अयोध्येमध्ये पुन्हा एकदा “राम राज्य रथ यात्रा” सुरू करण्यात आली आहे. अयोध्येपासून निघून ही रथयात्रा २२ मार्चला रामेश्वरला पोहोचेल आणि तिथेच तिचा शेवट होईल. राम मंदिराची प्रतिकृती घेऊन ही रथयात्रा सुरू झाली असून अयोध्येमध्ये राम मंदिर बांधणं आणि देशात राम राज्याची स्थापना करणं हे दोन उद्देश घेऊन ही रथयात्रा सुरू झाली आहे. यामध्ये भाजप, विश्व हिंदू परिषद आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांचे अनेक नेते सामील होत आहेत. रथयात्रा ही भारतासाठी नवीन नाही. या रामाच्या राजकारणातून काय घडू शकतं हे ९०च्या दशकात जाणत्या वयात असलेल्यांनी अनुभवले आहे. या राजाकरणातून तर विकासाच्या मुलाम्यावर भाजप केंद्रात आणि इतर अनेक राज्यांत सत्ता प्रस्थापित करू शकली. रामाच्या भोवती फिरणाऱ्या या राजकारणातून समाजामध्ये उभी फूट पडते हे यापूर्वीच सिद्ध झाल्याने नव्याने सुरू झालेल्या या यात्रेचा उद्देश वेगळा असण्याची शक्यता नाही.
काही नव्याने भक्तांच्या यादीत जमा झालेले कदाचित म्हणतील यात्राच तर आहे त्याला काय महत्त्वं द्यायंच. पण थोडा उलटा विचार करून बघायला हवा, इस्लामी राज्य येण्यासाठी अशी यात्रा मुस्लिमांनी काढली किंवा येशूचं राज्य येण्यासाठी ख्रिश्चनांनी तर याकडे आपण “त्यात काय एवढं” या वृत्तीने बघू का? नक्कीच नाही. कारण देशाची जडणघडण ही आधुनिक विचारांवर शक्य असते. अन्यथा सौदी अरेबियासारखं जमिनीच्या खाली तेलसाठे तरी असावे लागतात. अर्थात त्यातून फक्त भव्य दिव्य रस्ते आणि इमारती बांधता येतात. सौदीतील सामान्य जनता विशेषतः स्त्रिया त्या मध्ययुगीन राजवटीला किती त्रासले आहेत, यावर गार्डीयनसारख्या वर्तमानपत्रांनी किंवा बीबीसी सारख्या वाहन्यांनी असंख्य रिपोर्ताज दिले आहेत. असो तर धर्मसत्तावाद बहुसंख्यांचा असो वा अल्पसंख्यांचा तो घातकच आहे. रथयात्रेचे जनक आहेत लालकृष्ण अडवाणी. देशातील भाजपचा जनाधार या रथयात्रेद्वारे वाढविण्याचे काम त्यांनी केले. मात्र त्यांच्या या प्रयत्नांचे फळ पहिल्यांदा वाजपेयींनी चाखले. त्याच सरकारमध्ये गृहमंत्री व भाजपचे अत्यंत शक्तीशाली नेते या नात्याने त्यांनी नरेंद्र मोदी यांना दिलेल्या अभयामुळे नरेंद्र मोदी यांची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची वाचली होती. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत त्यांच्याच या चेल्याने त्यांना काय धडा शिकवला आणि त्याचे दुःख काय आहे हे तेच जाणोत. तर लालजींनी काढलेल्या या रथयात्रेमुळे देशभरामध्ये धार्मिक, जातीय दंगलींचा वणवा पेटला होता. बाबरी मशिदीची वास्तू उद्ध्वस्त केली गेली होती. या देशातील या दोन धर्मियांमध्ये असंख्य दंगे झाले. पण अडवाणींच्या रथयात्रा कारणीभूत ठरलेल्या या बाबरी विध्वंसाने जी मने दुभंगली त्याचा परिणाम आजही समाजात दिसतो. हिंदुत्ववाद्यांकडून खुलेआम मुस्लिमांना राष्ट्रीय शत्रू म्हणून घोषित करण्यात आल्यासारखी परिस्थिती होती. दंगलीच्या नावाखाली झालेल्या कत्तलींबाबतचा न्याय अद्यापही झालेला नाही व तो आपल्या देशात फारसा कधी होतो, असे दिसत नाही.
१९८० च्या दशकापासून भाजपने रामायण आणि राम या दोन प्रतिकांचा वापर करत बहुजन हिंदूंना हिंदुत्वाकडे वळविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले. त्याची फळं त्यांना सत्तारुपाने मिळू लागली आहेत. भाजपा दोन इंजिनाची गाडी आहे, मुख्य इंजिन हे हिंदुत्वाचे आहे, तर दिखाऊ इंजिन हे विकासाचे. विकासाच्या इंजिनात दम नव्हताच कधी त्यामुळेच तर आता पुन्हा एकदा या पक्षाकडे केवळ हिंदुत्वाच्या इंजिनाचीच वाफ तयार होते हे यात्रेने स्पष्ट झाले आहे. भाजपच्या डोक्यातील रामायण काळाचा असलेला पगडा इतका जबरदस्त आहे की त्यांनी काँग्रेसच्या माजी मंत्री रेणुका चौधरी यांनाही स्वतः पंतप्रधान मोदी यांनी रामायणातीलच एक पात्राची उपमा देऊन टाकली. त्यांच्या संसदेतील दिलखुलास हसण्यावर पंतप्रधान नाराज झाले, त्यांना या हसण्यामुळे थेट आठवली ती रामानंद सागर यांच्या मालिकेतील शूर्पणखा! त्यानंतर रामायणातील शूर्पणखेचा व्हिडिओ शोधून त्याला रेणुका चौधरी यांचे हसणं जोडून भाजपच्या केंद्रातील मंत्री किरण रिजिजूंनीच ट्विटवर टाकला. अर्थात टीका झाल्यावर त्यांनी तो व्हिडिओ मागे घेतला खरा पण त्यातून त्यांच्या, मोदींच्या आणि मोदींच्या समर्थनार्थ त्यांच्या या वक्तव्यावर टाळ्या पिटणाऱ्या लोकांवर रामायण मालिकेचा, किती प्रभाव आहे हे प्रकर्षाने पुन्हा एकदा पुढे आलं.
शूर्पणखा ही रावणाची बहीण आणि रामावर मोहित होणारी राक्षस होती. त्यामुळे धडा शिकवण्यासाठी लक्ष्मणाने तिचं नाक आणि कान कापले. ही वर्षानुवर्षे आपल्याला सांगितलेली कथा आहे. या देशातील सर्व पुराण व धार्मिक कथांचा आर्य-अनार्य संघर्षाशी संबंध आहे, हे प्राथमिक शिक्षणापासूनच मुलांना न शिकवण्याच्या काँग्रेसी धोरणाचाही असली मानसिकता होण्यामागे मोठा हात आहे. तर लहानपणापासून मनावर बिंबवण्यात येणाऱ्या या कथांमधून स्त्रियांना वारंवार हेच सांगितलं जातं की, तुला स्वतःहून पुरुष आवडणं म्हणजे भयंकर मोठे पाप आहे, त्या आवडत्या पुरुषाला बघण्याचा प्रयत्न जरी केलास तरी याद राख. तुझे नाक, कान गेलेच. त्यामुळेच असे अनेक स्वयंघोषित लक्ष्मण कधी लव्ह जिहादच्या नावाने किंवा कधी गोरक्षक म्हणून तर कधी संस्कृती रक्षक म्हणून विकृत हिंसाचाराचे प्रदर्शन करत फिरत असतात. खरेतरी वैदिक रामायणाच्या पलीकडेही अनेक इतिहासतज्ज्ञांनी, प्राच्यविद्या पंडितांनी जो अभ्यास केला व त्यातून ज्या अनेक गोष्टींचा उलगडा अनेक तज्ज्ञांनी केला, त्याकडे हिंदुविरोधी असे लेबल लावून ते नाकारण्याइतकीच बुद्धी स्वतःला संस्कृतीरक्षक म्हणवणाऱ्या या खांद्याखाली मजबूत कार्यकर्त्यांकडे असल्यामुळे त्यांना फारसा दोष देऊन चालणार नाही. मात्र त्यातून देशातील अभ्यास करणाऱ्या आणि ज्ञान मिळवू पाहणाऱ्या कितीतरी पिढ्या आपण बरबाद केल्या व भविष्यातही करतो आहोत किमान याचे तरी भान बाळगायला हवे की नाही ? शरद् पाटील यांनी त्यांच्या “रामायण – महाभारतातील वर्णसंघर्ष” या पुस्तकामध्ये म्हटलं आहे की, शूर्पणखा ही दंडक गणराज्याची राणी होती आणि त्र्यंबकेश्वर ही तिची राजधानी होती. जगभरामध्ये कृषिप्रधान गणराज्यांमध्ये स्त्रिया या मोकळेपणाने समागम करत होत्या किंबहुना तोच त्यांचा धर्म होता. शूर्पणखा हे नावही शेतीशी निगडीत आहे. शूर्पणखा म्हणजे नखांवर टोपली तोलून खळ्यात धान्य उपनणारी. पण त्याचवेळी पुरुषसत्ताक संस्कृतीमधून आलेल्या रामाला शूर्पणखेने आपल्यावर मोहित होणं हा अक्ष्यम्य गुन्हा वाटला आणि त्याने तिला विद्रूप करून टाकलं.
तर ही गोष्ट दुसऱ्या पद्धतीने पुन्हा सांगण्याचा हेतू असा की, शूर्पणखा मोदी आणि भाजप समर्थकांच्या ब्राह्मणी जाणिवेतून वाईट स्त्री दिसत असल्याने व एकंदरित सौंदर्यदृष्टीकोन व सर्जनशीलता ही टीव्ही मालिका यांच्यापलिकडे जाणारी नसल्याने त्यांना रेणुका चौधरी यांच्या मनमोकळ्या हसण्याचा त्रास झाला. रामायणाचं मिथक सोयिस्कररित्या वापरून भाजपने आपला जनाधार काहीप्रमाणात बांधला असल्याने त्यांना रामानंद सागर यांच्या रामायणाची वारंवार आठवण येणारच.
नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येण्याच्या आधी विकासाचं डिजिटल रूप लोकांसमोर उभं केलं. डिजिटल इंडिया, अच्छे दिन, मेक इन इंडिया, स्वच्छ भारत अशा सतराशेसाठ योजनाही त्यांनी पुढे आणल्या. पण निवडून आल्यानंतर तीन वर्षातच त्यांना व त्यांच्या परिवारातील संघटनांना पुन्हा एकदा रामाची आठवण यावी यातच त्यांचा विकास कोणत्या दिशेने किती मार्गक्रमण करू शकला हे समजायला हवे. भाजपला सत्तेच्या जवळ पोहोचविण्यात लालकृष्ण अडवाणी यांनी १९९० मध्ये काढलेल्या रथ यात्रेचाच भाग आहे. त्या रथयात्रेला रोखण्याचं आणि अडवाणींना अटक करण्याचं धारिष्ट्यं बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी दाखवलं. पण देशामध्ये व विशेषतः उत्तर भारतामध्ये व्हायचा तो परिणाम झालाच. धार्मिक तेढ निर्माण करून हिंदुत्वाचा कार्यक्रम राबवण्यात भाजपला यश आलं. बाबरी मशिदीसारख्या एका वास्तूला देशातील हिंदुत्वाचं प्रतिक बनवण्यात आलं. अशावेळी देशाचे शत्रू अर्थातच मुस्लिम बनले. १९८० पासून अडवाणींनी रामजन्मभूमी हा राजकीय विषय बनवला. मुस्लिमांवर हल्ले झाले, त्यांच्या जिवित व मालमत्तेचं नुकसान केलं गेलं. बाबरी मशिद पाडल्यानंतर उसळलेल्या दंगलींमध्ये शानसंस्थेनेही मुस्लिमांनाच लक्ष्य केलं. रामाचं नाव घेऊन बाबरी मशिद हा एक हिंदू-मुस्लिम अस्मितेचा मुद्दा बनवण्यात आला. रामाप्रमाणे रथातून अडवाणी यांनी सुरू केलेली यात्रा अयोध्येमध्ये बाबरी मशिदीच्या जागी राम मंदिर उभारण्यासाठी नव्हती ती होती मुस्लिमविरोधाची पेरणीकरून सत्तेची फळे चाखण्याकरिता. रामाचं नाव वापरून बहुसंख्यांक हिंदूंना मुस्लिमांविरोधात उभं करण्याचं काम या रथ यात्रेने केलं. त्यातून देशामध्ये हिंदू-मुस्लिम दंगे उसळले आणि दोन्ही समाजांमध्ये असलेली दरी आणखी दृढ झाली.
टीव्हीवर रामायण मालिकाही याच १९८७-८८ च्या काळामध्ये आली होती. या मालिकेच्या माध्यमातूनही लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात हिंदूत्वाची भावना तीव्र करण्यात आली कारण मालिका मध्यम वर्गीय घरातील पुरुषच नव्हे तर बायका, मुलं, वयोवृद्ध यांनीही पाहिली. इतिहास तज्ज्ञ रोमिला थापर यांनीही त्यावेळी हे दाखवून दिलं होतं की, रामायण अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारे लिहिलं असतानाही आपल्या विचारधारेशी मिळतंजुळतं असं तुलसीदासाची रामचरितमानस ही कथा याकरिता मुद्दाम निवडण्यात आली. कारण त्याद्वारे भाजप, संघविचारसरणीला आपला असा एक धार्मिक कार्यक्रम राबवायचा होता. या मालिकेमुळे रामाचा जन्म अयोध्येला झाल्याचं लोकांच्या गळी उतरवण्यात आलं आणि रामजन्मभूमीचा वाद चिघळत ठेवण्यात हिंदुत्ववाद्यांना यश आलं. पण याचं फळ भाजपला मात्र १९९९ मध्ये मिळालं. त्यांचे तब्बल १८३ खासदार निवडून आले. रामाला प्रतिक बनवून सत्ता मिळवण्यात भाजपला यश आलं. या धार्मिक राजकारणामध्ये देशात मात्र कायमस्वरुपी तेढ निर्माण झाली. त्याची तीव्रता सध्याची काळात एवढी जास्त आहे की, एका बाजूला मुस्लिम लव्ह जिहाद आणि गोमांस खाल्ल्याच्या आरोपावरून मारले जात असतानाही मोदींचा भाजप अगदी ग्रामीण पातळीवरही निवडून येताना दिसतो.
अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांनी रामायण आणि आजच्या काळाचा संबंध जोडताना बाबरी मशिदीच्या वादावर एक उत्तम विश्लेषण केलं आहे. त्यांच्या मते, दुसऱ्याच्या समूहातील लोकांच्या ताब्यातली जागा जबरदस्तीने आपल्या ताब्यात घेणं यासाठी रामाच्या प्रतिकाचा वापर करण्यात आला. त्यामुळे दुसऱ्या समूहातील लोकांच्या धार्मिक जागा उद्ध्वस्त करण्याचा परवानाच एकप्रकारे एका विशिष्ट समाजाला मिळाला. रामाच्या प्रतिकांचा वापर वेगवेगळ्या प्रकारे सुरूच आहे. अगदी अलीकडेच केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी २०१४ मध्ये “रामजाद्यांना मत द्या हरामजाद्यांना नाही,” असं सांगून रामाला न मानणारे सगळेच अनौरस ठरवून टाकले होते. भाजपचे खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी राम सेतू हा मानवनिर्मित असून तो केवळ पौराणिक कथा नाही म्हणून सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिकाही दाखल केली आहे. रामसेतूवर या संकल्पनेविषयी अनेकदा संशोधन झालं आहे. अगदी द्रमुक नेते आणि तत्कालीन तामिळनाडूचे मुख्यमंत्री एन. करुणानिधी यांनी राम कोण होता इथपासून प्रश्न विचारत तो कोणत्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकला होता, त्याने सेतू कधी बांधला असे प्रश्न उपस्थित करत राम सेतू या मिथकाची उघडपणे खिल्ली उडवण्याचं धारिष्ट्य दाखवलं होतं. कारण रामाचा ज्याप्रमाणे प्रभाव उत्तर किंवा मध्य भारतात आहे तसा दक्षिण भारतात नक्कीच नाही. दक्षिण भारतातलं रामायण वेगळं आहे ते सीतेला रावणाची मुलगी असल्याचं सांगतं आणि रामापासून तिचं संरक्षण करण्यासाठी तो तिला घेऊन गेल्याचं वर्णन करतं. पण रामायणाचे असे अनेक पैलू दाबून सोयीस्कररित्या वैदिक रामायणात लोकांना वर्षानुवर्षं बांधून ठेवण्यात आलं आहे. ए. के. रामानुज यांचा “थ्री हंड्रेड रामायणास” हा निबंध दिल्ली विद्यापीठामध्ये अभ्यासक्रमाला लावल्याबद्दलही हिंदूत्ववाद्यांनी २००८ मध्ये विरोध केला होता. रामायणाची देशभर आणि आशिया खंडामध्ये पसरलेली विविध रुपं, कथा यांचा अभ्यास करून हा निबंध लिहिला आहे. त्यातून रामायणाचं खरं स्वरूप जगासमोर येईल म्हणून हिंदुत्ववाद्यांनी त्याला विरोध केला.
वैदिक रामायणातील उदाहरणं देऊन बहुजनांच्या मनामध्ये रामाची विशिष्ट प्रतिमा कोरण्यात आली. सर्वगुण संपन्न, मर्यादा पुरुषोत्तम, न्यायी, प्रसंगी राज्यकारभारामध्ये पत्नीलाही दुय्यम स्थान देणारा, सहनशील, आज्ञाधारक अशा रामाच्या उभ्या केलेल्या प्रतिमेमध्ये बहुतांश पुरुष स्वतःला पाहू लागतत. राम राजा असल्याने त्याच्या नावाखाली करण्यात आलेली प्रत्येक गोष्ट ही योग्यच असते. बाबरी मशिद उद्ध्वस्त करण्यासारखे गुन्हेही देशामध्ये रामाच्या नावाने खपून गेले. रामाची धनुष्यबाण घेतलेला एक वीर पुरुष अशी प्रतिमा राम जन्मभूमी वादाच्या वेळी विश्व हिंदू परिषदेने पुढे आणली. प्रत्यक्षात रामायणाच्या शेवटी केवळ रावणाशी तो एक युद्ध करतो. दृढ रामायणातल्या कथा आणि प्रसंग पाहिले तर आधुनिक युगातील राज्यकारभाराच्या दृष्टीने त्यातील अनेक मुल्यांवर प्रश्नचिन्ह उभं राहतं. मात्र हे प्रश्नच पुढे येऊ न दिल्याने रामाच्या नावाखाली हिंदुत्ववाद हीच विचारधारा म्हणून राजकारणामध्ये पुढे आणण्यात आली. त्यामुळे बाकीचे सर्व त्याच्यापुढे दुय्यम झाले. याचा आणखीही एक परिणाम असा झाला की, वैविध्याने नटलेल्या हिंदू धर्मामध्ये एकसाचीपणा आणण्यात हिंदुत्ववाद्यांना काही प्रमाणात यश आले. हिंदू धर्मामध्ये इस्लाम किंवा ख्रिश्चन धर्मांप्रमाणे एक देव, एक पुस्तक, एक विचारसरणी असं नाहीये. अनेक तज्ज्ञ तर आजही हिंदू ही जीवनशैली असल्याचे मानतात. अशा विस्कळीत धर्माला, इथे असलेल्या असंख्य देवांना, त्यांना पुजणाऱ्या हजारो छोट्या मोठ्या समूहांना, विविध जातींना केवळ रामाच्या नावाखाली एका फटक्यात हिंदुत्वाचं लेबल चिकटवून टाकण्यात आलं. त्याचा परिणाम सध्या सर्वत्र दिसतो आहे. मुस्लिमांच्याविरोधात हिंदुत्वाच्या नावाखाली लोकांना जात विसरून एकवटवणे काही काळ तरी शक्य होते. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, सनातन संस्था, हिंदू जागरण वेदिके अशा अनेक हिंदुत्ववादी संघटना या खरंतरं ब्राह्मणेतर बहुजन जातींतील लोकांच्या जनाधारावरच उभ्या राहिल्या आहेत. कारण ब्राह्मणशाही व भांडवलशाही हे या देशातील दलित बहुजनांचे खरे शत्रू आहेत हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले विचार त्यांच्यापर्यंत पोहोचलेले नाहीत, त्यांच्या जाणिवा व नेणिवांचे ब्राह्मणीकरण झाले आहे. एकुणात काय तर रामाच्या नावाने विद्वेश पसरविण्यासाठी आणि राजकीय पोळी भाजण्यासाठी निघणारी कोणतीही यात्रा ही सामाजिक सलोख्याच्या दृष्टीने गंभीरच आहे. जेव्हा रामायण आणि रामामध्ये अडकलेल्या जाणीवा आणि नेणिवांमधील ब्राह्मणी अधिसत्तेसमोर प्रत्यक्ष जिवनातील प्रश्न द्वंद्व उभे करतील तेव्हा जनता प्रश्न विचारणं थांबवणार नाही आणि मिथकांचं राजकारण कोसळून पडेल.
3 Comments
खूप अभ्यासू विवेचन आहे श्रुती.धन्यवाद.
खूप अभ्यासू विवेचन आहे श्रुती.धन्यवाद.
मला नेहमी एक प्रश्न पडतो,’शूर्पणखेचे लक्ष्मणाने नाक कापल्यावरच्या रावणाच्या कृतीचे उदात्तीकरण रावणाने सीतेचे अपहरण केल्यावर रामाने केलेल्या कृतीचे जेवढे उदात्तीकरण झाले तो न्याय रावणाला का मिळाला नाही?’
Pingback: The Myth Called Ram | shrutisgblog