सध्याचं राजकारण हे धर्माच्या नावाखाली चाललं आहे. त्यामध्ये साम्राज्यवादी देशांचं तेलावर नियंत्रण मिळवण्यासाठी असलेलं राजकारण असो किंवा दक्षिण आशियाई देशांमध्ये जन्म-आधारित असमानतेचं राजकारण असो. हे सर्व धर्माच्या आडूनच सुरू आहे. पाकिस्तान आणि अनेक पश्चिम आशियाई देशांमध्ये, इस्लामच्या नावाने सरंजामशाही-एकाधिकारशाही अस्तित्वात आहे आणि मजबूतही होत आहे. म्यानमारमध्ये- श्रीलंकेमध्ये बौद्ध धर्माचा चेहरा आहे, तर भारतामध्ये हिंदू धर्माचा वापर करून समता आणि उदारमतवादासारख्या मूल्यांना पायदळी तुडवलं जात आहे. हे धर्माचं राजकारण अनेकदा सर्जनशील लोकांसाठी अडथळे निर्माण करतं. त्यांच्या गझल मैफिली उधळून लावणं, त्यांच्या चित्रपटांवर बंदी घालणं हे अनेकदा घडतं. कलाकारांना इशारे दिले जातात, धार्मिक भावना दुखावल्यामुळे माफी मागावी, अशी मागणी केली जाते.
अलीकडेच अशीच वेळ बॉलिवूडमधली स्टार प्रियांका चोप्रा हिच्यावर आली. त्याचं कारण ती सध्या काम करत असलेल्या अमेरिकन टिव्हीवरील क्लांटिको मालिका. या मालिकेच्या एका भागामध्ये भारत-पाकिस्तान समेट नियोजित असते त्यावेळी प्रियांका एका भारतीय हिंदू दहशवाद्याचा न्यूक्लिअर हल्ल्याचा डाव उधळून लावते. यामुळे भावना दुखावलेल्या लोकांनी लगेच मागणी केली की, “ हिंदू सेना असं आवाहन करते की, प्रियांका काम करत असलेल्या जाहिराती, चित्रपट यांच्यावर बहिष्कार टाकावा आणि भारतीय सरकारने तिचं नागरिकत्व रद्द करून तिला भारतात येण्यास बंदी घालावी. ” यावरून अस्वस्थ झालेल्या प्रियांकाने लगेच ट्विट केलं, “क्लांटिकोच्या एका भागामुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्याचं एेकून मला वाईट वाटलं. मी त्यांची माफी मागते. त्यामागे तसा कोणताच उद्देश नव्हता. मला भारतीय असल्याचा अभिमान आहे आणि मी भारतीयत्व कधीही सोडणार नाही. ” फिल्म इंडस्ट्रीतील पूजा भट मात्र प्रियांकाच्या बाजूने उभी राहिली आणि प्रियांकाला कलाकार म्हणून तिचं मत मांडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य असल्याचं तिने सांगितलं.
प्रत्यक्षात सध्या चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये मुसलमान पात्र ही अनेकदा दहशतवादी किंवा अतिरेकी म्हणून रंगवली जातात. पण तेच क्लांटिकोमध्ये हिंदू पात्र त्या भूमिकेत दाखवलं तर अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि कलाकाराचं नागरिकत्व रद्द करण्याच्या मागण्या करण्यापर्यंत मजल गेली. कोणतीही घटना घडली की ती धर्माच्या चष्म्यातून पाहून त्यावर शिक्का मारायचा ही गोष्ट ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यापासून सुरू झाली. मूळात अफगाणिस्तानमध्ये रशियाशी लढण्यासाठी दहशतवादी गटांना तयार करण्याचं, रसद पुरवण्याचं काम अमेरिकेने केलं. त्यासाठी सौदी अरेबियामध्ये प्रचलित असलेल्या इस्लामचा वापर करण्यात आला. पण त्यांचा मोहरक्या हा वॉशिंग्टनमध्ये बसला होता. दहशतवादाचा अवतार हा इस्लामच्या नावाखाली घडवण्यात आला. अमेरिकन माध्यमांनी ‘इस्लामी दहशतवाद’ असा शब्द प्रयोग रूढ करून धर्म आणि दहशतवाद यांची पहिल्यांदाच सांगड घातली. प्रत्यक्षात, दहशतवादाच्या कृतीमध्ये अनेक धर्माचे लोक होते. जेव्हा भारतात हिंदूंचा समावेश दहशतवादी कृत्यांमध्ये झाला तेव्हा हिंदू दहशतवादी, भगवा दहशतवाद, हिंदुत्व दहशतवाद असेही शब्दप्रयोग पुढे आले. पण प्रज्ञा सिंग ठाकूर आणि असीमानंद यांना जामीन दिल्यावर मात्र या शब्दप्रयोगांना मात्र विरोध करण्यात आला आणि माफी मागण्याची मागणी करण्यात आली.
मालेगावमध्ये २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये वापरण्यात आलेली मोटार सायकल हिंदुत्ववादी संघटनेच्या प्रतिनिधी साध्वी प्रज्ञा ठाकूरची होती हा तपास माजी एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांनी लावला होता. त्यानंतर अनेक हिंदू नावं पुढे आली. त्यामध्ये हिंदुत्ववादी संघटना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर उपाध्याय, स्वामी असीमानंद अशा अनेकांचा समावेश होता. अनेकांना अटक झाली आणि त्यातील संघाच्या दोन माजी प्रचारकांना अजमेर स्फोटामध्ये आजीवन कारावासाची शिक्षाही सुनावण्यात आली.
साध्वी, पुरोहित आणि असीमानंद यांना जामीन मिळाला. स्वामीने दहशतवादीकृत्याची संपूर्ण आखणी मॅजिस्ट्रेट समोर कबूल केली आणि स्वामी दयानंद पांडे याच्या लॅबटॉपमधून त्यासंबंधित साहित्य, माहितीही मिळाली. याच संघटनेशी बहुदा संबंधित असलेल्या सुनील जोशी नावाच्या एकाचा खून झाला. त्याने साध्वीला लैंगिक सुखासाठी संकेत दिल्याचं बोललं जातं. या सगळ्या तपासानंतरही केवळ २०१४ मध्ये केंद्रात सरकार बदलल्याने साध्वी आणि स्वामी यांना जामीन मिळाला. त्यामुळे सत्याला न्याय मिळेल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचबरोबर सरकार बदलल्यानंतर या प्रकरणामध्ये सरकारी वकील असलेल्या रोहिणी सॅलियन यांना धीम्या गतीने जाण्याविषयी सूचना करण्यात आल्या होत्या. त्यामुळे एकूणच या प्रकरणाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होतात. मुंबईमध्ये १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात रुबीना मेनन हिच्या नावावर गाडी नोंदवलेली गाडी स्फोटात वापरल्याने तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. पण मालेगाव स्फोटात साध्वीची मोटारसायकल वापरूनही तिला जामीन मिळाला !
गेल्या काही वर्षांत गोमांसाच्या नावाखाली लोकांना ठेचून मारण्यासारख्या दहशतवादी घटनांमध्ये हिंदूंची संख्या मोठी आहे. अफ्रझूल या कामगाराचा लव्ह जिहादच्या नावाने खून करताना व्हिडिओ रेकॉर्डिंग करणाऱ्या शंभूलाल रेगरसाठी निधी जमवणारे हिंदू आहेत. गौरी लंकेश आणि एम. एम. कलबुर्गी यांच्या खुनामागे हिंदुत्व संघटनांचा हात आहे. कदाचित प्रियांका चोप्रासारखे कलाकार आपलं करिअर वाचवण्यासाठी तोंडदेखली माफी मागून मोकळे होतीलही. पण धर्माचा वापर सार्वत्रिक राजकारणात होत असल्याने धर्माबद्दलच्या धारणा तपासण्याची नितांत गरज सध्या निर्माण झाली आहे.
राम पुनियानी