fbpx
सामाजिक

आंबेडकरांच्या फोटोला हार घालून सन्मान होईल का?

यावर्षी १४ एप्रिलला भीमराव आंबेडकरांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त देशभर मोठ्या उत्साहात अनेक कार्यक्रम पार पडले. त्यामध्ये विशेषतः भाजपनेही सहभाग घेतला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर जाहीर करून टाकलं की, काँग्रेस कायम बाबासाहेबांच्या विरोधात होती आणि म्हणूनच आपल्या सरकारने त्यांना योग्य तो सन्मान दिला आहे. आतापर्यंत इतर कोणत्याही सरकारने डॉ. आंबेडकरांना एवढा सन्मान दिला नव्हता!

त्यानंतर आंबेडकरांच्या नावाचा वापर करून भाजपने विविध पातळ्यांवर आपली खेळी खेळायला सुरुवात केली. एक तर काँग्रेस आंबेडकरांच्या विरोधात असल्याचा अपप्रचार त्यांनी जोरदार सुरू केला आणि भाजप त्यांचा सन्मान करते हे दाखवण्यासाठी भीम अॅप सुरू केलं, दलितांच्या घरी जाऊन जेवायला सुरूवात केली. या सर्व गोष्टी भाजपला फायदेशीर दिसत असल्या तरी भाजप खरोखरंच डॉ. आंबेडकरांचा सन्मान करत आहे का? किंवा त्यांची मूल्यांचा प्रचार करत आहे का? केवळ राजकीय दिखावा केल्याने ती मूल्यं राखली जाणार का?

प्रत्यक्षात आंबेडकरांचे विचार आणि जगाचं आकलन हे भाजपच्या विचारधारेच्या एकदम विरोधात आहे. एक बोलायचं आणि त्यातून दुसराच अर्थ काढायचा अशा वृत्तीमध्ये भाजप एकदम तरबेज आहे. त्यामुळे काँग्रेसने आंबेडकरांना विरोध केला हे विधान किती खोटं आहे हे थोडा इतिहास बघितला तर दिसून येईल. आंबेडकरांचा जातीअंताचा लढा सर्वश्रुत आहे. त्यासाठी त्यांनी घेतलेल्या मेहनतीला तोड नाही. त्यातून प्रभावित होऊन महात्मा गांधी यांनी अस्पृश्यतेविरोधात लढा सुरू केला.  हा एकप्रकारे आंबेडकरांचा सन्मानच होता. आंबेडकर काँग्रेसचे सदस्य नसले तरी नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांना बोलावून कायद्यासारखं महत्त्वाचं खातं त्यांना दिलं. संविधान बनवण्यासाठी नेमलेल्या समितीवर आंबेडकरांना अध्यक्ष म्हणून घेतलं. नेहरुंच्या काँग्रेसमध्ये सामाजिक सुधारणा हा मुख्य मुद्दा असल्याने नेहरूंनी आंबेडकरांना हिंदू कोड बिल बनवायला सांगितलं. त्याला संघाने जोरदार विरोध केला.

हा इतिहास लक्षात घेतला तर आपण भाजपचं आंबेडकर प्रेम कशा पद्धतीने बघू? भाजपचा जन्म १९८० मध्ये झाला असला तरी त्याआधी भारतीय जनसंघ १९५२ आणि त्यांची मूळ संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदू राष्ट्रवादाच्या विचारसरणीवर १९२५ मध्ये स्थापन झाली होती. अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर संघाने आंबेडकरांना कायम विरोध केला आहे. जेव्हा संविधानाचा मसुदा तयार करून संविधान समितीपुढे ठेवण्यात आला तेव्हा संघाच्या मुखपत्रात अॉर्गनायझरमध्ये (३० नोव्हेंबर १९४९) लिहून आलं की, “… प्राचीन भारतामध्ये संविधान, संविधानिक संस्था, असे शब्द अस्तित्वात नाहीत… किंबहुना संविधानाबद्दल काहीच म्हटलेलं नाही. पण मनूने आपले कायदे मात्र स्पार्टाचा लायकर्गस किंवा पर्शियाचा सोलन यांच्याही आधी लिहिले आहेत. आजच्या जगामध्ये आणि भारतातल्या हिंदूंमध्ये आजही या मनूस्मृतीमध्ये सविस्तर दिलेल्या मनुच्या कायद्यांची स्तुती होते. पण आमच्या संविधान बनवणाऱ्या पंडितांना त्याचं काहीच वाटत नाही”.

यानंतर हिंदू कोडबिलावरूनही सरसंघचालक गोळवलकर यांनी आंबेडकरांना लक्ष्य करत जोरदार टीका केली. त्यांच्या अॉगस्ट १९४९ च्या भाषणात ते आंबेडकरांच्या सुधारणांबद्दल म्हणाले की, “यात भारतीय असं काहीच नाही. लग्नं आणि घटस्फोटासारखे प्रश्न अमेरिकन किंवा ब्रिटीश कायद्यांच्या धर्तीवर सुटू शकत नाहीत. लग्नं हे भारतीय संस्कारांचा, कायद्याचा भाग आहे आणि मरणानंतरही ते सुटू शकत नाही. हे काही कंत्राट नाही जे कोणत्याही वेळी मोडू शकतं.” गोळवलकर पुढे म्हणाले की, “हिंदू समाजातल्या काही खालच्या जातींमध्ये घटस्फोटाची परंपरा आहे. पण म्हणून ही पद्धत आदर्श मानून सगळ्यांना लागू होऊ शकत नाही. ” (ऑर्गनायझर सप्टेंब ६, १९४९)

भाजप १९९८ मध्ये एनडीएच्या माध्यमातून पहिल्यांदा सत्तेत आली तेव्हा त्यांचे एक प्रमुख मंत्री अरुण शौरी यांनी आंबेडकरांवर जोरदार टीका केली होती. आताही भाजप एकीकडे आंबेडकरांच्या फोटोंना-पुतळ्यांना हार घालत असली तरी भाजप मंत्री अनंतकृष्ण हेगडे यांनी आपल्याला संविधान बदलायचं आहे हे उघडपणे जाहीर केलंय.

आंबेडकरांना कायम सेक्युलरिझम आणि समानता या तत्त्वांचा पुरस्कार केला तरी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सेक्युलरिझम ही स्वातंत्र्यानंतरची सर्वात मोठी थाप असल्याचं म्हटलं आहे. बाबासाहेबांचं नाव घ्यायचं पण त्याचवेळी त्यांच्या जातीअंताच्या, समानतेच्या मूल्यांना हरताळ फासायचा ही भाजपची नीती आहे. संघाचे नेते ज्या मनुस्मृतीची स्तुती करतात तीच मूळात बाबासाहेबांनी जाळली होती.

आंबेडकरांनी सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी जातीअंताची लढाई सुरू केली होती. पण त्याविरोधात संघ मात्र जातीभेद मान्य करून सामाजिक समरसतेच्या नावाखाली दोन जातींमध्ये सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न करतो.

त्यांच्या संपूर्ण विचारधारेमध्ये राम हा मुख्य व्यक्तिरेखा आहे. भाजप खरोखरच आंबेडकरांना मानत असती तर त्यांनी रामाला आपल्या राजकारणाची मुख्य व्यक्तिरेखा बनवलं असतं का? राम मंदिराचा विषय राजकारणामध्ये आणून भाजपने देशभर आपले हातपाय पसरले आहेत. उत्तर प्रदेश सरकारने अयोध्येमध्ये रामाचा मोठा पुतळा स्थापन करण्याची घोषणा केली आहे. राम नवमी भारतभर साजरी करताना शस्त्र घेतलेले तरुण मुद्दाम मुस्लिम मोहल्ल्यांमधून पदयात्रा काढतात. आता हे बघुया की, आंबेडकरांनी रामाबद्दल काय म्हटलं होतं? त्यांच्या रिडल्स अॉफ हिंदुइझम पुस्तकामध्ये डॉ. आंबेडकरांनी रामाबद्दल जोरदार टीका केली आहे. रामाने खालच्या जातीच्या शंबूकाला मारून टाकलं. रामाने वाली राजावर मागून वार केला. गरोदर असलेल्या आपल्या बायकोला सीतेला रामाने घरातून काढलं आणि अनेक वर्ष बायको आणि मुलांबदद्ल चौकशीही केली नाही, याबद्दल तर आंबेडकर अतिशय रागाने लिहितात.

केवळ आंबेडकरांच्या फोटोला हार घालून त्यांचा सन्मान होऊ शकत नाही. आंबेडकरांचा खरा सन्मान हा त्यांनी केलेल्या मनुस्मृतीवरील टीकेला पाठिंबा देणं, भारतीय संविधानातील मूल्यांची जपणूक, त्यांना अभिप्रेत सेक्युलरिझम आणि सामाजिक न्याय यांचा अंगिकार करणं. पण भाजप सत्तेत आल्यापासून दलितांबद्दल द्वेषाची भावना वाढीस लागली आहे, त्यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात हिंसा वाढते आहे. त्याचवेळी गांधी-नेहरू-काँग्रेसने राजकीय मतभेद असूनही आंबेडरांची मूल्य उचलून धरली आणि त्यांना पाठिंबा दिला हे विसरून चालणार नाही.

 

लेखक हे गेली अनेक वर्षे सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी कार्यरत असून सेक्युलरिझमच्या तत्वाचे खंदे पुरस्कर्ते आहेत. त्यांची कम्युनल पॉलिटिक्सः फॅक्ट्स वर्सेस मिथ्स, गॉड पॉलिटिक्स, फॅसिझम अॉफ संघ परिवार, रिलिजन, पॉवर अॅण्ड व्हायलंस अशी अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

Write A Comment