fbpx
अर्थव्यवस्था

बीबीसीच्या डोसानॉमिक्समध्ये राजन यांचे पुस्तक बसवणे हा सवंगपणाचा कळस !

या पुस्तकातली सर्वात वाचनीय  गोष्ट -म्हणजे ‘ताजा कलम’-पोस्ट स्क्रिप्ट . प्रत्येक व्याख्यानाच्या शेवटी (आणि काही ठिकाणी सुरुवातीला ) राजन  यांनी अतिशय चातुर्याने करूनही न केलेली टीका आहे . ‘समझनेवालोंको इशारा ही काफी है ‘कॅटेगरीतली ही टीका वाचणे हा ह्या पुस्तकातला सर्वात मजेचा भाग . उदाहरणच द्यायचे झाले तर – २ फेब्रुवारी २०१५ला गोव्यात डी .डी. कोसंबी व्याख्यानमालेत दिलेले भाषण – या भाषणांत त्यांनी एका सशक्त लोकशाहीचे १.सामर्थ्यशाली (स्ट्रॉंग ) सरकार २. कायदा आणि सुव्यवस्थेचे राज्य (rule of law ) आणि ३.लोकशाही उत्तरदायित्व (democratic accountability ) हे तीन आधारस्तंभ असतात हे फुकुयामाचे वाक्य उद्‌धृत केले आहे . त्याचे विवेचन करताना अर्थातच हिटलरचा उल्लेख येतो- सामर्थ्यशाली सरकार त्याचेही होते  खरेतर या भाषणात आक्षेपार्ह असे काहीच शोधता येत नाही पण ताजा कलम मध्ये राजन लिहितात-“या भाषणातले एक नाव वादग्रस्त ठरले ते म्हणजे -हिटलरचे .जर समाज माध्यमे त्याचा वेडावाकडा अर्थ लावतील हे मला जर माहित असते तर ते नाव मी वगळले असते. हे भाषण ,भारताच्या एकंदरीत त्रुटी कशारितीने कमी करता येतील , यावरील भाष्य होते- कोणतेही एक सरकार डोळ्यासमोर ठेऊन केलेली ती टीका नव्हती. मी या भाषणातून , सामर्थ्यशाली सरकार ,विशेषत: विद्यमान सरकारविषयी इशारा दिला असा त्याचा अर्थ काढला गेला . पण तरीही मी माझ्या भाषणातून निघू शकणाऱ्या साऱ्या इतर अर्थाना टाळू शकीन असे भाषण करू शकत नाही ”

सुप्रिया सरकार

गॅस पेटवून , तो मंद आचेवर करून त्यावर ठेवलेला तवा. त्या गरम तव्यावर ,एक डावातून  पीठ पसरले जाते .-त्या पीठावर अक्षरे उमटतात –

“ह्या ‘डिशचे ‘ इकॉनॉमिक्सशी काय घेणे आहे ?”

-भारतीय डोसा ,भारतीय साऊथ इंडियन इकॉनॉमिस्ट रघुराम राजन ह्यांची हि मुलाखत असल्यामुळे पार्श्वसंगीत अर्थातच तबल्याचे आहे- सोबत ” रघुराम राजन ह्यांचे वर्णन ,रिझर्व्ह बँकांच्या गव्हर्नरपदी तीन वर्षांसाठी असताना ‘रॉकस्टार ‘ असे केले जाई . आम्ही त्यांना ,त्यांच्या कमी महागाई खरंच इतकी चांगली का असते ह्या त्यांच्या सिध्दान्ताविषयी विचारले “अशी अगाध प्रस्तावनाही  आहे 

मग रघुराम राजन ,भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर ‘डोसा इकॉनॉमिक्स ‘ (नॉमिनल इंटरेस्ट रेट  कमी झाला,तरी महागाई कमी असेल तर रिअल रेट  जास्त मिळेल, असे कसनुसं हसत समजावतात (बँकेत ठेवलेल्या पैशावरचे व्याजदर  कमी झाल्याने कमी झाले तरी महागाई कमी असेल तर व्याजातून जास्त वस्तू  विकत घेता येतील हे कोणीही समजून घेऊ शकतो ) ह्या तब्बल १२९ सेकंदाच्या व्हिडिओत ,फक्त ३६ सेकंद डॉ .रघुराम राजनना त्यांचे उदाहरण समजावण्यासाठी मिळतात . उरलेले ९३ सेकंद डोसा ,डोसा खाणाऱ्या मुली ,मसाला डोसा , डोसा विक्रेता, गुंडाळल्या डोश्याचे ग्राफिक ,स्क्रीन भरून डोसे , डोश्याच्या वेगवेगळ्या किमतीनुसार किती डोसे विकत घेता येतील त्याच्या निरर्थक आलेख असे काहीबाही दाखवणारी दृष्ये आहेत. हे इतर कुठे बघितले  असते  तर  नवशिके असतील , म्हणून सोडून देताही  येऊ शकेल. एका भाषणात दिलेल्या डोश्याच्या उदाहरणापासून , डोसा रघुराम राजनांची पाठ सोडायलाच तयार नाही, अनेक ठिकाणी डोश्याचे उदाहरण, प्रश्नोत्तरांत आणि भारतीय माध्यमावर त्यांना आणावे लागले असले तरी ,चुकीच्या प्रश्नाच्या प्रस्तावनेसह ,पूर्णत: निरर्थक आणि निर्बुद्ध व्हिडीओ बनवारी बी.बी .सी -इंडिया ही पहिलीच नामांकित संस्था असावी. त्यांच्याच बाकी व्हिडिओत असा गलथानपणा दिसत नाही. मग असे का ?

एक तर बी बी सी इंडियाच्या मते भारत बालबुद्धी, निर्बुद्ध लोकांचा देश असावा आणि इथल्या डोसा ओरपून ,तबला वाजवणाऱ्या जनतेला अलीकडेच कमी महागाई चांगली कशी काय बुआ हा प्रश्न पडला असावा. आणि मग त्या देशातल्या सर्वात सुविद्य अशा रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरने (सगळ्या जगाला माहित असलेली माहिती -डोश्याचा सिद्धांत म्हणून मांडली ,आणि ती सगळ्यांना नीट समजावी म्हणून त्यांनी डोश्याच्या दृष्यासह सर्व जगासमोर नेली.

पण आताच बी बी सी इंडियाला रघुराम राजन ह्यांची  त्यांची आठवण व्हायचे काय कारण असावे तर त्यांचे नुकतेच प्रसिद्ध झालेले पुस्तक –‘I am Raguram Rajan. I do what I do’. ह्या पुस्तकात रघुराम ह्यांच्या रिझर्व्ह बँकेच्या कार्यकाळात त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी दिलेली अभ्यासपूर्ण भाषणे आहेत, आंतरराष्ट्रीय घडामोडींविषयी भाष्य आहेत. आपल्या अर्थशास्त्राच्या, वित्तक्षेत्राच्या अभ्यासाचा वापर आपल्या मातृभूमीसाठी करत त्यांनी अवघड काळातून भारतीय अर्थव्यवस्थेला पार केले. भारताच्या रिझर्व बँकेच्या प्रमुखपदी विराजमान होण्याआधी त्यांनी , आयएमएफ च्या प्रमुख इकॉनॉमिस्ट या पदावर काम केले .२००५ मध्ये , सर्व जगातले अर्थतज्ञ ,चांगल्या भविष्यकाळाची चित्रे रंगवण्यात गुंतलेले असताना , Jackson Hole येथे भरलेल्या सर्वोच्च बँकर्स आणि आणि अर्थतज्ज्ञांच्या परिषदेत, भावी काळात येऊ घातलेल्या आर्थिक संकटाविषयी वेळेअगोदर त्यांनी भाकित केले होते . त्याकाळच्या उन्मादी वातावरणात ह्या भाकिताकडे दुर्लक्ष झाल्याची जाहीर कबुली आयएमएफच्या प्रमुख , क्रिस्टीन लागार्ड ह्यांनी दिली होती. तर सांगायचा मुद्दा असा , की ज्यांना येणाऱ्या अशुभ काळाची चाहूल आपल्या अभ्यासातून लागली होती अशा गिन्याचुन्या तज्ज्ञांच्या पुस्तकातील एक खूपच कमी  महत्वाचा परिच्छेद घेऊन त्याला फुटेज  देण्यामागे काय कारण असेल बरे? डेमॉनिटायझेशनविषयी पूर्वीच प्रश्नोत्तरातुन दर्शविलेला विरोध ,उत्तम कारकीर्द असून न मिळालेली मुदतवाढ ,रिझर्वबँकेच्या गव्हर्नरपदी असताना घेतलेले प्रस्थापित व्यवसायिकांना त्रासदायक ठरलेले निर्णय, भारतीय अर्थव्यवस्थेविषयी रघुराम राजननी पाळलेले मौन, त्यांची परखड मत मांडण्याविषयी असणारी ख्याती लक्षात घेता , ह्या पुस्तकाचे सर्व स्तरातून स्वागत होणे स्वाभाविक होते . पूर्वी रिझर्व बँकांच्या कामकाजात फारसा रस नसणारा सामान्य नागरिक ही आता नोटबंदीनंतर अर्थव्यवस्थेत लक्ष घालू लागला आहे . असे असल्यामुळे ह्या पुस्तकात असे काही असावे का की ज्या गोष्टींवरून लक्ष्य हटवण्यासाठी असे  व्हिडिओ बनवले गेले असावेत ? पण ह्या इतक्या मोठ्या तज्ज्ञाने इतक्या साध्या प्रश्नाचे इतक्या विनयाने आणि उत्साहाने  उत्तर द्यावे ह्या मागची मनोभूमिका त्यांच्याच ह्या  नव्या पुस्तकातल्या एका भाषणात सापडते . आयआयटी दिल्लीच्या दीक्षांत समारंभाच्या भाषणातून रघुराम राजन म्हणजे कोण हे समजते .ह्या भाषणात ते नोबेल पुरस्कारप्राप्त ‘रिचर्ड फेनमन’ ह्या भौतिकशास्त्रज्ञाचे उदाहरण देतात ,ज्या संस्थेत हा भौतिकशास्त्रज्ञ काम करे तिथले वातावरण त्याला घुसमटवून टाकणारे वाटे . कारण माहिती आहे ?- साध्या प्रश्नातून मूलभूत धारणांविषयी पुनर्विचार करायला लावणारे विद्यार्थी त्या संस्थेत नव्हते -तिथे सगळे वेगवेगळ्या विषयातले तज्ञ. त्यामुळे विद्यार्थी नाहीत ही त्याची खंत होती आणि एका उत्तम शिक्षकाचे आणि तितक्याच उत्तम विद्यार्थ्यांचे हे लक्षण आहे . ह्या चांगल्या शिक्षकाच्या खुणा ह्या साऱ्या व्याख्यानातून दिसत राहतात . वरकरणी साध्या वाटणाऱ्या गोष्टी हा शिक्षक श्रोत्यांच्या पातळीनुसार समजावून सांगतो (अशाच एका भाषणातून संदर्भरहित उचललेला  ‘डोसा -नॉमिकस’ – केवळ त्या मुद्द्याला धरून ह्या पुस्तकात काय असणार म्हणून -‘सुशिक्षित’ लोकांनी दुर्लक्ष करू नये म्हणून हा लेख )

राजन ह्यांनी आपल्या रिझर्वबँकेच्या कारकिर्दीत अनेक गोष्टी साध्य  केल्या . अस्थिर भारतीय चलनातं स्थिरता आणली .महागाई निर्देशांक डबल डिजिट रेट्स वरून ६ टक्क्यांवर आणला. तोट्यात जाणाऱ्या सरकारी बँकांचे स्वास्थ्य सुधारण्यासाठी ठोस पावले उचलली .बँकिंग सेक्टर मधल्या नॉन-परफॉर्मिंग अससेट्सना म्हणजे ज्या कर्जाची परतफेड होणे कर्जदारांकडून शक्य नाही अशा कर्जांचे वर्गीकरण करायला लावली . अशी कर्जे घेऊन मुद्दामून बुडवणाऱ्या , वेगवेगळ्या बँकेतून कर्जे घेऊन परतफेडीच्यावेळी  बँकांना खेटे घालायला लावणाऱ्या , घेणेकऱ्यात स्पर्धा लावून देणाऱ्या अशा अनेक बड्या धेंडांची एक केन्द्रीय यादी बनवून त्यांना कर्ज मिळणे अवघड व्हावे, ह्यासाठी ठोस पावले उचलणाऱ्या ह्या गव्हर्नरच्या पोतडीत बँकिंग क्षेत्रातकल्या , जागतिक घाडामोडींच्या खूप साऱ्या गोष्टी आहेत. ह्या गोष्टी ह्या पुस्तकातील वेगवेगळया व्याख्यानांतून समोर येतात . रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारल्यापासून ते मुदत संपताच ,मुदतवाढ न मिळता पदभार सोडेपर्यंतच्या घडामोडी , तात्कालिक भाषणातून पहिल्या विभागात येतात . रघुराम राजन हे ‘हाडाचे शिक्षक ‘ असल्याने त्या त्या भाषणाचा श्रोतृवर्ग  ध्यानात घेऊन भाषणं लिहिलेली असल्याने काही ठिकाणी गरज नसलेल्या ठिकाणी सोपे  करून सांगितले आहे असे वाटते पण इतर बऱ्याच ठिकाणी श्रोत्यांचे पूर्वज्ञान गृहीत धरलेले असल्यामुळे काहीश्या अवघड गोष्टींविषयी पुरेसे स्पष्टीकरण आलेले नाही .अर्थ-वित्त क्षेत्राशी संबंधित नसणाऱ्या  व्यक्तींना  इतर काही माहितीस्रोतांचा पूरक वापर करावा लागला तरी त्यातून समजणारी माहिती ,हा खटाटोप अर्थपूर्ण बनवेल हे नक्की. ह्या पुस्तकाचा दुसरा विभाग आहे तो -२००८च्या जागतिक वित्तीय संकटाविषयी .ह्यात २००५ पूर्वीच्या अनेक घडामोडी , हे संकट ओढवण्यामागची पार्श्वभूमी ,ती टाळता आ ली असती का आणि कशी -ह्याविषयायी चार अतिशय उत्तम भाषणे आहेत . एक भारतीय अर्थतज्ज्ञ  म्हणून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा अभ्यास आणि  आहे .अनियंत्रित वित्त बाजारातील अनियंत्रित हवेतून संपूर्ण  जगाला आर्थिक संकटाच्या सामोर  उभे करणाऱ्या बँकर्सना त्यांच्यासमोर  येऊ घातलेल्या संकटाची जाणीव ह्यातल्या पहिल्या भाषणे केली होती . पुढच्या तीन भाषणांतून ,अमेरिकेच्या बेबंद धोरणांमुळे सगळ्या जगाला का आणि कोणकोणते परिणाम भोगावे लागले तेदेखाल ते सांगतात .

व्यावसायिक शिष्टाचार  म्हणून एक सेंट्रल बँकर दुसऱ्या सेंट्रल बँकरच्या धोरणावर जाहीर टीका करणे टाळतात ,परंतु ह्या व्यावसायिक शिष्टाचारापुढे सामाजिक उत्तरदायित्व मोठे मानून – अमेरिकन फेडरल रिझर्वच्या धोरणावर भारतीय गव्हर्नर म्हणून ते भाष्य करतात . ह्या मंदीतून निघण्यासाठी अमेरिकन फेडरल रेझर्व ने quantitative easing नावाच्या पूर्वी कधीही न वापरल्या गेलेल्या गोष्टीचा वापर केला -( ह्यात फेडरल रिझर्वने गव्हर्नमेंट बॉण्ड्स विकत घेऊन व्याजदर कमी केले . त्यामुळे जास्त  डॉलर्स अर्थव्यवस्थेत खेळते झाले, आणि त्यांची मोठी मंदी टाळली  )पण त्याचा व्यापक परिणाम इतर देशांवर झाला . ह्याविषयी फेडरल रिझर्व्हला आपले मत निर्भीडपणे कळवले .(ह्याविषयी माहिती मात्र, पहिल्या विभागात आहे. कारण हे भाषण त्यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर म्हणून केले होते.  )

पुस्तकाचा तिसरा विभाग आहे- त्यांच्या पूर्वीच्या अभ्यासातील( त्यांनी इतर अभ्यासकांसह  लिहिलेल्या ) सद्यपरिस्थितीत लागू पडेल अशा निवडक वेच्यांचा.

साम्राज्यवाद आणि भांडवलशाही  आणि विकसनशील देशांचा विकास ,आय .एफ .एम  आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांकडून मिळणाऱ्या विकास कर्जाचा खरा उपयोग कोणाला होतो आणि ते कर्ज कोण फेडतो, यासारखे महत्वाचे विषय या विभागात आहेत .

भारताला ‘बुलेट ट्रेन ‘ साठी मिळणाऱ्या कर्जाची खरी किंमत काय, अशा प्रश्नांची उत्तरे मिळवायला हा विभाग दिशादर्शक आहे. ह्या विभागातले लेख हे आय. एम .एफ मध्ये असताना लिहिलेले असल्याने पूर्वज्ञान गृहीत धरून लिहिलेले आहेत. हे लेख आणखी मोठे आणि सर्वसमावेशक असते तर बरे झाले असते.

या पुस्तकातली सर्वात वाचनीय  गोष्ट -म्हणजे ‘ताजा कलम’-पोस्ट स्क्रिप्ट . प्रत्येक व्याख्यानाच्या शेवटी (आणि काही ठिकाणी सुरुवातीला ) राजन यांनी  अतिशय चातुर्याने करूनही न केलेली टीका आहे . ‘समझनेवालोंको इशारा ही काफी है ‘कॅटेगरीतली ही टीका वाचणे हा ह्या पुस्तकातला सर्वात मजेचा भाग . उदाहरणच द्यायचे झाले तर – २ फेब्रुवारी २०१५ला गोव्यात डी .डी. कोसंबी व्याख्यानमालेत दिलेले भाषण – या भाषणांत त्यांनी एका सशक्त लोकशाहीचे १.सामर्थ्यशाली (स्ट्रॉंग ) सरकार २. कायदा आणि सुव्यवस्थेचे राज्य (rule of law ) आणि ३.लोकशाही उत्तरदायित्व (democratic accountability ) हे तीन आधारस्तंभ असतात हे फुकुयामाचे वाक्य उद्‌धृत केले आहे . त्याचे विवेचन करताना अर्थातच हिटलरचा उल्लेख येतो- सामर्थ्यशाली सरकार त्याचेही होते  खरेतर या भाषणात आक्षेपार्ह असे काहीच शोधता येत नाही पण ताजा कलम मध्ये राजन लिहितात-“या भाषणातले एक नाव वादग्रस्त ठरले ते म्हणजे -हिटलरचे .जर समाज माध्यमे त्याचा वेडावाकडा अर्थ लावतील हे मला जर माहित असते तर ते नाव मी वगळले असते. हे भाषण ,भारताच्या एकंदरीत त्रुटी कशारितीने कमी करता येतील , यावरील भाष्य होते- कोणतेही एक सरकार डोळ्यासमोर ठेऊन केलेली ती टीका नव्हती. मी या भाषणातून , सामर्थ्यशाली सरकार ,विशेषत: विद्यमान सरकारविषयी इशारा दिला असा त्याचा अर्थ काढला गेला . पण तरीही मी माझ्या भाषणातून निघू शकणाऱ्या साऱ्या इतर अर्थाना टाळू शकीन असे भाषण करू शकत नाही ”

तर या आणि अशा अनेक संयत आणि बौध्दिक आनंदाला सर्वसामान्य सुशिक्षित माणसाला पारखं करण्यासाठी किंवा त्यांच्या रीझर्व बँकेतल्या कार्यकाळात घेतल्या गेलेल्या नोटबंदीच्या पूर्वतयारीचे विद्यमान सरकारचे दावे , त्यावरचे राजन यांचे आक्षेप ,रिझर्व्ह बँकेचा आणि इतर बँकांचा कारभार सुधारण्यासाठी सुचवलेल्या योजना आदी गोष्टींविषयी – पुस्तक न वाचल्याने लोक अनभिज्ञच राहावेत यासाठी ,’डोसा-नोमिकस’ सारख्या ”कॉमिक ‘गोष्टीला प्रमाणाबाहेर प्रसिद्धी दिली गेली असावी.

अर्थात  ‘सवंग पत्रकारिता ‘ आणि ‘बातम्यांचे बटबटीत ‘सादरीकरण याने निर्ढावलेल्या जनमानसावर , या ‘मवाळ  भाषेतल्या ‘ , माहितीने भरलेल्या पुस्तकाचा कितपत परिणाम होणार हा एक प्रश्नच आहे .  अर्थशास्त्रां च्या , वित्तक्षेत्रातल्या  विद्यार्थ्यांसाठी आणि व्यावसायिकांसाठी, हे पुस्तक , अभ्यासक्रमाचा भागच असायला हवे पण त्याखेरीज काही दर्जेदार वाचू पाहणाऱ्या अभ्यासू वाचकाने सुद्धा हे पुस्तक अभ्यासावे असेच आहे .

ताजा कलम

बी.बी. सी च्या डोश्यावर लिहिलेल्या प्रश्नाचे उत्तर – डोश्याचा ‘इकोनॉमिकसशी’ बादरायण संबंध आहे किंवा काहीही घेणे देणे नाही .

 

सुप्रिया सरकारनी वाणिज्य व संगणकशास्त्रातील मास्टर्स व व्यावसायिक अभ्यासक्रम विशेष प्राविण्यासह पूर्ण केले आहेत. त्या लंडन मध्ये राहतात. जगभरातील मोठमोठ्या कंपन्यास कर व कायदेविषयक सल्ले देण्याचा व्यवसाय त्या करतात. आंतरराष्ट्रीय व्यापार व करआकारणी हा त्यांच्या विशेष अभ्यासाचा विषय आहे

Write A Comment