fbpx
OTT

‘डोण्ट लुक अप’ च्या निमित्ताने

‘डोण्ट लुक अप’ हा विज्ञानकथात्मक (sci-fi) चित्रपट गेल्या महिन्यात जगभरच्या सिनेमागृहांत आणि नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. सुपरहीरो चित्रपटहेच लोकप्रिय ठरण्याचा हा काळ. असे असताना पृथ्वीवर ओढवलेल्या हवामान बदलाच्या (climate change) भीषण पर्यावरणसंकटावर भेदकरूपकात्मक भाष्य करणाऱ्या  ‘डोण्ट लुक अप’ ला अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पहिल्या गेलेल्या चित्रपटांत त्याची गणती होते आहे.

लिओनार्डो  डि कॅप्रिओ, जेनिफर लॉरेंस, मेरील स्ट्रीप आदी दिग्गज अभिनेते हे एक कारण आहेच. पण रूढार्थाने लोकप्रिय होण्यासाठी लागणारे प्रेमकहाणी, देमार हाणामारी इ. कुठलेही साचे ह्या चित्रपटात नाहीत. ‘ब्लॅक कॉमेडी’ ह्या वरवर सोप्या भासणाऱ्या पण अत्यंत कठीण अशा फॉर्मचा वापरकरून आणि अपारंपरिक विषय असूनही लोकप्रिय होण्याचे हे काहीसे दुर्मिळ उदाहरण आहे. असे असले तरी समीक्षकांनी मात्र ह्या चित्रपटावर जोरदार टीका केली आहे. ‘गार्डियन’ चे  ‘शब्दबंबाळ, ढोबळ, बटबटीत असे दिग्दर्शन कंटाळवाणे ठरते आणि कितीही जोरकस अभिनेते असले तरी त्याचा उपयोग होत नाही’ असे परीक्षण प्रातिनिधिक  आहे.

दुसरीकडे शास्त्रज्ञांना, पर्यावरणप्रेमी कार्यकर्त्यांना मात्र हा चित्रपट अतिशय आवडला आहे. ह्या विरोधाभासाची संगती कशी लावायची? सर्वनाशाची ही शोकात्म/विनोदी कहाणी लोकांना का भिडते आहे? त्यातील विज्ञान, राजकारण, अर्थकारण यांची जी समजूत आहे ती या लोकप्रियतेच्यामागे कितपत कारणीभूत आहे? ह्या सगळ्याची मीमांसा गरजेची आहे.

चित्रपटाची थोडक्यात कहाणी अशी: मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीच्या दोन खगोलशास्त्रज्ञांनी- पदवीधर विद्यार्थी केट डिबियास्की (जेनिफर लॉरेंस) आणि प्राध्यापक रँडल मिंडी (लिओनार्डो  डि कॅप्रिओ) यांनी माऊंट एव्हरेस्टच्या आकाराचा एक धूमकेतू शोधला. हा धूमकेतू पृथ्वीवर सहा महिन्यात आदळणार आणि पृथ्वीचा विनाश होणार असे त्यांचे भाकीत. ते व्हाईट हाऊसला या धोक्याबद्दल सावध करण्याचा प्रयत्न करतात, परंतु अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जेनी ऑर्लीनचे (मेरील स्ट्रीप) प्रशासन निवडणुका होईपर्यंत धूमकेतूचा मुद्दा सोयिस्कर नाही म्हणून त्यांची वासलात लावायचा प्रयत्न करते. त्यामुळे डिबियास्की आणि मिंडी त्यांची कहाणी प्रसारमाध्यमांकडे घेऊन जातात. इतका गंभीर विषय लोकांच्या आणि माध्यमांच्या थिल्लर आणि शहामृगी वृत्तीला मानवणारा नसतोच- त्यामुळे शास्त्रज्ञांचा एककल्ली वेडेपणा म्हणून त्यांची वासलात लावली जाते. दुसरीकडे हळूहळू इतर मान्यवर शास्त्रज्ञ आणि राष्ट्रे ह्या संकटाचे गांभीर्य मान्य करतात आणि मग अमेरिकन प्रशासन सूर पालटून धूमकेतूवर अण्वस्त्रांचा हल्ला करून त्याची दिशा बदलायच्या प्रयत्नाला निवडणूक जिंकायचा हुकमी मुद्दा बनवते. पण हा हल्ला यशस्वी होणार असा रंग दिसत असताना अध्यक्षांच्या खास मर्जीतील धनाढ्य उद्योगपतीच्या दबावाला बळी पडून हल्ला स्थगित करण्यात येतो. ह्या उद्योगपतीला धुमकेतूवर असलेल्या अति-मौल्यवान अशा खनिजांचा (स्मार्टफोन, इलेक्ट्रिक वाहने वगैरेसाठी उपयुक्त) मोह पडतो- आणि त्याच्या कंपनीला  धूमकेतूची शकले करून त्यांचा महासागरात वर्षाव, आणि नंतर त्यांचे खाणकाम ही अतिशय धोकादायक कामगिरी देण्यात येते. त्यासाठी कंपनी दावा करत असलेले तंत्रज्ञान विश्वासार्ह, विज्ञानमान्य नाही वगैरे डिबियास्कीचे आक्षेप तुरुंगवासाची भीती दाखवून निकालात काढले जातात. रँडल मिंडीला राष्ट्रीय विज्ञान सल्लागार बनवून त्याला होयबा केले जाते. पुढे कंपनीचा धूमकेतूची शकले करण्याचा प्रयत्न फसतो. इतर देशांचा अखेरच्या क्षणीचा अण्वस्त्रहल्लाही  फसतो. धूमकेतू आकाशात स्पष्ट दिसू लागतो तेव्हा मिंडी सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून ‘जस्ट लुक अप- संकट किती खरे आहे ह्याची खात्री करायची असेल तर फक्त वर पहा’ अशी लोकचळवळ उभी करतो. तेव्हा त्याला विरोध म्हणून  ‘डोण्ट लुक अप’ अशी राष्ट्राध्यक्षसमर्थकांची प्रतिचळवळ उभी राहते. अखेर धूमकेतू पृथ्वीवर आदळतो आणि परग्रहांवर पळ काढणारे काही मूठभर अब्जाधीश वगळता सर्व मानवजात नष्ट होते.

चित्रपटातील धूमकेतू हे हवामान बदलाच्या संकटाबद्दलचे रूपक आहे हे खरेच- हवामान बदलाचे परिणाम आता उत्तर ध्रुवावरील बर्फ वितळणे, ओझोनच्या थराला भोक असे दृश्यातीत राहिले नसून वारंवार होणारी वादळे, त्यांची वाढती तीव्रता, वणवे, महापूर आणि त्यातून होणारी जीवित आणि वित्तहानी यामुळे सहज अनुभवता येणारे आणि त्यामुळे सामान्यांना आकलन होणारे झाले आहेत. चित्रपटाला कदाचित अभिप्रेत नसणारा पण अत्यंत महत्वाचा रूपकात्मक पैलू म्हणजे कोविडच्या संकटावरही लागू होणारे त्याचे भाष्य. वास्तवाला ‘निवडणूक जिंकण्यासाठीची कच्ची सामग्री’ म्हणून पाहणारे राजकारणी, गंभीर संकटावर त्यांची उथळ उपाययोजना (थाळ्या- टाळ्या, दिवे, ब्लीच जंतुनाशक टोचणे आदी सल्ले), अमेरिका- युरोप येथील मास्क,लस-विरोधी चळवळ आणि प्रतिगामी शक्तींचा त्यामागील हात, थिल्लर माध्यमे, शास्त्रज्ञांचा निरुपाय हे सगळे सर्वज्ञात, चिरपरिचित वास्तव आहे. धूमकेतूचा खराखुरा  धोका उद्भवला तर चित्रपटाने रंगवलेले व्यंगचित्र हे कदाचित वास्तवातल्या बटबटीतपणापुढे फिकेच पडेल अशी परिस्थिती आहे. त्यामुळेच परीक्षकांना अभिप्रेत असे सूक्ष्म चित्रण हेच ‘अवास्तव’ ठरले असते. चित्रपट असंगत, असंबद्ध भासतो कारण तो अतिवास्तव आहे हे त्याचे खरे कारण आहे. आणि म्हणूनच कदाचित तो लोकप्रिय ठरतो आहे.

यापुढे जात रूपके ‘केवळ कलात्मक महत्वाची नसतात तर त्यांची लोकप्रियता त्यांच्यात अनुस्यूत राजकीय समजुतीत असते’ याचा विचार गरजेचा आहे. ऑर्वेलच्या ‘ऍनिमल फार्म’च्या लोकप्रियतेचे कारण केवळ त्याची सुगम आणि इसाप किंवा इतर बालकथांची आठवण करून देणारी शैली एवढेच नाही तर ते भांडवली समाजाच्या स्वातंत्र्यप्रियतेचे मिथक आहे यातही आहे. त्याचप्रमाणे  ‘डोण्ट लुक अप’ ची लोकप्रियता राजकारणी, धनाढ्य उद्योगपती, माध्यमे यांच्यावरील कठोर टीकेत आहे. मात्र ह्या टीकेचे पर्यवसान जगाच्या अंतातच होते. मार्क्सवादी विचारवंत फ्रेडरिक जेम्सन याचा ‘जगाच्या अंताची कल्पना करणे एकवेळ शक्य आहे पण भांडवलशाहीचा अंत मात्र अकल्पनीय आहे’ हा इशारा इथे अचूक लागू होतो.

आता हवामान बदलाच्या संकटाबद्दल, विकसित राष्ट्रे, त्यांच्या खनिज तेलांच्या हव्यासाबद्दल पुरेशी जागरूकता निर्माण झाली आहे. विकसनशील राष्ट्रे विकसित राष्ट्रांना यासाठी जबाबदार धरावे म्हणून आग्रह धरत असताना विकसित राष्ट्रांना, तेथील उद्योगांना मात्र यातच नवीन संधी दिसू लागली आहे. इलेक्ट्रिक वाहने आणि त्यासाठी लागणारी दुर्मिळ खनिजे यांचा साठा चीनच्या ताब्यात जाऊ नये म्हणून नवी वसाहत-सदृश स्पर्धा बोलिव्हिया, पॅसिफिक मधील बेटांत टेस्ला आदी कंपन्या, अमेरिकेने सुरु केली आहे. रिलायन्स आदी तेल कंपन्या कार्बन-न्यूट्रल होण्याचा मार्ग सौरऊर्जेत शोधत आहेत. शुंपीटरच्या भांडवलाची ‘कल्पक विनाशाची’ (creative destruction) गरज त्यात अधोरेखित होत आहे हे खरेच. पण भांडवलाचा आजवरचा प्रवास केवळ समस्यांचे स्वरूप बदलणे (आणि त्यांचे गांभीर्य वाढवणे) असाच राहिला आहे आणि त्याचा निरास करू शकेल अशी व्यवस्था सोव्हिएत-उत्तर जगात शिल्लक नाही. पॅरिस, ग्लासगो  इ. पर्यावरण बैठकांत चर्चा होते ती केवळ मलमपट्टीबद्दल. ह्या दिवाळखोरीवर बोट ठेवणाऱ्या ग्रेटा थुनबर्गला वेडे ठरवले जाते. अश्या परिस्थितीत शक्य आहे तो केवळ सिनिकल निराशावाद आणि तिरकस विनोद. ‘डोण्ट लुक अप’ चा तोच गाभा आहे.

इथे झिझेकच्या ‘सर्वनाशाच्या चार घोडेस्वारांची’ (the four horsemen of apocalypse) कल्पना समर्पक ठरते- जागतिक पर्यावरण संकट, आर्थिक अस्थिरता, जैवशास्त्रीय क्रांती, सामाजिक दुफळी हे ते चार घटक. सर्वनाशाच्या कल्पनेला समाजाचा प्रतिसाद दुःखाच्या विविध अवस्था जशा असतात तसाच आहे: वैचारिक नकार, संताप आणि त्याचा उद्रेक, सौदेबाजी, नैराश्य, अलिप्तता. नैराश्य आणि अलिप्तता यातून सिनिकल निराशावाद आणि तिरकस विनोद; आणि त्यातून चांगली कला, चांगले चित्रपट तयार होऊ शकतात; पण तो काही निराशाजनक वास्तवाला पर्याय असत नाही. त्यासाठी ‘निसर्गाकडे/ खेड्याकडे परत चला’ वगैरे बाळबोधपणा चालणार नाही. ग्राहकांना नैतिक जबाबदारीबद्दल ब्लॅकमेल करून चालणार नाही. केवळ एकट्या-दुकट्या भांडवलदारांना चित्रपटातील खलनायक कल्पून चालणार नाही. ग्राहक, भांडवलदार, आणि आर्थिक संचालनाची जबाबदारी असणारी शासनव्यवस्था यांच्यावर अंकुश ठेवायचा असेल तर पर्यावरण चळवळीला ‘वृक्ष/प्राणी प्रेमी’ चौकटीतून बाहेर येत व्यावहारिक पर्यायांचा विचार, प्रचार करावा लागेल. वास्तवाचे  ‘काळे किंवा पांढरे’ असे वर्गीकरण करण्याची सवय मोडावी लागेल. ‘शाश्वत विकास’ (sustainable development), भांडवल आणि श्रमिक’ ह्या तीनही घटकांची सांगड घालणे कठीण आहे हे खरे. पण ते अशक्य नाही. अमेरिकन डाव्यांनी पुरस्कारलेल्या ‘ग्रीन न्यू डील’ मध्ये ती महत्वाकांक्षा आहे. अपेक्षेप्रमाणे उजव्या प्रतिगाम्यांचा कडवा विरोध आहे- पण कोळसा खाणीऐवजी अपारंपरिक ऊर्जा, इलेक्ट्रिक वाहने हा आकर्षक/व्यवहार्य उद्योग ठरू शकतो हे लक्षात आलेल्या भांडवली उद्योगांनी गुंतवणूक सुरु केली आहे. त्यासाठी कर, सबसिडी यांची रचना याबद्दल चर्चा जोर धरत आहे. अमेरिकेत ही सुरुवात होणे आवश्यक आहेच पण इतरत्रही असे प्रयत्न गरजेचे आहेत. धोकादायक रसायने समुद्रात सोडणे, जहाज-तोडणी आणि त्यातून प्रदूषण, पर्यावरणबदलातून येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी भांडवल-उभारणी ह्या सगळ्यासाठी भारत आदी विकसनशील राष्ट्रांनी विकसित देशांवर दबाव आणणे गरजेचे आहे. ‘प्रदूषण विरुद्व शेती’ ‘शहरी विरुद्व ग्रामीण’ असल्या खोट्या विभागण्याना हाणून पाडायला हवे. औद्योगिक क्रांतीनंतर मानवी हस्तक्षेपामुळे झालेल्या पर्यावरणबदलावर उपाय हा मानवी हस्तक्षेपातूनच शक्य आहे; आणि तो उपाय भांडवलप्रधानतेला अंकुश लावूनच शक्य आहे. तसे झाले नाही तर पृथ्वीचा विनाश अटळ आहे- ‘डोण्ट लुक अप’ प्रमाणे नाट्यमयपणे नाही तर एकामागून एक येत राहणाऱ्या आपत्तीच्या लाटांमुळे.

लेखक दिल्लीस्थित अभ्यासक संशोधक आहेत.

Write A Comment