fbpx
कला

संस्कारी चित्रपटांचा जमाना 

साधारण २००३ सालची गोष्ट आहे. हॉलिवूडमधील विख्यात माहितीपटकार मायकल मूर यांनी अॉस्कर पुरस्काराच्या मंचावरून तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या इराकबरोबर युद्ध करण्याच्या भूमिकेविरोधात जोरदार टीका केली होती. “आम्हांला सत्य घटना आवडल्या तरी काल्पनिक विश्वात जगायला आवडतं. आम्ही अशा काळात जगतोय जिथे काल्पनिक निवडणुकांमधून एक काल्पनिक राष्ट्राध्यक्ष निवडून येतो. आम्ही अशा काळात जगतोय जिथे काल्पनिक कारणं दाखवून एक माणूस आमच्या देशाला युद्धात उतरवतो आहे. मग कधी (हल्ल्यापासून बचावासाठी खिडक्या बंद करण्याच्या किंवा ब्लॅकआउटच्या) चिकटपट्ट्या तर कधी अॉरेंज अॅलर्ट (दहशतवादी हल्ल्याचा पूर्व इशारा) अशाही संकल्पना गळी उतरवल्या जातात. पण आम्ही युद्धाच्या विरोधात आहोत. मिस्टर बुश तुमचा धिक्कार असो,”

आज १५ वर्षांनंतर त्या अॉस्करच्या कोडॅक थिएटरपासून कितीतरी दूर भारतामध्ये काहीशी अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. पण इथली सिने दुनिया म्हणजेच बॉलिवूड मात्र स्पष्टपणे सरकारी मुस्कटदाबीच्या विरोधात उभी राहणं पसंत करत नाहीये. दाक्षिणात्य सिने विश्वातले प्रकाश राज किंवा कमल हसन सोडले तर सरकारच्या चुकीच्या धोरणावर बोलणारा एकही दुसरा अभिनेता, दिग्दर्शक दिसत नाही. उलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर हिंदी सिनेमा संस्कारी होत चालले आहेत आणि त्याबद्दल बॉलिवूड ब्रही काढत नाही.

नफा कमावणं हा बॉलिवूड चित्रपटांचा उद्देश कायम राहिला आहे. पण त्याचबरोबर हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये समांतर चित्रपट, कलाकार, दिग्दर्शक यांचीही मोठी परंपरा आहे. दो बिघा जमीन, गर्म हवा, मिर्च मसाला, एक रुका हुआ फैसला, अंकुर, अर्धसत्य असे अनेक सामाजिक चित्रपट सांगता येतील की ज्यामधून तत्कालीन भारताचं दर्शन घडलं. सत्यजित रे, ऋत्विक घटक, बिमल रॉय, श्याम बेनेगल, गोविंद निहलानी, बासू चॅटर्जींसारखे दिग्दर्शक आणि नासरुद्दीन शाह, स्मिता पाटील, शबाना आझमी, ओम पुरी, दीप्ती नवल, फारुख शेख, अमोल पालेकर यांसारख्या अनेक कलाकारांनी भारतीय समाज वास्तव हीच त्यांच्या चित्रपटांची मूख्य भूमिका ठेवली. त्यासाठी कधी त्या वास्तवातील प्रश्नांना थेट भिडत तर कधी हलक्या फुलक्या पद्धतीने या चित्रपटांमध्ये वास्तव केंद्रस्थानी राहिलं.  अगदी कर्मशिअल चित्रपट बनवणारे राज कपूरसारखे अभिनेते-दिग्दर्शकही “श्री ४२०” आणि “प्रेमरोग” सारख्या चित्रपटांतून सामाजिक संदेश देऊन गेले. एकीकडे चित्रपटसृष्टीमध्ये असे सामाजिक चित्रपट निघत असताना प्रेमकथा ही मध्यवर्ती संकल्पना ठेवूनच असंख्य चित्रपट निघत होते आणि अजूनही निघत आहेत. आधुनिक काळामध्ये हिंदी चित्रपटसृष्टीचं सामाजिक भान कमी झालं असलं तरी पूर्णतः सोडलेलं नव्हतं.

मात्र भाजपचे सरकार सत्तेत आल्यावर मात्र त्यांनी थेट माध्यमांनाच हात घालून संपूर्ण देशाला संस्कारी बनवण्याचा ठेका घेतला. त्यात लोकप्रिय असणारी चित्रपटसृष्टी ही त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचं माध्यम होतं. कारण बॉलिवूडचा प्रभाव समाजमनावर खूप मोठा आहे. पहलाज निहलानीसारख्या खूपच सुमार दर्जाच्या माणसाला त्यांनी सेन्सॉर बोर्डावर नेमलं आणि साहेबांनी संस्काराच्या नावाने चित्रपटाचा प्रत्येक सीन कापायला सुरुवात केली. पण “उडता पंजाब” या चित्रपटाला अशीच कात्री लावल्यावर मात्र दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि बॉलिवूडच्या इतर काही जणांनी पहलानीविरोधात आगपाखड सुरू केली. पण संस्कारी साहेब काही थांबायचं नावच घेईनात. शेवटी त्यांना काढून टाकण्यात आलं खरं. मात्र तोपर्यंत व्हायचं ते नुकसान झालंचं. त्यानंतरही भाजप सरकारने थोडी सावध भूमिका घ्यायला हवी होती. त्यांनी थेट फिल्म अॅण्ड टेलेव्हिजन इन्स्टिट्यूट अॉफ इंडियाच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान या दुय्यम दर्जाच्या कलाकाराची नेमणूक केली. या इन्स्टिट्यूटमधून अनेक उत्तमोत्तम कलाकार भारतात तयार होतात. शेवटी विद्यार्थ्यांना आपलं करिअर धोक्यात घालून बेमुदत आंदोलन करावं लागलं.

एकाबाजूला अशी सर्व अस्वस्थता व्यक्त होत असताना बॉलिवूडचे टॉपचे स्टार मात्र सरकारबाबत पूर्णतः मवाळ झालेले दिसले. केवळ सिक्स पॅक अॅब दाखवून सुपरस्टार पदापर्यंत पोहोचलेल्या सलमान खानने मोदींबरोबर पतंगच उडवले आणि आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली. त्याचा मोबदलाही सलमानला मिळाला. हिट अॅण्ड रन ड्रायव्हिंगच्या गुन्ह्यात एका माणसाला उडवूनही तो कायद्याच्या कचाट्यातून सुटला आणि अलीकडेच काळवीटाच्या शिकारीमध्येही त्याला जामीन मिळाला. आमीर खानला संवेदनशील कलाकार म्हणून ओळखलं जात होतं. त्याने देशातल्या अस्वस्थ वातावरणावर खंतही व्यक्त केली. पण त्यावर भाजपचे ट्रोलर आणि भक्तगण असे काही तुटून पडले की त्यानेही सरकारपुढे मान झुकवलीच. भाजपच्या थेट बाजूने जाणारे तर अनेक आहेत. त्यामध्ये बीग बी सर्वात पहिले. हिंदी चित्रपटसृष्टीमधली त्यांची कामगिरी लाखमोलाची आहे. १९७० च्या मध्यापासून त्यांनी फिल्म इंटस्ट्रीला अनेक उत्तमोत्तम चित्रपट देऊन दोन पिढ्यांवर प्रभाव टाकलाय. आजही वयाच्या ७५ व्या वर्षी अमिताभ बच्चन यांच्याबद्दलची क्रेझ कमी झालेली नाही. बॉलिवूडमधला सर्वात शक्तीशाली नट म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांच्या एका वाक्यासाठी लोक लाखो रुपये उडवायला तयार असतात. सुरुवातीच्या काळात त्यांची आणि गांधी घराण्याची मैत्री सर्वश्रुत होती. पण हळूहळू नवीन राजकीय वारे वाहू लागल्यावर त्यांनी आपली मैत्री नवीन राजकारण्यांशी केली. अमर सिंगसारख्या माणसालाही त्यांनी जवळ केलं. मोदींच्या गुजरातचं ब्रँड अॅम्बेसेडर होताना तिथे झालेल्या धार्मिक दंगलींविषयी मात्र त्यांनी मौनच बाळगलं. त्यांच्या पत्नी आणि समाजवादी पक्षाच्या राज्यसभा खासदार जया बच्चन यांनीही सरकारविरोधात ब्र काढल्याचं आठवत नाही.

हेमा मालिनी, अनुपम खेर, परेश रावल, नितीश भारद्वाजसारख्यांनी उघड भाजपची बाजू घेतली. अशा अनेक कलाकारांनी भाजप सरकारशी आणि त्यांच्या धोरणांशी आपली निष्ठा दाखवण्याचे अनेक उटपटांग प्रयत्न केले. हेमा मालिनी यांनी “एक थी रानी एेसी भी” या राजमाता सिंधिया यांच्यावरील चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका केली. भारव्दाज यांनी आधीच “कर्मयोगी” म्हणून संघचालक गोळवलकर यांच्यावर चित्रपट बनवला होता. अक्षय कुमारने तर “टॉयलेट एक प्रेमकथा” बनवून भाजपच्या स्वच्छ भारत अभियानची जाहिरातच केली. बाबूल सुप्रियोसारखा खूपच सर्वसाधारण गायक आज भाजपचा खासदार झाल्यावर आपल्या पश्चिम बंगालच्या मतदारसंघामध्ये झालेल्या दंगलींना आटोक्यात आणण्याएेवजी विरोधकांना तुमची कातडी सोलेन वगैरे धमकी देऊन विषय आणखी पेटता ठेवत आहे. आता अनुपम खेर हे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भूमिका करणार आहेत. त्यांच्या निष्ठा भाजपचरणी वाहिलेल्या असताना या चित्रपटातून काय अपेक्षा करावी हे ज्याचं त्याने ठरवा. मात्र पद्मश्री आणि फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट अॉफ इंडियाच्या अध्यक्षपदाची माळ मात्र त्यांनी आपल्या गळ्यात या निमित्ताने घालून घेतली.

पण एवढ्यावर या राजकीय हस्तक्षेप थांबत नव्हता. राष्ट्रवादाची एक लाट निर्माण करून लोकांना त्यामध्ये त्रास देण्याचा कार्यक्रमच भक्तांनी उघडला आणि बॉलिवूडही त्यामध्ये ओढलं गेलं. भातरमाता की जय म्हणणाराच देशभक्त ठरू लागला. त्यात मुस्लिमांनी वारंवार आपली देशभक्ती दाखवावी म्हणून त्यांचा मानसिक छळ चालवला. करण जोहरच्या “ए दिल है मुश्किल”, शाहरूख खानच्या “रईस” चित्रपटांमध्ये पाकिस्तानी कलाकारांनी काम केल्याचा मुद्दा काढत हे चित्रपट प्रदर्शितच होऊ देणार नाहीत, अशा धमक्या दिल्या. मग करण जोहरने सैनिकांच्या विधवांसाठी असलेल्या निधीला मदत करतो, असं सांगून नमतं घेतलं आणि आपला चित्रपट प्रदर्शित करून घेतला. पण हा निधी कधी प्रत्यक्षात मिळालाच नाही. केवळ आंतरधर्मिय लग्नं केल्याने सैफ अली खान आणि करिना कपूर यांच्या लहान बाळालाही टीकेपासून मुक्तता मिळाली नाही.  त्याचं नाव तैमूर ठेवलं तर हा राष्ट्रीय चर्चेचा विषय झाला आणि आता तर त्या बाळावर राष्ट्रीय बालक या नावाखाली काय वाट्टेल ते जोक चालवले जातात. हे फारच दर्जाहीन आणि घृणास्पद आहे.

राजपूत स्वाभिमानाच्या नावाखाली अलीकडेच “पद्मावत” या चित्रपटाभोवती वादंग निर्माण केला गेला आणि संपूर्ण देशाला वेठीस धरण्यात आलं. दीपीका पदुकोनचं नाक-कान कापण्याच्या घोषणा करण्यापर्यंत करणी सेनेची मजल गेली. पण चित्रपटसृष्टीतून फारच थोडे विरोधाचे आवाज आले. त्यात तो चित्रपटही अत्यंत प्रतिगामी म्हणावा असाच निघाला. जोहारचं समर्थन करणारा, हिंदू राजा रतन सिंह याला प्रामाणिक, शब्दाला जागणारा तर अल्लाउद्दीन खिलजीला मुसलमान असल्याने वेडा, क्रूर दाखवण्यात धन्यता मानण्यात आली. त्याचवेळी “न्यूड” आणि “सेक्सी दुर्गा” या चित्रपटांनाही केवळ त्यांच्या नावामुळे कडाडून विरोध झाला. मुझफ्फरनगर दंग्यावर आलेल्या चित्रपटाच्या प्रदर्शनामध्ये अडथळे निर्माण करण्यात आले.

मेन स्ट्रीम सिनेमा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बॉलिवूडने सध्यातरी संस्कारी होण्याचं ठरवलं असून समाजाची खरी परिस्थिती दाखवण्याची जबाबदारी टाळली आहे. दोन्ही बाजूच्या विचारधारा चित्रपटांमध्ये दाखवायला काहीच हरकत नाही. पण केवळ सत्ताधारी असलेल्या पक्षाचीच विचारधारा चित्रपटसृष्टीमधूनही डोकावत असेल, तर आजच्या तरुण पिढीला तेच खरं वाटायला लागेल. हॉलिवूडचे अनेक सिनेमे फ्रेम टू फ्रेम कॉपी करताना किमान बॉलिवूडने हॉलीवूडमधील स्वतंत्र विचार करण्याची पद्धत आणि न घाबरता सरकारी यंत्रणेला चुकीच्या ठिकाणी धारेवर धरण्याचा गुण यांचीही कॉपी करायला हवी. “पद्मावत” चित्रपटाच्या विरोधात मोर्चे काढताना काही तरुण मुलींनी जोहारचं बिनदिक्कत समर्थन केलं होतं. हेच खूप भयावह आहे आणि चित्रपटांचा किती प्रभाव जनमानसांवर पडू शकतो याचं बोलकं उदाहरण आहे.  त्यामुळे आज बॉलिवूडला मायकल मूर आणि प्रकाश राजसारख्यांचीच प्रचंड गरज आहे.

लेखक हैदराबादस्थित वरिष्ठ पत्रकार आहेत.

Write A Comment