रशियात संपन्न झालेल्या फुटबॉल विश्वचषकाचा ज्वर (किंवा नशा) फ्रान्स आणि क्रोएशिया यांच्यात काल झालेल्या अंतिम सामन्यानंतर ओसरेल. युरोप- अमेरिका आणि रशिया यांच्यातले ताणलेले संबंध, शिवाय रशियातील एलजीबीटीविरोधी, वंशवादी वातावरण, कायदे, एकूणच स्लाव राष्ट्रवाद आणि जगभरच वर्णवर्चस्ववादी गटांना फुटबॉलच्या निमित्ताने चढणारा जोम यामुळे हा विश्वचषक आधीपासूनच वादग्रस्त ठरला होता. २०१६ मध्ये फ्रान्समधील युरो स्पर्धेत इंग्लंडच्या समर्थकांवर रशियन समर्थकांनी मार्सेलिसच्या स्टेडियममध्ये, रस्त्यांवर, कॅफेमध्ये घुसून केलेले हल्ले आणि मारहाण ही वादग्रस्त ठरली होती. नंतर ‘रशियन ‘समर्थक’ हे फुटबॉलचे चाहते नसून प्रशिक्षित बाउन्सर आणि नव-नाझी गुंड टोळ्या आहेत, त्यांचा वापर पुतीन यांचा सत्ताधारी पक्ष वेळोवेळी करीत आला आहे’ याबद्दल विस्तृत वार्तांकन झाले (https://www.theguardian.com/news/2018/apr/24/russia-neo-nazi-football-hooligans-world-cup हा त्यावरचा ‘गार्डियन’ मध्ये प्रसिद्ध झालेला महत्वाचा लेख आहे). या सगळ्या पार्श्वभूमीवर २०१८ चा विश्वचषक सुरळीतपणे पार पडला हे विशेष. (त्यातही गोम आहे. विश्वचषकाची धूम आणि उत्सवी वातावरण यांचा मुहूर्त साधत पुतीन यांच्या सरकारने कल्याणकारी खर्चाला कात्री म्हणून पेन्शनची वयोमर्यादा वाढवली, करआकारणीचे दर वाढवले आणि त्यावर होऊ घातलेल्या आंदोलन, विरोधाला शह दिला)
फुटबॉल आणि राजकारण यांची चर्चा राष्ट्रवाद, व्यावसायिक फुटबॉल आणि जागतिकीकरण, वर्ण-वंशवाद, निर्वासित खेळाडू, टीव्ही आणि व्यावसायिक हक्क यांच्या आर्थिक उलाढाली अश्या विविध अंगांनी होत आली आहे. या लेखाचा हेतू अर्थातच ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याचा आहे- पण त्यात केवळ तपशीलवार जंत्री न मांडता काही एक तत्वविचार व्हावा, किमान त्या दिशेने सुरुवात व्हावी असा आहे.
सर्वप्रथम खेळ आणि आधुनिकता, आणि त्यांचा भांडवलशाही विकासाशी असलेला अन्योन्य संबंध अधोरेखित केला पाहिजे. ‘खेळात (किंवा कलेत) राजकारण नको’ वगैरे बनाव साळसूदपणे केले जातात त्यात ह्या ऐतिहासिक वास्तवाला नाकारणारी प्रस्थापितहितैषी विचारसरणी असते. क्रिकेटचा उगम इंग्रजी उमरावी परंपरेत झाला असला (किंवा कृष्णाच्या चेंडूफळीतही झाला असे खास ‘देशी’ संशोधन मान्य करूनही) किंवा चेंडूशी खेळण्याचा इतिहास अगदी मध्ययुगीन/ प्राचीन काळात जात असला तरी फुटबॉल, क्रिकेट आदी खेळांचे संस्थाकरण, त्यांचे लिखित नियम, ‘खेळाडू’ हा स्वतंत्र व्यवसाय/ धंदा म्हणून उदयाला येणे हा अगदी गेल्या शंभर- दोनशे वर्षांचा इतिहास आहे. इंग्लंडमध्ये झालेली औद्योगिक क्रांती, आणि मँचेस्टर आदी गिरण्यांच्या शहरांत कामगारांचा खेळ, विशेषतः फुटबॉल हा नव्याने घडत गेलेला धर्म- यांचा अर्थ मार्क्सच्या ‘धर्म ही अफूची गोळी आहे, तसेच धर्म हा काळीजहीन जगाचे काळीज आहे’ ह्या प्रसिद्ध द्वंद्वात्मक विधानातूनच लावता येतो. एकीकडे गिरण्यांत होत असलेले प्रचंड शोषण, गरिबी, बकाल शहरे आणि त्याच पार्श्वभूमीवर फुटबॉलच्या मैदानात शक्य असलेली समान संधी, उमराव/ हौशी विरुद्ध धंदेवाईक अश्या सामन्यात अनुस्यूत वर्गसंघर्षाची धार यातून कामगार वर्गाने खेळ हा आधुनिक धर्म स्वीकारला. भांडवली श्रमविभाजन, त्यातून होणारे परात्मीकरण (alienation) आणि वस्तूकरण (commodification) हे सगळे खेळ ह्या स्वायत्त संरचनेचाही स्वाभाविक भाग होते, आहे. त्यातूनच स्वतः ‘खेळणे’ ह्या कृतीचे, मानवी श्रमाचे भांडवली श्रमविभाजन, वस्तूकरण होत श्रम करायला धंदेवाईक खेळाडू आणि त्यांचे श्रम ‘मनोरंजन म्हणून उपभोगायला’, स्वतःचे शोषण आणि त्यातील दुःखाचा, वेदनेचा विसर/ विरेचन म्हणून खेळ ही नवी अफूची गोळी आधुनिक समाजाने मिळवली. (रोमन साम्राज्यातील ‘ग्लॅडिएटर’ शी असलेले साधर्म्य आपण अर्थातच लाक्षणिक अर्थानेच घेतले पाहिजे. प्राचीन-मध्ययुगीन नाटक-संगीत यांचे ‘प्रेक्षक’ ही कॅटेगरी उच्चभ्रूंसाठी मर्यादित होती. भांडवली आधुनिकतेने सर्व वर्गाना प्रेक्षक बनणे शक्य केले, हे कला-मनोरंजन यांचे लोकशाहीकरण होते)
दुसरीकडे ही अफूची गोळी तत्कालीन प्रस्थापित व्हिक्टोरीयन व्यक्तिमत्व, शारीरिक सुदृढता ही मर्दपणाची कसोटी बनणे, ह्या सगळ्या परिस्थितीचा भाग होती. खेळ- जो मजेचा आणि आनंदाचा भाग होता त्याचे चुरशीत आणि स्पर्धेत रूपांतर झाले. भांडवली मुक्त स्पर्धा, सर्वाना कागदावर समान संधी, शोषित वर्गाला खेळाच्या मैदानातला विजय हा आत्मसन्मान म्हणून मिरवायची सोय, आणि अखेर स्थानिक क्लब पातळीवर स्थानिक अस्मिता ते जागतिक पातळीवर खेळाचे संघ आणि त्यातच राष्ट्रवाद शोधायचा रस्ता; हा सगळा भांडवली फँटसीचा भाग आहे. १९ व्या शतकाच्या अखेरीपासून होणारे धर्माधारित पंचरंगी क्रिकेट सामने आणि त्यातून धार्मिक दंगली, तेढ हा इतिहास आपल्यालाही परिचित आहे.
ह्या सगळ्याची उजळणी एवढ्यासाठी करायची कारण फुटबॉल असो किंवा क्रिकेटसारखे अन्य खेळ; चाहते- पत्रकार यांना खेळात गेल्या ३० वर्षांत आलेला पैसा आणि त्यातून झालेला कायापालट पाहून ‘पूर्वी हे असे नव्हते’ अशी स्मरणरंजनाची टेप लावायची हुक्की अनिवार होत असते. ‘खेळाचा आत्मा हरवला, सर्व क्लब्स/ संघ बिनचेहऱ्याचे झाले आहेत- पैशासाठी इकडून तिकडे जाताना, वर्षभर यांत्रिकपणे खेळण्यात त्यांची स्वतंत्र शैली अशी उरली नाही’ अशी बरीच टीका होत असते. ती रास्तही आहे. पण त्याला अभिप्रेत असलेला रम्य युटोपीअन भूतकाळ हा काल्पनिक आहे. मुळात भांडवलाच्या इतर शाखांत लागू असलेला यांत्रिकीकरणाचा नियम खेळात लागू होणार नाही असे मानणे म्हणजे भाबडेपणा आहे. आणि यांत्रिकीकरण आधुनिक खेळाचा अविभाज्य भागच आहे. ज्या खेळाचा उगम आधुनिक भांडवली विकासाचा भाग आहे त्या खेळाची स्वायत्तता म्हणजे भांडवलाचा विरोध असे मानणे म्हणजे दादाइजम, एक्स्प्रेशनिझम वगैरे कलाप्रवाहांची भांडवलाचा विरोध कलेतून होईल अश्या असलेल्या समजुतीची पुनरावृत्ती.
इथे प्रश्न येतो खेळ आणि शैली, कला यांचा. स्पर्धात्मक खेळात कलेला स्थान असू शकते का? खेळ आणि कलात्मकता यांचा खरोखर काही संबंध आहे, असतो? आणि जरी कलात्मक कुसरत खेळात असते असे मान्य केले तरी विजयाच्या चुरशीत तिला दुय्यम स्थान मिळणे स्वाभाविक नाही का? असे अनेक प्रश्न मार्क पेरेलमन हे ‘the mass submission to football’ या ‘ल फिगारो’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या आपल्या लेखात (https://www.versobooks.com/blogs/3917-the-mass-submission-to-football) उपस्थित करतात. फ्रांकफुर्ट स्कूलच्या विचारवंत अडोर्नो यांच्या कला ही आधुनिक उद्योग बनण्याची प्रक्रिया, वस्तूकरण आणि ‘लोकांवरचा लोकप्रिय संगीत, सिनेमा आणि खेळ यांचा पगडा हा त्यांना बालिश उपभोक्तेपणातून बाहेर पडू न देण्यास जबाबदार आहे’ अश्या मांडणीचा आजच्या संदर्भात कसा अर्थ लावायचा हा पेरेलमन यांचा प्रयत्न आहे. प्रौढ लोकांनी हुच्चपणे उड्या मारणे, तोंडाला रंग फासणे, जोरजोरात झेंडे फडकावणे, आरडाओरडा करणे, हा सगळा बालिशपणा आधुनिक लोकप्रिय खेळाच्या संदर्भात केला तर तो शिष्टसंमत होतो- ही शिष्टसंमती समजून घेणे आवश्यक आहे. त्याला दोन पैलू आहेत. खेळ ही कलाच आहे आणि तिचे रसग्रहण करण्यात काहीच वावगे नाही हा पहिला भाग. पेरेलमन खेळ ही कला आहे यावरच प्रश्न उपस्थित करतात आणि चित्रे, नृत्य, साहित्य यांच्यात आवश्यक नसलेली स्पर्धा, हार-जीत ही खेळाचा गाभा आहे आणि त्यामुळे तिची कलेशी तुलना होऊ शकत नाही असा साधारण त्यांचा सूर आहे. दुसरा भाग म्हणजे फुटबॉल किंवा अन्य खेळ हे जीवनसदृश परिस्थिती अभिनित करीत असतात. ‘अफूची गोळी’ लोकप्रिय आहे याचा अर्थ लोकांशी जोडून घेण्यासाठी डाव्या, पुरोगामी चळवळी, विचारवंतानी अश्या घातक गोष्टींचा पुरस्कार करायचा असा होत नाही. तेव्हा फुटबॉल हा एक स्पेक्टाकल बनला आहे. त्याचा आंधळा स्वीकार, पुरस्कार, ‘जनतेचा खेळ, सुंदर खेळ’ वगैरे मुलामा देऊन करणे हे चुकीचे आहे इ. इ. पेरेलमन यांचे मुद्दे महत्वाचे आहेत. माझ्या मते त्यात एक गडबड झाली आहे. ‘कला की फुटबॉल’ असा एक छद्म विरोध त्यांनी मानला आहे. मुळात कला ही देखील फुटबॉल/ इतर खेळांप्रमाणे भांडवली व्यवस्थेचा भाग आहे आणि यांत्रिकीकरण, वगैरे आपण आधी पाहिलेली टीका कलेलाही लागू आहे. साहित्य सिनेमा, संगीत, नाट्य, नृत्य, हे सर्व कलाप्रकार भांडवली वस्तूकरणाचे लॉजिक पाळत आले आहेत. आणि असे असूनही जर त्यात काही एक ‘कला’/ ‘कलात्मकता’ शिल्लक उरत असेल किंवा जर उपभोक्ता त्यासाठी ती वस्तू/ सेवा खरेदी करत असेल तर त्याचा अर्थ कसा लावायचा? अखेर कलात्मकता, शैली (किंवा टूम) ही ऐतिहासिक उत्पत्ती आहे- आवड, निवड, आणि लोकप्रियता ही त्या त्या काळाला मुखर करत असते. झाडाभोवती नाचत गाणी गाणे हा विशिष्ट कल-स्थलस्थितीतच कलात्मक अविष्कार असू शकतो. त्याचबरोबर एखादा खेळ लोकप्रिय का होतो, त्यातील विशिष्ट शैली ‘राष्ट्रीय’ प्रतीक का आणि कशी होते हे त्या स्थल-काळाला समजून घेण्यासाठी महत्वाचे असते. अमुक एक गोष्ट कला नाही असे म्हणून तिला नाकारू पाहणे यातून केवळ आपले ‘जहाल’पण सिद्ध होईल; आणि ‘भ्रष्ट’ व्यवस्थेबरोबर तडजोड नाही म्हणायचे खोटे समाधान मात्र भरपूर लाभेल. पण कला-खेळाला झोडून व्यवस्था बदलता येईल हा केवळ भ्रम आहे. असो.
एक मुद्दा अधिक स्पष्ट केला पाहिजे- आधुनिक खेळ आणि पुरुषसत्ता याचा संबंध. आधी उल्लेख केल्याप्रमाणे शारीरिक सुदृढता आणि मर्दपण यांची कसोटी म्हणून या खेळांचा विकास होत गेला. स्त्रियांचा खेळात समावेश होत गेला- पण तो एकतर स्केटिंग, टेनिससारख्या खेळात त्यांचा ‘वस्तू’ म्हणून विचार करण्यात मर्यादित होता- नाहीतर स्त्रियांची शारीरिक/ मानसिक क्षमता पुरुषाच्या तुलनेत कमी असणार असे म्हणत त्यांचे स्थान क्रिकेट/ फुटबॉलसारख्या खेळात दुय्यम महत्वाचे ठरत गेले. चीयरलीडर्स म्हणजे नैतिक अधःपतन म्हणून ओरडा करताना ही दुसरी बाजू कोणीच लक्षात घेत नाही. स्पर्धात्मक भांडवली पुरुषसत्ताक समाजात आधुनिक खेळ लोकप्रिय आहेत ते टेनिसचा अपवाद करता पुरुषांचेच. आणि टेनिसमध्येही स्त्री-पुरुष विजेत्यांना समान रक्कम मिळावी म्हणून अजूनही लढा सुरु आहे. क्रिकेट- फुटबॉलमध्ये समालोचनात स्त्री खेळाडू उत्तम समालोचक होऊ शकते यावर पुरुष खेळाडू- समालोचक- प्रेक्षक यांचा विश्वास बसू शकत नाही. इतकेच काय तर क्रिकेट/ फुटबॉल वगैरे खेळांचे चाहते असणार ते केवळ पुरुषच- स्त्रियांना त्यातले काय कळणार असा समज लोकप्रिय आहे.
अखेर विचार करायला हवा तो अस्मिता आणि खेळ यांचा. स्थानिक/ राष्ट्रीय अस्मिता आणि आधुनिक खेळाचा विकास आपण पाहिला. आता हा प्रश्न फुटबॉलमध्ये प्रचंड गुंतागुंतीचा झाला आहे. जर्मन संघात असलेल्या तुर्की मुळाच्या ओझील आणि गुंडोगन ह्या खेळाडूंनी टर्कीच्या अध्यक्ष एर्दोगान यांची भेट घेतली यावरुन जर्मनीमध्ये मोठा वाद उभा राहिला. त्या खेळाडूंची हकालपट्टी करण्याची जोरदार मागणी झाली. करीम बेन्झेमा या फुटबॉल खेळाडूने २०११ मध्ये म्हटले होते ‘मी जर गोल केला तर मी फ्रेंच असतो आणि जर मी गोल करू शकलो नाही किंवा खराब खेळलो तर मात्र माझी ओळख ‘अरब’ अशी होते’. फ्रान्सच्या भूतपूर्व आफ्रिकन वसाहतीमधून पॅरिसच्या उपनगरांत आलेले नागरिक/ निर्वासित, आणि त्यातून उदयाला आलेले एमबापे, पोग्बा, कांते, हेन्री, वियेरा, थुराम, अनेल्का इ. प्रसिद्ध फुटबॉलपटू यावर मिहीर वासवडा यांनी indian express मध्ये वृत्तांत लिहिला आहे. (https://indianexpress.com/article/fifa/in-greater-paris-lives-french-greatness-world-cup-2018-france-vs-belgium-5252825/ ) गंमत अशी आहे की फुटबॉल, सिनेमा आदि कला यांच्यात यश मिळवले की हे एरवी दुय्यम दर्जाचे असणारे निर्वासित/ उपरे, एकदम रोल मॉडेल बनून जातात. पुन्हा हे यश मिळवणे हे भांडवली स्पर्धा-नियमांना धरून असल्याने प्रस्थापित क्लब्स आणि त्यांच्या एजंटच्या नजरेत यावे म्हणून हजारो मुले धडपडत असतात. त्यात अंगभूत अनिश्चितता ही दैव/ नशीब म्हणून गौरवलीही जाते. मात्र त्यात मागे राहिलेल्या मुलांवर कधीच प्रकाश पडत नसतो. मजा अशी की जागतिकीकरण आणि खुल्या स्पर्धेचे समर्थन करताना ‘फुटबॉल स्पर्धात्मक राहण्यासाठी आणि त्याचा सर्वसाधारण दर्जा उंचावण्यासाठी निर्वासितांच्या गुणवत्तेचं स्वागत होणं आवश्यक आहे. त्यामुळे क्लब्सच्या आर्थिक सुबत्तेमध्ये, तसंच राष्ट्रीय संघाच्या सामूहिक कौशल्यामध्ये मोठी भर पडते’ अशी कारणे दिली जातात. आता हा तर थेट उपयुक्ततावादी दृष्टीकोन झाला. आणि समजा निर्वासितांचा खेळ समाधानकारक नसला तर काय? अधिक सुजाण भूमिका ही नियोजनबद्ध विकासाची आणि त्यासाठी आरक्षणासारख्या अफर्मटिव्ह ऍक्शनची असू शकते. मुळात मुद्दा आहे तो अधिकाधिक लोकांना खेळात/ राजकीय जीवनात समानतेच्या आधारावर सहभागी करून घेण्याचा. मात्र उपयुक्ततावादी विचारातून फक्त सितारे सापडू शकतात. परिस्थिती बदलू शकत नाही. अगदी पॅरिसच्या उपनगरांत ७० फुटबॉल क्लब्स तयार झाले तरी नाही. असो.
विश्वचषक फुटबॉलची लोकप्रियता बऱ्याच अंशी राष्ट्रीय अस्मितेमुळेच आहे. आणि ब्रेक्झिटच्या पार्श्वभूमीवर इंग्लंड उपांत्य फेरीत पोचल्यावर हा ‘राष्ट्रवादी’ ज्वर/ उन्माद आयकिया ह्या स्वीडिश फर्निचरच्या एका दुकानात शिरून मोडतोड करून थोडा स्वस्थ झाला. ‘फुटबॉल इज कमिंग होम- फुटबॉलची घरवापसी होणार आहे’- फुटबॉलचा उगम इंग्लंडमधला; आता युरोपीय समुदायातून बाहेर पडल्यावर इंग्रजी साम्राज्याचे गतवैभव परत येईल तसा फुटबॉलचे जेतेपदही येईल असा असा हिस्टेरिया तयार करण्यात आला होता. त्यातून मग स्कॉट, वेल्श इ. इतर राष्ट्रकांची खिल्ली उडवणे वगैरे नेहमीचे प्रकार सुरु झाले. नंतर क्रोएशियाने इंग्लंडला हरवल्यानंतर कर्णधार मोड्रीच याने ‘इंग्रजी पत्रकारांनी केलेला माज आणि क्रोएशिया दुबळा संघ आहे वगैरे केलेली दर्पोक्ती’ यावर कडक टीका केली. आफ्रिका, आशिया, दक्षिण अमेरिका येथील संघ, खेळाडू यांना अनेकदा अशी वागणूक मिळत आली आहे. मात्र लोकांशी जोडून घेणे आणि लोकानुनय यातला फरक न केल्यामुळे ‘इंग्लंड जर विश्वचषक जिंकला तर सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी’ अशी भूमिका कॉर्बीन यांच्या मजूर पक्षाने घेतली होती. आता या सार्वजनिक सुट्टीचा अर्थ ‘जाहीर दारू पिऊन धिंगाणा करण्याची उजव्या अतिरेकी राष्ट्रवादी धटिंगणाना सूट’ असा होतो हे सर्वज्ञात असूनही अशी भूमिका घेणे हे विवेक सुटल्याचे लक्षण आहे. कॉर्बीन एकटेच नाहीत. फ्रेंच डाव्यांचे नेते मेलेन्चोन यांनी आधी ‘फुटबॉल ही अफूची गोळी’ असल्याची भूमिका घेतली होती. पण जर्मनी बाद झाल्यानंतर आनंद साजरा करत त्यांनी वक्तव्य केले ‘मानशाफ्ट (जर्मन राष्ट्रीय संघ) बाद झाला ह्याचा मला निखळ आनंद आहे. मी फुटबॉलशिवाय कसा राहू शकेन?’ जर डाव्यांची ही स्थिती आहे तर उजव्या राष्ट्रवादी उन्मादाची कल्पनाच केलेली बरी. (अर्थात आपल्याकडचा खेळपट्टी उखडणे, स्वतःच्या संघाने मिळवलेले चषक तोडणे, कॅम्पसवर विद्यार्थांना मारहाण करणे, दंगली करणे असा दीर्घ इतिहास परिचित आहेच). ‘धर्मयुद्ध’ हे दर वर्ष-दोन वर्षांनी आयोजित- प्रायोजित केले जात असेल- त्यासाठीचा उन्माद तयार होत असेल- केला जात असेल तर त्याचा अर्थ काय होतो?
अखेर प्रश्न खेळ आणि फुटबॉल यांच्या भ्रष्टतेचा आणि त्यात असलेल्या वर्ण-वंशवादी हिंसा, अस्मिता यांना सुटेपणाने पाहण्याचा नाही. हाही राजकारणाचा ‘खेळ’ आहे, स्वायत्त असला तरी सांस्कृतिक प्रभुत्वसत्तासंबंधाचा भाग आहे हे समजून घेण्याचा आहे. आणि त्यात असलेल्या कलेचा ऐतिहासिक संदर्भ लक्षात ठेवण्याचा आहे.