fbpx
राजकारण

प्रियंका गांधी आँधी है ?

२०१९च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षासमोरील प्रमुख उद्दिष्ट काय आहे?  २०१४ साली  स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्या पक्षाला पूर्ण बहुमताने या देशातील जनतेने सत्ता दिली आहे. त्या सत्तेचा मद संबंधित विचारसरणी ठेवणाऱ्यांना किती चढला आहे, त्याचे नमुने देशात गोमांसावरून झालेल्या हल्ल्यांपासून ते लोकशाहीचे हुकुमशाहीत परिवर्तन झाल्याच्या अविर्भावात घेतल्या गेलेल्या नोटबंदीसारख्या अनंत निर्णयांद्वारे सर्वांना अनुभवायला मिळतच आहेत. या देशाचा पाया ज्या गंगा-जमनी संस्कृतीवर रचलेला आहे, त्या पायालाच `आमची’ आस्था आहे म्हणत सुरुंग लावण्याच्या प्रयत्नांना आता सरकारी पाठिंबा मिळतो आहे. तर त्यामुळे या देशातील हा सांस्कृतिक पाया उद्ध्वस्त होऊ नये यासाठी केंद्रातील मोदी सरकार घालवावे लागेल, असे देशातील असंख्यांना वाटते. काँग्रेस पक्षासमोरही नेमके हेच उद्दिष्ट आहे, असे काँग्रेसचे धुरिण व काँग्रेस हेच खरे या गंगा-जमनी संस्कृतीचे राजकारणात पडलेले प्रतिबिंब असल्याचे समजणारे अनेकजण सांगत असतात. मग जर असे असेल, तर मोदी यांना केंद्रातील सत्तेवरून पायउतार करण्यासाठी काँग्रेस पक्षाला आपल्या पक्षाचा विस्तार वा आपल्या पक्षाचा पंतप्रधान सत्तेवर बसवणे याला खिळ घालावी लागेल का, तर देशातील सद्य राजकीय परिस्थिती व देशातील हिंदुत्ववादी नसलेल्या पक्षांचा विविध राज्यांमध्ये पसरलेला जनाधार पाहता काँग्रेसला त्यांचा पक्ष वाढविण्याच्या व पंतप्रधानपदी त्यांचा नेता विराजमान करण्याच्या मनसुब्यांना खिळ घालावीच लागेल, हे स्पष्ट आहे.

म्हणजे एकंदरित पाहता काँग्रेसपुढे तीन पर्याय आहेत. पहिला नरेंद्र मोदी यांची केंद्रातील सत्ता घालवणे, दुसरा पक्षाचा जनाधार वाढवणे व खिळखिळ्या झालेल्या पक्षाची पुनर्बांधणी करणे व तिसरा स्वतःचा पंतप्रधान बनवणे. ही तीन उद्दिष्टे एकत्रितरित्या असणेदेखील काही चूक नाही. मात्र ही तिनही उद्दीष्टे एकमेकांशी विसंगत असल्याने त्या उद्दिष्टांचे पर्यायांमध्ये परिवर्तन होते. म्हणजे कसे, तर पश्चिम बंगाल या ठिकाणचा जनाधार हा ममता बॅनर्जी यांच्यापाशी एकवटलेला आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये पक्ष वाढविण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न करणे गरजेचे आहे. मात्र राजकीय पक्ष हा काही एनजीओ नव्हे. त्यामुळे पक्ष नव्या लोकांपर्यंत घेऊन जाणे, नवे तरुण कार्यकर्ते पक्षात आणणे, नवा जनाधार पक्षाशी जोडणे या गोष्टी कुठलाही पक्ष करतो त्याची परीक्षा ही निवडणुकीद्वारेच होत असते.  पक्ष वाढला आहे किंवा कसे हे तपासून पाहण्यासाठी या परिक्षेशिवाय असलेले पर्याय हे तितकेसे थेट नसतात. त्यामुळे समजा पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसने पक्ष वाढविण्यासाठी निवडणुका लढविल्या तर त्याचा परिणाम पश्चिम बंगालमधील भाजपेतर मते विभाजनातच दिसणार हे नक्की. आता खरेतर भारतात बहुपक्षीय पद्धतीची लोकशाही असल्याने हे तत्वतः तितकेसे बरोबर नाही, असा आक्षेप असू शकतो. मात्र जमिनीवरील राजकारण अनेकदा पुस्तकातील राज्यशास्त्राच्या नियमांच्या विपरित असते. काँग्रेस व देशातील बहुतांश भाजपेतर पक्ष किंवा जे पक्ष या देशातील राजकारण हे हिंदू-मुस्लिम प्रश्नाच्या भोवती फिरवून त्याचा राजकीय फायदा घेत नाहीत, अशा पक्षांचा जनाधार हा सर्वसाधारणतः एकच असतो. अनेकदा कार्यपद्धती, सरकारमध्ये असताना घेतलेले काही आर्थिक निर्णय, सामाजिक परिमाणे यातून हा जनाधार अनेकदा इकडून तिकडे सरकण्याचा स्वातंत्र्यपश्चात झालेल्या निवडणुकांचा इतिहास पाहिले असता लक्षात येते. त्यामुळे एकाच जनाधारात तोंड मारणारे दहा जण झाल्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या ९० वर्षांच्या कामातून उभ्या केलेल्या हिंदू व्होटबँकेचे बहुमत सहज सिद्ध होते. 

आता असे जर असेल, तर काँग्रेस पक्षाने पश्चिम बंगालसारख्या ठिकाणी काय करावे? किंवा उत्तर प्रदेशसारख्या ठिकाणी काय करावे? म्हणजे काँग्रेस पक्षाने या राज्यांमध्ये निवडणुकाच लढवू नयेत का, असा स्वाभाविक प्रश्न यातून तयार होतो. आता उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी व बहुजन समाज पार्टी या दोन प्रमुख पक्षांची आघाडी झालेली आहे. उत्तर प्रदेशच्या राजकारणात या दोन्ही पक्षांच्या जनाधाराची संख्या टक्केवारीच्या हिशेबात ४० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. काँग्रेस केवळ सहा ते सात टक्क्यांच्या आसपास असणारा पक्ष आहे. काँग्रेस पक्षाचे दोन प्रमुख नेते राहूल गांधी व सोनिया गांधी हे या राज्यातून लोकसभेवर निवडून जातात. आता या राज्यातील अर्ध्या भागाची जवाबदारी प्रियंका गांधी यांच्याकडे देण्यात आलेली आहे. त्या निमित्ताने प्रियंका गांधी यांचा राजकारणात प्रवेश झालेला आहे. प्रियंका गांधी यांच्या येण्याने उत्तर प्रदेशचे राजकीय गणित बदलू शकते, असे काँग्रेस पक्षाचे धुरिण व काँग्रेस पक्ष हाच या देशातील गंगा-जमनी सांस्कृतिक पायाचे राजकीय पटलावर पडलेले प्रतिबिंब असल्याचे मानणारे बुद्धिवंत म्हणत आहेत. प्रियंका गांधी प्रत्यक्ष राजकारणात आल्याने उत्तर प्रदेशचे गणित का बदलणार आहे, याचे कारण त्या इंदिरा गांधी यांच्यासारख्या दिसतात, असा एक अजब तर्क यासाठी दिला जातो.

खरेतर इंदिरा गांधी यांच्या वेळच्या राजकारणानंतर पुलाखालून किती पाणी वाहून गेले आहे, याची सुतराम कल्पना नसलेल्या किंवा कल्पना असूनही मनाची समजूत घालणाऱ्यांनी असे वाटणे वा वाटून घेणे हे वावगे नाही. मात्र उत्तर प्रदेशातील ब्राह्मण-ठाकूरेतर बहुजन समाजाला आता मायावती व मुलायमसिंग यांच्यासारख्या दिसणाऱ्या नेत्यांमध्ये आपले भविष्य दिसते हे मान्य करायला ब्राह्मणी-मध्यमवर्गीय मानसिकता चटकन तयार होत नाही. आर्य हे अत्यंत सुंदर दिसत अशी वाक्याची सुरुवात करून,  गोरा रंग,उंच कपाळ, तरतरीत नाक अशी वाक्याची सांगता शालेय इतिहासाच्या पुस्तकांमध्येच असल्यामुळे भारतीय समाजाची सौंदर्यदृष्टी साचेबद्द झालेली आहे. नवरा विधुर, वय ५३ शिक्षण बीए, स्वतःचा पुण्यात व्यवसाय, अपेक्षित वधू, विधवाही चालेल, सुक्षित व गोरी असावी, अशा मॅट्रिमोनियलमध्ये जाहिराती देणारे वा कास्ट नो बार अशा मॅट्रिमोनियलच्या जाहिरातींखाली सॉरी फॉर एससी/एसटी निर्लज्जपणे लिहिणाऱ्यांच्या सौंदर्य समजेविषयी फार न बोलले बरे. असो सांगण्याचा मुद्दा काय, तर उत्तर प्रदेशात फार फार वर्षांपूर्वी काँग्रेसचे राज्य होते. तेव्हा या प्रदेशातील ब्राह्मण, मुस्लिम व दलित हे तीन प्रमुख समाज या पक्षाच्या सोबत कायम राहात. मात्र लोकशाही समाजवाद्यांचे अध्वर्यू डॉ. राममनोहर लोहिया यांच्या पिछडापावे सौ मे साठ धाटणीच्या राजकारणातून तेथील शूद्र समाजाच्या राजकीय आकांक्षांना धुमारे फुटले व पुढे त्याचे ठाशीव प्रतिबिंब राजकारणात उठूनही दिसले.

उत्तर प्रदेशातील यादव हा ओबीसी समाज लोहियांच्या राजकीय पाठशाळेत तयार झालेल्या मुलायम सिंग यांनी स्वतः सोबत पक्का जोडला आहे. कांशीराम यांनी अत्यंत मेहनतीने या प्रदेशातील जाटव हा दलित समाज अक्षरशः एकेका माणसाचे मनपरिवर्तन करून बसपाबरोबर जोडलेला आहे. उरता उरला मुसलमान, तर तो कायम त्याला जगण्याची सुरक्षितता कोण देऊ शकतो याचा विचार करत मतदान करतो. भाजपला हरविण्याची ताकद कुणात आहे, याचा पहिला विचार कुठल्याही मुसलमानाच्या डोक्यात मतदान करताना स्वाभाविकपणे येतो. प्रियंका गांधी या खूप छान दिसतात व त्या अगदी तंतोतंत त्यांच्या आज्जींप्रमाणे दिसतात, हे खरे असले तरी त्यांच्या सांगण्यावरून काँग्रेस पक्षाला उत्तर प्रदेशात मते दिल्यास त्याचे परिणाम काय होतील, याचा अंदाज मुसलमानांना नसेल, असे वाटते? हिंदी भाषक राज्यांमध्ये गोहत्येवरून मुसलमानांना ठेचून मारण्याचे पस्तीस चाळीस प्रकार झाल्यानंतर काँग्रेस पक्षाने अशी काय भूमिका घेतली होती की ज्यातून मुस्लिमांना धीर मिळावा? प्रियंका गांधी त्यासाठी कुठल्या रस्त्यावर उतरून त्यांनी आंदोलने केली. किंबहुना त्यांचे बंधू व पक्षाध्यक्ष राहूल गांधी हे तर ए. के. अँटोनी नामक एका ख्रिस्ती काँग्रेसी नेत्याने दिलेल्या अहवालानुसार काँग्रेस पक्ष हा खूपच मुस्लिमधार्जीणा झाला असून त्याची प्रतिमा बदलण्याची गरज आहे, या निष्कर्षावर विश्वास ठेवून वागत आहेत. त्यामुळेच सातत्याने शिव मंदिरांना जिथे जातील तिथे भेटी देण्याचा त्यांनी सपाटा लावला आहे. दुसरीकडे त्यांच्या शिव मंदिरांना भेटींमुळे अस्वस्थ भाजपाने त्यांच्या जातीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यावर ते ब्राह्मण आहेत, तेवळ ब्राह्मणच नाहीत तर जानवेधारी ब्राह्मण आहेत, असे काँग्रेस पक्षाचे अधिकृत प्रवक्ते जाहिर करत आहेत. फार फार वर्षांपूर्वी परशूधारी परशुरामाने पृथ्वी निःक्षत्रीय केल्याचे वर्णन केल्याप्रमाणेच खरेतर हे जानवेधारी प्रकरण वाटावे, असाच हा अविर्भाव आहे.  त्या जानव्याच्या पलिकडे जाऊन त्यांचे गोत्र दत्तात्रय असल्याचेही त्यांनी सांगून टाकले आहे. तर ब्राह्मण, जानवे  गोत्र आदी शस्त्रांच्या आधारावर या लढाईत उतरलेल्या प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेशातील यादव, जाटव, मुस्लिमांनी सपा-बसपाकडून उलटे फिरून मते द्यावीत किंवा ते देतीलच, असा दुर्दम्य विश्वास काँग्रेस नेत्यांना असेल, तर ते चांगलेच आहे.

 उत्तर प्रदेशात २०१४ च्या निवडणुकीत सगळ्यांची धुळधाण उडाली होती. मायावती यांच्या बसपाला तर शून्य जागा मिळाल्या होत्या. सपाला काहीतरी पाच जागा व काँग्रेसच्या राहूल व सोनिया अशा दोन जागा आल्या होत्या. मात्र २००९ च्या निवडणुकीत पूर्व उत्तर प्रदेशातून काँग्रेसला २२ जागा मिळाल्या होत्या. अशा वेळी मोदी यांना धूळ चारण्याचीच मनिषा बाळगणाऱ्या सपा-बसपा यांनी स्वतःहून युती जाहिर करण्यापूर्वी काँग्रेस पक्षाला का विचारात घेतले नाही, असा सवाल काँग्रेसच्या वतीने काही बुद्धिवंत उपस्थित करत आहेत. काँग्रेस पक्षालाही उत्तर प्रदेशात सात टक्के मते तर आहेतच. पण सात टक्के मते असलेल्या काँग्रेसला चाळीस टक्क्यांपेक्षा अधिक मते असलेल्या सपा-बसपाकडून जागा किती हव्या होत्या तर २५. आता २५ हा आकडा सांगण्याचा झाला, जसे प्रकाश आंबेडकर महाराष्ट्रात काँग्रेसकडून १२ जागा मागतात तसाच काहीसा. पण काँग्रेस २० जागांवर काँप्रोमाईझ करायाला तयार असल्याचे बोलले जाते. काहीजण तर काँग्रेस १२ ते १५ जागांवरही तयार होती, असे सांगतात. सपा-बसपा काँग्रेसला ८ जागा सोडण्यास तयार होते. मात्र एक आकडी जागा घेऊन देशाच्या सत्तेचा रस्ता ज्या उत्तर प्रदेशातून जातो त्या उत्तर प्रदेशात पक्षाची काहीच ताकद नाही, असे भासवणे कितपत योग्य आहे, असा काहीसा सूज्ञ विचार काँग्रेस नेत्यांनी केला. याचा अर्थ असा देशाची सत्ता बदलण्याबरोबरच देशाची सत्ता ताब्यात घेण्याची काँग्रेसची मनिषा आहे. मग तसे असेल, तर काँग्रेस पक्षाचे पहिले उद्दिष्ट काय आहे, मोदींना हलवणे की सत्ता ताब्यात घेणे हे त्यांनी देशभरातील जनतेपुढे स्पष्ट करायला हवे. कारण मायावती यांचा महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान इथला टक्केवारीतील जनाधार हा असाच चार, पाच टक्के आहेच. मग त्यांनाही या राज्यांमध्ये काँग्रेस पक्षाकडून अशा प्रकारे जागा मागून पंतप्रधानपदावरील त्यांचा दावा मजबूत करण्याचा अधिकार बहुपक्षिय राजकारणाच्या तत्वाप्रमाणे आहेच.

त्यामुळे प्रियंका गांधी यांच्या इंदिरा गांधींसारखे दिसण्याने उत्तर प्रदेशात जे काही वादळ आणण्याकरिता काँग्रेसचे नेते प्रयत्न करत आहेत, त्यांनी देशातील दलित, मुस्लिम, शेतकरी, ओबीसी यांना पहिल्यांदा याचे उत्तर दिले पाहिजे की, २०१९च्या निवडणुकीतील त्यांच्यापुढील प्रमुख उद्दिष्ट काय आहे, त्यानंतरच त्यांनी बेंबीच्या देठापासून प्रियंका गांधी आँधी है दुसरी इंदिरा गांधी है, ही घोषणा द्यायला हरकत नाही!

लेखक एक राईट अँगल्सचे नियमित वाचक आहेत.

1 Comment

  1. मधुकर Reply

    काॅग्रेसला शहाणे करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न करूया.

Write A Comment