषाख घातला गेला. तरीसुद्धा राज्यकर्त्यांच्या इशार्याने लेखण्या चालत, कॅमेरे फिरत. व्हिएतनाम युद्धाच्या सुरुवातीचे दिवस. कोरियन युद्धाची पुनरावृत्ती होत आहे असं दृष्य होत. कम्युनिस्ट उत्तर व्हिएतनाम, फ्रान्स व अमेरिकाधार्जिण्या दक्षिण व्हिएतनामवर हल्ला करत होतं. अमेरिकेला उत्तर व्हिएतनामविरुद्ध लढाईत उतरणं भाग होतं. पण कोरियन युद्धातील अनर्थाची आठवण ताजी होती आणि अमेरिकन लोक तसल्या धाडसाच्या विरुद्ध होते.
तेव्हा राज्यकर्त्यांनी आणि त्यांच्या भाटांनी डॉमिनो (Domino theory) मांडली. तो सिद्धांत असा: व्हिएतनाम पडला की त्याच्या धक्क्याने लाओस पडेल, लाओसच्या धक्क्याने थायलंड, थायलंडच्या धक्क्याने ब्रम्हदेश, वगैरे वगैरे. लोकांनी तरीही दाद दिली नाही. मग त्यांचं मतपरिवर्तन कसं करायचं? यूएसएस मेनसारख्या बोटीला बुडवण्यापेक्षा खोट्या-खोट्या बोटीला बुडवून त्याचे खोटे-खोटे फोटो काढून त्यांना प्रसिद्धी दिली—नवीन तंत्रज्ञान—तर तोच परिणाम होणार नाही का? तसा एक देखावा दक्षिण चीन समुद्रातील टॉंकिन या आखातीत रचला. त्याच्यावर भारून अमेरिकन संसदेने “टॉंकिन आखात” (The Gulf of Tonkin resolution) हा ठराव मंजूर केला आणि समोर दरी दिसत असतानाही जनतेने उडी मारली. पुढचा इतिहास सर्वज्ञात आहे.
जुनं पत्रलेखन सनसनाटी होतं हे म्हणण्यामागचा सुप्त हेतू असा की सध्याचं वृत्तपत्रलेखन शांत डोक्याने लिहिलेलं वस्तूस्थितीनिष्ठ, मसाला-विरहित (sober) असं आहे, हे लोकांच्या मनात बिंबवायचं. खरं म्हणजे तसं केव्हाच नव्हतं आणि आजही नाही. जुन्याच कल्पना अजूनही खालीलप्रमाणे जगभर चालू आहेत. लोकांच्या पूर्वग्रहांना, त्यांच्या स्वत:बद्दल असलेल्या श्रेष्ठत्वाच्या कल्पनांना खतपाणी घालायचं, त्यांच्यावर झालेले खरेखोटे ऐतिहासिक अन्याय फुगवून सांगायचे, त्यांना द्वेष करायला व्यक्ती, संस्था तयार करायच्या, त्यांना शुद्ध सैतानाचं रूप द्यायचं. निकराग्वाचा ऑर्टेगा, सर्बियाचा मिलोसेव्हिच, अफगाणिस्तानचा ओसामा, इराकचा सद्दाम हुसेन, इराणचा खोमिनी, उत्तर कोरियाचा किम, लिबियाचा गद्दाफी, सिरीयाचा आसाद, व्हेनझुवेलाचा मदुरो, रशियाचा पुतीन असे सैतानाचे दशावतार गेल्या तीस वर्षांतच झाले आहेत. अशा प्रकारे मिथ्य वास्तवतेचा एक अभेद्धय बुडबुडा लोकांभवती तयार करायचा. त्यात बाहेरचा आवाज प्रवेश करू शकत नाही. त्यात प्रतिध्वनीशिवाय दुसरं ऐकू येत नाही. त्यावर पडणार्या प्रतिमांशिवाय वेगळं काही दिसत नाही. तंत्रज्ञान जसं वाढतं तसे अप्रामाणिकपणा करण्याचे नवीन मार्ग उपलब्ध होतात. आता लुटपुटीच्या लढायांचे पडद्यावर खेळ करता येऊ लागले आहेत.
या संदर्भात “द सॉरो अॅण्ड द पिटी” या फ्रेंच महितीपटाची आठवण येते. दुसर्या महायुद्धात नात्सींविरुद्ध आपण प्राण पणाला लावून लढलो, अशी एक गोड दंतकथा फ्रेंच लोकांनी स्वत:भोवती तयार केली आहे. तिचा फुगा हा महितीपट फोडतो. त्यात कम्युनिस्ट आणि समाजवादी सोडून सर्व जण नात्सींचे कसे लाळघोटे होते आणि जेव्हा नात्सी ज्यू आणि इतर कमनशिबी लोकांचा संहार करत होते तेव्हा फ्रेंच लोक त्यांना आनंदाने कशी मदत करत होते याचा पुरावा सादर केला आहे. हा साडेचार तासाचा चित्रपट १९८० साली आला आणि गदारोळ माजला. फ्रेंच सरकारने त्यावर लागलीच बंदी घातली. सत्य आत्मपरीक्षण नेहमीच क्लेशदाायक असतं.
यूक्रेनमधलं युद्ध सुरू होऊन जेमतेम दोन महिने झालेत. युद्ध चालू झाल्यापासून यूक्रेनच्या शौर्याचं अफाट कौतुक चाललं आहे. त्यामागचा हेतू हा की ते मागतील ती शस्त्रांत्रं त्यांना मिळावीत. एवढया छोट्याशा काळात अंगावर शहारे येतील अशा पाच घटना घडल्या. काही वीररसाने भरलेल्या, काही रौद्ररसाने भरलेल्या, काही लज्जास्पद, तर काही मानवजातीला काळीमा आणणार्या. पहिली घटना घडली स्नेक आयलंड नावाच्या यूक्रेनच्या ब्लॅक सी या समुद्रातील एका बेटावर. युद्धातला तो पहिला किंवा दुसरा दिवस. कथेप्रमाणे तिथे यूक्रेनचे तेरा सैनिक अडकले होते. नंतर आलेल्या रशियन नौदलाच्या एका जहाजाने त्यांना हाक देऊन मदत करायचं आश्वासन दिलं. तेव्हा या अडकलेल्या सैनिकांनी त्या खलाशांना अत्यंत गलिच्छ शिवी दिली, आणि “चालते व्हा” असं सांगितलं. मग लढाई झाली. त्यात ते हुतात्मा झाले. यूक्रेनच्या अध्यक्षाने त्यांना मरणोत्तर पदके दिली. नंतर कळलं की बेटावर साठ सैनिक होते. ते सगळेच्या सगळे शरण आले आणि कैदी झाले. या शौर्यकथेची उपयुक्तता आता संपली असल्यामुळे ती आता फारशी ऐकायला मिळत नाही.
दुसरी कथा यूक्रेनची राजधानी कीएव्हच्या आकाशात घडली. एका यूक्रेनियन वैमानिकाने रशियाची दहा विमानं आकाशातल्या आकाशात जमीनदोस्त केली. अशी सहा विमानं उडवणं नैपुण्याचा भाग समजला जातो. त्याला फ्लाईंग एस हा किताब मिळतो. इथे तर दहा विमानं होती! या काल्पनिक वैमानिकाला “कीएव्हचं भूत” हे नाव पडलं. त्याच्या शौर्याची कथा क्षणात जगभर पसरली. त्याची चित्रफीत काही कोटी लोकांनी बघितली. नंतर कुण्या हुशार माणसाच्या लक्षात आलं की ही चित्रफीत त्याने एका संगणकाच्या खेळात पाहिली होती. झालं. शौर्याचा फुगा फुटला. अर्थातच मुख्य वृत्तवाहिनींनी आणि वर्तमानपत्रांनी या उघड्या पडलेल्या लज्जेची दखलही घेतली नाही. ते पुढल्या फसवणूकीच्या मागे लागले.
त्यानंतर दोन आठवडयांतच तिसरी कहाणी तयार झाली. ही यूक्रेनमधील डॉनबॅस या वादग्रस्त भागातल्या साडेसहा लाख वस्तीच्या मॅरीयुपोल नावाच्या शहरात. इथे एके दिवशी झालेल्या विमानहल्ल्यात एक प्रसूतीगृह, एक नाटयगृह आणि एक आर्ट स्कूल बेचिराख झाले. प्रसुतीगृहातील असंख्य अर्भकं जळून खाक झाली. (अर्भकांशिवाय कथा भावुक कशी होणार?) नाटयगृहात असंख्य लोकांनी घाबरून फाटक्या-तुटक्या कपडयांत आसरा घेतला होता. ती नाहीशी झाली. तोच प्रकार आर्ट स्कूलमधल्या विद्यार्थ्यांचा. अधिक चौकशीनंतर बाहेर पडलं की हा सगळा बनाव होता. जे प्रसूतीगृह म्हणून दाखवलं गेलं तो यूक्रेनियन नात्सींचा तळ होता. नाटयगृहातली माणसं तिथलीच वेषभूषा करून बातमीतल्या फोटोकरता आली होती. मुख्य म्हणजे त्या दिवशीं विमानहल्ला झालाच नव्हता. आता या गोष्टीसुद्धा संपूर्णपणे विस्मृतीत गेल्या आहेत.
हे संपतंय न संपतंय तोच रशिया चीनची मदत मागतोय ही आतल्या गोटातली बातमी बाहेर आली. अशी अफवा पसरवण्यामागे दोन हेतू होते. एक म्हणजे यूक्रेनचे शूरवीर रशियाला हाग्या मार देताहेत, हे जगाला कळावं. रशिया इतका मार खातोय की त्यांना भीकसुद्धा लागली. दुसरा हेतू हा की जाता जाता चीनलाही दम द्यायचा. खबरदार, जर रशियाला मदत केलीत तर! लोक एवढा साधा विचार करत नाहीत की रशिया स्वत: इतका शस्त्रास्त्रसंपन्न आहे की तोच चीनला मदत करू शकेल. (भारत रशियाकडून शस्त्रास्त्रं घेतो म्हणून तर भारतावर राग!) चीन असल्या भानगडीत पडणार नाही, हे उघडच आहे. तेव्हा चीन घाबरला अशा फुशारक्याही मारता येतील!
त्यानंतर आलेली कथा प्रेतांचा खच घेऊन आली. रशियाला यूक्रेनची राजधानी कीव्हमध्ये स्वारस्य केव्हाच नव्हते. त्यांना फक्त पूर्व यूक्रेनमधील डॉनबॅसमध्ये रस होता. कारण तिथे रशियन लोकांची वस्ती होती, आणि तिथे गेली आठ वर्षं सतत यूक्रेनियन नात्सींचा हल्ला होत होता. रशियाने तसं पहिल्यापासून स्पष्ट केलं होतं. युद्धाच्या सुरुवातीस रशियनांनी कीएव्हच्या दिशेने हालचाल केली तो केवळ डावपेचाचा एक भाग होता. मार्च महिन्याच्या शेवटी रशियन सैन्यानं सांगून कीव्ह भोवती घातलेला वेढा काढायला सुरुवात केली. त्यात कीव्ह जवळची अनेक गावं होती. त्यात बूचा नावाचं ३५,००० वस्तीचं गाव होतं. ३० मार्च रोजी रशियन सैन्य तिथून हटलं. १ एप्रिलला बूचातल्या प्रशासनाचे लोक परत आले. जल्लोश झाला. एक सभा झाली. नगराध्यक्षाने लोकांबरोबर स्वत:चे फोटो काढले.
दोन दिवस असेच गेले. ४ एप्रिलला रस्त्यावर प्रेतं आढळली. कसलीही चौकशी न करता “रशियानं केलेली अमानुष हत्या,” अशी आरडाओरड सर्व पाश्चात्य राष्ट्रांनी एका सुरात चालू केली. संयुक्त राष्ट्रसभेत रशियाचा निषेध व्यक्त करायचा ठराव आला. या हत्येला रशिया जबाबदार आहे, या सिद्धांतातल्या बर्याचशा गोष्टींचा मेळ लागत नसला तरी तो ठराव मंजूर झाला. पण त्याला पाश्चात्य राष्ट्रं सोडून कुणीही पाठिंबा दिला नाही. भारत, पाकिस्तान आणि चीनसकट बरीचशी राष्ट्रं तटस्थ राहिली. अमेरिकेचं परराष्ट्रधोरण आखणारी मंडळी अलिकडे अतिशय आक्रमक झाली आहेत. तटस्थ राष्ट्रांनासुद्धा दटावणं चालू झालं. पाकिस्तानचं सरकार पाडलं. भारतालाच काय चीनलासुद्धा धाकदपटशा देणं चालू आहे. चीनविरुद्ध केलेल्या व्यापारी युद्धात हारल्यानंतरसुद्धा चीनवर आर्थिक आणि व्यापारी निर्बंध टाकणं कितपत यशस्वी होणार आहे याचा विचारही कोणी करत आहे असं दिसत नाही. किंबहुना अमेरिका आणि युरोप दोघांनी चीनवर व्यापारी युद्ध पुकारायचं अशी नवीन योजना तरी यशस्वी होईल असा होरा आहे.
बूचा या शहरातील नरसंहार झाल्यानंतर यूक्रेनमधील क्रामटॉर्स्क या रेल्वे स्टेशनची पाळी आली. तिथे गर्दीच्या वेळी क्षेपणास्त्राचा हल्ला झाला. असंख्य लोक मरण पावले. तो हल्ला रशियानेच केला असा प्रचार चालू झाला. नंतर त्या क्षेपणास्त्राचे अवशेष सापडले. ती किंवा त्या प्रकारची क्षेपणास्त्रं रशिया वापरत नाही, असं आढळून आलं. किंबहुना ती यूक्रेनच वापरतं. पण असले फालतू पुरावे मुख्य कथेच्या आड येत नाहीत. गेला आठवडा या कथेची पारायणं चालू आहेत. आणि पुढील सनसनाटी घटना होईपर्यंत ती चालू राहतील.
हा अपप्रचार ओशाळवाणा होत आहे असं खुद्द न्यूयॉर्क टाइम्सलाच वाटलं. यूक्रेनमधून येणार्या बातम्या सगळ्याच सत्यावर आधारित असतात असं नव्हे, त्यात म्हटलं. काही पद्धतशीर बनावट आहेत. (वाचकांच्या बुद्धीची ही कमाल की हे त्यांच्या ध्यानात केव्हाच आलं नाही!) या खोटेपणाचं न्यूयॉर्क टाइम्सकडून होणारं समर्थन असं: हे आपण आणि रशिया यांच्यातील माहिती-युद्ध आहे. आपण रशियाच्या दोन पावलं पुढे असलं पाहिजे. आपल्या प्रचाराने रशियनांचा मतीभ्रम होत आहे. पुतीन (हिटलर याचा पूर्वावतार होता, असं म्हणतात!) तर पूर्ण गोंधळून गेला आहे. त्याचा मेंदू पूर्णपणे कामातून गेला आहे. ही कामगिरीसुद्धा काही कमी नाही.
वस्तूत: न्यूयाॉर्क टाइम्सचं हे समर्थनसुद्धा संपूर्णपणे बकवास आहे. खरं असेल तर अनेक प्रश्न उद्भवतात. पहिला प्रश्न हा प्रचार रशियन लोकांपर्यंत किती पोचतो. दुसरा प्रश्न तो किती जणांना कळतो. आणि तिसरा प्रश्न त्याच्यावर किती लोक विश्वास ठेवतात. शिवाय, पुतीनसारख्या माणसांना सर्व गोष्टींची खबरबात असताना ते कशाला गोंधळून जातील. या प्रचाराचं खरं कारण न्यूयॉर्क टाइम्ससारख्या संस्थांना लोकांचा बुद्धीभ्रंश करायचा आहे—अमेरिकन लोकांचा आणि त्याहून अधिक युरोपीयन लोकांचा. जनता बसली आहे त्या तव्याखालची आग कायम पेटती ठेवली पाहिजे. त्यात ढिलाई होता कामा नये. यूक्रेनसाठी जो वारेमाप खर्च होतोय त्याला नैतिक अधिष्ठान पाहिजे. युद्धामुळे महागाई जी प्रचंड वाढत आहे ती लोकांनी त्याबद्दल तोंडातून एक अक्षरही बाहेर न काढता सहन केली पाहिजे. आणि गोल फेरी मारून तुमच्या या कष्टांना पूटिनच कसा जबाबदार आहे, याचं तुणतुणं वाजवायचं. तेव्हा त्याचा काटा काढणं हे आपलं पहिलं काम हे बिंबवायचं.
आपण रशियाविरुद्ध युद्ध केलं पाहिजे. मग ते आण्विक झालं तरी चालेल. अशी मुक्ताफळं सोडणारेही काही लोक आहेत. अर्थातच ते स्वत: युद्धाला जाणार नाहीत. मुख्य म्हणजे त्यांना एक जिना चढला तर धाप लागते. ना त्यांची मुलं जाणार. आज सैन्यात भरती होणं (ज्याला अमेरिकेत दराफत् म्हणतात.) सक्तीचं नाही. तेव्हा गरीबांची मुलं किंवा जे नोकरीधंद्याला नालायक आहेत ते तरुण सैन्यात जातात. जे लोक टिव्हीवरती मोठमोठ्या गप्पा मारतात त्यांच्याकडे मजबूत पैसा आहे. त्यांच्या मुलांना सैन्यात भरती व्हावं लागत नाही. तेव्हा फुकाच्या “लोकशाही-रक्षणाच्या” गप्पा मारायला त्यांचं काय जातंय?
अमेरिका स्वत: यूक्रेनमधल्या युद्धात पडत नाही याचा अर्थ अमेरिकन लोक शांतीचे दूत झालेत अशातला भाग नाही. किंवा युद्धाला घाबरतात असंही नाही. शत्रूचा अंदाज घेऊनच ते लढायचं ठरवतात. इराक, सिरिया, लिबिया असतील तर फार अडचण नाही. पण शत्रू कसलेला असेल तर शक्यतो नको. अमेरिकच्या मानाने किरकोळ असलेल्या जपानने दुसर्या महायुद्धात त्यांच्या तोंडचं पाणी पळवलं होतं. अणुबॉम्बने त्यांना तेव्हा सोडवलं. कोरियन युद्धात विरुद्ध पक्षाकडे पण बॉम्ब होता. तेव्हा हाल झाले! पहिल्या सहा महिन्यांतच अमेरिकेने चाळीस हजार सैनिक गमावले. त्यानंतर प्रतिज्ञा केली की यापुढे अशिया खंडात युद्ध नको. (अमेरिकेच्या दृष्टीत फक्त पूर्व अशिया म्हणजे अशिया. अशिया खंडात आपण मोडत नाही.) ती प्रतिज्ञा व्हएिटनाममध्ये मोडावी लागली. सुरुवातीला त्याचं काही वाटलं नाही. पण जेव्हा शवपेटया घरी येऊ लागल्या तेव्हा अमेरिकेतील लोक, विशेषत: तरुण मुलं (त्या वेळी दराफत् होता!), शांतीचे पाइक झाले! यूक्रेनमध्ये तर खुद्द भयानक रशियाशी सामना आहे. तिकडे कोण जाणार? म्हणून अध्यक्ष बायडन सैनिक पाठवणार नाही (No boots on the ground!) असं पुन्हा पुन्हा ठासून सांगताहेत. स्वत: जरी त्यांनी व्हिएतनाम युद्ध टाळलं असलं तरी ते युद्ध आणि त्यामुळे झालेला समाजक्षोभ त्यांना चांगलाच आठवतोय.
आज अमेरिकेत युद्धाला विरोध करणारे लोक हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच थोडे असतील. डावे-उजवे, काळे-गोरे सर्वजण ठामपणे युद्धाच्या पाठीमागे उभे आहेत. आपली माणसं मरत नाहीत ही सगळ्यात मोठी जमेची गोष्ट. अशी घरगुती बाजू सुरक्षित झाल्यानंतर बायजी आयजीच्या जीवावर उदार झाले आहेत. पैसे अमेरिकन करदात्याचे, जीव यूक्रेनीयन लोकांचा. अगदी शेवटचा यूक्रेनीयन मरेपर्यंत अमेरिका लढायला तयार आहे. शस्त्रास्त्रं बनवणार्या कंपन्यांची चंगळ. युद्धाच्या निमित्ताने संसदेने त्यांना पंचवीस अब्ज डॉलर वाढवून दिले आहेत. त्यातले काही टक्के संसदेच्या सभासदांना या ना त्या रूपाने परत मिळतील. संसदेच्या दोन्ही सभागृहांत मिळून साडे पाचशे सभासद आहेत. त्यातल्या एक की दोन सभासदांनी या वाढीव खर्चाला विरोध केला. शस्त्रास्त्रं तयार करणार्या कंपन्या आणि संसदेचे सभासद यांचं असं सहजीवनाचं (symbiotic) नातं आहे. दोघं मिळून करदात्याचं रक्त शोषतात. यूक्रेनसारख्या गरीब बकर्यांचे गळे कापतात.
हे सगळं लक्षात घेता यूक्रेन अध्याय लवकर संपेल असं वाटत नाही. त्यावर अनेक जणांची उपजीविका चालली आहे. शिवाय आणखी बर्याच पोतडया उघडल्या आहेत. चेर्नबोल येथील अणूशक्तीचा प्रकल्प, यूक्रेनमधील जैविक अस्त्रांच्या प्रयोगशाळा. काही नाही तर शेवटी “रासायनिक अस्त्रं” आहेतच! ती प्रचारासाठी सिरीयात उपयोगी पडली, पूटिनच्या घरेलू शत्रूंना मारायला लंडनमध्ये उपयोगी पडली. पण यूक्रेन अध्याय जितका लांबेल तितके त्याचे दुष्परिणामसुद्धा दिसायला लागतील. महागाई वाढणार हे नक्की. पण ती किती रुद्र स्वरूप धारण करणार आहे, हे कळायला काही दिवस जातील. त्यातसुद्धा खरं किती आणि खोटं किती हे शोधणं हा मोठा व्याप असणार आहे. अमेरिकेचे एक सेनेटर हाइरम जॉन्सन यांनी म्हटल्याप्रमाणे सत्य हा युद्धातला पहिला बळी आहे.