fbpx
राजकारण

आगे-आगे देखिए, होता है क्या

गुजरात निवडणुकीत काय होणार याची देशातील प्रत्येकालाच उत्सुकता लागून राहिली आहे. या निवडणुकीत एकीकडे मोदी यांच्या नेतृत्वाखालील प्रचार यंत्रणेने सालाबादाप्रमाणे ही गुजरातची निवडणूक नसून हे भारत-पाकिस्तान युद्धच सुरू असल्याचा प्रचार सुरू केला. यात अर्थातच प्रखर देशाभिमानी, राष्ट्रवादी भाजप व परिवारातील सर्वजण हे भारत असून त्यांच्या विरोधातील काँग्रेसपासून ते डाव्यांपर्यंत सगळे पाकिस्तानच्या भूमिकेत असल्याचे भाजपने स्वतःच ठरवून टाकलेले आहे. दुसरीकडे काँग्रेसने गेल्या २२ वर्षांचा गुजराती जनतेवर असलेला हिंदुत्वाचा हँगओव्हर उतरलेला नसल्याचे मानून मवाळ हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे. राहूल गांधी हे शिवभक्त आहेत. केवळ तेच शिवभक्त नसून त्यांचे अख्खे कुटुंबच शिवभक्त असल्याचे त्यांच्या पक्षाचे नेते, उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार राज बब्बर यांनी सांगून टाकले आहे. त्यावर अखिल भारतीय काँग्रेसचे प्रवक्ते रणदिप सुरजेवाला यांनी तात्काळ, राहूल गांधी हे केवळ हिंदूच नसून ते जानवेधारी हिंदू असल्याचे ताठ मानेने ट्वीटही करून टाकले आहे.
एकंदर हिंदुत्ववाद, हिंदू धर्म, भारत, पाकिस्तान, लव्ह जिहाद, समाननागरी कायदा, याच मुद्द्याभोवती विकासपुरुषांच्या होमग्राऊंडवरची ही निवडणूक फिरू लागली आहे. अरे हो, भाजपचे एक तेजतर्रार नेते विनय कटियार यांनी दिल्लीतील बाबरी मशिद ही पूर्वी जमुना मंदिर असल्याचा एक नवा ऐतिहासिक दावाही या निवडणुकीच्या रणधुमाळीत केला आहे. अयोध्या तो झांकी है, काशी, मथुरा बाकी है, या घोषणेत आता दिल्लीही बहुदा जोडली जाणार असल्याचेच हे सुतोवाच आहे, हे मानायला आता हरकत नाही.
गुजरातमधील पटेल आंदोलन, हार्दिक पटेल यांच्या सभांना मिळणारा लाखोंचा प्रतिसाद, त्याचवेळी संपूर्ण देशात ज्यांच्या जाज्वल्य भाषणांनी तरुण, म्हातारे, स्त्रिया, पुरुष, मुले, मुली यांच्या अंगावर रोमांच उभे राहातात, ज्यांच्या भाषणांनी मना-मनात विरश्री फुलून येते, त्या विरश्रीचा अनेक अभ्यासू मग फेसबूक, ट्वीटर, व्हॉट्सअप आदी सोशल मिडियावर अविष्कार दाखवतात व काही राजस्थानातील राजसमंदमधील शंभुलाल रैगरसारखे लोक या जाज्वल्य विचारांनी प्रेरित होऊन अफराजूलला कुऱ्हाडीने कापून काढतात, त्याच्यावर सोबत आणलेले रॉकेल वगैरे ओतून खिशातील काडेपेटी काढून पेटवून देतात व त्याचवेळी त्याचा स्मार्टफोनवर पंधरा वर्षाच्या मुलाकडून व्हिडिओही काढून घेतात, वर देशातील तमाम भारतीयांना एक संदेशही देतात, की मला जे वाटले ते मी केले, चांगले केले की वाईट ते तुम्ही ठरवा, अशा आशयाचा… तर ज्यांच्या भाषणांनी अशा विविधांगी विरश्री असंख्यांच्या मनात फुलतात ते देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांना मात्र अगदीच तुटपुंजा प्रतिसाद मिळतो आहे.
ज्या पालनपूर येथील सभेत त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि माजी उपराष्ट्रपती हमिद अन्सारी यांच्यावर पाकिस्तानशी संधान बांधून देशातील लोकनियुक्त सरकारच्या विरुद्ध कटकारस्थान केल्याचा घणाघती आरोप केला, त्या सभेतील उपस्थिती देखील अशा रोमांच उभ्या राहणाऱ्या त्यांच्या फॅनक्लबसाठी मन निराश करणारी, अगदी एखाद वेळेस मन विषण्ण करणारी वगैरच होती.
हे सगळे पाहता, गुजरातमध्ये १८ डिसेंबरला नक्की काय होणार, याची उत्सुकता नक्कीच सगळ्यांना असणार यात वाद नाही. गुजरात हे काय केवळ मोदींचे होम पीच आहे, असे नव्हे. ती संघाची प्रयोगशाळाही आहे. याच प्रयोग शाळेत गोधरा हत्याकांडानंतर अत्यंत भयंकर दंगे झाले होते. ते घडविले गेले होते, असा काहींचा आरोप आहे. अगदी तेव्हा गुजरातच्या पोलीस सेवेत असलेल्या संजीव भट यांच्यासारख्या आयपीएस अधिकाऱ्यांचाही. पण ते असो. तर याच प्रयोगशाळेत एहसान जाफरी नावाच्या काँग्रेसच्या माजी खासदाराला जे राजसमंदमध्ये अफराजूलला ज्या पद्धतीने आधी कुऱ्हाडीचे घाव घालून मारून नंतर पेटवून दिले, त्याच पद्धतीने तुकडे तुकडे करून मारले गेले होते. (किंबहुना त्या राजसमंजमधील शंभुलालची प्रेरणही याच प्रयोगशाळेतील प्रयोगांवरूनच घेतलेली असू शकते) आधी जाफरींचे पाय तोडले, मग हात मग त्या तडफडणाऱ्या धडावर काहींनी लघुशंका केली व नंतर मग ते पेटवले, अगदी व्यवस्थित त्या तडफडणाऱ्या धडावर टायर वगैरे टाकून, हे सर्व त्यांच्या पत्नी इमारतीच्या आगाशीत उभे राहून पाहात होत्या. बिचाऱ्या काहीही करू शकल्या नाहीत. न्याय व्यवस्थेकडूनही त्यांना न्याय न मिळाल्याचीच त्यांची भावना आहे. तर अशा या वर्षा नु वर्षांच्या हिंसेच्या विविध सर्जनशील प्रयोगातून घडलेले जनमानस असे सहजगत्या बदलेल काय, हा मोठाच प्रश्न आहे.
दुसरीकडे गुजरातमधील सर्वात मोठी शेतकरी जात असलेल्या पटेलांना सध्याच्या अर्थकारणात त्यांचे भवितव्य फारसे चांगले दिसत नाही. शेतमालाला भाव नाही. देशातील बहुतांश भुईमुगाची भूक भागवणारे आणि कापसाची गरज पूर्ण करणारे हे शेतकरी आहेत. एकेकाळी अत्यंत सधन समजले जाणारे, महाराष्ट्रातील सिंचन पट्ट्यातील ऊस उत्पादकांप्रमाणेच. मात्र जागतिकीकरणाने असा काही काळ आणला आहे, की एकेकाळच्या या सधन शेतकऱ्यांना अगदीच गरिबी रेषेच्या खाली लोटल्याचेच लक्षात यायला लागले आहे. त्यामुळे ते कुठे मराठा, कुठे पटेल, कुठे जाट म्हणून जातीच्या नावाखाली एकवटत आहेत. गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन यांचा पक्षांतर्गत राजकारणात काटा काढण्यासाठी सुरुवातीला भाजपच्याच काही धुरीणांनी हवा देऊन हे आंदोलन वाढवल्याची चर्चा होती. खरेखोटे माहित नाही. मात्र कालांतराने हे आंदोलन काही त्यांच्या हातात राहिले नाही इतके नक्की. एखादे जनआंदोलन सुरू करणे सोपे असते मात्र ते थांबविणे हातात राहात नाही. कुरुक्षेत्रातील अभिमन्यूसारखाच हा प्रकार असतो, चक्रव्यूहात शिरणे माहित असते बाहेर पडण्याची क्लृप्ती समजून घेतलेली नसते.
पटेल आंदोलनाला हिंसक वळण लागले. पोलिसांनी गोळीबार केला. तिथेही नक्की काय झाले माहित नाही. पटेलांची विशाल रॅली संपली आणि सहा वाजताच वीज बंद केली गेली. मग जमावातून पोलिसांच्या दिशेने एक दगड भिरकावला गेला आणि गोळीबार केला गेला, असे वार्तांकन काही ठिकाणी प्रसिद्ध झाले आहे. यात काही पटेल तरुणांचा मृत्यू झाला. पाकिस्तानात बहुतांश मुस्लिम राहातात. त्यामुळे भारतातील मुस्लिमही त्यांचे भाऊबंदच आहेत. भारतातील मुस्लिम इथले खातात आणि निष्ठा तिथे वाहतात, अशा राजकीय विचारांवर पोसलेल्या अनेकांना हे नक्की कसे काय झाले त्याचे राजकीय अन्वयार्थ लावता आले नाहीत. कारण पटेल तर पाकिस्तानात राहात नाहीत. ते तर फक्त गुजरातमध्येच राहतात. फारफार तर अमेरिकेत, कॅनडात किंवा युरोपात राहतात. वर्षानु वर्षे प्रयोगशाळा उभी करण्यासाठी यातील अनेकांनी तन मन धनाने मदत केलेली आहे. अगदी विश्व हिंदु परिषदेचे तेज तर्रार नेते डॉ. प्रवीणजी तोगडिया हे देखील पटेलच आहेत. असे सगळे असताना एकदम पटेलांवरच गोळीबार?
प्रकरण चिघळले. ज्याचे वय निवडणुकीलाही उभे राहण्याइतके नाही त्या हार्दिकला पटेल याला समाजाने रातोरात नेता बनवून टाकले. त्याच्या एका हाकेसरशी लाखो पटेल तरुण रस्त्यावर येऊ लागले. हार्दिकवर सरकारने गुन्हे दाखल केले. गुजरातमध्ये बंदी घातली. पण फरक पडला नाही. एका विषाला दुसरे विष कापते, असा जंगलचा कायदा असतो. धर्माच्या विषाला जातीचे विष कापत राहते. हार्दिकने झंझावात उभा केला. दुसरीकडे अल्पेश ठाकोरने स्वतःच्या ओबीसी ठाकोर जातीला एकवटवले. जिग्नेश मेवाणीने उनामध्ये गोरक्षकांनी दलितांना केलेल्या मारहाणीच्या विरोधात जोरदार आंदोलन केलेच होते. या त्रिमुर्तीचा झंझावात भाजप व विशेषतः प्रयोगशाळेतील प्रयोगशील स्वयंसेवकांच्या लक्षात यायला वेळ गेला नाही. त्यांनीही त्या दृष्टीने बांधणी केली. पन्ना इन्चार्ज नावाचे नवे पद काढले. निवडणूक यादीतील प्रत्येक पानाचा एक प्रमुख नेमला. त्या पानावर जितकी तीस पस्तीस मतदारांची नावे असतील, त्यांच्या कायम संपर्कात राहायचे. त्यांचे या तिघांच्या झंझवताने मनपरिवर्तन वगैरे झाले असेल, तर त्यांच्यात जाज्वल्य विचार ठासून भरायचे. मोदीजींप्रमाणे कदाचित शक्य होणार नाही, मात्र त्यांच्यात अंगार फुलवण्याच्या वगैरे जवाबदाऱ्या त्यांना वाटून दिल्या गेल्या. त्यामुळेच गुजरात निवडणुकीचे वार्तांकन करायला गेलेल्या देशभरातील विविध पत्रकारांमध्येही प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे. अगदी घरटी प्रत्येक व्यक्तीविषयी माहिती असलेली शिस्तबद्ध कार्यकर्त्यांची फौज विरुद्ध खदखदणारा असंतोष अशी ही लढाई उभी राहिली आहे. हा असंतोष आर्थिक असला तरी त्याचा अविष्कार हा सांस्कृतिक पातळीवरच दिसतो आहे. पुन्हा त्या अविष्काराचा थेट फायदा होणार आहे तो काँग्रेस या एकमेव व त्यातल्यात्यात शक्तीशाली विरोधी पक्षाला. त्यातही त्या पक्षाने आत्ताच आपले उपाध्यक्ष राहूल गांधी यांना अध्यक्ष केले आहे. या निवडणुकीतील त्यांची भाषणे, या असंतोषाला ते आपल्या भाषणातून देत असलेली हवा, त्यांची रणनिती यामुळे त्यांची यापूर्वी केलेली पप्पूची प्रतिमा पुसून टाकणारा असाच आहे. त्यामुळे नक्की होणार काय? रिकाम्या खुर्च्यांपुढे जाज्वल्य विचार देणारे मोदीजी या शिस्तबद्ध फौज व त्यांच्याप्रती लोकांच्या मनात असलेल्या एका हळुवार कोपऱ्याच्या जीवावर बाजी मारणार की, हा खदखदणारा असंतोष एखाद्या मृत ज्वालामुखीप्रमाणे अचानक १८ तारखेला धाडकन मतदान यंत्रांतून फुटून बाहेर येणार हे, भल्या भल्यांना समजेनासे झालेले आहे.
त्यामुळे १८ तारखेला काय होणार याबाबत प्रचंड संभ्रम असला तरी एक गोष्ट मात्र पक्की आहे, ती म्हणजे निकाल काहीही लागला तरी, देशातील कोट्यवधींच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या मोदीजींच्या विरोधात सुर उमटू शकतो, त्यांना विरोध केला जाऊ शकतो, लोक त्यांच्या विरोधात रस्त्यावर येऊ शकतात, हे या निवडणुकीच्या निमित्ताने सिद्ध झाले आहे.
मोदीजींच्या पाठीशी अवाढव्य जनमानस असल्यामुळे विरोधक तर सोडाच त्यांच्याच पक्षातदेखील कोणीही ब्र काढण्याची देखील हिंमत ठेवत नव्हता. आता मात्र परिस्थिती तशी राहिलेली नाही. यशवंत सिन्हांसारखे नेते केवळ मोदींवर शाब्दिक फटकारे ओढत नाहीत तर डिसेंबर महिन्यात विदर्भातील आकोल्यात येऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करतात. विदर्भातल्या डिसेंबरमधील थंडीत झाडाच्या पाराखाली झोपतात. फडणवीस व पर्यायाने मोदींनाच आव्हान देतात. शत्रूघ्न सिन्हा यांनीतर मोदींना न जुमानण्याचा जणू वीडाच उचलल्यासारखे ते गेली दोन अडिच वर्षे बोलत आहेत. नाना पटोलेंसारखा एक साधा खासदार थेट आपल्या लोकसभा सभासदत्वाचा राजीनामाच फेकतात. अरुण शौरींसारखे एकेकाळचे भाजपचे केंद्रीय मंत्री उघड उघड मोदींच्या विरोधात भूमिका घेतात. त्यामुळे निवडणुकीचा निकाल काहीही आला, तरी पक्षांतर्गत व देशांतर्गत एकचालकानुवर्ती पद्धतीच्या विरोधात जनमत एकवटणार यात काहीच वाद नाही. विजय समजा शिस्तबद्ध प्रयोगशीलतेचा झाला, तरीही यापुढे मोदीजी व त्यांच्या नेतृत्वाखालील भाजप यांच्या विरोधातील असंतोष केवळ मनातल्या मनात खदखदत राहणार नाही, हेच या निवडणुकीतून सिद्ध झाले आहे. संसदीय लोकशाहीत अंकगणित महत्त्वाचे असते, तसेच त्याचे राजकीय व सामाजिक आयामही तितकेच महत्त्वाचे असतात. कांशीराम म्हणत पहिले हम हारने के लिए खडे होते है, बाद मे हराने के लिए और उसके बाद जितने के लिए… त्याच पद्धतीने या निवडणुकीचा अन्वयार्थ लावावा लागेल. या निवडणुकीतील अंकगणित काहीच कामाचे नाही, असे म्हणण्यात अर्थ नसला, तरी या निवडणुकीने गेले साडेतीन वर्षे देशात जी राजकीय संस्कृती रुजविण्याचा जीवापाड प्रयत्न शिस्तबद्ध प्रयोगशील स्वयंसेवक करत आहेत, त्याच्या विरोधात देशभरातील अनेकजण उभे राहण्याची एक दिशा स्पष्ट होताना दिसते आहे. समजा निकाल शिस्तबद्ध प्रयोगशीलतेच्या विरोधात गेलेच, तर मग त्या फुटलेल्या ज्वालामुखीतून वाहणारा लाव्हा गुजरातमधून किती दिशांना वाहात जाईल हे सांगता येत नाही. तो दक्षिणेला, महाराष्ट्र, कर्नाटक करत पार केरळपर्यंत पोहोचेल उत्तरेला, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान करत दिल्लीत घुसेल आणि पुर्वेला बिहार, ओरिसाकरत आसाममध्ये घुसेल किंवा कसे, हे सांगता येत नाही, लाव्हा चटकन थंड होत नाही म्हणतात. तसेच तो त्याच्या वाटेत येणाऱ्याला वर्षा नु वर्षांसाठी आपल्या उदरात गडपही करतो. हजारो वर्षांनी जेव्हा उत्खनन होते, तेव्हा हे अश्मावशेष सापडतात, हे या निमित्ताने लक्षात घ्यावे लागेल.

राईट अँगल्स Editorial Board

Write A Comment